एक झपाटलेला कलावंत : अप्पासाहेब देशपांडे



आम्ही शेवटच्या वर्षाला असतांना नागपूरहून बदली होऊन एक व्यक्ती प्राध्यापक म्हणून जे.जे. उपयोजीत कला संस्थेत आली. उंचीला थोडे ठेंगणे, जाड चष्मा, थोडेसे स्थूल असे हे प्राध्यापक प्रथम वर्षाच्या वर्गावर नेमले गेले. त्यांचे नांव तेव्हां आम्हांला समजले ते जी.के. देशपांडे असल्याचे. तसा त्यावर्षी त्यांचा आमचा अजीबात संबंध आला नाही. कारण एप्रील मध्ये परीक्षा आटोपताच जे.जे.ला रामराम ठोकून आम्ही निघालो होतो. पुन्हा दोन वर्षांनी मी याच जे.जे.त अध्यापक म्हणून आलो, तेव्हां हे गृहस्थ परत बदली होऊन नागपूर येथे गेले होते. त्यानंतर ते अधे मध्ये दिसत ते कला संचालनालयाच्या कार्यालयात. माधवराव सातवळेकर कला संचालक म्हणून आले होते. एक शिस्तप्रिय आणि कला शिक्षणातील अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांचा लौकीक होता. पण पुढे या अप्पासाहेबांशी आमची बरीच गट्टी जमली.


जी. के. देशपांडे अर्थात मराठीत गो.कृ.देशपांडे यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२४ चा अकोल्याचा. देशपांडेंचा ओढा चित्रकलेकडे असल्याने व अकोल्यासारख्या भागात उच्च कला शिक्षणाची सोय नसल्याने मुंबईची वाटचाल करणे क्रमप्राप्त होते. आणि १९४३ साली अप्पासाहेबांनी जे.जे.च्या कमर्शिअल आर्टच्या विभागांत पाऊल टाकले. त्यावेळी जे.जे. स्कुल ऑफ आर्टचा एक छोटासा विभाग म्हणून हा दृश्य कला विभाग कार्यरत होता. आणि तोही डीन बंगल्यासमोरील छोट्याश्या शेडमध्ये. कमर्शीयल आर्ट सेक्शन (CAS) नांवाने चालवलेल्या या विभागाला शिकविण्यासाठी तेव्हां  व्ही.एन.रानडे, बी.एन.पांचोली, जे.जी.बंगाले, एस.एन.कामत, पी.डी.अभ्यंकर, एफ. जे. फर्नांडीस, आर.जी.काणे, सायमन डॅनीयल असे तेव्हढेच कर्तबगार शिक्षक होते. आणि या सर्वांवर मुख्य म्हणून कार्यरत होते ते दादासाहेब अर्थात व्ही.एन.आडारकर. एक प्रसन्न आणि रूबाबदार असे व्यक्तीमत्व लाभलेले देखणे प्राचार्य. देशपांडेनी कष्ट काढतच  आपले शिक्षण पूर्ण केले.  तेथेहि त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. या चार वर्षांच्या वाटचालीत देशपांड्याना लॅंगहॅमर, जेरार्ड, अडूरकर, आर.चटर्जी यासारख्या मान्यवरांचे मोलाचे सल्ले मिळाले जे त्यांना त्यांच्या भावी वाटचालीत उपयोगाला आले. 

डिप्लोमा झाल्यावर देशपांडे यांची  भारत सरकारच्या प्रसारण खात्याच्या सिमला येथील जाहीरात स्टुडीओत नेमणूक झाली. पण त्याच काळात देशाची फाळणी झाल्यामुळे ते पदच रद्द झाले. पण पुढे त्यांची नागपूर येथील तत्कालीन 'गव्हर्नमेंट इंजीनिअरिंग स्कुल'च्या  कला  विभागांत नियुक्ती झाली. पुढे हे चित्रकला महाविद्यालयात रुपांतरीत झाले. ह्या मधल्या  काळात १९५९-६० च्या दरम्यान देशपांडे यांची 'फुल ब्राईट ट्रॅव्हल ग्रॅंट व स्मिथ म्युन्ड' शिष्यवृत्तीसाठी निवड होऊन त्यांना अमेरीकेतील लॉस एंजेलीस येथील प्रख्यात 'आर्ट सेंटर स्कुल' मध्ये कमर्शिअल आर्टच्या उच्च अभ्यासासाठी जाण्याचा योग जुळून आला. येथून पुढे जी.के.देशपांडे सर हे शिक्षण क्षेत्रांतील एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून पाहीले जाऊ लागले. 

औरंगाबादचे चित्रकला महाविद्यालय हा अप्पासाहेबांच्या जीवनातील एक महत्वाचा टर्निंग पॉईंट म्हणून पहावा लागेल. त्यात त्यांचे योगदान संस्था उभी करण्याइतपत नक्कीच होते.  जेव्हां अभ्यासक्रमात मूलभूत अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला, तेव्हां देशपांडेंनी अभ्यासीका करतांना विविध प्रयोग केले. कलर हा त्यांचा आवडीचा विषय. या विषयाचा त्यांनी पुरेपुर अभ्यास केला होता. आणि  कला संचालक माधवराव सातवळेकरांना हा बाहाऊसच्या धर्तीवरचा नवीन अभ्यासक्रम योग्य रित्या राबविणारी माणसे हवी होती.  त्या वेळी महाराष्ट्रात अनेक कला संस्था निघत होत्या. कालांतराने त्यातील कित्येक बंदही पडत होत्या. पण मराठवाड्यासारख्या भागात १९७१ पर्यंत तेथील जनतेची मागणी असूनही त्यांना कला महाविद्यालय मिळत नव्हते. तेथील सर्व विद्यार्थ्यांना मुंबई किंवा पुणे येथें येऊन कला शिक्षण घ्यावे लागे. अश्या वेळी अजिंठ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे शासकीय कला महाविद्यालय सुरु करण्याचे शासनाकडून ठरले. मुख्यमंत्री होते मा.वसंतराव नाईक. अन शिक्षण मंत्री होते मा.मधुकरराव चौधरी. शिक्षण म्हणजे मधुकररावांचा आत्माच होता. त्यातही कला शिक्षणाची त्यांना कळकळ होती. कला संचालक माधवराव सातवळेकरांनी प्रस्ताव सादर केला. मंत्रालयात संबंधीतांच्या बैठका झाल्या. आणि १९७१ च्या जून महीन्यात औरंगाबाद येथे कला संस्था उभारण्याचे ठरले. कला संचालक माधवराव सातवळेकर यांनी जातीने औरंगाबाद येथे जाऊन कला महाविद्यालयासाठी ज्या कांही वास्तू तेथे उपलब्ध होण्यासारख्या होत्या, त्यापैकी किले आर्क या टेकडीवरील 'जनाना महाल' ही वास्तू निवडली. पुढची पायरी होती तेथे लागणारा शिक्षक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी व ते कला महाविद्यालय सुरु करून त्याला एक दिशा देणारा संस्था प्रमुख अर्थात प्राचार्य

तेव्हां मुंबईचे जे.जे.कला महाविद्यालय हेच प्रमुख होते. तेथील सर्व जेष्ठ प्राध्यापकाकडे विचारणा करता सर्वानीच नकार दिला. एकतर बदलीवर जायला कोणीच तयार नसे. व दुसरे म्हणजे ती संस्था संपूर्णपणे नवी सुरु करून चालवणे. त्यावेळी नागपूरहून मुंबईला आलेले गो.कृ. देशपांडे यांनी या सर्व घडामोडी जवळून पाहील्या होत्या. शिक्षण क्षेत्राची त्यांना आवड तर होतीच! तसेंच अनुभव, फुल ब्राइट शिष्यवृत्तीमुळे अमेरीकेत घेतलेले उच्च कला शिक्षण, आदी जमेच्या बाजूही त्यांच्याकडे होत्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आव्हान स्वीकारून काहीतरी नवीन करण्याची जिद्द, यामुळे आपल्या नांवाचा विचार व्हावा अशी भूमिका त्यांनी शिक्षण सचिवांकडे मांडली. परीणामी कला संचालकांनी देशपांडेंना बोलावून १५ मे रोजी औरंगाबादला कामावर रुजू होण्यास सांगीतले. त्याचबरोबर ही जबाबदारी त्यांनी स्वतः होऊन पत्करल्यामुळे आता तक्रारीला जागा नसल्याचे सांगून त्यांना सुयश चिंतले. तसेच १५ जुलै १९७१ रोजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते संस्थेचे उदघाट्न ठरल्याचे सांगून कामात गती आणण्याचे सांगीतले.  आणि देशपांडे औरंगाबादेत दाखल झाले व त्यांनी विभागीय शिक्षण संचालकांकडून सर्व माहीती घेतली. आता त्यांच्या डोळ्यासमोर एक भव्य अश्या वास्तूचे हे चित्रं उभे होते, आणि त्यांनी त्या ऐतिहासीक 'जनाना महाल'कडे प्रस्थान केले. मोगलकालीन या बुलन्द वास्तुमधे आधीच चेलीपुरा हायस्कुल होते. कला महाविद्यालयासाठी राखून ठेवलेला भाग त्यांनी देशपांडेंना दाखवला. जी एक आदर्श संस्था निर्माण करण्याच्या हेतूने देशपांडे तेथे गेले होते, व त्यांच्या डोळ्यासमोर 'जनाना महाल'चे जे रूप आले होते, ते ही वास्तू पाहून त्यांच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. शेजारच्या सायन्स कॉलेजचा रसायन शास्त्र विभाग तेथे होता, त्यामुळे भर दुपारी अंधार असलेल्या त्या जागेला कुबट दर्प येतं होता. छताला वटवाघळे लटकत होती. त्याशिवाय इलेक्ट्रीक फिटिंग, रंगकाम,खेळती हवा आणण्यासाठी भिंतीला एक खिडकी व मागील खोल्यात प्रवेश करण्यास एक दरवाजा हवा होता. पण भिंतीची जाडीच तीन फुटांची होती. कुंपणाअभावी त्या जागेचा उपयोग उघडे शौचालय म्हणून केला जात होता. त्यासाठी सर्वप्रथम आवाराला भिंत घालणे आवश्यक होते.

आपण स्वत:च  ही जबाबदारी स्वीकारल्यामुळे देशपांडे यांना भलतीच जोखीम वाटू लागली. पण अश्या गोष्टींना घाबरतील तर ते अप्पासाहेब कसले? त्यांनी तात्काळ कला संचालकांना फोन करून कार्यालयातील एक अनुभवी व तडफदार व्यक्तीला ताबडतोब पाठविण्याची विनंती केली. त्याप्रमाणे तात्या महाजनी हे जेष्ठ व अनुभवी अधिकारी तेथे गेले. त्यानंतर एकेक सरकारी खात्यास हलवून त्यांनी भराभर कामे करून घेतली. रंगकाम झाले व 'जनाना महाल'चा अक्षरश: कायापालट झाला. त्या काळात महाराष्ट्रात वेळेवर पाऊस न आल्याने सर्वत्र दुष्काळाची छाया दाटली होती. मुख्यमंत्र्यांचे राज्यभर दौरे सुरु होते. त्यामुळे उदघाटनाची तारीख १३ जुलै ऐवजी १३ ऑगस्ट करण्यात आली. तोपर्यंत संस्थेला लागणारे फर्नीचर, स्टेशनरी साहीत्य आदींची खरेदी करण्यात आली. शासकीय नियमाप्रमाणे १० जूनला वर्ग सुरु झाले. आलेल्या शिक्षकांनी स्वतःला वर्गकामामध्ये झोकून दिले. विद्यार्थीही कामाला लागले. आकाशात रोज ढगांचे येणे व जाणे एवढेच प्रकार चालू होते. शिक्षकांना रहायला योग्य जागा नव्हत्या. शेजारच्या 'कामाक्षी लॉज' वर सर्वांचे मुक्काम होते, त्यामुळे निदान अंघोळीला तरी पाणी मिळे. बरेच विद्यार्थी परगावातून येणारे असल्यामुळे घरी स्वयंपाक करून ते काॅलेजला येत. पण त्यांनाही रॉकेलची टंचाई जाणवू लागली. तरीही १३ ऑगस्ट पर्यंत अवधी असल्याने देशपांडे यांनी विद्यार्थ्यांचे वर्गकामाचे प्रदर्शन व उदघाटन असा कार्यक्रम ठरवला. 


सातवळेकर यांच्या कानावर ह्या गोष्टी घालताच त्यांना हंसूच आले. एका महीन्यात संस्था उभी करून पुन्हां त्यात प्रदर्शन करणे या गोष्टी त्यांना आवाक्याबाहेरच्या वाटल्या. उदघाटनाच्या आधी दोन दिवस सातवळेकर औरंगाबादला आले. संस्थेत प्रवेश करतांच पूर्वीच्या वास्तूचा असा सुंदर कायापालट झालेला पाहून ते थक्कच झाले. १३ ऑगस्ट १९७१ चा दिवस उजाडला. सायंकाळी चार वाजताची उदघाटनाची वेळ होती. अजूनही शहरात्त पावसाचा थेंब पडला नव्हता. रोजच्यासारखे ढग जमले होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईक ताफ्यासह येतांच सर्वत्र गडबड उडाली. मराठवाड्यातील बहूतेक मंत्री उपस्थीत होते. शंकरराव चव्हाण, कल्याणराव पाटील, रफिक झकेरीया, मधुकरराव चौधरी, गोविंदभाई श्रॉफ, भाऊसाहेब वैशंपायन हे नामवंत समारंभाला उपस्थीत होते. मुख्यमंत्र्यांनी फीत कापली आणि संस्थेचे व प्रदर्शनाचे उदघाट्न केले. आणि नेमका त्याच सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरु झाला. दिवेलागणीची वेळ झाल्याप्रमाणे अंधारून आले. आणि एकाएकी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला. हे एक शुभ चिन्हच होते संस्थेच्या बाबतीत. वसंतराव नाईकांनी तेथल्या तेथे खिश्यातून शंभर रुपयांची नोट काढली व पेढे आणण्यास पाठवले! पुढे अर्थातच हे कला महाविद्यालय भरभराटीला आले. अप्पासाहेब देशपांडे प्राचार्य म्हणून कार्यरत असतानाच पूर्वी जाण्यास नकार दिलेल्या जेष्ठ शिक्षकांनी आता कॉलेज तयार असल्यामुळे आपली जेष्ठता दाखवून शासनाला आपल्याला तेथे पाठविण्यास सांगीतले. शासनाने त्याप्रमाणे जेष्ठ प्राध्यापकाची तेथे नेमणूक करून देशपांडेंना नागपूरला पाठवले. मात्र ते कला महाविद्यालयाला उभारण्यांत आप्पासाहेबांचा सिंहाचा वाटा होता हे मात्र तितकेच खरे! एखाद्या ध्येयाचा ध्यास घेऊन ते साकार करणे हे ध्येयवादी व्यक्तींचे वैशीष्ट्य असते. प्रतीकूल परीस्थीतीला वाकवून यश मिळवणे यातच कर्तबगारी सामावलेली असते. आणि गो.कृ. देशपांड्यांच्या बाबतीत हे सिद्धच झाले.






पुढे देशपांडे मुंबईला अधिष्ठाता म्हणून जे.जे.ला आले. त्यावेळी कला संचालक म्हणून प्रा. बाबुराव साडवेलकर कार्यरत होते. त्याकाळात साडवेलकर व त्यांच्या विरुद्ध असलेले शिक्षक असे दोन गट संस्थेत होते. त्याचीही कांही प्रमाणात झळ देशपांडेंना बसली. पण बाबुराव हे एकतर जागतीक कीर्तीचे पेंटर होते, कला शिक्षण क्षेत्राचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्यात संशोधनी वृत्ती होती. त्याचा फायदा अनेक विद्यार्थी शिक्षकांना होत असे. त्यामुळे अप्पासाहेबांनीही त्याचा लाभ उठवला. आणि यावेळी अप्पासाहेबांशी माझी जवळीक झाली. माझ्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांची कारकीर्द व्यवस्थीत चालली होती. पण परत दोन वर्षांनी त्यांना  नागपूरला जावे लागले.  त्यावेळी मी नागपूरला त्यांच्या हाताखाली होतो. अनेक बरे वाईट अनुभव आम्ही त्या नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयात घेतले. अर्थात ते संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नव्हे, तर तेथील प्रथेप्रमाणे राजकीय पक्षांचे कार्य करणाऱ्या संस्थेबाहेरील विद्यार्थ्याकडून. पण देशपांडे आम्हां सर्व अध्यापकांना एका कुटुंबाप्रमाणे सांभाळून घेत. प्रत्येक वेळी नियमावर बोट ठेवून काम करण्याची त्यांची पद्धत होती. पण त्याचा अतीरेक ते करीत नसत. शिस्त त्यांच्या अंगात लहानपणापासूनच असल्याचे ते सांगत. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या जवळिकीतून ती आली असेल. मी व बावीस्कर नावाचे आम्ही दोघेजण मुंबईतून बदलीवर नागपूरला गेलो होतो. आम्ही आमदार निवासात रहात असू. तेव्हां देशपांडे सरांनी आम्हां दोघांनाही बजावून ठेवले होते की तुमचे येथे घर नाही. माझे घर हे तुमचेच घर समजायचे. प्रत्येक सणाला तुम्ही दोघांनीही आमच्याकडे जेवायला यायचे. आणि दर सणाला ते आम्हाला घरी जेवायला बोलावीत असत. त्यांच्या सौभाग्यवतीही  खूप मनमिळावू अन  मोकळ्या स्वभावाच्या आणि अगत्याने सर्वांचे करणाऱ्या होत्या. त्यामुळे आम्हांला त्यांच्याकडे कधीच परकेपणा जाणवला नाही. त्यांची सौंदर्य दृष्टी अफाट होती. घरातील प्रत्येक गोष्ट ते सुंदरतेने सजवीत. आणि याच सौंदर्य दृष्टीच्या आधारे त्यांनी संस्थेमध्ये विद्यार्थी -शिक्षकांकडून आकाश कंदील बनवणे, रंगीत बाटल्यांच्या कलात्मक वस्तू बनवणे पतंग बनवणे अशा अनेक गोष्टी बनवून घेतल्या.  आपले काम सुंदर कसे करायचे, आणि त्याचे संवर्धन कसे करायचे हे त्यांच्याकडून शिकावे.

अश्या ह्या गो.कृ.देशपांडे यांनी कला शिक्षण क्षेत्रांत ३५ वर्षे  एकनिष्ठतेने सेवा करून ३० सप्टेंबर १९८४ रोजी ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायीक झाले. एक मोठा खडतर असं प्रवास त्यांच्या वाट्याला आला होता. पण सर्व अडी अडचणींना तोंड देत त्यांनी तो पूर्ण केला. अनेक संघर्षांना ते सामोरे गेले. आणि संस्काराचा भरपूर साठा असल्याने ते सतत पूर्ण समाधानी राहीले. लहानपणी शाळेत शिक्षकांनी शिकवलेली बोधवाक्ये त्यांनी नेहमीच आचरणत आणली. स्वतः मधील सुसंस्कृतपणा त्यांनी नेहमीच जोपासला.  आपल्या विद्यार्थी दशेपासूनची चित्रे ते व्यावसायीक झाल्यानंतर केलेली चित्रे त्यांनी जशीच्या तशी सांभाळून ठेवली होती. त्याच प्रमाणे फोटोग्राफीचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. विवीध प्रकारची फोटोग्राफी ते करीत असत. ताजमहालचे त्याच्या चारी मिनारसह ते एक मिनार, दोन मिनार, तीन मिनार अशा विवीध ॲंगलनी त्यानी फोटो काढले होते. एकदा मी त्यांचे जे.जे.मध्ये प्रदर्शन भरवले होते, त्यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी चित्रे कशी जपावी, कशी सांभाळावी या विषयावर व्याख्यानही दिले होते. त्यानंतर पुण्याला त्यांनी बालगंधर्व मध्ये स्वतःच्या चित्रांचे तसेच सोबत आपल्या नातवाची चित्रे असे दोन  पिढ्यांचे चित्र प्रदर्शन भरवून त्याचे उदघाट्न माझ्या हस्ते केले होते. त्या प्रदर्शनाला नामवंत चित्रकार श्री शि.द. फडणीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.  आमच्या जे.जे.च्या सहस्त्रकाच्या प्रदर्शनाच्या वेळी ते मुद्दाम हजर राहीले. अधून मधून त्यांच्याशी फोनवरून गप्पा होत असत. त्यावेळी 'नवशक्ती' मध्ये मी त्यांच्या कला प्रवासावर एक लेख लिहीला होता. तो वाचून त्यांनी अगत्याने फोन करून माझे आभार मानले होते.

असे तृप्त आणि समाधानी जीवन जगत असताना ७ सप्टेंबर २००८ च्या  रात्री त्यांच्या मुलाचा पुण्याहून मला फोन आला व त्याने ती दुःखद बातमी दिली. 'आप्पा गेले' ! काळजात लक्कन कुठेतरी हलल्यासारखे झाले.

-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष

Comments

  1. जिद्द,कष्ट,दुरदृष्टी,टिम वर्क,धडाडी ,कलोपासना
    अनेक गोष्टी आहेत ज्या स्मरणात राहतील.लहानपणा पासून आम्हाला त्यांचे आशीर्वाद लाभले.नमन आहे त्यांना.

    ReplyDelete
  2. We respect GK sir as a dedicated colour theory teacher. And a successful dean at Nagpur.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…