आतिथ्यशील सेवेचे प्रतीक: एअर इंडियाचा महाराजा



कांही वर्षांपूर्वी 'एअर इंडिया'च्या विमान सेवेला सत्तर वर्षे पूर्ण झाल्यामुळे झालेल्या समारंभाचा एक भाग म्हणून नरीमन पॉईंट वरील एअर इंडीयाच्या भव्य इमारतीवर प्रकाश योजनेमार्फत तिचे प्रतीक 'महाराजा' प्रोजेक्ट करण्यात आला होता. एअर इंडियाच्या या आतिथ्यशिल महाराजाला आबाल वृद्धापर्यंत सर्वच ओळखतात. किंबहुना कैक पिढ्या या महाराजांसोबत वाढल्या. महाराजांची अनेक रूपे त्यांनी पाहीली. ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवास केलाही नसेल, तेही या महाराजाशी परिचित आहेत. अश्या लोकांनीही या महाराजाला आपल्यासोबत वागवीला. कधी टाय पीन म्हणून तर कधी दिवाणखान्यातील शोकेसवर विराजमान करून. कधी पत्रे लिहीण्याच्या स्टेशनरीतून तर कधी प्रवासी ब्यागेवर रुबाबात स्थानापन्न करून. मात्र आजच्या काळात हा महाराजा हळूहळू लुप्त होत चालला आहे. पण या महाराजांची निर्मिती आणि त्याचा येथपर्यंतचा प्रवास मोठा मजेशीर झालेला आहे. तो पाहण्यासाठी आपणाला सुमारे ८८ वर्षे मागे जावे लागेल.


१५ ऑक्टोबर १८३२ चा दिवस होता तो. एका अठ्ठावीस वर्षे वयाच्या तरुणाने त्या दिवशी एकच इंजीन असलेल्या 'पूस मॉथ' जातीच्या विमानाने कराचीच्या ड्रिग रोड विमानतळावरून अहमदाबाद मार्गे जुहू-मुंबई येथे टपाल घेऊन प्रवास केला. त्यावेळी त्या तरुणाला कल्पनाही नसेल की पुढे त्याचे हे उड्डाण भारतीय हवाई वाहतूकीचा आरंभ ठरेल. आणि हा तरुण होता सुप्रसीध्द उद्योगपती श्री. जे. आर.डी. टाटा!  केवळ भारतातच नव्हें तर संपूर्ण जगभरात आदराला प्राप्त झालेले एक नांव. टाटांनी जेंव्हा प्रथम उड्डाण केले त्या काळात कांही ठिकाणी तर वैमानिकाला मार्गदर्शन करणारी यंत्रणाही अस्तीत्वात नव्हती. यातूनही यशस्वीपणे ही हवाई वाहतूक करून जे.आर.डी. टाटा यांनी तिचा पाया घातला. नंतर एक इंजीन असलेली दोन विमाने व तीन कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी आपली कंपनी सुरु केली. ती होती ' टाटा एअर लाईन्स' ! प्रवाश्यासोबत ही कंपनी टपालाचीसुद्धा
ने-आण करीत होती. यानंतर सरकारी टपालाचे कंत्राट मिळाल्यामुळे पुढे या एअर लाईन्सला फायदा होऊ लागला. त्यामुळे पुढे विमानांच्या संख्येतही वाढ करण्यात आली.


पुढे जगाला हादरवून सोडणाऱ्या महायुद्धाचे आवाज सर्वत्र निनादू लागले. तेव्हां ही टपालसेवा बंद करून सरकारने त्यातील कांही विमाने संरक्षण सेवेसाठी ताब्यात घेतली. पण पुढे महायुद्ध समाप्त झाल्यावर ती पुन्हां कंपनीला परत करण्यात आली. यानंतर मात्र टाटा एअर लाईन्सने आपला उत्कर्ष करीतच १९४६ मध्ये तिचे 'एअर इंडीया लिमिटेड' मध्ये रूपांतर केले. कंपनीची खाजगी मालकी जाऊन तिची पब्लीक लिमीटेड कंपनी झाली. यावेळी कंपनीचे कमर्शीअल संचालक होते श्री. बॉबी कुका. आपल्या ‘एअर इंडिया’ने  आता जगाशी स्पर्धा करायला हवी, तिची छबी त्याप्रमाणे असायला हवी या हेतूने कुका यांनी विचार करण्यास आरंभ केला. एअर इंडीया ही भारताचे प्रतिनिधीत्व करीत होती. भारत हा पूर्वीचा राजा महाराजांचा देश! राजे लोकांचें वैभव, ऐषाराम, त्यांच्या सुखसोयी ही कंपनी या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना देत असल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीचा एक स्वतंत्र 'मॅसकाॅट (बोधचिन्ह) असावा असे बॉबी कुका यांनी ठरवीले. एअर इंडियाचे आर्ट डायरेक्टर होते जाल कावसजी. आणि या कंपनीचे जाहिरातींचे सर्व काम पहात असे ती जे.वाॅल्टर थॉंप्सन ही जाहीरात संस्था. मग एक बैठक झाली तेथील कलाकार उमेश राव यांच्याशी. उमेश राव यांच्याबरोबर कुकांच्या विचार लहरीही जुळल्या.त्यांनी आपली कल्पना उमेश रावांना सांगीतली. आणि सर्वानुमते ठरले की कंपनीचे मॅसकाॅट (बोधचिन्ह) हा महाराजा असावा. तो राजा असला तरी त्याच्यात राजघराण्यातील 'ब्लू ब्लड नसेल. तो रॉयल वाटला पाहीजे तरी तो रॉयल नसेल. आतीथ्यदर्शकाचे रूप त्याने घेतलेले आहे आणि तीच त्याची ओळख व्हायला हवी. आणि बॉबी कुकांच्या कल्पनेतील त्या महाराजाला उमेश राव यांनी साकारले. आणि एअर इंडीयाचा महाराजा सेवेसाठी सज्ज झाला.

महाराजा अवतीर्ण झाला तोच मुळी भारतीय संस्कृतीची थोर परंपरा घेऊन! त्याचे उच्च रहाणीमान, आतीथ्यशील स्वभाव, खानदानीपणा, विनम्रता यांनी युक्त असा, आणि उमेश रावांनी या महाराजाला स्वतःची अशी वेगळी ओळख देण्याच्या दृष्टीने त्याला जरा निराळे व्यक्तीमत्व दिले. त्याच्या मिश्या झुपकेदार, लांब अन टोकेरी बनवल्या. चेहऱ्यावर नम्रपणा, आणि शालीनता, नजर सतत खाली पहाणारी आणि स्वागतासाठी कमरेत झुकून अभीवादन करणारे हात. उमेशरावांनी चित्रांकीत केलेल्या या महाराजाने पहाता पहाता आपली प्रतीमा जनमानसावर एवढी ठसवली की त्यापुढे एअर इंडीया व महाराजा हे एक समीकरणच होऊन बसले. महाराजाने एअर ईंडीयाला नवीन राजेशाही घराण्याच्या रूपाने आपली नवी ओळख करून दिली. विमानाचा रंग लाल व पांढरा ठेवण्यात आला जो शाही घराण्याशी सादृश्य आहे. त्याच्या खिडक्यांना राजमहालातील खिडक्यांच्या नक्षीकामाप्रमाणे सजविण्यांत आलेव त्यासोबत 'युअर प्यालेस इन द स्काय ' हे  एक घोषवाक्य देण्यात आले. '

या मॅसकाॅट सोबत कंपनीला प्रतीक म्हणून एक चिन्हही आवश्यक असते. हे चिन्ह म्हणजे कंपनीचे कार्य दाखवणारी दृश्य प्रतिमाच असते. त्यामुळे जागतीक स्तरावर उड्डाण करणाऱ्या एअर इंडीयाला स्वतःच्या चिन्हाची गरज भासली, ज्यामध्ये कंपनीच्या संदर्भात असलेला वेग व विश्वास या दोन्ही गोष्टीं त्यात अंतर्भूत व्हायला हव्या होत्या. त्यासाठी झोडियाक साईनमधील नववी रास सॅजीटेरीयस (धनु) हा ग्रीक पुराणातील धनुर्धारी  १९४८ साली स्वीकारला गेला. ज्यामध्ये वेग व वहन या दोन्ही गोष्टी ध्वनीत होत होत्या. आणि स्वतः जे.आर.डी.टाटांनी तो निवडला होता.  त्यांचेच आधुनीक संकल्पन सेंटार या रूपाने एअर इंडीयाचे चिन्ह (सिम्बॉल) म्हणून अस्तीत्वात आले आणि त्याला ज्या वर्तुळात बसवले होते ते कोणार्कच्या सुवर्ण मंदीराच्या रथाच्या चाकावरून स्वीकारण्यात आले होते. एअर इंडीयाच्या प्रत्येक विमानाच्या शेपटीवर हा धनुर्धर अचूक नेम धरून उभा असे.  व हा सेंटॉर देखील  मोठ्या प्रेमाने लोकांनी स्वीकारला. मात्र मध्यन्तरी एअर इंडीयाच्या कांही उच्चाधिकाऱ्यानी ह्या सेंटरचे उच्चाटन करून तेथे एका अमेरीकन कंपनीकडून सूर्यावर आधारीत असे नवीन प्रतीक बनवून घेतले. पण ह्या सूर्याने तसे कोणालाच आकर्षीत केले नाही. उलट पूर्वीचे वेगवान चिन्ह काढल्यामुळे कंपनीला लोकक्षोभाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे ते नवीन चिन्ह रद्द करून पुन्हां पूर्वीचाच सेंटार अभिमानाने अवतरला. नेहमीसारखाच आपला वेग व अचूकपणा दाखवत! पण पुढे या सेंटरचे रूपांतर एका उडत्या हंस पक्षामध्ये करण्यात आले. जे आज आपण एअर इंडीयाच्या विमानावर पहातो आहे. 

एअर इंडियाच्या महाराजाने विवीध देशातून प्रवास केला. तेथील लोकांमध्ये सहभागी झाला. त्यांचा पेहराव चढवला. तेथील संस्कृतीशी तादात्म्य पावला. जगभरातील सुंदरींशी फ्लर्ट करू लागला. कधी रेड इंडीयन बनला. कधी रशियन बाहुल्यामध्ये लपला. पॅरीसमध्ये महाराजाने मोनालिसाचे पोर्ट्रेट केले. तेथे त्याने कोटाच्या आत शृंगारीक चित्रे लावून तीही विकली. बेल्जीयम मधील पीसींग बेबीच्या धारेखाली छत्री घेऊन तो उभा राहीला. इंग्लड मध्ये तो बॉबी झाला तर टोकीयो मध्ये सुमो रेसलर बनला. भारतात तर त्याने विविध प्रकार केले. कधी बाइस्कोपच्या डब्यातून सिनेमा दाखवला, कधी पायाला प्याड बांधून क्रिकेट खेळायला निघाला. एवढेच नव्हे, तर ‘टाईम’ मासीकाच्या कव्हरवर सु्धा तो प्रकट झाला. या महाराजाचा वापर विविध तऱ्हेने करून एअर इंडीयाने निरनिराळ्या कल्पक अश्या जाहीराती बनवल्या. त्यामध्ये होर्डींग हे त्यांचे प्रमुख माध्यम होते. त्या करताना त्यात विनोद निर्मीती हा मूख्य आशय असे. मात्र थिल्लरपणाला तेथे अजीबात वाव नसे. त्यातील विनोदही इतके मार्मिक असत, की एका क्षणांत आपणांला त्यातील मर्म कळून येत असेल. केम्स कॉर्नरवरील त्यांचे होर्डींग बदलतांना त्यापुढे नेहमी एक कापडी आवरण असे. त्यावरही टॉवेल गुंडाळून कपडे बदलणारा महाराजा दाखविण्यात येई, व त्याच्या तोंडी वाक्य असे, 'यस , आय ॲम चेंजिंग!' नवीन होर्डींग रंगवून लोकांना दिसेपर्यंत मधल्या काळातही महाराजा लोकांचे मनोरंजन अश्या तऱ्हेने करित असे. एवढी कल्पकता दुसऱ्या कोणत्याच संस्थेने दाखवली नव्हती.

महाराजाला जशी बेसुमार प्रसीद्धी मिळाली, तशीच त्याच्या वाट्याला टीकाही आली. तत्कालीन पोलाद मंत्री टी. सुब्रम्हण्यम यांनी 'या महाराजांमुळे भारत हा  अजूनही राजा महाराजांचा देश आहे अशी जगात भावना होते,असे म्हटले होते. तर एकदा ऑलिम्पिक मध्ये भारताच्या निराशामय कामगीरीवर त्यांचे होर्डींग होते, त्यावर महाराजा हा कबड्डी खेळताना दाखवीला होता. त्याला शीर्षक होते, कबड्डीमध्ये भारत सुवर्णपदके मिळवू शकेल, कारण दुसरा कोणताही देश हा खेळ खेळत नाही. या क्रूर विनोदांवरही त्यावेळी वृत्तपत्रातून टीका झाली होती.  पण काहीही असले तरी एअर इंडियाची होर्डींग्स ही मार्मिक विनोदांनी नटलेली, हजर जबाबी आणि मनोरंजन करणारी होति हे नक्की! 


पाकिस्तानमध्ये आपल्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडाला त्यावेळी महाराजा आपले प्याड बांधून, काखेत ब्याट पकडून हातात ब्याग घेऊन परतत आहे असे दाखवून त्यावर शीर्षक दिले होते, 'पाक अप ॲंड फ्लाय' आणि हा महाराजा अल्पावधीतच वर्ल्ड फिगर बनला. या महाराजाने जगभरातील एअर लाइन्समध्ये अधीक ओळखले जाणार मॅसकाॅट म्हणून नंबर पटकावला. आणि त्याच्या या मिस्कील, व्रात्य, भाव निर्मीती, खोडकरपणा, विनोद या जोरावर एके काळी केवळ इन फ्लाईट मेमो पॅडसाठी वापरण्यात येणाऱ्या या महाराजाने एवढी प्रसीद्धी मिळवली, की एअर इंडीयाच्या जगभरातील प्रवाश्याना प्रमोशनल संदेश देणारी ती एक जागतीक मूर्ती ठरली. त्याच्या या गुणांच्या आधारे  केलेल्या या महाराजाच्या, पर्यायाने एयर इंडीयाच्या जाहीरातींना देशात तसेच परदेशात अनेक मानाची पारितोषिके व पुरस्कार मिळाले आहेत.

पण २०१४ मध्ये देशाचे नवे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजींनी पदभार स्वीकारताच केंद्रीय नागरी हवाई उड्डाण खात्याची एक बैठक घेऊन त्यांना एअर इंडीयाचे सादरीकरण करण्यास सांगतले. त्यात त्यांनी अशी इच्छा प्रकट केळी की या हवाई सेवा सरकारी न वाटता त्या खासगी विमान कंपन्यांच्या सेवेप्रमाणे वाटल्या पाहीजे. शिवाय एअर इंडीयाचा जो महाराजा आहे, तो आता जनतेला आपला वाटत नाही. महाराजा ऐवजी तो आम आदमी असायला हवा असे म्हणून थोडक्यात त्यांनी हा मॅसकाॅट बदलण्याचे संकेत दिले. पण तो न बदलता त्याला थोडे नवीन रूप देऊन त्याला थोडा तरुण करण्यात आला. ज्यामुळे तरुणांनाही तो आकर्षीत करू शकेल. आता एअर इंडिया प्रचंड तोट्यात गेली आहे. मुंबईतील जागा विकून दिल्लीला त्यांनी प्रस्थान केले. मुंबईतील जागा भाड्याने देऊन त्यातून अफाट पैसे मिळवून त्यातून खर्च चालवला जात आहे. एअर इंडीया विकायला काढली आहे. पुढे काय होईल ते होवो, पण अद्याप तरी आपला मित्र हा महाराजा जगभर हवाई प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्याना संदेश देत आहे. आपली आतिथ्यशील सेवा देत आपल्या खाली झुकवलेल्या नजरेने सर्वांचे स्वागत करत  त्याने वीस वर्षांपूर्वी नव्या सहस्त्रकात प्रवेश केला. वयाची वाढ होत गेली, तरी सदैव चिरतरुण असलेला हा महाराजा अजूनही सुहास्य वदनाने कुर्नीसात करत उभा आहे. अविचल अन अविरथ !

-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :