Posts

Showing posts from October, 2020

कला क्षेत्रातील प्रसन्नता : डॉ. शरयू दोशी.

Image
  शरयू दोशी हे नांव घेताच आपल्या डोळ्यासमोर येते ते  एक अतीशय प्रसन्न चेहऱ्याचे, देखणें असे हसतमुख व्यक्तीमत्व. आणि त्याचसोबत येते ती म्युझियम समोरील मोठ्या दिमाखात उभी असलेली 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट'ची भव्य अशी गोलाकार दगडी इमारत, ज्यामध्ये देश विदेशातील महान कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शीत केल्या जातात. तसाच त्यांचा संग्रहही केला जातो. आत गेल्यावर तेथील स्थापत्यरचना प्रथम आपले लक्ष वेधून घेते. संपूर्ण गोलाकार असलेल्या या इमारतीमध्ये पाच लेव्हल्स आहेत. प्रत्येक लेव्हलवर वेगवेगळी प्रदर्शने आकार घेत असतात. येथे सर्वसाधारण गॅलरीप्रमाणे कोणी प्रदर्शने भरवू शकत नाही. तर चित्रकारांचा व चित्रांचा दर्जा विचारात घेऊन त्यांची प्रदर्शने क्युरेट केली जातात. अश्या या खास प्रदर्शनांना आपण जेव्हां भेट देतो ती चित्रे, शिल्पे, छायाचित्रे, आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातात. आणि याच गॅलरी मध्ये स्वतः जातीने उपस्थीत राहून वातावरण प्रसन्नमय करणारे, सुहास्य मुद्रेने वावरणारे एक व्यक्तीमत्व वावरत असे. डॉ. शरयू दोशी! दोशी नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात ती उद्योगपती वालचंद हिराचंद, लालचंद हिरा

महाराष्ट्राचा सांस्कृतीक खजीना : दी बॉंबे आर्ट सोसायटी

Image
भारतीय कलेचा इतीहास हा भारतीय संस्कृती इतकाच प्राचीन आहे. कालानुरूप त्याच्यावर प्रत्येक कालखंडाचे प्रभाव पडत गेले. त्यातून व्यक्त होणारी भावना बदलत गेली. त्या व्यक्त करण्याच्या पद्धती बदलत गेल्या. आणि याचा प्रभाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतातील मुंबई, कोलकाता, मद्रास अश्या शहरावर पडला. याला कारण होते ते, ब्रिटिशांनी येथें सुरु केलेल्या कला शाळा. आणि यातूनच स्थापन झाली ती आपल्या देशातील कलेच्या संदर्भातील कार्य करणारी एक गौरवशाली कला संस्था 'दी बाॅंबे आर्ट सोसायटी'. देशातील एक सर्वात जुनी अशी अग्रगण्य कला संस्था.   1888 साली अस्तीत्वात आलेल्या झालेल्या 'बॉंबे आर्ट सोसायटी' ची स्थापना मूलतः ब्रिटिश कलाकारांना प्रोत्साहीत करण्यासाठी झाली. तसेच या देशातील हौशी कलावंतांना प्रोत्साहन देणे व सर्वसामान्य जनतेमध्ये कलेचा प्रसार होऊन त्यांची अभिरुची वाढवणे हाही उद्देश त्यामागे होता. अर्थात त्या काळातील इंग्रज अधिकारी तसेच त्यांच्या स्त्रिया याना उत्तेजन देणे हा एक अंतस्थ हेतू त्यामध्ये होताच! त्यामुळे कांही सुविद्य नागरीकांच्या सहाय्याने या सोसायटीची मुहूर्तमेढ रोवून कांही प्

विचारवंत समीक्षक- सर्जनशील कलावंत : प्रा. संभाजी कदम.

Image
  संभाजी कदम सरांची पहीली भेट मला अजूनही आठवते. त्यापूर्वी जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील या शैलीदार आणि सर्जनशील कलाकारांची नांवेच फक्त ऐकून होतो. आणि त्याला कारणही तसेच घडले. माधवराव सातवळेकर त्यावेळी कलासंचालक म्हणून कार्यरत होते. एक जबरदस्त ताकदीचा वास्तववादी कलाकार आणि तेवढ्याच ताकदीचे प्रशासकीय काम पहाणारे कलासंचालक म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा कांही कामानिमित्त त्यांनी मला बोलावले होते. त्यांच्या केबिनमध्ये जाताच मला समोरच दिसले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भव्य असे लाईफ साईझ पेंटींग. त्या तैलरंगातील व्यक्तिचित्रात डॉ. आंबेडकरांचे पुरेपूर व्यक्तिमत्व व्यक्त होत होते.क्षणभर मी भान विसरून त्या पेंटींगचे निरीक्षण करु लागलो. त्या पेंटींग शेजारीच एक कोट, टाय वगेरे परीधान केलेली व काखेत एक चामड्याची बॅग धरलेली किरकोळ शरीरयष्टिची एक प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती चेहऱ्यावर निरागस हास्य आणून उभी होती. 'यांना ओळखता का?' मला सातवळेकरांनी विचारले. क्षणभर मी प्रश्नार्थक चेहरा करून उभा राहीलो. 'अहो! हे संभाजी कदम.' सातवळेकरनी त्या व्यक्तीचे नांव सांगताच आदराने माझी मान त्यांच्य

मातीच्या कणातून माणूस साकारणारा प्रतिभावान शिल्पकार : भगवान रामपुरे.

Image
  १९९३ सालची गोष्ट आहे ही. सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या त्या शिल्पकाराच्या आयुष्यातील स्वतःच्या स्टुडिओची निर्मिती होती त्यादिवशी. गोरेगावच्या भाड्याने घेतलेल्या स्टुडीओत आधी तयार केलेल्या आपल्या मातेच्या शिल्पासोबतच आपल्या कुटुंबीयाचे 'मदर ॲंड चाईल्ड' ह्या शिल्पाची सुरुवात करून आपल्या स्टुडिओचे उदघाटन करायचा घाट घातला होता त्याने. एवढ्यात एका कर्मचाऱ्याने सांगितले, आज पूजा करायची आहे. त्यासाठी एखाद्या देवाची मूर्ती ठेवून तिची पूजा करून स्टुडिओचे उदघाटन करावे. शिल्पकाराने शेजारीच असलेल्या ओल्या मातीतून एक गोळा उचलला. आणि दोन्ही हातानी त्याला पिळवटून एक आकार दिला. आणि त्यातून घडली गणेशाची अमूर्ताकारातील एक सुबक मूर्ती. ती मूर्ती त्या शिल्पकाराने घडवली नव्हती. तर एक अदृश्य शक्तीने त्याच्याकडून बनवून घेतली होती. त्या गणेशाकडे पहाताच शिल्पकाराच्या मनातून आनंदाच्या लहरी उमटून गेल्या. आणि त्याने ठरवले, हा गणेश आता कायमचा ठेवायचा. आणि त्याचा मोल्ड काढून त्यानें अनेक फायबरचे गणेश आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी बनवले. एक दिवस त्याचे एक क्लायंट कामासाठी त्याच्या स्टुडीओत येताच त