आमचा सुभाष गेला…
आज अचानक आमचा सुभाष गेला. तशी त्याची प्रत्येक वेळी प्रत्येक कामात नेहमी गडबड असायचीच! आमची कांही कामे असली की, मग तो आमचं काही एक न ऐकता ती कामे उरकून यायचा. मला म्हणायचा सर, तुम्ही आता काय काळजी करू नका. आम्ही आहोत ना! अहो सर, तुम्ही आम्हांला शिकवलं म्हणून आम्ही आज लायक ठरलो आहोत. माझ्या बायकोचा तो वर्गमित्र. तिला बहीण मानायचा. भाऊबीजेला हक्काने यायचा. आणि कधीही फोन केला की म्हणायचा, भारती आज माझा वाढदिवस आहे. विसरलीस काय! काय भेट देणार आहेस मला. असे वाढदिवस त्याचे महिन्यातून एक दोन तरी असायचे. अर्थात त्यामागे असायचा तो त्याचा मिस्कीलपणा. आणि त्यानंतर असायचे ते त्याचे खळाळून हसणे. चेहऱ्यावर कायम हास्य धारण करूनच हा जणू जन्माला आला होता. आकर्षक असे व्यक्तिमत्व, गौरवर्ण, उंचापुरा अन देखणा, आमच्या डोक्यावरील केस गेले तरी त्याच्या डोक्यावर भरगच्च केस, आता ते रुपेरी झालें होते. सुभाष आणि त्याची तितकीच बोलकी पत्नी शुभदा हे जणू आमच्या आयुष्यातील मोकळ्या जागा भरून आम्हांला उभारी देणारे लेणं देवाने आम्हांला दिले होते. स्वतः ते तर एकमेकांसाठीच जणू बनले होते.
असा हा आमचा सुभाष, सुभाष गोरेगांवकर हा आमच्या जीवनात आला तो १९६८ साली माझा जे.जे.उपयोजीत कला संस्थेचा विद्यार्थी म्हणून. ती बॅच म्हणजे अजूनही कांही विद्यार्थी माझ्या आजही जीवनात आहेत. कार्यरत आहेत. ते म्हणजे सुभाष तर होताच, शिवाय नरेंद्र विचारे, विजय कुल्लरवार, पुष्पा पाटील रमेश खापरे, बाळा राणे, वाकले, चिंदरकर असे कांही. त्यापैकी शेखर साळवी हा देखील असाच सर्वाना उपयोगी पडत असे. कॉलेजमध्ये विचारे, साळवी ही जोडीचं नेहमी दिसत असायची. माझ्या प्रत्येक कामात यांचा मदतीचा हात असायचा. पण दुर्दैवाने त्यापैकी शेखर साळवी, रमेश खापरे हे दोघेही अकाली निघून गेले तेव्हां माझें वैयक्तीक नुकसान झाले होते. तरीही नरेंद्र विचारे आणि सुभाष गोरेगांवकर हे दोघेही आमच्या कोणत्याही संकटाला धावून येत असत.
तसा सुभाषचा घरंदाज व्यवसाय सोन्या चांदीचे काम करणे हा होता. त्यांची स्वतःची पेढी होती. मुळात हा आर्किटेक्चरचा विद्यार्थी. तेथे दोन वर्षे काढून उपयोजीत कला संस्थेत आलेला. आणि त्यांच्या या बॅचला एक तिसरे वर्ष सोडले, तर संपूर्ण अभ्यासक्रमाची वर्षे मी ह्या बॅच सोबत होतो. याच बॅच मध्ये माझी माझ्या भावी पत्नीशी-भारती जोगळेकरशी ओळख अन पुढे त्याचे रूपांतर प्रेम व विवाहात झाले. त्यामुळेही हे विद्यार्थी मला खूप जवळचे होते. त्यातलाच एक सुभाष. अगदी विद्यार्थी दशेपासून सर म्हणून मान देणारा. त्यात अखेरपर्यंत खंड पडला नाही. शिक्षण संपल्यावर आरंभाला त्यांनी स्वतःचा स्टुडिओ सुरु करून जाहिरातीची कामे करण्यास आरंभ केला. पण पुढे हळूहळू तो आपल्या घरगुती व्यवसायाकडे वळला. सोने आणि विशेषतः हिऱ्यांचे दागीने करणे हे त्याचे मूख्य काम होते. जोडीला कला शिक्षण घेतल्यामुळे ती त्याच्या अलंकारात उतरत होती. त्याचा विवाह झाला आणि त्याला शुभदा वहीनीसारखी त्याला समजून घेणारी, त्याला सांभाळणारी पत्नी मिळाली, जिने त्याचे संपूर्ण आयुष्य सांभाळले. विशेष म्हणजे सुभाष हा पक्का मांसाहारी. त्याशिवाय त्याचे चालतच नसे. याच्या उलट शुभदा वहीनी संपूर्ण शाकाहारी. चुकूनही कधी मास मच्छी न खाल्लेली. पण तिने सर्व शिकून घेतले, व इतक्या उत्तमपणे ती मांसाहारी जेवण बनवून त्याच्यासहित आम्हां सर्वाना खायला घालणारी. सरांना -भारतीला आवडते म्हणून मधेच कधीतरी तो बायकोला कुर्ल्या, कोळंबीचे करून स्वतः घरी हजर होत असे. मग दोघा पती पत्नीशी गप्पा मारत रात्री उशीरापर्यंत थांबून मग जात असे. पुढे त्याला मुलेही झाली. त्यांचे शिक्षण करून त्यांचे विवाहही त्याने मोठ्या थाटामाटात केले.
तसा सुभाष खूप धार्मीक होता. देवाला मानणारा, त्यांना पुजणारा असा. गणपतीच्या वेळी तो संपूर्ण गणेशमय होऊन जात असे. पाच दिवसाच्या त्याच्या गणेशाचे कोड कौतुक त्यानेच करावे. रोज ताजी फ़ुले, कंठी, घराण्यातील गणपतीचे दागीने असे लेवून त्यांचा गणेश सजत असे. त्याच्या आजूबाजूला केलेली आरास देखील त्याची असे. सकाळी आंघोळ करून शूचिर्भूत होऊन तो एकदा सोवळे नेसला की मग मात्र त्याची साग्रसंगीत पूजा सुरु होत असे. तोपर्यंत शुभदावहिनींचा सगळा स्वंयपाक तयार होऊन नैवेद्याची ताटे तयार असत. त्यांच्या गणपतीला आमची हजेरी पक्की असे. पुढे माझ्या मुलाने त्याच्या मुलींसाठी घरात गणपती आणण्यास सुरुवात केली, तेव्हां मात्र आमचा पहील्या दिवसात खंड पडला. मात्र एक दिवस आम्ही जाऊन येतच असू. मग आमच्यासाठी खास ऋषींची भाजी ठेवलेली असे. मोदक असत. आणि जोडीला दरवर्षी आमचा दुसरा एक मित्र अनील गांधी, विजय कुल्लरवार हे दोघे फोटोग्राफर व सुभाषचे वर्गमित्र देखील गणपतीला हजर असत. आणि मघ त्या दोघा पती पत्नीचा प्रेमळ आग्रह. मग आळसावलेल्या देहाने व तृप्त मनाने आम्ही घरी परतत होतो.
दिवाळी आली की स्वतः आकाश कंदील बनवल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. मग तो दादरहून स्वतः जाऊन कागद, काठ्या घेऊन येत असे. व अत्यंत कुशलतेने तो कंदील बनवत असे. एक वर्ष तो अमेरिकेला मुलाकडे गेला होता. तेथून येतांना त्याने सुंदर अश्या लाकडी काठ्या, त्यांना एकमेकांवर येतील त्याजागी एक कच व हे सर्व मशीनवर केले असे साहीत्य घेऊन आला. म्हणाला, सर, एक तुमच्यासाठी बनवणार. आणि त्याने त्या सुबक अश्या चौकोनी बारीक अश्या काठ्यांनी आकाश कंदील बनवून एक आम्हांला दिला. अजूनही आमच्या घरी त्याचा कंदील आहे. त्याची आठवण सतत देत रहाणारा. आठवणी उजळणारा. त्याचे गावं रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील. तेथे त्यांच्या मालकीची जमीन, आंब्याची कलमे होती. दरवर्षी आमच्यासाठी तो आंब्याच्या पेट्या पाठवीत असे. जमिनीचे कज्जे तर सुरूच होते. त्यामुळे पायाला भिंगरी लागल्यामुळे तो सतत गावी जा, तहसीलदारना भेट, तारखांना हजर रहा हे प्रकार त्याच्या आयुष्याचा एक भागच बनून राहीले होते. मधेच कधीतरी तो अचानक उगवत असे व सांगे, सर आता महिन्यांत निकाल नक्की लागणार. आम्हीही त्याला त्याबद्दल आशीर्वाद देत असू. त्याचा स्वभाव एकदम भोळा होता. त्यामुळे कोणावरही तो चटकन विश्वास टाकत असे.
खूप वर्षं माझ्या मनात एक गोष्ट होती ती म्हणजे मला हातात एक सोन्याची पोची (ब्रेसलेट) करून घ्यायची. आणि माझ्या पन्नासाव्या वाढदिवशी माझ्या पत्नीने मला सरप्राईस देण्याकरीता म्हणून सुभाष कडून छानपैकी चपट्या तासाची पोची बनवून घेतली. पण त्यादिवशी सुभाषने स्वतः एक सोन्याची टायपिन बनवून मला भेट म्हणून दिली. मी म्हटले अरे आजकाल कोण टाय वापरतो? पण सुभाष म्हणाला सर आज तुम्ही संध्याकाळी सूट घातलाच पाहीजे. असे गोड हट्ट करणारा हा सुभाष होता. कित्येकदा तो खिशात अनेक हिरे बाळगून असे. माझ्या हातातील अंगठीतील लहानश्या हिऱ्याकडे पाहून तो नेहमी मला म्हणत असे, सर तुमच्या अंगठीतील हिरा मला मोठा करायचा आहे. आणि एके रात्री खरोखरीच तो आला तो अंगरख्याच्या आतमधून एक बारीकशी पुडी काढून तिच्यातून एक चमकदार हिरा त्याने बाहेरी काढला. मला मूळ किमतीत त्याने तो देऊन मला अंगठी बनवली. तसेच माझी नात छोटी होती, तिच्यासाठी एकदा त्याने स्वतः होऊन कानातील सोन्याचे डुल करून आणले. त्याचे पैसे देऊ करताच सर, आमच्या चिमणीसाठी हे आणले आहेत. आमच्या दोघांमध्ये तुम्ही बोलायचे नाही. असे म्हणून त्याने ते तिच्या कानात घातले.
अश्या या सुभाषचे दोघे मुलगे अंकुश या अमीत, आता दोघेही चांगलेच व्यवसायिक झाले आहेत. अंकुश एका परदेशी कंपनीत काम करीत असून तो आता अमेरीकेत स्थायीक झाला आहे. तर धाकटा अमित व त्याची पत्नी दोघेही आर्किटेक्त्त असून तेही आपल्या सर्नजशील कामात व्यस्त असतात. आता तर सुभाषला नातवंडेही झाली व ते सुखही त्याने मनसोक्त भोगले. आम्ही जेव्हां केळवे येथे बंगला बांधायला घेतला तेंव्हा तर सुभाष आपली फियाट ११८ ही गाडी घेऊन आमच्या दिमतीला सतत हजर असे. एकेकदा तर रात्री उशिरा आम्ही सफाळा मार्गे पोचलो होतो. तेथे मग रात्र जागवून आम्ही निघत असू. केळव्याच्या बंगल्याच्या अगदी वास्तुशांतीपासून सर्व कार्यक्रमांना सुभाष व शुभदा वहीनी हजर असत. माझे १९९९ साली ओबेराय हॉटेलमधील गॅलरी आर्ट वॅाक मधे प्रदर्शन भरले होते. त्यावेळी माझ्याकडे वाहन नव्हते. सर्व चित्रे ट्याक्सीमध्ये घालून नेण्याचा माझा विचार होता. त्यावेळी पुन्हा सुभाषच माझ्या मदतीला आला. रात्री आठ वाजता आर्टवॅाकला ला पोचायचे होते. त्यानंतर चित्रांचा डिस्प्ले. डिस्प्ले करायला माझे मित्र व स्कुल ऑफ आर्टचे डीन प्रा. सोनवणी येणार होते. एवढ्यात सुभाषचा फोन आला की आपण संध्याकाळी येतो व मग चित्रे घेऊन जाऊया. आणि माझा जीव भांड्यात पडला. तेथे आम्ही पोचलो. एवढ्यात तेथे सोनवणी सरही आले. आम्ही तिघांनी मिळून डिसप्ले केला. रात्री उशिरा परतलो. सोनवणीही पार्ल्यालाच रहात होते. त्यांना सोबत घेवून, मला कॉलेजच्या डीन बंगल्यावर सोडून दुसऱ्या दिवशी सकाळी मला व भारतीला प्रदर्शनाच्या उदघाटनाला नेण्यासाठी सुभाष हजर होता. असे एक ना अनेक किस्से सांगता येतील या माझ्या जिवाभावाच्या माणसाचे.
मात्र एक कथा मला सांगितल्याशिवाय रहावणार नाही. त्यावेळी मी व भारती आमच्या धाकट्या वहिनीच्या वर्षश्राद्धाला बेळगांवला गेलो. होतो. रविवार होता. मुंबईला हर्षद एकटाच होता. सकाळचे आठ साडेआठ वाजले होते. एवढ्यात मला हर्षदचा फोन आला. व म्हणाला येथे कोठे जवळपास दवाखाना आहेका? मी कश्यासाठी विचारताच त्याने सांगीतले की तो आंघोळ करत असताना दरवाज्याची बेल वाजली म्हणून घाईघाईने टॉवेल गुंडाळून तो निघाला व खाली सर्वत्र असलेल्या साबणाच्या पाण्यावरून तो घसरून पडला व नेमके त्याचे डोके बाथरूमच्या दरवाजाच्या मार्बलच्या फ्रेमच्या धारेवर आपटले. व डोक्यातून रक्ताच्या धारा उडू लागल्या. त्याच परिस्थितीत त्याने मला फोन केला होता. मी त्याला ताबडतोब स्टेशनजवळील एच. के. हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. शेजारी कोणीच नव्हते. तसाच तो डोक्यावर टॉवेल दाबुन रिक्षा पकडून तीत बसला, व हॉस्पिटल मध्ये गेल्यावर डोक्याचा हात सोडताच पुन्हा रक्ताच्या पिचकाऱ्या उडू लागल्या. रिक्षावाल्याने धावत जाऊन तेथील वार्डबॉयला आणले. दोघांनी मिळून त्याला आत नेले. यावेळी बेळगावी मी व भारती सुन्न होऊन बसलो होतो. तत्क्षणी माझ्या डोक्यात पहीले नांव आले ते सुभाष गोरेगावकरांचे. मी त्याला तात्काळ फोन करून साधारण परिस्थितीची जाणीव करून दिली व त्याला ताबडतोब सांताक्रूझच्या हॉस्पिटलला जाण्यास सांगितले. व अर्थातच त्याने तेथे धाव घेतली. तेथील सर्व सोपस्कार आटोपून पैसे भरले. रवीवार असल्याने ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आल्या नव्हत्या. त्यांनाही हॉस्पिटलने इमरजेन्सी म्हणून बोलावण्यात आले व त्यानंतर सर्व सुरळीत झाल्यावर सुभाषने मला फोन केला. वास्तविक त्यादिवशी त्याच्या एका जागेची त्याची मिटींग ठरली होती. त्यासाठी त्याला बोलावण्यात आल्यावर त्याने सडकावून त्या पार्टीला सांगितले, येथे माझ्या भाच्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, आणि तुम्हांला मिटींग सुचते? असे म्हणून सुभाष संपूर्ण दिवस हॉस्पिटल मधे होता. माझा मोठा मुलगा त्यावेळी आपल्या मित्रांसोबत केळव्याला गेला असल्याने ते देखील ताबडतोब निघाले व सायंकाळी पोचले. बेळगावहून विमान एक दिवसाआड सुटत असल्याने त्यादिवशी फ्लाईट नव्हती. आम्ही रात्रीच्या पै बसने निघालो व दुसऱ्या दिवशी पहाटे पोचलो. आलो ते सरळ हॉस्पिटल मध्ये जाऊन प्रथम हर्षदची भेट घेतली. त्याच्या डोक्याला टाके घातले होते. त्यावेळी मल खऱ्या मैत्रीची जाणीव झाली. माझ्या सख्ख्या घरच्या लोंकापेक्षा त्याने माझे जास्त केलें होते. आणि तेथून त्याच्या कुटुंबीयाशी माझे रक्ताचे नसेना का पण एक भावनीक नाते जुळले.
नंतर माझ्या पायात मुंग्या येऊ लागल्या. सर्व उपाय केले पण काहीच फरक पडला नाही. त्या दरम्यान माझे स्पाईन ऑपरेशन झाले. पण पुढे माझ्या पायातील बधिरतेमुळे मला चालणेही अवघड होऊ लागले. त्यामुळे पार्ल्याला त्याच्या घरी लिफ्ट नसल्याने त्यांचे दोन मजले चढून जाणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मला त्याच्याकडे जाणे बंद झाले. त्यातच त्याचीही तब्येत बरी राहीली नाही. त्याला न्यूमोनिया झाला असे समजले. जरा बरे वाटले की, स्वारी पुन्हां कार्यरत होत असे. मध्यंतरी त्याला खूप बरे नव्हते असे कळल्यामुळे मी पत्नीला म्हटले, आपण त्याला जाऊन भेटल्याशिवाय मला समाधान वाटणार नाही. आणि त्याला कळवून आम्ही दोघेही कसेबसे त्याच्या फ्लॅटची एकेक पायरी कशीबशी चढत अखेर वर चढलो. आणि माझ्या मित्राला कडकडून भेटलो. केवळ आपल्याला भेटायला मी जिना चढून आल्याचे कळताच तो अक्षरशहा घळघळू लागला. चेहऱ्यावर तोच भाबडेपणा होता. माझ्या नेहरू सेंटर येथे झालेल्या प्रदर्शनाला आपला मेहुणा शेखर घेऊन आला नाही म्हणून त्याला मनसोक्त शिव्या देऊन झाल्यावर मला म्हणाला. सर मला यायचं होतं हो तुमच्या प्रदर्शनाला. छान झालं ना! पुढे आम्ही खार येथे रहायला आलो, तेव्हां तो बाहेर जाण्याच्या परिस्थितीत नव्हता. पण फोनवरून मला आश्वासन द्यायचा की आपण नक्की जागा पहायला येईन. आणि आमच्या गप्पा सुरु होत. त्यात मग आमचे मित्र खांबेकर येत, वाघमारे येत, माझ्या नातेवाईक श्रीमती नेमळेकर येत, कारण या सर्वासाठी त्याने काहींना कांही दागीने करून दिले होते. त्याची गिऱ्हाईकेही मोठमोठी होती. कधी माझ्याकडे आला की त्याचे नेहमीप्रमाणे खिश्यातुन पुड्या काढून त्यातून त्याचे ऐश्वर्य बाहेर काढायचा. अर्थात मला वाटते हे बहुदा सर्वच हिरे व्यापाऱ्यांची पद्धत असते. मी त्याला गमतीने मनातही असे की सुभाष, तुला जर का झटकले तर आतून कित्येक हिरे बाहेर पडतील.
मोकळ्या स्वभावाचा, भाबडा असलेला सुभाष अखेरपर्यंत आम्हांला मान देत असे. मी जे कांही थोडेफार लिखाण करीत असे, त्यामुळे मी कोणी प्रचंड विद्वान असल्याचा त्याचा विश्वास होता. माझे आत्मचरीत्र लिहा म्हणून तो सतत माझ्या मागे असे. त्यावर मी म्हटले. एकतर ते कोणी छापणार नाही, व छापले तर तूच त्याचा पहीला आणि शेवटचा वाचक असशील. पण त्याला वाचनाची आवड होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरीत्र त्याला वाचायचे होते. त्यामुळे एकदा मी त्याला दादरमधील शिवाजी मंदिर येथील मॅजेस्टीक बुक स्टॅाल मधून सदर ग्रंथ विकत घेऊन त्याला भेट दिला. वर त्याला सांगीतले की हे पुस्तक तुझ्यासाठी आहे. इतर कोणालाही मागीतले म्हणून द्यायचे नाही. ते वाचून त्यातील माहीती मला देत जा. म्हणजे तू पुस्तक वाचत आहेस हे मला कळेल. त्यावर त्याचे नेहमीप्रमाणे प्रेमळ हसणे हे ओघाने आलेच!
नंतर मधून मधून त्याच्या नंबरवरून फोन येई, पण तो लगेच बंद होत असे. मी परत लावला की तो थोडेफार बोलत असे. मग त्याची पत्नी फोनवर असे. मग तिच्याकडून त्याची सर्व हकीकत समजत असे. नंतर ते गोरेगांव येथे त्यांचा मुलगा अमित यांच्याकडे रहायला गेले. शुभदा वहिनीशी माझ्या पत्नीचे वारंवार बोलणे होत असे. मध्ये त्याला लीलावती मध्ये दाखल करण्यात आले. छातीच्या प्रचंड प्रमाणात कफ साठत असे. तो काढून टाकावा लागे. तो परत घरी आला, पण खूप अशक्त झाला होता. कधी फोनवर तुटक बोलणे झाले तर एकच वाक्य. सर तुमच्याकडे एकदा यायचं आहे. मी त्याला समजावयाचो की बरा हो, म्हणजे मीच तुला भेटायला येतो. मात्र आता तुझ्या जागेचे विषय नकोत. आपण जुन्या आठवणीत रमूया ! आणि हो ना! असे म्हणून तो आनंदीत होत असे.
आणि ६ तारखेला दुपारी दोनच्या सुमारास पत्नीला फोन आला, त्यांवर सुभाष गोरेगावकर नांव दिसत होते. पत्नीने विचारले काय रे सुभाष कसा आहेस? पलीकडून आवाज आला, मावशी मी अंकुश बोलतोय. आज सकाळी बाबा गेले ! कानात तप्त तेल ओतल्याप्रमाणे ती बातमी आली. योगायोग म्हणजे हाच अंकुश अमेरीकेत एका कंपनीत काम करतो, व त्याचे भारतात कांही काम असल्याने कंपनीने त्याला त्याच दिवशी भारतात पाठवले होते. खरोखरीच देवानेच त्याला या क्षणी धाडले होते. सुभाषचीच इच्छा असेल की आपण जाताना सर्वच कुटुंबीय सोबत असावेत. नेहमीच सुभाषला धावपळीत पाहीले होते. सतत नेहमीच कुठेना कुठे जायच्या तयारीत असे. जणू आता जातानाही त्याला हीच घाई लागली असावी. आणि म्हणूनच तो नेहमीप्रमाणे घाई गडबडीत निघून गेला.
सुभाष, कारे असे आमचे काळीज टरकावीत असा मधूनच उठून निघून गेलास? एकतरी संधी द्यायची होतीस ना, तुझे ते भाबडेपणाचे प्रसन्न असे खळाळत हास्य पाहण्याचे, तुझ्याशी गप्पा मारण्याचे, तुझे जमिनीच्या वादाचे खटले ऐकण्याचे आणि मोकळेपणाने तुझ्याशी बोलण्याचे!


Comments
Post a Comment