दीनानाथ दलाल- चित्र आणि चरीत्र

 


२५ तारखेला दुपारी कुरिअरवाल्याने एक जाडजूड पार्सल आणून दिले. इतके व्यवस्थीत आणि नीटनेटके पार्सल उघडून पाहील्यावर आतून निघाले ते राजहंस प्रकाशनाचे एक नवीन प्रकाशन ' दीनानाथ दलाल -चित्रं आणि चरित्र' हे सुहास बहुळकर यांनी लिहीलेला आणि राजहंस ने प्रकाशीत केलेला ग्रंथ. वास्तवीक दलाल हे आमच्या लहानपणापासून आमच्या आवडीचे चित्रकार. तो काळच असं होता की मुळगांवकर आणि दलाल या दोघा कलाकारांनी समस्त मराठी घरातील माणसांना आपसात वाटून घेतले होते. आणि चित्रकलेचा ओढा लागण्याचे काम मुळगावकरांची मनमोहक सौंदर्ययुक्त चित्रे करीत असत, अन जरा चित्रकलेतील कळू लागले की आपोआप सर्वजण दलालांकडे वळत असत. त्यांची रंगीत चित्रे आम्ही त्यावर चौकोन आखून मोठी कॅनव्हासवर मोठी करून ऑइल पेंट मध्ये करण्याचा प्रयत्न करीत असू. एवढे त्यावयात आमच्यात दलाल भिनले होते. त्यांची प्रसीद्ध झालेली सर्वच चित्रे आम्ही अंकातून कापून व्यवस्थीत जपून ठेवीत असू. पुढे जे.जे.मध्ये शिकायला आल्यावर केनेडी ब्रिजवरून जातांना पहील्या मजल्यावरील त्यांच्या स्टुडिओवरील 'दलाल आर्ट स्टुडीओ' ही दिमाखदार पितळी पाटी दिसत असे. वाटे की कधीतरी वर जाऊन या पृथीतलावर अवतरलेल्या यक्षाचे दर्शन घ्यावे, त्यांना चित्रे काढतांना पहावे अन आयुष्याचे सार्थक करून घ्यावे, पण कधी हिम्मतच झाली नाही.


दलालांच्या चित्रांचे आकर्षण अगदी शालेय वयापासून मला आहे. विशेष म्हणजे माझ्या वडीलांना वाचनाची प्रचंड आवड होती. एकप्रकारचे ते त्याचे व्यसनच होते.त्यामुळे आमच्या घरी त्या काळातील बरीच पुस्तके, मासिकें, दिवाळी अंक यांची रेलचेल असे. त्यामध्ये सत्यकथा, हंस, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, अंजली, नवयुग, धनुर्धारी, अलका, मौज, झंकार अशी प्रकाशने होती. आणि त्यांना घेऊन उघडून वाचावं अशी उत्कंठा वाढवणारी त्यावरील मुखपृष्ठे होती. आतील बोधचित्रे होती.
त्यामध्ये अग्रस्थानी नांव असे ते दलाल या लयबद्ध सही असलेले दीनानाथ दलाल या सव्यसाची चित्रकाराचे. पुढे त्यांनी लाल त्रीकोणामध्ये केवळ द हे अक्षर टाकून आपली ओळख ठेवली. दलालांनी त्याकाळात आम्हां सर्वांचे मन आपल्या चित्रातील गोडव्याने, त्यातील रंगभान आविष्कृतीने आणि निर्दोष अश्या चित्रणाने भारून टाकले होते. मासिकांसोबतच अनेक प्रकाशकांची पुस्तके देखील दलालांचा साज शृंगार लेवून मराठी साहीत्यविश्वात त्यावेळी अवतरत होती. अजूनही माझ्या आठवणीत आणि नजरेच्या असलेली पुस्तके म्हणजे, वि.वि. बोकीलचा वसंत, ना.धों. ताम्हणकरांचे चार भागातील गोट्या. यामध्ये गोट्या जसजसा मोठा होत गेला, तसे त्याच्यातील परिपक्वता दलालांनी मोठ्या मार्मिकपणे दर्शवली होती. शिवाय त्यांच्या दाजी, चिंगी ह्या व्यक्तिरेखाही त्यांनीच केल्या होत्या. वसंताचा खट्याळपणा, लोभस असे बालीश रूप हे देखील हवेहवेसे वाटत होते. स्वा. सावरकरांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या ग्रंथावरील स्वातंत्र्य लक्ष्मीची वीरता दाखवणारे चित्र, राणी लक्ष्मीबाईंचे घोड्यावरील लढत असलेले आवेशपूर्ण चित्र, खुद्द स्वा. सावरकरांचे पोर्ट्रेट अशी किती नांवे घ्यावीत. सर्वचजण ही चित्रे कापून फ्रेम करून भिंतीवर लावीत असत. अजूनही मला आठवतो तो मौजचा पन्नाशीच्या आरंभाचा दिवाळी अंक. यामध्ये दलालांनी आपल्या खास अश्या शैलीत कृष्ण धवल रंगात केलेल्या कांही प्लेट्स दिल्या होत्या. त्यामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गोगटे यांनी हॉटसनवर झाडलेली गोळी, एका हाताने एका स्त्रीला पकडून तिच्या मुलाच्या पोटात संगीन खुपसलेला रझाकार, त्यांचे अत्याचार दाखवीत होता. सत्याग्रह करणाऱ्या बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्र्क घालून त्यांचा बळी घेतला तरी हातातील तिरंगा न सोडता प्राणार्पण करणारे बाबू गेनू. अशी सहा चित्रांनी त्यांनी मौज नटवला होता. सत्यकथेवरील एका षोडशीचे गालावर हात धरून असलेले विलोभनीय असे  मुखपृष्ठ. असेच त्यांनी ग.दि.माडगूळकर यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वृत्त वैनायक या काव्यासाठी केलेली वॅाश पद्धतीची अनेक बोधचित्रे यावरून दलाल हे अंतकरणात खोलवर रुतून बसले.


दलाल यांचे स्त्री चित्रण केवळ अवर्णीनीय होते. पूर्वी ते वास्तववादी शैलीत आविष्कार साधत. त्यांची चित्रे वास्तववादी असली तरी पुराणमतवादी नव्हती. त्यामध्ये आधुनिकता असे. सैलशी साडी परीधान केलेली, मोहक चेहऱ्याची स्त्री, सभोवार पसरलेला निसर्ग, आणि अद्भुत अशी रंगसंगती. यामुळे त्यांची चित्रे सर्वार्थाने उठून दिसत. पण पुढे काळानुरुप ते  त्यांच्यात बदल घडवीत गेले. या वास्तववादी चित्रामध्ये आधुनिकता दिसून येऊ लागली. स्त्री चित्रणात कमनीयता आली. त्यांत अधिक मोहकता दिसून येऊ लागली. वस्त्रभूषणातही सौंदर्य जाणवू लागले. चित्रणातील तजेलपणा, कधी आकारांचे सुलभीकरण, कधी अलंकारीक वाटेने जाणारे, कधी समान पातळीवर साधलेले असे वैविध्य त्यांच्या चित्रातून दिसून येऊ लागले. आणि त्यानंतर त्यांनी सुरु केलेल्या 'दीपावली' या चित्रकला आणि साहीत्य यांना वाहिलेल्या दिवाळी अंकाचा जन्म झाला. आणि दलालांच्या चाहत्यांना एक मेजवानीच मिळाली. त्यामध्ये त्यांनी स्वानंदासाठी केलेली चित्रे पहायला मिळू लागली. यामध्ये दलालांनी अनेक प्रयोग केले. अनेक विषय हाताळले. पौराणिक, ऐतिहासीक, राग, संगीत, नायीका अश्या विषयांना दलालांनी अलंकृत केले. छपाईच्या बाबतीतही ते नेहमी प्रयोगशील राहीले. याचसोबत त्यांची इतरांसाठीही कामे सुरूच होती. मधुकर पाटकरांच्या 'आवाज' साठी त्यांनी प्रथम खिडकी चित्रे काढली. त्यामध्ये एका इसमाला खिडकीच्या बाहेरुन स्त्री शरीराचा एखादा भाग दिसतो. आणि तो अश्लील, अश्लील असे ओरडत सुटतो. आणि वाचक ते पान परतल्यावर त्याला दिसते की, ते एका भटजीचे गुळगुळीत डोके आहे. आणि वाचकांना हंसू फुटते. सतत तीन वर्षे दलालांनी ही खिडकी चित्रें काढली. पुढें त्यांचा निधनानंतर चंद्रशेखर पत्की ती काढीत असत.


'दीपावली' हे दलालांचे सर्व साहित्यिक, कवी, नाटककार, व्यंगचित्रकार, टीकाकार, चित्रकार यासाठी एक व्यासपीठ म्हणून राहीले. पुढे त्यांनी ‘दीपावली’चे मासिक केले. दर्जेदार साहीत्याचे मासीक म्हणून ते पाहीले जात असे. त्यांच्या मित्रमंडळीत सर्व प्रकारचे लोक होते. त्यात द.ग.गोडसे, गोपालकृष्ण भोबे, पु.श्री.काळे, अनंत काणेकर, पुरुषोत्तम चित्रे, अनंतराव कुलकर्णी, कोठावळे असे सर्वच असत. बहुतेक मोठे चित्रकार आपण काम करित असतांना कुणालाच दाखवीत नाहीत.पण दलालांच्या बाबतीत हे समीकरण कधी जुळलेच नाही. स्टुडिओत एका टेबलवर त्यांचे काम चालू असे. त्यावेळी त्यांना भेटायला अनेक मित्र येत असत. मग गप्पाना ऊत येत असे. आणि दलालही त्यात सामील होत असत. पण त्याचवेळी त्यांचा कुंचला देखील चालू असे. जणू तोही त्यांच्या सोबत कुजबुजत असे. आणि यातच दलालाची चित्रसंपदा आविष्कृत होत असे.

 दलाल यांनी उपयोजीत कलेसाठी कलासंपदा केली तरी त्यांच्या चित्रकलेला शास्त्रीय बैठक होती. कसलेल्या पेंटरच्या तोडीसतोड असे व्यक्तीचित्रण ते करीत असत. त्यांनी केलेल्या लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यसम्राट न.चिं. केळकर, एस. एम. जोशी, महात्मा गांधी, गाडगे महाराज, विनोबा भावे यांच्या केलेल्या व्यक्तीचित्रणावरून ही कल्पना येते. दलालांपूर्वी सामान्य माणसावर आपली छाप पाडणारा चित्रकार म्हणजे राजा रविवर्मा हे होते. रविवर्मांच्या चित्रांच्या प्रिंट्सना मिळालेले यश पाहून अनेक चित्रकार मुद्रणासाठी चित्रे काढायला पुढे आले. छपाईची तंत्रे बदलली. चित्रांची छपाईची संख्याही वाढली. आणि त्याकाळात चित्रकार मुळगावकर आणि दलाल या दोघा चित्रकारांचीच चित्रे सर्वत्र दिसत असाही एक काळ होता. पुस्तकांची मुखपृष्ठे दलालांकडूनच करून घ्यावीत असा एकंदर सर्वच प्रकाशकांचा, लेखकांचा मानस असे. साने गुरुजी, स्वा. सावरकर, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, पु.ल.देशपांडे, जयवंत दळवी ते रणजीत देसाई अश्या अनेक प्रतिभाशाली साहित्यिकांच्या पुस्तकांना दलांच्या कुंचल्याने नटवले आहे. दलालांचे मुखपृष्ठ हे पुस्तकाचा दर्जा ठरवणारे एक परिमाणच ठरले होते. दलालांची मासिके, पुस्तके यासाठी केलेली कृष्णधवल चित्रे देखील असामान्य असत. केवळ ब्रश आणि शाईने अथवा पोस्टर रंगाने केलेली ही चित्रें केवळ अवर्णनीय अशी आहेत. त्यातील जमिनीवर सिगरेट ओढत लिहीत बसलेले पु.भा.भावे यांचे चित्र तर अत्यंत भावनीक आहे. त्यांच्या बोटातील सिगरेट, बाजूला पडलेले सिगरेट पाकीट हे विचार करणारे भावे दिसून येतात. केवळ ब्रशवर कमी अधीक दाब देत त्यांनी केलेली ही रेखाटने त्यांच्यातील सर्जनशीलतेचा प्रत्यय आणून देतात.


दलालांच्या चित्रांत सूर-ताल, लाघवीपणा, लावण्य असे सर्व कांही होते. प्रणय आणि शृंगार हा त्यांच्या चित्रांचा मूलभूत आविष्कार होता, पण त्यात अश्लीलता कोठेच जाणवली नाही. आपल्या आधुनिक चित्रात त्यांनी थोडे स्वातंत्र्य घेतलेले दिसते, त्यामुळे ते नेहमीच प्रयोगशील राहीले ! आज कांही अभिजात कलाकार दलालांच्या कलेचे मूल्य मापन करताना म्हणतात की, दलालांना अभिजात कलासाधना व निर्मिती करता आली नाही याची खंत होती. माझ्या मते हे शक्यच नाही. त्यांच्या चित्रांनी मराठी मनांत प्रेमाचे व श्रद्धेचे स्थान मिळवले. त्यांनी केलेल्या अभिजात कलेच्या कामाने त्यानी ते सिद्धही करून दाखविले. त्यांच्या व्यावसायिक कामांनाही त्यांनी नेहमीच अभिजात कलेचा स्पर्ष दिला.दलाल हे मराठी माणसाला पडलेले एक गुलाबी स्वप्न होते.  त्यांचा ' दलाल आर्ट स्टूडीओ ' हा वैभवाच्या शिखरावर होता. पण सृष्टीच्या विधात्याला आपल्या रंगरेषा, कुंचल्याच्या साहाय्याने प्रती विश्व निर्माण करणाऱ्या या कलावंताबद्दल असूया निर्माण झाली असावी. चित्र निर्मितीच्या मैफलीत मग्न असतांना, वयाच्या केवळ ५५ व्या वर्षी, १५ जानेवारी १९७१ रोजी, प्रत्येक मराठी मनाचा मानबींदू ठरलेल्या या मनस्वी कलावंताला, दीनानाथ दामोदर दलाल यांना हिरावून नेले.


अश्या या दलालांवर सुहास बहुळकर यांनी लिहिलेले व राजहंस या प्रतिष्ठित अश्या प्रकाशन संस्थेने प्रकाशीत केलेले 'दीनानाथ दलाल-चित्र आणि चरित्र' हे दलालांचे चरीत्र मला राजहंसने पाठवले होते व हातात येताच ते मी अधाशाप्रमाणे वाचू लागलो. मी एकेक प्रकरण वाचू लागलो, तसे ज्या माणसाला आपण देवाप्रमाणे बघता आलो, त्यांचे जीवन चरीत्र हळू हळू डोळ्यासमोर उलगडू लागले. कलाकृतीमागील दलालांची नव्याने ओळख होऊ लागली. आजपर्यंत दलालांबद्दल त्रोटक बरेच वाचन केले होते. त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींकडून त्यांची माहीती घेत होतो. त्यांच्यावर निघालेली दोन पुस्तके माझ्या संग्रही आहेत. पण तरीही ते चरीत्र असे नाही. आणि खरोखरीच या ग्रंथात सुहास बहुळकर यांनी घेतलेले श्रम जाणवू लागले. सुहास मधील संशोधक क्षणाक्षणाला दिसून येत होता. अगदी दलालांच्या कुटुंबियांनाही माहीत नसलेल्या गोष्टी बहुळकर यांनी यात मांडल्या आहेत. त्यामध्ये बडोदा संस्थांच्या महाराजांचे पोर्ट्रेटं हे एक आहे. विशेष म्हणजे अनेक दिवस त्यात झोकून दिलेल्या सुहासनी दलालांची सर्व चित्रे काल गणनेनुसार मांडली आहेत, जी अभ्यासकांना निश्च्छितच उपयोगी पडतील. शिवाय यामध्ये दलालांवर इतरांनी लिहीलेले लेख, दलालांनी केलेले लिखाण, आपल्या प्रिय वडिलांवर लिहीलेले त्यांच्या कन्यांचे मनोगत या गोष्टीही जमेची बाजू आहे. एकूणच यात आढळते ती बहुळकर यांची दलालांप्रती असलेली भक्ती, सुहासची संशोधक वृत्ती, त्यांचा कलेचा अभ्यास, सौंदर्याबद्दल आसक्ती आणि नेहमी काहीतरी वेगळे करून दाखवण्याची वृत्ती. आणि यातच  दलालांची कन्या व सुहास यांची जे.जे.मधील सहाध्यायी प्रतिमा दलाल-वैद्य यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी. त्यांनी दलालांविषयी उपयुक्त अशा माहिती तर पुरवलीच,शिवाय त्यांच्याकडे असलेले, जपून ठेवलेले व सुहास यांना पुरवलेले संदर्भ, यातूनच आरंभी सुहासला केवळ एक लेख लिहिण्याची विनंती केली असता, सुहासचा स्वभावाप्रमाणे त्यांनी त्याचे एक अभ्यासपूर्ण चरित्र करून  त्याला संदर्भउंचीवर नेवून ठेवले. अनेक चित्रांची उपलब्धी करून दिली.  हे  मराठी साहित्य -कला क्षेत्रावर आणि मराठी मनावर केलेले अनंत उपकार आहेत. आज हा ग्रंथ कला महाविद्यालये, ग्रंथालये, कला विद्यार्थी, कला रसीक यांच्याकडे अभ्यासासाठी हवाच! आणि सुहास बहुळकर यांच्या सोबतच राजहंसचे दिलीप माजगांवकर यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत!


आता थोडे मला जाणवलेल्या या चित्र- चरित्र मधील त्रुटी. आज हा ग्रंथ म्हणजे एक खास ग्रंथ आहे. तोही दीनानाथ दलाल यासारख्या एक दैवी कलाकारावरील. त्याचे मुखपृष्ठ पाहील्यावर थोडी निराशा होते. दलालांनी त्यांच्या काळात काळाच्या पुढे जावून चित्रण केले. त्यावर आधुनिक साज चढवला. त्याला सर्वांगाने वेगवेगळ्या शैलीमध्ये आविष्कृत केले. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे दलालांची मनात ठाव धरून बसलेली चित्रें पाहताना आनंद वाटला असता. पण या पुस्तकावर ती ज्याप्रमाणे दाखवली आहेत ते सौंदर्यपूर्ण कोलाज न वाटता केवळ चित्रांची खिचडी वाटते. विशेष म्हणजे त्यावेळच्या प्रघाताप्रमाणे चित्रकार हेच अक्षरांकन देखील करीत असत.अन दलाल त्यात माहीर होते. त्यांची लेखांची, पुस्तकांची शीर्षके ही देखील सौंदर्याचा एक अविष्कार असे. विषयानुरूप ती दलाल रेखाटत असत. उलट दलालांचे मोठे  छायाचित्र व त्या सभोवार लहान आकारातील चित्रे टाकली असती तरी चालली असती. किंवा दलालांची सही ही सुद्धा एक सुंदर अशी कलाकृती आहे. तीच त्यांची ओळख दाखवते. ती लयबद्ध सही जरी मुखपृष्ठावर असती तरी सुंदर परीणाम साधला गेला असता. अर्थात हे केवळ माझे विचार आहेत. मला जे वाटले, ते मी लिहीले आहे. ग्रंथकर्त्यानी व प्रकाशकांनी याचा विचार नक्कीच केला असेल! याबद्दल ग्रंथकर्त्यानी अन प्रकाशकांनी मला क्षमा करावी.



एकूण या सर्वांग सुंदर साहित्यिक, कलाकार, कला विद्यार्थी कला रसिकांना उपयोगी ठरेल असा एक महत्वपूर्ण चित्रांकीत ग्रंथ प्रकाशीत केल्याबद्दल लेखक श्री सुहास बहुळकर व प्रकाशक श्री दिलीप माजगांवकर यांचे आभार मानावे तितके थोडेच!

-प्रा. मं. गो.राजाध्यक्ष
rajapost@gmail.com

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :