लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.

 



अंजली अरुण काळे. दृश्यकलेतील एक ओळख असलेले नांव. आज त्यांचा कलाक्षेत्रात आत्मविश्वासाने संचार सुरू असतो. पण मी त्यांना ओळखतो ते त्याही आधीपासून. ते त्या अंजली ठाकरे असल्यापासून. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशी नाते जोडणारी, सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीपासून. त्या येण्याआधी त्यांचे नांव माझ्या कानावर आले. मी सर जे.जे.उपयोजीत कला संस्थेचा अध्यापक होतो, आणि त्याकाळात अंजली विद्यार्थीनी म्हणून आली व एक स्पष्टवक्ती, निर्भीड, आक्रमक अश्या तिच्या स्वभावामुळे ती सर्वाना माहीत झाली. पुढे ती माझ्या वर्गात आल्यावर मला तिच्या स्वभावातील मोकळेपणा, तिची सर्जनशीलता, सर्वाना आपलासा करण्याचा तिचा मोकळा ढाकळा स्वभाव,  त्याचसोबत इतरांना मदत करण्यासाठी चाललेली तिची धडपड, आणि यामुळेच सर्व शिक्षकांशी तिची चांगलीच मैत्री झाली होती. जेजे मधील प्रदर्शनाची कामे असोत वा सांस्कृतीक कार्यक्रमातील सहभाग असो, अंजली स्वतः तर आघाडीवर असेच, शिवाय आपल्या वर्गातील सहकार्यांना पण उत्तेजीत करीत असे.


पुढे जेजे मधून शिक्षण पूर्ण करून जेव्हां जाहीरात क्षेत्रांत तिने पाय टाकला, तेंव्हा तिचे एक नवीन कार्यक्षेत्र ठरले. दृककलेतून विचार मंथन. या जाहीरातीच्या विश्वात संभाषण कलेला किती महत्व आहे, याची महती सांगायलाच नको. अन या तिच्या कारकिर्दीत तिला तिचा आयुष्याचा जोडीदार मिळाला. अरूण काळेशी विवाहबद्ध होवून त्या अंजली काळे बनल्या. अगदी एकमेकासाठीच खास बनलेले जोडपे. आणि परत दोघेही एकाच क्षेत्रातील. त्यामुळे संभाषणाचे त्यांचे विषयदेखील सर्जनशीलतेचे. कला, साहीत्य, काव्य यांचे. मात्र गंमत म्हणजे जेवढा अरूण अबोल तितकीच अंजली सतत बडबड करणारी. त्यामुळे दोघांचा समतोल घडत असतो.  पुढे अंजलीचे कार्यक्षेत्र केवळ जाहीरात क्षेत्रापुरते मर्यादीत न रहाता तिने व्यापक असे स्वरूप धारण केले. ललीत कलेची अनेक दालने तिने ओलांडली. आणि इकडे अरूण जाहीरात क्षेत्रातील अनेक मान सन्मान घेत, नवनवे विक्रम करीत अनेक गड सर करीत होता. आणि नुकताच त्याला महाराष्ट्र शासनाचा ‘ वासूदेव गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार राज्य कला प्रदर्शनात मिळवून त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, हे खचितच अभीनंदनीय आहे.


