कलापुरातील चित्रपट - कला महर्षी : बाबुराव पेंटर.


आज बॉलीवूड म्हणून ओळखली जाणारी भारतीय सिनेसृष्टी ही प्रामुख्याने पंजाबी, बंगाली, दाक्षिणात्यांच्या हातांत आहे. त्या भाऊगर्दीत मराठी चित्रपट कसेबसे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. नाही म्हणायला काही नवीन आणि सृजनशील दिग्दर्शक कांही चित्रपट निर्माण करून मराठीचे नांव उज्वल करीत आहेत. पण त्याचवेळी वृत्तपत्राच्या एका पानावर बेसुमार मराठी चित्रपटांच्या जाहिराती दिसतात , ते कधी अन कुठे लागून जातात तेही कळत नाही. मात्र त्यापैकी काहींना आपला मराठीच्या नावाने उदोउदो करणारा झी चॅनल कांही चित्रपट दत्तक घेऊन वर्ल्ड प्रीमियरच्या नावाने कधीकधी जाहिरातींच्या मधून मधून दाखवत असतो. पण हे चित्रपट सृष्टीचे वैभव यायला कारणीभूत झाली, ती दोन मराठी माणसे ! स्वतःच्या पत्नीचे दागीने विकून पहीला भारतीय चित्रपट बनविणारे नाशिकमधील धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके. १९१३ साली त्यांनी पहीला भारतीय चित्रपट ' राजा हरीश्चन्द्र ' बनवीला आणि त्याच काळांत कोल्हापूर या कलेच्या माहेरघरात जन्माला आलेल्या एका मिस्त्री घराण्यांतील कर्तबगार कलावंताने या नुकत्याच जन्मलेल्या चित्रपट सृष्टीवर रूपशाली यौवनाचा व  निसर्गातील रमणीयतेचा साजशृंगार चढवीला. व तो कलावंत म्हणजे कोल्हापूरचे भूषण असलेले
कला महर्षी बाबूराव पेंटर !
              

३ जून १८९० रोजी कृष्णराव मिस्त्री या कुशल कारागिराच्या पोटी बाबुरावांचा जन्म झाला. वडील कृष्णराव हे संगमरवरी, दगडी, लाकडी कोरीव शिल्पे करण्यात वाकबगार होते. त्यांच्यातील हे कलागुण उपजतच बाबुरावांना प्राप्त झाले होते. जोडीला निसर्गाचे सौंदर्य त्यांना खुणावत असे. आकाशातील रंगांची उधळण, खळाळत्या पाण्यातील प्रतीबींम्ब, हिरवीगार वनराई पाहतांना त्यांचे भान हरपून जाई, व त्या सृष्टी सौंदर्याने मोहित होऊन ते आत्मसात करण्याचा प्रयत्न बाबुराव करीत. व येथे त्यांनी निसर्गालाच आपला गुरु मानले, आणि त्यातील सौंदर्य कागदावर उतरवण्यास आरंभ केला. याच वेळी त्यांचे आतेभाऊ आनंदराव त्यांच्या सान्नीध्यात आले. आनंदराव नाटक कंपनीचे पडदे रंगवित असत .जमीनीवर मोठ्या आकाराचा पडदा अंथरून त्यावर महाल, जंगल, रस्ता, बगीचे रेखाटून ते परत रंगवायचे काम सोपे नसते. पण या दोघा बंधूनी त्यात प्राविण्य मिळवले. नाटक सुरु होण्यापूर्वी केवळ पडद्याला टाळी घेण्याची करामत आनंदराव करीत. १९०८ -०९ च्या सुमारास चित्रकलेत प्राविण्य मिळविलेल्या या दोघा बंधूनी मुंबईत फोटोग्राफीचा स्टूडीओ काढला. येथेच त्यांना केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श नाटक कंपनीचे पडदे रंगविण्याचे काम मिळाले. बाबुरावांना चित्रपट पाहण्याचीही आवड होती. अनेक परदेशी मूकपट त्यांनी पाहीले. आपणही असे चित्रपट करावेत अशी महत्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. येथेच त्यांना दादासाहेब फाळके यांचा ' राजा हरिश्चन्द्र ' हा मूकपट पाहायला मिळाला, व चित्रपट माध्यमाने ते एकदम प्रभावीत झाले. मात्र त्यातील स्त्री भुमिका पुरुषांनीच केल्या होत्या. ती विसंगती बाबुरावांना जाणवली. कोल्हापुरात ते परतले तेच चित्रपट तयार करण्याची जीद्द बाळगून ! प्रथम त्यांनी ' डेक्कन सिनेमा ' हे चित्रपट गृह सुरु करून त्यामध्ये मूकपट दाखवीण्यास आरंभ केला. चित्रपटाची मशीनरी पहावी या हेतूने ते पेंटरबंधू नाशिकला दादासाहेब फाळक्यांकडे गेले, व त्यांचा कॅमेरा पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण फाळक्यांनी त्यांना कॅमेरा तर दाखवीलाच नाही, शिवाय तुम्हांला त्यांतील कांहीच कळणार नाही हे देखील सूचीत केले. दोघेही बंधू तसेच माघारी परतले, उमेद न सोडता, न खचता. पण एका नव्या दृढनिच्छयाने ! 


एव्हाना त्यांच्याकडे पेणचे विष्णूपंत दामले हे चित्रकला शिकण्यासाठी आले होते. त्यांना मशीनरीची थोडीफार माहीती होती. त्या सर्वानी आणलेला प्रोजेक्टर खोलून त्याचे कार्य अगदी बारकाईने पाहीले. कोल्हापूरातील कसबी सुतार ज्ञानबा, दत्तोबा मेस्त्री यांच्या मदतीने १९१४ साली कॅमेरा तयार करण्याचे काम पेंटरबंधू व दामले यांनी सुरु केले. या कामाला सुमारे चार वर्षे लागली. व हाताने हॅन्डल फिरवून चालवायचा कॅमेरा तयार झाला. हा भारतातील सर्वात पहीला देशी बनावटीचा कॅमेरा होता. आता चित्रपट बनवायचे स्वप्न पुरे होत आले होते. पण १९१८ मध्ये कांही किरकोळ आजाराने आनंदरावांचे आकस्मीक निधन झाले. आणि यामुळे बाबूराव संपूर्णपणे खचले. यावेळी त्यांचे शिष्यत्व पत्करलेले पण वयाने बाबूरावांपेक्षा वडील असलेले बाबा गजबर यांनी त्यांना सावरले, व आनंदरावांचे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्याचे आवाहन केले. नेमके त्यावेळी मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्यावर बाबूरावांनी आपण स्वतः तयार केलेल्या खास कॅमेऱ्यातून त्याचा एक वृत्तपट तयार केला, व पहीली मुहूर्तमेढ रोवली. पण आर्थिक अडचणीमुळे चित्रपटाला हात घालता येत नव्हता. त्यावेळी तानीबाई कागलकर व शंकरराव नेसरीकर यांनी त्या काळात त्यांना पंधरा हजार रुपये दिले व  १ डिसेंबर १९१८ रोजी बाबूराव पेंटर यांनी खरी कॉर्नर येथे ' महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन केली. फत्तेलाल हेही त्यामध्ये सहाय्यक म्हणून सहभागी झाले. याच काळांत बालगंधर्व यांच्या आग्रहामूंळे बाबूरांवानी गंधर्व मंडळीसाठी ‘ द्रौपदी ‘ नाटकाची सीन सीनरी इतकी अप्रतीम तयार केली की बाल गंधर्वानी त्याची तारीफ केली. केवळ पडदेच नव्हे, तरत्यांतील वेषभूषा, पादत्राणे यांचा स्केचीसही बाबूरावांनी करून दिली.
                     


बाबुरावांनी आपल्या पहील्याच चित्रपटाची कथा निवडली ती काकासाहेब खाडीलकर यांच्या 'किचकवध' या ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या नाटकाची ! कारण ब्रिटिश राजसत्तेवर त्यातून रूपकात्मक टीका केली होती. चित्रपटाचे नांव ठेवण्यांत आले ' सैरंध्री '. प्रत्येक सिनची, वेशभूषेची, पात्रांची कागदावर स्केचेस होऊ लागलू. कोल्हापूरच्या आखाड्यातून बाळासाहेब यादव हा पहिलवान भीमाच्या तसेच दत्तात्रय पोवार याला किचकाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. आता प्रश्न होता तो स्त्री भूमिकेचा. कारण त्या काळांत स्त्रियांनी चित्रपटात वा नाटकांत काम करणे निषिद्ध मानले जात असे. पण तोही प्रश्न सुटला. कोल्हापुरात गायन कलेतील बुजूर्ग  मंडळीच्या शिष्या असत. त्यापैकी गुलाबबाई यांनी या चित्रपटांत सैरंध्रीचे काम केले. कारण स्त्री भूमिका स्त्रीनेच केली पाहीजे हे बाबुरावांचे दृढ मत होते. चित्रपटासाठी गुलाबबाईंचे नामकरण कमलादेवी करण्यांत आले. यावेळी बाबुरावांच्या सहकाऱ्यात  दामले, फत्तेलाल, बाबा गजबर यासोबतच आणखी काहींची भर पडली, ते होते बाबूराव पेंढारकर,कॅमेरामन माचवे, कलाकार बाळ गजबर.
                     
१९१९ मध्ये ' सैरंध्री ' चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात लागला. त्यातील भीम व कीचक यांचे द्वंद्वयुद्ध बाबुरावांनी त्या काळात अश्या कल्पकतेने चित्रित केले होते की, भीम कीचकाच्या छातीवर बसून त्याचे मुंडके उपटून काढतो. शरीर तडफडत असते. व मस्तक भीमाच्या हातात असते. प्रेक्षक या दृश्याने गर्भगळीत होऊन खुर्चीला खिळून बसत.
मुंबईला ' म्याजेस्टीक ' चित्रपटगृहात तर हा सीन पहाताच कांही प्रेक्षक किंचाळून बेशुद्ध पडले, तर काहींनी चित्रपटगृहाबाहेर पळ काढला. यावेळी दिग्दर्शकाने खरोखरीच कीचकाची भूमिका करणाऱ्या नटाला मारले आहे अशी भावना होऊन मुंबईच्या गव्हर्नरने बाबूराव पेंटरना नोटीस पाठविली. तेव्हां यादव व पोवार या दोघांनाही सोबत घेऊन बाबूराव गव्हर्नरपुढे हजर झाले व त्यांचा गैरसमज दूर केला. मात्र तेव्हांपासून चित्रपटाला ' सेन्सॉर ' पद्धत लागू झाली

दुसरा वादग्रस्त प्रकार म्हणजे या चित्रपटाद्वारे प्रथमच पुरुषाऐवजी स्त्रीने केलेली स्त्रीची भूमिका. गुलाबबाईंना समाजाने वाळीत टाकले. त्या वाईट मार्गाला गेल्या असा त्यांच्यावर आरोप झाला. पुढे याच गुलाबबाई प्रभातच्या अजरामर बोधचीन्हावर तुतारी वाजवीत स्वतःही अमर झाल्या. महाराष्ट्र फिल्म कंपनीला सैरंध्रीने अमाप यश मिळवून दिले. कोल्हापूरकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले. स्टुडीओत सुधारणा होत गेल्या. स्वतः चित्रकार असल्याने बाबूराव त्या नजरेतून सर्व गोष्टी पहात. पडद्यावर पार्श्वभूमी दाखविण्याऐवजी त्यांनी त्रिमिती सेटिंगचा वापर करण्यास आरंभ केला. 'आर्टिफिशल लायटींग ' बाबूरावांनीच प्रथम सुरु केले. लोकमान्य टिळकांनी ' सैरंध्री ' पाहून केसरीमध्ये त्यांच्यावर स्तूतीपर अभिप्राय लिहिला व त्यांना सुवर्ण पदक देवून बाबूरावांना ' सिनेमा केसरी ' हा किताब बहाल केला. त्यानंतर बाबुरावांनी ' वत्सला हरण ' हा भरपूर ट्रीक सीनचा चित्रपट सुरु केला. यावेळी बाबुरावांनी कोडॅकचा ‘ बेल ॲन्ड होवेल ‘ हा कॅमेरा इंग्लंडहून मागवला.  सर्वप्रथम तो खोलून त्यातील यंत्रणा पाहून घेतली व त्यावर ट्रीक सीन चित्रित केले. नंतर सुरु झाला त्यांचा 'सिंहगड ' हा चित्रपट. पण तो चालू असतांनाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि बाबूराव संपूर्णपणे खचले. रात्रंदिवस ते चित्रपटातच बुडून गेले. मनाने खचल्यामुळे काही मनाविरुद्ध झाले की त्यांना खूप चीड येऊ लागली. व त्याचे परीणाम त्यांचे सहकारी दामले, फत्तेलाल, पेंढारकर याना भोगावे लागू लागले. पण त्यांच्यातील कलागुणांची जाण असलेल्या त्या शिष्यांना त्याचे बिलकूल दुःख होत नसे. मात्र बाबूराव पेंढारकर सोबत तेथे आलेल्या शांताराम या त्यांच्या मावसभावाला मात्र ते खटकत असे.

' सिंहगड  पूर्ण झाला. पण त्याच काळात मुंबईत हिंदू - मुसलमान यांच्यात जातीय दंगली सुरु झाल्याने मॅजेस्टीकने  तो लावण्याचे नाकारले. तेव्हां नॉव्हेल्टीमध्ये तो प्रदर्शीत झाला. चित्रपटाची पोस्टर्स, चित्रपटग्रहावर लावलेले ब्यानर्स हे बाबूराव स्वतः तयार करीत असत. ते ती रंगवीत असताना पहायलाही प्रचंड गर्दी होत असे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक कॅ. ग्लॅडस्टन सालोमन हे इतर अध्यापकांना घेऊन तेथे येत व तासनतास ती चित्रे न्याहाळत बसत. शेवटी एक दिवस  बाबुरावांची भेट घेवून त्यांनी विचारले, ' आपण चित्रकला शिक्षण कोठे घेतले?' त्यावर बाबूरावांनी उत्तर दिले, मी कोठेच शिकलो नाही. निसर्ग हाच माझा गुरु ! तो दाखवीत गेला व मी रेखाटत गेलो. आणि खरेच होते ते. कोणत्याही प्रकारचे प्रचलीत कला शिक्षण न घेता केवळ स्वतःच्या अंतःप्रेरणेवर काम करणारा चित्रकार जेव्हां स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करतो, ती संपूर्णतः स्वतंत्र असते. कोणाचाही मागोवा ती घेत नाही. दुसऱ्या दिवशी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये बाबुराव पेंटर यांना बोलावून सॉलोमन यांनी त्यांचा गौरवपूर्ण सत्कार केला.
                   

सिंहगडानंतर बाबूरावांनी आणखी चार चित्रपट निर्माण केले. बाबूराव पेंटर हे नांव भारतभर गाजू लागले. पौराणीक व ऐतिहासीक काळातून समाजाला बाहेर काढण्यासाठी १९२५ साली त्यांनी पहीला वास्तववादी मूकपट ' सावकारी पाश ' हा काढला. पुढे १९३२ साली चित्रपट बोलू लागताच १९३६ साली  हाच त्यांनी बोलपट केला. महाराष्ट्र फिल्म कंपनीचे नांव सर्वत्र दुमदुमू लागले. मायाबाजार, भक्त प्रल्हाद, सती सावीत्री आदी पौराणीक चित्रपट त्यांनी काढले. आपल्या शिष्यांना तंत्रज्ञान शिकता यावे म्हणून मोती गिडवाणी यांना त्यांनी कंपनीत आणले. आणि आजवर आतमध्येच धुमसत असलेले दामले, फत्तेलाल, गजबर व शांताराम यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली. ते सर्वजण महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडले.  व कोल्हापूरातील मंगळवार पेठेत त्यानी ' प्रभात फिल्म कंपनी ' स्थापन केली. ज्या शिष्यांना त्यांनी शिकविले, स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याची संधी दिली, सामर्थ्य दिले, तेच सर्व लोक स्वतःविषयी गैरसमज करून कंपनी सोडून गेले याचे बाबूरावांना आत्यंतीक दुःख झाले. पण त्यांनी त्याही स्थितीत त्या सर्वांना यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला व त्यांनी स्वतः महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमची सोडली. व ते संपूर्णपणे चित्रकलेत व्यस्त झाले. या काळात त्यांनी केलेल्या कल्पक चित्रांमध्ये विश्वमोहीनी सरस्वती, कमळावरील लक्षुमी, दत्तात्रय, मंदिराकडे अशी खास चित्रे आहेत. शिवाय अनेक राजघराण्यातील पोर्ट्रेट्स त्यांनी बनविली. जोडीला त्यांची शिल्पकलाही सुरु होती. कोल्हापूरचे राजपूत्र शिवाजी यांचा संगमरवरात कोरलेला पुतळा, भालजी पेंढारकर यांनी बनवून घेतलेला शिवाजी महाराजांचा उभा पुतळा केवळ १७ दिवसांत स्वतः ब्रॉन्झचे ओतकाम करून बनवीला. कोल्हापूरच्या शिवाजी चौकात आज तो विराजमान आहे. त्यांचे मोठे व शेवटचे शिल्पकलेतील काम म्हणजे कोल्हापुरात बसवीलेला महात्मा गांधींचा पुतळा. हे सर्व पुतळे त्यांच्या कलात्मकतेची साक्ष आजही देतात. मात्र गांधीजींच्या या पुतळ्याने बाबूरावांना आर्थीक संकटाला तोंड द्यावे लागले. झालेल्या दगदगीने त्यांची तब्येत ढासळली. व १६ जानेवारी १९५४ रोजी भारतीय चित्रपटसृष्टीला  वैभवाकडे नेणाऱ्या, मुक्या चित्रपटांना बोलके करणाऱ्या या अष्टपैलूं कलावंताला, फिल्म केसरीला नियतीने आपल्यातून ओढून नेले. बाबूराव केवळ कोल्हापूराचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचं एक अमूल्य ठेवा आहेत.

आज कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी १३० वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन

- मं. गो. राजाध्यक्ष.
                    



Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…