ओंकार साकारणारा गुरु : प्रा. नागेश साबण्णावर




जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील त्याकाळातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाणारा तो काळ. तेथील  एकेक शिक्षक हा आपापल्या क्षेत्रात निपुण असे. मी नुकताच अध्यापक म्हणून उपयोजीत कला संस्थेत लागलो होतो. आमचे कला संचालक दादासाहेब आडारकर हे नुकतेच निवृत्त होऊन त्याजागी थोर चित्रकार माधवराव सातवळेकर आले होते. शासनाची अनेक कलात्मक कामे तेंव्हा आमच्या संस्थेकडे येत असत. आणि त्या गरजेनुसार कला संचालकांकडून ती त्या त्या विभागाला देण्यात येत असत. माझ्या वाट्यालाही अशी बरीच कामे येत असत. व त्या निमित्ताने इतर विभागातील शिक्षकांच्याही भेटी होत असत. ओळखी होत असत अन काहीजणांशी जवळीक देखील साधत असे. यामध्ये पळशीकर होते, परब होते, सोलापूरकर होते, सोनावडेकर होते. पण एक नांव त्यात आवर्जून घ्यावे असे होते व ते म्हणजे प्रा. नागेश साबण्णावर. रे आर्ट वर्कशॉप मधील कला व हस्त व्यवसाय या विभागाचे विभाग प्रमुख.

नागेश भिमराव साबण्णवार सरांचा जन्म बेळगांव जिल्ह्यातील सौंदत्ती या गांवी १७ जून १९२५ साली झाला. बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या साबण्णावर यांना कर्नाटकातील मंदिरामधील शिल्पे पाहण्यात, ती अभ्यासण्यात खूप रस होता. दुर्दैवाने आपल्याकडे अशी शिल्पे फारशी जपली गेली नाहीत, अथवा त्यांचे दस्तावेजीकरण झाले नाही याचे त्यांना दु:ख होई. तरीही त्यात कार्ल खंडालवाला भरत अय्यर, डॉ. कपीला वात्सायन अश्यानी भरीव कार्य  केले आहे त्याचा त्यांना आनंद होत असे. कांही शिल्पीनी, शिल्पकारांनी आपल्या हाताचे कौशल्य वापरून अश्या गोष्टींचा वारसा जपण्याचे कार्य केले आहे. पुढे १९४२ सालच्या सुमारास जे.जे.स्कुल मधील कला व हस्त व्यवसाय शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. तेथे त्यांचे शिक्षक होते पुट्टस्वामी. मूळ कारागीरांच्या घराण्यातील शिल्पी असल्याने शिल्पकला कारागिरी त्यांच्या अंगात भिनली होती. पेंटींगचे शिक्षण त्यांनी त्यावेळचे नावाजलेले चित्रकार दंडवतीमठ यांच्याकडे केले. त्यांच्या सोबत जे.जे.चे सुखडवाला देखील होते. मेटल एम्बॉसिंग विषयाची पदविका १९४५ साली त्यांनी प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन मिळवली. त्याच सोबत १९४८ साली साबण्णवारांनी पेंटिंगची पदवीका मिळवली. ड्रॉईंग हा विषय साबण्णवारांचा खास आवडीचा विषय होता. त्याची त्यांनी जोपासना केली व त्या विषयात प्रावीण्य मिळवले. पुढे १९४८ मध्ये नागेश साबण्णवार हे कला व हस्तव्यवसाय या विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि पुढे ते 'नागेश मास्तर' म्हणून प्रसीद्ध झाले. त्या काळात शिक्षकांना मास्तर म्हणून संबोधणे हे एक आदराचे संबोधन असे.

 


साबण्णवार सर हे कोणावर चटकन छाप टाकतील असे व्यक्तीमत्व नव्हते. वर्णाने काळ्या गडद रंगात  जमा होणारे, बुटकेशे, आवाज थोडासा अनुनासीक व करडा भासणारा, डोळ्यावर चष्मा आणि सतत नाकात तपकीर घालणारे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. आणि त्यांची शिस्त व दरारा देखील तसाच होता. पण एकदा का बोलायला लागले की त्यांच्या वाणीतून ज्ञानाचे अमृत ओसंडू लागत असे. कला, कलाकार यांच्याविषयी त्यांचे ज्ञान केवळ अबोध होते. तसे ते कोणाच्या पुढे पुढे कधीच करत नसत. अगदी कामासाठीच अधिष्ठाता अथवा इतर वरिष्ठाकडे ते जात. एरवी सर्वच त्यांच्या केबीनमध्ये येत असत. मास्तरांना विद्यार्थी दशेत असताना तसेच पुढे अध्यापक म्हणून काम करताना जोडीदार मिळाले ते प्रा. विश्वनाथ सोलापूरकर हे कर्नाटकातील त्यांचे मित्र. दोघांची मैत्री अजोड अशी होती. विद्यार्थी असताना साबण्णवार व सोलापूरकर ही जोडी कर्नाटकातील दुर्लक्षीत अश्या मंदिरातील शिल्पे व मुर्त्या पहाण्यास भटकत असत. प्रत्येक भागातील अजोड अश्या सौन्दर्याकृतीची कारागिरी, त्यातील कोरीव काम पाहून त्याचा अभ्यास करीत असत. एकेकाळी भव्य असे मंदीर असलेल्या देवालयाचे भाग संस्मरणीय असे स्मारक बनल्याचे त्यांच्या दृष्टिपथास येई. अश्यातच एकदा त्यांना गदग जवळील लककुंडी गांवात एक खेडुताच्या घरी चुलीला भांडे ठेवण्यासाठी म्हणून सुंदररीत्या कोरीवकाम केलेली कांही देवतांची मस्तके वापरात असल्याची दिसली. तेथील कांही पडीक देवालयाच्या भिंतीदेखील थोडक्यात घर बांधण्यासाठी वापरात आणल्या होत्या. स्वातंत्र्यानंतरही अशी भीषण असंस्कृत परिस्थीती पाहून त्यांच्या तळ पायाची आग मस्तकात जात असे.

क्राफ्ट विभागात मास्तर केवळ पारंपारिक शिक्षण देत नसत. वास्तवीक क्राफ्ट अथवा कारागिरी हे कौशल्य पारंपारीक पिढ्यानपिढ्या चालत येत असते. पण नागेश मास्तरांना ते मंजूर नव्हते. बापाकडून मुलाकडे वारशाने येणारी पारंपारीक कला त्यांना मंजूर नव्हती. म्हणून त्यांनी मेटलमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले. त्यातून निरनिराळी टेक्चर्स मिळवली,  जे आतापर्यंत मेटल क्राफ्ट विभागात कधीच झाले नव्हते. त्यांच्या विद्यार्थीदशेत जे.जे.चे भूषण असलेले प्रा. धोंड मास्तर हे कला शिक्षक- प्रशिक्षण विभागाचे मुख्य होते. त्यांना जेव्हां हा विद्यार्थी नजरेस आला. आणि तो जेव्हां मेटलवर काम करताना त्यांच्या पहाण्यात आला, तेव्हां त्यांना त्याच्यातील हुशारी दिसली. पुढे १९५८ साली जेव्हां धोंड मास्तर जे.जे.चे अधिष्ठाता झाले, तेव्हां ते प्रत्येक वर्गातून फेरी मारीत असत, त्यावेळी हा गडद रंगाचा मुलगा नेहमी आपल्या वर्गांतील मुलासोबत काम करताना दिसून येत असे. आणि येथून धोंड मास्तरांची त्यांच्याशी जवळीक वाढली. धोंड मास्तर साबण्णवाराना नावाने कधीच बोलत नसत. ते त्यांना 'आण्णा' असे संबोधीत. आणि त्यातूनच त्यांचे जवळीकेचे नाते जुळले. 

 


'कला-हस्तव्यवसाय विभागांत काम करतांना त्यांना कधी जास्त बोलतांना कोणी ऐकले नाही. किंवा स्वतःचा बडेजाव त्यांनी कधी सांगीतला नाही. थोडेसे अबोल असलेले नागेश मास्तर स्वभावाने अतीशय नम्र आणि दुसऱ्याप्रती आदर व्यक्त करणारे होते. आपल्या पूर्वयुष्यात त्यांनी जी भटकंती केली, तपस्चर्या केली तें त्यांच्या पुढील कामातून त्यांनी स्वतःच्या खास अश्या शैलीने आविष्कृत करून कला वारशाला एक मानवंदना दिली. मास्तर केवळ पारंपारीक स्वरूपाचे काम करीत नव्हते, तर त्या कामाला आधुनिकतेची जोड देऊन त्यातून विविधता आणण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच असत. आपल्या कामातून त्यांनी सौंदर्य आविष्कार नेहमीच जपला. त्यांच्या हातातून घडलेली कलाकृती ही एकमेव अशी असे. अश्या या शिस्तप्रिय मास्तरांच्या हातात पेन्सील आली की जणू कागदाला सोन्याच्या कांडीचा स्पर्श झाल्याप्रमाणे त्यांचे काम सुरु होत असे. अनेक मेडल्स, ट्रॉफीज, देव देवतांच्या मुर्त्या, नाणी यांची संकल्पने व निर्मिती त्यांच्या कुशल बोटांच्या परीस स्पर्शाने घडलेली आहेत. त्यांनी बनवलेल्या प्रत्येक मूर्तीमध्ये त्यांचे कसब दिसून येते. त्या केवळ देव देवतांच्या मूर्ती म्हणून त्यांनी बनवल्या नाहीत तर सौंदर्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच ते घडवीत असत. आकाराचे सुलभीकरण, मनाला भुरळ घालणारी कलाकुसर, मूर्तीमंत सौंदर्य व शालीनता हे त्यांचे निर्मिती गुण होते. आणि या त्यांच्या आविष्कारामुळे सर्वच त्यांच्या कामाच्या मोहात पडत.

एकदा मास्तरांनी 'कीर्तिमुख' बनविले. त्याचे ड्रॉईंग, डायसाठी केलेले त्रिमिती मॉडेल व शेवटी धातूमध्ये बनवलेले कीर्तिमुख  हे पहाणे देखिल एक अप्रूपच होते. त्यावेळी किर्तीमुखाचे महत्व, ते कोठे अन कशासाठी वापरतात, त्यांचे प्रतीकात्मक स्वरूप सांस्कृतीक महत्व याची तपशीलवार माहीती मास्तरांच्याकडून ऐकायला मिळे. तेव्हां त्यांच्याकडे सांकृतिक आणी पौराणिक वारसा किती मोठ्या प्रमाणावर आहे याचे प्रत्यन्तर येत असे. आणि त्यांच्या या कलाविष्कारामुळे आणि अधिकारवाणीमुळे कलामहर्षी एस.एम. पंडीत यासारखे बुजुर्ग कलाकारही त्यांच्याशी स्नेहभावाने वागत.

 


नागेश मास्तरांच्या नशिबाने अनेक देव देवतांना घडवण्याचे भाग्य त्यांना लाभले. तेही कोठेही जाऊन न मागता. एकदा विख्यात नर्तक श्री पार्वतीकुमार यांना त्यांच्या गावांतील लोकांसाठी भवानी देवीची एक मूर्ती करून घ्यायची होती. त्याकाळात योग्य कलाकाराच्या शोधात असलेले कोणीही आमचे प्राध्यापक श्री दामू केंकरे यांच्याकडे येत. कारण एक तर त्यांचं मोठा लोक संग्रह आणि दुसरे म्हणजे समस्त कलाकार मंडळींशी असलेले केंकरेंचे स्नेहाचे संबंध. त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीच होते ते. पार्वतीकुमार केंकरेंना भेटले व केंकरे यांनी त्यांना साबण्णवार मास्तरांकडे पाठवले. ते साल होते १९७२. पार्वतीकुमारांनी आपली गरज सांगीतली व त्यांना याचे पैसे किती होतील ते विचारले. त्यावर मास्तर म्हणाले, पैसे नंतर सांगतो. प्रथम तांब्याचा पत्रा आणावा लागेल, त्यासाठी पाचशे रूपये द्या. तो ठोकून ही मूर्ती तयार होईल. एवढ्यावरच पार्वतीकुमारांनी ओळखले की आपली एका कलावंतांशी भेट झाली आहे. मास्तरांनी या कामासाठी जे. जे.मधून कांही दिवसांची रजा काढली व ते त्यांच्या दादर येथील डॉ. आंबेडकर मार्गावरील मोहन मनोर या इमारतीच्या दोन खोल्यांच्या जागेतील बाल्कनीत काम करू लागले. तांब्याच्या पत्र्याला राळेवर ठोकून त्यांनी मूर्ती बनवायला सुरुवात केली. पहीला ठोका मारला आणि आणि त्यांची तब्येत खूष झाली. मूर्ती छान होणार याची त्यांना त्या ठोक्यातच पावती मिळाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मास्तरांचं काम चालायचं. पत्र्यावर थोडं ठोकायचं, पत्रा काढायचा, पुन्हां बसवायचा, पुन्हां ठोकायचा असा कार्यक्रम सुरु होता. हळूहळू मूर्ती आकार घेऊ लागली. नाक, डोळे जाणवायला लागले. आणि एक दिवस सांबांनवर मास्तर म्हणाले, देवीच्या कुंकवासाठी सोनं हवंय. तिचा तिलक सोन्याचा करायचा आहे. दुसऱ्या दिवशी पार्वतीकुमारांनी घरातील सल्ल्याचा आठेक ग्रामचा तुकडा तोडून आणला. थोड्या दिवसांनी कुंकवाच्या ठिकाणी सोनं बसवलं आणि त्याबरोबर देवीच्या मूर्तीला एक शोभा आली. देवी प्रसन्नपणे हसते आहे असे वाटू लागले. आणि तेव्हापासून पार्वतीकुमार व नागेश मास्तरांचे संबंध जिव्हाळ्याचे जडले.

कॉलेजचे काम सांभाळून मास्तरांचे काम सुरूच असायचे. रोज मूर्तीवर अधिकाधीक बारकावे करीत असत. भवानीची मूर्ती तयार झाली आणि त्यांनी ती पार्वतीकुमारांच्या हातात सोपविली. अगदी सुरुवातीलाच मास्तरांनी त्यांना विचारले होते की आपल्याला मूर्ती कशी हवी?  तेव्हां पार्वतीकुमार म्हणाले होते, 'मूर्ती अशी असावी की तिच्याकडे पाहील्यावर ती बाई दिसता कामा नये, आई वाटावी.' आणि अक्षरश: मास्तरांनी त्याप्रमाणेच मूर्ती घडवली. त्यानंतर कांही दिवसांनी पार्वतीकुमार त्यांना घेऊन आपल्या गांवी देवीची मूर्ती बघायला घेऊन गेले.  तें पहातच राहीले, आणि म्हणाले 'मला नाही वाटत मी इतके छान काम करू शकेन. ती माझ्याशी बोलते आहे.

 


साबण्णवार यांनी अनेक शिष्य घडवले. अनेकांना नांवारूपाला आणले. त्यांच्या लहानश्या रहात्या जागेत अनेक शिष्य त्यांच्याकडे शिकायला येत. कांही तर पुणे, बेळगांव येथूनही येतं असत. धातुकाम एम्बॉसिंग हा एक प्रकार असतो. त्यामधे मास्तरांनी विशेष नैपुण्य मिळवले होते. त्यामुळे या क्षेत्रात मास्तरांनी स्वतःचे असे खास स्थान निर्माण केले होते. सोने, चांदी, तांबा, पितळ अश्या विविध धातूंवर अस्सल भारतीय कलाकौशल्याचा आविष्कार करण्याची जी परंपरा आपल्या देशात होती ती आजकाल दुर्मीळ झाली आहे. पण नागेश मास्तरांच्या कलाकौशल्याने आजही ती अस्तीत्वात आहे. आणि यामुळेच त्यांचा शिष्यगण वाढला. असेंच नावारूपाला आलेले त्यांचे एक शिष्य म्हणजे शिल्पकार नारायण सोनावडेकर. सोनावडेकर जे.जे.मध्ये शिकायला आले तेव्हां ते पेंटींग विभागात होते. पुढे कांही दिवस उपयोजीत कलेमध्ये राहीले.  नेमके कला क्षेत्रांतील कोणत्या विभागात आपण आपले नैपुण्य दाखवले पाहीजे हे त्यांना कळत नव्हते.  एकदा ते मास्तरांच्या मेटल क्राफ्ट विभागात गेले असता, तेथे मास्तर चांदीच्या पत्र्यावर उठावशिल्प करीत होते. सोनावडेकरांना त्यांची पद्धत अतीशय कौशल्यपूर्ण वाटली. मागील बाजूने ठोकून त्या सपाट पत्र्यातून उठाव शिल्प कसे तयार होते त्याचे प्रात्यक्षिकच होते ते! त्यानंतर मास्तरांनी सोनावडेकरांची माहीती विचारून घेतली. आणि एक दिवस त्यांनी सोनावडेकरांना त्यांच्या 'वीश्वकर्मा' या घराण्याविषयी सांगीतले. विश्वकर्मा कला व शिल्पकला या दोन्ही कलांमध्ये  सामावलेले असतात. त्यामूळे तू विश्वकर्मा घराण्यातील असल्यामुळे तू शिल्पकला शिक, असे त्यांनी सोनावडेकरांचे मन वळवले. हे गुरुशिष्याचे नाते १९६२ सालापर्यंत राहीले आणि पुढे सोनावडेकर तेथेच अध्यापक म्हणून लागले. आणि नात्याला नवीन मित्रत्वाचे नांव मिळाले. पुढें जेव्हां एस. एम. पंडीत यांना कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारक समितीने तेथे स्वामीजींचे पूर्णाकृती शिल्पं बनविण्यासाठी चांगल्या शिल्पकाराचा शोध घेण्यास सांगीतले तेव्हां पंडीतजींनी ही जबाबदारी साबण्णवार यांच्यावर सोपवली. व तत्क्षणी मास्तरांनी सोनावडेकरांचे नांव त्यांना सुचवले. सदर शिल्प हे पंडीतजीनी केलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुर्णाकृती पेंटींगवरून करायचे होते.  सोनावडेकरांनी त्यांची निवड किती योग्य होती हे त्यांनी कन्याकुमारी येथे स्वामीजींचे जे शिल्प उभे केले त्यावरून आपणास येऊ शकते.  त्यांनी स्वामीजींचे शांत, सात्विक पण करारी भावाविष्कार मोठ्या कौशल्याने आविष्कृत केले.

जरी सोनावडेकर अध्यापक म्हणून आले तरी त्यांच्या व मास्तरांच्या गुरु शिष्य नात्यातील घट्ट वीण गुंफली गेली होती. पुढे बाबुराव सडवेलकर कला संचालक पदावर आल्यानंतर बदली प्रकरणावरून जे.जे.स्कुल मध्ये कांही शिक्षकांनी त्यांच्या विरुद्ध संप केला. कांही दिवसानंतर हा संप मिटलाही. पण त्यावेळी त्याची परीणीती सोनावडेकरांनी १९७७ मध्ये राजीनामा देण्यात झाली. संस्थेतून जरी ते गेले, तरी स्कुल ऑफ आर्ट व साबण्णवार मास्तर यांच्यापासून त्यांनी कधीच फारकत घेतली नाही. माझे या दोघांशीही जिव्हाळ्याचे संबंध होते. मास्तरांनी कांही नवीन काम केल्याचे समजले की, मी त्यांच्या विभागात जाऊन ते पहात असे. त्यावेळी खिशातून आपली तपकिरीची डबी काढून त्यातील चिमूटभर तपकीर  नाकात घेऊन ओढल्यावर त्यांची तब्येत खुष होत असे. मग एकावर एक पाय घेऊन एक हात खुर्चीच्या मागे ठेवून त्यांचे बोलणे सुरु होई. त्यांचे काम हे   कित्येकदा कागदावर ड्रॉईंगच्या स्वरूपात असे तर कांही वेळा डाय करण्यासाठी बनवलेल्या प्लॅस्टरच्या मॉडेल मध्ये असे. आणि मास्तर हळुवारपणे एखाद्या लहान बालकाला हाताळावे तसे त्यांच्या डिझाईनला दाखवित असत. मनाजोगते काम झाले अथवा डाय मधून एखादी नवी निर्मिती बनली की ती बाहेर काढुन त्याकडे जेव्हां ते पहात असत, त्यावेळी त्यांचे चष्म्यांमागील डोळे चकाकत असत. अश्या या मास्तरांची काम करण्याची आयुधेही तितकीच सांभाळून योग्य रीतीने ठेवलेली असत. त्यांच्या पेन्सील बॉक्स मधे 2H ते 6B अश्या सर्व पेन्सीली नीट टोक काढून ठेवलेल्या असत. सोबत टोक काढायचे ब्लेड, खोड रबर, सँड पेपर असे सर्व आवश्यक साहीत्य ठेवलेले अकाम करताना पेन्सीलचे टोक बोथट झाले की तिला पुन्हां हवे तसे टोक काढून त्यांचे काम चालू असे.

साबण्णवार मास्तरांनी अनेक कलात्मक कामे केली. अनेक मानसन्मान, पारितोषिके मिळवली. यामध्ये खडकवासला येथील मिलिटरी अकॅडमीसाठी केलेली प्रचंड घड्याळाची डायल, भारत सरकारच्या रौप्य महोस्तवासांठी केलेले चांदीचे नाणे, ‘अधीक धान्य पिकवा’ साठी केलेले चांदीची नाणे,  भूतान सरकारसाठी केलेले खास नाणे, याशिवाय भारत सरकारच्या टांकसाळीमधून प्रसृत होणारी कांही खास स्मारक नाणी मास्तरांच्या हातून घडली आहेत. ट्रेड फेअर अथॉरिटीसाठी केलेला मेमेंटो, नेहरू सेंटर साठी केलेली ट्रॉफी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, बॅांबे आर्ट ॲंड स्पोर्ट्स साठी ट्रॅाफी अशा अनेक गोष्टीही त्यात समावीष्ट आहेत. 

 


शिवाय अनेक  पुरस्कार व सन्मान त्यांच्या वाट्याला आले. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये चार वेळा पारितोषिके, कर्नाटक राज्य प्रशस्ती अवार्ड, अश्या रीतीने सतत कामात मग्न असलेले नागेश साबण्णवार मास्तर १९८१ साली 'कला व हस्त व्यवसाय' या विभागातून विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यावरही त्यांचे काम सुरूच होते. फक्त आता ते त्यांच्या दादर येथील मनोर हाऊस मधील त्यांच्या घरातून सुरु होते. कधी त्या रस्त्यावरून बसने जात असताना त्यांच्या इमारतीमधील बाल्कनीत हातोडीचे ठोके मारीत काम करीत असल्याचे दिसत. घरी ते अर्धी पटेरी चड्डी व पांढरें बनियन या वेषात असत.

मध्यंतरी मी डीन बंगल्यावर जेथे रुडयार्ड किपलिंगचा जन्म झाला होता त्याजागी सोनावडेकर यांच्याकडून रुडयार्डचा  ब्राँझ मध्ये अर्धपुतळा बनवून घेतला. त्याच्या अनावरण प्रसंगी परत आम्ही सर्वजण जमलो. आणि एक दिवस सायंकाळी सोनावडेकर माझ्याकडे आले. मी त्यावेळी जे.जे.उपयोजीत कला संस्थेचा अधिष्ठाता होतो व संस्थेसाठी मी बरेच उपक्रम करीत असे. सोनावडेकरांनी ते सर्व पाहीले होते. मला ते म्हणाले, राजा, आमच्या साबण्णवार मास्तरांनी जे.जे.स्कुलचे नांव आपल्या कर्तबगारीने उंचावले आहे. अनेक स्मारकचिन्हे शासनाच्या विविध खात्यांसाठी त्यांनी चांदी, तांबे, पितळ अश्या धातूमध्ये बनवून स्कुल ऑफ आर्टला एक ओळख करून दिली आहे. पण माझ्या मते स्कुल ऑफ आर्टने त्यांना काहीच दिले नाही. आणि मास्तरही कधी कोणाकडे कांही मागणारे नव्हेत. तेव्हां मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे आहे. गुरुदक्षिणा म्हणून त्यांना काहीतरी द्यायचे आहे. आणि नेमके १७ जून २००० साली त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मला त्याच्या जन्मदिनाचा एक भव्य समारंभ करायचा आहे. आणि हा तू तुमच्या उपयोजीत कला संस्थेत घडवुन आणावा अशी माझी इच्छा आहे. अर्थातच हा मंगल सोहोळा आमच्याकडे व्हावा यासारखा दुग्ध शर्करा योग कोणता होता? आमची टीम कामाला लागली. मास्तरांची बरीचशी कामे मिळवण्यात आली. त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. आमच्यासोबत स्कुल ऑफ आर्टचा अध्यापक वर्गदेखील या कामात सामील होता. अम्ही मास्तरावर एक आकर्षक असे सोव्हिनिअर छापले. आणि २००० सालच्या १७ जून च्या सायंकाळी उपयोजीत कला विभागात मास्तरांच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याला आरंभ झाला. जेष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या हस्ते मास्तरांचा सत्कार करण्यात आला. रुस्तमजी जीजीभाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या हृदयंगम सोहोळ्याचे खास पाहुणे होते, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सदाशिवराव तिनईकर. तिनईकर हे कुशल प्रशासक म्हणून प्रसीद्ध होतेच, शिवाय ते एक उत्कृष्ट चित्रकार होते. आणि साबण्णवार मास्तरांच्या कामाचे चहाते देखील. आपली मनोगतात तिनईकर म्हणाले, ' आजच्या काळात विशेष श्रम न घेता, प्रदीर्घ अभ्यास न करता कांही फटकाऱ्यातच चिरंतन कलाकृती निर्माण करता येतात अशी विचारधारा मान्य पावत असतानाच नागेश मास्तरांसारख्या सांप्रदायिक कलाकारांच्या प्रदीर्घ अभ्यासाने व शिस्तबद्ध कौशल्याने प्रकट झालेल्या कलाकृतीच चिरंतन होतात!’
पुढे दोनच वर्षानी सोनावडेकरांचे निधन झाले. नागेश मास्तर व सोनावडेकर या दोघांच्या मैत्रीतील एक चाक निखळले. आपला खरा शिष्य गेल्याचे दुःख त्यावेळी मास्तरांना झाले.

 


मी २००२ साली जे.जे.मधून निवृत्त झालो त्यावेळी मास्तरानी आम्हां कुटुंबियांना घरी जेवायला बोलावले. निघतांना त्यांनी माझ्यासमोर दोन ब्रॉन्झ मधील गणेश मूर्ती ठेवल्या. व मला म्हणाले, यापैकी एक आवडेल ती घे. मी त्यातील एक मूर्ती घेताच ते म्हणाले, हे माझा आशीर्वाद आहेत. आणि सोबत माझ्या पत्नीला स्वतः बनवलेले चांदीचे लक्ष्मीचे नाणे दिले. दादर कडून सायनकडे जातांना डॉ. आंबेडकर मार्गावरील 'मोहन मनोर' मधील इमारतीतील पहील्या मजल्यावरील बाल्कनीत नेहमीप्रमाणे ते काम करीत असलेले दिसत. आणि एक दिवस आमच्या एका मित्राचा निरोप आला, साबण्णवार मास्तर गेले! क्षणभर सुन्न झालो. स्वतःला सावरले. आणि त्यांच्या घरी त्यांचे शेवटचे दर्शन घ्यायला गेलो. आयुष्यात कधी विश्रांती न घेता सतत कामात पाहीलेल्या मास्तरांना प्रथमच शांत झोपलेले पाहीले. तो दिवस होता, २२ ॲागस्ट २००५. एका सव्यसाची कलाकाराला हिरावून घेणारा! पुन्हां कधी ते आपल्या बाल्कनीत काम करताना दिसणार नव्हते!

- प्रा. मं. गो.राजाध्यक्ष
- rajapost@gmail.com


.




Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :