किमयागार कलाकार

 


आजपर्यंत मी अनेक चित्रकार, चित्रसंस्था, चित्रकारी उपक्रम तसेच चित्रकलेवरील पुस्तके अन चित्र प्रदर्शने यावर वृत्तपत्रे , मासीके, दिवाळी अंक यामध्ये असंख्य प्रकारे लेख लिहीले आहेत. या चित्रकलेने मला साहित्यिक जगतात लेखक म्हणून मान्यता मिळवून दिली. अर्थात या माझ्या लिखाणाला सुरुवात झाली ती सुमारे तीस एक वर्षांपूर्वी. कांही किरकोळ लेख लिहून झाल्यावर खरे तर मला लेखक बनविले ते नवशक्तीचे संपादक श्री प्रकाश कुलकर्णी यांनी. त्यांनी नवशक्तीच्या रविवारच्या 'ऐसी अक्षरे रसिके' या पुरवणीत चित्रकला या नैपुण्य विषयावर सदर लिहीण्यास सांगीतले, तेव्हां माझी छाती दबकूनच गेली. एखादा लेख लिहीणे हे तसे सोपे काम, पण सतत वर्षभर एका नैपुण्य विषयावर लिहिणे, तेही त्यात सातत्य राखून. हे काम माझ्याकडून होईल कीं नाही ही शंका मी त्यांच्याकडे उपस्थीत करताच त्यांनी सांगून टाकले, लिहाहो, तुम्ही अवश्य लिहाल. आणि माझा पहीला लेख प्रसीद्ध झाला. आणि त्यापुढे माझे दडपण नाहीसे झाले. मी आजवर पहात गेलो होतो, ते ते कलाकार, त्यांची कला संपदा, माझ्या नजरेसमोर तरळू लागली. आणि त्या एकेक कलाकाराला मी शब्दबद्ध करत गेलो. आणि बघता बघता महीने गेले, वर्षे सरली आणि तब्बल बारा वर्षे मी सातत्याने माझे ‘सृजनगंध’ हे सदर नवशक्तीमध्ये लिहीत गेलो. दरम्यान नवशक्तीच्या  पुरवणीला आपल्या कुंचल्याने नटवित असणारे सतीश भावसार यांनी माझ्या लेखांपैकी कांही निवडक असे लेख घेऊन त्यावर ' सृजनरंग' व 'कागद कॅनव्हास आणि कुंचला' ही दोन पुस्तके प्रकाशीत केली. त्याच वर्षी दैनिक लोकमतचा साहित्यविषयक ललितगद्य पुरस्कार माझ्या 'कागद कॅनव्हास आणि कुंचला' या पुस्तकाला मिळाला. यामागे प्रेरणा होती ती लोकमतचे त्यावेळचे संपादक श्री विजय कुवळेकर यांची. चित्रकलेची जाण असलेले, चित्रे पहाण्याची नजर असलेले, चित्रकारांच्या सहवासात वावरणारे अन त्याचें अंतरंग जाणणारे एक अभ्यासू अन वैचारीक व्यक्तिमत्व!

त्यानंतर 'चंद्रकांत' या दिवाळी अंकात संपादक श्री राजेंद्र कुलकर्णी यांनी माझ्याकडून त्यांच्या हयातीपर्यंत कलेच्या संदर्भात कांही खास असे दीर्घ लेख लिहून घेतले. राजेंद्र कुलकर्णी हे स्वतः वास्तुविशारद. सौंदर्यशात्राचे जाणते. त्यामुळे आपले दिवाळी अंक असोत वा पुस्तके, हे सुंदर आणि सुबक असे छापले जावेत याबद्दल ते जागरूक असत. अनेक प्रदर्शनांना भेटी देऊन त्यातील चित्रे देखील घेऊन त्यांनी मुखपृष्ठावर वापरली आहेत.  आणि माझे हे लेख जेव्हां उद्धव ठाकरे यांच्या नजरेला पडले, तेव्हां त्यांनी स्वतः होऊन आपल्या 'प्रबोधन प्रकाशन' तर्फे त्याचे पुस्तक करण्याची जबाबदारी घेतली. व हर्षल प्रधान यांनी ती मार्गाला लावली. आणि याचे नांव ठरले 'कलाडिस्कोप'. कलाडिस्कोप म्हणजे प्रत्येक चित्र पाहणारा दर्दी रसीक ते चित्र आपल्या नजरेतून पहात असतो. प्रत्येकाला त्याचा वेगळा अर्थ जाणवतो. आणि नेमकी हीच गोष्ट कलाडिस्कोप त्याचा कोन बदलला की वेगळे दृश्य दाखवीत असतो. ह्याच्या संकल्पनांची जबाबदारी आमचे मित्र व उपयोजीत कलाकार, सुलेखनकार श्री अमोल मटकर यांनी संपुर्ण पुस्तकाचे संकल्पन केले. माझा मुलगा हर्षद याने मुखपृष्ठ बनवले. व याचा प्रकाशन समारंभ मराठी दिनाच्या निमित्ताने वांद्र्याच्या 'रंगशारदा' मध्ये उद्धव ठाकरे, गजानन किर्तीकर, निळा गोऱ्हे, सुभाष देसाई, अनील देसाई, महापौर सुनील प्रभू, अश्या मोठमोठ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या हस्ते करण्यात आला.

आणि हा योग आता पुन्हां आला. तोही माझे एक सहकारी डॉ. गजानन शेपाळ यांच्या प्रयत्नामुळे. २०२२ साली 'लोकसत्ता' वृत्तपत्राने मला संपूर्ण वर्षभरासाठी एक कलाविषयक सदर लिहिण्याची संधी दिली होती. त्यातील लेख तसेच माझे ब्लॉगवरील इतर कांही लेख घेऊन मी 'किमयागार कलाकार' ह्या पुस्तकाची मांडणी करून ठेवलीच होती. कारण एकाशी बोलणे झाले होते. पण नंतर माझ्या ध्यानात आले केवळ स्वतःच्या  आर्थीक फायद्याचा  व्यवहार पाहणारी ती संस्था होती. त्याना ना माझ्या पुस्तकाची किंमत ना त्यातील सौंदर्य स्थळाची महत्ता, ना त्यातील महान कलाकारांच्या कलाविष्काराची जाण. त्यामुळे मी त्यांना नकार दिला. माझ्या नेहरू सेंटरमधील मधील प्रदर्शनाच्या वेळी श्री शेपाळ आले होते. त्यांना आपले 'रंगसभा' हे समकालीन चित्रकारावरील १०० चित्रकारांची माहीती देणारे पुस्तक मला द्यायचे होते. ते घेऊन जेव्हां ते माझ्या घरीं आले तेव्हां माझी पुस्तकाची कथा ऐकुन ते म्हणाले, सर मी जर पुस्तक काढले तर चालेल का? आणि मला तरी दुसरे काय हवे होते? आणि माझे सर्व लेख , आतील छायाचित्रे, वगैरे सर्व साहीत्य मी त्यांच्या हवाली केले. हे सर्व सुरु झाले गणपतीनंतर. व पुढील  केवळ तीन महीन्यातच शेपाळ झपाटल्याप्रमाणे कामाला लागले होते. प्रत्येक स्टेजला पुस्तकाची प्रगती मला दाखविण्यासाठी ते बेलापूरहून माझ्याकडे खारला येत असत. पुस्तकांत कोणत्याही प्रकारची बारीकशी चूकही राहू नये यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील होतो. पुस्तकाचा आकार, त्याची सुबक बांधणी, आतील लेआऊट, विषय प्रारंभ, मलपृष्ठ ह्या सर्वच बाबी देखण्या होण्यासाठी शेपाळ यांची धडपड चालू होती. मुखपृष्ठ माझा मुलगा हर्षद याने केले. तेही दाद घेणारे ठरले. अन त्याची उत्कृष्ट रित्या छपाई व्हावी म्हणून त्याला स्पॉट लॅमीनेशन करण्यात आले. आतील रंगीत चित्रांच्या सुबक छपाईसाठी चांगल्या प्रतीचा ग्लेझ कागद वापरण्यात आला. त्यानंतर सोशल मिडीयावरून शेपाळ यांनी पुस्तकाची जाहीरात करण्यास सुरूवात केली. आणि प्रकाशनपूर्व बुकींगही होवू लागले. 

अश्या सर्व बाजूनी आकर्षक झालेल्या 'किमयागार कलाकार'चा प्रकाशन सोहळा देखील तितक्याच तोलामोलाचा व्हावा, यासाठी शेपाळ कामाला लागले. समारंभाचे अध्यक्ष म्हणुन थोर विचारवंत साहित्यिक, कथाकार, कवी चित्रपट लेखकः श्री विजय कुवळेकर यांचा होकार घेतला. एकाने मला लिहीण्यास प्रोत्साहीत केले तर दुसऱ्याने मला माझ्या पुस्तकाला 'ललीत गद्य पुरस्कार' देवून त्यावर कळस चढवला. आणि आज ते दोघेही माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्याला एकत्र आले, हा तर माझ्या दृष्टीने सुवर्ण कांचन  योग होता. माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्यासाठी मला लेखक बनविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता, त्या प्रकाश कुलकर्णीनी ती लिहावी असा हट्ट मी त्यांच्याशी धरला. आणि त्यांनीही तो आत्मीयतेने पुरविला. आणि ते या समारंभाचे प्रमुख पाहूणे होते. शिवाय धर्मादाय सह आयुक्त श्रीमती सुवर्णा  जोशी/ खंडेलवाल याही होत्या.

समारंभाची सुरुवात संस्थेतील सर जमशेटजी जीजीभाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. श्री शेपाळ यांचे वडील ज्यांनी लष्करात आपली कारकीर्द गाजवली, त्याचा फोटो स्टेजवर होता. यांच्या नांवाने त्यांचे सुपुत्र श्री गजानन यांनी एस.व्ही.एस. ( सीताराम विश्वास शेपाळ) हा ट्रस्ट बनवून त्या आधारे अनेक समाजोपयोगी कलात्मक कामांना सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रतिमेला चाफ्याची सुवासीक फुले वाहून दीप प्रज्वलीत करण्यात आला. आणि त्यानंतर मोगऱ्याच्या सुवासिक फुलामध्ये रेशमी भगव्या वस्त्रात आच्छादित केलेल्या 'किमयागार कलाकार' च्या प्रती उघडून विजय कुवळेकरांनी त्यांचे उदघाटन केले. आपल्या लालित्यपूर्ण भाषणात विजय कुवळेकर व प्रकाश कुलकर्णी यांनी पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीविषयी अनेक बारकाईने अनेक गोष्टी सांगितल्या. व सर्वाना एका वेगळ्याच विश्वात नेले. साहीत्य अन कला यांचा सुरेख संबंध होता तो. प्रत्येकाचा सत्कार झाला. शेवटी माझी मुलाखत झाली व सर्वजण भोजनासाठी गेले. एकूण मंगल असा हा  गुरुवार  दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ हा दिवस माझ्या आयुष्यात एक नवी उमेद घेऊन आला. नव्या प्रेरणा देऊन गेला. आणि याचे सर्व श्रेय द्यावे ते डॉ. गजानन सीताराम शेपाळ यांना. ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य झाले. त्यांचाही तो जे.जे.मधील शासकीय सेवेचा शेवटचा दिवस होता. त्यांची नेमणूक झाली तोही गुरुवार होता. आजचा दिवसही गुरुवारचा. गुरूपुष्य योग असलेला.  

rajapost@gmail.com

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.

दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर