अक्षरांची प्राचीन सौंदर्यदृष्टी जपलेला कला प्राध्यापक : प्रा. रमेश खापरे.



नागपूरचे चित्रकला महाविद्यालय हे राज्याचे कला संचालनालय निर्माण होण्यापूर्वी तंत्र शिक्षण खात्याअंतर्गत पॉलीटेक्नीक कला विद्यालय म्हणून कार्यरत होते. तेथे तीन वर्षाचा पदवीका अभ्यासक्रम सुरु होता. त्यामध्ये रंगकला, उपयोजीत कला, छायाचित्रण, शिल्पकला असे सर्वच विषय शिकवले जात असत. नंतर त्यांची पदवीका पूर्ण झाल्यानंतर अश्या विद्यार्थ्यांना सर जे.जे.उपयोजीत कला महाविद्यालयात द्वितीय वर्षात प्रवेश मिळत असे. जे.जे.लाही पदवीका होती. पण ती पदवीला समान अशी होती. कारण या पदवीकेचा दर्जा पदवीला समकक्ष होता. असे अनेक विद्यार्थी तेव्हां जे.जे.मध्ये प्रवेश घेत. आणि १९६९ साली काही विद्यार्थी आले त्यामध्ये एक विद्यार्थी होता त्याचे नांव होते रमेश खापरे.

मीही नुकताच त्यावेळी स्टाफ म्हणून जे.जे.मध्ये आलो होतो. आणि माझ्याच वर्गात हे विद्यार्थी होते. आमच्या वर्गप्रमुख होत्या प्रा. मीरा करंडे मॅडम. अन सोबतीला जवळजवळ आम्ही सात आठ स्टाफ. वर्ग कसा तुडुंब भरल्यागत वाटत असे. शिवाय व्हिजीटींग म्हणून व्ही. एस. गुर्जर, आंबेरकर, एल.एस.वाकणकर, रमेश कुलकर्णी, असे व्यावसायीक कलाकारही असत.   यात विद्यार्थी म्हणून दत्ता पाडेकर, प्रकाश बिस्ने, शेखर साळवी, नरेंद्र विचारे असे विद्यार्थी होते. जसजसे हे विद्यार्थी वरील वर्गात गेले, तशी त्यांच्यात परिपक्वता येऊ लागली. ड्रॉईंगवर भर असलेले विचारे, पाडेकर वगैरे एकत्र दिसत. फोटोग्राफीच्या आवडीमुळे बिस्नेचा वेगळा ग्रुप झाला. यात पाडेकर तसा सर्वत्र दिसायचा. चेहरा साळसूद ठेवून त्याआडून मिस्किलपणे इतरांच्या फिरक्या घेणे हे पाडेकरचे आवडते काम. समोरच्याला ते कळतही नसे. मात्र खापरे हा सतत गंभीर चेहऱ्याने, पोक्तपणे वागत असे. ना कधी मस्ती, टवाळी, ना कधी विद्यार्थी दशेतील मौज मजा. सतत कामात मग्न. शेवटच्या वर्षी आम्हांला साठे सर वर्गप्रमुख होते. विचारे, साळवी, खापरे हे विद्यार्थी माझ्यासोबत जास्त असत.कधी कधी खापरे बराच भावनीक होऊन बोलत असे. एकदा वर्गातील बरेच विद्यार्थी स्टडी टूरला गेले. न गेलेले वर्गात काम करीत असत. अश्या वेळी एकदा खापरे माझ्याकडे आला व मला म्हणाला, सर टूरवर पाडेकर अगदी एकटा पडला आहेस. मला त्याने पत्र लिहीले आहे, त्यात त्याने उल्लेख केला आहे. मला पाडेकरच्या सवयी माहीत होत्या. मी त्याला म्हटले, तू पाडेकरची काळजी मुळीच करू नकोस. तो कोणी एकटा असलेल्यालाच नाचायला लावेल.

पुढे परीक्षा आटोपल्या. कांही दिवसांनी नरेंद्र विचारे, शेखर साळवी, आणि रमेश खापरे आमच्याकडे लेक्चरर म्हणून लागले. विचारे तसा मुलांमध्ये प्रसीद्ध असल्याने तो त्यांच्यासोबत खेळ, स्पर्धा यात भाग घेत असे. शेखरचा सांस्कृतीक कामाकडे कल दिसे. मात्र खापरे शिक्षक म्हणून आपले ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करीत होता. स्वाध्यायींका काढणे, त्यांचे परीणाम पहाणे, ह्या कामात तो रस घेऊ लागला. पुढे या जे.जे.च्या दोन्ही संस्थामध्ये प्रथम शिक्षकांचा व नंतर हे शिक्षक आम्हांला नको म्हणून विद्यार्थ्यांनी केलेला संप झाला. त्यावेळी संस्थेमध्ये शिक्षकांचे तसेच शिक्षक विरोधी विद्यार्थ्यांचे सरळ सरळ दोन गट बनले.यावेळी खापरे हाॅस्टेलचे रेक्टर म्हणून काम पहात असे.कांही शिक्षकांनी यावेळी खापरेचा वापर करून घेतला. मात्र खापरेनी विद्यार्थ्यांना केवळ रेक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहीले नाहीं, तर त्यांच्यासाठी अनेक उपक्रमही आयोजीत केले. बाळासाहेब ठाकरे यांनाही त्याने व्यंगचित्रांची  प्रात्यक्षीके देण्यासाठी आमंत्रीत केले व  बाळासाहेबांनीही तितक्याच आत्मीयतेने विद्यार्थ्याना दिली. गणेश चतुर्थीला त्याने विद्यार्थ्यांकरवी गणपती बनविण्याची स्पर्धा घेऊन तेथे गणपती बसविला. एकदा त्याने मी, प्रा. षांताराम पवार व अरुण साधू यांना विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी बोलाविले. असे अनेक सर्जनशील कार्यक्रम घेऊन खापरे यांनी आपल्यातील कला शिक्षक जिवंत ठेवला होता. व हॉस्टेलही कृतीशील ठेवले होते. मधल्या काळांत माझ्यावर एका गुंड विद्यार्थ्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हां फक्त साळवी, विचारे व खापरे हे तिघेच मला धीर देण्यासाठी आले होते. व शेवटपर्यंत माझ्यासोबत राहीले. मला आवडतो म्हणून खास नागपूरी ठेचा आठवणीने खापरे घेवून येत असे.

खापरेची कॅलीग्राफी सुंदर होती. मी अधिष्ठाता असताना तो अश्या सुलेखनावर आधारीत आयोजीलेल्या स्वाध्यायीका करून  दाखवीत असे. प्रत्येक अक्षरावर त्याने निरनिराळी अनेक प्रोजेक्ट बनवून घेतली. सुलेखनाचा वापर हा उयुक्ततेसाठी करून घेण्याची नवीन तऱ्हा त्याने अवलंबीली. त्याचे हे काम पाहून, तसेच कॅलीग्राफी करणारे आणखीही संस्थेमध्ये असे शिक्षक होते त्या सर्वाना घेऊन मी एक बैठक घेतली व सुलेखन या विषयावर एक संशोधनात्मक काम करून त्यातून स्वतःचे असे सर्जनशील काम प्रत्येकाने करायचे ठरवले. कारण मीही सुलेखन करीत असे. त्यासाठी आठवड्यातून एकदा सर्वानी एकत्र येऊन आपण काय प्रगती केली आहे ते दाखवायचे व संपूर्ण काम होताच जहांगीर आर्ट गॅलरी येथे सर्वांचे जेजे उपयोजीत कला महाविद्यालताच्या अध्यापकांच्या कामाचे प्रदर्शन भरवायचे असा माझा मानस होता. पण तो दिवस संपला. दुसऱ्या आठवड्याला खापरे व दुसरा एक असे दोघेच राहीले. व नंतर फक्त खापरे एकमेव अभ्यास करत राहीले. माझा हे करण्यामागील हेतू हा होता की येथील उपयोजीत कलेचा अध्यापक वर्ग कधी प्रदर्शन केले तर त्यामध्ये बरेचजण लॅंडस्केप करतात. वास्तवीक हे  फाईन आर्टचे काम आहे. मग आपण जे विषय शिकवतो ते खरेतर आपण दाखवले पाहीजेत. मग ग्राफ़िक असोत, इलस्ट्रेशन असोत, फोटोग्राफी असो वा विचारप्रसारणाचा कोणताही विषय असो. आणि शिवाय विद्यार्थ्यांनाही आपले शिक्षक काय काम करतात हेही समजेल. ही माझी भावना त्यांना सांगीतली होती.

पुढे विद्यापीठाने फाईन आर्ट विषयावर मास्टर डिग्री सुरु केली.त्यावेळीही मी सर्व शिक्षकांना सांगीतले की आता काळाची गरज आहे, की प्रत्येक शिक्षकाने आपल्या विषयातील उच्च शिक्षण घेतलेच पाहीजे. नाहीतर तुम्ही कामात कितीही निपुण जरी असला तरी तंत्र शिक्षणसंस्थेला उच्च शिक्षण पदवीधरच लागणार. पुढे त्यावरच तुमची पगाराची स्केल अवलंबून रहाणार आहेत. आणि अन्य राज्यात हे पदवीधर त्यांना भरपूर मिळणार. आणि यावेळीही ही सूचना मनावर घेणारा खापरेच होता. त्याने सुलेखनाद्वारे लिहिलेल्या प्राचीन पोथ्यांचा अभ्यास करण्यास आरंभ केला. प्रा. हणमंते सरांना त्याने मार्गदर्शक म्हणून निवडले. नागपूर तसेच इतर भागात जेथे जेथे म्हणून अश्या प्राचीन पोथ्या मिळतील त्या मिळवून त्या त्या कालावधीतील लेखन पद्धतीचा अभ्यास खापरेने सुरु केला. एकदा मला खापरेने विचारले, सर तुम्हांला हरताळ शब्दाचा अर्थ माहीत आहे का? हरताळ म्हणजे बंद. आजच्या काळात बराच रूढ असलेला शब्द आहे हा. मी म्हटले. त्यावर एक पोथी काढून त्याने दाखविलें की हरताळ म्हणजे हळद . त्या काळात एखादा शब्द लिहीताना चुकला तर त्यावर हळद फासत. म्हणून हरताळ फासला असे म्हणतात. आपले वर्गकाम सांभाळून खापरेनी आपला हा सुलेखनाचा प्रबंध पूर्ण केला. एक मोठा पल्ला गाठला होता त्याने. आणि विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठात फाईन आर्ट विभागात मास्टर डिग्री सुरु झाल्यावर त्यात पदव्यूत्तर शिक्षण घेणारा पहीला विद्यार्थी म्हणून खापरेने मान पटकवला. विद्यापीठाच्या रेकॉर्डवर खापरेचे नांव राहीले.

तसा खापरे नेहमी गंभीर दिसत असला तरी बऱ्यापैकी मिस्कील होता. कधीतरी तो सहजगत्या असे कांही बोलून जाइ की समोरच्याला ते कळायला वेळ लागे. कोणत्याही कामाला तो तत्पर असे. आणि तेही अगदी मनापासून. अश्या या उमद्या माणसाच्या जीवनात कांही कटू प्रसंगही आले. पुढे हाॅस्टेलचे कांही विद्यार्थी त्यांच्यावर उलटले. बारीकसारीक कारणे काढून घोषणा देत फिरू लागले. त्यात खापरे कुटुंबीयासहीत तेथे रहात असे. मी एकदा त्यांच्याकडे गेलो असता, खापरेना पाहून  बऱ्याच विद्यार्थ्यानी जोरजोरात  घोषणा देऊन नकोसे करून सोडले होते. मला म्हणाला, रोज हे असे चालू आहे. खापरे शिस्तप्रिय होता. त्याची शिस्त त्याच्या कामातून देखील दिसून येई. विद्यार्थ्यांकडूनही हीच शिस्त त्याला अपेक्षीत असे. आणि अभ्यासप्रिय विद्यार्थ्यांना त्याचा जाचही होत नसे. पण असेही कांही विद्यार्थी सगळीकडेच असतात, ज्यांना अशा प्रकारे शिस्त लावणाऱ्या शिक्षकाला ते शत्रू म्हणूनच पहात असतात. आणि हाॅस्टेलवरील वातावरण तर पहायला नकोच! तेथे वाटेल तेव्हां येणे. बाहेरील लोक त्यांच्या सोबत रहाणे, अश्या गोष्टी तेथे चालत असतात त्याला आळा घालणारा आला, की मग त्या माणसाच्या मागे हात धुवून लागणे हे पर्यायाने आलेच! म्हणूनच कोणी कौटुंबीक माणूस ते पद स्वीकारायला तयार होत नाही. हॉस्टेलमधील हे वातावरण पाहून  मी खापरेला म्हणालो, सोडून दे ही हाॅस्टेलची रेक्टरशिप. पण तो जिद्दीने तेथेच राहीला. बरेच विद्यार्थी त्याला मानणारे होते. पण चार आडदांड त्यामध्ये  असले की ते  पन्नासांना पुरून उरतात. आणि या मानसीकतेतून खापरेच्या मनावर आणि शरीरावरही परीणाम होऊ लागला.  त्याच्या बोलण्यावर त्याचा परीणाम दिसू लागला. मध्ये मधे हाताला कंप जाणवू लागला. आणि हळूहळू त्याचा हा आजार बळावू लागला. विशेषतः शिक्षक म्हणून त्याला हे कठीण होते. मध्ये एकदा मी त्याला सुचवले की तुझी वीस वर्षे नोकरी झाली आहे, तर आता स्वेच्छा निवृत्ती घेऊन घरी आराम कर. पण त्याने हे मनावर घेतले नाही. तरीही आम्ही त्याला बरेच सांभाळून घेतले. प्रा. विचारे यांनी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांना बराच आधार दिला. तशातच तो रोज लोकलने प्रवास करून  कॉलेजला येत असे. एकदा तर कॉलेजमध्येच त्यांला चक्कर आली. त्यामुळे आम्ही सर्वच काळजीत होतो. एकदा मला आमचे माजी अधिष्ठाता
गो.कृ. देशपांडे यांनी पुण्याला आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले, व त्याचे उदघाट्न मी करावे अशा इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी त्यांच्याशी खापरे व विचारे या दोघांचेही संबंध घरगुती होते, त्यामुळे त्यांनीही आपली दोघांची तिकिटे माझ्यासोबत काढली. मी विचारेना म्हणालो, बाबारे! तू आहेस ना त्याच्या सोबत? वाटेत त्याला कांही लागले तर मला काहीच मदत करता येणार नाही. विचारेंनी त्यांची ठामपणे जबाबदारी  घेतली व नेहमीप्रमाणे आदल्यादिवशी त्यांचा फोन आला, आपल्या डोळ्यांना त्रास होत असल्याने आपण येऊ शकत नाही. मी कपाळावर हात मारला.

आम्ही पुण्याला गेलो. दुपारी देशपांडे सरांच्या घरीच जेवण होते. माझ्यासोबत माझी पत्नी होती. तीही खापरे, विचारे, साळवी, बिस्ने यांची वर्गमैत्रिण. दुपारी आम्ही परत निघालो. आमच्या समोरच खापरे यांची सीट होती. गाडीने शिवाजी नगर सोडले. खापरे गुढग्यावर डोके ठेवून बसले ते चक्क दादर येईपर्यंत त्यांनी आपले डोके उचलले नाही. माझे सारखे त्यांच्याकडे लक्ष होते. अखेर दादर स्टेशन आले. त्यांना न्यायला त्यांची पत्नी व मुलगा आले होते तेव्हां मी सुस्कारा सोडला. पुढे मी निवृत्त झालो. कांही वर्षानी खापरेही निवृत्त झाला, व जोगेश्वरीला रहायला गेला. एकदाच एका लग्न समारंभात त्याची भेट झाली. ती शेवटचीच. मधून मधून खापरे फोन करीत असे. पुढे तर तो काय बोलतो तेच कळत नव्हते. शब्द असंबद्ध येत असत. पण त्याच्या समाधानासाठी मी केवळ त्याच्या वाक्यागणिक होकार देत असे. त्यालाही बरे वाटे. रमेश खापरे, नरेंद्र विचारे, शेखर साळवी या तीन व्यक्ती अगदी त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच माझ्या जीवनात आल्या. पुढे सहकारी बनले. मित्र झाले, ज्यांचा आधार माझ्या पुढील आयुष्यात मला खूप झाला. मी निवृत्त झाल्यावर खापरे मला म्हणाले, सर तुम्ही मला येथे सांभाळून घेतले. त्यामुळेच मी राहीलो. मी म्हटले. अरे आपण सर्वानीच एकमेकांना सांभाळायला हवे.

पुढे आमचे भेटणे, बोलणे थांबले, कोणाकडून तरी  त्याच्याबद्दल कळत असे. भेटून आलेली व्यक्ती त्याच्याबद्दल सांगत असे. आणि अखेर तो दिवस उगवला. १३ ऑक्टोबर २०१९.  त्यांच्या मुलाने वडील गेलेले सोशल मीडिया वरून कळवले. हृदयातील पोकळी वाढतच गेली.

-प्रा. मं . गो. राजाध्यक्ष 







Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :