आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी
स्वतः दुःखात असतांनाही दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे कांही कण वाटत फिरणारा, स्वतःच्या आयुष्याची दोरी संपत असताही दुसऱ्याच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण यावेत यासाठी झटणारा राजेश खन्नाने साकारलेला आनंद आपल्या सर्वांच्या मनांत अजूनही वास्तव्य करून आहे. पण या जगात असे लोक आपल्याही जीवनांत कधीना कधी येत असतात. आपल्याला प्रत्येक टप्प्यावर मदतीचा हात पुढे करत असतात. आणि तीही कसलीच अपेक्षा न ठेवता! असाच एक मित्र माझ्या आयुष्यात मला मिळाला. आणि हा होता प्रथम माझा विद्यार्थी, नंतर सहशिक्षक आणि शेवटी मित्र. आणि हा हरहुन्नरी मित्र होता शेखर साळवी. तसे शेखर साळवी, नरेंद्र विचारे, नाना पाटेकर, विजय कुल्लरवार,दत्ता पाडेकर, अनील गांधी, प्रकाश बिस्ने, रमेश खापरे, सुभाष गोरेगावकर हे सर्व माझी पत्नी भारती हिचे वर्गमित्र. त्यामुळेही आम्हां सर्वाचा एक प्रकारचा घरोबा असे.
शेखर साळवी व नरेंद्र विचारे हे विद्यार्थी दशेपासूनच माझ्या जवळ आले. दोघेही विद्यार्थीप्रिय. खेळातही सर्वात पुढे. त्यामुळे स्पोर्ट्सच्या काळात हे दोघेही चमकत असत. विचारे हा वर्ग कामात हुशार, पण शेखर तसा थोडा यथातथाच होता. पण इतर कामाला मात्र सर्वात पुढे असायचा. हे दोघे काॅलेजचे जी. एस.ही झाले. नंतर नरेंद्र विचारे व शेखर साळवी दोघेही जे.जे.मध्ये अध्यापक म्हणून लागले. आणि शेखर जो वर्गात समोर बसायचा तो आता दुसऱ्या बाजूला दिसू लागला. मग मात्र तो विद्यार्थ्यांशी शिक्षकांच्या रुबाबात वागू लागला. शेखरला टापटीपीने रहाणे आवडत असे. अधूनमधून तो केसांना मेंदी लावून त्यांना लालसर रंग चढवे. त्याचे मित्रमंडळही बरेच मोठे आणि सर्वस्तरावरचे होते. मग ते जाहीरात क्षेत्रांतील लोक असोत, गॅरेजमधील मेकॅनीक असोत किंवा महंमद अली रोडवर परदेशी इलेक्ट्रॉनीक वस्तू विकणारे मुस्लीम दुकानदार असोत, सर्वांशीच शेखरचे सलोख्याचे संबंध.त्या सर्वांशी बोलतांना तो मुलाचे अथवा वडीलांचे नाते जोडूनच बोलत असे. त्यामुळे तो चटकन त्यांच्या पोटात शिरत असे.
शेखर रहायला होता वरळीच्या बी डी डी चाळीत. त्यांच्या तीन मोठ्या खोल्या होत्या तिथे. त्यात त्याचे आई-वडील पत्नी मुले व भाऊ असे सर्वजण असत. त्याचा जोडीला स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय सुरु होता. कॉलेज संपले की मग कांही विद्यार्थ्याना घेऊन त्याचे तेथे स्क्रीन प्रिंटिंग सुरु असे. मात्र कामाचे पैसे तो न चुकता देत असे. त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी त्याच्याकडे काम करीत. शिवाय बेंगाल केमिकलला शेखरने एक फ्लॅट देखील घेतला होता. पण त्याची आई मात्र त्यांच्या सर्व कुटुंबाला बांधून होती. त्यामुळे शेखरची कधी हिम्मत झाली नाही तेथे जाऊन रहायची. पुढे त्याने तो फ्लॅट आपल्या भावाला दिला व आपण आपल्या घराजवळच दुसरा घेतला. शेखरच्या घरी गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यावेळी त्याची आई आम्हांला मुद्दाम जेवायला बोलावीत असे. खास काळ्या वाटण्याची उसळ केली जात असे त्यावेळी. कांही वर्षे तो माझ्यासोबत माझ्या वर्गावर होता. मुलांच्या कामावर सुधारणा करतांना आम्ही काय बोलतो यावर त्याचे बारीक लक्ष असे. त्यातून स्वतः शिकण्याची त्याची उमेद असायची. कोणतेही काम सांगीतले की ते तत्परतेने तो करीत असे. तसेच विद्यार्थ्यांना काय कमी पडू नये ह्याकडेही त्याचे लक्ष असे. एकदा तो माझ्याकडे एका वरच्या वर्गातील विध्यार्थ्याला घेऊन आला व म्हणाला, सर या मुलाला आपले काम तुम्हांला दाखवायचे आहे. त्याचे काम जेव्हां मी पाहीले ते अतीशय उत्कृष्ट होते. तेंव्हा शेखर मला म्हणाला, त्याचे सर त्याला कांही सुधारणा सांगत नाहीत किंवा त्यावर मतही प्रदर्शीत करीत नाहीत. हा मध्ये मध्ये तुम्हांला येऊन आपले काम दाखवीत जाईल. तरी त्याला कांही सांगत चला. आणि खरोखरीच पुढे तो विध्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला.
शेखरला निरनिराळ्या कला स्पर्धामध्ये भाग घेण्याची आवड होती. बहुदा कॉलेज संपल्यावर संध्याकाळी तो माझ्याकडे येत असे. मग हळूच आपल्या खिश्यातुन एक छोटासा कागद काढून त्यावर समाज शिक्षण पोस्टरसाठी केलेली आपली आयडीया दाखवून त्यावर सुधारणा करण्यास सांगत असे. प्रत्येक स्पर्धेसाठी तो पोस्टर पाठवीत असे. आणि त्याचे नशीब त्याला नेहमीच साथ देत असे. बहुतेक वेळा त्याला बक्षीस मिळत असे. आणि त्यादिवशी सकाळी त्याचा माझ्या पत्नीला फोन येत असे, भारती, आज ब्रेकफास्ट करू नको. मी घेऊन येत आहे. मग तो ऑपेरा हाऊस येथील तिवारी कडून सामोसे, ढोकळा आदी चमचमीत पदार्थ व सोबतीला पेढे घेऊन येत असे. पैशाला त्याचा हात एकदम सढळ. कोणालाही मदत लागली की हमखास करणारा. माझ्या १० टक्के जागेचे शासनाकडून काम झाले, व एकदम पैसे भरायची वेळ आली तेव्हां कांही रक्कम कमी पडत होती. शेखरकडे शब्द टाकताच त्याने एकरकमी मला ते दिले. मात्र माझे काम झाल्यावर मैत्रीचे एक प्रतीक म्हणून मी त्याला पैशांसोबत एक शर्ट व पॅंट पीस देताच तो माझ्यावर रागावला. म्हणाला, सर तुमच्याकडून मला परतफेड घेणे कधीही आवडणार नाही. शेवटी मी त्याची समजूत घातली तेव्हां त्याने ते घेतले. असाच एक प्रसंग माझ्यावर आला होता. जे.जे.च्या कांही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी परीक्षेत नापास झालेल्या मुलीला पास करवून घेण्यासाठी माझ्यावर रात्री घरी येऊन हल्ला केला होता. अर्थात पोलीसांनी दोनच दिवसात त्याच्या मुसक्या आवळून त्या टोळीला जेरबंद केले. पण त्यावेळी विचारे व साळवी हे दोघेही माझ्यासोबत सावलीसारखे रहात होते.
१९८८ साली माझी अधिष्ठाता पदाची ऑर्डर निघूनही तेथील अंतर्गत राजकारणामुळे माझी निघालेली ॲार्डर रद्द करण्यात आली. आणि माझ्या हक्काच्या पदावर जाण्यास मला पुढे दोन वर्षे लागली. माझी दोन वर्षानी जेव्हां ऑर्डर येवून मला माझे पद मिळाले तेव्हां शेखर आमच्या घरी आला व मला म्हणाला, सर विरारची जीवदानी देवी एक जागृत देवस्थान आहे. तुम्हांला तुमचे हक्काचे पद मिळावे म्हणून देवीकडे मी मागणे मागीतले होते. म्हणून आता आपल्याला देवीच्या दर्शनाला जायला हवे, असे म्हणून येणाऱ्या शनीवारी तो, मी, माझी पत्नी आणि त्याची वयोवृद्ध आई असे सर्वजण आम्ही जीवदानीच्या दर्शनाला निघालो. मे महिन्याचे दिवस होते ते. विरारला पोचून जीवदानीचा डोंगर चढण्यास सुरुवात केली तेव्हां जवळ जवळ दुपारचे बारा वाजत आले होते. डोक्यावर तप्त असा सूर्य आग ओतत होता. त्यात त्याची आई नेटाने चढत होती. या वयात तिला हा त्रास दिल्याबद्दल मी शेखरची हजेरी घेत होतो. पण त्याची आई असल्या उन्हातून सरांना कशाला आणलंस म्हणून त्याच्यावरच डाफरत होती. स्वतःच्या जिवाबद्दल तिला काहींचं वाटत नव्हते. आता आहेत तसे त्याकाळी रोपवे नव्हता. आणि पूर्ण समाधानाने आम्ही दर्शन घेतले. खणा नारळाची ओटी भरून सायंकाळी आम्ही घरी पोचलो. एखाद्या साठी किती जीव लावावा हे केवळ शेखरकडूनच शिकावे. नंतर एकदा माझे सुखसागर योथील दळवी ईस्पीतळात एक ॲापरेशन झाले होते. अन नेमके त्याच वेळी बाबरी मशीद पाडल्यामुळे मुंबईत दंगा उसळला होता. मी रहात होतो त्या बोरीबंदरच्या भागात कर्फ्यू लावला होता. डिसचार्ज मिळाल्यावर मला जे.जे. च्या बंगल्यात मी रहात होतो तेथे जाण्यास टॅक्सीही मिळेना. परत आठवण आली ती शेखरचीच. तो वरळीवरून सरळ टॅक्सी करून आला व मला त्याने घरी आणले. असे एक ना अनेक प्रसंग त्याच्या बाबतीत मला सांगता येतील.
अश्या या शेखरने आपल्या कॉलेजच्या सर्वच मित्रांशी चांगले संबंध होते. त्यामुळे कोण कोणत्या कामात वाकबगार आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे काम असले की तात्काळ शेखर ते काम करणाऱ्याला गाठत असे. मी पहील्याच वर्षी संस्थेत जेव्हां जमशेटजी जीजीभॉय यांचा अर्धपुतळा बसवला, त्यानिमित्ताने एक सोव्हिनिअर करण्याचा माझा हेतू होता. त्यासाठी अंधेरीच्या देवरुखकर यांच्याकडून मी मेटलमध्ये जमशेटजी यांची मेडल बनवून घेतली होती. पण त्यासाठी त्याला एक स्टॅन्ड हवा होता. शेखरला सांगताच त्याने आपला मित्र व जेजेचा माजी विद्यार्थी दाजी दळवी याला गाठले व त्याने एक अप्रतीम स्टॅन्ड बनवून दिला. डॉ. एस. पी. गोदरेज यांनी अनावरण केलेल्या जमशेटजींच्या पुतळ्याच्या समारंभासाठी हजर असलेल्या व आमच्या शिल्पांजलीच्या हितचिंतक जाहिरातदाराना आम्ही ती स्मृतीचिन्हे दिली. आणि या गोष्टी पूर्णत्वाला येत असत त्याही शेखरच्या समयसुचकतेमुळेच! संस्थेमध्ये सांस्कृतीक कामाच्या वेळी शेखरची धावपळ पाहण्याजोगी असे. सर्वच विद्यार्थ्यांशी त्याची नाळ जोडली गेली असल्याने ते विद्यार्थी देखील साळवी सरांनी काम सांगीतले म्हणजे झालेच पाहीजे, या उद्देश्याने कामाला लागत. मी जेव्हां युती सरकारतर्फे महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणावर आधारीत ' प्रगती पथावर महाराष्ट्र' हे प्रदर्शन भरवले, त्यावेळी मी बऱ्याच वेळा मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी यांच्याकडे जात असताना हा शेखर माझ्यासोबत असे. व तेथे अगदी अघळ पघळ बोलत असे, जणू कांही आपल्या कॉलेजमधील सरांशीच बोलत आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील कांही लोकांशी गट्टी करून आपला संपर्कही वाढवीत असे.
रमेश पावसकर गेल्यावर तो कोठे होता, कोठे त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार होते, ह्याची काहींचं माहीती आम्हा कोणाला नव्हती. पण कॉलेज सुटल्यावर शेखरने त्याचा पत्ता काढून ( मला वाटते ते ठाण्याला त्यांच्या भावाकडे रहात असत) तेथे पोचला. व सर्व संपेपर्यंत तेथे राहीला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला शेखर दुखावलेल्या मनानेच आला. स्टाफरूम मध्ये सर्वांना तो बोलला, एरवी पार्ट्याना रात्री सुद्धा जाणारे सर्वजण, तेथे मात्र कोणीही आले नाही. कोणाला बोलण्याला तोंडच नव्हते! आमच्याकडे नंदा देशपांडे नावाचे एक प्राध्यापक होते. त्यांची पत्नी अध्यात्मीक स्वभावाची होती. वर्षातून एकदोनदा तरी त्यांची तीर्थयात्रा होत असे. अश्याच त्या एकदा अमरनाथ यात्रेला गेल्या होत्या, अन दुर्दैवानं त्याचवेळी दरडी कोसळून अनेक बस, गाड्या त्याखाली आल्या होत्या. त्यांच्याशी संपर्क तुटला होता. अन चॅनलवर सतत त्या बातम्या दाखवीत होते. देशपांडे तेव्हां निवृत्त झाल्यामुळे घरीच होते. मलाही रवीवार असल्याने मीही घरीच होतो. आणि त्यांचा मला फोन आला. मला म्हणाले, पाहतोस ना काय बातम्या दाखवत आहेत त्या! असे म्हणून त्यांना एकदम रडू कोसळले. शब्दही त्यांच्या तोंडून निघेना. मग त्यांनी आपला पत्नीशी संपर्क होत नसल्याचे सांगीतले. मी त्यांना धीर देत होतो. एवढ्यात अचानक शेखर घरी आला. हे सर्व त्याला सांगितल्यावर त्याने प्रथम देशपांडे यांना आपण तेथे येत आहोत. तुम्ही अजीबात काळजी करू नका असे सांगीतले. व तडक तो मुलुंडला त्यांच्या घरी गेला. त्यांना धीर देऊन त्यांचे समाधान केले व रात्री तेथून परतला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीशी संपर्क झाला व देशपांडेंना हायसे वाटले. असा हा शेखर सर्वांच्या मदतीला धावून जाणारा होता.
जे.जे.मध्ये मी डीन असतांना दुपारी ३.३० ला कॉलेज सुटल्यावर सर्वच शिक्षक निघून जात असत. मी एकटाच असे केबिनमध्ये. अश्या वेळी आमचे लायब्ररीयन सुधाकर क्षीरसागर हे कांही निरनिराळ्या विषयांची पुस्तके मला वाचायला देत असत. शिवाय मला स्केचिंगचा पूर्वीपासून नाद असल्याने त्याचा एक प्रकारचा मला चाळाच लागला होता. कोणत्याही कागदावर माझे स्केचिंग सुरु असे. स्केच करून झाले की मी ते चोळाबोळा करून टोपलीत टाकत असे. अश्याच एका प्रसंगी शेखर आत आला. मी टाकलेले स्केच त्याने उचलले व म्हणाला, सर ही स्केचिस तुम्ही टाकत जाऊ नका. ती सांभाळून ठेवा. असे म्हणून तो खाली प्रिंटिंग विभागात गेला व तेथून बरेचसे पांढरे कागद घेऊन आला. त्याने ते सर्व कागद माझ्यापुढे ठेवले. आणि मला सांगीतले की आता या कागदावर स्केचिस करा व ती सर्व स्केचीस जपून ठेवा. मलाही ते पटले. मी एका विवक्षीत शैलीमध्ये ही स्केचीस करत असे. आणि ती शैली मला बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे अभ्यासतांना गवसली होती. विशेषतः त्यांचे दाक्षीणात्यांचे ओठ ज्या पद्धतीने ते काढत असत ते माझ्या चित्रात नकळत सामावले गेले. आणि तेव्हापासून माझ्या कडे कोणी आला, समोर बसला तर त्याच्याशी बोलताना माझे स्केचिंग सुरूच असे. अशी नंतर अनेक स्केचीस जमा झाली. आणि त्यातील निवडक अश्या स्केचिसचे मी 'फेस व्हॅल्यू' नावाचे प्रदर्शन संस्थेमध्ये भरवले. सांगायचे कारण यातही शेखरचाच वाटा होता, मला काम करण्यास उद्युक्त करण्याचा. मी संस्थेत भरवलेल्या प्रत्येक प्रदर्शनांत शेखरची धावपळ नेहमीच असे. मग ते शासनाची धोरणे जनतेला सांगणारे 'प्रगतीपथावर महाराष्ट्र' असो किंवा 'जय जवान' हे संरक्षक दलामध्ये भरती होण्यासाठी तरुणांना आवाहन करणारे प्रदर्शन असो, शेखर साळवींचा ठसा तेथे उमटलाच पाहीजे!
मध्ये एकदा १९७३ च्या बॅचचे विकास गायतोंडे माझ्याकडे आले. व त्यांनी त्यांच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी बॅचला पंचवीस वर्षे होत असल्याने एकत्र जमण्याचे ठरवल्याचे मला सांगीतले. त्यासाठी त्यांना एक सायंकाळसाठी जे.जे.चा असेम्ब्ली हॉल हवा होता. मी म्हटले, अरे आनंदाने देतो. तुम्ही जे.जे.च्या विद्यार्थ्यांनीच जे.जे.चे नांव मोठे केले आहे. त्यावर तुमचाच हक्क आहे. आणि एका सायंकाळी एक मंगलमय अशी मैफल तेथे जमली. त्यांच्या वेळच्या सर्व शिक्षकांनाही आमंत्रण होते. आमच्या शुभानंद जोग या शिक्षकाने कॅलीग्राफीमध्ये सुंदर असे त्यांच्या स्वागताचे पोस्टर करून दिले. हे पाहून मी शेखरला म्हटले, असे काहीतरी तुम्ही कां नाही करत ? तुमच्या बॅचची तर पंचवीस वर्षे पूर्ण झाली. आणि शेखरने ती कल्पना पक्की उचलून धरली. मग त्याने आपल्या बॅचचे नरेंद्र विचारे, विजय कुल्लरवार, अनील गांधी, नाना पाटेकर अश्याना पकडून संस्थेमध्ये १९७२ च्या बॅचचा एक भव्य कार्यक्रम करण्याचे योजले.सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला. सहकुटुंब सर्वाना आमंत्रण देण्यात आली. अगदी बेंगळूर, दिल्ली पासून विद्यार्थी आले. सर्व शिक्षकाना आमंत्रीत करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येकाला समयोचीत असे पंचवीस वर्षांचे एक स्मरण चीन्ह देखील देण्यांत आले. नाना पाटेकर सोबत मनीषा कोईराला हीला घेऊन आला होता. त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नानाने केले. सीमा सामंतने गाणी म्हटली. आणि संस्थेच्या आवार गजबजून गेले. अनेक विध्यार्थी सुमारे पंचवीस वर्षांनी भेटत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुले होती. त्यांना आपले कॉलेज त्यांचे आई वडील अभिमानाने दाखवीत होते, आणि कॅम्पसभर फिरत होते. अश्या या शेखरचे गुण होते, तसे कांही अवगूणही होते. विशेषतः तो जर कोणासोबत प्यायला बसला तर कोठे थांबायला हवे तेच त्याला कळत नसे. आणि त्याच्यावर आवर घालणारी व्यक्ती नसेल तर मात्र त्याला अंत नसे. मग त्राण नसले की तेथेच झोपायचीही त्याची तयारी असे. पण हे सर्व चाळे ते मित्रांच्या पार्टीच्या वेळी करत असे. एरवी तो या भानगडीत पडत नसे.
याच दरम्यान शेखरच्या आईचे निधन झाले. घराला एकत्र बांधून ठेवणारा एक अतूट धागा होता तो तुटला. सर्व दिवस वगैरे करून शेखर माझ्या रूममध्ये आला. आईच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले होते. त्याच्याशी बोलताना माझेही शब्द जड झालें होते. एवढ्यात मला त्याचे उजवे गालफड सुजल्यासारखे दिसले. मी विचारताच तो म्हणाला, दाढ दुखत होती. डॉक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी गोळ्या दिल्या आहेत. बरे वाटेल. त्यानंतर तो कॉलेजला येत होता. त्याला एक सवय होती, ती म्हणजे गुटखा खाण्याची. सतत त्याच्या खिशातील गुटख्याची पुडी काढून तो खात असे. मी कित्येकवेळा यावरून त्याला हटकले होते. पण त्याची सवय जात नव्हती. आणि एकदिवस त्याच्या पत्नीला शेखरच्या खिशात एक चिठी मिळाली. ती होती त्यांच्या डॉक्टरनी टाटा कॅन्सरच्या हॉस्पिटलला दिलेली. त्यांना संशय होता. त्याची तपासणी करण्यासाठी दिलेली चिठी त्याने घरी कोणालाही न सांगता खिश्यात ठेवून दिली होती. मग मात्र पत्न्नीने त्याला टाटा मध्ये नेवून त्याची तपासणी करवून घेतली. पण दुखणे खूप पुढे गेले होते. शेखरला त्याच्या गुटख्याच्या सवयीने तोंडाच्या कॅन्सरची देणगी दिली होती. अन हे लपवून ठेवून त्याने त्या रोगाला खतपाणीच घातले होते. याच्या आदल्याच वर्षी शेखरने मला देवगडहून प्रकाश राजेशिर्के यांच्याकडून एक हापूस आंब्याचे कलम आणून दिले होते. मी ते कॉलेजच्या डीन बंगल्याच्या आवारात लावले होते. त्यावर्षी त्याला फळ देखील आले होते. शेखर आला की हमखास त्या झाडाकडे नजर टाकून येत असे. व त्याचे हक्काचे मागणे होते की याचा पहीला पिकलेला आंबा आपल्याला पाहीजे. आणि आम्हीही ते त्याला दिल्याचे सांगीतले होते.
टाटा मध्ये आमचा एक माजी विद्यार्थी मधू पाटील हा फोटोग्राफर म्हणून कार्यरत होता. शेखरला तेथे दाखल केल्यावर सतत तो त्याच्यावर लक्ष ठेवून असे. मलाही त्याच्या प्रकृतीची माहीती तो नेहमी देत असे. त्याच्या गालाचे ऑपरेशन करायचे ठरले. ऑपरेशनच्या दिवशी मी व पत्नी दोघेही त्याला भेटायला गेलो. स्ट्रेचरवरून त्याला नेत असतांना तो माझ्या पत्नीला म्हणाला,भारती सरांच्या तब्येतीकडे लक्ष दे. त्यांना म्हणावं टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत सर्व मदतीला. त्याकाळात मी फोटोग्राफीमधील चाललेले बरेच अवैध उद्योग थांबवले होते. आजवर कोणी हात लावू न शकलेल्या फोटोग्राफीला मी सुधारण्यास सुरुवात केली. तेव्हा मला, माझ्या मुलांना फोनवरून अनेक धमक्या येऊ लागल्या होत्या. पण मी त्यांना कधी भीक घातली नव्हती. पण शेखर, विचारे त्याची काळजी घेत असत. मात्र या वेळी स्वतः शेखर ज्या परीस्थीतीत होता, ऑपरेशन साठी आत चालला होता, त्याचे त्याला काय नव्हते. उलट माझ्याच तब्येतीची काळजी तो वहात होता. काय म्हणावे या माणसाला? ऑपरेशन झाले. त्याच्या गालाचा संपूर्ण भाग काढावा लागला, व त्यासाठी त्याच्याच छातीवरील कातडी त्यावर चढवली. पण ती एकजीव होईपर्यंत अलग करता येत नव्हती. नंतर प्लॅस्टीक सर्जरी करून त्याच्या गालावर चढविण्यात आली. इकडे मधू त्याच्या प्रगतीची खबर नेहमी देत असे. नंतर शेखरला डिस्चार्ज मिळाला. तो घरी आला. कॅन्सर ह्या रोगावरील खर्च शासन १०० टक्के उचलत असल्याने आमच्या कार्यालयातील लोक तसेच कला संचालनालयातील लोकांनी त्याचे पगाराचे पैसे घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली होती. त्याच्या पगारात कधीही विलंब होवू नये याकडे सर्वजण जातीने लक्ष देत असत. त्यानंतर तो फेब्रुवारी मध्ये आमच्या लग्नाच्या पंचविसाव्या वर्ष्याच्या सोहोळ्यालाही उपस्थीत राहीला. आम्हांला वाटले चला, त्याच्यावरील संकट टळले. पण विधीलिखीत कांही वेगळेच होते. आम्ही मधून मधून त्याच्या घरी जाऊन त्याला भेटत असू. कोणत्यातरी वैद्याचे आयुर्वेदीक औषध घेणे त्याने सुरु केले होते. त्यामुळे आता आपल्याला बरे वाटत असल्याचे तो सांगे.
हळूहळू शेखरची प्रकृती खालावत चालली. त्याला जेवण जात नसे. मध्ये एकदा त्याला टाटा मध्ये नेवून तपासण्यात आले. संध्याकाळी मधूचा फोन आला व त्याने सांगीतले की फारतर सहा महीने त्याच्यापाशी आहेत. व डॉक्टरांनी हे त्यांच्या घरच्यांना सांगण्यास सांगीतले होते. मधुची इच्छा होती की मी ते सांगावे. पण माझे त्या घराशी कितीही जवळचे संबंध असले तरी त्याचे वडील, पत्नी यांच्याशी बोलण्याची माझी हिम्मतच होणार नव्हती. मी मधूला सांगीतले की खुद्द डॉक्टरानीच ते त्याच्या पत्नीकडे सांगावे. नंतर तो घरी आला. कांही दिवसांनी त्याला अचानक त्रास होऊ लागला. पुन्हा टाटा मध्ये दाखल. पुन्हा आम्ही तेथे पोचलो. तेव्हां कळले की त्याला 'शांती आवेदन' येथे हलवताहेत. शांती आवेदन हा वांद्र्याच्या माऊंट मेरीच्या पायथ्याशी असलेला एक आश्रम आहे. जेव्हां कॅन्सरवरील सर्व उपाय संपतात तेव्हां शेवटचा डिसचार्ज मिळालेल्या रुग्णांसाठी येथे व्यवस्था केली जाते. मिशनरी लोकांनी चालवलेला हा एक सेवाभावी आश्रम आहे. येथे कोणालाही रुग्ण असे वाटू नये असे प्रसन्न वातावरण येथे जाणीवपूर्वक ठेवले आहे. मुख्य म्हणजे स्वच्छता. एखाद्या घराप्रमाणे येथे प्रसन्नता दिसते. कोणाला खायला काय हवे नको ते पाहीले जाते. लहान मुलापासून ते वयोवृदापर्यंत सर्वच शेवटच्या घटकेतील कर्करुग्ण येथे असतात. तेथील नन्स त्यांची घरच्यांप्रमाणे काळजी घेतात, त्यांचे वाढदिवस साजरे करतात आणि येथूनच हे लोक परलोक प्रवासाला निघतात. पश्चिमेच्या भागाला मोठी काच लावलेली आहे. त्यातून सर्वाना मावळता सूर्य दिसतो. तो मावळतांना प्रत्येकजण त्याला मनोभावे नमस्कार करतो. कदाचीत उद्या उगवणारा सूर्य आपल्या नशीबात नसेल. ही भावना प्रत्येकाच्या मनात असते.
आम्ही शांती आवेदन येथे शेखरला भेटायला गेलो. आता त्याचे बोललेले शब्दही कळेनासे झाले होते. जेंव्हा त्याला हे कळे तेव्हां तो आपल्या पत्नीवर जोराने ओरडून सांगे, मी काय म्हणतो ते सरांना सांग ना! नळीतूनच त्याला पातळ पदार्थ भरवीत असत. त्यावेळेला शेखरने आणलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे पिकले होते. आम्हांला त्याच्या शब्दांची आठवण झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यातील एक मोठासा आंबा घेऊन शेखरकडे गेलो. आता त्याचे डोळेही निस्तेज होत चालले होते. त्यात आता ओळखही दिसत नव्हती. मी त्याला आंबा दाखवून तेथील नर्सला त्याचा रस काढून नळीद्वारे शेखरला देण्यास सांगीतले. त्यामागची हकीकत सांगताच तत्परतेने तिने रस काढून आणला व त्याला दिला. एक इच्छापूर्ती झाली होती. आणि दोनच दिवसांनी त्याच्या वडीलांचा पहाटे पांच वाजता फ़ोन आला, 'शेखर गेला' !
दुसऱ्यासाठी झगडणारा, मदतीला सतत धावणारा, वेळप्रसंगी पुढचा विचार न करता सढळ हाताने आर्थीक मदत करणारा आणि त्याच्या चुकीवर कितीही ओरडले तरी एका शब्दाने उलटून न बोलणारा, सदैव धडपड करतांना दिसणारा आमचा शेखर शेवटची लढाई लढून आता शांत झाला होता.
-प्रा मं.गो. राजाध्यक्ष
Sir, it is very well quoted and written. I am sanjana Ghag , the niece of dada mama (Chandrasekhar salvi) . I always had him as my inspiration in the field of art and I am trying to maintain his legacy being in an artist , of course not exactly pro like him but trying to walk his footsteps Although I was there in JJ school of arts for a year and shifted to the NIFT and completed my bachelors
ReplyDeleteसर, तुमच्या बद्दल मी काय सांगणार, तुमचा सहवास मला जास्त काळ लाभला नाही पण तुमच्या आशीर्वादाच्या रुपात तुमची मुलगी मला माझ्या आयुष्यात अर्धांगिनी म्हणून लाभली, हाच तुमचा मला मिळालेला आशीर्वाद, तुमची कीर्ति खुप ऐकली पण ती प्रत्यक्ष अनुभवता आली नाही, हे माझ कम नशीब आणि तुमच्या परिवारचा एक मला भाग होता आला हा मी माझ नशीब समजतो. तूमचा आशिर्वाद असाच आमच्या वर् असुदया ही प्रार्थना🌷
Delete