कलोपासक संग्राहक : जहांगीर निकालसन
कांही वर्षांपूर्वी कला क्षेत्रांत जागतीक स्तरावर एक नवा इतीहास घडला होता. एक उद्योगपती गुरु श्रीवास्तव यांनी जागतीक कीर्तीचे भारतीय चित्रकार श्री एम.एफ. हुसेन यांची आगामी १०० चित्रे विकत घेतली. असे बरेच कला व्यापारी या कला क्षेत्रात कलाव्यवसाय करणारे आहेत. किंबहुना आज तेच जास्त प्रमाणावर या क्षेत्रात दिसून येतात. एक गुंतवणूक म्हणून याकडे ते पहातात. आणि प्रचंड पैशांची उलाढाल या चित्रकला व्यवसायात होत असते. यांना त्या चित्रकाराविषयी ना आपुलकी ना त्यांच्या कलेचे मोल असते. असते ती फक्त त्यावरील सहीला असलेली किंमत व तीचे जागतीक पातळीवरील स्थान! बाजारात खणखणणाऱ्या कलाकाराच्या नांवाचा वापर त्यांना करायचा असतो. त्यामध्ये नसते कलाकारांबद्दल आस्था, ना त्याच्या कॅनव्हासवर त्याने आपले सर्वस्व ओतून केलेल्या आविष्काराबद्दल कळकळ वा भावनेचा ओलावा. फारच कमी संग्राहक आपणास दिसतील की ते कलाकृतीच्या दर्जामुळे, तिच्या प्रेमामुळे आणि त्यामागील संवेदनशील भावनांमुळे अश्या कलाकृती विकत घेऊन तिचा संग्रह करतात. संवर्धन करतात. या कलाकृतींना प्राणापलीकडे जपून जनतेलाही तिचा आस्वाद घेता यावा यासाठी त्या प्रदर्षितही करतात.
तसे पाहीले तर १९४० च्या आसपास मुंबईत आलेले इंडो-फार्मा वर्क्सचे इम्यॅन्युअल स्लेजिंगर हे पहीले समकालीन भारतीय कलेचे संग्राहक म्हणून ओळखले जातात. त्या काळात चित्रकलेने झपाटलेले तरुण चित्रकार रझा, हुसेन, आरा, सूझा, गाडे, बाक्रे यांना त्यांनी बरेच प्रोत्साहन दिले. त्यांना युरोपातील आधुनीक चित्रशैलीची ओळख करून दिली. त्यांच्या चित्रांचा संग्रह केला. पण यामध्ये त्यांचा केवळ खरेदी करणे हा हेतू नसून त्यांना एक दर्जा त्यांनी मिळवून दिला. आणि हीच परंपरा एकाने पुढे चालू केली, अन आपल्या अमुल्य अश्या कला संग्रहाने कला रसिकांचे ज्ञान वाढवले. त्यावेळी त्यांचे नांव होते जहांगीर निकोल्सन ! एक महान कलासंग्राहक म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल.
कला क्षेत्रांत 'जंगू' या लाडक्या नावाने परीचीत असलेले जहांगीर निकोल्सन यांचा जन्म १९१५ मधला. त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेतले होते. अनेक पारशी कुटुंबाप्रमाणे त्यांच्या घरण्याचाही कच्या कापसाचा व्यवसाय होता. त्यांचे बालपण महात्मा गांधींच्या असहकार चळवळीच्या सानीध्यात गेले. वयाच्या लहानपणापासूनच त्यांना छयाचित्रणाची गोडी होती. निसर्गाची ओढही होती. त्यामुळे त्यांचे मन कलासक्त बनले होते. १९६७ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. एकमेकांवर अत्यन्त गाढ प्रेम करणारे हे जोडपे असल्याने पत्नीच्या निधनाचा त्यांच्या मनावर एक मोठा आघात झाला. त्यांच्या जीवनात एक प्रचंड अशी पोकळी निर्माण झाली. कधिही न भरून येणाऱ्या जखमेने ते दुःखी झाले. आणि ते सौंदर्य उपासक असल्याने त्यांचा दृक कलेकडचा ओढा वाढला. जहांगीर कलादालन, ताज कलादालन, पंडोल कलादालन येथे ते वारंवार जाऊ लागले. तेथे त्यांच्या कलाकारांशी भेटी होऊ लागल्या. चर्चा वाढू लागल्या.भारतीय चित्रकला शैलीचा अभ्यास होवू लागला. ते रोटरी क्लबचे सदस्य असल्याने दर महीन्यात ताज महाल हॉटेलच्या बॉल रूम मध्ये त्यांची बैठक होत असे. बैठक संपताच एकेकजण जिना उतरून खाली जात असे. खाली असलेल्या ताज आर्टगॅलरी कडे केवळ एक कटाक्ष टाकून सर्वजण निघून जात. पण जहांगीर मात्र आत शिरून प्रत्येक चित्राचे बारकाईने निरीक्षण करित असत. असेच एक दिवस ते ताजच्या बॉल रूम मधून खाली उतरताच ते ताज कलादालनात गेले. त्यावेळी तेथे तरुण एक चित्रकार शरद वायकुळ यांचे चित्र प्रदर्शन सुरू होते. जहांगीरना तेथील एक निसर्गचित्र अत्यन्त भावले. त्याची किंमत होती सहाशे रुपये. थोडेसे लाजतच त्यांनी चित्रकाराला विचारले, 'मला हे पाचशे रुपयांना द्याल कां ?' वायकुळानी क्षणभर त्यांच्याकडे पाहीले व होकार दिला. व त्या चित्रावर सेल झाल्याची लाल टिकली लावली. १९६८ मध्ये जहांगीर निकोल्सन यांनी खरेदी केलेली ही पहीली कलाकृती! चित्रामध्ये कधीही बार्गेनिंग करू नये या मताचे ते होते. आणि त्यानंतर कधीही त्यांनी चेक शिवाय चित्रांची किंमत दिली नाही. स्वतःला त्यांनी हा नियमच घालून घेतला.
आणि येथून पुढे जहांगीर यांची कलाकृतीमधली आस्था वाढीला लागली. यातील ज्योत प्रंथम पेटवली गेली ती हुसेन यांच्याकडून. त्यांच्याशी संबंध आल्यावर ते संग्रहात आले. त्यानंतर अकबर पदमसी, तय्यब मेहता, वासूदेव गायतोंडे हेही दाखल झाले. त्यानंतर राम कुमार, क्रिशन खन्ना, रझा, ही मंडळी सत्तरीच्या दशकाच्या प्रारंभी आली. त्याच वेळी लक्ष्मण श्रेष्ठा अन त्यांची पत्नी सुनीता श्रेष्ठा यांच्याही चित्रांनी वर्णी लावली. या त्यांच्या प्रवासात त्यांना निच्छित मार्गदर्शन करेल असा एकही संग्राहक अथवा एखादी गॅलरी माहीत नव्हती. मात्र १९७० च्या सुमारास त्यांची थोर संग्राहक बिल चौधरींशी भेट झाली. आणि त्यांनी या कलाक्षेत्रात खोलवर शिरून कसा विचार करायचा याचे धडे त्यांना दिले. चित्र कसे पहावे, त्यातील मर्म कसे जाणावे ह्याची माहीती जहांगीरना तेथून समजू लागली. व येथून पुढे त्यांनी आपल्या कला संग्रहाकडेच पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले. प्रत्येकाची कामाची पद्धत, तसेच त्याची शैली, रंगाची पॅलेट याची जहांगीर यांना संपूर्णपणे ओळख झाली. यातूनच त्यांना कलाकृती ओळखून त्यातून आनंद अनुभवता येऊ लागला.
एकदा का चित्रकार त्याच्या कामावरून, चित्राच्या शैलीवरून आणि त्यातील अर्थावरून ओळखता येऊ लागला, की मग त्याच्या चित्राचे रसग्रहण करतांना जहांगीरना आनंद आणि समाधान देऊ लागला. निरनिराळी चित्रे पाहून, त्यातील नेमके गुण त्यांनी हेरण्यास सुरुवात केली. बऱ्याच चित्रांमधून योग्य अशी निवड करणे त्यांच्या हातचा मळ झाला. यातूनच त्यांनी पुढे अनेक चित्रे जमवली. त्यामध्ये अंबादास, सुलतान अली, बेंद्रे, मोहन सामंत, हेब्बर आणि अँजोली इला मेनन हे प्रतिभाशाली कलाकार होते. जहांगीर यांच्या संग्रहात अनेक महान कलाकारांनी वर्णी लावली. त्यांचा चित्रसंग्रह एक दर्जेदार कलासंग्रह म्हणुन ओळखला जाऊ लागला. चित्रकलेतील 'मास्टर' मानले गेलेल, तसेच नवोदीत कलाकार या सर्वानांच तो प्रेरणादायी ठरला. लक्षण श्रेष्ठा यांच्या अमूर्त शैलीशी त्यांचा संपर्क आला, तेव्हां त्या शैलीला त्यांनी दाद दिली. शिवाय गणेश पायन, भूपेन खक्कर, अतुल-अंजु दोडिया हे देखील त्यांचे आवडते चित्रकार. या सर्वांची चित्रे त्यांच्या संग्रहात आली. त्यांच्या संग्रहात गेल्या शतकातील नावाजलेल्या कलाकारांची चित्रे समाविष्ट असून रवींद्रनाथ टागोर, जेमीनी रॉय यांच्यापासून ते अँजोली इला मेनन, नलीनी मालानी यांच्यासह सर्वच श्रेष्ठ कलाकारांनी त्यांच्या संग्रहात हजेरी लावली आहे.
१९७० मध्ये नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्ट ( NCPA) यांच्या विनंतीवरून जहांगीर निकोल्सन यांनी आपल्या अमूल्य चित्रसंग्रहाचा कांही भाग त्यांना दिला. तेथे आधुनीक कलादालन उभारले गेले. कलाप्रेमी जे.आर.डी. टाटा यांनी त्याला उस्फूर्त दाद देऊन सदर कलादालनाला 'जहांगीर निकोल्सन मुझियम ऑफ मॉडर्न आर्ट' हे नांव सुचवले. व आज त्या नांवानें ते कलादालन एन सी पी ए मध्ये समृद्धपणे उभे आहे.
कलाक्षेत्रांत होणाऱ्या स्थायी बदलाप्रमाणे जहांगीर यांच्या कला संग्रहात अमूल्य भर पडत होती. यामध्ये भारतीय कलाशैलीचा प्रवास व प्रगतीच्या खुणांची ओळख हा मानस होता. आपला हा संग्रह केवळ स्वतःपुरताच अथवा कांही मोजक्या व्यक्तीपुरताच मर्यादीत न रहाता सर्वानाच त्याचा आनंद लुटता आला पाहीजे या भावनेने जहांगीर निकोल्सन झपाटले गेले होते. आपल्यामागे सर्व भारतीय रसीकांना त्याचा आनंद घेता यावा या हेतुने कला संग्रहालय उभारण्यासाठी एक छोटासा भूखंड महाराष्ट्र शासनाने द्यावा या हेतूने त्यांची धडपड चालली होती. यासाठी केकू गांधी देखील त्यांना मदत करीत होते. या संग्रहालयात स्वतःचा कोट्यवधी रुपयांचा अनमोल संग्रह त्यांना ठेवायचा होता. त्यांचे हे स्वप्न होते. केकू गांधी त्यांना दरवेळी प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातं असत. आशावादी होते ते.
त्याकाळात आम्ही सर्व मुंबईच्या 'राष्ट्रीय आधुनीक कलादालना’च्या सल्लागार समीतीवर होतो. जहांगीर निकोल्सन देखील त्यात होते. चेहऱ्यावरून किंचितसे कठोर वाटणारे, किंचितसे ठेंगणे, बहुदा बुश शर्ट व पॅंट मध्ये असलेले जहांगीर उर्फ
' जंगू' एकदा का कोणाच्या सहवासात आले की त्याला ते आपलासा क्षणार्धात करीत. मग या गप्पाटप्पा चालू असतांना शरयू ताई दोशी यांनी मागविलेली भेळ, ढोकळा यांवर ताव मारणे सुरु असे. समीतीच्या बैठकीत या कला दालनात प्रदर्शनासाठी आलेल्या अर्जाची छाननी करून कोणाला संधी द्यायची ते ठरवतांना केवळ जुजबी बोलून एखाद्याला नाकारणे त्यांना कधीच मंजूर नसे. प्रत्येकाला नाकारताना योग्य कारणे द्यावीत शिवाय त्यासाठी एक नियमावली तयार करावी असं जहांगीर यांचा आग्रह असे. कोणतीही बैठक सुरु होण्यापूर्वी शरयू दोशी यांच्याकडे अम्ही सर्वजण हजर राहून गंभीरपणे चर्चा करीत असू. यामध्ये केकू गांधी, जहांगीर साबावाला, अकबर पदमसी, दादीबा पंडोल, प्रफुल्ला डहाणूकर, असे लोकं होते. आणि एकदा का जंगू यांचा तेथे प्रवेश झाला की वातावरण एकदम जिवंत अन प्रफुल्लीत होत असे. बैठक संपल्यावर निरनिराळ्या विषयावर गप्पा होत असत. मग कधीतरी त्यांच्या कलादालनाचा विषय निघत असे. केकू गांधी त्यांना सांगत की आताचे नवे मुख्यमंत्री जागेचा विचार नक्कीच करतील. पण या महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे अनेक क्लब उभे झाले, साखर भवने झाली, स्मृती सभागृहांनी या शहरात जागा मिळवली. पण क्रिकेट, नाट्य,चित्रपट यामध्ये रमलेल्या कला संस्कृतीहीन महाराष्ट्र शासनातर्फे अगदी शेवटी ओळखल्या जाणाऱ्या चित्रकलेच्या बाबतीत तो दिवस कधी उजाडलाच नाही! आपले स्वप्न या शासनातर्फे पूर्ण होईल या आशेवर जगणाऱ्या या महान कला संग्राहकाचे - जहांगीर निकोल्सन यांचे ते साकारण्यापूर्वीच ३१ ऑकटोबर २००१ रोजी मॉरीशस येथे निधन झाले. चित्रकलेचा एक सच्चा कैवारी गेला. आपल्यामागे एक प्रचंड असा कला संग्रह मागे ठेवून!
कला क्षेत्रात नावाजलेल्या जहांगीर यांनी भारतातील आधुनीक कलेचे अभ्यासक म्हणून नांव कमावले होतेच! त्यांच्या प्रत्येक श्वासात चित्राबद्दल आस्था आणि काळजी होती. चित्रकाराच्या आविष्काराचे पडसाद त्यांच्या मनापर्यंत जाऊन भिडत असत. त्यातील सौंदर्यस्थळे ते अचूक निवडून त्यातील मर्म जाणीत असत. त्यामुळे त्यांचा कला संग्रह हा केवळ संख्येने नव्हे, तर दर्जाने देखील अत्युत्तम ठरला.अमूल्य ठरला. अद्वितीय ठरला. आपल्यामागे आपला हा जीवापाड जपलेला संग्रह कश्या तऱ्हेने सांभाळला जावा, याचीही व्यवस्था त्यांनी आपल्या इच्छापत्रात करुन ठेवली होती. आपला मानसपुत्र सायरस गझदर व चार्टर्ड अकाउंटन्ट कैवान कल्याणीवाला यांच्यावर त्याची काळजी घेण्याची व सदर संग्रह हा जनतेच्या अवलोकनार्थ प्रदर्शीत करण्याची जबाबदारी त्यांनी टाकली. त्यांच्या निधनानंतर भारतीय आधुनीक कलेतील ज्ञान, त्याची समज, उकल आणि त्यातून मिळणारा आनंद प्रतीत व्हावा, यासाठी लोकांना कलासाक्षर करण्यासाठी ' जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशन'
( JNAF) ही संस्था स्थापन करण्यांत आली. आज त्यांच्यातर्फे जहांगीर यांच्या अमूल्य चित्रांचे संवर्धन, दस्तावेजीकरण केले जाते. याशिवाय आधुनीक कला इतिहासातील महत्वाच्या टप्प्यावरील प्रगती, चित्र प्रबोधनासाठी ज्ञान केंद्र, शैक्षणीक व संशोधनात्मक कार्य असे विविध उपक्रम देखील पुढे सुरु करण्यात येणार आहेत.
आणि जहांगीर निकोल्सन यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा सर्व चित्र संग्रह छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे कांही वर्षांच्या लीजवर देण्यात आला. सदर वस्तुसंग्रहालयाने एक स्वतंत्र विंग तयार करून 'जहांगीर निकोल्सन आर्ट फौंडेशन' नांवाने आधुनीक चित्रकलेसाठी एक खास विभाग तयार करून तेथे ही चित्रे समाजातील सर्व स्तरांच्या लोकांसाठी अवलोकनार्थ प्रदर्शीत केली. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने जहांगीर निकोल्सन यांना त्यांच्या कार्याची जाण ठेवून केलेला हा सन्मान आहे. आज अनेक कला रसीक त्याचा आस्वाद घेत आहेत. जहांगीर निकोल्सन उर्फ कला क्षेत्रातील लाडक्या 'जंगू'चे हे महाराष्ट्रावर उपकार आहेत!
-प्रा. मं.गो. राजाध्यक्ष






Comments
Post a Comment