'बॉंबे स्कुल' कला परंपरेतील स्त्री चित्रकार : एक अभ्यासपूर्ण कला विषयक पुस्तक

 


नुकतेच श्रीमती साधना बहुळकर यांनी लिहीलेले ' बॉंबे स्कुल कला परंपरेतील स्त्री चित्रकार' हे कला विषयक पुस्तक वाचनात आले, आणि ते संपूर्ण पुस्तक वाचताना मला त्या काळातील चित्रकारांच्या जगात घेऊन गेले. साधना बहुळकर या मूळच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थीनी. त्यांना चित्रे काढतानाच या चित्र परंपरेचा अभ्यास करण्याची  विलक्षण ओढ होती. त्यामुळे त्या अंगानेही त्या प्रगल्भ होत गेल्या. त्यांचा विवाह झाला तोही विख्यात चित्रकार श्री सुहास बहुळकर यांच्याशी. यामुळे त्यांच्या अभ्यासू मनाला शिक्षकी खतपाणी मिळणे हे ओघानेच आले. आपल्या आयुष्यात साधनाताईंनी अनेक भुमिका वठवील्या. चित्रकार त्या होत्याच, शिवाय प्रख्यात वृत्तपत्रे, नियतकालिके यातून चित्र समीक्षण त्या करीत असत. कांही काळ त्यांनी ॲनीमेशन फिल्मसाठी सहाय्यक चित्रकार म्हणून कार्यरत राहिल्या. कला समीक्षक म्हणून त्यांनी आपली कर्तबगारी दाखवली. अर्थात मी त्यांना त्यांचा सुहास बहुळकर यांच्याशी विवाह होण्यापूर्वीपासून त्या साधना खडपेकर असल्यापासून ओळखत होतो. आमच्या उपयोजीत कलेच्या कांही उपक्रमावर देखील त्यांनी त्याकाळात नवशक्तीमधून लेख लिहीले होते. त्यामुळे त्यांच्या टीकात्मक शैलीला मी आरंभापासून ओळखत होतो. कांही वर्षांपूर्वी जे.जे.स्कूल मधील चित्रांच्या दूरावस्थेसंबंधी त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून त्याला वाचा फोडली होती. त्याकाळात कला संचालक बाबुराव सडवेलकर कांहीसे दुखावले होते. पण पुढे हेच बाबुराव सुहास व साधना यांच्या गुणांशी एवढे समरस झाले, की बहुळकर यांच्याशिवाय त्यांचे कोणतेही काम पूर्णत्वास येत नव्हते. तेव्हापासूनच मला साधनाताईंची बेधडक वृत्ती, कामाचा धडाका मी ओळखून होतो. साधनाताईंनी दृश्य कला कोशाची सह संपादक म्हणूनही काम पाहीले. अश्या या चित्रकर्तीला कला क्षेत्रात चौफेर वावरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्याकाळात स्त्रियांचा या क्षेत्रात असलेला अत्यल्प सहभाग. आणि याचे उत्तर त्या स्वतःपाशी शोधायला लागल्या. आणि त्याला जोड मिळाली ती त्यांनी केलेल्या दृश्य कला कोशाच्या कामाची. त्यावेळी त्यांना अनेक नोंदी मिळाल्या, ज्यामुळे साधनाताईंच्या विचारणा पुष्टी मिळाली. त्यांना प्रकाशात आणण्याची ओढ निर्माण झाली.


ब्रिटिश अमदानींत जेंव्हा सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री ही संस्था सुरु झाली, तेव्हां हे कला शिक्षण पाश्चिमात्य धाटणीचे होते. त्यांच्या वास्तववादी शैलीत जसे दिसते तसे काढण्यावर भर होता. यात धार्मिक. पौराणिक, ऐतिहासीक अश्या चित्रांवर भर दिला जात असे. तसेच येथील संस्थानिक, राजे महाराजे हे पाश्च्यात चित्रकार-शिल्पकार यांना आमंत्रीत करून त्यांच्या करवी व्यक्तिचित्रे, शिल्पे बनवून घेत. राज दरबारी असे चित्रकार संस्थांनी चित्रकार म्हणून नेमले जाऊ लागले. अनेक संस्थानिकांनी अश्या होतकरू चित्रकारांना कला शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या. यातील कांही म्हणजे जे.जे.स्कुल मधून  शिक्षण घेतलेले आबालाल रहिमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडे राहीले. पंडीत श्रीपाद दामोदर सातवळेकर हे औंध संस्थानाशी निगडीत राहीले तर रामकृष्ण देऊसकर हे हैद्राबाद संस्थानात होते. अशा प्रकारचा राजाश्रय त्यांना मिळत गेला. त्यातून ही वास्तववादी शैली बहरत गेली. पण पुढे  चित्रे हा प्रकार केवळ राज घराण्याशी सिमीत राहीला नसून अभिरुची संपन्न धनीक वर्गात देखील त्याचा शिरकाव झाला. अश्या प्रकारे वास्तववादी काम करणाऱ्या दर्जेदार कला आविष्कृत करणाऱ्या चित्रकारांची परंपराच येथे निर्माण झाली. व ती 'बॉंबे स्कुल' अश्या नांवाने प्रचलीत झाली.


या स्त्री चित्रकारांच्या विचाराने साधनाताईंना इतके झपाटले की आतापर्यंतच्या कला प्रवासात त्याना स्त्रिया ह्या अल्प प्रमाणात या विषयात आलेल्या त्यांना जाणवल्या.  त्याच दरम्यान त्यांना एशियाटिक सोसायटीची 'रजनी दांडेकर' शिष्यवृत्ती मिळाली. जणू नियतीने देखील त्यांना मदत करण्याचे ठरवले होते. आणि साधनाताईंचा विषय पक्का झाला. ' बॉंबे स्कुल परंपरेतील स्त्री चित्रकार!' आणि त्यासाठी त्यांनी कालमर्यादा ठरवली १८५७ ते १९५० या दरम्यानची. नेमके २०१६ साली 'बॉंबे आर्ट सोसायटी'ला सव्वाशे वर्षे पूर्ण झाली होती. त्याचे सिंहावलोकनी प्रदर्शन व संस्थेच्या इतिहासावर पुस्तक असा भव्य दीव्य कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी सुहास बहुळकर यांनी अनेक कॅटलॉग जमा केले होते. त्यातूनही साधनाताईंना बहुमोल मदत होत गेली. याच कॅटलॉग्जचा बॉंबे स्कुल परंपरेतील स्त्री चित्रकारांचा मागोवा घेण्यासाठी एक साधन म्हणून उपयोग नक्कीच त्यांना झाला.  नंतर वेळ आली ती त्याकाळातील स्त्री कलाकार शोधून त्यांच्याविषयीची उपयुक्त माहीती, त्यांची चित्रे जमवण्याची. आणि नंतर सुरु झाली एक अथक पायपीट. जेथून कांही मिळेल असा आशेचा अंकुर दिसला की मग दुपारचे टळटळीत ऊन जरी असले, तरी साधनाताईंनी तेथे जाऊन ते पाहीले, मिळवले. त्याकाळातील कॅटलॉगमधील स्री चित्रकारांची नावे शोधून काढली. त्यांच्या चित्रांची यादी बनवली. आणि यातून साधनाताईंना काही नावे आढळली ती होती, विमल भागवत, मारी हेन्डरसन, मग्दा नाख्मन. यापैकी विमल भागवत या दुर्गाबाई भागवत यांच्या भगीनी होत्या. आणि मिळेल तेथून मदत घेत त्या त्याच्या तळाशी पोचून त्यांची माहीती घेत राहील्या . यापूर्वी जागतीक चित्रकार श्री माधवराव सातवळेकर यांच्यावर त्यांनी 'चित्रायन’ हे पुस्तक लिहीले होते. त्यावेळी सातवळेकरांची शिस्त आणि आदर  पाळून त्यांना लिखाणाची कसरत करावी लागे. पुढे या 'चित्रायन’ला धनंजय कीर स्मृती पारितोषिक प्राप्त झाले.


मारी हेंडरसन यांची केवळ तोंडओळख प्रा. प्रल्हाद धोंड यांच्या रापण वरून झाली होती. त्या सात्यत्याने बॉंबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाला चित्रें पाठवीत होत्या. रशियन चित्रकर्ती मग्दा नाख्मन हे नांव देखील कोणाच्या ऐकीवात नव्हते. इंटरनेटवर त्यांची कांही चित्रे पहायला मिळाली. माहीती देखील अल्पशी होती. आणि चित्रांचीही सत्यता पटवून घेणे आवश्यक होते. पण खूप प्रयास करून एशियाटिक सोसायटी, जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, कलाकारांच्या पुढील दोन पिढ्यातील त्याचे वंशज अशातून सत्य अशी माहीती त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवली. आणि ती त्यांनी  सत्यतेच्या कसावर पारखून घेतली. आणि संशोधनात्मक कामानंतर साधनाताईंनी पांच स्त्री चित्रकार निवडल्या . त्या होत्या रशियन चित्रकार मग्दा नाख्मन (१८८९). अँग्लो इंडियन चित्रकार मारी हेंडरसन ( १९०८), अँजेला त्रिंदाद (१९०९), अंबिका धुरंधर (१९१२), विमल भागवत-गोडबोले (१९१३), आणि याशिवाय सहावी अमृता शेरगील (१९१३). वास्तविक अमृता शेरगील ह्या या मालीकेत बसणाऱ्या नाहीत. एकतर त्यांचे स्वतंत्र  व्यक्तिमत्व, शिवाय त्यांची चित्रे ही 'बॉंबे स्कुल'चे प्रतिनिधीत्व करणारी नाहीत. पण पण समकालीन कला क्षेत्राचा वेगळी दिशा देणारी असल्याने लेखिकेने त्याच्यावर एक स्वतंत्र प्रकरण लिहीले आहे. अमृता शेरगील सारख्या उच्च श्रेणीच्या चित्रकर्तीला स्त्री पुरूष या भेदभावात कोणी मोजूच शकणार नाही एवढ्या कर्तबगार कलाकार होत्या त्या. त्यांचे उच्च कला शिक्षण देखील पॅरीस सारख्या ठिकाणी झाले. तेथे त्यांनी परिश्रमपूर्वक शिक्षण घेतले. अनेक इझम अभ्यासले. तेथील गॅलरीमधून अनेक चित्रे पाहीली. आणि ते कलात्मक वातावरण त्यांच्या व्यक्तीमत्वात सामावत गेले. व त्यांचे कलाजीवन समृद्ध होत गेले. अश्या अमृतावर संपूर्ण असे स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल. आणि हे सर्व मान्य करूनच लेखिकेने त्यांचा समावेश आपल्या पुस्तकांत केला आहे. आणि ऐतिहासीक बाब म्हणून ते आवश्यक देखील आहे. आज दुर्दैवाने अश्या प्रकारच्या नोंदी खुद्द सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्येही उपलब्ध नाहीत. त्यामुळे साधनाताई बहुळकर यांनी हे केवळ चित्रकला क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण साहीत्य क्षेत्रावर केलेले अनंत उपकार आहेत.


वास्तविक आपल्या त्याकाळातील पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री शिक्षण हे अभावानेच होत असे. त्यातूनही कला शिक्षण तर अतर्क्यच होते. स्त्रियांमध्ये बहुदा कलागुण हे नैसर्गिकच असतात. रांगोळी, कशिदा, शिवणकाम, भरतकाम अश्या कलात्मक गोष्टींमध्ये स्त्रिया ह्या निपुण असतात. तेही कोठेही कला शिक्षण न घेता. त्या जर का जे.जे. स्कूल कडे वळल्या असत्या तर कदाचित त्यामुळे त्यांच्या कला वाढीला लागल्या असत्या. पण स्त्रिया ह्या तेवढ्यापुरत्या आहेत हीच विचारधारणा घरोघरी असे. यातून ॲंजेला त्रिंदाद व अंबिका धुरंधर ह्या जे शिकल्या त्या त्यांचे वडील नामांकीत चित्रकार होते. ते उदारमतवादी होते. आणि एक महत्वाचा दुवा म्हणजे त्रिनिदाद व धुरंधर हे दोघेही जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिक्षक होते. साहजिकच त्यांच्या कन्येमध्ये ती कला उतरणे, त्यांना वडिलांचे प्रोत्साहन मिळणे हे सहाजिकच होते. अमृता शेरगील देखील याच पठडीतील.    पण अश्या कैक स्त्रिया होत्या त्या केवळ जुनाट परंपरेमुळे पुढे हे शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. अन्यथा त्या देखील प्रतिथयश चित्रकार म्हणून गणल्या गेला असत्या.


साधनाताईंनी ह्या पुस्तकात चित्रकार महिलांची माहीती देतांना केवळ सर्वसाधारण अशी जुजबी माहीती न देता त्यामध्ये त्या चित्रकर्तीची कौटुंबीक पार्श्वभूमी, त्यांचे कलाशिक्षण, कलाभीव्यक्ती, त्यांचा कला प्रवास, चित्र आवीष्कृती, आणि त्यांची चित्रं शैली याविषयी सांगोपांग विवरण केले आहे. त्यांची त्या कालखंडातील चित्रे मिळवून त्यांचे अभ्यासपूर्ण समीक्षण केले आहे, हे या पुस्तकाचे एक खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यामुळे कोणाही चित्रकारांच्या अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण अश्या माहीतीसाठी या पुस्तकाचा वापर होऊ शकेल.


यातील अंबिकाताई उर्फ अंबुताई धुरंधर या तर आजच्या पिढीतील अनेकांना माहीत असलेल्या चित्रकार. वडीलांच्या नांवाचा त्यांना खूप उपयोग झाला असणार. विशेषतः त्यांच्या वडीलांच्या ओळखी बऱ्याच मोठ्या लोकांशी, संस्थानीकांशी होत्या. त्यामुळे अंबिकाताईंनाही त्याचा लाभ मिळाला. त्यांचे वडील रावबहादूर धुरंधर हे जे.जे.चे हंगामी संचालक असताना ते जे.जे.च्या आवारात रहात असत. त्यामुळे अंबुताईना ते कलात्मक वातावरण तसे नवीन नव्हते. खार येथे लिंकिंग रोडवर असलेला धुरंधरांचा बंगला 'अंबा सदन’ यात दिल्ली येथील सेक्रेटरीएट व व्हाइसरॉय हाऊस येथील सजावटीचतील पेंटींगच्या कामापैकी एक पेंटींगचे काम धुरंधरांना मिळाले होते, ते खारच्या बंगल्यात तयार होऊन दिल्लीस नेण्यात आले होते. सोळाव्या वर्षी अंबुताईना आपल्या वडीलांना मदत करण्याची संधी मिळाली होती हे त्यांना महत्वाचे वाटत होते. जेव्हां कला संचालक बाबुराव सडवेलकर यांनी महाराष्ट्र राज्यासाठी चित्र संग्रह जमा करण्यास सुरुवात केली, तेव्हां धुरंधरांची काही चित्रे, स्केचेस विकत घेण्याचे ठरले.  तेव्हां  बाबुरावांसोबत मीही दोन तीन वेळा तेथे गेलो होतो. सदर रस्त्याचे नावंच ‘चित्रकार धुरंधर मार्ग’ ठेवण्यात आले आहे. तेव्हां धुरंधरांची व्यवस्थीत नोंदी करून ठेवलेली असंख्य स्केचेस, चित्रे हा खजीना त्यारूपाने मला पहावयास मिळाला. शिवाय पाठारे प्रभू लोकांचे आदरातिथ्य तसेच त्याचे निरनिराळे फराळाचे पदार्थ खाण्याची संधी अंबुताईंमुळे  मिळाली. तेथे पहील्या मजल्यावरील एका खोलीच्या छताला एक ॲाईल पेंटींगमधील धुरंधरांचे चित्र चिकटवले होते.


या वास्तूत धुरंधरांच्या चित्रांचे कलासंग्रहालय करण्याची अंबुताईंची योजना होती. त्यामध्ये या चित्रालाही स्थान मिळावे ही त्यांची इच्छा होती. खारच्या लिंकींग रोडवरील 'अंबा  सदन' पाडून तेथे एक भव्य इमारत उभारण्याची कल्पना धुरंधर कुटुंबीयांनी घेतली होती. व हे छतावरील चित्र काढणे शक्य नव्हते. शेवटी जेथे सर्वांचे प्रयत्न संपतात तेथे सुहास बहुळकर कामी येतात, ही भावना असल्याने शेवटी सुहासकडे ते काम आले. चित्र, त्यातही पुरातन, म्हटले की सुहास त्यांना प्राणापलीकडे जपत असतो. सुहासचे काम सुरु झाले. बांबूची परात बांधून त्यावर फळ्या घालून त्यावर उभे राहून सुहासचे काम सुरु होते. आणि एक दिवस वरून पडून त्याचा हातही मोडला. हॉस्पिटलमधून परत येतांना प्रथम सुहास अंबासदन येथील त्या कामावर गेला. हात बांधलेल्या स्थितीत सुहासने ते चित्र काढून वाचवले. पुढे ती वास्तू पाडण्यात आली. तेथे नवीन इमारत उभी राहीली. अंबुताई तेथील एका फ्लॅटमध्ये राहू लागल्या. नंतर बहुळकर कुटुंबीयांना कळले की, सुहासला तीन महीने जायबंदी करणारे ते म्युरल नव्या वास्तूत येण्यापूर्वीच विकले गेले होते. धुरंधरासाठी तेथे होणाऱ्या संग्रहालयात ते चित्र प्रदर्शीत व्हावे ह्या सद्भावनेने सुहासने ते वाचवले होते, पण शेवटी कलेपुढे पैशाचे मोल अधीक ठरले.


बॉंबे स्कुलच्या परंपरेतील या पांच महीला कलाकारांना साधनाताईंनी मोठ्या कल्पकतेने एकत्र गुंफले आहे. त्यांच्या कलाप्रवासाचा अभ्यास करून तो कलाप्रेमींपुढं ठेवला आहे. एका अंधुकश्या कालखंडाला प्रकाश दाखविण्याचा यशस्वी प्रयोग लेखिकेने केला आहे.

आज मराठी भाषेत अश्या पुस्तकांची नितांत गरज आहे. एकतर असे लिहीणारे अभ्यासू बरेच कमी आहेत. जे आहेत त्यांच्या उपयोग समाजाने करून घेतला पाहीजे. आणि प्रकाशीत झालेली पुस्तकें रसिकांपर्यंत पोचली पाहीजेत. आणि साधनाताई बहुळकर यांनी हे शिवधनुष्य मोठ्या जबाबदारीने पेलले आहे. कला या विषयावर त्यांनी विविध माध्यमातून विपुल असें लेखन केले. अनेक कलाकारांच्या कॅटलॉग साठी माहितीपूर्ण लेख लिहीले. थोर चित्रकार के.के.हेब्बर, एन.एस.बेंद्रे, प्रभाकर बर्वे, शिल्पकार नारायण सोनावडेकर अश्यांच्या मुलाखती घेतल्या.अनेक चित्रांवर रसग्रहणात्मक लिखाण केले. व एवढा अभिरुचीपूर्ण अनुभव पाठीशी घेऊन त्यांनी आता बॉंबे स्कुल कला परंपरेतील स्त्री चित्रकार, यासारखा विषय घेऊन तोही तितकाच अभ्यासपूर्ण रीतीने मांडला आहे. आणि त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत, हे नक्कीच प्रशंसनीय आहे! तसेच या पुस्तकाला राजहंस प्रकाशनाने प्रकाशीत करून त्याला एक आकर्षक असे रूप दिले आहे. शिवाय या पुस्तकाच्या अखेरीस दिलेली नामसुची मराठी पुस्तकात प्रथमच येत आहे. याचे श्रेय साधनाताई देतात राजहंस प्रकाशनाला व ते तयार करण्याचे शिल्पा सबनीस व त्यांच्या पतीना!  

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
rajapost@gmail.com




Comments

  1. Bet365 vs Betway - Sports & Markets | MapYRO.com
    bet365. 출장안마 Place your bet now and receive the bonus. Bet jancasino on many of the sports markets. We have a 메이피로출장마사지 broad 온라인 카지노 selection 토토사이트 of football, horse racing, soccer, basketball,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…