'My Rooted Friends'




नुकतेच वरळीच्या नेहरू सेंटर कला दालनात भरलेले वरील विषयावरचे माझे झाडांच्या चित्रणाचे प्रदर्शन संपले. वाटले नव्हते कधीकाळी मी एखाद्या नामांकीत गॅलरीत माझे प्रदर्शन भरवेन. कारण गॅलरीचा आकार पहाता तो एकदम अंगावरच यायचा. आणि आम्हां उपयोजीत कलाकारांची कामे लहान आकारातील. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात काम कसे होईल. त्यामुळे प्रदर्शनाचा विचारच माझ्या कधी मनात आला नव्हता.

पण निवृत्त झाल्यावर मी बाहेरील कामे जवळ जवळ बंदच  केली. कारण आताची नवीन टेक्नॉलॉजी. ज्यामध्ये मी अशिक्षीत होतो. तरी माझ्या मुलांकडून पोटापुरते जुजबी संगणकी ज्ञान मी मिळवले होते. पण माझा हात सतत चालूच होता. स्केचिंगची आवड मला लहानपणापासूनचीच! माझ्या हाताला तो चाळाच असे. कळत नकळत माझ्या हातून कोठेही बसलो तरी स्केच करणे सुरूच असे. जे माझ्या दृष्टीसमोर दिसे, तेते मी कागदावर आणण्याचा प्रयत्न करीत असे. आणि याला एकमेव व्यासपीठ म्हणजे सोशल मिडीया. फेसबुकवर अथवा इंस्टाग्रामवर मी नेहमी माझी चित्रे आणि लिखाण टाकू लागलो. चित्रे तर मी विविध माध्यमात व विविध पृष्ठभागावर काढु लागलो. मध्ये तर मी वृत्तपत्रावर देखील चित्रे काढली. व बऱ्याच जणांना ती आवडू लागली. विषयाची गरज मला कधी पडली नाही. घरात असलेली विविध भांडी, शोभेसाठी असलेले प्लांटस, घरातील माणसे आणि घराबाहेर दिसणारी विविध प्रकारची झाडे हे खास करून मझ्या चित्रांचे विषय ठरले. आणि अर्थातच झाडांच्या प्रति माझे प्रेम जरा जास्तच होते. मी वाढलो तेच झाडांच्या वनराईत. मी लहानपणी पुस्तके वाचण्यासाठी झाडावर चढून बसून ती वाचत असे. आणि हल्ली आम्ही नुकतेच खार या उपनगरात रहायला आलो, अन तेथे अतीशय सुंदर झाडी मला पहायला मिळाली. आमच्या बाल्कनीसमोरच अनेक वृक्ष आहेत, ज्यांनी मला मोहीत केले. रोज सकाळी बाल्कनीत मी व माझी पत्नी चहा घेत बसलो असता त्या झाडांचे पेनने स्केच करण्यात मी रमू लागलो. तो महीना होतं जून २०२२.

 


हळू हळू त्या परीसरातील एकेक झाड त्याच्या विषीस्ट रूपात, शैलीत आणि मनमोहक अवतारात माझ्या नजरेत भरू लागले. अलगद माझ्या स्केच बुक मध्ये स्थानापन्न होऊ लागले. मला एक मानसीक समाधान देऊ लागले. हे पहाण्यास दोन रसिक सतत असत. ते म्हणजे माझी पत्नी भारती आणि माझा मुलगा हर्षद. आणि अचानक एक दिवस हर्षद म्हणाला, 'पपा, ही तुमची झाडे इतक्या सरसपणे उतरत आहे की त्यांना केवळ स्केचबुक मध्ये बंदीस्त ठेवू नका. त्यांना जरा मोकळा श्वास घेऊ द्या. आणि त्याने मला 'ब्रेस्ट्रो' चे A3 साईझचे कागद व स्टेडलरचे वेगवेगळ्या साईझचे पॉईंट आणून दिले. कागदाचा पृष्ठभागच इतका सुरेख होता की त्यावर पेनची लाईन ओढण्याचा मोह आवरत नव्हता. किंचितसा खडबडीत पृष्ठभाग असलेल्या त्या कागदावर मी माझ्या चित्रांचा आकार ठरवला. आणि तबल्यावर जशी सुरेल थाप पडावी तसा माझे पेन त्यावरून अलगद चालू लागले. मग मात्र मी या निरनिराळ्या झाडांची चित्रे काढण्यात इतका हरकून गेलो की त्या परीसरातील, उद्यानातील, एवढेच नव्हे तर माझ्या मोठ्या मुलाने- केतन याने मला त्याच्या बाईकवर बसवून पार पाली हील ते सांताक्रूझ, जुहू, वर्सोवा, खार अश्या सर्व ठिकाणची झाडे फिरवून दाखवली. माझी नजर ती टिपत गेली. झाडांची विविध रूपे मी पाहीली.एखाद्या संन्यस्त ऋषीप्रमाणे तप करणारी, आंघोळ करून आपले केस सुखावणारी ललना, आलिंगनासाठी उत्सुक असलेली तर कधी शेजारील पिंपळाच्या पारंब्यांना खांद्यावर टाकून  एखाद्या वारकऱ्याप्रमाणे  रुबाबात उभे असलेली अशी नाना तर्हेची या झाडांची रूपे मी पाहीली. त्या झाडांचा पोत पाहीला, त्यांच्यातील संस्कारक्षम मन पाहीले. त्यांच्याशी संवाद साधला. आणि या झाडांची व्यक्तीचित्रे माझ्या कागदावर उमटत गेली. दिवस गेले, आठवडे गेले, महीने गेले अन वर्षही सरले माझा पोर्टफोलिओ भरत आला होता. अश्यातच नेहरु सेंटर कला दालनाच्या संचालीका व माझी वर्ग भगिनीं नीना रेगे माझ्या घरी आल्या. मी सहज त्यांच्यापुढे माझा पोर्टफोलीओ सरकवला. त्यानी त्यातील एकेक चित्र न्याहाळून पाहीले. व अचानक मला म्हणाल्या, राजा, वयाच्या ७९ व्या वर्षी तू ही सुंदर चित्रे काढतोस, ती लोकांना पाहू दे. तुझ्या चित्रांचे प्रदर्शन भरव. मी तुला गॅलरी देते. आणि मी हादरलोच! प्रदर्शन करणे ही कल्पनाच मी कधी विचारात आणली नव्हती. पण नीनाचा सतत आग्रह सुरु झाला. मग काय, घरचे पण आग्रह करू लागले. अर्थात ते माझे पहीले प्रेक्षक होते. मग धीर करून मी एकदाची गॅलरी बुक केली. आणि आता मात्र माझ्यावरील दवाब वाढला. संपूर्ण गॅलरी भरेल एवढी चित्रे काढणे, तीही प्रत्येक चित्र संपूर्णपणे वेगळे. त्यात पुनरावृत्ती नको. आणि माझी चित्र साधना अविरत सुरु झाली. या माझ्या साधनेमागे माझे सर्व कुटुंब सामावले होते. माझी पत्नी भारती, माझे दोन्ही चिरंजीव केतन व हर्षद, माझी सून पूजा व सर्वात माझे प्रदर्शन व्हावे म्हणून मागे लागलेली माझी गोड नात सिमरन हे सर्वच माझी चित्रे दर्जेदार व्हावीत म्हणून आग्रही असत.  डिसेम्बर२०२२ पर्यंत बहुदा सर्व चित्रे तयार झाली. 



पुढे २०२३ च्या एप्रील पर्यंत चित्रांनी शंभरी पार केली. एकेक महीना सरत होता, तसा पोटातील गोळा वाढत होता. मग आले चित्रांना फ्रेमींग करण्याचे काम. अन मला बांद्र्याच्या महम्मद रफी चौकात 'रॉयल फ्रेम' नावाचे दुकान दिसले. आतमध्ये एक हसतमुख गृहस्थ होते. मोहनभाई नावाचे. ते पेंटिंग्जना फ़्रेम करणारे निघाले. व त्यांनी आकर्षक अश्या रेखीव फ्रेम करून दिल्या. हर्शदने पोस्टर, आमंत्रण पत्रिका, व्हिजिटिंग कार्ड्स याचे डिझाईन तयार केले, तर केतनने सिल्व्हर पॉईंट या नामांकीत प्रेस मध्ये त्याची छपाई करून दिली.  आणि ही सर्व पोस्टर्स व आमंत्रणे मी स्वतः प्रत्येक आर्ट स्कुल मध्ये, प्रत्येक ग्यालरीमध्ये लावण्यास दिली. हेतू हा की तेथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आवर्जून हे प्रदर्शन पहाण्यास यावे.


आणि शेवटी तो दिवस उजाडला. ११ सप्टेंबरच्या संध्याकाळी आम्ही सर्वजण गॅलरीत अवतरलो. एकदा का चित्रांची मांडणी योग्य रित्या करून दिली की गॅलरीतील माणसे ती सहजपणे वर चढवतात. व तेथील दिपक त्यात माहीर होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता उदघाटनाची वेळ आली. मनात एक धुकधुक होती. आमंत्रणे तर दिलीच होती. त्यात आदल्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचीही भीती होतीच! पण माझ्या प्रदर्शनाला यशस्वी करण्याचे ठरवून पावसानेही त्या दिवशी थोडी उसंत घेतली. व एकेकजण जसे येवू लागले, तसे माझ्यावरील दडपण संपले. अन पहाता पहाता सर्वच हजर झाले. अन नीना रेगेनी समई प्रज्वलीत करून माझ्या 'My Rooted Friends' या प्रदर्शनाचे उदघाटन केले. आणि थोड्याच वेळात सर्व पूर्वीची  जे.जे.उपयोजीत कला संस्था व ज.जे.स्कूल ॲाफ आर्ट येथे हजर झाली. अरुण काळे, सुधाकर खांबेकर, वसंत सोनवणी, दत्ता सावंत, किरण आषर, समीर खानझोडे, गंगाधरन मेनन, सुप्रसीध्द सुलेखनकार अच्युत पालव या सारखे बहुदा फोनवर भेटणारे दिग्गज  आज प्रत्यक्ष भेटले. दत्ता सावंत सारखे सुमारे चाळीस वर्षांनी भेटले. आणि रोजचा हा उपक्रम सुरू झाला. खास पुण्याहून पुरूषोत्तम बेर्डे आले. दुसऱ्याच  दिवशी  पुरुषोत्तम बेर्डे यानी महाराष्ट्र टाइम्स मधुन या प्रदर्शनाविषयी लिहील्यावर सामान्य जनही या झाडांच्या ओढीने येथे येऊ लागले. रोजचा हा गर्दीचा ओघ सुरु झाला. रोज नवीन नवीन विद्यार्थ्यांच्या  बॅचीस येवू लागल्या. आपण कोणत्या वर्षी होते याची आठवण देवू लागले. बरेचसे चेहरे ओळखू येत होते. कांही आठवावे लागत होते. अनेक संस्था व त्यांचे अध्यापक व  विद्यार्थी हजेरी लावू लागले. त्यांच्याशी संवाद साधत, फोटो काढत वेळ कसा जात असे समजत नव्हते. जेवायलाही वेळ मिळत नसे. यापैकी कित्येकजण मला भेटण्याच्या ओढीने देखील येत असत, व आपली पूर्वीची ओळख देऊन जुन्या आठवणी जागृत करीत असत.


या प्रदर्शनाला यशस्वी करण्यात माझ्या सर्व वर्गबंधूंचा, विद्यार्थ्यांचा, हितचिंतकांचा, रसिकांचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांचा सहभाग आहे. माझ्या प्रदर्शनातील चित्रांचा  भाग तर त्यात होताच, शिवाय माझ्यावरील प्रेमामुळे, माझ्या विद्यार्थी प्रती असलेल्या गुरूप्रेमापोटी शेकडो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला व माझी भेट घेण्याला उपस्थीती लावली. आणि येणाऱ्या लोकांमध्ये जसे कला रसीक होते, तसेच जाहीरात क्षेत्रातील दिग्गज अशी व्यक्तिमत्वे होती. त्यापैकी कांही;

काळे ग्रॅफिक्सचे अरुण व अंजली काळे, गंगाधरन मेनन, क्रिडन्सचे सुधाकर खांबेकर, जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता वसंत सोनवणी, कालनिर्णयचे जयेंद्र साळगांवकर, फिल्म निर्माते दिग्दर्शक विनय नेवाळकर, सुनील चव्हाण, राजेंद्र -विशाखा पाटील, वींग कमांडर आनंद शिंदे, सुप्रसीद्ध दिग्दर्षक, निर्माते पुरूषोत्तम बेर्डे, फेमस ॲडव्हर्टायझींगचे  CCO राज कांबळे, अंडर डॉगचे विक्रम गायकवाड, ओगिल्वीचे व्हाईस चेअरमन मधुकर सबनवीस, ओगिल्वीच्या कैनाझ कर्माकर, प्रसीद्ध फूड रायटर व ब्लॉगर कल्याण कर्माकर, सुकेश नायक ओगिल्वी, प्रेम नारायण चीफ  स्ट्रॅटॅजी ऑफिसर ओगिल्वी, महेश परब, ओगिल्वी, हार्षीक सुरय्या, फोटोग्राफर, पेंटर व क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रशांत गोडबोले, निखील मोहन, विख्यात फिल्म मेकर, डायरेक्टर रवी जाधव, क्रिएटिव्ह टॅाकेटीव्ह चॅनलच्या केतकी शाह, सिस्टर कन्सर्नच्या  इरावती व पद्मावती मालेगांवकर, महेश घरत, फिल्म मेकर शैलेश आचरेकर, अम्ब्रेलाचे भूपाल रामनाथकर,  आशुतोष कारखानीस, मोनिशा (ब्रम्हभट) कारखानीस, निखील मोहन,  लिंक ॲडचे समीर खानझोडे,  डी.ॲंड जे.फॅब्रीक्सचे रमेशजी जैन व त्यांच्या पत्नी कल्पनाताई,  मीरा गुलाबचंद,   नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, सोनी चॅनलचे व्हाईस प्रेसीडेंट ओंकार शेंडे  व  शिवसेनेच्या विभाग प्रमुख जुईली शेंडे, 3 D  ॲनीमेटर व क्रिएटिव्ह डायरेक्टर संजय त्रिंबककर, प्रा. नरेंद्र  विचारे, जागतीक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव,  सुप्रसीध्द चित्रकार सुहास बहुळकर, चित्रकार विजय मोहन भाटीया, माजी सह पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी,  शरद कुलकर्णी, रंजन जोशी, ज. जी. उपयोजीत कला संस्थेचे अधिष्ठाता संतोष क्षीरसागर व तेथील अध्यापक प्रा. कृष्णा फुलकुंडावर,  प्रा. शुभानंद जोग, सर जे.जे,स्कूल ॲाफ आर्टचे अधीष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, प्रा. जॅान डग्लस, रचना संसद उपयोजीत कला महाविद्यालयाच्या प्रिन्सिपॉल प्राजक्ता पर्वतीकर व त्यांचा अध्यापक वर्ग , सोफिया पॉलिटेक्निकच्या प्रिन्सिपॉल मीनल कुलकर्णी, विवा कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टच्या प्रिन्सिपॉल संगीता पाटील, विवा कॉलेजचे दोन आधारस्तंभ अनील ठाकूर व राजू वनमाळी. अशी किती किती म्हणून नांवे घेऊ? या शिवाय अजीत जयकर, किशोर जयकर, अजीत नाईक, संजय त्रिंबककर, राज शिंगे, अभिनेते पंकज विष्णू व मानसी पंकज, बाळ जोगळेकर फिल्म्सचे किशोर जोगळेकर व शुभदा जोगळेकर, आणि सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे माझ्या जेजे मधील शिक्षीका व नंतर सहाध्यायी श्रीमती मीराताई करंडे ह्या वयाच्या ९२ व्या वर्षी ठाण्याहून मुद्दाम प्रदर्शनाला आल्या व माझे कौतुक करून मला आशीर्वाद दिला . तसेच पुण्याहून खास आलेल्या माझ्या गुरुपत्नी श्रीमती स्मितावहिनी परांजपे- रवी परांजपे सरांच्या पत्नी, यांनीही प्रदर्शन पाहून कौतुक केले व मी भरून पावलो. आणि पुरूषोत्तम बेर्डेनी महाराष्ट्र टाईम्स मध्ये या प्रदर्शनावर लिहीले ते वाचून तर सामान्य रसीकजन येथे मोठ्या प्रमाणात येवू लागले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारणात व्यस्त असूनही आपले कलासक्त मन राखणारे व कला विश्वात रमणारे उद्धवजी ठाकरे यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावून सुमारे दीड पावणेदोन तास प्रदर्शनाची पहाणी करत व  सर्वांशी गप्पा मारत आनंदात वेळ घालवला.  

 


आणि या प्रदर्शनांत वातावरण निर्मिती करण्यासाठी माझा मुलगा हर्षदा याने पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करून अगदी हलक्या आवाजात लावले होते, ज्यामुळे ग्यालरीत प्रवेश करताच लोकांना झाडांच्या चित्रासोबतच पक्षांची किलबील ऐकू येत असे. ते देखील येणाऱ्यांना एक कुतूहल झाले होते. अनेकजण पक्षी कोठून आवाज करताहेत हे देखील शोधण्याचा प्रयत्न करीत होते. असे हे प्रदर्शन शेवटच्या दिवसापर्यंत सतत गर्दी करीत राहीले. अगदी चित्रे उतरावल्यानंतरही रसीक येत राहीले. आणि येथेच माझे  'माय रूटेड फ्रेंड्स' हें प्रदर्शन यशस्वी झाले!


माझे प्रदर्शन यशस्वी झाले, याचे सर्व श्रेय माझ्या सर्व मित्रांना,  माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांना , कलाकार मित्रांना व माझ्या हितचिंतकांना आहे. नेहरू सेंटर कलादालन नाही म्हटले तरी जरा आडवळणाला आहे. सहजासहजी तेथे कोणी जात नाही. चित्रकलेच्या ओढीने तेथे रसिकांची पावले वळतात. आणि ही पावले वळवण्यात माझे 'My Rooted Friends' यशस्वी ठरले यात शंका नाही. 'तरुण भारत' तसेच 'सामना'  मधून माझ्यावर व माझ्या प्रदर्शनावर लेख लिहून
डॉ. गजानन शेपाळ यांनी या प्रदर्शनाचा आधीच गाजावाजा केला, तेही रसिकांना प्रदर्शनाकडे वळवण्यासाठी कारणीभूत ठरले. तसेच पुरुषोत्तम बेर्डे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' मधुन माझ्या प्रदर्शनाचे गुणगान केले देखील लोकांना येथे येण्यास कारणीभूत ठरले. त्याबद्दल त्या दोघांचा मी आभारी आहे. आता 'My Rooted Friends 2' हे प्रदर्शन भरावे अशी इच्छा माझ्या अनेक चाहत्यांनी व्य्क्त केली. परमेश्वराच्या मनात असेल तर तेही शक्य होईल अशी प्रेमळ आशा व्यक्त करून आपले आभार मानून थांबतो!  

 -प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
rajapost@gmail.com

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’