आमचा मिठू




काल आमचा मिठू देवाघरी गेला. मिठू हा आमचा लाडका पोपट. तब्बल गेली पंचवीस वर्षे आमचे क्षण आनंदी करीत होता. मिठू हा मी जे.जे.चा डीन असतांना जेव्हां मी तेथिल डीन बंगल्यात रहात होतो, त्यावेळी म्हणजे १९९८ साली जन्मलेला. भर मुंबईत असूनही एखाद्या हील स्टेशनवर असल्याप्रमाणे भरगच्च झाडीने व्यापलेले आमचे जे.जे. कॅम्पस. आजूबाजूला सभोवार केवळ सिमेंटचे जंगल. त्यामुळे आमच्या आवारात सर्वच पक्षांचा वावर सुरु असे. त्यातही कावळ्यांनी जायबंदी केलेले अनेक पक्षी माझी पत्नि मलमपट्टी करून बरे झाल्यावर सोडून देत असे. त्यामुळे आमच्याकडे घार, कोकीळा, पोपट, घुबड, पाणकोंबडी खंड्या एवढेच काय, पण घोरपड देखील राहून गेली आहे. शिवाय दुर्मिळ असा पांढरा कावळा देखील हजेरी लावून आम्हांला प्रसीद्धी मिळवून देऊन गेला. असाच आमचं हा मिठू. नुकताच जन्मलेला, कावळ्यांनी टोचून घरट्यातून खाली पाडलेला. पूर्ण पिसेही अंगावर आली नव्हती. आणि तेथील एका शिपायाचा मुलगा त्याला आमच्याकडे घेवून आला. का कोण जाणे? त्याला पहाताच आम्हांला त्याच्याशी कांही ऋणानुबंध असल्याचे जाणवले.   त्त्याला सांभाळावे अशी मनोमन इच्छा मनांत निर्माण झाली. हळू हळु दुधाचे थेंब भरवू लागलो. पाण्यात पीठ मिसळून त्यांचे लहान लहान गोळे करून त्याला खायला देऊ लागलो. एका पिंजऱ्यात स्वारीची रवानगी झाली. अन बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. अंगावर हिरवीगार पोपटी रंगांची लव व त्यावर मोरपंखी रंगांची लांब लांब पिसे येऊ लागली. आणि बघता बघता एका देखण्या पोपटात त्याचे रूपांतर झाले.

त्यावेळी आमच्याकडे मार्शल नांवाचा डॉबरमन कुत्रा होता. मिठुच्या पिंजऱ्याखालीच त्याला बांधून ठेवण्यात येत असे. या मार्शलला शिकविण्यासाठी आमच्याकडे एक पोलीस ट्रेनर येत असे. त्यांचे काहीं खास शब्द असत. व मार्शल त्याप्रमाणे करीत असे. त्याला पुढ्यात जेवण ठेवून त्याला 'इट मार्शल, इट म्हटल्याशिवाय तो अन्नाला तोंडही लावत नसे. मग आमच्यापैकी कोणीतरी त्याला 'इट मार्शल इट म्ह्टल्यावरच तो जेवायला सुरुवात करित असे. एक दिवस मिठूने 'इट मार्शल इट' असे म्हणण्यास सुरुवात केली, आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. कुणीही न शिकविता मिठू स्वताच बोलायला शिकला होता. मग माझी पत्नी भारती हिने त्याला वेगवेगळे शब्द बोलायला शिकविण्यास सुरुवात केली. माझ्या मोठ्या मुलांचे नांव केतन व धाकट्याचे हर्षद. मग 'केतन उठ, हर्षु उठ, ममी उठ' हे शब्द त्याने बिनचूक उच्चारायला सुरुवात केली. 'मिठू मिठू पोपट' हे वाक्यही तो बोलू लागला. मिठू कुठेआहे मिठू हाही त्याचाच शब्द. शिवाय आमच्या कडे मांजरी होती. तीचे म्यांव म्यांव ऐकून तो स्वतःच मांजराचा इतका बेमालूमपणे मॅंव मॅंव असा आवाज काढू लागला की कोणालाही वाटे की आमच्याच घरी मांजर आहे. तसेच आमच्या आवारातील कावळ्यांचे आवाजही तो बिनधास्त काढीत असे.

डीन बंगल्यावर असेस्तोवर आमची कामवाली बाई त्याचा पिंजरा साफ करण्याचे काम करीत असे. पण मी निवृत्त झाल्यावर ते काम माझ्याकडे आले. दूसरी गंम्मत म्हणजे, माझ्या दोन्ही मुलांना ते कोठूनही बाहेरून आले की  तो त्यांना जवळ बोलावून आपले डोके त्यांच्याकडून खाजवून घेत असे. मोठा मुलगा दुसरीकडे रहातो. तो कधी आठ पंधरा दिवसांनी आला तरी त्याची ओळख ठेवून त्याला बोलावून आपले डोके खाजवून घेत असे. हर्षद तर बघायलाच नको! तो कामावरून कितीही उशीरा घरी येवो, तो कंपाऊंड मध्ये शिरला की इकडे मिठुच्या शिट्या सुरु होत असत. अर्थात आम्हीही कोणी बाहेरून आलो की घरात शिरण्याच्या आधी त्याला वर्दी मिळत असे व ओरडून तो सांगत असे. हर्षद बऱ्याच वेळा शुटिंग वगैरे कामामुळे कधी कधी रात्री दोन तीन वाजता परतत असे. आम्ही झोपलेले असू. पण हर्षद बिल्डिंगमध्ये वर चढण्यापूर्वीच मिठू शिट्या मारून हर्षद येत असल्याची जाणीव आम्हांला करून देत असे. मात्र आल्याबरोबर त्याला जवळ बोलावून पिंजऱ्यावर हळूहळू चढून आपल्याला त्याने खाजवल्यावरच त्याला घरात जाण्याची मुभा असे. मात्र मी अथवा माझी पत्नी यांच्याकडून मात्र तो हात लावून घेत नसे. तसा जर प्रयत्न केला तर चावायला येत असे.

माझ्या पत्नीने त्याच्यासाठी महात्मा फुले मार्केटमधून एक सुंदरसा प्रशस्त पिंजरा घेतला होता. त्यामध्ये एक आरसा देखील तिने बसवला होता. कित्येकदा आपले पंख पसरून ते त्या आरश्यात पहात असे. तोंडाने त्याचे मिठू मिठू सुरु असे. मध्ये मध्ये आम्ही त्याला स्प्रेने आंघोळ घालीत असू. मग त्याचा पिंजरा उन्हात ठेवला की त्याचा हिरवा रंग अधीक तजेलदार होत असे. त्याला खेळण्यासाठी प्ल्यास्टीकची रंगीत डावले आम्ही आत ठेवली होती. स्वारी रंगात आली कीं त्या डावलात आपले तोंड खुपसून तोंडाने म्यांव म्यांव करीत तर कधी मिठू मिठू करीत आपले पंख पसरवून तो स्वतःशीच खेळत असे. हर्षद ऑफीसला जाताना व परतल्यावर त्याच्याशी बोलल्याशिवाय कधीच जात नसे. जर का कधी मुंबईबाहेर अथवा परदेशी जाण्याचा प्रसंग आला तर हर्षद दिवसातून दोनवेळा फेसटाईमवर आमच्याशी संवाद साधे व मिठूला त्याला दाखवावे लागे. हर्षदचा आवाज आल्याबरोबर मिठू पाठी वळून आपल्या आरशात पहात पंख पसरून झुलत मिठू मिठू व म्यांव म्यांव करायला सुरुवात करीत असे. मग त्या डावलाचा दांडा तोंडात धरून पिंजऱ्यावर खटाखटा आपटत आवाज करित आपण खुशीत आहोत हे दाखवित असे.

असा हा आमचा मिठू खाण्याच्या बाबतीत मात्र एकदम चोखन्दळ होता. तो स्वतःला रियो सिनेमातील पोपट जसा स्वतःला कुत्रा समजत असतो, त्याप्रमाणे मिठू आपल्याला माणूस समजत होता. पोपटाने खाण्याच्या गोष्टी त्याला वर्ज होत्या. त्याने कधी पेरू, मिरची, भिजवलेली डाळ खाल्ली नाही. त्याला आवडे तो चपाती भात, नूडल्स, सकाळ व दुपारी चहात बुडवून केवळ मारी बिस्कीट त्याला खायला लागे. अधून मधून क्रीम क्रॅकर आवडत. घरात आतमध्ये कागदाचा नुसता आवाज आला की बाहेर याची शिटी वाजलीच. कांही खाण्यासाठी आमची तोंडे हालली की याला ते द्यावेच लागे. नाहीतर ओरडून तो आम्हांला कदाचित त्याच्या भाषेत शिव्या हासडत असेल. मग ते तो खावो वा न खावो. पण त्याला चुकविण्याची काय बिशाद होती? तसेच आमच्या दुपारच्या चहाची वेळ ही साधारणपणे चार वाजताची असे. व त्याला बिस्कीट भिजवून देण्याची देखील. पण जर कधी आम्ही दुपारी जरा जास्त वेळ झोपलो की मिठूची बिस्कीट खाण्याची वेळ टळत असे. तेंव्हां तो जोरजोराने शिट्या मारून आम्हांला उठवीत असे. जणू माझी खाण्याची वेळ झाली, आणि तुम्ही अजून झोपून काय राहीलात? असा त्याचा ओरडण्याचा आवीर्भाव असे. मग उठून चहा करून त्यात त्याचे मारी बिस्कीट बुडवून त्याला खायला दिले, की मग मात्र स्वारीचा मूड लागत असे. असा हा मिठू कधी कोणाला भ्यायला नाही. डीन बंगल्यात असतांना त्याच्या पिंजऱ्यात एक चिवळा उंदीर रोज शिरून त्याला घातलेले बिस्कीट खात असे. पण ह्याने कधी घाबरून ओरड केली नाही. सांताक्रूझ मध्ये असताना तेथेही सभोवार खूप झाडी होती. त्यावर खूप पोपट बसलेले असत. हळूहळू त्यापैकी काहींनी मिठूजवळ येऊन त्याच्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न केला. एकदा मी एका मादीला त्याच्या पिंजऱ्यात सोडले. पण हा पट्ठ्या तिच्याकडे पाहील तर शपथ! मात्र हळूहळू येणाऱ्या पोपटांची संख्या वाढत गेली व आम्हांला त्यांना खायला घालायचे धान्यही. शेवटी आम्ही ती जागा सोडली तेव्हां तेही निघून गेले.

अश्या पाळीव प्राणी पक्षाना पाळण्याची एक अडचण असते ती म्हणजे, सर्वाना एकत्र कोठे जाता येत नाही. पण आमच्या कुटुंबियांप्रमाणेच  असलेले आमचे खूप वर्षांचे शेजारी श्री लोवलेकर कुटुंबीय ह्यांच्याकडे मोठ्या आनंदाने मिठू रहात असे. त्यांनाही विठूचा लळा लागला होता. त्यामुळे घरीच असल्याप्रमाणे त्याची बडदास्त राखली जायची. आणि त्यांच्याकडे नेताना मिठू जेव्हां गाडीत बसे, तेव्हां त्याच्या आनंदाला सुमार नसे. गाडीचा प्रवास त्याला खूप आवडे. मग गाडी सुरु झाली की मिठूची शिट्या व बडबड गीते सुरु होत असत. मग आम्ही गोव्याला गेलो, पुण्याला गेलो वा काश्मीरला, मिठूचे दुसरे घर म्हणजे लोवलेकरांचे घर. तेथे त्याला परकेपणा कढी वाटलाच नाही. पुढे अम्ही खार येथे रहायला आलो. व आमच्या समोरील झाडावर सुमारे पन्नास साठ पोपट होते. त्यातीलही कांही हळूहळू करून मिठूला भेटायला आमच्या बाल्कनीत येऊ लागले. कांही जण मिठुच्या पिंजऱ्याच्यावर बसून त्याला बोलावू लागले. येथे खारीही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याही मिठुच्या पिंजऱ्यातील त्याचे खाणे खाण्यासाठी येऊ लागल्या. त्याच्या पिंजऱ्यावर स्पायडर मॅन प्रमाणे पिंजऱ्यावरून उतरून आपल्या पंजाने आतील बिस्कीट वगैरे खाणे उचलून खाऊ लागल्या. एक तर रोज आतमध्ये जाऊन आरामात फराळ करीत बसू लागली. पण आमच्या या शुकमुनींना त्याचे कांहीही नव्हते. जणू त्यांच्याकडे मिठू दुर्लक्षच करीत असे. मग आम्हांलाच त्याकडे लक्ष द्यावे लागे. त्याच्या वेळाही तो ओळखत असे. संध्याकाळी सहा वाजले की तो ओरडून आम्हांला आत घेण्याविषयी सूचना देई.

रोज सकाळी आमचा पहीला चहा हा मी व माझी पत्नी आमच्या बाल्कनीत घेत असतो. त्यावेळी प्रथम मिठूला त्याचे आवडते मारी बिस्कीट चहात बुडवून द्यावे लागे. मग ते खाल्ल्यावर एक तृप्तीचा आवाज त्याने काढल्यावर समजावे की मिठूला आवडले आहे. आम्ही एकदा मजेत म्हणालो होतो की ब्रिटानिया कंपनीला सांगीतले पाहीजे की आमचा मिठू तुमच्या मारीशिवाय कोणतीच खात नाही. हे वापरून जाहीरात तरी करा. तसेच हर्षदची सकाळ उजाडे तीच प्रथम मिठुशी बोलून आणि सायंकाळी घरी आल्यावर देखील पहीली भेट ही मिठुशीच! अगदी दोघेही एकमेकांसाठी तळमळत असत. आम्ही गमतीने म्हणत देखील असू की हर्षद गेल्या जन्मात हा मिठू कदाचित तुझी प्रेयसी असणार. तेव्हांच तुम्ही एकमेकांवर इतका जीव लावता!
आणि रात्री आम्ही झोपायला जाताना मिठूला आता झोप हां! असे म्हणून त्याचा रात्री निरोप घेऊन साधारणपणे १० च्या सुमारास लाईट बंद करून आम्ही बेडरूम मधे जात असू. मात्र काल हर्षद रात्री दिल्लीहून येणार होता. प्रथम त्याची फ्लाईट रात्री ११.३० ला येणार होती. पण काम आटोपल्यामुळे तो आधीच्या फ्लाईटने आला. ती १०.३० ला मुंबईला आली. मध्ये नेहमीप्रमाणे आम्ही मिठूला दुपारच्या चहाच्यावेळचे बिस्कीट दिले. रात्री बायकोने ७ च्या सुमारास थोडा केक भरवला. व रात्री ८.३० वाजता आम्ही जेवायला बसलो तेव्हां मी नेहमीसारखा थोडासा भात दिला. तोपर्यंत तो वरच्या बारवर बसून होता. व आम्ही हर्षद येणार असल्याने हॉल मधेच टीव्ही पहात बसलो. सव्वा अकराच्या सुमारास हर्षद घरी आला. नेहमीसारखी मिठूने त्याला साद घातली नाही. आम्हांला थोडे आश्चर्य वाटले. हर्षदने व माझ्या पत्नीने, काय रे मिठू तुला बरे वाटत नाही काय? असे म्हणत त्याच्या पिंजऱ्याकडे आम्ही सर्वजण गेलो. पाहतो तो काय? मिठू खाली बसला आहे. त्याने आपले दोन्ही पंख खाली केले होते. आम्ही चरकलोच! हर्षदने हळूच आत हात घालून त्याला बाहेर काढले. त्याला बिचाऱ्याला आपले डोके उचलण्याचीही ताकद नव्हती. बाहेर हर्षदने त्याला हातावर घेतले. त्याच्याकडे एकवार पाहून त्याने एक आवाज काढला व तेथेच हर्षदच्या हातावर कुशीवर झोपावे त्याप्रमाणे त्याने आपले प्राण सोडले. जणू केवळ हर्षदला भेटण्यासाठी तो ताटकळत होता.


मिठू, गेली पंचवीस वर्षे तू आमचा प्रत्येक क्षण आनंदी केलास. आमची नात सिमरन तर तुझ्याशी खेळत मोठी झाली. एकही दिवस असा गेला नाही की तू आमच्यात नव्हतास. तुझ्या गोड आवाजात सर्वाना रिझवत राहीलास. मनोरंजन करीत राहीलास. आम्ही तुला काय दिले असेल माहीत नाही, पण तू मात्र आम्हां सर्वांच्या जीवनात आनंद वाटत राहीलास. आता तू अनंतात विलीन झाला आहेस. अनेक आठवणी आमची हृदयं कुरतडण्यासाठी मागे ठेवून!

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
rajapost@gmail.com



Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :