नशिबाने साथ न दिलेला दुर्लक्षीत कलाकार : इर्शाद हाशमी
इर्शाद हाशमी हा वेगवेगळ्या स्तरावर आठवणीत राहीलेला आमचा मित्र. दोनच वर्षांनी जे .जे. मध्ये आमच्या मागे असलेला. त्यावेळी आमच्या जे.जे.चा नूरच कांही वेगळा होता. सुसंस्कृत असे कलासक्त कुटुंब, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. केवळ पन्नास विद्यार्थी एकेका वर्गात असल्याने विद्यार्थ्यांची सर्वच वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी मैत्री होत असे, व शिक्षक देखील प्रथम वर्ष ते शेवटच्या वर्ष्यातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वाना ओळखून असत. असाच हाशमी देखील त्याच्या बोलक्या स्वभावामुळे व त्याला अंगभूत लाभलेले नाट्यगुणामुळे आमच्या सहवासात आला. संस्थेच्या स्नेहसंमेलात भाग घेऊ लागला. आणि त्यातच तो अंतीम वर्षाला असताना मजलीसचा सेक्रेटरी झाला. मग वर्षभराचे सांस्कृतीक कार्यक्रम करणे, इतर विद्यार्थाना कामाला लावणे हे हाशमीचे काम ठरले. आणि यावेळी मी अध्यापक म्हणून जे.जे.ला लागलो होतो. जरी आम्ही शिक्षक विद्यार्थी असलो तरी पूर्वचे मैत्रीचे नाते जास्त घट्ट होते.
हाशमीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर साधारणपणे वर्षभरानंतर आमच्याकडे सहाय्यक अधिव्याख्यात्याची जागा रिकामी झाली, त्यावर अधीष्ठाता हणमंते सरांनी हाशमीला त्या जागेवर घेतले. आधीच तो नाटकामध्ये कामे करत असल्याने त्याला स्टेज फ्राइट बिलकुल नव्हती. त्यामुळे वर्गात मुलांसमोर जातांना त्याला बिलकुल बुजरेपणा जाणवला नाही. टायपोग्राफी लेटरींग त्याचा विषय असल्याने लेटरिंगच्या तासाला तो मुद्दाम सर काय सांगतात, त्याकडे लक्ष देत असे. तेंव्हां आमच्याकडे प्रा.अरविंद देसाई नांवाचे प्राध्यापक लेटरिंग विषय शिकवत असत. त्या विषयातील ते द्रोणाचार्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ ते लेटरींग करीत नसत, तर त्यामागे डिझाईनची जोड, कल्पकता आणि अक्षरांचे व्यक्तीमत्व ते उलगडून दाखवीत असत. कामालाही मोठा दादा माणूस. यांच्याच कल्पनेतून फाऊंडेशनचा अभ्यासक्रम बनवला गेला. आणि हाशमी त्यांच्या तासाला बसून आपणही ते धडे गिरवू लागला. एकदा त्याने मला विनंती केली की आम्ही जे परीक्षेचे पेपर तपासतो, त्यावेळी आपणास हजर राहण्याची परवानगी द्यावी. त्याचा उद्देश होता, पेपरला मार्क देतांना कोणती चर्चा होते, कोणत्या मुद्द्यावर अश्या सब्जेक्टीव्ह विषयाचे मूल्यमापन केले जाते. आणि त्याच गोष्टी त्याला जाणून घ्यायच्या होत्या. अर्थात याला आमची कांहीच हरकत नव्हती.
हाशमीचा आणखी एक गुण सांगण्यासारखा होतं तो म्हणजे त्याला अवगत असलेली नक्कल करण्याची कला. मग ते एखाद्याचे बोलणे असो, त्याचे चालणे असो किंवा त्याची देहबोली असो, या सर्व बाबी बारकाव्यासहीत हाशमी उचलत असे. व त्यातून सदर व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी करत असे. आणि यामध्ये त्याची संस्थेमध्ये कांही ठरावीक गिऱ्हाईके होती. त्यात फोटोग्राफीचे भास्कर जतकर, प्रा. सवाई, प्रा. रमाकांत देशपांडे, प्रा. धैर्यवान आणि खास करून कॅन्टीनमधील वसंत व रमेश. या प्रत्येकाला तो आपल्या नकलानी साक्षात उभे करीत असे. त्या केवळ नकला नसत तर त्यामागे एक नाट्य असे. जणू स्क्रिप्ट लिहिल्याप्रमाणे हजरजबाबीपणा त्याच्या या नकलात असायचा. रमाकांत देशपांडे हे ठरावीक पद्धतीने आपले हातवारे करीत ते हाशमीने बरोबर उचलले होते. सवाई सरांची चाल सुद्धा नेहमी तिरक्या पद्धतीची असे. विशेषतः कॉलेजच्या स्पोर्ट्सच्या वेळी सवाई सर नेहमी हाफ प्यांट घालून येत. व तोंडात शिटी पकडून ते नेहमी हम्पायर म्हणून काम करीत. त्यांच्या लकबी हाशमी हुबेहूब उचलत असे. जतकर यांच्या तर त्याच्या बोलण्यासहीत तो त्याच्या आवाजात सादर करीत असे. धैर्यवान सरांना फोटाग्राफीचा खूप षोक होता. त्यामुळे जतकारांसोबत ते फोटोग्राफी करीत असत. दोघांच्या गप्पा देखील फोटोग्राफीच्या असत. हाशमी त्यांची देखील नक्कल करे. ‘सर सर तो पहा कावळा. फांदीवर बसला आहे. धैर्यवान कॅमेरा घेऊन येताच जतकर म्हणे, सर कावळा उडाला’. अर्थात हे सर्व एकपात्री चालायचे. रमेश चहा घेऊन केंकरेंच्या रूम मध्ये जाताच केंकरे तो चहा पाहूनच त्याला म्हणत, हा काय चहा आहे रे? जा, दुसरा चांगला बनवून आण. नंतर रमेश तो चहा घेऊन कॅन्टीन मध्ये मुले बसलेली असतात तेथे आणून मुलांना देतो. त्यावर तो मुलगा म्हणतो, हा कसला चहा देतोस रमेश सेठ? त्यावर रमेश म्हणतो, पेशल हाये. सरांसाठी बनवला होता. हे देखील एकपात्रीच. पण सर्वजण त्यातून प्रत्येक व्यक्तीच्या लकबीची मजा घेत.
कॉलेजचे काम सुरु असतांनाच हाशमीची बाहेर नाटके सुरूच असत. त्याचे कांही अभिनेते मित्र होते. त्यांना घेऊन तो ही प्रायोगिक नाटके बसवून त्यांचे प्रयोग करीत असे. असेच एक नाटक रॅगिंगवर आधारीत होते. 'आसामनसे उतरे, खजूर मे ‘अटके ' अशी त्याची नाटके होत असत. वर्गात बसूनच तो त्यांच्या जाहीराती, तिकिटांची डिझाईन करीत असे. हे त्याचे मित्र त्याला खूप मानत असत. एकदा त्याला किडनी स्टोनचा त्रास झाला. शेजारील जी. टी. हॉस्पीटल मधे तो दाखल झाला. नेहमीप्रमाणे करंडे बाईंनी त्यांच्या ओळखीचे तेथील हाॅनररी डॉक्टर रांगणेकरांना सांगून त्याची त्या सरकारी हॉस्पीटल मध्ये खास व्यवस्था करवीली होती. त्यामुळे विनाखर्च त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. या दरम्यान त्याचे बाहेरील नाटकातील मित्र दिवसरात्र त्याच्या सोबत असत. एवढे ते या माणसाला मान देत. कॉलेजच्या गॅदरींगची नाटकेही तोच बसवीत असे. हळूहळू हाशमी प्रसीद्धी पावू लागला. पण कित्येकदा त्याला आपण सतत विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांच्या नकला करे ते कांही शिक्षकांना रुचत नसे. विशेषतः सवाई सरांना हे जेव्हां कळे, तेंव्हां ते अतीशय संतापत. बऱ्याच शिक्षकांना हा आपला उपमर्द वाटे. हाशमीला पण हे समजत असे. पण तोही त्यात मजा घेत असे. मात्र आपल्या या कलेचा वापर तो योग्य रीतीनेही करे. आमच्याकडे प्रसादे नावाचे एक अध्यापक होते. मोठे पापभिरू व सर्वांशी अदबीने वागणारे. त्यांनी पोस्टर या विषयावर बराच अभ्यास केला होता. त्यासाठी त्याने बऱ्याच नोट्सही काढल्या होत्या. सर्वांशी ते चर्चा करीत. व एक दिवस त्यांनी आमच्या वर्गावर पोस्टर विषयवार लेक्चर देण्याचे ठरवले. त्यांनी दिलेल्या वेळी आम्ही सर्वजण वर्गात उपस्थीत राहीलो. इतक्यात हाशमी वर्गात शिरले व त्यांनी जोराने ललकारी दिली, 'बा अदब बा मुलाहिजा होशिऽऽऽयार, प्रसादे सर पधार रहे है ऽऽऽ’ आम्हांला क्षणभर समजलेच नाही हा अचानक कसा आला व ही घोषणा कशी केली. कारण त्याचा स्वभाव आम्ही जाणून होतो. पाठोपाठ प्रसादें सर आत आले व म्हणाले, ऐकलंत ना काय म्हणाले ते? पूर्वी राजे लोक दरबारात येण्यापूर्वी अश्या प्रकारची ललकारी देत असत. व ती महाराज येण्याची वर्दी असे. पोस्टर या माध्यमाचे कार्य तेच आहे. घोषणा देणे. त्यासाठीच आम्ही हा प्रयोग केला होता. तेव्हां आम्हांला कळले की हा प्रसादेंच्या लेक्चरचा एक भाग होता, व त्यांनी व हाशमी यांनी त्याला आकार दिला होता. गंमत म्हणजे मोहन वाघ यांच्या 'चंद्रलेखा' संस्थेतर्फे झालेले ' ऑल दी बेस्ट हे नाटक सर्वप्रथम जे.जे.उपयोजीत कलासंस्थेसाठी झाले होते. व भारतीय विद्याभवन मध्ये त्याचा दणदणीत प्रयोग झाला त्यात आंधळा, बहीरा व मुका या भूमिका जे.जे.तील लोकांच्याच होत्या त्यापैकी हाशमी एक होता. सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते हे नाटक.
पुढे हाशमी हा कांही विद्यार्थ्यांच्या टार्गेटवर आला. हाशमी शिकवायला नको म्हणून ते विद्यार्थी वर्गाबाहेर गेले. पाठोपाठ शिक्षकांचा व त्यामागोमाग विद्यार्थ्यांचा संप झाला. संपकरी विद्यार्थ्यांच्या नेत्यांनी आम्हां शिक्षकांना पंचेचाळीस तोंडाच्या रावणाची उपमा दिली. त्यातील एक तोंड होते हाशमीचे. त्याच्यावर अश्लील आरोप करून पोस्टर लावण्यात येऊ लागली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडेही हाशमीविरुद्ध राजकीय नेत्यांच्या मदतीने तक्रारी केल्या गेल्या. परीणामी हाशमी याची नागपूरला बदली करण्यात आली. संपकरी शिक्षकांच्या नेतेमंडळींनी हाशमीला नागपूरला जाऊन हजर होण्याची विनंती केली. पण हाशमीने नम्रपणे ती नाकारली, व त्याने राजीनामा दिला. जे.जे.पुरते हाशमीचा विषय संपुष्टात आला. हा संप कसा झाला, त्यामागे कोण होते, असे प्रश्न आता विचारण्यात अर्थ नाही. पण हाशमीचे आयुष्य उध्वस्त झाले हे मात्र खरे! आता प्रश्न होता तो त्याच्या रहाण्याच्या जागेचा. हाशमीचे वडील पोलीस खात्यात होते. त्यामुळे त्यांना वांद्र्याच्या सरकारी वसाहतीत रहायला जागा मिळाली होती. पुढे ते निवृत्त झाल्यावर हाशमी देखील सरकारी नोकरीत आला त्यामुळे ती जागा पुढे त्याच्या नावांवर झाली. पण नोकरी सोडल्यावर जागा खाली करून देणे हे साहजीकच होते. आणि मुंबईत पैसे भरून जागा घेणे त्या काळात तरी शक्य नव्हते. त्याने सरळ त्यावेळचे लोकप्रिय आमदार राम कापसे यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. सर्वांच्या उपयोगी पडणारे म्हणून राम कापसे यांची ख्याती होती. ते थेट हाशमीला घेऊन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे गेले, व त्यांना कलाकारासाठी असलेल्या शासनाच्या दहा टक्के जागेतून एक जागा या गरजू माणसाला देण्याची विनंती केली. दरम्यान हाशमीने सिंहासन व इतर कांही चित्रपटात काम केले होते. वसंतदादांनी त्याला विचारले कोणत्या चित्रपटात आपण काम केले आहे? त्यावर हाशमीने जब्बार पटेलांच्या 'सिंहासन'चे नांव सांगताच वसंतदादांचे समाधान झाल्याचे दिसले. व तेथेच त्यांनी हाशमीला एक सदनीका मंजूर केली आणि गोरेगांव पूर्वेला पोलीस स्टेशनच्यावर हाशमीला अखेर आसरा मिळाला. ज्या वसंतदादानी हाशमीची बदली केली होती, त्यांनीच त्याला डोक्यावर छप्पर दिले हे काय थोडे झाले?
जे.जे.सोडताच हाशमीला आता खरा वाली एकच होता, आणि तो म्हणजे सर्वांच्या मदतीला धावून येणारा विनय नेवाळकर! विनयच्या जणू तो घरचाच झाला होता. एकदा तर गंमत झाली. हाशमी व दिगंबर कुलकर्णी अश्या दोघांना विनयच्या आजीने एकदा जेवायला बोलावले होते. जेवतांना दिगंबरच्या ताटात मटण वगैरे मांसाहारी जेवण, व हाशमीच्या ताटात मात्र श्रीखंड पुरी वाढली होती. त्यावेळी विनय घरी नव्हता. हाशमीला कळेना आपल्याला का मांसाहारी वाढले नाही. इकडे कुलकर्णी एका मनाने आपल्या जेवणावर ताव मारत होते. हाशमीने त्याबाबत विचारताच विनयच्या आजी म्हणाल्या, आपण ब्राम्हण ना! म्हणून आपल्यासाठी खास शाकाहारी बनवले आहे. याना चालते ते त्यांच्यासाठी आहे. हाशमीच्या ध्यानांत काय झाले ते आले. तो ओरडला, म्हणजे हा माझं जेवण हा खातोय! दिगंबरला दाढी होती आणि हाशमी तुळतुळीत केलेला. थोडक्यात हाशमीला त्या कुलकर्णी समजल्या होत्या. त्यावेळी दादरच्या ब्रॉडवे शॉपींग सेंटर मध्ये विनय नेवाळकरांची जागा होती. तेथे विनय, रंजन जोशी व इर्शाद हाशमी यांनी एक स्टुडीओ सुरु केला. विनयच्या ओळखीने कामे भरपूर येत असत. हाशमीची फोटोग्राफी सुंदर होती. कॉलेजमध्येही तो फोटोग्राफी करीत असे. यातूनच विजय तेंडुलकरांचे 'चेहरे' झाले. 'राजमाता''चित्रपटाच्या वेळी विनयने हाशमीला सोबत घेऊन फोटोग्राफीसाठी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. जुने वाडे, त्यांचे दरवाजे, खिडक्या, खांब, कोनाडे, नक्षीकाम, महिरपी, काठ असे जे जे म्हणून कलात्मक दिसे, त्याचे संपूर्ण फोटो हाशमीने काढले. पुण्यातील बऱ्याच वाड्यांचा अभ्यास झाला. या त्यातून निर्माण झाला एक सुंदरसा ऑल्बम. हा ऑल्बम पहाताच द.ग.गोडसे तर त्याच्या पुरेपूर प्रेमात पडले. अनेक पौराणीक, ऐतिहासीक नाटकांची नेपथ्य गोडसे करीत असत. हा ऑल्बम त्यांना एक पर्वणीच होती. त्यांनी तो अभ्यासायला स्वतःकडेच ठेवला होता. या ऑल्बमचा उपयोग पुढे बऱ्याच जणांनी आपापल्या कामासाठी करून घेतला. मग ते नेपथ्य असो, पेंटींग असोत किंवा इंटेरीअरच्या कामासाठी असो. याशिवाय विनय नेवाळकरांनी त्याला आणखी एक काम दिले होते ते म्हणजे, चित्रपट सृष्टीतील सर्व मुख्य कलाकारांचे फोटो काढून ठेवणे. कारण अश्या प्रकारचे कार्य कोणीही करून ठेवले नव्हते. जेव्हां गरज पडेल, तेव्हां फोटो शोधत फिरण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तेही काम हाशमी करीत असे. त्यावेळी रॉक्सी शेजारील हर्म्स हाऊस मधील नेवाळकरांच्या स्टुडीओत हाशमीने ७ x ७ फूट आकाराचे प्रिंट काढले आहेत. पुढे ही इमारत आगीमध्ये भस्मसात झाली.
