दादासाहेब फाळके पुरस्कार आणि महंमद रफी

 


नुकताच आपल्या फिल्म इंडस्ट्री मधील सर्वोच्च असा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा एक थोर व गुणी अभिनेत्री वहीदा रेहमान यांना देण्यात आल्यामुळे देशभरातील चित्रपट प्रेमींच्या मनात आनंदाच्या भावना उमटल्या यात शंकाच नाही!  प्रत्येक कलाकाराला हा पुरस्कार आपल्या जीवनात मिळवण्याची इच्छा असतेच! हा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दरवर्षी माहीती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येतो. ह्या पुरस्काराचा बहुमान अश्या व्यक्तीला देण्यात येतो, ज्याने भारतीय सिनेमाचा विकास, आणि प्रगती यामध्ये बहुमूल्य योगदान केले आहे. आणि अश्या कलाकाराची  निवड ही देशातील नामवंत अश्या चित्रपट व्यवसायातील व्यक्तीकडून होत असते. हा पुरस्कार दहा लाख रुपये रोख, स्वर्ण कमळ व शाल अश्या स्वरूपात असतो. दादासाहेब फाळके यांनी भारतात प्रथम चित्रपटाची मुहूर्त मेढ रोवली. पहीला संपूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चन्द्र त्यांनी दिग्दर्शीत केला त्यानंतरही ते या क्षेत्रांत कार्यरत राहीले व चित्रपट सृष्टीला एक भरीव योगदान त्यांनी दिले. अश्या या महान माणसाच्या नावाने देशातील हा चित्रपटातील सर्वोच्च बहुमान त्यांच्या नांवाने देण्याचे ठरवुन दादासाहेबांच्या जन्म शताब्दी निमित्ताने १९६९ सालापासून हा बहुमान देण्यास केंद्र सरकारने आरंभ केला व पहील्याच पुरस्कार विजेत्या ठरल्या देविकाराणी. बॉंबे टॉकीजच्या निर्मात्या व तो काळ गाजवलेल्या अभिनेत्री.

यानंतर दरवर्षी एकेक व्यक्तीला निवडून हा पुरस्कार देण्यात येऊ लागला. यामध्ये १९७१ साली पृथ्वीराज कपूर, १९७२ पंकज मलीक, १९७३ रुबी मायर, १९७७ नितीन बोस, १९७८ सोहराब मोदी, १९८० पी. जयराज, १९८१ नौशाद, १९८२ एल व्ही प्रसाद, १९८३ दुर्गा खोटे, १९८४ सत्यजीत रे, १९८५ व्ही शांताराम, १९८७ राज कपूर, १९८८ अशोक कुमार, १९८९ लता मंगेशकर, १९९१ भालजी पेंढारकर, १९९२ भूपेन हजारीका, १९९३ मजरुह सुलतानपुरी, १९९४ दिलीपकुमार, २००७ मन्ना डे, २०१४  शशी कपूर, २०१५ मनोज कुमार, २०१७ विनोद खन्ना, २०१८ अमिताभ बच्चन, २०१९ रजनीकांत, २०२० आशा पारेख, २०२१ वहीदा रेहमान. ही झाली कांही वानगीदाखल नांवे.

वास्तवीक दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रात ज्याचें भरीव असे योगदान देणाऱ्या अश्याना देण्यात येतो, ज्यामध्ये लेखक असोत, दिग्दर्शक असोत, निर्माते असोत, गीतकार-कवी असोत, संगीतकार असोत, गायक, अभिनेते, अभिनेत्री असोत हे सर्वजण या पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त असतात. १०६९ पासून पुढे जर आपण पाहीले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यासर्व लोकात एका नावाची उणीव भासते. जिला हा दादासाहेब फाळके पुरस्कार आधीच देणे आवश्यक होते. तो त्या व्यक्तीचा हक्क होता. तो अधीकार होता. आणि ती व्यक्ती म्हणजे स्वर सम्राट महंमद रफी. १९६७ साली 'पदमश्री' हा 'किताब देऊन बोळवण केलेल्या रफींचे नांव या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या  निवड समितीला या योग्यतेचे वाटत नाही? आज पदमश्री किताबाला किती महत्व आहे ते सर्व जण जाणतातच. मग  रफी साहेब या पुरस्कारासाठी लायक नाहीत का? की समितीच्या पात्रतेत तें बसत नाहीत? आज ते हयात नाहीत म्हणून म्हणावे तर यापूर्वी विनोद खन्ना याना त्यांच्या निधनानंतर मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलाच होता की. आज या सर्वोच्च पुरस्कारासाठी आतापर्यंत निवडल्या गेलेल्या व्यक्ती मध्ये अनेक नांवे अशी दिसतील की रफींची योग्यता, त्यांनी केलेले  फिल्म जगताशी व देशाशी केलेले योगदान आणि त्यांचे कर्तृत्व यापेक्षा केवढेतरी कमी आहे. मग रफी साहेबांसोबत हा दुजाभाव का?

रफी साहेबांची ओळख ही या इतरांपेक्षा वेगळी आहे व ती त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवली होती. त्यांच्या मेहनतीने आणि अर्थात त्यांना लाभलेल्या त्यांच्या दैवी आवाजाने.  जो आवाज परमेश्वराची देणगी होती.  आणि त्यांची गायकी बद्दल  म्हणाल तर या चित्रपट जगतात तिला तोडच नाही. या चित्रपटश्रुष्टीत गायक बरेच आले, येत रहातील पण त्यात रफी कोणीच नसेल. एवढेच नव्हे, तर रफी साहेबांच्या पंक्तीत बसण्याचा हक्कही कोणाचा नसेल. जेव्हां महात्मा गांधीची हत्या झाली, तेव्हां  आपल्यातून गेले, तेव्हां रफीसाहेबानीच त्यांना 'सुनो सुनो ये दुनीयावाले बापुकी ये अमर कहानी' म्हणून संगीत शब्दांजली वाहीली.  पंडीत नेहरू यांनी आपल्या घरी रफी साहेबाना बोलावून हे गीत त्यांच्याकडून म्हणवून घेतले होते.  पुढे निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान व्हावे म्हणून पंडीत नेहरूजींच्या विनंतीवरून त्यांनी ' काँग्रेस को वोट दो ' हे गीत म्हटले.  ज्या जमान्यात स्वैपाकासाठी गॅस अथवा इतर उपकरणे नव्हती, त्या काळात घासलेट विकत घेण्यासाठीही त्यांच्या गीताचा वापर करण्यात आला.  रफी साहेबानी देवादिकांची भक्तिगीते इतक्या प्रमाणावर गायली आहेत, व तीही आपल्या मधुर पहाडी आवाजात, की ऐकणाऱ्याच्या मनात भक्तीरस आपोआप उन्मळून येत असे व त्यांचे हात जोडले जात. देशभक्तीची  गीते तर त्यांनी इतकी गायली आहेत की जिथे असा प्रसंग आला की देश प्रेमाखातर रफीसाहेब सामोरे आले व त्यांनी आपल्या देशभक्तीपर गीतांनी फौजी भाईंचा उत्साह वाढवून त्यांना लढण्याची ताकद दिली.

रफी साहेब निष्कलंक राहीले. या फिल्म जगतात असा कोणीही नाही की  त्याच्यावर कोठे ना कोठे एखादा तरी लहान मोठा डाग लागला असेल. पण रफीसाहेब एखाद्या स्वच्छ धुतल्या पांढऱ्या चादरीसारखे स्वच्छ राहीले. निष्कलंक राहीले. मग ते त्यांच्या व्यावसायीक जगतात असो किंवा त्यांच्या घरगुती आयुष्यात. गरजूना मदत करण्यात तर त्यांचा हात सदैव वर असे. चेहऱ्यावर एक हास्य घेऊन जन्माला आलेला हा स्वर्गलोकीचा गंधर्व सतत सुहास्य मुद्रेने वावरत असे. एकदा त्यांच्या दर्दभरी गजलांचा आल्बम काढण्यात आला. त्यासाठी  त्यांचा दुःखी चेहऱ्याचा फोटो टाकायचा होता. निर्मात्याने रफी साहेबांचे अनेक फोटो पाहीले, पण त्यांत एकही दुखी चेहऱ्याचा नव्हता. सगळेच हसतमुख. शेवटी त्यातीलच एका फोटोवर निभावण्यात आले. सतत दुसऱ्यांसाठी आनंदी वातावरण निर्माण करणारा हा माणूस स्वतः आनंदीच असायचा.

महंमद रफी हे भारतातील लोकप्रिय पार्श्वगायक होते. त्यांना भारतीय उपखंडातील एक महान अन प्रभावी गायकांपैकी एक मानले जाते. रफी साहेब हे त्यांचा अष्टपैलू आवाज यासाठी प्रसीद्ध होते. त्यांचा गाण्यात पॉप ते गझल, दर्दभरी गाणी, रोमॅंटीक गाणी,  भजने, गझल, कव्वाली, शास्त्रीय अश्या सर्व प्रकारचे गायन ते सहजपणे गाऊन जात. आणि हे सर्व संगीत त्यांच्या कंठामध्ये एकत्रपणे सुखाने नांदत होते. आणि कलावंताच्या शैलीप्रमाणे आपला आवाज काढण्यात ते यशस्वी होते. जणू स्क्रीनवर तो अभिनेताच ते गाणे म्हणत आहे. असाच भास व्हावा. आणि महंमद रफी हे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील एक प्रमुख पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धीला आले. 'जर महंमद रफी नसते तर'तर ओ पी नय्यर नसते' हे खुद्द ओ पी नय्यर यांनी स्वतः उदघृत केले आहे. मदनमोहन यांनी म्हटले होते, 'तुम्हांला जर देवाचा आवाज ऐकायचा असेल तर तुम्ही महंमद रफी यांचा आवाज ऐका.' एकदा शंकर जयकिशनच्या रेकॉर्डींगमध्ये रफी साहेब अडकले होते, तेव्हां  ओ पी नय्यरकडे रेकॉर्डींगला जाण्यास रफींना उशीर झाला. व ओ पी नी रफींना सांगीतले की आता मला वेळ नाही. पुढे त्यांनी रफींना घ्यायचे बंद केले. तेथून ओ पी नय्यर यांची घसरण सुरु झाली. पुढे तीन वर्षे ते एकत्र काम करत नव्हते. ओ पी ना चूक कळाली होती. अशीच गोष्ट लता मंगेशकर यांच्या बाबतीतही घडली होती. विषय होता पार्श्वगायकाना रॉयल्टी मिळण्याबाबतची. लता मंगेशकरांनी ही रॅायल्टीची बाब आणली पण रफी त्याला तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होतें की एकदा आपण गाणे म्हणून निर्मात्यांकडून पैसे घेतले की आपला संबंध संपला. आधीच तो टेन्शनमध्ये असतो. मग जेव्हां त्याचा चित्रपट पडतो व त्याचे नुकसान होते, तेव्हां आपण थोडेच त्यांना मदत करतो? व इथे दोघांचे संबंध बिघडले व लताजींनी जाहीर केले की यापुढे मी रफींसोबत गाणार नाही. त्याचा परीणाम रफीसाहेबावर झाला नाही पण संगीतकारांनी ड्युएट गाण्यासाठी लता ऐवजी सुमन कल्याणपूर यांना घेतले. व कांही दिवस तरी सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील रफींसोबत कित्येक कर्णमधुर गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. पण रफींचे स्थान तसेच अबाधीत राहीले. असे एकमेवाद्वितीय व्यक्तीमत्व होते.

आयुष्यात रफीसाहेबानी इतक्यांना मदत केली आहे की एका हाताने दिलेले दान दुसऱ्याला माहीत नसावे. याचा प्रत्यय त्यांच्या घरच्यांनाही आला आहे. एक तब्बलजी होता, त्याने रफी,मन्नाडे, तलत महमूद, मुकेश अश्या गायकांच्या रेकॉर्डींगच्या वेळी कैकवेळा तबला वाजवला होता. पुढे त्याची हलाखीची वेळ आली. खायलाही मिळणे कठीण झाले होते. अनेकांकडे त्याने निरोप पाठविले. पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ही गोष्ट रफीसाहेबांच्य कानावर गेली. ते त्याच्याकडे गेले. खोलीच्या कोपऱ्यातील टेबलावर अनेक गायकांना साथ केलेले तबले होते. रफीनी दोनशे रुपये काढून त्याच्या हातात ठेवले. व त्यानंतर दरमहा दोनशे रुपये त्याला त्याच्या हयातीपर्यंत मिळतील याची व्यवस्था त्यांनी केली. त्याकाळात दोनशे रुपये खूप मोठी रक्कम होती. कित्येकदा रात्री ते बाहेर जाऊन उशीरा परतत. कोणालाही कोठे जातो ते सांगत नसत. नंतर घरच्यांना बाहेरून समजले की कांही नवोदीत संगीतकारांना रफींचे दर परवडत नव्हते. पण दिवसभर इतर कामात व्यस्त असल्याने रफी त्यांना वेळ देऊ शकत नसत. पण त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने ते रात्री त्यांच्यासाठी गात व त्याचे ते पैसे अजीबात घेत नसत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने जेव्हां स्वतंत्र काम करायला सुरुवात केली तेव्हां त्यांचे पहिलेच गाणे रफीनी गायले. जेव्हां त्यांनी रफीसाहेबाना त्याचे पैसे देवू केले, तेव्हां रफीनी त्याबद्दल एक पैसाही घेतला नाही. या दोन मुलांना त्यांनी वाद्यें वाजवतांना त्यांच्या रेकॉर्डींगच्या वेळी कित्येकदा पाहीले होते. त्यांना आशीर्वाद म्हणून त्यांनी त्यांच्याकडून काहीच मोबदला स्वीकारला नाही. रफीसाहेबानी बहुतेक सर्वच भाषांतून गाणी गायली आहेत. मराठी मधूनही श्रीकांत ठाकरे यानी त्यांच्याकडून गझल गाऊन घेतली.

माणुसकीचा दाखला म्हणून रफी साहेबांकडे पाहीले जाते. जेव्हां बी.आर.चोप्रानी त्यांना केवळ आपल्याच प्रॉडक्शन हाऊस साठी गावे, इतरांसाठी गाऊ नयें असा दबाव आणला तेव्हां रफी साहेबानी त्यांना नम्रपणे नकार दिला. त्यांवर चिडून जाऊन चोप्रानी पण केला की आपल्या फिल्म मध्ये कधीही रफींना गाणे देऊ नये. तश्या सूचना त्यांनी दिल्या. मी दुसरा रफी बनवून दाखवीन अशी प्रतीज्ञा केली. व त्यानी पुढे महेंद्र कपूरचा आवाज वापरण्यास सुरुवात केली. गाणी प्रसिद्धीला येत, पण त्या गाण्यांत जीव नसे याचे प्रत्यन्तर शेवटी चोप्राना आले व ते रफींना शरण गेले. नंतर त्यांच्या धूल का फुल मधील 'तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा' या त्यांच्या गाण्याने याचे प्रत्यन्तर दिले. ज्या अनील बिश्वासनी रफींची नेहमी भेंडी बाजारचा गायक म्हणून अवहेलना केली, त्यांचाच मुलगा पुढे आपले बस्तान बसविण्यासाठी रफीसाहेबांकडे आला. रफीनी त्यालाही मदत केली. सलील चौधरीही रफींना गाणी द्यायला तयार नसत. पण काही गाण्यासाठी त्यांना जेव्हां रफीचं लागत तेव्हां रफीनी काहीही मनात न ठेवता गाणी म्हटली आहेत. म्हणूनच 'टूटे हुवे ख्वाबोने' 'तसवीर तेली दिलमे' अशी अवीट गाणी जन्माला आली. म्हणूनच म्हणतात, माणुसकीचे दुसरे नांव 'महंमद रफी'

मन्ना डे स्वतः एक नामांकीत गायक असूनही रफी साहेबाना ते खूप मानत. कारण रफीसाहेबांची गाणी  कश्याही प्रकारची  असुदे ते पडद्यावरील गायकाल त्यातून उभे करीत व सहजतेने गाऊन जात. एका मुलाखतीत मन्ना डे यांनी सांगीतले होते की, रफी जर का कधी रेकॉर्डिंग साठी उपलब्ध नसले कीं त्यांचे गाणे म्हणणे आम्हांला कधीच श्यक्य झाले नाही. पण आम्ही जर का नसलो व रफींना आमचे गाणे गायचे असले की ते अगदी सहजतेने गाऊन जात. मन्ना डे यांच्या हृदयात रफी साहेबांबद्दलचा एक हळुवार कोपरा त्यांनी जपून ठेवला होता. म्हणूनच त्यांना जेव्हां २००७ साली ' दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला तेव्हां ते थोडे उदास वाटत होते. त्यानी म्हटले, आज हा पुरस्कार घेताना मला आनंद वाटत नाही. कदाचित त्यांच्या मनातून रफी त्यांना जाणवत असतील. त्यांच्यासोबत निखळ स्पर्धा करीत शास्त्रीय गाण्यांची केलेली जुगलबंदी आठवत असेल. कल्पना चित्रपटातील 'तू है मेरा प्रेमदेवता' या गाण्यात एकमेकांवर मात करताना मुक्तपणाने उधळलेली स्वरांची माणीक मोती आठवत असतील.

अश्या या हरहुन्नरी, अजातशत्रू मानवाला, स्वर्गीय आवाजाच्या गंधर्वाला आजवर ज्या सन्मानापासून वंचीत ठेवले गेले, तो दादासाहेब फाळके पुरस्कार देवून भारत सरकारला आपली चुक सुधारण्याची एक संधी आहे ती गमावू नये. आपल्या य देशात आजवर अनेक महान लोक होऊन गेले, ज्यांना  या भारत देशाची प्रतिमा म्हणून पाहीले जाते, भारताचा गौरव वाढवण्यात ज्यांचा महत्वाचा वाटा आहे, त्यात महंमद रफी नावाचे एक अनमोल रत्न आहे. ज्याची गणती झाली नाही. पुढच्या वर्षी २०२४ साली रफी साहेबांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याची संधी शासनाने गमावू नये. याच सोबत ‘भारत रत्न’ किताबासाठी त्यांचा विचार करावा.

रफी साहेबांच्या हातात जेव्हां हा पुरस्कार पडेल, तेव्हां रफी साहेबांच्या स्मृतीला कदाचित कांही विशेष वाटणार नाही. पण आमच्या सारख्या त्यांच्या करोडो चाहत्याना जो हर्ष होईल, तेव्हां त्या पारितोषिकाला देखील कदाचित लाजल्यासारखे होईल व आपण आज योग्य व्यक्तीच्या हातात आहोत असे वाटून त्यालाही हर्ष होईल.

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
rajapost@gmail.com







Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.

दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर