एक मैत्रीची षष्ठ्यब्दीपूर्ती : सुधाकर खांबेकर
१९६३ साल अजून माझ्या मनात कोरले गेले आहे. एस.एस.सी. संपवुन बालपणापासूनची इच्छा असलेल्या जगविख्यात सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टला प्रवेश घेण्यासाठी मुंबईला माझ्या भावांसोबत आलो. तसा मी शालेय शिक्षण बेळगावासारख्या मोठ्या शहरात घेतलें असल्याने जे.जे.प्रवेश घेतल्यावर मला बिलकुल बिचकल्यासारखे झाले नाही. कांही श्रीमंत विद्यार्थी सोडले तर बाकीचे सर्व माझ्यासारखे मध्यमवर्गातले. मग काय, मने जुळायला बिलकुल वेळ लागला नाही. आणि अर्थातच आताच्या विद्यार्थ्यांना त्या आमच्या काळातील जे.जे.ची कल्पनाच येणार नाही. सर्व कसे आनंदमयी वातावरण. शिक्षकवर्ग अतिशय निपुण आणि सर्वानाच आदरयुक्त असा. शिक्षकांबद्दल अढी नाही, असूया नाही. मिळे ते फक्त प्रेम आणि शिक्षण. कसलेच राजकारण नव्हते त्याकाळात. आणि आमचे अधिष्ठाता प्रा. वि. ना. आडारकर हे तर अत्यंत आदरणीय असे व्यक्तिमत्व! भारदस्त आणि देखणे. पाहील्याबरोबर छाप पडावी असे. वर्णाने गोरेपान. ते आम्हांला नांवाने ओळखतात यातच आम्हांला आनंद वाटे. जोडीला दामू केंकरे, साठ्ये, हणमंते, देसाई, तिरोडकर असे मैत्रत्व असलेला निष्णात असा शिक्षकवर्ग. दिवसच काय, पण महीने गेले वर्षे सरली आणि आम्ही शिक्षण संपवून बाहेर पडायची वेळ आली.
या बाहेर पडण्यात आम्ही कांही जवळचे एकमेकांशी प्रथम वर्षांपासून जवळीक असलेले विद्यार्थी होतो. त्यामध्ये होता अरुण. अहो, तोच अरूण. जो एम सी एम, रिडीफ्यूजन. एंटरप्राईझ अशा एजन्सीत नांवाजलेला. महाराष्ट्र शासनाने त्याला राज्य कला प्रदर्शनात जाहीरात क्षेत्रातील त्याच्या अतुलनीय योगदानाबद्दल 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरवलेला. दुसरा होता जगदीश पुळेकर. पुढे फिल्म डिव्हिजन मध्ये अनिमेशन करू लागला. तिसरा विनायक पोंक्षे, लिंटास मध्ये गेला. तर यशवंत जामसंडेकर उल्का मध्ये. शिवाय प्रकाश देशमुख, दिलीप नवलकर, विलास कुलकर्णी, चिंट्या उर्फ अविनाश गायकवाड, असे अनेकजण वेगवेगळ्या वाटेने गेले. पण आजच्या माझ्या लेखाचा नायक आहे तो माझा मित्र सुधाकर खांबेकर. त्यावेळी आम्ही सर्वजण एकमेकांना नांवे अथवा आडनांवें यांचा अपभ्रंश करून बोलत असू. जसे पुळेकरला जग्या, विलासला विल्या, जाम्या, कुल्या, अशी होती. व खांबेकरचे झाले होते खांब्या. आणि आमचे कोटीभास्कर डॉ. रेगे सर यांनी त्याला अस्सल इंग्लिश नांव दिले होते 'पोले डू' !
आमचे जे.जे.जगी 'रंगले''असे म्हणायचे दिवस होते ते अंतीम वर्षाचे. पहील्या मजल्यावरील एक छोटासा क्लास. खालून वर येईपर्यंत गळत गळत सुमारे ३५ एक विद्यार्थी होतो आम्ही. आणि आमचे वर्गशिक्षक होते, अष्टपैलू असे 'डोक्याने चित्रे काढा' सांगणारे षांताराम पवार सर. सर कमी अन मित्र अधिक. पण कामात मात्र जमदग्नीचा अवतार. आम्हां विद्यार्थ्यांचा लीडर होता अरुण. तो हक्काने कोणत्याही सरांशी वाद घालीत असे. आणि त्या वर्षाच्या विद्यार्थी निवडणुकीत उभा राहीला आमचा सुधाकर खांबेकर. त्यावेळी देव आनंदाचा 'गाईड' हा चित्रपट लागला होता आणि त्यातील देवानंदचे अंगावर केशरी शाल पांघरलेले पोस्टर व गाईड चित्रपटाचा लोगो खूपच गाजला होता. जे.जे. उपयोजीत कलेच्या निवडणुका म्हणजे धमाल असे. अगदी व्यावसायिक पद्धतीने विद्यार्थी प्रचार करीत असत. स्वतः उपयोजीत कलाकार असल्यामुळे नेत्रदीपक पोस्टर करणे, सर्वत्र चित्रमय संदेश लावणे. कॅंपीयन करणे असा मोठा माहोल असायचा. कित्येक बाहेरील लोक ते पहाण्यास येत असत. आणि वर्गातून अशी कल्पना निघाली की खांबेकरला गाईड च्या भूमिकेत पेश करण्याची. देवानंद प्रमाणे त्याचा फोटो काढला. तो एका मोठ्या आकाराच्या कागदावर चिटकवून त्याखाली तिरोडकर सरांनी त्यानी अंगभर गुंडाळलेली शाल पेंट केली. एक प्रासंगिक जाहीरात प्रकार होता तो. आणि शेवटच्या दिवशी दस्तुरखुद्द खांबेकर साहेब तशीच केशरी शाल गुंडाळून, दाढी वाढवून देवानंद प्रमाणे खाली येऊन बसले. ( खांबेकर आणि देवानंदच्या रूपात? कल्पना करा. जराशी गम्मत) आणि तेवढ्यात जग्याने पुढे येऊन खिश्यातुन सिगरेट काढली, ती पेटवून एक झुरका घेतला आणि देवआनंदसमोर उदबत्तीप्रमाणे उभी केली. दुपारपर्यंत या देव आनंदला त्याच्या भूमिकेतून बाहेर पडण्यास दिले नाही. आणि अखेर सुधाकर जे.जे.चा जनरल सेक्रेटरी झाला. आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या सुधाकरने त्यावर्षी अनेक उपक्रम केले. त्याची दुसरी एक खासीयत होती ती म्हणजे त्याचा डान्स. कोणत्याही कॉलेज उपक्रमात तो असायचाच!
आम्ही जेव्हां शिक्षण संपवून बाहेर पडलो, त्यानंतर सुमारे दीड एक वर्षाने म्हणजे ६८ च्या नोव्हेंबर महीन्यात पुन्हां भेटलो. त्यावेळी जे.जे.मध्ये अधिव्याख्यात्याची जाहीरात आली होती, तेंव्हा आम्ही कांही जणांनी त्यासाठी आर्ज केला होता. आणि अचानक आम्हांला त्यासाठी इंटरव्ह्यू साठी बोलावणे आले व त्यादिवशी मी, सुधाकर, पेंडसे व निब्रे असे चार जण निवडलो गेलो. आणि पुन्हा आम्ही एकत्र आलो. मात्र आता शिक्षकांसोबत काम करण्यास, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकविण्यासाठी. आमच्या काळात असलेली शिक्षणाची जी फळी होती त्यात आता आमची दुसरी फळी निर्माण झाली. पुढे हळूहळू यात भर पडत गेली. मात्र विद्यार्थी काळात माझे आदरणीय प्रा. साठे व प्रा. पवार यांच्याशी माझें नाते होतेच. ते आता आणखीनच जवळ आले. तसेच सुधाकर हा शांताराम पवार यांच्या सोबत राहीला. तेथे पवार सरांचा शिष्य अविनाश गोडबोलें होता. त्या दोघांबरोबर सुधाकरचे सूर जुळू लागले. त्याने त्यांच्या सहवासात आपले विचार, संभाषण, कला ह्याची चांगली मशागत केली. सोबतीला तो काव्यही करू लागला.आणि तेथून पुढे प्रत्येक पावलागणिक आम्ही पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली कामे करू लागलो. प्रत्येक प्रदर्शनासाठी काम करायलाच हवे ही पवार सरांची आज्ञाच असायची. ते स्वतःही आमच्यासोबत काम करीत. एका वर्षी सुधाकरने कॉर्न प्रॉडक्ट्स साठी कॅलेंडर डिझाईन बनवले. त्यामध्ये जे सुंदर स्त्रीचे वर्णन केले जाते त्या प्रमाणे सफरचंदासारखे गाल, त्याजागी खरे सफरचंद, डोळ्यांच्या जागी द्राक्षे अश्या प्रकारे चेहऱ्याच्या विविध फळांमधून त्यांनी कॅलेंडरची पाने तयार केली. असेच एकदा स्टडी टूरला गेले असता त्याने जे विविध प्रसंग पाहीले, कांही शिक्षकांच्या लकबी पाहील्या त्यावर आधारीत एक चित्र मालीका तयार केली. त्यांत काश्मीरहून अक्रोड घेऊन आलेले, संपूर्ण त्यात बुडलेले व गळ्यात कॅमेरा अडकवलेले जतकर होते. आपल्या स्वतः केलेल्या टाईजबद्दल सांगून शिक्षण सचिवावर टाईजचा मारा बाणा प्रमाणे करणारे यंदे सर अशी विविध प्रतीकात्मक व विनोद निर्मिती करणारी सर्जनशील अशी इलस्ट्रेशन केली. त्याला जमाल भट्टी या विद्यार्थ्याने शीर्षके दिली. पुढे गोडबोले यांनी त्याला त्याच्या ड्रॉइंग्सची शैली पाहून त्याला इलस्ट्रेशनची व्याख्या समजावून दिली. आणि सुधाकरने इलस्ट्रेशनमध्ये स्वतःची अशी एक शैली निर्माण केली, व ती पुढे त्यांनी जोपासली. वृद्धिंगत केली. राज्य कला प्रदर्शनासाठी त्याने केलेले एक पोस्टर मला आठवते, त्यामध्ये वरती गिरणीचे धुरांडे दाखवले होते व त्याचा खालचा भाग म्हणजे त्याचाच कापडाचा तागा होऊन त्याचं गठ्ठा झाला आहे. व ह्याला त्याने स्लोगन दिला होता, 'Work More -Produce More. अगदी स्वतः स्वताची माहीती देणारे ते पोस्टर होते ते!
दिवस मजेत चालले होते. केंकरे सर, पवार सर यांच्यासोबत रोज सकाळी त्यांच्या दरबारात आमचा चहा, नाश्ता होत असे. त्यांच्यासोबत आम्हांला कित्येकदा बिअर पिण्याचे भाग्य पण लाभत असे. गिरगांवातील अनंताश्रम मधून आम्ही डबा मागवीत असू. पुढे माझे लग्न झाल्यावर मला घरून डबा येवू लागला, काही वर्षे वर्गाचा प्रमुख तो व त्याच्या हाताखाली मी असे. वर्ग संपल्यावर देखील आम्ही मुलांच्या कामावर दिल्या जाण्याऱ्या करेक्शन बद्दल बोलत असू. दुपारी पवार सरांच्या केबिनमध्ये जेवण करणे व त्यानंतर जाहीरात क्षेत्रातील घटनांबद्दल चर्चा करीत असू. येथेच आमची आरती प्रभू, अशोकजी परांजपे, अरुण जोगळेकर, कमलाकर सोनटक्के, मनोहर ओक अश्या लोकांशी ओळख झाली. तसा खांबेकर विद्यार्थ्यांमध्ये एकदम मिसळत असे. काही विद्यार्थी तर त्याच्या इतक्या जवळ असत की ते त्याचे विद्यार्थी न वाटता मित्रच वाटत. आणि हे सर्व बहुदा बिगर मराठी होते. यामध्ये जमाल भट्टी, पवन गुप्ता, राणा प्रजापती, जावेद चौधरी असे विद्यार्थी होते. तसेच त्याला कपड्यांचा, नीटनेटके रहाण्याचा शोक होता. मी मात्र त्याबाबतीत फारसा चोखंदळ नव्हतो. पुढे माझ्या होणाऱ्या पत्नीने माझ्यात बराच बदल घडवून आणला. पण कॅालेजच्या मुलांशी माझी जास्ती जवळीक अशी कधी झालीच नाही.
आम्ही जेव्हां विद्यार्थ्यांबरोबर स्टडी टूरला जात असू, तेव्हां आम्ही दोघेही एकत्रच असू. केरळला आम्ही गेलो होतो. आम्हांला बऱ्याच अनोख्या वस्तू घेण्याचा छंद होता. आम्ही दोघांनीही मुंबईहून जातानाच मोठे मिलिटरीचे असतात तसे सॅक घेतलें होते. मुले एकीकडे काम करीत बसली असतांना आम्ही गावात जाऊन निरनिराळ्या वस्तु घेऊन त्या या सॅकमध्ये भरत असू. मग परत येताना बसमध्ये असताना एकेक वस्तु आम्ही सर्वाना दाखवत असू. आणि प्रत्येकजण आपल्याला न नेल्याबद्दल नाराज होत असे. सुधाकर बहुदा पवार सरांच्या वर्गावर त्यांचा सहाय्यक म्हणून काम करीत असे. दोघांची खूप जवळीक झाली होती. दरम्यान अविनाश गोडबोले आर्टस्कुलची नोकरी सोडून जाहीरात एजन्सीत गेला होता.पवारांच्या हाताखाली खांबेकरने त्यांच्यातील व्हीज्यूलायझेशन बरेंच स्वतःमध्ये झिरपून घेतले होते. विद्यार्थ्यांना दिलेल्या करेक्शन मधुन ते जाणवायला लागले. त्याचा आत्मविश्वास वाढला. पण कोठेतरी बिनसले. कदाचित शिष्याबद्दलची असूया असेल. पवार सरांची त्याच्याविषयी बघण्याची वृत्ती बदललेली दिसली. याचे सुधाकरला खूप वाईट वाटले. त्याला वाटले, मी तर त्यांचा विद्यार्थी होतो. वास्तविक आपला एक विद्यार्थी मोठा होत आहे याचा त्यांना आनंद वाटायला हवा. मग माझा राग का करतात? असे विचार सुधाकरच्या मनात येत असत. पण पुढे सर्व किल्मिष जाऊन वातावरण निवळले. आणि खरोखरीच सुधाकरच्या विचारात प्रगल्भता आली. त्याचे विचार, कल्पना सृजनशील झाल्या. कॉलेजच्या सोशलमध्ये सुधाकर चक्क विद्यार्थी होऊन जात असे. त्याचा व जमालचा डान्स व जतकरची त्याला जोड ह्या गोष्टी गाजत असत. विशेषतः नाच कारत करत जमिनीवरील रुपयाचे नाणे कपाळाला आलेल्या घामाने उचलणे ही एक गोष्ट त्यांत असे. मग जमालभट्टी त्याला आलेला घाम रुमालाने पुसायचा. जेणेकरून तो रुपया त्याच्या कपाळाला चिकटू नये. पण खांबेकरच्या बऱ्याच उशिरा हे लक्षात येत असे.
पुढे आमच्या संस्थेत बदली प्रकरण गाजले. दरवर्षी नागपूर अथवा औरंगाबाद येथे कोणाला तरी जावे लागेल यांची चिंता प्रत्येकाला असे. मुंबईत कायम असलेल्या व्यक्तीला बाहेर जाणे परवडणार नसे. मात्र कोणाचा वशीला असला की तो आपली बदली रद्द करून घेत असे. पण त्या जागेवर त्याच्या खालोखालच्याला जावे लागत असे. आमच्याकडील प्रा. जतकर हे बदलीवर नागपूर येथे गेले होते. कांही वर्षे गेल्यावर त्यांनी खटपट करून मुंबईला बदली करून घेतली. आणि नेमकी सुधाकरची त्या जागेवर बदली झाली. आणि त्याच्यावर एक डोंगर कोसळला. तो बाहेरची कामेही करीत असे. नेमके मी व साठे सर एकत्र असे बरीच वर्षे कामे करीत असू. साठे सरांनी बांद्र्याला कार्टर रोडला आपला स्टुडीओ केला होता. आमच्याकडे उल्काचे र. कृ. जोशी कामे देत असत. ओबेराय हॉटेलचे साईनेजचे काम असे. कित्येकदा आम्ही कॉलेजमध्येच उशीरा थांबून ही कामे करीत असू. आणि नेमके त्यावेळी आमच्याकडे सौभाग्य ऍडव्हर्टायझींग कडुन आम्हांला कृषी विकास यावर मोठे काम आले होते. त्यांचा एक्झीक्यूटीव्ह एक बेंगाली गृहस्थ होते. काम जास्ती होते व वेळेत पुर्ण करायचे होते. त्यामुळे साठे सरांनी खांबेकर व तिरोडकर य दोघांना मदतीला घेतले. बरेच उशिरापर्यंत कामे करुन नंतर बियर पिऊन आम्ही पुढे जात असू. यामुळे साठे सरांची व सौभाग्य ची चांगली ओळख झाली होती. खांबेकर बाहेर कोठे जमते काय ते पहात होता. तेव्हां साठे सरांनी सौभाग्य मध्ये त्यांच्यासाठी शब्द टाकला. आणि सुधाकरची सौभाग्यमध्ये वर्णी लागली. आणि इतक्या वर्ष्याच्या जे.जे.ची साथ सोडून सुधाकर नोकरी सोडून बाहेरी पडला. नोकरी सोडल्यामुळे सुधाकरचे कांही नुकसान झाले नाही. त्याला आपल्या आवडत्या आणि विशाल अश्या जाहीरात क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली. मात्र संस्था एक चांगल्या सर्जनशील शिक्षकाला मुकली हे मात्र खरे!
सुधाकरचा निरोप समारंभ आमच्या संस्थेत जेव्हां झाला त्यावेळी त्याच्या जागी आलेल्या जतकर यांना रडू आवरेना. त्यांनी सुधाकरला मीठी मारून आपल्या अश्रूंना वाट करून दिली. आपल्यामुळे सुधाकरला जावे लागत आहे, याचे दुःख त्याला होत होते. मात्र सुधाकर त्यादिवशी बोलतांना म्हणाला की मी ‘सौभाग्य’ला लागलो ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हते. फक्त साठे सरांनाच मी सांगीतले होते. वास्तवीक साठे सरांनीच त्याला तेथे लावले होते. पुढे तो आपल्या कामाच्या जोरावर यशस्वी झाला हे खरे. पण त्याने साठे सरांचे त्यांच्या मदतीबद्दल आभार मानायला हवे होते. पण ते मोठेपण त्याने त्यावेळी दाखवले नाही. तेथून पुढे तो डाकुन्हाला गेला. आणि त्यानंतर त्याने स्वतःचा स्टुडीओ काढला, 'क्रिडन्स.' आणि सुधाकरचे एक स्वतंत्र असे नवे जीवन सुरु केले. आरंभी त्याचे ऑफीस बोरीबंदरला होते. मीही त्याकाळी जे.जे.च्या आवारातील डीन बंगल्यात रहात होतो. दहा मिनिटाचा पायी प्रवास. त्यामुळे कित्येकदा त्याच्याकडे जास्ती काम असले की मला बोलावणे असेच! पुढे त्याने आपले ऑफिस वरळीला नेले. तेथेही कित्येकदा मी त्याच्याकडे जाऊन काम केले आहे. आणि नंतर त्याने आणखी एक वरची पायरी गाठली. ती म्हणजे त्याने दादर येथे शारदाश्रम जवळ स्वतःची जागा घेऊन तेथे आपल्या 'क्रीडन्स’ला स्थानापन्न केले. हाताखाली आर्टीस्ट ठेवले. संगणीकीकरण केले. आणि दणक्यात त्याचे काम सुरु झाले.
गम्मत म्हणजे त्याच्या आणि माझ्या विवाहात केवळ तीनच महिन्याचे अंतर आहे. माझे फेब्रुवारी १९७२ मध्ये आणि सुधाकरचे मे १९७२. मात्र माझी पत्नी ही जे.जे.चीच विद्यार्थीनी होती. शिवाय माझ्याप्रमाणे ती देखील खांबेकरसहीत येथील सर्वच शिक्षकांची विद्यार्थिनी असल्याने सर्वच तिला ओळखीत असत. त्यामुळे माझ्या विवाहाला सर्व कॉलेज उपस्थीत होते. पण खांबेकरचा विवाह एकतर सुटीच्या कालावधीत झाला आणि परत नाशीक येथे. त्यामुळे कोणाला सहजी जाणे शक्य नव्हते. आणि मी जायचे ठरवले होते, पण आमच्या कुलाचाराच्या रीतीप्रमाणे आम्हांला गोव्याला मंगेशी येथे आमच्या कुलदैवतांकडे जावे लागले. त्यामुळे कांही काळ तो माझ्यावर रागावला होता. त्याने आपली लग्नपत्रीका पूर्वी कागदाचे पार्टी नॅपकीन मिळत. त्यावर सभोवार नक्षीकाम केलेलं असायचे. त्यावर आपली पत्रीका छापली होती. त्याच्या कल्पक डोक्याने केलेले ते डिझाईन अतीशय सुंदर झाले होते. मात्र त्यानंतर पुढे त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने ठरली, तेव्हां मात्र मी सांगितले मी कोठेही असलो तरी तुझ्या मुलींच्या लग्नाला येणार आहे. आणि एकाच दिवशी दोन्ही लग्ने होणार होती. पण दोन्ही लग्ने एकाच दिवशी झाली तर दोघीनांही दुसरीच्या लग्नात मजा करता येणार नाही म्हणुन दोघीनींही हट्ट धरला की आमची लग्ने एक झाल्यावर दुसऱ्या दिवशी दुसरे करा. म्हणजे आम्हां दोघीनाही एकमेकांच्या लग्नात भाग घेता येईल. आणि तसेच ठरले..मात्र लग्नाच्या आधी तीन दिवस माझ्या मोठ्या बंधूना बेळगांवी हार्ट अट्याक आला, व मला तात्काळ बेळगांवला जावे लागले. भाऊ हॉस्पिटलमध्ये होता. मात्र मी पहील्या लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री बसने मुंबईला यायला निघालो. मी त्यावेळी व्ही.टी. ला रहात होतो. सकाळी मुंबईला पोचलो. आणि थेट लग्नाच्या ठिकाणी गेलो. जाताना दोघींसाठी दोन पाकिटे तयार करून नेली होती. कारण दुसऱ्या लग्नाला मी उपस्थीत राहु शकणार नव्हतो. आणी एक लग्न आटोपून दुसरीचे पाकीट सुधाकरच्या हवाली करून मी रात्री बसने पुन्हां बेळगावला निघालो. ही आमच्या मैत्रीची मिसाल आहे. नुकताच आम्ही दोघांनीही आपापल्या लग्नांचा सुवर्णमहोत्सवी सोहोळा साजरा केला. पन्नास संपून एक्कावन्न वर्षे झाली.
सुधाकरला खाण्यापिण्याचा नाद मात्र खूप आहे. कोठेही गेला की त्याला कुठं चांगले खायला मिळते, हे तो पहात असतो. आणि तेथे काय खाल्ले त्याचे वर्णन तो आपलें डोकें हलवत, तृप्त नजरेने तो सांगत असतो. विशेषतः एखाद्या रिसॉर्टवर गेल्यावर त्याला तेथे चांगली वागणूक मिळाली, चांगले पिणे झाले, चवदार खाणे मिळाले व एकूण छान सर्व्हीस मिळाली की त्याच्याकडून ते वर्णनं ऐकावे. जणू आपणही त्याच्या सोबत राहून तो आपणास फिरवीत आहे, अश्या तर्हेने त्याचे बोलणे असते. मग तो आपण कसा गेलो, कधी पोचलो, तेथील मुलांनी उत्तम हॉटेलचा रस्ता कसा दाखवला, मग आतले वातावरण तेथील कर्मचारी, भेटायला आलेला म्यानेजर ह्या सर्व बाबी तो डोके हलवीत इतक्या बारकाईने सांगतो की त्यावेळी त्याचे डोले चकाकत असतात. जणू नुकताच आस्वाद घेत असल्याप्रमाणे त्या गोडीने त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात. इतका तो खाण्याचा शौकीन आहे. आणि हे शोक पुरवणारे आणि कंपनी देणारे त्याला मित्रही बरेच आहेत. तसा सुधाकर हा बराचसा बेफिकीर होता. मी त्याला गोवा विद्यापीठाच्या परीक्षांसाठी घेतले, तेव्हां आम्हांला गोवा कॉलेज ऑफ आर्ट मध्ये जावे लागत असे. तेथिल महेश वेंगुर्लेकर, राजू शिंदे हे स्टाफ आमच्यासाठी तेथे गेल्यापासून आमच्या दिमतीला असत. मी जितका शिस्तप्रिय तितकाच सुधाकर बेफिकीर. आम्ही गोव्यात बस स्टॅण्डवर उतरलो की मी धावाधाव करून रिक्षा मिळवण्याचा प्रयत्न करीत असे. मात्र सुधाकर शांतपणे आजूबाजूला पहात उभा असे. एखादी रिक्षा मिळाले की मी ती पकडून पट्कन आत शिरे पण हा शांतपणे डुलत डुलत आत येई. मला निघताना सर्कीट हाऊस चे बिल भरायला जायचे असे. पण सुधाकर मला हाताने खूण करून शांतपणे जाऊया म्हणत असे. कित्येकदा त्याचा हा शांतपणा मलाच असह्य होई. माझ्या स्मरणशक्तीच्या देणगीमुळे मला बारीकसारीक गोष्टी आठवणीत राहीत, पण हा आताची गोष्टी विसरून जाई. आठवण करून दिली, तर पुन्हां तेच येरे माझ्या मागल्या! मी सकाळी अंघोळ करून, सर्व आटोपून तयार होत असे. आणि सुधाकर गोव्यातील सुशेगात पणे सावकाश तयार होत असें. नंतर चकाचक कपडे करून तयार झाला की आम्हांला न्यायला राजू शिंदे हजर होत असे. एकदा का मुलांच्या डिस्प्ले झालेल्या कामावरून सुधाकरची नजर फिरली की झपाटयाने तो त्यातील मह्त्वाचे मुद्दे आत्मसात करीत असे. अन मग आमचा व्हायव्हा सुरु झाला की एकेक विद्यार्थी समोर आला की सुधाकर त्यांच्याच कामातील मुद्द्यावरून त्यांना बोलके करीत असे. हे सर्वच विद्यार्थी बहुदा इंग्लीश माध्यमातील असत. आणि जाहिरातीतील नेमक्या विक्रीकेंद्राला उद्देशून त्यातील कमतरता सुधाकरने दाखविल्यावर त्या विद्यर्थ्यानाही ते मनोमन पटत असत. अशी विद्यार्थ्यांची मने तो जिंकत असे.
मात्र सुधाकरचा एक गुण म्हणजे अगदी कौतुकाचा आहे, आणि तो म्हणजे गोष्टी पोटात ठेवणे. माझ्या जीवनात एखादी लहानशी गोष्ट जरी घडली, तरी मी तिचा गाजावाजा करीत जवळच्यांना सांगीतल्याशिवाय मला चैन पडत नसे. तीही अगदी साग्रसंगीत. पण सुधाकर तीच गोष्ट अगदी सांगण्याची वेळ येईल तेव्हांच सांगतो. याचे एक मजेशीर उदाहरण सांगतो. एकदा विरारच्या हितेंद्र ठाकूर कडून मला निरोप आला. मी गेलो तेंव्हा कळले की त्यांना एक नवीन आर्ट स्कुल सुरु करायचे आहे. आणि ते काम तुम्ही करायचे आहे. बऱ्याच लोकांनी तुमचे नांव सांगीतले आहे. मी त्यांना सांगीतले की हे एकट्याचे काम नाही. सुदैवाने माझ्याकडे बरेच लोक आहेत ज्यांचा आपल्याला उपयोग होईल..पण तुम्हांला सुरु करायचे असल्यास, शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारीत करू नका. तर आपण याची सुरुवातच एक डिझाईन स्कुल म्हणून करू. व आरंभालाच त्याला वरच्या दर्ज्यावरून सुरु करू. आणि मी पहीला संपर्क केला तो माझ्या जवळच्या मित्राला-सुधाकरला. माझी कल्पना त्याला सांगीतली. दरम्यान माझे त्यावरचे प्रोजेक्ट सुरु केले. मधून मधून झालेल्या सुधारणा मी त्याला कळवीत असे. आणि एक दिवस मला त्याच्याशी बोलणे करायचे होते. त्यावर त्याने बाहेर एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तेथे गेल्यावर मी त्याला कोणाकोणाशी संपर्क साधला, प्रोजेक्ट कसे तयार केले हे मी रीतसर सांगून झाल्यावर सुधाकरने मला सांगीतले, 'राजा, माझ्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? मी आता अश्या वरच्या स्टेजवर आहे की कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाही'. मी ओळखले त्याला काय म्हणायचे आहे. पुढे मिस्कील हसत त्याने म्हटले, अरे, तुझ्याआधी मला त्यांनी ते आर्ट स्कुल सुरु करण्यासाठी बोलावले होते. माझा विदयार्थी अनिल ठाकूर मला तेथे घेऊन गेला होता. मला तो एका लग्नात भेटला. तो ठाकूरांच्या अगदी जवळचा आहे. पण ते नवीन करणे मला झेपणार नव्हते. म्हणून मी नकार दिला. तो सांगत होता आणि मी ऐकत होतो. मी पहील्या दिवसापासून याला माझ्या सर्व घटना सांगत होतो, आणि याने बिलकुल जाणवून दिले नाही की आपणही तेथे जाऊन आलो आहे. आहेना माणसाच्या पोटात किती गोष्टी लपून ठेवता येतात! यशस्वी होण्यास हा गुण आवश्यक आहे!
आता त्याचं मुलगा जाहीरात क्षेत्रात आहे. दोन्ही कन्या व्यावसायिक आहेत. नातवंडे झाली आहेत. तृप्तपणे त्याने आता जाहीरात कामातून निवृत्ती घेऊन आपले छंद जोपासण्यास सुरुवात केली. एके दिवशी त्याने फेसबुकवर आपण केलेले एक पेंटींग पोस्ट केले. त्यानंतर त्यानें बरिच पेंटींग केली. आपल्या गोरेगावच्या घरी तो गणपती आणीत असे. तो पोचवायला त्याला आरे कॉलनीकडे जावे लागे. नंतर त्यानें तो आपल्या घरीच एका टबमध्ये पोचवण्यास सुरुवात केली. नंतर त्याच्या मातीची काय करावें हा विचार त्याच्या मनात आला. आणि प्रथमच त्यानें त्या मातीतून छोटेसे शिल्प निर्माण केले. आणि पुढें त्याला तो नादच लागला. त्यानंतर त्याने अश्या प्रकारे मातीकाम करणाऱ्यांकडून माहीती करून घेतली.नंतर त्याच्या ध्यानात आले की त्याला सुकल्यावर तडे जातात. तेव्हां त्यांना भट्टीत भाजावे लागते. तेही त्याने जाणकाराकडून आत्मसात केले. आणि मग सुधाकरच्या हातातून एकेक सुन्दर अशी शिल्पे निघू लागली. त्याची प्रतीभा बहरू लागली. त्याच्या घरी त्याने आपला शिल्प कामाचा स्टूडीओ केला आहे. आता त्याचा संपूर्ण दिवस त्या स्टुडिओत जातो. आता तर तो एक शिल्पकार म्हणून ओळखला जात आहे. मंदा वहीनी त्याची देखभाल उत्तम रित्या करीत असतात. आणि त्याला कधी मित्रमंडळींकडून संधी मिळाली तर लाईफ एन्जॉय करण्यासाठी तो कोठेही जायला तत्पर असतो. आमच्या आता प्रत्यक्ष भेटीगाठी होत नाहीत. फोनवर आमचे सतत संभाषण होत असते. नवीन सिनेमा पाहीला की त्याचे परीक्षण आम्ही एकमेकांकडे करीत असतो. एकमेकाला आवडलेले फायर स्टिक वरील चित्रपटांची माहीती एकमेकांना देत असतो. कधीतरी भेट होते व त्यावेळी आम्ही आमच्या लाडक्या जे.जे.च्या काळातील सुवर्णयुगात जात असतो. तेव्हां आम्हांला आमचे लाडके शिक्षक केंकरे सर, साठ्ये सर, षांताराम पवार सर, तिरोडकर सर आमच्यासोबत असतात. कधीतरी डॉ. रेगे सर त्यात सामील होतात. आमचे विद्यार्थ्याप्रमाणे बौद्धीक घेत असतात. मधूनच आमच्या फिरक्या घेतात. आणि आम्ही तें क्षण हळुवारपणे जपून अलगद आमच्या हृदयात सांभाळून ठेवतो! एक नवलाखाची ठेव समजून.
प्रा. मं.गो. राजाध्यक्ष
rajapost@gmail.com
Comments
Post a Comment