अशी ही अंजली जाहीरात क्षेत्रात काम करताना तिने अनेक माध्यमांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विविध माध्यमामध्ये तिने प्रयोग केले. बाटीक, सिल्क स्क्रीन प्रिंटिंग, ऑइल पेंटींग, स्टेन्ड ग्लास पेंटींग अश्या माध्यमांशी तिची जवळीक झाली. निसर्गात रमणाऱ्या अंजलीला यावेळी बोन्साय या प्रकारामध्ये रुची निर्माण झाली आणि त्यानंतर त्या कलेत ती खूप रमली. व बोन्साय या वृक्ष  प्रकारावर तिने बरीच वर्षे घालवून त्यात काम केले. हे करत असताना तिला वृक्षांची गोडी लागली व लाकूड हे माध्यम म्हणून तिच्या डोळ्यासमोर आले. या माध्यमातून तिने स्वतःला अभीप्रेत करायला सुरुवात केली. आणि ते वास्तवात आणण्यास तिला मदत झाली ती अनंत कुळे या लाकूडकाम करणाऱ्या कारागीराची. आणि तो  अंजलीला भेटण्याचा किस्साही मोठा गमतीशीर आहे. ही घटना आहे १९९० सालची. तो जेव्हां अंजलीकडे कांही कामानिमीत्त आला, त्यावेळी तिच्याकडे एक सुतार काम करीत होता. त्याने केलेले काम अंजलीच्या कलात्मक नजरेस भावत नव्हते. पुन्हां पुन्हां सांगून त्याला कळत नव्हते. अनंत ते पहात होता. आणि त्याने पुढे येऊन ते काम अंजलीला हवे तसे कांही क्षणांतच बनवून दिले. पुढे अंजलीला तिने मनात योजलेल्या लाकूड माध्यमाला हा अनंत योग्य न्याय देईल ह्याची जाणीव झाली. तिचा स्वभाव थोडा अध्यात्मीक असल्याने अनेक देवांवर तिची श्रद्धा होती. अनेक पुराणातील अध्यात्मीक दृश्ये तिच्या मनात सतत भिरभिरत होती. पतीही कला क्षेत्रांतील सर्जनशील कलावंत असल्याने त्याच्याशीही चर्चा होत असे. मग ते मनातील प्रसंग कागदावर उमटू लागत. आणि हीच चित्रे पुढे लाकडाच्या पृष्ठभागावर काढून त्यांना त्रिमितीचे रूप देण्यात आले व ते एकावर एक असे साकारू लागले.  ह्याच चित्रांना ॲक्रॅलीक रंगांमध्ये रंगवील्यानंतर  त्यातून आविष्कृत होऊ लागली एकापेक्षा एक अशी सर्जनशील पेंटींग्स. ज्यांना अंजलीने 'वुडक्राफ्ट्स एक्सप्रेशन्स’ असे नांव दिले. आणि येथून पुढे अंजली काळे या नांवाचा सुरु झाला एक झंझावाती असा वुडक्राफ्ट पेंटींग्सचा अनोखा प्रवास. आणि गेली नऊ वर्षे अनंत कुळे यांचाही प्रवास त्यांच्यासोबत! त्याला कशाही प्रकारचे काम सांगा, नाही हा शब्दच त्याच्या शब्दकोषात नाही. कोणतेही आव्हान असो, अनेक प्रयोग करून ते तो लिलया पेलतो.


