सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’






२७ फेब्रूवारी, २०२५!   महीन्यापूर्वीच सतीश नाईकांचा फोन आला. ही तारीख राखून ठेवा. त्या दिवशी माझ्या गायतोंडेवरील ग्रंथाचे प्रकाशन आहे. 

अर्थातच सतीश याचा हा प्रकल्प पूर्णत्वाला नेणाऱ्या  या कालावधीतील संपूर्ण प्रवास पहाणे आवश्यक ठरेल.

एखादा माणूस एका विलक्षण वेडाने झपाटलेला असतो. त्यासाठी येणारी संकटे आनंदाने अंगा खांद्यावर कुरवाळण्याची त्याला संवय असते. आणि आपण योजलेले काम पूर्ण झाले की आनंदाने थपथपलेल्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणून तृप्त मनाने त्या कामापासून दूर होतो. किती विलक्षण स्थितप्रज्ञाप्रमाणे वागण्याची क्षमता बाळगून असतो हा माणूस! आणि हा विलक्षण, चतुरस्त्र असा एकमेव माणूस म्हणजे आमचा मित्र तसेच चित्रकार, लेखक, पत्रकार, संपादक, साहीत्यिक, कला समीक्षक, वास्तू विशारद अश्या अनेक बिरुदानी नावाजलेला, 'चिन्ह' या आपल्या कलेला वाहीलेल्या वार्षिकाला जीवापलीकडे जपणारा लोक प्रबोधन करणारा सतीश नाईक नांवाचा अवलीया. कला विश्वांत नावाजलेला. जे.जे.स्कुल मध्ये गाजलेला, आणि अफाट मित्रसंग्रह जमा केलेला. तर असा हा सतीश गायतोंडे या नांवाने का भारून गेला त्यालाही एक कारण होतं.  तर हा गायतोंडे शोधाचा प्रवास आताचा नव्हता, तर सुमारे पन्नास वर्षांपासूनचा हा प्रवास सुरु आहे. १९७४ साली सतीश नाईक यांनी सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी जे.जे.च्या भिंतीवरील एक चित्र पाहून ते अत्यंत प्रभावीत झाले.  त्या चित्राखाली मोकळी ढाकळी अशी सही होती, 'गायतोंडे'. त्या चित्राचा सतीशवर इतका प्रभाव पडला, की ते स्वतः देखील त्यांच्याप्रमाणे मराठीत सही करू लागले. आणि गायतोंडे नावाने झपाटलेले सतीश त्यांची माहीती मिळवू लागले. दुर्दैवाने त्याकाळात आता प्रमाणे नेट-गुगल असे प्रकार नसल्याने असंख्य पुस्तकातून, अक्षरश: डुबकी मारून संदर्भ, माहीती मिळवावी लागत असे. त्यामुळे कुठे कात्रणे पहा, जुनी मासीके शोध, कुठे रद्दीतील जुनी पुस्तके पहा अश्या प्रकारें नाईकांचा शोध घेणे सुरुच होते. यामुळे त्यांना असा फायदा झाला, की त्यांनी चित्रकलेचा भारतीय इतिहास जमवला. शिक्षण संपल्यावर ते आपल्या चित्रकलेव्यतिरीक्त मराठी पत्रकारीता पूर्णवेळ करीत असत. आणि या दरम्यान त्यांनी दृक कलेला वाहीलेले 'चिन्ह' हे मराठी वार्षिक सुरु केले. तेही जमेपेक्षा तोटाच जास्त सहन करून! स्वतः कलाकार, त्यामुळे उत्तम सौंदर्यदृष्टी लाभलेला, दिसेल त्या गोष्टीतून सौंदर्य वेचणाऱ्या सतीशला गायतोंडे ध्यासापायी हे सर्वच कठीण जाऊ लागले. .



आणि सतीशच्या कला जीवनाला अचानक कलाटणी देणारी एक बातमी आली ती गायतोंडे गेल्याची! तो दिवस होता १० ऑगस्ट, २००१. दुसऱ्या दिवशी 'टाइम्स ऑफ इंडिया मध्ये केवळ तीन ओळींची बातमी होती ' Noted painter Gaytonde died '

सतीश संतापून पेटून उठले. जागतीक कीर्तीच्या पेंटरची केवळ तीन ओळींची बातमी टाइम्स  सारख्या दर्जदार वृत्तपत्रात येते. आणि त्याचं तिरीमिरीत सतीशने आपली बॅंक गाठून त्यात आपली शिल्लक पाहीली. घरी जाऊन आपली पत्नी नीता हिच्याशी चर्चा करून ठामपणे ठरवले, 'चिन्ह' काढायचा. आणि तो काढला. त्यातील गायतोंडेंची २३ पानी पहीली मुलाखत खुप गाजली. त्यानंतर बातमी आली 'गायतोंडेंचे पेंटींग कोटींना गेले' त्यानंतर सतीशने गायतोंडे यांचावर २००६ मध्ये विशेषांक काढला. गायतोंडेंनी आपल्या मागे काहीही ठेवले नव्हते. त्यामुळे संदर्भ शोधणे कठीण होते. त्यांना ओळखणारी माणसेही शोधणे कठीण होते. बरेचसे हयात नव्हते. जे होते त्यांना बोलकं करणं हे तर त्याहूनही कठीण होते. त्यांच्या कुटुंबियांचे कोण आहे माहीत नव्हतं. आणि अचानक सतीशच्या हातात ग्रंथालीच्या 'रुची' मधील पुण्याचे वास्तू  विशारद श्री नरेंद्र डेंगळे यांचा गायतोंडेंवर लेख आला, आणि सतीशच्या मनातील कोंडी फुटली. त्याचे मन गायतोंडे विचाराने स्वैरपणे दौडू लागले. 



सतीशने त्यानंतर एकामागोमाग एक अश्या चिन्ह च्या दर्जेदार वार्षिकांचे प्रकाशन केले. त्यामध्ये अनेक कलाकारांना उदयास आणले. त्यांच्या 'कालाबाजार' या खास अंकाने सर जे.जे.कॅम्पसमधील कित्येक दुष्कृत्ये बाहेर काढली. त्यानंतरच्या न्यूड विशेषांकाने तर एकच खळबळ माजवली. अनेक धमक्या, फोन येऊनही सतीश आपल्या निर्णयावर ठाम राहीला. कारण या अंकात होत्या त्या चित्रकाराच्या आविष्काराच्या पूर्ततेच्या कलाकृती. ज्यांच्या नजरेतच विकृती होती, त्यांनी अंक प्रकाशीत होण्यापूर्वीच तो पहाताच फैसला सुनावला होता. यात सतीशचे धाडस म्हणजे सर्व संपादक आपल्या अंकाच्या आरंभींच एक टीप देतात, की 'या अंकातील कोणत्याही लेखातील मतांशी संपादक सहमत आहेत असे नाही' असे सांगून आपली जबाबदारी झटकून देतात. पण सतीश मात्र आपल्या अंकात सुरुवातीलाच देत असे की, 'या अंकातील प्रत्येक लेखाची जबादारी संपादक घेत आहे'' असे म्हणून सर्व लेखकांना एक प्रकारचं संरक्षण देत असतो तिथूनच आपला या कलंदर अवलियाशी एक गूढ असा प्रवास सुरु होतो.  वासूदेव गायतोंडे   यांच्या लहान बहीणीने- किशोरी दासने आपल्या या विक्षिप्त भावाचं या अंकातून  उलगडलेलं अंतरंग आपल्याला त्या कुडाळदेशकर चाळीतील जिन्याजवळील खोलीकडे घेऊन जातं. जमदग्नी स्वभावाच्या बापाने त्याच्या कोवळ्या मनावर केलेले अनन्वीत अत्याचार, त्यांची अवाजवी शिस्त, अवहेलना, अपमानास्पद वागणूक यामुळे संपूर्ण कुटुंबासोबतचे तोडून टाकलेले पाश, आणि चित्रकलेत समाधिस्त अवस्थेला पोचलेली त्यांची सतत मौन धारण करणारी वृत्ती या गोष्टी जसजशा आपल्या मनात उलगडत जातात, तसतसा आपला मेंदू बधीर होऊन सुन्न होतो. आणि मनाला उगीचच वाटते की जर का त्याकाळात एका सुखी मध्यमवर्गीय घरामध्ये जन्मलेल्या वासुदेव संतू गायतोंडेला घरातून आईवडिलांचे प्रेम-ममता-लाड मिळाले असते तर गायतोंडे खरोखरीच 'गायतोंडे' झाले असते का? त्यांच्या आयुष्यात सोन्याने जसे मुशीतून लाल होऊन आपला बावन्नकशीपणा सिद्ध करावा लागतो, त्याप्रमाणे आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले ते झाले असते का? 


मध्यन्तरी सतिश दक्षीण भारतातील चोलामंडळ या कलावंतांच्या वसाहतीच्या प्रेरीत होऊन आपणही आपल्या कलावंतासाठी काहीतरी करावे म्हणून 'चित्रकुटीर ' ही संकल्पना घेऊन आला. कमी पैशात स्टुडिओ रहायला जागा अशी ती संकल्पना होती. पण यात काही जवळच्या म्हणणाऱ्या मित्रांनी दगा दिला. एक दुर्दैवी घटना होती ती. . आणि याचे पर्यवसान सतीशच बाहेर पडण्यात झाला. पण तरीही सतीश डगमगला नाही. त्याने दुसऱ्या एका मित्राचे त्याच पद्धतीचे अल्प किमतीत घर बांधून आपण वास्तूविशारद देखील आहोत हे सप्रमाण सिद्ध केले. आणि एक दिवस त्या बातमीने सतीशच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. 



तो दिवस होता ऑगस्ट १०, २००१. गायतोंडे गेल्याची बातमी आली. दुसऱ्या दिवशी 'टाइम्स ऑफ इंडीया' मध्ये केवळ तीन ओळीची बातमी होती, Noted painter Gaytonde died’. सतीश संतापाने पेटून उठला. एवढ्या मोठ्या जागतीक कीर्तीच्या पेंटरची केवळ तीन ओळीची बातमी टाइम्स सारख्या दर्जेदार वृत्तपत्रात येते. आणि त्याच तिरीमिरीत सतीशने आपली बॅंक गाठून त्यातील शिल्लक पाहीली. घरी जाऊन पत्नीशी चर्चा करून ठामपणे ठरवले, ' चिन्ह' काढायचा. त्यातील गायतोंडेंची २३ पानांची पहीली मुलाखत खूप गाजली. त्यानंतर बातमी आली' गायतोंडेंचे पेंटींग कोटीला गेले. गायतोंडेंनी आपल्या मागे काहीही ठेवले नव्हते. त्यामुळे संदर्भ मिळवणे तितकेच कठीण होते. त्यांना ओळखणारी माणसे शोधणेही कठीण होते. बरेचसे हयात नव्हते. जे होते त्यांना बोलकं करणं हे तर त्याहून अवघड होतं. त्यासाठी सतीशला काय काय प्रयास करावे लागले असतील तोच जाणे. ज्या माणसाचा कसलाही मागोवा नव्हता, त्याच्या कुटुंबियांचे कोण आहे नाही याचा पत्ता नव्हता, कुठून सुरुवात करायची याचे मार्गदर्शन नव्हते, होते ते समोर एक भले मोठे प्रश्नचिन्ह! जवळ होती ती सतीशने कॉलेज जीवनात जमवलेली काही कात्रणे. आणि अचानक त्याच्या हाती आला एक ग्रंथालीच्या रुची मधील १९८८ सालचा गायतोंडेंवरील पुण्याचे आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे यांचा लेख आला. आणि त्यांच्या लेखातून, पेंटिंगवर केलेल्या विश्लेषणातून सतीशची मनांतील कोंडी फुटली. आणि मग त्याचे मन गायतोंडे विचाराने स्वैरपणे दौडू लागले. 


'चिन्ह' बंद करण्याचा निर्णय तर सतीशने घेतलाच होता. 'चिन्ह' पासून दूर राहण्याचा प्रयत्न तो करत होता. पण अचानक मध्यप्रदेश सरकारनं गायतोंडे यांना 'कालीदास सन्मान ' पुरस्कार जाहीर केल्यावर त्यांची घेतलेली मुलाखतसंडे ऑबझर्व्हरया इंग्रजी वृत्तपत्रात त्यांला पहायला मिळाली. त्या मुलाखतीतून सतीशला गायतोंडे बरेच समजून आले. हा पुरस्कार स्वीकारायला ते भोपाळला येतील, तिकडे त्यांना नक्कीच पहाता येईल, शक्य झाल्यास भेटता येईल या भावनेने सतीशने थेट भोपाळ गाठले. तेथील भारत भवन तर पहायच होतंच! पण ...गायतोंडे आलेच नाहीत. २०११ साली सतीशने 'गायतोंडेग्रन्थ प्रसीद्ध करायचे ठरवले. तोपर्यंत सतीशला वाटले की कोणीतरी गायतोंडेंवर पुस्तक काढेल. अंक काढतील, मराठी प्रमाणे इंग्रजीत तो येईल, पण तसे काहीच घडले नाही. तोपर्यंत 'गायतोंडे' हे नांव प्रकाशमय झाले होते. खूप मोठे वलय त्यांच्या मागे पसरले होते. ३० कोटीला चित्र गेल्यावर ज्या 

'टाइम्स ऑफ इंडिया' ने त्यांच्या निधनाची बातमी तीन ओळीत दिली होती, त्याच टाइम्सने गायतोंडे यांचे कर्तृत्व सांगण्यासाठी त्यांचे नांव हेडलाईन मध्ये टाकले. अनेक लोकांना 'गायतोंडे' नावाची उत्सुकता होती. पण काल परवा उगवलेल्या प्रसीद्धी पावलेल्या अनेक कलाकारांवर मोठमोठी पुस्तके-कॅटलॉग तयार होत होते. पण गायतोंडे मात्र कोणालाच आठवत नव्हते. आणि 'गायतोंडे' ची घोषणा केल्यावर सतीशच्या वाट्याला आल्या अडचणीच्या पायवाटा. अर्थात सतीश नाईक आणि अडचणी नेहमीच एकमेकांच्या हातात हात घालूनच चालत असतात. आणि कलाक्षेत्रातील राजकारण येथेही त्यांना नडले. त्यांचा 'गायतोंडे' आकाराला येऊ नये, तो प्रसीद्ध होऊ नये, यासाठी कित्येकांनी त्यांचे देव पाण्यांत बुडवले होते. संदर्भासाठी अनेकांच्या गाठीभेटी घेणे सुरूच होते. दरम्यान गायतोंडेंची चित्रे कोटींमधे गेल्यावर त्यांची चित्रे बाजारात येऊ लागली. त्यामध्ये फेक चित्रेही येऊ लागली. अनेक लोक त्यांच्याकडील चित्रे घेऊन येऊ लागले, त्यातही बरीचशी फेक असत. त्यामुळे अस्सल चित्रे ओळखणेही अवघड होऊन बसले. कारण एखादे बनावट चित्र जर का ग्रंथात छापले तर त्या व्यक्तीकडे ते अस्सल असल्याचा पुरावा म्हणून तो ते दाखवू शकतो. यामुळे ग्रंथासाठी चित्रे निवडतांना फार काळजीपूर्वक काम करावे लागले. 



आता प्रश्न होता गायतोंडेंच्या घराण्याची माहीती घेण्याचा. ते गिरगावात कुडाळदेशकर वाडीत रहात एवढी माहीती मिळाली. त्यांच्या तीन बहीणी होत्या. त्यातील दोघी हयात नसल्याची माहीती मिळाली. तिसरीविषयी कांहीच माहीती नव्हती. त्यांच्या परिचयातील एका महीलेने आपण तिचा पत्ता देतो असे सांगून फक्त झुलवले. पण अचानक एके दिवशी प्रफुल्ला डहाणूकर यांनीच तिचे नांव किशोरी दास असल्याचे सांगून तिचा फोन नंबर देखील मिळवून दिला. हा अंधारातील एक मोठा प्रकाशझोत सतीशच्या . पहील्याच किशोरी दासच्या मुलाखतीतून आपल्याला गायतोंडे समजत गेले. त्यांचे जमदग्नी वडील, मुलाचे जे.जे.ला जाण्यास त्यांचा असलेला विरोध, त्यावरून बाप लेकामध्ये आलेला दुरावा, परीणीती गायतोंडेंनी तोडलेले संपूर्ण घराशी असलेले नाते, स्वतःला मिळालेल्या मान सन्मानाचा किंचितही मोठेपणा मिरवणे, मित्र आले तरी कधीही त्यांना घरात आणता आपण त्यांच्या सोबत बाहेर जाणे अश्या कित्येक गोष्टी आपण जेव्हां वाचतो तेव्हां आपल्या मनाला असंख्य इंगळ्या डसून दंश करीत असल्याची जाणीव होते. त्यांनी भोगलेले हाल हेच पुढे कदाचीत त्यांचे भवितव्य घडवीण्यास कारणीभूत ठरले असावेत. त्यानंतर ते दिल्लीला गेले ते मुंबईला पून्हा आलेच नाहीत. आपण गोव्याला आपल्या मूळगावी कधी गेलात का? असा एकाने त्यांना प्रश्न विचारताच ते ताडकन म्हणाले, 'मी जेथून एकदा निघतो तेथे पुन्हां पाय ठेवत नाही'. 

यानंतर मुलाखती झाल्या त्या प्रफुल्लाबाईंची, त्यानंतर मनोहर म्हात्रे, सच्चीदानंद दाभोळकर, शरद पाळंदे, शांतू आमोणकर, त्यांचे मामेभावू शांताराम वर्दे वालवलीकर, फिरोझ रानडे आणि विश्वास यंदे यांच्या! या सर्वानी गायतोंडेंसोबत आपणांस सर्वंभर फिरवून आणले. आणि हे सारे केवळ शक्य झाले ते सतीश नाईकांमुळे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे. त्यांच्या 'गायतोंडे' नामक मनस्वी चित्रकारावर असलेल्या श्रद्धेमुळे! पण आतापर्यंत झाले ते 'गायतोंडे' ग्रंथाचे संकल्पन. त्याची रचना. त्याचा एकंदरीत आकारबंध, ज्याचा आतापर्यंत कोणीच कधी विचार केला नसेल. पण पुढचा प्रवास होता तो, या अभूतपूर्व ग्रंथांची तितकीच आकर्षक आणि सुंदर छपाई. म्हणतात ना, सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. आणि त्याचा प्रत्यय आता येऊ लागला. ग्रंथाचे देखणेपण त्याच्या डमीमधूनच दिसत होते. त्यासाठी कागद वापरला होता तो खास असा इमोटे प्लस हा कोरीयन कागद, मराठी ग्रंथात अद्यापपर्यंत हा कागद कोणीच वापरला नव्हता. पण आर्थीक गणित जुळत नव्हते. कुमार केतकरांनी ही डमी जेव्हां पाहीली, तेव्हां त्यांनी अंतीम निर्णयच दिला, बस, याच कागदावर हा ग्रंथ छापला पाहीजे. आणि एवढे बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पुढील व्यवस्थाही पाहीली. मधल्या काळात बेंगळुरूचा सलील साखळकर हा चिन्हच्या कुटुंबियात आला, आणि चीन्हशी एकरूप झाला. आय आय टी मध्ये शिक्षण घेतलेला सलील बेंगळुरूमध्ये स्वतःची डिझाईन फर्म चालवत होता. अनेक प्रकाशनाचे संकल्पने त्याने केली होती. आणि त्याने या ग्रंथाची जबाबदारी उचलली. 'गायतोंडे' साठी वापरात येणारा कागद हा 'क्युरीयस पेपर्स' ही कंपनी छपाईचे दर्जेदार कागद विवीध देशातून भारतात आयात करणारी कंपनी. सलील या कंपनीचा आधीपासूनचा ग्राहक. त्याच्यामुळे हा कागद सवलतीच्या दरात त्याने मिळवून दिला. शिवाय याची छपाई बेंगळुरू मध्ये करायची जबाबदारी सलिलने घेतली, आणि मनमोकळेपणाने सतीशने त्याला श्रेय देऊन मोकळा झाला. आणि सतीशच्या 'गायतोंडे' ह्या ग्रंथाने एक आकर्षक रूप धारण करून मराठी कलाविश्वात पदार्पण केले. 



'गायतोंडे' ग्रंथाचे प्रकाशन देखील तितक्याच दिमाखदार पद्धतीने करायचे सतीशने ठरवीले. आणि त्यासाठी त्यांनी निवडले ते मुंबई विद्यापीठाचे पदवीदान सभागृह. जेथून अनेक विद्वान लोकांनी पदवी ग्रहण केली. त्यांच्या नांवाने, अस्तीत्वाने पावन झालेल्या त्या वास्तूत गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन हा दुग्ध शर्करा योग लाभला होता. शिवाय गायतोंडेंचे महत्व वर्णन करण्यासाठी जोडीला गायतोंडेंशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले वास्तुविशारद नरेंद्र डेंगळे, लक्ष्मण श्रेष्ठा, गायतोंडेंचे मामेभावू शांताराम वर्दे वालावलीकर हजर होते. प्रभाकर कोलते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. Fसंजय देशमूख देखील या मंगल प्रसंगी हजर होते. अनेकांनी गायतोंडेंच्या आठवणी जागविल्या. दिल्लीला गायतोंडे रहात असत त्या जागेला बरसाती म्हणत. तेथील घराची घंटा वाजवली की बहुदा गायतोंडे दरवाजा उघडत नसत. मग त्यांना भेटायला आलेले हुसेन आदी चित्रकार त्या दरवाजावर आपली सही करून त्या खाली चित्र काढीत आपण येऊन गेल्याची जाणीव देत असत. तो दरवाजा जरी जपुन ठेवला असता तरी तो अनमोल झाला असता, असे डेंगळेनी गायतोंडेंबद्दल सांगीतले. तसेच त्यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या अमूर्त चित्रविषयी देखील त्यांनी प्रबोधन केले.  त्यांच्याशी कोलतेंचा बराच संबंध आला. तसेच एकदा गायतोंडे मुंबईला गेले त्यांनी आपण आल्याचा शंकर पळशीकरांना निरोप दिला ठरावीक वेळी जहांगीर कलादालनात भेटायला बोलावले. वेळ जसजशी जवळ आली तेव्हां गायतोंडे जहांगीरच्या पायऱ्यांवर आले.  दुरूनच त्यांना पळशीकर गडबडीत येत असल्याचे दिसल्यामुळे ते देखील रस्त्यावर त्यांना सामोरे गेले. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. पळशीकरांच्या हातात एक पिशवी होती. त्यातून त्यांनी आणलेली खास अशी नागपूरची रेशमी शाल बाहेर काढली. रस्त्यावरच गायतोंडेंच्या अंगावर त्यांनी ती पांघरली, एकही शब्द बोलता दोघेही आपापल्या वाट्याने निघून गेले. केवळ मौनातून अभिव्यक्त होणाऱ्या या महान कलाकारांपुढे नकळत आपले हात जोडले जातात. पण घरी जाताच गायतोंडेंनी सांगीतले, ' पळशीकर माझ्यापेक्षा मोठे, वयाने, अनुभवाने आणि चित्रकार म्हणून. त्यांनी आज माझा सत्कार केला. हा माझा सत्कार मला कोणतेही मोठे पारितोषिक मिळाल्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. केवढा जाज्वल्य अभीमान होता त्यांना पळशीकरांबद्दल? म्हणजे ते सत्कार करून घेत नाहीत, त्यांना मुलाखती द्यायच्या नसतात, अश्या ज्या वावड्या त्यांच्याबद्दल उठत, त्यांना हे प्रत्यूत्तर आहे. सत्कार ते घेत, पण विद्वानांकडून, ज्याला चित्रकार म्हणून त्यांच्या लेखी मान्यता आहे, त्यांच्याकडून. उगाचच कोणी त्यांची खोटी स्तुती केलेली त्यांना सहन होत नसे. 


किशोरीताईंनी तर या समारंभाला एका उच्च स्तरावर नेवून ठेवले. त्या म्हणाल्या, 'गायतोंडे जिवंत आहेत आणि जिवंत रहातील. कलाकारांपेक्षा कलाकाराने काय काम केलं याची आपल्याला जास्त किंमत असते. त्यामुळे गायतोंडेंना तुम्ही सर्वानी पुन्हां जिवंत केलं याचा मला आनंद आहे. कलेची साधना करणारा प्रत्येक कलाकार हा आनंदाच्या शोधात असतो. मग माध्यम कोणतेही असो. रंग असो वा स्वर. परमानंद हेच खरं सुख असतं. आणि याची प्रचीती ज्याला येते, तो खऱ्या अर्थाने आपल्या विषयांमध्ये उच्चता गाठतो. त्यालाच अंतीम सत्याची प्रचीती येऊ शकते. यातलाच एक कलाकार म्हणजे गायतोंडे असे मी मानते. वेगवेगळ्या रंगातून विश्वरंगाची ओळख करून देणं हेच त्यांचं ब्रीद असावं असं म्हणायला हरकत नाही'! किशोरीताई बोलत होत्या, त्यांच्या मुखातून शब्द - सुमनांच्या ओंजळी ओसंडून वहात होत्या. त्याचा दरवळ सर्वत्र पसरलेला होता. गान सरस्वतीने चित्र भास्करावर वाहीलेली ही शब्द सुरांची बरसात होती. तिच्यातील भक्तीभावाने मनं भिजून चिंब झाली होती. 


भूतकाळातून वर्तमानात :


आता यापुढचे पाऊल होते ते या अनमोल मराठी ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून त्याला जागतीक पातळीवर सन्मानाने नेणे. आणि सर्व वाचकांसाठी आवश्यक अशी भाषा अर्थातच इंग्रजी. आणि आपल्या भारतीय कलाकारावर फारच थोडी पुस्तकें आहेत. आणि अचानक सतीशच्या जीवनात एक असाच कलासक्त माणूस आला. केतन करानी या कलाप्रिय इसमाच्या हातात सतीशचा मराठी 'गायतोंडे' आला आणि ते सतीशला भेटायला आले.  त्यांनी सतीशला सांगीतले, अहो! हा खजीना केवळ भाषेमुळे एकाच राज्यात बंदीस्त करू नका. त्याला आपण पंख देऊया. संपूर्ण जगभरात  गायतोंडेंना विहार करून आणूया. त्याच सोबत त्यांनी सांगीतले की याचा सर्व खर्च मी उचलतो. तुम्ही फक्त भाषांतराचे पहा. आणि हे ऐकल्यावर सतीशच्या आनंद गगनात मावेना. तो अधीक जोमाने कामाला लागला. सतीश नाईक  अर्थातच संपादनाची जबाबदारी निभावणार होते.  जोडीला त्यांची सहकारी डॉ. मंजीरी ठाकूर या सह संपादक म्हणून काम पाहू लागल्या. सोबत विनील भुर्के हे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत झाले. श्रीमती शांता गोखले यांनी भाषांतराला सुरुवात केली.  अंकाची प्रस्तावना  लिहीली  डॉ. फिरोजा गोदरेज यांनी. प्रास्तावीक लिहीले प्रा.प्रभाकर कोलते यांनी. अशी नावारूपाच्या कलाकार मंडळींनी हा गोवर्धन उचलायला हातभार लावला.   छपाईसाठी खास असा इटालीयन कागद वापरला. आणि आज भारतात छपाईसाठी सर्वोत्कृष्ट म्हणून मानला गेलेला हैद्राबादच्या 'प्रगती' या नामवंत छापखान्यात छपाई ठरली. अंकामध्ये चुकूनही एखादी चूक राहू नये यासाठी सतीश आणि त्यांची टीम डोळ्यात तेल घालून तपासात होती. आणि अनेक व्यावसायिक कलाकार, ग्यालरी मालक, कला रसीक यांचे हात सतीशच्या हाताला जुडले गेले. आणि अखेर यातून निर्मिती झाली एका सर्वांगसुंदर अश्या ''Gaitonde BETWEE  MIRRORS' या ग्रंथाची ज्यासाठी सतीश नाईक या अवलियाने सतत पन्नास वर्षांचा प्रवास करत अंतीम ध्येय साधले. याबद्दल सतीशचे अभिनंदन करावे तितके कमीच! 



२७ फेब्रुवारी, २००५. गुरुवार. महिन्याभरापूर्वीच  सतीश नाईकांचा फोन आला की, २७ फेब्रुवारी ही तारीख ध्यानात ठेवा. त्यादिवशी संध्याकाळी मी आपल्या 'गायतोंडे' या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन करीत आहे. संध्याकाळी वाजता छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात. म्हणजे म्युझियम मध्ये. सतीशची निर्मिती जशी देखणी असते तसेच त्याचे सादरीकरणही तितकेच सुंदर आणि सर्जनशील असते. त्याने आपला 'गायतोंडे' हा मराठी ग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या हिरवळीवर नामांकीत पाहुण्यांसोबत प्रकाशीत केला होता, तर आताचा त्याचा 'गायतोंडे: बिटवीन टू मिरर्स ' ह्याला प्रकाशन स्थळ निवडले ते आपल्या छत्रपती शिवाजी संग्रहालय. एक शानदार वास्तू, त्यामागे कैक वर्षांचा इतिहास आहे. आणि तेथेच जाणून येत होते गायतोंडे सतीश नाईक यांचे भावनीक नाते. 


आणि त्या सायंकाळी मी पत्नीसह तेथे जाण्यास निघालो. साधारणपणे सहा साडेसहा वाजेपर्यंत पोहोचू अश्या बेताने रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज घेत आम्ही खार हुन निघालो. पण जेंव्हा आम्ही कोस्टल रोडवरून गेलो, ते अवघ्या बाराव्या मिनिटाला मुक्कामी पोचलो. मुंबईतील ह्या सुधारणेने मी तर थक्क झालो. वाटले आपण इतक्या लवकर पोचलो आहोत, तर जहांगीर मध्ये जाऊन थोडा वेळ काढावा. पण वास्तू संग्रहालयाच्या जागी पोचताच पहातो तो समोरच स्वागतकक्ष, तेथे तुमचे रजिस्ट्रेशन केलें कीं आतमध्ये संपूर्ण हिरवळीवर शामियाना घातला होता. स्वयंसेवक सर्वाना आदराने नेवून बसवीत होते. पाठीमागे चहापाण्याची व्यवस्था केली होती. अनेक कलाकार या मुंबईत असूनही भेटणारे,  या समारंभाच्या निमित्ताने एकमेकांना भेटत होते. जणू कलाकारांचा एक मेळाच तेथे भरला होता. समोर बसलेल्या आमंत्रितांच्या हातात 'गायतोंडे' ग्रंथाची माहीती देणारी ग्रंथाला साजेशी एक सुबक अशी पुस्तीका ठेवण्यात येत होती.  मागे विजेच्या रोषणाईने उजळून निघालेली छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची भव्य अशा इमारतीची पार्श्वभूमी त्यासमोर समारंभाचे व्यासपीठ उठून दिसत होते. आणि या प्रकाशनाच्या समारंभाला असलेली मंडळी तरी किती मोठी होती? वासुदेव गायतोंडे यांचा अपघात झाल्यावर त्यांच्यावर अवघड शस्त्रक्रिया करणारे मुंबईचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. नंदकिशोर लाड, हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. चित्रपट सृष्टीतील कलाकार पेंटर अमोल पालेकर, पदमश्री डॉ. शरयू दोशी, पदमश्री कुमार केतकर, आर्ट हिस्टोरिअन डॉ. फिरोझा गोदरेज, श्रीमती शांता गोखले, कविवर्य पराग शुक्ला, मिलिंद हरदास असे खास पाहुणे होते. या समारंभाचे औचित्य साधून नुकतेच पद्मश्री मिळालेले जे.जे.चे दोन कलाकार श्री अच्युत पालव श्री वासुदेव कामत यांचे हृद्य सत्कार कारण्याचा कार्यक्रमही मनाला सुखावून जाणारा होता. असा हा प्रकाशन सोहळा गायतोंडे यांच्या आठवणींना उजाळा देऊन कला रसिकांना त्या सायंकाळी एका वेगळ्याच सुमधुर अश्या वातावरणात घेऊन गेला. खरे पाहीले तर सतीश नाईक या हरहुन्नरी कलाकाराने निद्रिस्त कला जगताला  ' वासुदेव गायतोंडे' या नावाचा गजर करून जाग आणली म्हटले तर ते वावगे ठरू नये! 


-प्रा . मं. गो. राजाध्यक्ष 

rajapost @gmail.com 

-----------------------







Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…