आज रंग बेरंग झाले.
कांही माणसे जन्माला येतात ती सर्वांना सुगंध वाटत, त्यांच्या जीवनात रंग भरत आणि सर्वांच्या मनात एक नाते जोडत त्यांची वाटचाल सुरु असते. असेच एक जोडपे आम्ही पाहीले, जे देवाने केवळ एकमेकांसाठी बनवले होते. त्यांच्या गाठी स्वर्गातच बांधल्या होत्या. आणि हे जोडपे म्हणजे कॅम्लिनचे सुभाष दांडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रजनी दांडेकर व कला विश्वातील सर्वांच्या लाडक्या रजनी वहीनी. दोघांचेही व्यक्तिमत्व अतिशय सुंदर असे. खानदानी देखणे सौंदर्य, सुहास्य वदन, जिभेवर साखर पेरल्याप्रमाणे सर्वांशी गोड बोलणे आणि एकदा का कोणाच्या सान्नीध्यात आले की त्या व्यक्तीवर त्यांची छाप पडलीच म्हणून समजा.
वास्तविक कॅमल ह्या नावाला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. आरंभाला १९३१ साली दिगंबर परशुराम उर्फ काकासाहेब दांडेकर या तरुण केमिस्ट्री मधील पदवीधराने आपल्या इंजिनीअर असलेल्या वडील बंधू गोविंद यांना सोबत घेऊन 'दांडेकर अँड कंपनी' नांवाने शाई पावडर बनवण्याचा कारखाना सुरु केला. हळूहळू या कंपनीने आपला जम बसवण्यास सुरुवात केली व इतर राज्यामध्ये देखील या कंपनीने आपली वाटचाल सुरु केली. पण हवा तसा खप होत नव्हता. कारण स्पर्धा होती ती परकीय मालासोबत. एकतर परदेशी मालाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होत असे, अन दुसरे म्हणजे त्यांना करामध्ये सवलत असे. या दोन्ही प्रकारामुळे परकीय उत्पादने स्वस्त दराने उपलब्ध होत, आणि दुसरीकडे दांडेकरांना लहान प्रमाणावर उत्पादन करून शिवाय कर देखील मोठया प्रमाणावर भरल्यामुळे उत्पादनमूल्य जास्ती होत असे. त्यामुळे त्यांनी तात्पुरते शाईचे उत्पादन थांबवावे असे त्यांनी ठरवले. पण दांडेकरांच्या ग्राहकांनी त्यांना उत्पादन न थांबवण्याचा सल्ला दिला. व उत्पादन सुरु राहीले. या उत्पादनाला 'कॅमल इंक' हे नांव कसे दिले गेले हे देखील मजेशीर आहे.
एकदा काकासाहेब एका इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा घेत बसले असता त्यांना समोर 'कॅमल' सिगारेट्सचे पोस्टर पहायला मिळाले. त्यामध्ये स्लोगन होता,
"I' d walk a mile for a camel." आणि हे पहाताच त्यांच्या मनात हा उंट वापरण्याची कल्पना आली. तोपर्यंत ते आपले चिन्ह म्हणून घोडा वापरीत असत. आणि पुढे कॅमल इंक हे नांव आणि त्याचे उंट हे बोधचिन्ह सतत चालू राहीले. पुढे ती कॅम्लीन झाली तरी. अनेक पिढ्यानी ही शाई वापरली. शाळेतील मुले, ऑफिसमधील कर्मचारी असे सर्वच जण या शाईचे ग्राहक ठरले. पुढे काकासाहेबांच्या अथक परीश्रम व प्रामाणीकपणा त्यामुळे ‘कॅमल इंक’ ही पुढें चार दशकापर्यंत आघाडीवर राहीली. पुढे त्याचे चिरंजीव सुभाष यांनी १९५८ साली मुंबई विद्यापीठातून केमिस्ट्री विषयात पदवीधर होऊन कॅमलचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम पहाण्यास सुरुवात केली. भारतात परदेशी मालाच्या तुलनेने उच्च प्रतिचे कला साहीत्य कासे बनेल याचा शोध ते घेऊ लागले. आणि त्यांचे पहीले उत्पादन झाले ते, वाटरप्रूफ ड्रॉईंग इंक. ही ड्रॉईंग इंक खरोखरीच उच्च दर्जाची ठरली. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांना ती वापरून तिची प्रसंशा केली.
त्यानंतर कलर केमिस्ट्री मधील उच्च शिक्षण घेण्यासाठी यु के मधील ग्लॅसगो येथे त्यानी प्रयाण केले व तेथील शिक्षण यशस्वीपणे प्राप्त करून ते भारतात परतल्यावर त्यांनी लबॉरेटरी सुरू केली. आणि त्यात अनेक रंगाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या रंगाच्या निर्मितीलाही सुरुवात होण्यास एक कारण घडले होते, आणि ते म्हणजे त्यांच्या वाचनात कधीतरी आले होते , १९४८ साली महात्मा गांधींचा जेव्हां खून झाला, त्यावेळी त्यांचे पोर्ट्रेट करण्यासाठी एका मोठ्या पेंटरला नेमण्यात आले होते. त्यावेळीं त्याला जे रंग पुरवण्यात आले ते सर्व विन्सर अँड न्यूटनचे होते. तेव्हां सुभाषरावांच्या मनांत आले की एवढा स्वदेशीचा पुरस्कार करणारा महापुरुष. आणि त्यांच्या पोर्ट्रेटच्या वाट्याला मात्र परदेशी रंग का यावे? आणि तेव्हांच त्यांनी निर्णय घेतला होता की आपण आपल्या देशात संपूर्ण भारतीय बनावटीचे रंग बनवायचे. आणि पुढे त्यांनी रंगीत शाई बनवण्यास आरंभ केला.
आम्हीं जेव्हां १९६२ साली जे.जे.मधे विद्यार्थी म्हणून आलो, तेव्हां केवळ विन्सर न्यूटन व पेलिकनचे रंग मिळत. फ़क्त 'पिकॉक' नांवाचे भारतीय रंग मिळतं ते अत्यंत कमी प्रतीचे असत. त्यामुळे परकीय रंग हे पुरवून वापरावे लागत. इंडियन इंक देखील रीव्ह्ज व पेलिकनची असे. पोस्टर व्हाईट हा पेलिकनचा. अश्या रंगाच्या दुनियेत आम्ही वावरलो. पण पुढे सुभाष दांडेकरांनी इंडियन इंक, कलर इंक, पेस्टल्स, पोस्टर कलर्स, पेन्सिल अश्या वस्तूंच्या निर्मितीसाठी कॅमलची 'आर्ट मटेरीयल डिव्हिजन' सुरु केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कंपास बॉक्स, पेन्सील, अशा गोष्टींची निर्मिती केली. आणि याचसोबत देशपातळीवरील विद्यार्थ्यांसाठी चित्रांची स्पर्धा सुरु केल्या. त्या खूपच प्रसिद्धीला आल्या. आणि यानंतर कॅमल व इंक हे एकत्रित करून 'कॅम्लीन' हे नांव कंपनीला देण्यात आले. व सर्वांच्या तोंडात 'कॅम्लीन' बसले'. माहीमला गॅलरी 'ओयासिस' हीं सुरु केली. आणि या सर्वात त्यांची पत्नी रजनी वहीनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असत. दोघेही प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाच्या जोड्याप्रमाणे भासत. त्यांचे देखणे खानदानी सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात भरच घालीत असे. पुढे तर त्यांनी पेंटींगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा भरवून त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना युरोपला नेवून तेथील ग्यालरी दाखवण्याचा उपक्रम सुरु केला. रजनी वहीनी स्वतः या विद्यार्थ्यांना घेऊन जात असत.
जेव्हां सुप्रसीध्द सुलेखनकार प्रा. र.कृ. जोशी जे.जे.उपयोजीत कला संस्थेत देवनागरी सुलेखन शिकवायला येत, त्याकाळी आता जाशी परदेशी सुलेखनाची पेन मिळतात, ती तेव्हां मिळत नसत. मग त्यांनी दांडेकरांना कॅम्लिनची मोठी पेन घेऊन त्यांची निब ४५ अंशाने दुमडून करवून घेतली आणि सुभाषरावांनी ती करून दिली. आणि मशीनवर बनवलेली ही सुलेखनाची पेन कागदावर मुलायमपणे चालू लागली. भारतातील सुलेखनच्या पेनचा तो पहीला मान ठरला.
पुढे १९९१ साली मी जेव्हां संस्थेचा अधिष्ठाता झालो तेव्हां माझी त्यांची जास्तीच जवळीक झाली. संस्थेमधील गरीब विद्यार्थ्यांना देण्यासाठीं ते बरेचसे आर्ट मटेरीयल पाठवून देत असत. एकदा थोर समाजवादी नेते प्रकाश मोहाडीकर माझ्याकडे आले. त्यांना नाशिक जेल मधील जेथे साने गुरुजींना ठेवले होते त्या कोठडीचे सुशोभीकरण करून तेथे येणाऱ्या अभ्यागतांना त्यांचे कार्य समजावे हा त्यांचा हेतू होता. शिवाय सानेगुरूजींनी आपले 'श्यामची आई' हे पुस्तक तेथेच लिहीले होते. व त्या कोठड्या पाहिल्यावर माला मागील बाजूस एक अखंड अशी सुमारे १२० फूट लांबीची भिंत दिसली. व तेथेच श्यामची आई यातील प्रसंग चित्रीत करण्याचे आम्ही ठरवले. त्यासाठी आर्ट स्कुलचे विद्यार्ती व शिक्षक यांच्या मदतीने काम करायचे नक्की झाले. आता प्रश्न होता तो या अवाढव्य म्यूरलसाठी रंग, ब्रश कोठून मिळवायचे? आणि तत्क्षणी आम्हांला आठवले ते आमचे सुभाषराव. आणि त्यांच्यापुढे ही कल्पना मांडताच त्यांनी ताबडतोब आम्हांला लागतील तितके रंग, ब्रश व इतर साहीत्य उपलब्ध करून दिले. आणि आजही नाशिकच्या कारागृहाच्या भिंतीवर ते 'श्यामची आई'चे म्युरल दिसत आहे.
हीच गोष्ट मी जेव्हां ए आय सी टी इ कडून उपयोजीत कला संस्थेसाठी फंड्स मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होतो, त्याकाळी सुद्धा सुभाषरावांनी त्यांच्या दिल्लीतील उच्चपदस्थांकडून होईल तितकी मदत मला करवून दिली. पुढे आम्ही ते फंड मिळवले, त्यामागेही दांडेकरांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. प्रसंन्न आणि हसतमुख असलेल्या सुभाषरावांचा एवढे मोठे उद्योगपती असूनही त्यांच्या सान्नीध्यात आल्यावर त्यांचा धाक अजीबात वाटत नसे. उलट ते आपल्या कुटुंबियांपैकीच एक वाटत असत. एक नाते जुळले जात असे. पुढे त्यांचे बंधू दिलीपराव यांच्याशी संबंध आल्यावर मी एकदा त्यांना त्यांची अंधेरी येथील फॅक्टरी पाहण्याची ईच्छा व्यक्त केली. ती सुभाषरावांना कळताच त्यांनी स्वतः तेथे जातीने हजर राहून मला तेथील सर्व काम कसे चालते ते दाखवले. यावेळी त्यांनी कॅम्लीन व विन्सर न्यूटन यांच्या सहकार्याने आता ऑइल पेन्ट निर्मिती होणार असल्याचे सांगीतले. त्यासाठी क्वॅालीटी कंट्रोल साठी नवीन मशिनरी आली होती. आणि पुढे या दोन्ही संस्थांचा मिलाप होवून एकत्ररीत्या ऑईल पेंटची घोषणा त्यांनी ताजमहाल हॉटेल मधील क्रिस्टल रूममध्ये करण्यात आली. सर्व कला विश्व् तेथे हजर होते. त्यादरम्यान मी नवशक्तीमध्ये कला विषयक सदर 'स्मृतिगंध' लिहीत होतो. या कॅम्लीन वर त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा एक लेख मी लिहीला होता. त्याला संपादकांनी कॅम्लीनच्या रौप्य महोत्सवाचे छायाचित्र दिले होते. त्या समारंभात काकासाहेब स्टेजवर होते. माझा लेख वाचून व सदर छायाचित्र पाहून दांडेकरांच्या मातोश्रींचा मला बंगळूरहून फोन आला. त्यांच्याही गत स्मृती जाग्या झाल्या होत्या.
कॅसॅान हा जलरंगासाठी असलेला जपानी कागद त्यांनी भारतात आणला व तो जलरंगाचे बादशहा प्रा. प्रल्हाद धोंड सर यांच्याकडून सीस्केप करून त्यांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये भरवले. वयाच्या नव्वदीत असलेल्या धोंड सरानी त्या दिवशी आपण कलाकार म्हणून अजूनही कसा तरुण आहे, याचे प्रत्यन्तर आणून दिले. असाच एक किस्सा पुढे झाला होता. कॅम्लिनच्या स्पर्धा परीक्षेमधील पारितोषिक विजेत्यांना बक्षीसे देण्याचा समारंभ होत असे.त्यासाठी त्यांनी जे.जे.गॅलरी उपलब्ध करून देण्यास सांगीतले होते.पण ऐनवेळी गॅलरीने नकार दिला. त्यासाठी दिलीप दांडेकर व त्यांचे एक एक्सिक्युटिव्ह कोल्हटकर माझ्याकडे आले व ही समस्या कशी सोडवायची याचा विचार करू लागले. त्यावर मी त्यांना आमच्या संस्थेचा असेम्ब्ली हॉल दाखवला व तेथे त्यांचा समारंभ घेण्यास सांगीतले. त्यांनाही ते योग्य वाटले. शिवाय सुभाषरावांनी मलाच त्या समारंभाचे प्रमुख पाहूणे म्हणून रहायला सांगीतले. त्यावर नम्रपणे मी त्यांना सांगीतले की, मी कांही इतका मोठा नाही की हा सन्मान मी घ्यावा. पण एक नांव मी निश्चित सुचवू शकतो की, जे या समारंभाला योग्य न्याय देईल. आणि ते नांव आहे प्रा. बाबुराव साडवेलकर. कलेबद्दल विद्यार्थ्यांना जाणकारांचे मत मिळू शकेल. त्यावर दांडेकर म्हणाले, पण बाबुराव येतील का? त्यावर मी सांगीतले , ते माझ्यावर सोडा. कारण मध्यन्तरीच्या काळात कला संचालक असताना बाबुरावांवर बरीच संकटं आली होती. कांही शिक्षकांनी त्यांच्याविरुद्ध संप केला होता. जे.जे.चे वातावरण दुषीत झाले होते. त्यामुळे बाबुराव देखील निवृत्त झाल्यावर त्या आवारात आले नव्हते. मी जेव्हां त्यांच्याशी बोललो, तेव्हां ते म्हणाले, 'राजाध्यक्ष, मला तेथे यावेसे वाटत नाही. विनाकारण कोणी माझा अपमान केला तर मला सहन होणार नाही.' त्यावर मी त्यांना सांगीतले की, सर तुम्ही माझ्याकडे, उपयोजीत कला संस्थेत येणार आहात. येथील सर्व जबाबदारी माझी आहे. सन्मानाने तुमचे स्वागत केले जाईल. व त्याप्रमाणे आमच्या संस्थेत त्यांचे स्वागत झाले. नंतर आपल्या भाषणातून त्यांनी फार मौलीक सल्ला देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि दांडेकरांचे तो समारंभ बाबूरावांच्या भाषणामुळे एका उच्च दर्जावर गेला.
पुढे मी निवृत्त झालो. त्यामुळे माझे त्या क्षेत्रातील संबंध कमी झाले. यापुढे कॅम्लीनने मोठी झेप घेतली. मे २०१२ मध्ये जपानी कंपनी 'कोकीयो' हीने जास्ती शेअर विकत घेऊन कॅम्लीनशी आपले नांव जोडले. आणि सुभाषराव 'कोकीयो कॅमलिन्स'चे अध्यक्ष झाले. यानंतर कोकियोची मुख्यत्वे कागद व ऑफीस स्टेशनरी भारतीय बाजारात आली, तसेच कॅमलिन्सच्या पेन्सिल्स, पेन्स, इंक, मार्कर अश्या २००० पेक्षा जास्त उत्पादनांनी परदेशी बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले. कॅमलिन फाईन सायसेन्सचे संस्थापक व कोकीयो कॅम्लिन्सचे अध्यक्ष या नात्याने सुभाष दांडेकरांनी हजारो मराठी तरुणांना रोजगार दिला आहे. माझी त्यांची व रजनी वहिनींची शेवटची भेट सुहास बहुळकर यांच्या कन्येच्या विवाहानिमित्ताने खार येथील कुलकर्णी हॉल येथे झाली होती. त्यादिवशी आवर्जून ते दोघेही माझ्या जे.जे.मधील माझ्या कारकिर्दीविषयी बोलले होते.
आपल्या उद्योगाचा पसारा सुभाष दांडेकरांनी खूप वाढवला. पण तो वाढवताना त्याच्या दर्जात व गुणवत्तेत कधीच तडजोड केली नाही. उलट त्यांचे नांव त्यांच्या उत्पादनासोबत कसे उंचावेल, परदेशी मालासोबत आपली उत्पादने कशी स्पर्धा करतील याकडे लक्ष दिले. उद्योगात सचोटी व तत्त्वनिष्ठा हवी हे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत राबविले. आणि हेच कॅम्लिन्सचे यश आहे. राज्यातील हजारो उद्योजकांना प्रेरणा देणारे समाजोपयोगी कार्य त्यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. आणि अशी उज्वल कारकीर्द करून पहील्या पिढीतील काकासाहेब दांडेकरांनी सुरु केलेली कंपनी, दुसऱ्या पिढीतील त्यांचे सुपुत्र सुभाष दांडेकर यांनी जगाच्या नकाशावर नेवून ठेवली, आणि आता तिसऱ्या पिढीतील सुभाषरावांचे सुपुत्र आशीष हे आता कंपनीची धुरा समर्थपणे चालवीत आहेत.
सुभाष दांडेकरांनी लाखो लोकांच्या जीवनात रंग भरले. त्यांचे जीवन रंगीबेरंगी बनवले. शाळेतील मुले असोत. महाविद्यालयीन विद्यार्थी असोत अथवा चित्रकलेचे विद्यार्थी असोत, कॅम्लीनच्या पेन्सील, पेन, मार्कर, कंपॉस बॉक्स, वाटर कलर, पोस्टर कलर, फोटो कलर, असे विविध साहीत्य वापरून सर्वजण आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत. प्रत्येकाशी कॅम्लीन हे नांव जुडले गेले आहे. आज सुभाषराव आमच्यात नाहीत. पण त्याचे कार्य, त्यांचे रंगसाहित्य, आणि त्यांनी निर्माण केलेली आम्हां सर्वांसोबतची नाती, त्यामुळे ते सदैव आमच्यात आहेत.
आणि आमच्या या रंगभान आणि कलासक्त मनाच्या उमद्या उद्योगपतीला सर्व कला विश्वाची मानाची आदरांजली!
- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
- rajapost@gmail.com




Comments
Post a Comment