अंजलीला आपल्या पेंटींगसाठी कधी विषय शोधावे लागले नाहीत. पण तिच्या मनात नेहमी येणारी तिची दैवते म्हणजे भगवान श्रीकृष्ण व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा. विशेषतः श्रीकृष्णावरती त्यांची भक्ती त्यातून जास्तच आढळते. विविध आकारात, रूपात त्याची निर्मिती होते. कधी तो मुरलीधर असतो, तर कधी सत्यभामेच्या पारिजातकाच्या वृक्षाखाली धेनु चारवित असतो, कधी आपल्या करंगळीवर पर्वत उचलणारा असतो, कधी रासक्रीडा करीत असलेल्या रूपात आपल्याला दर्शन देतो. कधी तर तो केवळ प्रतीकात्मक असा केवळ बोटानी आपला पावा वाजवताना दिसतो, कालीयामर्दन करणारा देखील तो येथे आपणाला पहायला मिळतो. व हे सर्व आपणाला मोहीत करणारे असते. हाच प्रकार आपणास भगवान गौतम बुद्धाच्या बाबतीत दृष्टीस येतो. कधी तो आपणास आशीर्वाद देणारा दिसतो, तर दुसरीकडे बोधिसत्वाच्या वृक्षाखाली असलेला विचारवंत बुद्ध आपणास दिसतो. निद्रीस्त बुद्ध देखील यामध्ये आपणास पहायला मिळतो.   पण प्रत्येक वेळी अंजलीची पेंटींग्स ही आपोआप अध्यात्माकडे वळणारी असतात. त्यामुळे तिच्या लाकूड या माध्यमाला ती योग्य अशी समर्पक जाणवतात. अंजलीच्या लाकडी चित्रांवर जेंव्हा तिचे रंग चढतात तेव्हां त्या चित्रामध्ये एकप्रकारचा जिवंतपणा येतो आणि ती चित्रे आपणासोबत संवाद साधू लागतात. हिरवळीवर चरणाऱ्या गाई श्रीकृष्णाच्या पाव्याच्या मधुर संगीताने मोहीत होत असलेल्या आपणाला दिसतात. उठाव शिल्पाप्रमाणे असलेल्या या पेंटींगमधील बारीक काम इतके कुशलतेने केले आहे की त्यामधील ओठ, डोळे, हातापायांची बोटे, बारीक बारीक कमळे या त्रिमितीमध्ये केलेल्या इतक्या बारकाईच्या कामामुळे त्यांना दाद दिल्यावाचून आपण रहात नाही. ही पेंटींग्स भव्य अशा आकारात असून कोणतीही भिंत सजवायला ती नक्कीच कारणीभूत होवू शकतात.


यापूर्वी अंजलीने २००९, २०११, २०१६ अशी तीन प्रदर्शने भरविली आहेत. तिच्या एका प्रदर्शनाला थोर चित्रकार रझा यांनी हजेरी लावून तिला आशीर्वाद दिले होते. अनेक मोठ्या व्यक्तींकडे तिची पेंटींग्स संग्रहीत आहेत. पुण्यातील एका उद्योजक महीलेने तिच्याकडून पेंटींग घेतल्यावर तिने नवीन घर घेतले. व हा तिच्या पेंटींगचा पायगुण समजून पुढे घेणाऱ्या आणखी एका घरासाठी शुभ शकुन म्हणून तिला नवीन पेंटिंगसाठी अंजलीला ऑर्डर दिली. अंजलीचे काम सतत सुरूच असते. झालेल्या ड्रॉईंग्जना  लाकडावर त्यांच्या एकेक घटकाचे कटआऊट करण्याचे अनंतचे काम तितक्याच जोमाने सुरु असते. आणि या २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता अंजलीच्या चौथ्या 'वुड क्राफ्ट्स एक्सप्रेशन्स ४’ या प्रदर्शनाचे उदघाटन वरळीच्या नेहरु सेंटर  या गॅलरीत सुरु होत आहे. पहील्या प्रदर्शना दरम्यान प्रत्येक कलाकृती करतांना, ते साध्य करण्यासाठी जी अंजली धडपडत होती, झगडत होती, आणि आता या चौथ्या प्रदर्शनाच्या वेळी तिच्यामध्ये  जाणवतो तो तिचा आत्मविश्वास,  तिच्या सर्जनशीलतेला तिने दिलेला न्याय, तिच्यातील कामाची परीपक्वता व सफाई आणि तिने सहजगत्या साकारलेले, आविष्कृत केलेले तिचे इंद्रधनू स्वप्न. ज्यामागे होती तिच्या ध्येयवेड्या मनाला मिळालेली प्रेरणा आणि तपश्चर्येचे पाठबळ. सर्वानी आवर्जून पहावे असे हे प्रदर्शन आपणास एक वेगळी अनुभूती देऊन जाईल यात शंकाच नाही! लक्षात ठेवा, २७ फेब्रूवारी २०२४ रोजी वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये.

- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
- profraja@gmail.com

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर