दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर

 


आज भारतातील जाहीरात कला ही केवळ भारतातच नव्हे, तर पाच्छात देशाबरोबर स्पर्धा करीत असल्याचे आपणास पहायला मिळते. आज जी जाहीरात कला, संभाषण कला अथवा उपयोजीत कला म्हणून आपण पहातो ती कशी विस्तारीत होत गेली याचा इतिहास देखील अभ्यासण्यासारखा होईल. आणि त्यासाठी आपल्याला सुमारे नव्वद वर्षे मागे जावे लागेल.
१८५७ साली सर जमशेटजी जीजीभाई यांच्या प्रयत्नाने आणि आर्थीक सहाय्याने स्थापन झालेल्या सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयाने अल्पावधीतच उच्च दर्जावर प्रस्थान केले. आणि एकापेक्षा एक निपुण असा शिक्षकवर्ग या संस्थेला लाभला. संस्थेचे वरीष्ठ हे इंग्लंडवरून येतं असत. अन पुढे भारतीय कलाकार शिक्षक म्हणून लाभण्याचे भाग्य या संस्थेला लागले. त्यातही पुढे कॅप्टन ग्लॅडस्टन सालोमन हे संस्थाप्रमुख झाले. व त्यांनी भारतीय कलेला देखील येथे स्थान दिले. जोडीला त्यांचे असीस्टंट जेरार्ड हे आधुनिकतेकडे वळणारे. त्यामुळे आधुनीक कलेकडे वळणारे विद्यार्थी त्यांच्याकडे वळत.
 
सॉलोमन हे फाईन आर्टला उर्जितावस्था आणणारे होते. वास्तववादी कलेला प्राधान्य देणारे. पण पुढे जेव्हां सरकारच्या ध्यानात आले की या कला क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊनही पुढे या कलाकारांना उपजीविकेसाठी साधन राहीले नाही, त्यामुळे त्या महायुद्धाच्या काळात कांही शासकीय योजना बंद करून पैसा वाचवण्यासाठी सरकारने थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली 'थॉमस कमीशन' नेमले. व त्या कमीशनने सदर कलाशाळा बंदच करावी असा अहवाल सरकारला दिला. व येथील जमीन विकून पैसा जमा करावा अशा कल्पनादेखील थॉमस याने सरकारला सुचवले होते. हे वर्ष होते १९३२. पण सॉलोमन यांना कलाक्षेत्र तसेच शासकीय स्तरावर वजन होते. त्यांनी मुंबईतील प्रतीष्ठीत लोकांना तसेच स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना, मुख्य वृत्तपत्रांना मदतीला घेऊन 'जे.जे.स्कुलचे रक्षण करा' ही चळवळ सुरु केली व  त्यांनी जे.जे.वरील अरीष्ट टाळले. तथापी वार्षीक प्रदर्शनाच्या वेळी गव्हर्नर साहेबांनी या स्कूल ॲाफ आर्टमध्ये एक असा अभ्यासक्रम सुरु करण्यास सांगीतले, त्या योगे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे काम करण्यास व उपजीविकेसाठी पैसे कमावण्यासाठी साधन उपलब्ध होईल. तेव्हां जेरार्ड यांच्या अधिकाराखाली १९३५ साली  एक स्वतंत्र विभाग सुरु केला. तो होता 'पोस्टर डिपार्टमेंट’. या अभ्यासक्रमात उत्पादनाच्या, सेवेच्या जाहीराती करण्याचे व्यावसायिक शिक्षण  तेथे देण्यात येऊ लागले. सुरुवातीला आजच्या क्राफ्ट डिपार्टमेंटमधील एक हॉल मध्ये हा वर्ग सुरु झाला. त्यासाठी आर्टस्कुलच्याच आरोरा नामक एका माजी विद्यार्थ्यांची नेमणूक झाली.  आणि त्या विभागाला तशाच तोलामोलाच्या व्यक्तीचा शोध सुरु झाला. आणि शेवटी टाइम्स ऑफ इंडीयाच्या कला विभागात काम करणाऱ्या श्री वि.ना.तथा दादासाहेब आडारकर यांच्यापर्यंत येऊन हा शोध संपला. दादांचे कलागुण, व्यवस्थापकीय चातुर्य, लोक संग्रह करण्याचे त्यांचे कसब या अंगभूत गुणामुळे शासनाने त्यांना जे.जे.मध्ये आमंत्रीत करून हा पोस्टर विभाग त्यांना सुपूर्द केला.


आरंभी हा विभाग तसा चाचपडतच होता. कारण देशात अजून पाहीजे तसे उत्पादन होत नव्हते. कारखाने उदयाला आले नव्हते. त्यामुळे जाहीरात करण्याला तसा वाव नव्हता. मात्र पुढे जगात दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहु लागले. भारतावर देखील त्याचा परीणाम झाला. युद्धावर जसा सैनिक लढत असतो, तसेंच देशातील जनतेसाठी त्यांना धैर्य द्यायला, त्यांना समाज शिक्षण द्यायला देखील संदेश माध्यमांची जरुरी असते. आणि त्यासाठी जे.जे.च्या कमर्शिअल आर्ट विभागाची सरकारला जरुरी भासली. आणि अनेक पोस्टर्स, लेआऊट, सिनेमा स्लाईडस अश्या माध्यमांनी जनतेला धीर देण्यासाठी प्रसार साहीत्य निर्मिती या विभागाकडून करण्यासाठी झाली. आणि यापुढे या विभागाची भरभराट चालू राहीली. आणि जेथे पूर्वी जाहीरात क्षेत्रांमध्ये फाईन आर्टीस्ट कामे करीत होती, तेथे आता शास्त्रशुद्ध जाहीरात कला शिक्षण घेतलेले कलावन्त या क्षेत्राला मिळू लागले.

विष्णू नामदेव तथा दादा आडारकर हे एक हरहुन्नरी व्यक्तीत्व होते. वेंगुर्ल्यातील जन्म. त्यामुळे कोकणी माणसाचा बेरकीपणा त्यांच्यात होताच. शिवाय थोरामोठ्यांमध्ये वावरण्याची संधी मिळाल्याने स्वभावातही सभाधीटपणा आला होता. कोकणातील माणसामध्ये कला ही बहुदा जन्मजात असते. मग ती चित्रकला असो, संगीत कला असो वा नाट्यकला, कोकणी माणूस ह्या कला जगतो. लहानपणी जे.जे. स्कुल मध्ये शिकत असतांना ते सुटीत जेंव्हा गावी येत, तेव्हां आपल्या सवंगड्याना ते आर्ट स्कुल मधील गमती सांगत असत. तेथील शिक्षकांच्या कामाबद्दल सांगत असत. जोडीला त्यांचे लहान बंधू भास्कर असत. अश्याच एका दिवाळीच्या सुटीत मालवणहून आलेल्या क्रिकेट टीमची मॅच पहायला गेले असता, दादांना तिथे मालवणचा एक चित्रकलेची आवड असलेला मुलगा भेटला. त्याचे नांव होते प्रल्हाद धोंड. दादा त्यावेळी शरीराने बारीक आणि उंच होते. धोतराचा काचा मारून वावरत असे. मात्र भास्कर थोडासा मितभाषी. आणि येथे दादा व प्रल्हाद तथा भाई या दादा-भाईंची मैत्री घट्ट झाली. आठवडाभर राहीलेल्या त्या वेंगुर्ल्याच्या काळात आडारकर बंधू, इतर मित्र व भाई फिरायला जात व दादा सर्वाना आर्ट स्कुल मधील कलात्मक वातावरण रसभरीत करून सांगत असत. आणि यामुळे भाई धोंडाची जे.जे.ला जाण्याची उत्सुकता वाढत असे. दादा त्यावेळी चौपाटीवरील बॉडीगार्ड बिल्डिंग मधील पहील्या माळ्यावरील खोलीत भास्कर सहीत रहात असत. त्या इमारतीत गव्हर्नरचे बॅाडीगार्ड रहात असत, म्हणून तिला बॅाडीगार्ड बिल्डींग म्हणत.  दादा आर्ट स्कुलचे विद्यार्थी तर भास्कर विल्सन कॉलेजचे. पुढे हे भास्कर रिझर्व बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले.


१९३० साली दादांचा डिप्लोमा पूर्ण झाला. या काळात त्यांना नगरकर मास्तर, चुडेकर मास्तर यांचे मौलीक मार्गदर्शन मिळाले.    या दोघांही आडारकर बंधूनी आपले शिक्षण शिष्यवृत्यांवर केले. डिप्लोमा नंतर दादा 'स्ट्रोनॅक्स' या जाहीरात एजन्सीत कामाला लागले. संध्याकाळी भाई गिरगावातून चालत चौपाटीवरील दादांच्या घरी पोचले की दादा, भास्कर व भाई बॅंडस्टॅंड मागील पायऱ्या चढून हॅंगींग गार्डनवर जात. आणि तेथे कला विषयावर गप्पा मारत चकरा सुरु होत. कधीकधी ब्रीच कॅंडीवर जात असत. मग दादा बरीचशी भेळ आणून खडकावर बसून गप्पा मारीत खात असत. पुढे दादा स्र्ट्रोनॅक्स मधून टाइम्स ऑफ इंडीया वृत्तपत्राच्या कला विभागात गेले. टाइम्स मध्ये त्याकाळात ब्रिटिश कला दिग्दर्शक असत. विशेषतः टाईम्सची स्वतःची प्रकाशने असल्याने सर्व प्रकारचे काम तेथे होत असे. याचा दादांना नक्कीच फायदा झाला. शिवाय व्यवस्थापनाचा अनुभव देखील त्यांना मिळाला. याच दरम्यान जे.जे.मधील पोस्टर विभाग हा बाहेरील बॅरॅक्स मध्ये हलविण्यात आला. कमर्शियल आर्ट या नांवाने तो आता ओळखू जाऊ लागला.

याच सुमारास जे.जे.स्कुलचे डायरेक्टर सालोमनसाहेब निवृत्त झाले. व तेथें जेरार्ड यांची डायरेक्टर म्हणून नियुक्त झाले. या दरम्यान दादांना टाईम्समध्ये सात आठ वर्षे झाली होती. इथे जे.जे. मध्ये कमर्शीअल आर्ट शिकवणाऱ्या आरोरा यांना काढून टाकल्यावर ती जागा रिकामी झाली होती. व त्या जागेवर दादासाहेब आडारकर यांचा स्ट्रोनॅक्स व टाइम्स मधील अनुभव व तेथील कार्य ध्यानात घेऊन जेरार्डसाहेबाने त्यांची कमर्शिअल आर्ट विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक केली. व येथून दादा आडारकर यांचे कला शिक्षक म्हणून जे.जे.च्या प्रांगणात पाऊल पडले. आणि दादांनी कला शिक्षणाच्या भवितव्याची स्वप्ने पहाण्यास व ती अंमलात आणण्यास आरंभ केला. आतापर्यंत दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वात बराच फरक पडला होता. त्यांच्या विवाहानंतर त्यांची किडकिडीत शरीरयष्टी जाऊन ते अंगाने भरले होते. गोरापान  वर्ण, उंच बांधा, मागे उलटे फिरवून बसवलेले केस ह्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात भरच टाकीत होत्या. ते रुबाबदार दिसू लागले होते. कोणावरही सहजी त्यांची छाप पडत असे.  आणि महत्वाचे म्हणजे त्याचे गोड मिठास बोलणे. कोणीही भेटला तर अगदी खांद्यावर हात ठेवून त्यांची विचारपूस करणे, त्याच्या कुटुंबाविषयी चौकशी करणे या मुळे सर्वानाच ते आपलेसे वाटत. या दरम्यान शासनाने दादांना लंडनला कला शिक्षणाची अधीक माहीती घेण्यासाठी इंग्लंडला पाठवले.
 


दादांकडे कमर्शिअल विभाग आला त्यावेळी स्कुल ऑफ आर्टच्या अधिपत्याखाली पेंटींग सोबतच इतर विभाग होते, ते म्हणजे  वास्तुशात्र, शिल्प, कला व हस्तव्यवसाय आणि शिक्षक प्रशिक्षण आणि त्याबरोबरचा हा कमर्शिअल विभाग. पण दादा त्या विभागात येताच दादांची कर्तबगारी आणि दरारा यामुळे या विभागाचा बराच बोलबाला होऊ लागला, आणि इतर विभाग दुर्लक्षीत राहू लागले. यावेळी जेरार्डच्या झाली डेप्युटी डायरेक्टर असलेले एम. आर. आचरेकर तेथून निघून गेले, व त्या जागी आडारकरांची डेप्युटी डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली. विशेषतः जेरार्ड यांचा त्यांना पाठींबा होता. आणि दादा त्याकाळच्या डायरेक्टर व डेप्युटी डायरेक्टर साठी असलेल्या बंगल्यात राहायला गेले. पण कांही दिवसातच लोकसेवा आयोगाकडून त्या पदावर देऊस्कर यांची नेमणूक झाली. पुढे देऊस्करांनीही स्वतःला काम करायला वेळ मिळत नाही या कारणाने ते पद सोडले, व दादा पुन्हां त्या पदावर स्थानापन्न झाले. पण पुन्हां तेथे अडूरकर आले. मात्र अडूरकरांच्या कारकिर्दीत कला शिक्षण समितीच्या शिफारशीनुसार डेप्युटी डायरेक्टची जागाच रद्द करण्यात आली व दादा हे विभागप्रमुख राहीले. नंतर सरकारने जे.जे.या संस्थेची विभागणी करून तीन स्वतंत्र संस्था निर्माण केल्या त्या अश्या, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट, सर जे.जे.कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाईड आर्ट. कमर्शिअल आर्ट विभाग स्वतंत्र होताच दादांनी संस्थेच्या प्रांगणात असलेले सिडनहॅम कॉलेज चर्चगेट येथील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरीत झाल्यावर रिकामी इमारत शासनाकडे शब्द टाकून मिळवली. व तेथे कमर्शिअल आर्ट ही संस्था १९५८ साली हलवून तिचे नामाभिदान 'सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाईट आर्ट ' असें करवून कमर्शिअल आर्टला एक मानाचा दर्जा दिला.   एक स्वतंत्र संस्था म्हणून ती कार्यरत ठरली व  दादा आडारकर हे तिचे पहीले प्राचार्य ठरले. व कांही दिवसांतच डीन हा मानाचा 'किताब त्यांच्या नावांमागे लागला. ज्या बंगल्यात लॅाकवूड किपलींग रहात असताना त्यांचा पुत्र व नोबेल प्राईझ विनर रूडयार्ड किपलींग जन्माला आला, तेथेच दादा आडारकर या द्रष्ट्या कलोपासकाचे वास्तव्य झाले.

१९६० साल या संस्थेने पाहीले ते एक गौरवशाली वर्ष म्हणून. संस्थेने पंचवीस वर्षे पूर्ण केली. आणि तो सोहळा साजरा करण्यासाठी दादा आडारकरांनी शासकीय स्तरावर ते करण्याचे योजीले. संस्थेत पाच दिवस चाललेल्या या मंगल सोहोळ्याला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. राधाकृष्णन, न्यायमूर्ती छगला, चिंतामणराव देशमुख, धोंडो केशव कर्वे, पंडीत श्री. दा.सातवळेकर, यशवंतराव चव्हाण, आदी मान्यवरांचे शुभ संदेश लाभलं होते. आपल्या देशातून टाईम्सचे माजी कला संचालक वॅाल्टर लॅंगहॅमर, व जे.जे.स्कूलचे माजी अधीष्ठाता ग्लॅडस्टन सॅालोमन यांचेही संदेश आले. या रौप्यमहोस्तवाची आठवण म्हणून संस्थेच्या विद्यार्थ्यानी श्रमदान करून संस्थेच्या प्रांगणात 'आर्ट अँड इंडस्ट्री' चे प्रतीक म्हणून एक भव्य पुतळा उभा केला. नामांकीत शिल्पकार श्री नारायणराव पाणसारे यांनी तो आडारकरांच्या व संस्थेच्या प्रेमाखातर बनवून दिला. या कामात लंक्ष्मण आजगावकरांनी त्यांना मदत केळी होती. या शिल्पामधील स्त्रीच्या एका हातात घड़ा व दुसरा हात औद्योगीक प्रगतीचे प्रतीक असलेली औद्योगीक चक्रावर दाखविला आहे. आणि पुढे हेच शिल्प 'कला नगर' ही कलावंताची नगरी उदयास आणण्यास कारणीभूत ठरले.

कला नगरची निर्मिती


आर्ट अँड इंडस्ट्रीचे शिल्प बनवतांना पाणसारे नेहमी उपयोजीत कला संस्थेत येत असत. खाली शिल्पाच्या कामाची पहाणी करून झाल्यावर ते वरती दादांना भेटायला येत. नंतर बराच वेळ त्यांच्या गप्पा चालत. एक दिवस पाणसारेनी त्यांना आलेल्या कटू अनुभवाची गोष्ट सांगितली. चेंबूर येथे जागतीक कीर्तीचे शिल्पकार नानासाहेब करमरकर यांनी आपला भव्य स्टुडिओ उभारला होता. त्याच्याच शेजारी पाणसारे व चित्रकार बेंद्रे यांनी अल्प दरात शासनाकडून प्लॉट मिळवले होते. स्वतःचा स्टुडिओ उभा रहाणार अशी स्वप्ने पाणसारे पहात असताना एक दिवस शासनाने अचानक त्यांचे प्लॉट ताब्यात घेतले व त्यांचे पैसे परत केले. पण एवढ्या अल्प किमतीत दुसरी जागा मिळणे अशक्य होते. स्वतःच्या मालकीचा स्टुडीओ उभारण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. तेव्हां इतरत्र कोठे जागा मिळेल का पहा अशी त्यांनी दादांना गळ घातली. दादांच्या मनाने दूरवरचा विचार करण्यास सुरुवात केली. केवळ पाणसारे, बेंद्रेच नव्हेत, तर इतरही चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद अश्या लोकांना एकत्र येण्याचा, काम करण्याचा वाव मिळेल. दादांचे बऱ्याच उच्चपदस्थ व्यक्तींशी जवळीकीचे संबंध होते. त्यांच्याकडे अनेक नामांकीत चित्रकारांचा सतत राबता असे. त्या सर्वांसोबत दादांनी हा विचार मांडला. पण स्वतःचे घर बांधणे म्हणजे २०-२५ हजार रूपांची तयारी हवी. आणि चित्रकारांचे उत्पन्नही त्या काळात जास्त नसे. शिवाय चित्रे काढण्यास त्यांना स्टुडीओची आवश्यकता नव्हती. ती होती केवळ शिल्पकारांना. म्णून बऱ्याच मंडळीनी त्यात उत्साह दाखवला नाही.


पण दादांना स्वस्थ बसवेना. या  काळात सहकारी चळवळ मोठ्या जोमात सुरु होती. अनेक संस्था सहकारी तत्वावर उभ्या रहात होत्या. सरकार देखील यांना मुबलक पैसा पुरवीत होते.  याचाच लाभ घेण्याचा दादासाहेबांनी ठरवले. आणि कलावंतासाठी वेगळी वसाहत बनवण्याचा त्यानी चंग बांधला. आता प्राशन होता योग्य जागा शोधण्याची. ही जबाबदारी त्यांनी अजगांवकर व पाणसारे त्यांच्यावर सोपवली. या दोघांनी अनेक जागा पाहील्यावर खार दांडा येथील जागा निश्चित केली. ती पहायला जाताना त्यांनी जे.जे.चे प्राध्यापक वसंत परब यांना सोबत घेतले. जागा सुंदर होती. निसर्गाचे सान्निध्य तिला लाभले होते. पण परबानी जेव्हां बारकाईने पाहीली तेव्हां त्यांना जाणवले की येथे पुढे विस्ताराला वाव नाही. ते स्वतः बांद्रा पूर्वेला महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या भव्य सोसायटीमध्ये रहात होते. त्यांनी त्याच्या पुढील बरीच मोकळी असलेली जागा या दोघांना दाखवली. येथे पुढे विस्तारालाही वाव होता. आणि तेथील वातावरण देखील कलेशी निगडीत होते. दादानी ताबडतोब त्याजागेचे आराखडे तयार करण्यास सांगितले. त्यांना केवळ वस्तीसाठी कलाकारांना एकतर आणायचे नव्हते, तर त्यांनी स्वप्न पाहीले ते भोपाळच्या धर्तीवर एक कला केंद्र उभारण्याचे. यामध्ये आर्ट ग्यालरी असेल. वसतिगृह असेल. आणी याच प्रस्ताव करून त्यांनी त्याकाळचे महसूल मंत्री मा. वसंतराव नाईक व महसूल राज्य मंत्री मा. मधुकरराव चौधरी यांना सादर केला. जेव्हां त्यांनी दादांना मुलाखतीला बोलावले, तेव्हां दादांनी आपले सर्व चातुर्य पणाला लावून आपली योजना त्यांना सादर केली. फ़क्त दादा बोलत होते. व वसंतराव आणि मधुकरराव ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भावविष्कारावरूनच कळाले की दादांनी बाजी मारली. आणि कलानगरसाठी शासकीय वसाहतीसाठी त्यांनी अल्प किंमतीत जागा मिळवली.

वातावरण निर्मिती म्हणून दादांनी आणखी एक योजना केली. ती होती कलानगर समोर एक भव्यसा लामणदिवा बसवण्याची. महाराष्ट्र राज्याचे प्रतीक असलेला भव्य असा लामणदिवा श्री पाणसारे आणि श्री अजगांवकर यांनी तयार केला. आजही मोठ्या दिमाखात तो तेथें उभा आहे. कलानगर या वास्तूची मुहूर्तमेढ १९६१ सालच्या दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात आला. आणि आज जो रेल्वेवरील फ्लाय ओव्हर दिसतो तो देखील दादांच्याच प्रयत्नाचे फलीत आहे. बांद्रा पश्मिमेकडून पूर्वेला जोडणारा पूल कला नगरसाठी बांधून घेणे हे केवळ दादानाचं श्यक्य होते. आज कलानगरमध्ये चित्रकार- शिल्पकार- छायाचित्रकार-व्यंगचित्रकार राहून गेले. दादासाहेब आडारकर यांनी अनेक कलाकारावर केलेले हे अगणित उपकार आहेत.

पुढे दादासाहेब बंगल्यात डीन म्हणून रहात असतानाच त्याचे बालपणाचे मित्र प्रल्हाद उर्फ भाई धोंड तेथील मागील भागात फाईन आर्टचे डीन म्हणून रहायला आले. दादाची पत्नी, मुले ही नेहमी त्यांच्याकडे व धोंडांच्या मुली दादांकडे असे नेहमी जात येतं असत. एवढा त्यांचा घरोबा होता.  दादा बंगल्यावर राहीले तेही युरोपियन अधिकाऱ्याप्रमाणे. वरच्या मजल्यावरूनच आंघोळ, दाढी करून कपडे करूनच ते खाली येत. ब्रेकफास्ट केल्यावर ऑफिसला निघत. त्यांचा शिपाई दत्ताराम सोबत असायचा. आणि रुबाबदार असे दादा उपयोजीत कला संस्थेत पाय टाकीत असत. दादांचा जनसंपर्क खूप मोठा होता. अनेक राजकारणी, मोठमोठे कलावंत, खाजगी कंपनीतील अधिकारी, जाहीरात एजन्सीचे कला दिग्दर्शक अश्यांचा त्यात समावेश असे. त्यामुळे कोणीही नोकरीसाठी त्यांच्याकडे आला की या ओळखीमुळे दादा कुठे ना कुठे त्याला चिटकवून देत असत. शिवाय बं. नाथ पै हे त्यांचे भाचे असल्याने त्यांचाही त्यांना फायदा होत असे. शिवाय त्याचे बंधू रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर. अशा सुसंस्कृत व सुशिक्षित घराण्याचे वलय लाभले होते दादासाहेब आडारकरांच्या घराण्याला.  नाथ पै हे मुंबईला आले की दादांकडेच त्यांचा मुक्काम असे. येथेच आम्ही नाथ पै यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळची प्रसिद्धीची कामे केली.   स्कुल ऑफ आर्ट हे केवळ दादांच्या नावावर ओळखू जाऊ लागले. याला कारणही तसेंच होते. शासनाची अनेक मोठमोठी कामे ही उपयोजीत का कला संस्थेकडे येत ती दादांच्या ओळखीमुळे. यशवन्तराव चव्हाण, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई अश्या राजकारणी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आल्या. मधुकरराव चौधरी तर स्कुल ऑफ आर्टचे महत्व जाणून वेळोवेळी त्यांना मदत करीत असत. आणि केवळ यामुळेच 'कला नगर' सारखी वसाहत त्यांनी निर्मिली. कोकणातून जर कोणी आले तर त्याच्याशी मालवणी भाषेत ते बोलत. त्यामुळे आलेली व्यक्ती त्यांचीच होऊन जात असे.

दादांच्या कारकिर्दीत उपयोजीत कलासंस्थेचा आलेख नेहमी चढता राहीला. प्रसंगोचीत काम करण्याची समयसूचकता दादांमध्ये पुरेपूर होती. १९६४ साली मायकेल अँजेलो यांच्या चारशेव्या पुण्यतिथीचे निमित्त साधून मोठमोठ्या कलावंतांकडून त्यांनी संस्थेमध्ये भित्तिचित्रे रंगवून घेतली. यामध्ये व्ही.एस.गुर्जर, डॉ.मनोहर जोशी, वाघूळकर, यशवन्त चौधरी, रवी परांजपे, शांताराम पवार, चिंतामण तिरोडकर आदी कलावंतांनी सांघिकरीत्या काम करून एक वेगळाच उपक्रम केला. जे.जे.च्या इतिहासात प्रथमच घडलेला एक अभूतपूर्व प्रायोग होता तो.

पुढे २२ जून १९६५ साली महाराष्ट्र शासनाने राज्यात 'कला संचालनालय' स्थापन केले. त्याचे पहीले 'कला संचालक' म्हणून दादांची नियुक्ती केली. संपूर्ण भारतात महाराष्ट्रामध्येच कला संचालनालय आजमितीला आहे. शासनाला कलात्मक कामामध्ये मार्गदर्शन करणे, उच्च कला शिक्षणाचा दर्जा वाढविणे, शासकीय व खाजगी कला संस्थांवर नियंत्रण ठेवणे हे कला संचालनालयाचे स्वरूप होते. त्यांच्या कारकिर्दीत शासनाची अनेक कलात्मक कामे ह्या संस्थेमध्ये झाली. १९६२ च्या चिनी आक्रमणाच्या वेळी आयोजीत केलेले 'आमचा हिमालय' व १९६६ मधील 'आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा' या दोन प्रदर्शनाचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तसेच पंचवार्षीक योजनांची भित्तिचित्रे देखील याच संस्थेत झाली. दादांनी कला शिक्षणाशी निगडीत अश्या अनेक गोष्टी केल्या. त्यापैकीच संस्थेच्या आवारातील 'शासकीय मुद्रण संस्था' व पवई येथील आय.आय.टी. येथे 'इंडस्ट्रिअल डिझाईन सेंटर' याची निर्मिती केली. या दोन्ही संस्था उपयोजीत कलेचा एक विभाग म्हणून त्यांनी उभारल्या. दादांच्या आयुष्यात त्यांना अनेक मान सन्मान मिळाले. त्यापैकी 'भारत सरकारने 'पदमश्री' 'किताब देऊन त्यांना गौरविले. जाहीरात क्षेत्रात केलेल्या असाधारण कार्याबद्दल त्यांना 'खटाव सुवर्ण पदक ' मिळाले.  महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव  केला. परदेशात जाहीरात कला कश्या प्रकारे राबवली जाते याचा अभ्यास करण्यासाठी शासनातर्फे त्याना इंग्लंडलाही पाठविण्यात आले होते.  

आणि १९६८ साली दादा शासकीय सेवेतून निवृत्त झाले. पण ते कधी निवृत्त जीवन जगलेच नाहीत. इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटरचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहीले,  तसेच पुढे 'इंडीयन एक्सप्रेस' चे व 'लोकसत्ता'चे सल्लागार कला संचालक  म्हणून त्यांनी काम पाहीले. ते निवृत्त झाल्यावर देखील या उपयोजीत कला संस्थेकडे त्यांचे लक्ष असे. या संस्थेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. संस्थेचा अधिष्ठाता झाल्यावर जेव्हां त्यांना भेटण्यास गेलो त्यावेळी त्यांनी मला संस्था कशी चालवली पाहीजे याचे धडे दिले. नंतर मात्र ते भूतकाळातील रम्य आठवणीत जात व त्यातील हकीकती सांगत. दोनही मुली विवाह होऊन बाहेरगावी असल्यामुळे घरी त्यांची पत्नी ताई व ते असे दोघेच त्यांच्या 'आडारी' या कलानगर मधील बंगल्यात असत. मुलगा राजन हा अमेरीकेत होता. कधी त्यांच्याकडे गेल्यास मग त्यांच्या गप्पाना सुरुवात होत असे. कसे आपण कला नगर निर्माण करून कलावंतांना एकत्र आणले हे सांगत, तर् कधी कुणीतरी आपला बंगला विकून तेथें आता इमारत होणार ह्याची त्याना खंत असे. मात्र माझा 'आडारी' बंगला राहणारच हे देखील ते अभिमानाने सांगत.

आणि वयाची ८४ वर्षे ते समृद्ध जीवन जगले. शेवटी आजारपणामुळे त्यांची तब्येत ढासळत गेली. त्यांना भेटण्यासाठी मी इस्पितळाच्या गेलों असता तेथेही ते खुप बोलत होते. आणि १३ मे १९९४ रोजी, अक्षयतृतीयेच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. जाहीरात कलेच्या क्षेत्रांत क्रांती घडवणारे दादा आडारकर गेले, त्यावेळी वृत्तपत्रांनीही त्यांची विशेष दखल घेतली नाही. तेव्हां त्यांच्यावर एक पानभर लेख लिहून मी लोकसत्ताचे संपादक श्री अरुण टिकेकर यांचेकडे गेलो. व त्यांना सांगताच त्यांनी माझा ‘द्रष्ट्रा कलोपासक' हा आडारकरावरील संपूर्ण लेख लोकसत्तेत छापला. तो वाचून त्यांचे बंधू भास्कर आडारकर यांनी मला पत्र लिहून माझें आभार मानले.  जाहीरात क्षेत्रातील एका पर्वाचा अंत होता तो !

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
rajapost@gmail. com



Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.