एक झपाटलेला कलावंत : अप्पासाहेब देशपांडे
आम्ही शेवटच्या वर्षाला असतांना नागपूरहून बदली होऊन एक व्यक्ती प्राध्यापक म्हणून जे.जे. उपयोजीत कला संस्थेत आली. उंचीला थोडे ठेंगणे, जाड चष्मा, थोडेसे स्थूल असे हे प्राध्यापक प्रथम वर्षाच्या वर्गावर नेमले गेले. त्यांचे नांव तेव्हां आम्हांला समजले ते जी.के. देशपांडे असल्याचे. तसा त्यावर्षी त्यांचा आमचा अजीबात संबंध आला नाही. कारण एप्रील मध्ये परीक्षा आटोपताच जे.जे.ला रामराम ठोकून आम्ही निघालो होतो. पुन्हा दोन वर्षांनी मी याच जे.जे.त अध्यापक म्हणून आलो, तेव्हां हे गृहस्थ परत बदली होऊन नागपूर येथे गेले होते. त्यानंतर ते अधे मध्ये दिसत ते कला संचालनालयाच्या कार्यालयात. माधवराव सातवळेकर कला संचालक म्हणून आले होते. एक शिस्तप्रिय आणि कला शिक्षणातील अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांचा लौकीक होता. पण पुढे या अप्पासाहेबांशी आमची बरीच गट्टी जमली. जी. के. देशपांडे अर्थात मराठीत गो.कृ.देशपांडे यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२४ चा अकोल्याचा. देशपांडेंचा ओढा चित्रकलेकडे असल्याने व अकोल्यासारख्या भागात उच्च कला शिक्षणाची सोय नसल्याने मुंबईची वाटचाल करणे क्रमप्राप्त होते. आणि १९४३ साली अप्पासाहेबांनी जे.जे...