Posts

आमचा मिठू

Image
काल आमचा मिठू देवाघरी गेला. मिठू हा आमचा लाडका पोपट. तब्बल गेली पंचवीस वर्षे आमचे क्षण आनंदी करीत होता. मिठू हा मी जे.जे.चा डीन असतांना जेव्हां मी तेथिल डीन बंगल्यात रहात होतो, त्यावेळी म्हणजे १९९८ साली जन्मलेला. भर मुंबईत असूनही एखाद्या हील स्टेशनवर असल्याप्रमाणे भरगच्च झाडीने व्यापलेले आमचे जे.जे. कॅम्पस. आजूबाजूला सभोवार केवळ सिमेंटचे जंगल. त्यामुळे आमच्या आवारात सर्वच पक्षांचा वावर सुरु असे. त्यातही कावळ्यांनी जायबंदी केलेले अनेक पक्षी माझी पत्नि मलमपट्टी करून बरे झाल्यावर सोडून देत असे. त्यामुळे आमच्याकडे घार, कोकीळा, पोपट, घुबड, पाणकोंबडी खंड्या एवढेच काय, पण घोरपड देखील राहून गेली आहे. शिवाय दुर्मिळ असा पांढरा कावळा देखील हजेरी लावून आम्हांला प्रसीद्धी मिळवून देऊन गेला. असाच आमचं हा मिठू. नुकताच जन्मलेला, कावळ्यांनी टोचून घरट्यातून खाली पाडलेला. पूर्ण पिसेही अंगावर आली नव्हती. आणि तेथील एका शिपायाचा मुलगा त्याला आमच्याकडे घेवून आला. का कोण जाणे? त्याला पहाताच आम्हांला त्याच्याशी कांही ऋणानुबंध असल्याचे जाणवले.   त्त्याला सांभाळावे अशी मनोमन इच्छा मनांत निर्माण झाली. हळू...

ओंकार साकारणारा गुरु : प्रा. नागेश साबण्णावर

Image
जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील त्याकाळातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाणारा तो काळ. तेथील  एकेक शिक्षक हा आपापल्या क्षेत्रात निपुण असे. मी नुकताच अध्यापक म्हणून उपयोजीत कला संस्थेत लागलो होतो. आमचे कला संचालक दादासाहेब आडारकर हे नुकतेच निवृत्त होऊन त्याजागी थोर चित्रकार माधवराव सातवळेकर आले होते. शासनाची अनेक कलात्मक कामे तेंव्हा आमच्या संस्थेकडे येत असत. आणि त्या गरजेनुसार कला संचालकांकडून ती त्या त्या विभागाला देण्यात येत असत. माझ्या वाट्यालाही अशी बरीच कामे येत असत. व त्या निमित्ताने इतर विभागातील शिक्षकांच्याही भेटी होत असत. ओळखी होत असत अन काहीजणांशी जवळीक देखील साधत असे. यामध्ये पळशीकर होते, परब होते, सोलापूरकर होते, सोनावडेकर होते. पण एक नांव त्यात आवर्जून घ्यावे असे होते व ते म्हणजे प्रा. नागेश साबण्णावर. रे आर्ट वर्कशॉप मधील कला व हस्त व्यवसाय या विभागाचे विभाग प्रमुख. नागेश भिमराव साबण्णवार सरांचा जन्म बेळगांव जिल्ह्यातील सौंदत्ती या गांवी १७ जून १९२५ साली झाला. बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या साबण्णावर यांना कर्नाटकातील मंदिरामधील शिल्पे पाहण्यात, ती अभ्यासण्यात खूप रस होता. दुर्दै...

माझे वडील कलाकार होते :

Image
  माझे वडील गोविंद गजानन राजाध्यक्ष. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. कारण त्यांचे भाचे त्यांना मामा असे म्हणत व आम्ही त्यांच्या पुढेच लहानांचे मोठे झालो त्यामुळे आम्ही सर्वानी तेच पुढे चालू ठेवले. तेच आमच्याही अंगवळणी  पडले होते. बाहेरील जगात ते बाबुराव म्हणून ओळखले जात. मला मामा आठवतात ते वयाच्या साधारण चवथ्या वर्ष्यापासून. त्या वेळच्या बेळगावातील चंदगड तालुक्यातील कारवे या बेळगावापासून बारा मैलावर असलेल्या गावी माझा जन्म झाला. शेतीवाडी भरपूर असलेल्या सुखवस्तू घरात.  संपूर्ण आंब्या फणसानी लगडलेले, ऊस भात यांनी मोहरलेले असे गांव, कुणालाही हेवा वाटावा असे.  पण मला आठवायला लागले  ते आम्ही बेळगावात स्थायिक झालो तो काळ. कारण ते शहर होते. कारव्याचे घर नाना कुलकर्णी म्हणून होते ते सांभाळत होते. आम्ही चार भाऊ व तीन बहीणी असे आमचे कुटुंब होते. मी सर्वात लहान. शेंडेफळ. माझी आई मी अगदी लहान असतांनाच  वारली. तिला पाहील्याचेही मला आठवत नाही अथवा आमच्या घरी तीचा एखादा फोटोही नव्हता. त्यामुळे ती कशी दिसत होती तेही मला माहीत नाही. मात्र आई वारल्यानंतर वडीलांनी आम्हांला बेळग...

 झाकोळलेले कलावंत: जॉन लॉकवुड किपलींग

Image
  कला, साहीत्य, काव्य या क्षेत्रांचा एकमेकांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. साहीत्य-काव्य या प्रकारांना मुखपृष्ठ, बोधचित्रे या प्रकाराने नटवून कलाकार ते अधीक वाचनीय करतो. पण  साहित्याचे क्षेत्र व वाचक संख्येने अधीक असल्याने त्यांचे नांव सर्वतोमुखी होते. त्या तुलनेने कला क्षेत्र मर्यादीत असते. तिच्या निर्मितीचा आनंद प्रत्येक रसीक अनुभवतो. पण तरीही कित्येकदा त्यामागील कलाकार मात्र तितकासा प्रसिद्धीला येत नाही. किंबहुना साहित्यिक पुढील कित्येक पिढ्या आपल्या लेखनाद्वारे ज्ञात असतो. पण कलाकार त्याच्या कलाकृती अमर असूनही कित्येकदा विस्मृतीत जातो.   अशीच एक पिता पुत्राची जोडी कला व साहीत्य क्षेत्रात अजरामर झाली. तीही जन्माने ब्रिटिश असूनही भारतीय संस्कृतीशी त्यांचे नाते जुळले. हे पिता पुत्र म्हणजे जगप्रसीध्द साहित्यिक- कवी, नोबेल पारितोषिक विजेते रुडयार्ड किपलिंग व त्यांचे वडील नामांकीत चित्रकार-कला शिक्षक, वास्तुविशारद, शिल्पकार जॉन लॉकवुड किपलिंग हे होत! या लॉकवुड किपलिंग यांचे भारतातील आगमनही मोठे आश्चर्यकारक होते. अंगी विविध कला असणाऱ्या लॉकवुड यांचा जन्म १८३७ सालचा. त्यांच्या व...

'बॉंबे स्कुल' कला परंपरेतील स्त्री चित्रकार : एक अभ्यासपूर्ण कला विषयक पुस्तक

Image
  नुकतेच श्रीमती साधना बहुळकर यांनी लिहीलेले ' बॉंबे स्कुल कला परंपरेतील स्त्री चित्रकार' हे कला विषयक पुस्तक वाचनात आले, आणि ते संपूर्ण पुस्तक वाचताना मला त्या काळातील चित्रकारांच्या जगात घेऊन गेले. साधना बहुळकर या मूळच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थीनी. त्यांना चित्रे काढतानाच या चित्र परंपरेचा अभ्यास करण्याची  विलक्षण ओढ होती. त्यामुळे त्या अंगानेही त्या प्रगल्भ होत गेल्या. त्यांचा विवाह झाला तोही विख्यात चित्रकार श्री सुहास बहुळकर यांच्याशी. यामुळे त्यांच्या अभ्यासू मनाला शिक्षकी खतपाणी मिळणे हे ओघानेच आले. आपल्या आयुष्यात साधनाताईंनी अनेक भुमिका वठवील्या. चित्रकार त्या होत्याच, शिवाय प्रख्यात वृत्तपत्रे, नियतकालिके यातून चित्र समीक्षण त्या करीत असत. कांही काळ त्यांनी ॲनीमेशन फिल्मसाठी सहाय्यक चित्रकार म्हणून कार्यरत राहिल्या. कला समीक्षक म्हणून त्यांनी आपली कर्तबगारी दाखवली. अर्थात मी त्यांना त्यांचा सुहास बहुळकर यांच्याशी विवाह होण्यापूर्वीपासून त्या साधना खडपेकर असल्यापासून ओळखत होतो. आमच्या उपयोजीत कलेच्या कांही उपक्रमावर देखील त्यांनी त्याकाळात नवशक्तीमधून ले...

दीनानाथ दलाल- चित्र आणि चरीत्र

Image
  २५ तारखेला दुपारी कुरिअरवाल्याने एक जाडजूड पार्सल आणून दिले. इतके व्यवस्थीत आणि नीटनेटके पार्सल उघडून पाहील्यावर आतून निघाले ते राजहंस प्रकाशनाचे एक नवीन प्रकाशन ' दीनानाथ दलाल -चित्रं आणि चरित्र' हे सुहास बहुळकर यांनी लिहीलेला आणि राजहंस ने प्रकाशीत केलेला ग्रंथ. वास्तवीक दलाल हे आमच्या लहानपणापासून आमच्या आवडीचे चित्रकार. तो काळच असं होता की मुळगांवकर आणि दलाल या दोघा कलाकारांनी समस्त मराठी घरातील माणसांना आपसात वाटून घेतले होते. आणि चित्रकलेचा ओढा लागण्याचे काम मुळगावकरांची मनमोहक सौंदर्ययुक्त चित्रे करीत असत, अन जरा चित्रकलेतील कळू लागले की आपोआप सर्वजण दलालांकडे वळत असत. त्यांची रंगीत चित्रे आम्ही त्यावर चौकोन आखून मोठी कॅनव्हासवर मोठी करून ऑइल पेंट मध्ये करण्याचा प्रयत्न करीत असू. एवढे त्यावयात आमच्यात दलाल भिनले होते. त्यांची प्रसीद्ध झालेली सर्वच चित्रे आम्ही अंकातून कापून व्यवस्थीत जपून ठेवीत असू. पुढे जे.जे.मध्ये शिकायला आल्यावर केनेडी ब्रिजवरून जातांना पहील्या मजल्यावरील त्यांच्या स्टुडिओवरील 'दलाल आर्ट स्टुडीओ' ही दिमाखदार पितळी पाटी दिसत असे. वाटे की कधीत...