भाई मिरजकर

 


तो मला भेटला ते मी सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अँलिड आर्ट मध्ये १९६२ साली प्रवेश घेतला त्या वेळी. तोही तेथेच शिक्षण घेत होता. अत्यंत टापटिपीत राहणारा. त्यावेळच्या फीट अँड टाईट पॅन्ट वापरणारा. कपड्याच्या बाबतीत अत्यन्त चोखन्दळ. हातात एक सोन्याची बारीकशी चेन अन तोंडात नेहमीच दिसणारी चार मिनार सिगरेट. डोक्यावरील केंस बारीक केलेला अन डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा. हा मुलगा विद्यार्थी आहे की शिक्षक हा भ्रम मला पडत  असे. कारण कधी तो वर्गात काम करतांना दिसे, पण बहुदा षांताराम पवार, चिंतामण तिरोडकर, त्यावेळचे आमचे फेलो नरेंद्र वैउडे या शिक्षकांसोबत शासकीय कामे करताना स्टाफरूम मध्ये दिसे. शिवाय त्याची या लोकांशी अरे तुरे करून बोलण्याइतकी असलेली सलगी हेही एक कारण असे.

मी प्रवेश घेतेवेळी मला रवी परांजपें सरांनी सांगीतले होते, की बेळगावच्या नॅंशनल कोल्ड्रींक हाऊस च्या मिरजकरांचा मुलगाही तेथेच शिकतो आहे. आता बहूदा शेवटच्या वर्षाला असेल. रमेश त्याचे नांव. एक दिवस कोणीतरी मला सांगितले की हा मुलगा तुमच्या बेळगावचाच आहे. तेव्हां मला समजलं की हाच तो रमेश मिरजकर. जे.जे.मधे आत्मविश्वासाने वावरत असणारा. सर्वच शिक्षकांच्या सलगीतला, आणि त्यांच्या कौतुकाचा. विशेष म्हणजे त्या काळात जाहीरात क्षेत्रात भाई पत्की नावाचे एक भारदस्त नांव होते. बेन्सन मध्ये काम करणारे ते एक वरीष्ठ नामांकीत सर्जनशील कलाकार असून  अत्यंत प्रसिध्द होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाशी रमेशचे व्यक्तित्व साधारण जुळणारे असल्यामुळे रमेश त्यांना आदर्श मानून त्यांच्याप्रमाणेच स्वतःचे व्यक्तिमत्व करीत असे. आपले नावदेखील त्याने भाई असे ठेवलं होते, त्यामुळे जाहीरात क्षेत्रांत भाई पत्की नांव घेतले जातं असे, तसेच भाई मिरजकर हेही नांव उदयाला आले. आणि पुढे सर्वच त्याला भाई म्हणून संबोधू लागले.

 


भाई जसा कामात हुषार होता तसाच सांस्कृतीक कामातही नेहमी पुढे असे. सोशलचे कार्यक्रम आयोजीत करण्यात देखील त्याचा पुढाकार असे. भाई शेवटच्या वर्षात असताना आमच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुका आल्या. भाईने स्वतःच मॉडेलींग करून आपले वर्गकाम म्हणून एक कॅम्पेन केले होते, त्यातीलच एका लेआऊट वरून त्याने आपले निवडणूक पोस्टर केले होते. आणि तिरोडकर सरानी त्याचे पोर्ट्रेट करून तो ' Of course I need your support ' म्हणून विद्यार्थ्यांना विंनती करतो आहे, असे दाखवले होते. पण त्या निवडणुकीत त्याला अपयश आले, व काली कोतवाल हा त्याच्याच वर्गातील दुसरा विद्यार्थी निवडून आला. म्हणून भाईने आपला जनसंपर्क कांही सोडला नाही. तो परत आपल्या तसेच शासकीय कामात गर्क असलेला दिसू लागला. विशेषतः त्यावेळी चीन आक्रमण झाले होते, त्यामुळे जनतेला धैर्य देण्यासाठी बरीच प्रसिद्धी माध्यमं वापरली जात होती. व ही बरीचशी कामे भाई पवार सर, तिरोडकर सर यांच्यासोबत करीत स्टाफरूम मध्ये बसलेला दिसत असे. सर, मग ते कोणतेही असोत, केंकरे, हणमंते, देसाई, पवार, तिरोडकर सारे भाईवर प्रेम करीत. एकतर त्याच्या लेआऊट मधील सर्जनशील कल्पना, व दुसरे त्याचे बोलणे सर्वानाच भारून टाकत असे. अश्या या भाईंचे काम अतिशय सुंदर होते. ग्राफिक पद्धतीने केलेली त्याची इलस्ट्रेशन त्याच्या कल्पनांना झेप घेण्यासाठी मदत करीत असत. त्याचे प्रत्येक काम हे ग्राफ़िक पद्धतीने नटलेलं असे. अगदी भौमित्तिक पद्धतीने केलेली. त्याची फोटोग्राफी देखील तेवढीच परिणामकारक होती. आणि आपल्या वर्गकामावर भाई दरवर्षी बक्षीसे ओढून घेत असे. यामध्ये त्याला एअर इंडियाची ट्रॉफी, कॅग अवार्ड, राज्य कला प्रदर्शनातील बक्षिसे, संस्थेतील वार्षीक प्रदर्शनाची बक्षीसे अशी बक्षिसे भाईने पटकावली होती. आणि अश्या कामामुळे त्यांची स्पेसीमेन फाइल भरगच्च झाली होती.

 


अश्या या भाईशी मी नकळत जोडला गेलो. मी अंधेरीला गुंडवलीत रहात होतो. व भाईंचे मामा रेल्वेत होते, त्यांना अंधेरीलाच रेल्वे क्वार्टर मिळाली होती. तीही एक नंबरचा प्लॅटफॉर्म संपल्यावर जरा पुढे जाताच होती. आणि शिक्षणासाठी भाई त्यांच्याकडे रहायचा. अधून मधून मी माझे काम दाखवायला त्याच्याकडे जात असे. दिलेल्या विषयावर कशी कल्पना लढवायची हे तो मोठ्या मार्मिकपणे सांगत असे. एखाद्या विषयावर त्याला पटापट कल्पना सुचत असत. सुटीमध्ये आम्ही मिळून बेळगांवी जात असू, तसेच मुंबईला परततांना देखील एकत्र येत असू. त्यावेळी स्लिपरकोच, रिझर्वेशन अश्या कांही भानगडी नव्हत्या. गोव्याहून येणाऱ्या जनता एक्सप्रेसला बेळगांवात एक डबा जोडला जात असे. त्यामध्ये आधीच जाऊन भाईंचे काहीं मित्र जागा पटकावीत असत. मग पुण्यापर्यंतचा प्रवास हा मीटर गेजच्या गाडीने. व पुढे मोठाले उंच प्लॅटफॅार्म असलेल्या मुंबईच्या गाडीने आमचा पुढचा प्रवास सुरू होई. वाटेत कर्जतला खास दिवाडकरांचा बटाटेवडा खावून आमचा प्रवास दादर पर्यंत होत असे. पुढे लोकलने अंधेरीला उतरल्यावर भाईच्या घरी जाऊन तेथे जरा फ्रेश होवून मी मग पुढे माझ्या घरी पोचत असे.  

बघता बघता वर्ष संपले. आणि भाई शिक्षण पूर्ण करून बाहेर गेला. त्याच्याकडे त्याने बनवलेली स्पेसिमेन फाईल होती. त्या आधारावर तो ए.एस.पी. ( ॲडव्हर्टायझींग अँड सेल्स प्रमोशन) या जाहीरात एजन्सीमध्ये सरळ व्हिज्युलायझर म्हणून तो कामाला लागला. तसेच आमच्या संस्थेत सायंकाळी असलेल्या इंटीरिअर डेकोरेशन या अभ्याक्रमासाठी त्याने प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. आणि त्यामुळे तो जाहिरातीसोबतच डिस्प्लेची देखील कामे करू लागला. एवढ्यात त्याचे मामा रेल्वेमधून निवृत्त झाल्याने त्याना त्यांची क्वार्टर सोडावी लागली. पण त्यापूर्वीच त्यांनी अंधेरी पूर्वेलाच अगदी स्टेशनच्या जवळ असलेल्या नित्यानंद नगर येथे जागा घेतली होती. व भाई देखील तेथेच राहू लागला. मी मधून मधून तेथे जात असे. क्वचित आम्ही दोघेही एकाच डब्यातून प्रवास देखील करीत होतो. कधी काम असले की चर्चगेट येथील दिनशॉ वाच्छा रोडवरील स्टीलक्रीट हाऊस मधील त्याच्या ए.एस.पी. या एजन्सीमध्ये त्याला भेटण्यासाठी जात असे.तेथे त्याच्या बॉस होत्या तेथील क्रिएटिव्ह डायरेक्टर व इलस्ट्रेटर मारी पिंटो. एल. आय. सी., बुश रेडीओ अश्या महत्वाच्या अकाउंटवर भाई काम करीत होता.  भाईला स्वतःची प्रौढी मिरवण्याची खूप आवड होती. पुढे भाईने  स्वताचा वर्कशॉप टाकून डिस्प्लेचे कामदेखील करण्यास सुरुवात केली. नंतर कांही वर्षांनी भाईने ए.एस.पी. सोडली व तो  कुलाब्याला दुसऱ्या एका एजन्सीत काम करू लागला. मी देखील सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये लेक्चरर म्हणून कामाला लागलो. पुढे माझें व भाईंचे कामानिमित्तच थोडेफार बोलणे होत असे. त्याचा विवाह झाल्यावर त्याने अंधेरीलाच जागा घेतली होती. मध्ये त्याचे तिरोडकर सरांकडे कांही इलस्ट्रेशनचे काम होते, त्यासाठी तो कॉलेजमध्ये आला. तेथे आमची भेट झाली. काही जून्या आठवणी जागवल्या. बेळगावचे त्यांचे नॅशनल कोल्ड्रींक हाऊस विकले जाऊन तेथे आता कावेरी कोल्ड्रींक हाउस सुरु झाले होते.


मी १९९१ साली जेव्हां संस्थेचा अधिष्ठाता झालो त्या वर्षाचे वार्षिक प्रदर्शन व स्नेहसंमेलन मी मोठ्या प्रमाणावर करायचे ठरवले. संस्थेमध्ये कधीच नसलेला सर जमशेटजी जीजीभॉय यांचा अर्ध पुतळा त्याच वर्षी मी डॉ. एस. पी. गोदरेज त्यांच्या हस्ते बसवला.  त्या वर्षाचा शिल्पांजलीचा खास अंक सर जमशेटजी जीजीभॅाय यांच्यावर नागवेकर सरांनी काढला.  विशेष म्हणजे माझे वर्गमित्र तसेच सर्व माजी विद्यार्थी येथे यावेत या इच्छेने मी स्वतः सर्वाना या माझ्या पहील्या समारंभास प्रत्यक्ष येण्याविषयी आमंत्रण दिले होते. यावेळी माझ्या कारकिर्दीची जडण घडण करण्यात ज्याचा हातभार लागला आहे, त्या माझ्या मित्राने, भाई मिरजकर याने यावे ही माझी प्रकर्षाने इच्छा होती. मी भाईला फोन केला. त्याने माझ्या कारकिर्दीतील पहीले प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून यावे ही इच्छा मी त्याच्याकडे व्यक्त केली. पण खेदाने त्याने नकार दिला. कांही प्रापंचीक अडचणीमुळे आपण येऊ शकणार नसल्याचे त्याने सांगीतले. त्याच्या आवाजात मला पूर्वीचा आत्मविश्वास दिसला नाही. कोठेतरी खचल्याचे जाणवत होते.

ते त्याचे माझे शेवटचे संभाषण...

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
rajapost@gmail.com



Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.

दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर