एक गुंफलेले अतूट नाते : प्रा. शशिकांत साठ्ये.

 


प्रा. साठ्ये अर्थात आम्हा सर्व जेजे वासियांचे अत्यंत लाडके असलेले व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीत ही कल्पनाही करवत नाही. जेजेच्या माझ्या एकंदरीत विध्यार्थी व शिक्षक अश्या आजपर्यंतच्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत साठे सरांशी माझे जे ऋणानुबंध जुळले ते केवळ व्यावहारिक नव्हते, ना व्यावसायीक. पण एकमेकांची सुखदुःखे वाटण्या इतपत आम्ही भावनाशील झालो होतो. मी जेव्हा जेजे उपयोजित कला महाविद्यालयात १९६२ साली प्रवेश घेतला, त्यावेळी आमचे वर्ग प्रमुख म्हणून साठ्ये सर आम्हाला लाभले, ते केवळ दीड दोन महिन्यासाठी. पण त्यांचे देखणे व्यक्तिमत्व पाहून आम्ही सर्वच जण हरखून गेलो होतो. कपड्यांच्या बाबतीत एकदम चोखंदळ असलेले साठ्ये सर लेक्चर द्यायला उभे राहिले की त्यांची एक भुवई नेहमी उडत असे. सुरुवातीच्या काही असाइनमेंट झाल्यावर नंतर आम्हाला दुसरे देखणे व्यक्तिमत्व वर्ग प्रमुख म्हणून आले, ते होते दामू केंकरे सर. दुसऱ्या वर्षाला साठ्ये सर आम्हाला लेटरिंग टायपोग्राफी शिकवायला आले. त्यावेळी त्यांचे ब्रश स्क्रिप्ट व कॅलिग्राफी आम्हाला मोहवून टाकीत असे. ब्रश रंगात अथवा शाईत बुडवून ते कागदावर असा काही चालवीत की तश्या प्रकारे काम करून पाहण्याचा मोह आम्हालाही होत असे. येथे माझी सरांशी जवळीक झाली. पुढे तिसऱ्या वर्षाला आमचे वर्ग प्रमुख म्हणून त्यांचा लाभ आम्हाला मिळाला. आणि सरांचे एकेक पैलू आमच्या समोर उलगडू लागले. एक उत्कृष्ठ टायपोग्राफर, कॅलिग्राफर, एक सर्जनशील डीझाइनर, व्हीज्यूलायझर, इलस्ट्रेटर, इंटेरीयर डेकोरेटर,संशोधक, जाहीरात कलाकार, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक उत्कृष्ट असे शिक्षक अशा सर्व गुणानी संपन्न असे स्वयंभू व्यक्तीमत्व होते साठ्ये सर म्हणजे 

 

साठे सरांवर सर्व काम करणारे तसेच त्यांच्याकडून काही शिकणारे विध्यार्थी होते त्यांनी सतत प्रेम केले, पण नंतरच्या काळात काही वर्गाला दांडी मारणारे, काम न करणारे, सरांची शिस्त न पाळणारे असेही काही विध्यार्थी होते अश्यांना सरांबद्दल थोडी असूयाच होती. पुढे याचाच फायदा काही अल्पसंतुष्ट शिक्षकांनी घेऊन अश्या विध्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्नही केला. पण सरानी त्याकडे दुर्लक्ष केले व आपली वाटचाल सुरूच ठेवली. पुढे संस्थेमध्ये बदली प्रकरणामुळे कांही शिक्षकांनी कला संचालकाविरुद्ध संप पुकारला, तेंव्हा साठ्ये सरही त्यात होते. त्यांत अश्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरुद्ध हाकाटी मारण्यास सुरुवात केली. ह्या वियार्थ्यांनी पुढाकार घेऊन संस्थेत विद्यार्थ्यांचा संप घडवून आणला. तेंव्हा साठ्ये सर ह्या मुलांचे लक्ष्य होते.   त्यांच्या औषधी सुचनांच्या प्रकल्पाला  फिलिप्स आयक्रोगाडाचे जागतीक अवार्ड मिळवल्याबद्दल खालील काचेच्या डिस्प्ले बोर्डवर एक वरिष्ठ प्राध्यापक वसंत सवाई यांनी  मजलिस तर्फे एक अभिनंदनाचे पोस्टर लावले होते तेही त्या विध्यार्थींपैकी कांहीनी काच फोडून फाडून बाहेर टाकले होते. त्यावेळी वासू नावाच्या एका विध्यार्थ्यांच्या हाताला फुटकी काच लागून रक्तही आले होते. साठ्ये सर शांत होते.  ते  बिलकुल डगमगले नाहीत. नंतर मार्मिक मधून जेव्हा संपकरी शिक्षकांवर लेखमाला सुरु झाली, त्यामध्येही साठ्ये सरांना ' एक निष्णात व शिकविण्यात तरबेज ' असेच त्यांचे वर्णन करावे लागले. 
 

साठ्ये सरांचे समकालीन आणि त्यांच्या हाताखालून गेलेले अनेक विध्यार्थी त्याकाळात जाहिरात क्षेत्रात कार्यरत होते. सरांच्या व्यावसायिक कामाची महतीची जाण असल्याने त्यांच्या योग्यतेची अनेक कामे त्यांच्याकडे येत. आर्टस्कुल मधील अध्यापन तसेच व्यावसायिक क्षेत्रातील कार्य या दोन्ही बाबीवर साठ्ये सर उठून दिसत. साठ्ये सरांच्या कामामध्ये डिस्प्लेची कामे प्रामुख्याने असत. त्यांचे पर्स्पेक्टिव्ह उत्तम होते. अश्या वेळी त्यांना मदतीला काही विध्यार्थी लागत. व मी त्यामध्ये हटकून असे. तशी माझी त्याकाळातील आर्थिक स्थिती बेताचीच होती. परत रोजचा कॉलेजचा खर्च चालूच असे. त्यासाठी एकदा मी कामासाठी सरांना विनंती केल्यावर मला ते जेव्हा एखाद्या एजन्सीत जादा काम असले की त्यांच्याकडे मुलांना पाठविण्यासाठी सांगण्यात येई, तेव्हा त्या ठिकाणी मला ते पाठवू लागले. आणि ते आमच्या वर्गावर तृतीय वर्षाला होते, तेव्हांपासूनच मी सरांसोबत व्यावसायीक कामे करू लागलो, व तेव्हांपासून साठ्ये सर व मी सतत एकत्र दिसू लागलो.


१९६५ साल होते ते. भारत - पाक युद्ध सुरु झाले होते. आम्ही बरेच विध्यार्थी नागरी संरक्षणासाठी प्रसीद्धी साहीत्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनवीत होतो. याचवेळी सरांकडे युनिसेफ च्या प्रदर्शनाच्या स्टॉल डिझाईनचे काम आले होते. व मी त्यांच्यासोबत काम करीत होतो. कॉलेज सुटल्यावर सरांच्या वांद्रे कॉलनी मधील घरी जाऊन आम्ही काम करत असू. कधीमधी तिरोडकर सर देखील मदतीला असत. युद्धामुळे ब्लॅक आऊट असे व त्या काळोखातच आमचे जाणे येणे असे. येथे साठ्ये सर व माझ्या ऋणानुबंधाच्या तारा जुळल्या. तसेच पुढे आमचे घरोब्याचे रूणानुबंध झाले. आम्ही एक कुटुंब बनलो.

पुढे मी अध्यापक म्हणून आल्यावर तर त्या अधिकच दृढ झाल्या.त्यांच्या प्रत्येक कामामध्ये माझा सहभाग असायचाच. बरीच वर्षे मी त्यांचा सहाय्यक म्हणून वर्गावर असे. त्यामुळे त्यांची शिकवायची पद्धत मला जवळून आत्मसात करता आली. साठ्ये सर कधीच मुलांवर आपली मते लादत नसत. तर आम्हा सर्व सहाय्यक शिक्षकांना बरोबर घेऊन मुलांच्या कामावर सांगोपांग चर्चा करीत व विध्यार्थ्याचीच संकल्पना सुधारीत. कित्येकदा कागद पेन्सिल हातात घेऊन पटकन त्याचेच डिझाईन सुधारून दाखवीत. व पुढे आम्हीही तीच प्रथा पुढे चालू ठेवली. यामुळे आपल्या शिक्षकाला काय येते हे कळते असा त्यांचा दृष्टिकोण होता. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने आपले सर्व काम प्रदर्शनात डिस्प्ले करावे यासाठी ते आग्रही असत. मात्र ते वर्गात केलेले काम असावे या बाबतीत ते ठाम असत.

 


आम्ही पुढे एकत्रच काम करू लागलो. त्याची कॅलिग्राफी, ब्रश स्क्रिप्ट मी बरेचशे उचलले होते, पुढे त्यांचे हस्ताक्षर मला एवढे भावले होते की नकळत माझ्या तिरक्या इंग्लिश रनिंग हॅन्ड हस्ताक्षराने त्यांच्या सरळ अश्या लिखाणाचे वळण घेतले ते मला कधी कळलेच नाही. पण जवळ जवळ त्यांच्या हस्ताक्षराप्रमाणेच माझेही अक्षर वळण झाले. त्यांची सहीदेखील मी हुबेहूब करू लागलो. आमचे अधीष्ठाता हणमंते सर गमतीने कधी कधी मला म्हणायचे अरे, किती म्हणून साठेंची कॉपी करतोस ? अनेक ठिकाणी कामाच्या निमित्ताने, तसेच मिटींग्जना आम्ही दोघेही जात असू. कित्येकजण तरी आम्हाला भाऊ भाऊ समजत असत. अनेक मोठमोठी कामे आम्ही केली. यामध्ये उल्का तर्फे केलेली कुटुंब नियोजन, तसेच र.कृ. जोशींसोबत केलेली चिमणलाल, विंडसर हॉटेल, ओबेराय हॉटेल, बजाज भवनची शोरूम, अशी कामे होती. काही वेळा विचित्र अनुभवही आम्हाला त्या काळात आला. युनिअन कार्बाइड या कंपनीने 'एन्सॅार ' नावाची शेविंग ब्लेड्स काढली होती. त्याच्या प्रसिद्धीचे सर्व साहित्य आम्ही बनविले होते. याच युनिअन कार्बाइडचे कॅलेंडर डिझाइनचे काम आम्हाला मिळाले. विषय होता प्रातिनिधिक भारत दाखवायचा. यासाठी देशातील निरनिराळ्या राज्यातील स्त्रिया आम्ही दाखविल्या होत्या. एका बंगाली मुलीची आवश्यकता होती. त्यावेळी आमच्या संस्थेत  एक बंगाली विद्यार्थिनी होती.  तिची एक मैत्रीण मॉडेलिंगची आवड असलेली होती. तिने मॉडेलिंग करायचे ठरविले. पैसे किती देणार तेही ठरले. अर्थात एजन्सी प्रमाणे आमचे चार्जीस नसल्याने आम्ही शक्य तितके देणार होतो, त्याची कल्पना तिला दिली होती. अन सोबत आमची विद्यार्थीनीही होतीच. तिचे पोर्ट्रेट घेतले. कॅलेंडर छापले गेले. सरानी विद्यार्थीनीकरवी तिला पैसे घेऊन जाण्याचा निरोप दिला. पण ती मुलगी बोलावूनही आलीच नाही. मैत्रीणीलाही ती भेटेना. आणि अचानक एक दिवस युनिअन कार्बाइडकडून आम्हाला बोलावणे आले. अन तेथे जे कळले त्याने आम्हाला धक्काच बसला. त्या बंगाली मुलीचे वडील एल. आय.सी. मध्ये लीगल अॅडव्हायझर होते. त्यांनी पाहीले की फोटो वापरण्यासाठी काही करारनामा केलेला नाही, हे त्यांच्या ध्यानात आल्यामुळे त्यांनी चक्क युनियन कार्बाइडला नोटीस पाठवून आपली परवानगी न घेता तिचा फोटो कॅलेंडरवर छापल्यामुळे त्याची नुकसान भरपाई म्हणून युनिअन कार्बाइड कडे एका भल्या मोठ्या रकमेची मागणी केली. कंपनीलाही हे अपमानास्पद होते. त्यांनी हे प्रकरण मिटविण्यास साठ्ये सरांना सांगितले. सरळ मनाच्या सरांना जगात अशीही बदमाश माणसे असतात याची नव्यानेच जाणीव झाली. त्यांनी सदर गृहस्थाला भेटून प्रामाणिकपणे आपली बाजू मांडली. पण तो बनेल माणूस म्हणाला, अरे आपको क्या करना है, कंपनी बडी है, वो दे देंगी पैसा. एकूण पध्दतशीरपणे त्याने सापळा रचला होता. मुलीला तर त्याने कोणालाही न भेटण्याची तंबी दिली होती. शेवटी साठ्ये सरांकडून एक मोठी रक्कम घेऊन त्याने हे प्रकरण मिटवले. अर्थात आमचे ' युनिअन कार्बाइड ' हे क्लायंट आमच्याकडून गेले हे सांगायला नकोच. मात्र ज्या विद्यार्थीनीने या मुलीशी गाठ घालून दिली होती, तिची मात्र परिस्थिती विचित्र झाली. अर्थात ह्यात तिचा काहीच दोष नव्हता.



आम्ही स्टाफवर असताना खेळ हा सुद्धा आमच्या दैनंदिन जीवनाचा एक घटक बनला होता. रोज सायंकाळी आम्ही व्हॉली बॉल काळोख होई पर्यंत खेळत असू. साठ्ये सर आमचे कॅप्टन असत. सर्वांचाच खेळ सुंदर असे. विद्यार्थीही आमच्यासोबत असत. वार्षिक स्पोर्ट्स आले की टेबल टेनिसची टेबल्स लागली की तेथेही आम्ही सतत हजेरी लावीत असू. साठ्ये सर धावपळ करीत खेळत, तर पवार सर एका जागी उभे राहून बॅक हॅंडचा जबरदस्त शॉट मारीत. या दोघांचाही खेळ प्रेक्षणीय असे. विद्यार्थ्यांमध्ये पेशू वाडिया, संजय खुळे, आनंद गुप्ते, रमेश बावीसकर, नरेंद्र विचारे असे एकापेक्षा एक सरस खेळाडू होते. असे सुवर्णक्षण होते त्यावेळी आमच्या वाट्याला आलेले. माझी पत्नी भारती त्यावेळी त्यांची विद्यार्थिनी होती. दुपारी जेवण झाल्यावर सर तिला व्ही टी समोरील भाजलेला भुट्टा ( मक्याचे कणीस ) आणायला लावीत. रोजचा क्रम होता हा. तसेच आमचे जेवणाचे डबे आले की, ते उघडून आम्ही आतील पदार्थांची अदलाबदल करीत असू. त्यांची पत्नी सी के पी असल्याने त्यांच्या डब्यात नेहमीच कांही खास असे पदार्थ असत. विशेषतः तळलेल्या विविध प्रकारच्या मिरच्या. माझी पत्नी देखील तश्याच प्रकारचे जेवण बनवीत असे. माझ्या विवाहाच्या वेळी मला केळवण म्हणून बोलावणारे दोघेच होते. एक षांताराम पवार सर  व दुसरे आमचे साठे सर.
 

कॉलेज सुटल्यावर आम्ही  त्यांच्या केबिन मध्ये काम करीत बसत असू. संध्याकाळ झाली की हरिभाऊ पानवाल्याकडे बनारसी पान व समोरील सुकी भेळ हा आमचा नित्याचा खुराक असे. मग ४ लिमिटेड पकडून माहीमला  उतरणे, तेथील क्राऊन रेस्टारंट मध्ये बिअर झाली की कित्येकदा समोरील रेडिओ पंजाब मध्ये जेवणे, बाजूलाच एक पानवाला होता, तो पान बनवून अश्या तऱ्हेने  त्याला मुरड घालायचा की जणू पहात रहावे. त्याचे पान खाऊन मग ३१४ बस  पकडून रात्री ते कॉलोनीत उतरत व मी पुढे वाकोल्याला जात असे. माझा रेल्वेचा पास असतानाही मी सकाळी बस पकडून कॉलोनीत त्यांच्या घरी जाई, व त्यानंतर ८७ नंबरची बस पकडून आम्ही कॉलेजला जात असू. वर्षानुवर्षे  हा आमचा नियम होता. पुढे मीच त्यांना रेल्वे किती सोयीस्कर पडते हे जाणवून दिले अन नंतर आमचा लोकल प्रवास सुरु झाला. मी, साठ्ये सर, नागवेकर, रमाकांत देशपांडे, अरविंद हणमंते, रमेश कांबळी, वसंत सोनवणी, असा आमचा सात जणांचा ग्रुप कैक वर्षे एकत्र प्रवास करीत असू. या मुंबईत तसे आमचे निरनिराळ्या ठिकाणी अनेक पानवाले होते. ज्यांना पान कोणते ते सांगावे लागत नसे.

साठ्ये सर तसे शिस्तप्रिय होते, पण आतून थोडेसे भावनाशील व घाबरटही होते. एकदा त्यांच्या एका कॅन्सरग्रस्त नातेवाईकाला टाटा मध्ये रक्ताची गरज होती, त्यासाठी त्यांना डोनर हवा होता. अर्थात मुंबईत त्यांच्या माहितीचे कोणीच नसल्याने सरानाच त्यांनी गळ घातली. सोबत मला घेऊन ते निघाले. जातानाच ते थोडे अस्वस्थ दिसत होते. मला वाटते त्यांनी यापूर्वी रक्तदान केले नव्हते. टाटा मध्ये रक्त घेण्यापूर्वी त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला. तो एकदम वाढला होता. त्यामुळे त्यांचे रक्त घेण्यास नकार दिला. शेवटी मीच रक्त दिले. दुसरा एक आठवणारा प्रसंग म्हणजे १९७४- १८७५ साली आम्ही र.कृ. जोशी सरांसोबत भारतीय जनसंघाचे उत्तर प्रदेश व गुजरात राज्यासाठी निवडणूक प्रचार साहित्य ल जाहीरात मोहीमा बनविल्या  होत्या. त्यांची स्पेसीमन म्हणून त्यांच्याकडे ठेवलेली आमची छापील कामे आणीबाणी जाहीर झाल्यावर त्यांनी नष्ट करून टाकली. खरेतर ती आमच्या कामाची स्पेसिमन्स होती.  त्याचवेळी त्यांनी मला सांगितले असते तर ते काम मी माझ्याकडे सांभाळून ठेवले असते. पंण दुर्दैवाने ते सर्व काम कायमचे नष्ट झाले.


साठ्ये सरांना मी कधीच स्वस्थ बसलेले पाहीले नाही. जेव्हा बाहेरील काम नसत, तेव्हा एखादा सामाजिक विषय घेऊन त्यावर त्यांचे काम सुरुच असे. यातूनच त्यांचा औषध घेण्याच्या सुलभ सुचनांचा चिन्ह प्रकल्प तयार झाला. त्याला जागतिक स्तरावर पारितोषिक मिळाले. यावर अनेकांना अत्यानंद झाला, मात्र संस्थेतीलच काहींना विषाद वाटला. यातूनच मी वर उल्लेख केलेला काच फोडून पोस्टर फाडण्याचा प्रकार घडला. पुढे साठ्ये सरांची नागपूर येथे बदली झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. पण त्यांना निरोप देण्याचा समारंभ देखील करायला संस्थेतील जेष्ठ प्राध्यापक सवाई घाबरू लागले, तेव्हा मी स्वतः सरांसोबत असलेल्या निवडक शिक्षकांसोबत त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला. त्यावेळी सरांचे जवळचे मित्र,  र.कृ. जोशी, बाबा जोगळेकर, रमेश कुलकर्णी, यशवंत चौधरी, प्रा. मीरा करंडे,  डॉ. रेगे, डॉ. मुत्तगी, अश्या निवडक लोकांना बोलाविले, एक हृद्य असा अंतःकरण हेलावणारा समारंभ त्यावेळी संस्थेत आम्ही घडवून आणला. प्रत्येकजण भारावलेला होता. मी बोलायला उठलो तेव्हा माझे मन भरून आले होते. शब्द फुटेनात अन अचानक माझ्या डोळ्याचा बांध फुटला. जोशी म्हणाले, उल्कातून चापगार गेले तेव्हा माझीही अशीच अवस्था झाली होती.   साठ्त्याये सर संस्थेमधून निघून गेले. तरी देखील आमची मैत्री तशीच राहिली. नंतर आलेल्या अधीष्ठाताना सरांच्या नावाची अॅलर्जी असल्याने सरांना संस्थेत त्यानी विध्यार्थ्यांच्या फायद्यासाठी कधीच बोलाविले नाही. पुढे मी अधिष्ठाता झाल्यावर या सर्व गुणी लोकांना संस्थेत व्हिजिटिंग म्हणून आमंत्रित करू लागलो. दरम्यान साठ्ये सर पवई येथे आय.डी.सी. मध्ये प्राध्यापक म्हणून पदव्यूत्तर विध्यार्थ्यांना शिकवू लागले. तेथेही ते विध्यार्थीप्रिय ठरले. कारण नाणे खणखणीत होते.

पुढे मीही निवृत्त झालो. साठ्ये सरांचेही आय.डी.सी. मधील कॅांन्ट्रॅक्ट  संपले. आमच्या भेटी पुन्हा सुरु झाल्या. त्यांनी यावेळी देखील बेस्ट, पर्यावरण, ऊर्जा अश्या विषयांवर प्रकल्प केले. कोठेही जनतेला सार्वजनीक सेवेच्या सूचना देण्याची गरज असते, तेथें सरांची नजर जातच असे. व मग सुरु होत असे त्यांचा एक नवीन प्रकल्प.  या दरम्यान सरांना राज्य कला पुरस्कार मिळाला. त्यासाठी त्यांचे स्वतःचे काम निवडून त्याचे फ्रेमिंग करण्याचे काम चालले होते. ते पहाण्यास त्यांनी मला घरी बोलाविले. पुढे काही वर्षे त्यांनी  पुण्यात काढली. पण पत्नीचे निधन झाल्यावर ते परत मुंबईला आले. येथेही त्यांची कामे सुरूच होती. एक  दोन दिवसाआड आमचे फोन सुरूच असत. फोन करताच त्यांचा पहिला प्रश्न असे तो,  काय बातमी आहे ? मग त्यांनी  नवीन पाहिलेले, वाचलेले यावर आमची चर्चा होत असे. पुढे त्यांनी खेळायचे पत्ते पूर्ण भारतीय स्वरूपात डिझाईन करण्याचे काम सुरु केले. ते मला व माझ्या मुलाला, हर्षदला दाखविण्यासाठी घेऊन माझ्या घरी आले. त्यांना या वयात असे येणे मला बरे वाटले नाही, म्हणून मी सरांना विनंती केली की, कधीही तुम्ही मला फोन करून बोलवा. मी स्वतः तुमच्याकडे येतो. त्यानंतर दोन वेळा मी त्यांच्या घरी जाऊन आलो. मात्र फोन चालूच असे.
 
पत्नीच्या जाण्याने सर थोडेसे खचले होतेच. पुण्याला ते एकटेच रहात असत. तेथे मारुती पाटील वगैरे काही विद्यार्थी होतेच. शिवाय रवी परांजपेंच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांची हजेरी असे. तेथेच त्यांनी आपले ' साइन फॉर लाईफ ' हे सायनेज वरील पुस्तक प्रकाशित केले. मुंबईला आल्यानंतर मुद्दाम घरी येऊन त्यांनी मला भेट म्हणून सही करून त्याची प्रत दिली. त्यांच्या चित्रलिपीवर वृत्तपत्रात मी त्यांच्या नकळत एक लेख लिहिला होता. तो प्रसिद्ध झाल्यावर मी त्यांना तो दाखवीला. काही वर्षापुर्वी नेहमीसारखे दिवाळीच्या  सुमारास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी पुण्याला फोन केला तो त्यांच्या सुनेने घेतला. तेव्हा समजले की सरांना इस्पितळात दाखल केले आहे. आय.सी.यू. मध्ये होते ते. दुसऱ्याच दिवशी मी शिवनेरीच्या बसने पुण्याला जाऊन त्यांना पाहून आलो. त्यांचा मुलगा श्रीरंग भेटला. अचानक आजारी झाल्यामुळे त्यांना दाखल करावे लागल्याचे त्याने सांगीतले. त्यानंतर श्रीरंग त्यांना घेऊन मुंबईला आला. परत गेल्यावर्षी त्यांची कन्या स्मिता हिने मेसेज पाठविला सरांना वांद्र्याच्या होली फॅमीली हॉस्पिटल मध्ये ठेवले आहे. कोणालाही ते ओळखत नाहीत. असे तिने सांगीतले. लगेच दुसऱ्या दिवशी मी तेथे पोचलो. सर आय.सी.यू. मध्ये होते. 'माझे नाव सांगितल्यावर माझ्याकडे पाहून मला त्यांनी ओळखले. त्यांना संपूर्ण काही आठवत नव्हते. कदाचित आपण घरीच आहोत असे त्यांना वाटत असावे.  त्यातूनही ते संपूर्ण बरे होऊन घरी आले, एवढेच नव्हे तर पूर्वीसारखे कार्यरतही झाले.

कला क्षेत्रातील चालू घडामोडींरहात  साठ्ये सरांचे बारकाईने लक्ष असे. जाहिरात एजन्सीतील नवीन होणाऱ्या गोष्टींबद्दल औत्स्यूक असे. मग फोन करून त्यावर माझ्याशी अथवा हर्षदशी चर्चा करीत. त्यांनी बनविलेल्या पत्त्यांच्या डिझाईनचे पेटंट घेण्याची त्यांची धडपड सुरु होती. कारण त्या पत्त्याना भारतीय रूप दिलेली संकल्पना केवळ त्यांची स्वत:ची होती. त्यांच्या अथक परीश्रमांचे चीज होते ते ! मध्ये हिंदुस्थान थॉम्प्सनचा नवीन सी.ई.ओ. एजन्सीचा संपूर्ण चेहरा बदलणार असल्याचे वृत्त टाइम्स मध्ये आल्यावर हर्षदला फोन करून त्यांनी त्यावर सखोल चर्चा केली. सर्व काही नेहमीप्रमाणे चालले होते. मध्यंतरी माझ्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. चालणेही कठीण होऊ लागले. डॉक्टर, तपासण्या सुरु झाल्या. स्वतंत्रपणे फिरणेही कठीण झाले. दरम्यानच्या काळात फोन बंद झाले, नेहमी विचार यायचा की सरांना जाऊन भेटले पाहिजे. आणि शनिवारी ८ जुलै रोजी रात्री  साठ्ये सरांचा फोन आला. मी लगेच फोन घेऊन नेहमीप्रमाणे म्हणालो, ' बोला सर ' पण सरांच्या फोनवरून श्रीरंग बोलत होता. सरांची तब्येत एकदम कॉम्प्लिकेटेड झाली आहे असे त्याने सांगितले. मला चालताना तोल जात असल्याने दुसऱ्या दिवशी सरांना कसे भेटता येईल याची कल्पना नव्हती. रात्रभर मला बेचैनी जाणवत होती. मी हर्षदला सकाळी मला त्यांच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले. सकाळी आम्ही निघालो. हर्षद म्हणाला, त्यांना तुम्ही येत असल्याचे  निदान फोन करून कळवा. त्याप्रमाणे मी श्रीरंगला फोन करून आम्ही पाच दहा मिनिटात तेथे पोचू असे सांगताच तो म्हणाला, सर पहाटेच गेले. आणि सरांशी तब्येत पाहण्यासाठी निघालेलो मी त्यांचे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या पायाना स्पर्श करून निघालो.

साठ्ये सर कोण नव्हते ? एक यशस्वी उपयोजित कलाकार तर होतेच, शिवाय एक तत्वज्ञ होते. त्यांचे वाचन अफाट होते. जेजेच्या लायब्ररीचा खरा वापर कोणी केला असेल तर तो साठ्ये सरानी. वृत्तपत्रातील संभाषण कलेविषयी काहीही वृत्त असले की आवर्जून त्याचा उपयोग ते विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठी करत. अनेक आजूबाजूची उदाहरणे देत. दावर कॉलेज मध्ये ते जाहिरात कलेवर काही लेक्चर घेत. तेव्हा विध्यार्थी त्यांना म्हणाले, सर तुम्ही जे सांगता ते आम्हाला कुठल्याच पुस्तकात आढळत नाही. साठ्ये सरानी एकदा डॉ. मुत्तगीना या संदर्भात  विचारले असता ते म्हणाले, अरे बाबा ही तर तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स आहेत. कारण बरेच जण पुस्तकातूनच वाचून लेक्चर घेतात, तुमची तर तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून सांगता हे विध्यार्थ्यांना खचित आवडते. जेजे उपयोजित कला संस्थेत अंतिम वर्षाला जे प्रोजेक्ट वर्क असते तेही सरांचे योगदान आहे. एखाद्या गोष्टीवर रिसर्च करणे हे त्यांच्या अंगवळणीवरच पडले होते. यातूनच त्यांनी सायनेज प्रकार चालू केला. आजमितीला अनेक पंचतारांकित हॉटेल्सची सायनेज त्यांच्या नावावर जमा आहेत.जेजे मध्ये येण्यापूर्वी ते शिल्पी या जाहिरात संस्थेत काम करीत होते. तेथे त्यांचे बॉस होते भाई पत्की. त्यांचे हाताखालील लोकांना नेहमी सांगणे असे की जेव्हा तुमच्या हातात काम नसते, तेव्हा कोणताही सामाजिक समस्येवरील कामाचा प्रकल्प हाती घ्या व त्याच्यावर काम करा. या निमित्ताने तुमची बुद्धी तल्लख राहतेच, शिवाय याचा उपयोगही समाजाला होतो. साठ्ये सरानी हे व्रत आयुष्यभर तंतोतंत पाळले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी काम, काम आणि कामच केले. आज साठ्ये सरांना जाऊन वर्षे झाली आहेत. पण माझा एकही दिवस साठ्ये सरांची आठवण काढल्याशिवाय जात नाही. कित्येक ठिकाणी लेक्चरसाठी गेलो असता सरांची शिकवण्याची पद्धत, त्यांची निरीक्षण शक्ती, विषयाचा सांगोपांग अभ्यास व त्यांनी आर्ट स्कुलना प्रोजेक्ट ही योजना दिल्याबद्दलची कृतज्ञता याविषयी मी हमखास बोलत असे. आजही बोलतो.

सर जेजे उपयोजित कला महाविद्यालयाच्या अनेक पिढ्या साठ्ये सरांच्या ऋणी राहतील. कारण ते या संस्थेचे भूषण होते. या माझ्या गुरुवर्यांना, एका अदृश्य अश्या रेशमी धाग्याने नियतीने बांधून ठेवलेल्या माझ्या बंधुसमान हितचिंतकांना अश्रूभरीत नयनांनी माझी आदरपूर्वक आदरांजली.

           - प्रा. मं.गो.राजाध्यक्ष.
             



              
     
Sent from http://bit.ly/LvJfIK

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

लाकडातून आध्यात्मीक भावाविष्कार.

दृष्ट कलोपासक : वि. ना. तथा दादासाहेब आडारकर