अरूण काळे : जाहीरात क्षेत्रांतील समृद्ध कला वारशाचा उचीत सन्मान!

 



 शालेय अथवा कॉलेज जीवनामध्ये आपल्याशी अनेकांशी मैत्री होते. त्यापैकी काही शिक्षण संपताच आपल्यापासून दूर होतात, काही व्यवसाया निमित्ताने इतरत्र जातात. मात्र काही मित्र आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात, आपल्याशी एकरूप होतात. आपल्या बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला साथ देतात. आपल्या हृदयात कायमचे घर करून आपले हृदयस्थ बनतात. असाच एक माझा हृदयस्थ म्हणजे माझा जीवच्छ कंठच्छ  मित्र अरुण काळे. ज्याने पुढे अवघे जाहीरात क्षेत्र आपल्या कर्तबगारीने गाजवीले.
 जे.जे. उपयोजीत कला संस्थेतील आमची ती १९६२-६७ ची बॅच म्हणजे एक खास बॅच म्हणायला हवी.आम्ही सर्व मित्र जसे एकमेकांना घट्ट धरून राहीलो होतो, आणि तितकेच घट्टपणे आम्हांला बांधून ठेवले होते ते आमचे गुरुवर्य प्राध्यापक षांताराम पवार यांनी. पवार सर आम्हां दगडांवर निर्दयपणाने  छिन्नीचे घाव घालून त्यातून मूर्ती घडवण्यासाठी त्याला आकार देऊ पहात होते.  त्या काळात अश्या गुरुवर्यांच्या तालमीत आम्ही घडत होतो, धडपडत होतो. त्याच सोबत मजा- मस्ती देखील करीत होतो. आणि आमचा अरुण त्यात आघाडीवर असे. शिवाय आमचे सर्वच गुरूवर्य आमचे शिक्षक तर होतेच, शिवाय आमचे मित्रही झाले.


आमचा जेजेचा वर्ग म्हणजे सुरुवातीला पन्नास मुलांचा, पण अंतिम वर्षात सुमारे पस्तीस विध्यार्थ्यांचा होता. त्यातील जवळचे म्हणजे जग्या ( पुळेकर ), नंदू कुबल, ढाप्या ( प्रकाश देशमूख ), चिंट्या ( अविनाश गायकवाड ), विलास कुलकर्णी, सुधाकर खांबेकर, गोट्या तांबे, ढेबरी, यशवंत जामसंडेकर, नॉर्मन फ्रेटस, विनायक पोंक्षे, नेपाळचा मदन चित्रकार, किरण आशर, प्रकाश गोडसे, दिलीप नवलकर, दिलीप कामत, मीना कामत, सुलोचना राजपूत, विभा गुलाठी, मीना कामत, नीला धामणकर, शोभा दुर्वे, राणी सोहनी, सरला पप्पू, शामा हेमाडी, कनक खटाव, मणी गझदर, रणजीत सिंग असे होते. या सर्वांचे नेतृत्व असे अरुण कडे. अरुण तसा मितभाषी होता. गोरापान, डोक्यावर भरगच्च केस ( अजूनही तसेच आहेत, फक्त सफेद झाले आहेत ) डोळे थोडेसे धुंदावलेले, पण त्यातून त्याचा करारीपणा व बेफिकिरी दिसून येत असे. त्याचा स्वभाव थोडा अबोल वाटे. पण एकदा मैत्री झाली की त्याला तो किती पारदर्शी आहे याची जाणीव होत असे. आणि त्याचे खानदानी व्यक्तिमत्व त्यावर साज चढवीत असे.

असा हा अरुण वर्गात कामाबद्दल चोखंदळ असे. पवार सरांनी करेक्शन दिल्यावर त्यांच्याशी हुज्जत घालून वाद करणारा अरुण एकमेव. तसेच वर्गकाम, अथवा मस्ती असो, त्यामध्येही कल्पकता लढविण्यात अरुण माहीर असायचा. आम्ही शेवटच्या वर्षाला असताना वर्ग प्रतिनिधीची निवडणूक होती. अरुणने सर्वच विध्यार्थ्यांना प्रत्येकाने आपले नाव उमेदवार म्हणून द्यायला सांगितले, तसेच प्रत्येकाने स्वताचे मत स्वतालाच द्यावे असेही सांगितले. आम्हालाही ती गम्मत वाटली. केंकरे सर वर्गात आले. त्यांनी इच्छुक उमेदवारांना नावे द्यायला सांगताच ओळीने प्रत्येकजण उभे राहून आपले नाव सांगू लागला. केंकरे सर एकेक नाव बोर्डावर लिहू लागले पण मारुतीचे शेपूट संपेचना ! सरानाही यामागे काहीतरी फाजीलपणा असल्याचे जाणवले. प्रत्येकाने स्वताचे मतही स्वत:ला दिले. पण वर्गात एक प्रेमी जोडपे होते त्यातील मुलाने आपले मत आपल्या मैत्रिणीला दिले, आणि ती 'एक' मताने निवडून आली. अजूनही मला ते केंकरे सरांचे मिस्किल हास्य आठवते.


दुसरा एक प्रसंग होता तो १९६७ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचा. त्याकाळात सर्व तरुणाई आचार्य अत्रे, कॅा. डांगे, जॅार्ज फर्नान्डीस,  याच्या कर्तबगारीने भारली होती. त्यातच अप्रिय असे मराठी द्वेष्टे स.का. पाटील फर्नाडीसच्या विरोधात उभे होते. त्यांचा पराभव होवून फर्नांडीस निवडून आले तो दिवस मुंबईने साजरा केला. येथेही अरुणने कल्पकता लढविली. पाटलांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याची. आमच्या काम करायच्या टेबलावर आम्ही सर्वांच्या बॅगा रांगेने लावल्या. त्यावर कॅन्टीन मधून एक चादर आणून पसरली. पायाशी एकाचे बूट लावून ठेवले. एवढ्यात पुळेकरने अरुणच्या हातातील सिगरेटचा एक झुरका मारला व ती उदबत्ती प्रमाणे उभी करून ठेवली. प्रत्येकजण आपापल्या परीने हातभार लावत होता. एवढ्यात बेल झाली अन पवार सर आत आले. वाटले तेही आमचे कौतुक करतील. पण... आमच्या सर्वांच्या बॅगा जप्त झाल्या, आणि आम्ही आडारकर यांच्या समोर खाली मान घालून उभे होतो. अडारकरानी एक मोठे बौद्धीक घेवून आम्हाला सोडले. आमची बॅच जशी कामात आघाडीवर होती, तशीच खोडकरपणातही तेवढीच निर्ढावलेली होती. त्यावेळी मुंबईत पाऊस न पडल्याने पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष जाणवले होते. सर्व शाळा- महाविद्यालयांना सुटी देवून लोक आपापल्या  गांवी जावून रहातील अशी शासकीय योजना आकार घेत होती. आणि यासाठी ‘पाण्याचा अपव्यय टाळा’ ‘ पाणी जपून वापरा’ या विषयावर आम्हांला पोस्टर्स करायला सांगीतली होती. तीही आम्ही जोमाने केली. पुढे सुदैवाने पावूस पडला व पुढचे दुर्भीक्ष टळले. अशी आमची बॅच काम व खोडकरपणा करीत मस्त चालली होती.