मध्ये आमचे मित्र सतीश नाईक यांनी आपल्या 'चिन्ह' या कला विषयाला वाहीलेल्या खास अंकामध्ये ज्या कोणा लोकांवर अन्याय झाला आहे, त्यांचे लेख छापले होते. त्यामध्ये बाबुराव सडवेलकर यांचा ' कला संचालक आणि मी' तसेच इर्षाद हाशमी याचा 'बदली आणि मी' असे लेख छापले होते. या लेखात हाशमीने आपले सर्व मनोगत उलगडून दाखवले होते. शासन कोणावर कसा अन्याय करते, आपली बाजूही मांडण्याची संधी देत नाही याचे सविस्तर विवेचन त्याने केले होते. आणि हे खरेही होते. कारण वसंतदादानी स्वत:च अधीष्ठाता हणमंते यांना सांगीतले होते की, आपल्यावर बाळचे (बाळासाहेब ठाकरे ) दडपण असल्याने ही बदली करतो आहे. त्यानंतर हाशमी अधून मधून जे.जे.मध्ये येत असे. तेव्हाचं त्याने ही आपली दहा टक्के जागेची कहाणी आम्हांला ऐकवली. पुर्वी हाशमी कॉलेजला असताना एकदा बाथरूमला जायच्या वेळी खिशातील साहीत्य काढून त्याने टेबलवर ठेवले. त्यात आम्हांला त्याचे ओळखपत्र दिसले. सहज म्हणून आम्ही ते पाहीले तर त्याच्यावर हाशमीचा पोलिसाच्या वेशातील फोटो होता. त्याला विचारताच तो म्हणाला, माझे वडील व माझ्यात खूप साम्य आहे. हा फोटो माझ्या वडीलांचा आहे. कधी गरज लागली व कार्ड दाखवले तर उपयोग होतो. म्हटले, अरे अशाने कधीतरी गोत्यात येशील. पुढे त्याने काहीं हिंदी -मराठी चित्रपटात कामेही केली. त्यामध्ये राजू बन गये जंटलमन, वजीर, मोहरे, बाळाचे बाप ब्रम्हचारी, ब्योमकेश बक्षी ही मालीका पण होती. पण त्याच्या भूमिका नेहमीच दुय्यम स्तराच्या आणि थोडक्यात विनोदी स्वरूपाच्या राहील्या. त्याचे एक कारण म्हणजे त्याचे बोलणे, वाणी ही स्वच्छ वाटत नसे. शब्द जडावल्या प्रमाणे मराठीचा उच्चार होई, हे असेल कदाचीत.
हाशमी गोरेगांवला रहात असे त्याच बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर पोलीस स्टेशन होते. आणि हाशमीची जागा होती पहील्या मजल्यावर. घरी तो आपली पत्नी, मुलगा व मुलगी असे होते. हाशमीचे लग्न देखील जवळ जवळ विनयनेच लावून दिलें होते.त्यामुळे हाशमीची पत्नी विनयला खूप मानीत असे. ती नोकरीवर जात असे. रात्री तिला येतांना जिन्यात पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या बऱ्याच जणांच्या गर्दीतून यावे लागे. दिवस रात्र तेथे माणसांची वर्दळ सुरु असे. त्यात सर्व प्रकारचे लोक असत. जिन्यातही काहीजण जागा अडवून बसत असत. तेथेच तंबाखू खाऊन थुकत असत. त्यामुळे हाशमीच्या कुटुंबाला हा नेहमीचा त्रास सहन करावा लागे. पोलीस स्टेशनलाही तक्रार करून झाली. पण त्यांचे म्हणणे, याला आम्ही काय करणार? पोलीस स्टेशनवर हे असेच चालते. त्यामुळे हाशमी दुसऱ्या जागेच्या शोधात होता. तश्यातच अचानक त्याची पत्नी वारली. हा एक फार मोठा आघात होता हाशमीवर.
आणि एक दिवस माझ्या कानावर बातमी आली की हाशमीला अर्धांगाचा झटका आला आहे. घरी मुलगा व मुलगी होते. आर्थीक ओढाताणीतही चालली होती. माझ्या मनांत आले, आपण त्याच्यासाठी काहीतरी केले पाहीजे. माझे खास असे कांही मित्र होते. त्यामध्ये प्रा. साठे, नेक्ससचे अरुण काळे, सुधाकर खांबेकर, अरविंद नागवेकर, समीर खानझोडे, रतन सोहनी असे आम्ही बारा लोकांनी एक एक हजार रुपये काढून बारा हजार रुपये गोळा केले. त्यांच्या नांव पत्त्यासह एक शुभेच्छा पत्र लिहून त्यासह मी, साठे सर, खांबेकर, नागवेकर त्याच्या घरी जाऊन त्याला आमची छोटीशी मदत देऊन आलो. त्याक्षणी त्याच्या चेहऱ्यावर जे तृप्ततेचे, समाधानाचे भाव मला दिसले ते आम्हांला समाधान देणारे होते. एकेकाळी सर्वाना आपल्या नकलानी हसवणारा हा माणूस आता तोंडातून शब्दही नीट काढू शकत नाही, यालाच विधीलिखीत म्हणतात. दुसऱ्या दिवशी रात्री मला हाश्मीचं घरी फोन आला. अगदी घळघळून बोलत होता तो. वारंवार आमचे आभार मानत होता. अजून तुम्ही मला विसरला नाही हे पाहून उमेद आल्याचे त्याने सांगीतले. नंतर त्याने कोणीकोणी मदत केली होती त्या सर्वांचं फोन नंबर माझ्याकडून घेतले व दुसऱ्या दिवशी सर्वाना आवर्जून त्याने फोन करून आभार मानले. नंतर एक दिवस नागवेकर माझ्याकडे लोकप्रभेचा अंक घेऊन आले व मला म्हणाले वाच. हाशमीवर त्यामध्ये एक लेख आला होता. त्यात हाशमीने मराठी नाटकांतील कांही कलावंतांनी आपल्याला कशी आर्थीक मदत केली ते सांगीतले होते. नागवेकर म्हणाले कोणीही न सांगता आपण त्याला मदत केली. पण बाहेर सांगताना त्याने फक्त नाटकवाल्यांची नांवे सांगितल्यामुळे नागवेकर संतापले होते. मी म्हटले, जाऊ दे ना! आपण थोडेच कोणाला दाखवायला केले आहे? फक्त त्याला शेवटी सत्य माहीत आहे ना! कदाचीत त्याला या कलावंतांना मोठेपणा द्यावासा वाटला असेल! पुढे हाशमी रहायला नाला सोपाऱ्याला गेल्याचे कळले. मुंबईशी त्याचे ऋणानुबंध संपल्यात जमा झाले.
आणि अखेर वर्षे २०११ ! हाशमीने या जगातून एक्झीट घेतली. स्वतःमध्ये गूण असूनही नियतीने साथ न दिल्याने एक तारा शेवटी लुकलुकतच राहीला. चमकलाच नाही.
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष


Comments
Post a Comment