समीर खानझोडे
समीरला मी पाहीले ते जे.जे.मध्ये. आमच्या पुढील बॅचचा तो विद्यार्थी. त्यावेळी प्रत्येक वर्गात साधारणाने पन्नास एक विद्यार्थी असत. आणि आमची संस्था एकाच इमारतीत असल्याने आम्ही सर्व एका कुटुंबाच्या शाखाप्रमाणे आजूबाजूला विस्तारलों होतो. पहील्या वर्षांपासून शेवटच्या वर्ष्यापर्यंत सर्वच विद्यार्थी एकमेकांना ओळखत असत. मित्राप्रमाणे वागत असत. आणि वर्गशिक्षकही प्रत्येक वर्गावर एकच असे संपूर्ण वर्षभर. त्यामुळे आमच्या पुढील बॅचचे विद्यार्थी देखील आम्हाला जवळचे होते. मग तो समीर खानझोडे असो, वीरू हिरेमठ असो, सुधीर कर्नाटकी असो, वा प्रकाश कावळे असो, सर्वच आमच्या माहितीतील आणि जवळिकीतील. आणि समीर जास्त ध्यानात राहीला तो त्याच्या गुणामुळे. त्याच्या सद्वर्तनामुळे आणि त्याच्या शांत व कोणालाही न दुखावणाऱ्या स्वभावामुळे. त्याच्यातील सज्जनपणा सतत जाणवत असे. आणि कामातले वेगळेपण आणि शिस्त.- अकोल्यात जन्मलेला समीर हा इतर विद्यार्थी जसे वेगवेगळ्या गावाहून जे.जे.उपयोजीत कला संस्थेमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला येत असत, त्याप्रमाणे समीरदेखील त्यातीलच एक होता. समीर कामाला एकदम वक्तशीर होता. अर्थात त्या काळातील आमचे जे.जे.म्हणजे एका सुवर्ण काळातील कला महाविद्यालय होते. आमचे डीन अर्थात अधिष्ठाता प्रा. वि. ना. तथा दादासाहेब आडारकर एक. भारदस्त अन पितृतुल्य व्यक्तिमत्व होते. सरकार दरबारी त्यांना खूप महत्व होते. मा. यशवंतराव चव्हाण यांचे दादासाहेबांशी विशेष सख्य होते. असे आमचे डीन आम्हांला भूषण होते. आणि बहुतेक सर्व विद्यार्थी त्यांच्या तालमीत तयार झालेले. असत. दादांनाही अशी कामे करणारे विदयार्थी नावांनीही माहीत असत. आणि समीरही त्यातलाच.
दरवर्षी संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वर्गकामाचे प्रदर्शन संस्थेमध्ये भरत असे. त्यात शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपली कामे लावण्यास जस्ास्त जागा मिळत असे. पण हे कामे लावणें विद्यार्थ्यांच्या मर्जीवर अवलंबून नसे, तर जाहीरात एजन्सीमधील तज्ञ कलाकार येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कामातून चांगले काम निवडून त्याच फक्त लावण्याची संधी मिळे. आणि पुन्हां निवड समितीमधून त्यातील बक्षिसपात्र कलाकृती निवडून त्यातून गोल्ड, सिल्वर व ब्रॉन्झ मेडल पहील्या तीन विद्यार्थ्यांना देण्यात येत असत. हे गोल्ड मेडल मिळवणे हे प्रतिष्ठेचे होते. मला वाटते समीरचे त्यावर्षीचे कॅम्पेन ऑर्वो फिल्म वरील होते. फिल्मची रील वेगवेगळ्या आकारात ठेवून त्याची फोटोग्राफी त्याने केली होती. व हे त्याचे हे कॅम्पेन गोल्ड मेडल मिळवुन गेले. १९६८ साली समीरची तपश्चर्या पुर्ण झाली होती. आणि पुढे समीरने मोठ्या आत्मविश्वासाने व्यावसायिक क्षेत्रात पाय टाकला. व त्यावेळच्या 'एव्हरेस्ट' या नावाजलेल्या जाहीरात संस्थेत समीरची कारकीर्द फुलू लागली.- त्यावेळचा गाजलेला ब्रॅंड 'स्टॅनरोज फॅब्रिक्स' ह्या क्लायंट वर तसेच ‘दिनेश सुटींग’वर समीरने बरेच काम केले. पुढें तो त्या कंपनीचा क्रिएटिव्ह डायरेक्टर झाला. मी अधून मधुन डी.एन. रोडवरील 'किताब महाल या त्यांच्या कार्यालयात पवारसरांसोबत जात असे, त्यावेळी जाणवे तो समीरचा तेथील दबदबा. आणि समीरच्या हातून अनेक कॅम्पेन निघू लागली. गाजू लागली. त्याकाळात जाहीरात क्षेत्रातील कामाचे मोजमाप करून त्यांना त्यातील सर्व घटकांसहित त्यांचे मूल्यांकन अथवा पारख करून त्यांना बक्षीसे देणारी ‘कॅग’ ( कम्युनीकेशन आर्टीस्ट गील्ड) नांवाची संस्था होती. वर्षभरात प्रसीद्ध झालेल्या कामांमधून ज्याचा पोर्टफोलिओ वर्षभरात आपल्या कामाचं वर्चस्व ठेवतो, त्याला 'आर्ट डायरेक्टर ऑफ द इअर' हा मानाचा 'किताब देण्यात येतो. त्याशिवाय सर्वोच्च 'किताब म्हणजे ' हॉल ऑफ फेम' हा जीवन गौराव पुरस्कार देण्यात येतो. समीरला तरुण वयातच एव्हरेस्ट मध्ये चीफ आर्ट डायरेक्टरचा मान तर मिळालाच होता. पण त्याला स्पर्धात्मक अशा कॅगच्या स्पर्धेतही 'आर्ट डायरेक्टर ऑफ द इअर' हा किताब तीन वेळा मिळून त्याने या क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवाय हा 'किताब मिळवणाऱ्याला 'कॅग' चे त्यावर्षीचे वार्षिक संकल्पन करायचा मिळते. हाही एक मान असतोच! समीरने विविध कल्पकता वापरून या वार्षिकाची मुखपृष्ठे व आतील संकल्पना तयार केल्या.
एवढे यश मिळवूनही समीरचे पाय नेहमीच जमिनीवर राहीले. दुसऱ्यांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव विद्यार्थ्यांना नेहमीच उपयोगी ठरे. दुसऱ्याशी बोलताना त्याचा आवाज कधीही चढलेला मी पाहीला नाही. उलट समोरच्याला मान देऊनच त्यांचे संभाषण होत असे. पुढे समीरने आपल्या आयुष्यात मोठी झेप घेण्याची ठरवले. व त्याने नोकरीं सोडून स्वताची एजन्सी निर्माण करण्याचे ठरवले. जेव्हां आपण जाहीरात एजन्सी म्हणतो, तेव्हा आपल्याला त्यामध्ये सर्व खाती असण्याची गरज असते. नाहीतर बऱ्याच वेळा एखादा एक जागा घेऊन त्यात आपल्या हाताखाली दोनचार आर्टिस्ट घेऊन त्याला आपण एजन्सी सुरु केली असे सांगतो. पण समीरची एजन्सी सर्व खात्यांनी परिपूर्ण होती. आणि 'लिंक ॲडस' नांवाने समीरने आपली एजन्सी मेट्रो समोरील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरु केली. आजच्या काळातील दोन मजले होतील अशा त्या इमारतीचा एकेक मजला होता. आम्ही त्यावेळी तरुण होतो, त्यामूळे सहजी ते मजले चढून जातं असू. आणि बघता बघता लिंक ॲड्स’ ने उच्च पातळी गाठली.
पुढे परळ येथील फिनिक्स मिल कंपाउंड मधे समीरने आपल्या 'लिंक ॲड्स' साठी प्रचंड मोठी जागा घेतली. त्या कंपाउंड मध्ये सर्वप्रथम व्यावसायिक कामासाठी जागा घेण्याचा मान समीर खानझोडे या तरूण जाहीरात कलाकाराने मिळवला. व तो त्याच्या नांवावर कायमचा राहीला आहे. आमच्या जे,जे.वासीय मित्रामधील समीर हा एवढा पुढे गेला याचा रास्त अभिमान आम्हांला वाटतो. आपल्या जाहीरात कारकिर्दीत समीरने- अनेक क्लायंटसाठी कामे केली, त्यापैकी टेक्सन्स कम्पनी, दिनेश सुटिंग, स्टेनरोझ फॅब्रिक्स अशी कांही. सोसायटी चहाची संपुर्ण इमेज बनवण्याचे काम समीरच्या 'लिंक ॲडस' ने केले. अगदी सणा सुदीलाही सोसायटी चहाची केलेले गणेश चतुर्थीची होर्डिंग्स कोण बरे विसरेल! अगदी जास्वंदीच्या फुलापासूनही गणेश दर्शन होत असे. जाहिरातीच्या व्यस्त कामातून वेळ काढून समीरने स्वतःच्या आनंदासाठी पेंटींग्स देखिल केली आहेत. त्याचे प्रदर्शन समीरने नेहरू सेंटरच्या कला दालनात भरवून रसिकांची दाद मिळवली होती. विशेषतः समीरच्या स्टॅनरोज, दिनेश सुटिंग्स, सोसायटी चहा यांच्या जाहिराती विषेश गाजल्या.
- मध्यंतरी कॅग ही संस्था खूपच खालावली होती त्यावेळी गोपी कुकडे, समिर खानझोडे यांनी तिला उभारणी देण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले. या कॅगच्या वार्षिकासाठी ‘कॉल फॉर एन्ट्रीज’ साठी पोस्टर समीरने बनवली. मध्यंतरी समीर एक्दा माझ्याकडे आला. मला म्हणाला, आपल्या कॅगकडे बरेच पैसे शिल्लक आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे अशी त्याची इच्छा होती. आणि त्यातूनच पुढे मुंबईतील कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना 'यंग कॅग अवार्ड' सुरु झाली. शिवाय एक उत्कृष्ट कला शिक्षक निवडून त्याला 'गुरु अवार्ड' देण्यास सुरुवात झाली. ही कामे करताना समीर नेहमीच पडद्याआड राहीला. पुढे पुढे करून आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवणाऱ्यापैकी समीर कधीच नव्हता.
मि जेव्हां सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट चा अधिष्ठाता झालो, त्यावेळी माझे अभिनंदन करण्यास समीर आला असता मी त्याला माझ्या कारकिर्दीत मला काही लागल्यास मदत करण्याविषयी विनवले. त्यावर तात्काळ होकार देऊन हसत हसत तो म्हणाला, आमचीही संस्था आहे ही!. आणि लवकरच मला त्याची मदत लागली. आमच्या संस्थेतच नव्हे, तर संपुर्ण जे.जे. च्या आवारात कोठेही जेंजेंचे निर्माण करणार्या सर जमशेटजी जीजीभॉय यांचा कायमस्वरूपी पुतळा उभारला नव्हता. शिल्पकला विभागात प्लास्टरचे एक बस्ट होते तेच समारंभात आणून ठेवीत असत. अन तेव्हापासून माझ्या मनात आपण पुढाकार घेऊन सर जमशेटजींचा अर्ध पुतलळा आपल्या संस्थेत बसवावा ही मनोमन इच्छा होती. आणि आता मला ती संधी चालून आली होती. मी विद्यार्थ्यांच्या स्टुडंट'स मजलीस तर्फे हा पुतळा बसवायचे ठरवले. त्यासाठी आदित्य बिर्ला यांनी ब्रॉन्झ साठी पैसे दिले. स्कुल ऑफ आर्टचा माँडेलवरून तेथील शिल्पकला विभाग प्रमुख प्रा. विठ्ठल शानभाग यांनी मला उत्तम असे शिल्प बनवून दिले. त्यावेळी संस्थेचे वार्षिक हे जमशेटजींना अर्पण करावे असे आमच्याकडील प्राध्यापक अरविंद नागवेकर यांनी ठरवले. पण ते छापायला प्रचंड खर्च येणार होता. शिवाय त्यांचे मुखप्रुष्ठ देखील त्या तोडीचे हवे होते. आणि मी समीरला बोलावले. समीरने तत्काळ सर्व छपाईची जबाबादारी उचलली. शिवाय जमशेटजींचे छायाचित्र वापरून, त्यांवर तांत्रीक उपचार करुन त्यानें सुंदर असे मुखपृष्ठ बनवले. त्याचे प्रोसेसिंग त्यानें युनिक ब्लॉकचे अशोक नेरकर यांच्याकडून करुन घेतले. ऑफसेट प्लेटस रवी जसरा यांच्याकडून बनवुन घेतल्या. दोन्ही नांवें छपाई जगतातील नामांकीत अशी. आणि तो 'शिल्पांजली'चा अंक आतापर्यंतच्या सर्व अंकापेक्षा देखणा असा हार्ड बॉऊण्ड अंक झाला. आणि समीरच्या त्यांच्याशी असलेल्या संबंधामुळे आम्हाला फुकट असा एकही पैसा खर्च न करता केवळ समीरमुळे मिळाला. आणि उद्योगपती डॉ. एस.पी.गोदरेज यांच्या हस्ते पुतळ्याचे व या 'शिल्पांजली'चे थाटामाटात उदघाटन करण्यात आले.
असं हा आमचा समीर, कधीही फोन केला किंवा त्याचा आला की 'मॉर्निंग' अश्या आपल्या मधाळ आवाजात बोलतो. २००४ साली समीरला कॅगने 'हॉल ऑफफेम' हा बहुमानाचा 'किताब देऊन सन्मान केला. विद्यार्थी म्हणुन तो गाजला, जाहीरात क्षेत्रात एक दिग्गज म्हणून नांव कमावले, तेथेही अनेक पारितोषिके पटकावली. कॅग सारख्या संस्थेत काम करून जाहीरात तसेच विद्यार्थी दोघांचाही विचार त्यानें केला. स्वत:ची अशी 'लिंक ॲडस' ही जाहीरात एजन्सी सुरु करून सुमारे पंचवीस वर्षे काम करून तिला प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले. आजही तो विद्यार्थी वर्गाचा विचार करतो आहे, कॅगचे काम सुरुच आहे, कधीतरी फोनवर बोलणे झाले कीं म्हणतो, एकदा तुमच्याकडे यायचे आहे. कॅगतर्फे कला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचे आहे! कांहीतरी ठरवूया!- -प्रा.मं.गो.राजाध्यक्ष.
- rajapost@gmail.com
- ————————————————






Comments
Post a Comment