माझे वडील कलाकार होते :
माझे वडील गोविंद गजानन राजाध्यक्ष. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. कारण त्यांचे भाचे त्यांना मामा असे म्हणत व आम्ही त्यांच्या पुढेच लहानांचे मोठे झालो त्यामुळे आम्ही सर्वानी तेच पुढे चालू ठेवले. तेच आमच्याही अंगवळणी पडले होते. बाहेरील जगात ते बाबुराव म्हणून ओळखले जात. मला मामा आठवतात ते वयाच्या साधारण चवथ्या वर्ष्यापासून. त्या वेळच्या बेळगावातील चंदगड तालुक्यातील कारवे या बेळगावापासून बारा मैलावर असलेल्या गावी माझा जन्म झाला. शेतीवाडी भरपूर असलेल्या सुखवस्तू घरात. संपूर्ण आंब्या फणसानी लगडलेले, ऊस भात यांनी मोहरलेले असे गांव, कुणालाही हेवा वाटावा असे. पण मला आठवायला लागले ते आम्ही बेळगावात स्थायिक झालो तो काळ. कारण ते शहर होते. कारव्याचे घर नाना कुलकर्णी म्हणून होते ते सांभाळत होते. आम्ही चार भाऊ व तीन बहीणी असे आमचे कुटुंब होते. मी सर्वात लहान. शेंडेफळ. माझी आई मी अगदी लहान असतांनाच वारली. तिला पाहील्याचेही मला आठवत नाही अथवा आमच्या घरी तीचा एखादा फोटोही नव्हता. त्यामुळे ती कशी दिसत होती तेही मला माहीत नाही. मात्र आई वारल्यानंतर वडीलांनी आम्हांला बेळगांवी आणले. भावंडेही तशी लहानच होती.
१९४८ साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर जी ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली, त्यात आमचे कारवे गावही होते. तेथील लोकांनाही याची झळ बसली. पण आम्ही गावांत रहात नसताही आमच्या घराला कोणीही हात लावला नाही, याला कारण होते माझ्या वडिलांचे गावकऱ्यांशी असलेले स्नेह संबंध ! माझे वडील बंधू म्हणजे दादा ह्यांना लेखनाची आवड होती. शाळेत असतांना त्यांच्याप्रमाणे साहीत्य गूण असलेल्या समविचारी लोकांनी ' कुमार साहीत्य मंडळ ' स्थापन केले होते. त्यांचे 'प्रदीप' नावाचे हस्तलिखित सुरु केले होते. माझ्या बंधूचे अक्षर सुंदर होतेच. त्यामुळे लिखाणाची जबाबदारी त्याचीच असायची. बेळगावात भरलेल्या महाराष्ट्र साहीत्य संमेलनात या मासिकाला विशेष गौरविले गेले होते. शिवाय त्यावेळी हजर असलेल्या न.चिं. केळकर, आचार्य अत्रे, ग. त्र्यं. माडखोलकर, दत्तो वामन पोतदार, न.र.फाटक, काका गाडगीळ, मामा वरेरकर अशा अनेक नामवंत साहीत्यीकांनी त्यात आपले अभीप्राय लिहीले होते. त्या काळांत माझ्या बंधूंच्या वसंत, सह्याद्री, महाराष्ट्र, माणीक, अश्या मासिकांमधून त्याच्या कथा प्रसीद्ध होऊ लागल्या.लेखक म्हणून त्याला मान्यता मिळाली होती. याच काळात माझा भाऊ संघात जाऊ लागला. शिक्षणाकडे दुर्लक्ष होते म्हणून मामा त्याच्यावर खूप रागावत असत. त्यातच गांधीजींची हत्या झाल्याने संघाच्या अनेकांना अटक झाली, त्यात माझे बंधूही होते. पुढे सुटका झाल्यावर मामानी भावाचा विवाह केला. व पुढे याच माझ्या वडील भावावर मामानी कुटुंबाची सर्व जबाबदारी टाकली व भावाने ती निभावलीही.
मामांचा स्वभाव तसा तापट होता. मनाविरुद्ध झालेली गोष्ट त्यांना चालत नसे. पण त्यांनी आम्हां मुलांना चुकूनही कधी बोटही लावले नाही. सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायचा त्यांचा स्वभाव होता. हातातील घड्याळ वेस्ट एन्ड वॅाच कंपनीचे. त्याकाळी सर्वप्रसिद्ध असलेले ' पारकर ५१' व ' वाटरमन' ही सोन्याची पेनं ते वापरीत असत. अक्षर अगदी मोत्यासारखे अन छापील. इंग्रजी तसेच मराठी या दोन्ही लिखाणावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यासाठी शाईही ते चमकदार अशी स्वतः बनवीत. त्या काळी आम्हांला कॅलिग्राफी हा शब्दही माहीत नव्हता. कदाचित त्यानाही नसेल . पण छापल्याप्रमाणे ते लिहीत असत.
कित्येक वेगवेगळ्या आकाराच्या लहानमोठ्या लेखण्या ते करून ठेवीत. रॉजर्स हा चाकू ते वापरीत. त्याने केवळ लेखण्याच तासत नसत, तर त्याने लाकूड कोरून त्यातून अनेक कोरीव कामाच्या वस्तू आकार घेत. जशी उदबत्ती लावण्याची भांडी, तपकिरीच्या डब्या, वळलेल्या पाकळ्यांची फुले, पेपरवेट, अश्या गोष्टी ते करीत असत. आमची काही चंदनाची झाडे होती. त्यातील सुवासिक भागाच्या लाकडातूनही अनेक कलात्मक वस्तू ते बनवीत.
दरवर्षी त्यांचे कॅलिग्राफीने नटविलेले कॅलेंडर ते करीत असत. रोज फाडायच्या ३६५ दिवसांचे तारखांचे हे कॅलेंडर एक खास आकर्षण असायचे. वरती महिना, मध्ये मोठ्या आकारात तारीख, खाली वाराचे नांव व वर एक सुंदर असे चित्र. त्यावेळी आम्हांला कोणालाच त्यांच्या या कलागुणांचे मोल नव्हते. लिहितांना ते वापर करीत तो त्याकाळात वापरला जाणाऱ्या रुळाचा. हा गोल रूळ कागदावर धरून अलगद फिरवीत खाली आणला जात असे. टी स्क्वेअर चे काम करीत असे तो. हा रूळही ते स्वतः बनवीत . फुटक्या काचेच्या धारेने त्याला घासून नंतर पॉलीश पेपरने घासून तो गुळगुळीत करीत असत.. लिहिण्यासाठी स्वतः शाई ते तयार करीत असत. आमच्या मामांच्या प्रत्येक गोष्टीत कलेचा प्रादुर्भाव असेच असे. मग त्या कलात्मक गोष्टी असोत वा घरगुती वापराच्या दैनंदीन गोष्टी असोत. त्यातील कलात्मक दृष्टी जाणवून येतच असे. आमच्या गावच्या घरी दारात असलेल्या फणसाची पिकलेली तपकिरी रंगाची पाने खाली पडत, त्यांच्या पत्रावळी ते बनवीत. ती पत्रावळ इतकी गोल असे, की जणू वर्तुळच कापले असे वाटावे. त्या टोपायला ज्या काड्या लागत त्याही तासून अत्यंत बारीक अश्या बांबूच्या ते बनवीत असत. मीही त्यांच्या सोबत या गोष्टी शिकत असे. मोळाच्या झाडू बनविणे, हिराच्या केरसुणी बनविणे, यासाठी पीळ घालून केलेल्या त्या झाडूसुद्धा बघण्यासारख्या असत. मांडीवर सुतळी फासून तिला पीळ देणं हे त्यांच्याशिवाय कोणालाच शक्य होत नसे. पूजेचा नारळ ही ते पॉलिश पेपरने गुळगुळीत करत असत. लहानपणी मी मासीकातील चित्रांच्या नकला करीत असे, तेव्हां त्यातील चुका ते मला दाखवून देत.
मामांनी आपल्या आयुष्यालाही एक प्रकारची शिस्त लावली होती. सकाळी उठल्यावर चहा स्नान झाल्यावर ते पंचवीस सूर्य नमस्काराचे आवर्तन पूर्ण करीत. त्यानंतर दंड बैठका असत. व्यसन कोणतेही नसलेल्या आमच्या वडिलांना एकच व्यसन होते ते तपकिरीचे! मार्केट मधून जेव्हां मी त्यांच्यासोबत मानेंच्या दुकानांत तपकीर आणायला जात असे, तेंव्हा त्या दुकानांतील फणसोड्याच्या (पळस) पानातून बांधून दिलेल्या सुवासीक तपकिरीचा सुगंध मी भरभरून साठवून घेत असे. मात्र आमच्या मामांना आणखी तीन जबरदस्त व्यसने होती. त्याशिवाय त्यांचा दिवसही जाऊ शकत नव्हता आणि ती म्हणजे पुस्तके, वाचन आणि नाटक ही तीन व्यसने. त्यांच्या उमेदीच्या काळांत त्यांनी बालगंधर्वांची नाटके मनसोक्त पाहीली. अनेक नाटकातील पदे, स्वगते त्यांना तोंडपाठ होती. बालगंधर्वांना तर ते देवाप्रमाणे पूजत. सर्व नाटकांची पुस्तके त्यांनी घेतली होती. बालगंधर्व, केशवराव भोसले, गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, नारायणराव जोगळेकर, चिंतामणराव कोल्हटकर, दीनानाथ मंगेशकर, या सर्वांची केवळ नाटकेच त्यांनी पाहिली नाहीत तर त्यांची चरित्रेही त्यांना अवगत होती. चिंतामणराव कोल्हटकरांचा खलनायक पाहून कित्येकदा लोक त्यांना मारायला जात अश्या कथा त्याकाळात ऐकायला येत. त्यांचा पुण्यप्रभाव मधील वृंदावन हा त्यांनी अजरामर केला होता. कोल्हटकरांनी जेव्हां आपले ' बहुरूपी' हे आत्मचरित्र लिहिले त्यावेळी प्रथम मामानी ते खरेदी केले.
वाचनाच्या वेडापायी मामानी असंख्य पुस्तके विकत घेतली. त्यामध्ये जशी अभ्यासपूर्ण अशी होती त्याच सोबत मनोरंजनात्मक होती. न. ची. केळकर यांच्या समग्र साहित्याचे १२ खंड, स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचे दहा खंड, स्वामी रामतीर्थांचे चरित्र, स्वामी परमहंस यांचे चरीत्र, लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य, ज.स. करंदीकरांची गीतातत्वमंजिरी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्य समर, आत्मचरित्र, ख्रिस्ताचे हिंदुत्व, जोसेफ मॅझीनी, काळे पाणी आदी ग्रंथ, नाथमाधवांचे वीरधवल, स्वराज्याची घटना, स्वराज्याचा श्रीगणेशा, रायक्लब अथवा सोनेरी टोळी , गो. ना. दातारांचे कालिकामुर्ती, अधःपात, विलासमंदिर, इंद्रभुवन गुहा या कादंबऱ्या, हरी नारायण आपटे यांच्या पण लक्षांत कोण घेतो, मी , रुपनगरची राजकन्या, लंडंन येथील बड्या लोकांची गुप्त कृत्ये अश्या कादंबऱ्या, शिवाय वि.वि. बोकील, ना. धो. ताम्हणकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे सुदाम्याचे पोहे, राम गणेश गडकऱ्यांचे ' वाग्वैजयंती , अशा अनेक मौल्यवान पुस्तकांचा खजीना त्यांनी जमा केला. याच बरोबर साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा, संत नामदेवांच्या गाथा, अशी धार्मिक पुस्तकांचीही त्यात महत्वाची वर्णी होती. शिवाय दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या बाबुराव अर्नाळकरांच्या सर्व रहस्यकथा याही यात भर टाकीत असत. आणि या ग्रंथ संग्रहालयाला त्यांनी वाचनालयाचे रूप देऊन त्याचे ‘मंगेश वाचनालय’ असे नामकरणही केले होते. तसा रबर स्टॅंप बनवून प्रत्येक पुस्तकांवर तो मारीत असत. कोणताही संदर्भ हवा असल्यास त्यांना सांगताच ते तात्काळ नेमके पुस्तक काढून त्यातून दाखवीत. एवढा त्यांना स्मरणशक्तीवर भरवसा होता.
मला आठवते ते माझ्या लहानपणी रात्री जेवण झाल्यावर सर्व बहिणी कामाची आवराआवर करून आल्या, की मामांचा एखादी कादंबरी वाचून दाखविण्याचा कार्यक्रम असे. रोज थोडीथोडी अशी ती वाचवून दाखवीत. त्यांच्या भोवती गराडा घालून त्या कथा ऐकणे ह्यात मोठी मजा येत असे. त्यातच रात्री कोकिळेने टोचा मारून पिकलेले आंबे पाडलेला आवाज आला, तर ते गोळा करण्यास रात्री आम्ही बाहेर धावत असू. नंतर ते आंबटगोड असे आंबे बहीण चिरून त्याला मीठमिरची लावत असे व मग आम्ही खात असू. आणि केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजीमधील ग्रिम्स फेरी टेल्स, शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथा, रेनॉल्डच्या रहस्यमय कादंबऱ्या यांचीही भाषांतरे आम्हांला ऐकायला मिळत. असा हा कथा कथनाचा कार्यक्रम कैक दिवस आमच्या घरी चालू असे. यातूनच मला वाचनाचा मनस्वी नाद लागला. अरेबियन नाईट्सच्या गोष्टी तर एका वेगळ्याच विश्वांत नेत. मासिके तरी दरमहा आमच्या घरी अगणित येत. शिवाय त्याकाळची साप्ताहीके म्हणजे अत्र्यांचा नवयुग, फडक्यांचा झंकार, मौज, धनुर्धारी, देखील असत. एकूण मेजवानीच असे आमच्या घरी ! टिळकांचा ' केसरी ' अनेक वर्षे आमच्या घरी पोस्टाने यायचा. मामा त्याचे वर्गणीदार होते. दोऱ्याने बांधलेली केसरीची घडी दर मंगळवार व शुक्रवार अशी येत असे. आमच्या कारवे गांवात पोस्ट नव्हते. त्यामुळे सुमारे दोन अडीच मैल दूर असलेल्या तुर्केवाडी गांवात जाऊन टपाल आणावे लागत असे. तसेच इतर गोष्टीबद्दलही सांगता येईल. त्यांनी डबल बॅरलची अमेरीकन ॲटोमॅटीक रायफल घेतली होती. त्यावेळी केवळ शेतीच्या रक्षणासाठी याचा परवाना मिळत असे. पण मामानी त्यांच्या ओळखीमुळे स्वसंरक्षणाचा परवाना मिळवला होता. त्यांच्या खास कपाटातील खणात एल.जी. काडतुसे ठेवलेली असत. दर आठवड्याला ते आपली बंदूक स्वच्छ करीत. मात्र १९४८ साली महात्मा गांधींच्या हत्येच्या वेळी माझा मोठा भाऊ संघात जात असल्याने आमची बंदूक जप्त करण्यात आली. व परवाना रद्द केला गेला. तसेच त्यांनी अमेरिकन रॅले ही तीन गिअर ची सायकल स्वतःसाठी घेतली होती. तीदेखील स्वच्छ करणे हा त्यांचा आवडता छंद होता. या सायकलवर चढण्यासाठी त्यांनी मागच्या चाकावर एक पीन बसवलेली होती. त्यावर पाय देऊन ते सायकलवर बसत. ही प्रथा अनेक लोक त्यावेळी पाळत. याच सोबत संगीताचा नादही त्यांना होता, नाट्यसंगीत तर त्यांच्या रोमारोमात भरले होतेच, शिवाय सुगम संगीत, फिल्म संगीत याचेही त्यांना वावडे नसे. गाणी आवडली की रमण म्युझिकल मार्ट मध्ये जायचे व त्या चित्रपटाच्या अथवा नाटकाच्या रेकॉर्ड्स विकत आणायच्या. त्यासाठी एच एम व्ही चा ग्रामोफोन घेतला होता. बालगंधर्व, विष्णूपंत पागनिसांच्या संत तुकाराम, पन्ना, अनमोल घडी, वाल्मिकी, धुपछाव, मराठीतील सासुरवास, लाखाची गोष्ट, संत तुळशीदास, शिवाय नूतन पेंढारकर मास्टर दामले, श्रीपाद नेवरेकर, आदींच्या नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिका घरांत होत्या. त्या लावून सोबत गाणे म्हणणे हा माझा आवडता उद्योग असे.
आमचे मामा अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. देवांवर, विशेषतः गुरुदेव दत्तावर त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे अनेक आरत्या, दत्तमहाराजांची पदे, देवाची संस्कृत स्तुती लहान लहान वह्या करून आपल्या सुवाच्य अश्या कॅलिग्राफीत ते लिहून काढीत. मोडी लिपी तितक्याच सुरेलपणे ते लिहीत. त्यांच्या अनेक डायऱ्या अश्या लिहिलेल्या होत्या. मामांचे वाचन हे केवळ वरवरचे वाचन नसून त्याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला होता. गीतेमधील भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या वचनांचा प्रत्येकानी कसा अभ्यासपूर्ण अर्थ काढला याचीही ते उत्तमरीत्या मीमांसा करीत. ज्ञानदेवांना त्यात भक्तिमार्ग आढळला तर टिळकांना त्यात कर्मयोग जाणवला. एकदा एस.एस.सी. ला असतेवेळी आमच्या धड्यातील ज्ञानेश्वरांच्या ओवीमधील अर्थ आमचे शिक्षक समरसून सांगत होते. त्यामध्ये अखेरीस ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःकडे कमीपणा घेऊन म्हटले आहे की, ज्या आकाशात गरुड झेपावतो, त्याच आकाशात एका लहान पाखराला उडायला हरकत नसते,
श्री व्यासाची पदे पाहता | आणिता श्रवण पथा | मऱ्हाठीचा ।।
व्यासादीकांचा उन्मेख । राहाटथी जेथ साशंक ।
तेथ मीही रंक येक । चावळी करी ।।
परी गीता ईश्वर भोळा । ले व्यासोक्ति कुसूम माळा ।
तरी माझीया दुर्वादळा | ना न म्हणे की ||
“ परंतु गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे. म्हणून व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करतो, व आमचे गरीबाचे दुर्वांकूरही नाही म्हणत नाही. ज्या गीतार्थाचे यथार्थ वर्णन करण्यांविषयी व्यासादिकांचे देखील ज्ञान साशंक होते, त्या गीतेचे मी हे गरीबाने व्याख्यान केले आहे.” व त्यांनी आपल्या गीतेवरील टीकेला नाव दिले ' भावार्थ दीपिका ' तसेच मोरोपंतांनी जी टीका लिहीली तिचे नांव मात्र मोरोपंतांनी दिले ' यथार्थ दीपिका ' यामध्ये मोरोपंतांची गर्विष्ठ वृत्ती दिसते. असे आमच्या शिक्षकांनी सांगितल्यावर संध्याकाळी मी शाळेतून घरी आल्यावर मामांशी बोलत असता माझी नवीन माहिती सांगितली. अर्थात मामा ज्ञानेश्वरीचे पारायण नेहमीच करीत असत. ते मला गंभीरपणे म्हणाले, ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाला ' भावार्थ दीपिका म्हटले आहे, ते योग्यच आहे, एवढा गहन अर्थ सोप्या भाषेत करून त्यांनी सांगूनही आपण केवळ वरवरचा अर्थ सांगितला आहे असे नम्रपणे त्यांनी सांगितले. यातच ज्ञानदेवांचे मोठेपण दिसते. यथार्थ म्हणजे जशाचा तसा अर्थ सांगितला आहे असे म्हणणारा मोरोपंत नसून तो वामन पंडीत आहे. ते आपल्या काव्यांत नेहमी यमक जुळवीत म्हणून त्यांना ' यमक्या वामन ' असेही म्हणत. मात्र मोरोपंतांनी केवळ आर्या लिहील्या आहेत. माझे मन याला मानेना. एकतर माझे शिक्षक व्यासंगी होते. धडे अथवा काव्य वर्गात शिकवतांना ते स्वतः गृहपाठ करून येत असत. नंतर मामानी आपले पुस्तकांचे कपाट उघडून त्यातील एक पुस्तक त्यांनी काढले. ते होते लोकमान्य टिळकांचे ' गीतारहस्य ' टिळकांनी केलेली गीतेवरील मीमांसा. त्यातील प्रस्तावनेमध्ये टिळकांनी वामन पंडितांच्या यथार्थ दीपिकेचा उल्लेख केलेला त्यांनी मला दाखवून दिला. आणि तेंव्हा मामांच्या अभ्यासाची, त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची, आणि समयसूचकतेची जाणीव मला झाली. दुसऱ्याच दिवशी मी गीतारहस्य घेऊन शाळेत गेलो. व शिक्षकांनी देखील आपली चूक मान्य केली. एक दिवस मी मामांना विचारले, तुम्हांला इतक्या गोष्टींचे आकलन कसे होते. एवढ्या गोष्टी तुम्ही ध्यानांत कश्या ठेवता , मुख्य म्हणजे तुम्ही या शिकला कश्या ? त्यावर त्यांनी एक साधे तत्वज्ञान सांगितले; मला गोष्टी आवडायचा. त्यामुळे इतिहास वाचायला लागलो. त्यातून इतिहासातील सोनेरी क्षण जाणवायला लागले. त्यामुळेच जे वाचत जायचो ते मनातल्या कप्प्यात कुठेतरी पक्के बसून राही. त्याकाळात शिकलेले इंग्रजी भाषेचे ज्ञान इंग्रजी भाषेतील गोष्टी वाचण्यास कारणीभूत झाले. त्यातून ज्ञान वाढत गेले. वृत्तपत्रे वाचण्यातून राजकारणाच्या गोष्टी समजावून देऊ लागल्या. साहित्याच्या ओढीतून साहित्यिकांची ओळख झाली. नाटकांच्या वेडातून बालगंधर्व, चिंतामणराव कोल्हटकरांचा वृंदावन, गणपतराव जोशींचा हॅम्लेट, गणपतराव बोडस, यांची कामे, नेवरेकर, दिनानाथ मंगेशकर, चिंतोबा गुरव, गोविंदराव टेंबे, नानासाहेब फाटक, असे गद्य व पद्य नट समजले. आणि जे वाचले, पाहीले, अनुभवले हे केवळ आवडीतून, त्यामुळे सर्व गोष्टी ध्यानांत राहील्या. आठवणी रहात असल्याने कधीही त्या सांगता येतात. आचार्य अत्रे यांची कधी घणाघाती तर कधी लालित्याने नटलेली भाषा त्यांना आवडायची, तर कधी नरसिंह चिंतामण केळकरांची प्रासाद युक्त विद्वत्ताप्रचूरभाषा त्यानां मोहवायची.
कारव्याचे आमचे घर म्हणजे सर्व राजकारणी लोक, सरकारी अमंलदार, मित्रमंडळी नातेवाइकांचे हक्काचे निवासस्थान होते. मामा कोणत्याच राजकीय पक्षाला बांधील नव्हते, पण सर्वच पक्षांतील लोक त्यांच्या मित्र मंडळीत होते. यात शेतकरी कामगार पक्ष होता, काँग्रेस होता, समाजवादीवाले होते तसेच कम्युनिस्ट पण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी मामांना अतीव आदर होता, भक्ती होती. त्यांच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भोगलेल्या हालअपेष्ठा बद्दल केवळ कृतज्ञता होती. तसेच काँग्रेसने त्यांची कदर न केल्यामुळे त्यांना काँग्रेसचा तिरस्कार वाटे. लहानपणी आम्हांला ते सर्व क्रांतिकारकांच्या ओजस्वी बलिदानाच्या कथा सांगत, त्यांचा इतिहास सांगत, त्यामुळे या लोकांविषयी माझ्याही मनांत आदर वाढतच गेला. नाशिकला जॅक्सन या कलेक्टरला गोळ्या घालणारा अनंत कान्हेरे, फर्ग्युसन कॉलेज मधील वाचनालयात हॉटसन या गव्हर्नर वर गोळ्या झाडणारे बा. म. गोगटे. रॅन्ड साहेबाला मारणारे चाफेकर बंधू, साताऱ्याचे पत्री सरकारवाले क्रांतिसिंह नाना पाटील अश्यांच्या चित्तवेधक कथा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत. मात्र गांधीजींचा भोंगळ गांधीवाद त्यांना मान्य नव्हता. इंग्रज सरकार लोकमान्य टिळकांना आपला शत्रू मानीत असे व गांधीजींना मांडीवर खेळणारे नातवंड जसे आजोबाच्या मिशा ओढून उपद्रव देते तसे त्यांची चळवळ ब्रिटिशाना वाटत असे ते म्हणत. सुभाष बाबूंनी जेव्हां सैन्य फितवले, हिटलरने ब्रिटिशांवर आता इंग्लंड राखायचे की हिंदुस्थानवर राज्य करायचे? अशी वेळ आणली व हेच खरे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आहेत, ही पक्की भावना त्यांच्या मनांत होती. नाटकांतील स्वगते तशीच सावरकरांच्या माझी जन्मठेप, सत्तावानचे स्वातंत्र्य समर या ग्रंथातील उत्तरेंच्या उतारे त्यांना मुखोद्गत होते. बालगंधर्व आणि सावरकर ही त्यांची दैवते होती !
मामांचे सर्वत्र लक्ष असे. मी जेव्हां जेजे ला जायचे ठरविले, तेव्हां त्यांनी मला सर जमशेटजी जीजीभाई यांची सर्व हकीकत संगीतली. जे. जे. स्कुल ॲाफ आर्ट त्यांनी कसे सुरु केले. त्यांचा मूळ व्यवसाय, बाटलीवाला हे नांव जाऊन बॅरोनेट कसे झाले, ही सर्व माहिती त्यांच्या कडून मला मिळाली. मामा लहानपणी मुंबईत होते. त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांची आई त्यांना घेवून बेळगांवी तिच्या माहेरी आली. नंतर तिने आपल्या कारवे या गांवी शेतीवाडी घेतली. नंतर मामांची मोठी बहीण त्यांना शिक्षणासांठी कोकणांत घेवून गेली. तोपर्यंत आजी कारव्याला स्थीरस्थावर झाली होती. पुढे मामा परत आल्यावर ते बेळगांवी आले. त्यामुळे मुंबईची त्यांना माहीती होती. तेथील कोळीणी पारशी लोकाना घासाघीस करू लागल्यावर पॅापलेटने कशा मारीत ह्याचे ते वर्णन करीत. तसेच मुंबई घडविणारा माणूस म्हणून व शालान्त परीक्षेसाठी संस्कृत विषयाला ' जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती ' ठेवणारा महापुरुष म्हणून जगन्नाथ शंकरशेट याना ते मानत.
पुढे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत त्यांचा एक डोळा गमावला. त्यांच्या एका डोळ्याने त्यांना दिसणे बंद झाले. दुसऱ्याचीही नजर थोडी कमी झाली. तेव्हां जाड मॅग्निफ्लाइंग ग्लास घेऊन ते वाचत असत. कधी कधी दुसऱ्याला वृत्तपत्र वाचून दाखवायला सांगत. पण वाचनात खंड म्हणून पडला नाही. बेळगांवच्या सार्वजनीक वाचनालयात स्वतः जाऊन ते पुस्तके आणीत. पण त्यांची तब्येत शेवटपर्यंत चांगली होती. घरातल्या घरांत पावले मोजून ते चालत असत. कॉटला धरून उठाबशा काढीत. दिवस पालटत होते, काळ बदलत होता, जुन्या आठवणी त्यांच्या भोवती रुंजी घालत असत. त्यांच्या आईच्या आठवणी सांगत. हट्टी झाले होते. आम्हीही मनाविरुद्ध काही झाले की चिडत असू. त्यांचा हात चालू होता तोवर ते स्वतःच्या अक्षरांत पत्रे लिहून पाठवीत, पुढे त्यांचा हात कापू लागला तेव्हां दुसऱ्याकडून पत्रे लिहवून घेत. एकदा मी नवा घेतलेला टेप रेकॉर्डर घेऊन बेळगांवला गेलो, तेव्हां त्यांच्या नकळत मी त्यांना प्रश्न विचारून बोलते करत होतो, व ते टेप करीत होतो. मला वाटले कदाचित त्यांना आवडणार नाही. त्यांना टेप करीत असल्याचे कळाले, तेंव्हां त्यांनी स्वतः होऊन बोलायला सुरुवात केली. एवढेचं नव्हे, तर त्यांनी जुनी नाटकांतील पदेही गायली.
मी शिकायला जेव्हां मुंबईला आलो तेव्हां त्यांच्या सुंदर हस्ताक्षराचे मोल मला कळले, त्यांच्यातील कलागुणांची जाणीव झाली,त्यांच्या कॅलिग्राफीची लय कळाली. पण तोवर खूप वेळ झाला होता. तेव्हां पाहीले तर त्यांच्या डायऱ्या, वह्या सर्व कांही नाहीसे झाले होते. एकच फाटलेली वही मला मिळाली. त्यामध्ये त्यांनी लिहिलेला काही मजकूर मला मिळाला तो मी जपून ठेवला. मध्यंतरी त्यांच्या कपाटातील काही पुस्तके नाहीशी झाली, ती मी मुंबईहून मिळवून त्यांना दिली. तीही त्यांनी जाड भिंग धरून पुन्हां वाचून काढली. नंतर मात्र त्यांना तेही जमेना. मग कोणाला तरी ते वाचायला सांगत. पण स्मरणशक्ती मात्र पूर्णपणे शाबूत होती. आठवणी जागृत होत्या. त्यांच्याच या स्मरणशक्तीचा, कलाकाराचा वारसा त्यांच्याकडून मला मिळाला. आणि समृद्ध असे जीवन जगून त्यांनी १७ जुलै १९७९ रोजी मामानी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
म्हणतात ना, माणूस असतो तोवर त्याची किंमत कळत नाही. आणि तो गेल्यावर मात्र त्याची किंमतच नव्हे, तर त्याची महानता, प्रेम, माया, ममता यांचे मोल कळते. त्यांच्या अस्तित्वाचा आधार जाणवतो. त्यांच्या मायेच्या महापुराचा ओघ कळतो. पण तोपर्यत खूप वेळ झालेला असतो. त्यांच्या नसलेल्या अस्तीत्वाचा विचार आपल्या मनाला कुरतडत असतो. पोटांत कधीही न भरून येणारा खड्डा पडलेला असतो, आपण अक्षरश: भिकारी झालेलो असतो. आणि आपल्याला जाणवते ती एक भयानक पोकळी. कधीही भरून न येणारी ! मनाला वेदना देणारी ! अंत:करणाला पीळ पाडणारी ! आजही मला भूतकाळातील बऱ्या वाईट गोष्टी जेव्हां त्रस्त करतात, जीवाची तगमग होते, तेव्हां मी खोलीत जाऊन मामांची रेकॉर्ड केलेली टेप वाजवून शांतपणे ऐकत बसतो. वाटते ते शेजारीच आहेत. पुन्हां नाटकाच्या जमान्यात जाऊन ते त्या आठवणीत रमतील. बालगंधर्वांची भामिनी, वसूंधरा, सिंधू, ह्या भूमीका त्याना मोहवतील. आणि त्यातील नाट्यपदे गुणगुणायला लागतील !
- मं. गो. राजाध्यक्ष.
*******************************




You father was an art lover and genius all the way. Your vyakti chitr is do real that one can sees the person alive. You are the best . Keep writing.Don't care who reads and who does not. I love this ortriat of your father as one of the best you have written, Just for your information your first 3/4 paras almost resemble to my father.Like...hand writing ,liking for plays, shlokas, natya sangeet etc.
ReplyDeletePlease please do not stop writing if it makes you happy, and not for some one clicks the lik button without reading,Cheers.
please ignore the typo error as the eye site is bit weaker nowadays
Delete