शिक्षण संपले. सर्वजण निरनिराळ्या ठिकाणी कामाला लागले. अरुणने आपल्या कला जीवनाची कारकीर्द सुरु केली ती 'सरस्वतीचंद्र' या चित्रपटाचे पोस्टर करून.  त्याच सुमारास केरसी कात्रक या जाहिरात क्षेत्रातील एका सर्जनशील दिग्गजाने बेन्सन सोडून स्वत:ची  MCM ( मास कम्युनीकेशन ॲन्ड मार्केटींग ) ही जाहिरात संस्था काढली. ही केवळ जाहिरात संस्था नव्हती, तर एकप्रकारे सर्जनशील अश्या कलावंतांची खाणच होती. आणि त्यातील अनमोल अशी रत्ने शोधून त्यांना एका छपरा खाली आणले होते केरसी कात्रक यांनी. यामध्ये  किरण नगरकर, पन्ना जैन होते. रवि गुप्ता, महम्मद खान, अनिल कपूर होते, व या सर्वांवर होते ते त्या काळातील जाहीरात कलेचे सर्जनशील असे, कवीमनाचे कलावंत अरूण कोलटकर. अश्या या जाहिरात कलेच्या शेर कंपनीत अरुण काळे नामक छाव्याने प्रवेश केला. आणि अरुणच्या कल्पकतेला एक सुवर्ण कोंदण मिळाले. MCM च्या  सर्वच जाहिरातीना सृजनशीलतेची एक मिसाल असायची.  अश्या या एजन्सीत अरुणला सोबत लाभली ती दुसऱ्या एक अरुणची. अरुण कोलटकरांची ! अरुण कोलटकर ह्यांची सर्वच कामे वैविध्याने नटलेली. त्यांच्या कल्पनेतून विचारांना पंख लाभत, शब्द उमलत, काव्य फुले,  कधी शब्दांतून, कधी रंगातून, तर कधी चित्रांतून आणि रेषेतून. आणि ह्या अश्या सर्जनशील अश्या कवी मनाच्या कलावंतांशी अरुण काळे याचीही नाळ जुळली असणार ! जशी त्याची आर्ट स्कुलमध्ये षांताराम पवार या शिक्षकांशी जुळली होती. एकाने खतपाणी घातले तर दुसऱ्याने मशागत केली.  पुढे MCM बंद झाल्यावर नंदा व बालक्रिष्णन यांनी 'रीडीफ्युजन' ही एजन्सी सुरु केली. अरुणने तेथेही आपल्या कामाचा सर्जनशील असा ठसा उमटवला. अनेक ब्रॅंड त्याने तयार केले. त्यांना नवीन चेहरे दिले. त्याची कामे गाजू लागली. एव्हररेडी, कॅलीबर, लक्मे, जेन्सन निकल्सन, गार्डन असे अनेक ब्रॅन्ड,  जे आजही आपल्या हृदयात स्थान मिळवून बसले. जेन्सन निकल्सनने तर जेथे जेथे कसाही रंग दिसला तर स्वताच्या आठवणीची जाणीव करून दिली. ( Whenever you see colour, think of us) पुढे इंटरप्राईझ मध्ये रेमंड या ब्रॅंडला एक खानदानी, उच्च स्वरूप मिळाले, ' A Complete Man ' ने जाहिरात क्षेत्रात एक अद्भुत स्थान मिळवले. त्याचे लेआउट, त्याचा विशिष्ट टाईप, त्याची खास अशी रचना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विषय मांडणी हे सर्व अरूणच्या कल्पकतेचे द्योतक होते. अनेक कल्पनानी या काळात या कंप्लीट मॅनला जन्म दिला. रिडिफ्यूजन मध्ये अरुणच्या नांवाचा दबदबा होता. त्यानंतर नेक्सस, इंटरप्राईस ते स्वतःची ‘काळे ग्राफीक्स’ पर्यंत यशस्वी वाटचाल करून अरुण काळे आता आपल्या आवडत्या छंदाकडे वळले. पण छंद तरी कसा म्हणू ? कारण छन्द हा व्यवसायाच्या जोडीने जपलेला असतो. तर प्रतीभा ही जन्मतःच अंगात मुरलेली असते. आणि लहानपणापासूनच अरुणचे मन इकडे तिकडे स्वैरपणे विहार करीत असे. आणि तो स्वतःच वर्णन करतो त्याप्रमाणे, बालकवींची कविता त्याला आठवते;

         वाटते  सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे,  

त्या प्रमाणे अरुणने आपल्या मनात आठवणींचे रांजण भरून ठेवले आहेत. अगदी सर्व आठवणी. कधी विचारात गढलेले असताना, कधी कल्पनांना जन्म देतांना, तर कधी हिंदी चित्रपट गीते गुणगुणतांना- त्यांच्या शब्दांचे अर्थ शोधतांना. आणि कधी आजूबाजूंच्या घटनांचे साक्षीदार ठरतांना. पण आठवणी कधी थांबल्या नाहीत. त्या नेहमीच रुंजी घालत राहील्या. स्वतःभोवती फेर धरत राहील्या. अरुण अश्या आठवणींना ' कचरा ' म्हणत असे. पण मी जेव्हां हा कचरा उपसून पाहीला तेव्हां मला आढळले,  अरे ! हा कचरा नाही, हे तर विचार धन आहे ! विचारांचे मौलीक मोती आहेत. ते असे रसीकांपासून लपवू नयेत. त्यांना योग्य कोंदणात गुंफणे महत्वाचे आहे. व त्यांना समाजापुढे आणणे हेही तितकेच महत्वपूर्ण आहे.  आणि अरुणने आपले शब्द मौक्तीक ब्लॉगच्या रूपाने गुंफण्यास सुरुवात केली. आपल्या मनोगतातच तो म्हणतो, ही कविता म्हणजे मूर्त स्वरूपात मी. लहानपणापासून माझे चित्त/मन/मेंदू कधीच एके ठिकाणी स्थिरावला नाही किंवा विसावला नाही. आजही माझ्या मनाच्या अश्वाला मला लगाम घालता आला नाही. ही आहे विचारांची भरकट. आयूष्यात ओझरते का होईनात, भेटलेले प्रवासी, मित्र मैत्रिणी, सहकारी, शिक्षक, नोकर चाकर वगैरे वगैरे ! जाहीरात क्षेत्रांत या भिरभिरत्या विचारांचा खच खोळ वेळोवेळी कागदावर उत्तरीत गेलो. मेंदूला जसे दिसले, तसे वहीत उतरले. हा कुठलाही वाङ्मयीन प्रकार नाही. ना बालगीते ना कविता ! कांही असलेच तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे. आणि अरुणच्या या कविता त्याच्या आठवणींच्या रांजणातून बाहेर येऊन एकेक आकार घेत नटू लागल्या. जोडीला त्याची तितकीच समर्थक बोधचित्रे त्यांना भक्कम असा आधार देऊ लागली. या कविता काही वेळा विनोदाच्या अंगाने जाऊन आपल्याला सुखावतात, कांही विचार करायला लावून अंतर्मूख करतात, कांही आपल्याच गत स्मृतींना जागृत करतात. थोडक्यात ती स्मृतीतील स्मरणचित्रे आहेत म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशीच त्याच्या एका कवितेतील कोंबडी सकाळी उठून पहाते तो काय, कोंबड्याने तिची सर्वच कामे संडे असल्याने तिला विश्रांती देण्यासाठी उरकून टाकली. त्यात तो तिचे अंडे घालण्याचे कामही उरकतो. तेव्हां कोंबडीला हसूं आवरत नाही. ती कोंबड्याला सांगते, आता तूच त्याचे ऑम्लेट कर व भर दोन प्लेट. करूया साजरा संडे दोघे...आगळा वेगळा....जगावेगळा !  पण या गमती जमती सचित्र पाहायला...वाचायला मजा येते ती कांही औरच! त्याही त्याच्या ‘खचखोळ’ या ब्लॅागवर. येथे त्याचे संवेदनशील मन कधी जुन्या आठवणीतून खुलून येते, कधी नवीन वर्षाच्या आठवणीने खुलते,  ‘सध्या देशात राजकारण म्हणजे दुसऱ्या पक्षावर चिखल फेकणे व आपण स्वच्छ असल्याचा दावा करणे’  असे हे सध्याचे राजकारण पाहून विमनस्क होते, तर कधी मनांशी देवतेप्रमाणे पुजलेल्या लता मंगेशकर नामक दिदीबद्दल भरभरून लीहीते होते. त्याच दिदीबद्दल तिच्या पुण्यतीथीदिवशी कुठेही लिहून आलेनाही म्हणून ‘मोहे भूल गये सावरीया’ असे आक्रंदते पण…


तर अश्या या आमच्या अरुणने आपल्या जाहीरात क्षेत्रांतील कारकिर्दीतील पंचावन्न वर्षे नुकतीच पूर्ण केली. या कारकिर्दीत त्याने अनेक जाहीरातींच्या ब्रॅंडवर काम केले. अनेक ब्रॅंड तयार केले. ग्राहकांच्या मनावर ठसवले. आणि त्या ब्रॅंडना एका विशिष्ट दर्जावर नेवून ठेवले. त्यापैकी कांही म्हणजे लॅक्मे, रेड एव्हररेडी बॅटरी, जेन्सन निकलसन पेंट्स, पर्यटन विभाग- भारत सरकार, गार्डन सील्क अशी भारदस्त नांवे त्यामध्ये आहेत. आणि आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा म्हणून अरुणने आपल्या त्याकाळातील जाहीरात क्षेत्रांतील कामाचा पोर्टफोलीओ ‘अरूण काळे 55’ इन्स्टाग्रामवर सादर केला आहे. हा त्याच्या कामाचा पोर्टफोलिओ सर्वसाधारण लोकांना आकर्षीत करेलच, शिवाय जाहीरात क्षेत्रांतील कलाकार, कला विद्यार्थी या सर्वांनाच एक मार्गदर्शक ठरेल असा हा अरुणचा पोर्टफोलीओ नक्कीच मदत ठरू शकेल यात शंकाच नाही! मध्यंतरी दोनेक वर्षे त्याने जे.जे. च्या उपयोजीत कलेच्या विद्यार्थ्यांना शिकवले देखील.

आज अरुणच्या संसारात त्याला सदैव साथ देणारी, त्याच्या सुख दुःखात त्याची सतत सोबत करणारी त्याची कलाकार पत्नी अंजली हिचा देखील अरुणच्या या यशात तितकाच मोलाचा वाटा आहे. आज तिने स्वतःचे खास असे 'लाकूड' ह्या माध्यमातून बनवलेली अनोखी पेंटींग्स तिची स्वतःची अशी खास ओळख बनवली असून या महीना अखेर तिचे या माध्यमातील चौथे प्रदर्शन भरत आहे. असा एकंदरीत या कलासक्त जोडप्याचा सुखाचा संसार सुरु आहे.


आणि आमच्या या लाडक्या मित्राला, अरुण काळेला आज महाराष्ट्र शासन 'महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन' या मंगल प्रसंगी शासनाचा ' चित्रकार श्री वासुदेव गायतोंडे' यांच्या नांवे देण्यात येणारा मानाचा पुरस्कार प्रदान करीत आहे. आणि तोही माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या शुभ हस्ते!  ही तर दुधात साखर आहे. एका सृजनशील, मनस्वी कलाकाराचा यापेक्षा अधीक सन्मान तो काय? आज हा सन्मान केवळ अरुणचा नाही तर तो आम्हां सर्वांचा आहे. सर्व उपयोजीत कला क्षेत्राचा आहे. सर ज. जी. उपयोजीत कला संस्थेचा आहे. कारण तो आमच्या अरुणचा आहे!

अरुण, तुझी कला क्षेत्रातील वाटचाल उत्तरोत्तर  अशीच प्रगतीशील ठरो हीच तुझ्या या मित्राची ईश्वरचरणी प्रार्थना!

- प्रा. मं.गो. राजाध्यक्ष

rajapost@gmail.com

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.

दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर