सर्वांगसुंदर पाडेकर.

 


दत्तात्रय पाडेकर आणि त्यांची लयबद्ध सही ही सर्वच कलाकार, कलाविद्यार्थी, आणि कलारसीक यांच्या ओळखीची आहेच! पाडेकर हे सतत प्रयोगशील असतात. संपूर्ण कलाक्षेत्रात त्यांची चित्रे, त्यांची शैली, आणि त्यातील लयबद्धता याबद्दल माहीती आहे. असे हे पाडेकर सतत चित्रे आविष्कृत करण्यात मग्न असतात, त्यातूनही त्यांची ग्राफिक्स, प्रिन्टमेकींग, निसर्गचित्रे, बोधचित्रे, शिल्प अश्या चित्रकलेच्या विविध दालनातून मुक्त मुशाफिरी सुरु असते. आणि गंमत म्हणजे, निरनिराळी प्रदर्शने, चर्चासत्र, कला महाविद्यालयातून प्रात्यक्षिके, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असलेले पाडेकर पाहणाऱ्याला बहुदा बाहेरच दिसत असतात. म्हणजे यांचा दिवस किती तासाचा असतो, हाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतो, इतके ते चतुरस्त्र आहेत. पेहरावही कसा तर स्वच्छ असा खादीचा पांढरा कुडता आणि पांढरा पायजमा. यात कधीच बदल झाला नाही. किंबहुना ती त्यांची आता ओळख बनली आहे. विध्यार्थी दशेपासूनच बाहेरून संस्थेत मार्गदर्शनासाठी येणाऱ्या चित्रकाराकडूनही त्यांचे कौतुक केले जात असे. आणि यामुळेच थोर चित्रकार व्ही.एस.गुर्जर यांच्याशी त्यांचे अखेरपर्यंत सौख्य राहीले.

 


असे हे पाडेकर आपले कलाशिक्षण संपल्यावर सर ज.जी.उपयोजित कला महाविद्यलयात प्रथम फेलो म्हणुन व नंतर अध्यापक म्हणून काम करू लागले. तेथेही सकाळी ते कॉलेजमध्ये येत तेव्हां प्रथम आपली कॅलिग्राफीची सर्व पेनं स्वच्छ धुवून घेत असत. अर्थात त्यांच्या कला अविष्कारामुळे ते विद्यार्थीप्रिय तर होतेच, शिवाय त्यांची चित्रे बाहेरील प्रकाशनामध्ये छापून येत. तीही विद्यार्थ्यांना आकर्षित करीत असत. आणि त्याखाली मराठीत त्यांनी केलेली ' पाडेकर' अशी धावत्या अक्षरातील सहीचेही विद्यार्थ्यांना आकर्षण असे. आणि काही विद्यार्थी ती सही संस्थेच्या भिंतीवरही रेखाटत. पुढें पाडेकरांनी जे. जे. सोडले व ते टाइम्स ऑफ इंडियाच्या कला विभागात काम करू लागले. त्यावेळी त्यांनी आपल्या बोधचित्रात अनेक प्रयोग केले. तेथेही ते मधली जेवणाची सुट्टी देखील फुकट घालवीत नसत. त्यांच्या जोडीला तेथे सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाशंकर कवडी, शंतनू माळी असे दिग्गज लोक होते. मग त्या सुटीमध्ये अश्याना मॉडेल म्हणून बसवून त्यांची पोर्ट्रेट करणे हा त्यांना छंदच लागला होता.

 


पाडेकर घडत गेले ते त्यांच्या शालेय जीवनापासून. अमलसाड येथील ‘कला विद्यालय’ मधे डी. टी. सी. मध्ये असतांना त्यांची पोर्ट्रेटला सुरुवात झाली. त्यांचे गुरु जशुभाई नायक हे कलात्मक पोर्ट्रेट कसे करायचे त्याची प्रात्यक्षिके देत असत. त्यामुळे पाडेकरांची पोर्ट्रेट पेंटिंगकडे पाहण्याची दृष्टी विकसित होत गेली. आणि पुढे मुंबईला जे.जे. उपयोजित कसा संस्थेमध्ये शिकायला आले असता तेथील सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट त्यांचे प्रेरणास्थान बनले. जे.जे.ला ते एक भव्य असे खुले कलासंग्रह म्हणतात. तेथील भिंतीवरील सतत दिसणारी ए.ए.भोंसुले, त्रिनिदाद, लॅंगहॅमर, व्ही.एस.गुर्जर, गजानन हळदणकर, गोपाळराव देऊसकर, शंकर पळशीकर अश्यांची पोर्ट्रेट्स पाहून त्यांच्या जाणिवा समृद्ध झाल्या. त्यांच्या रंगलेपनाची पद्धत, ब्रशच्या फटकाऱ्यांची नजाकत आणि अचूकता, कपड्यांच्या चुण्या, त्वचेचा रंग याच्या सतततेच्या निरीक्षणाने नवनवीन गोष्टी त्यांच्या मनात रुजल्या. निसर्गचित्रासाठी पाडेकर अनेक ठिकाणी प्रवास करीत असत. त्यावेळी त्यांच्यातील चित्रकाराला आकर्षित करणारी अनेक व्यक्तिमत्वे त्यांच्या नजरेला येत असत. आणि त्यापैकी कित्येकांना पाडेकर चित्र काढण्यासाठी बसण्याची विनंती करीत. तेही आनंदाने त्याला संमती देत.

 


पाडेकरांनी अमर्याद पोर्ट्रेट्स केली. त्यामध्ये विविध प्रयोग केले. अनेक माध्यमं हाताळली. त्यामध्ये ते सतत नाविन्याचा शोध घेतं राहीले. त्यामध्ये सौंदर्य आणि कलात्मकता हवी याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष्य असते. आणि इतर सर्व कलाप्रकारामध्ये त्यांना पोर्ट्रेट मध्ये विशेष रस आहे. ते त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे. त्यांची चित्रप्रक्रिया समोर मॉडेल बसले की सुरु होते. समोर बसलेल्या व्यक्तीची प्रतीमा ब्रशच्या फटकाऱ्यासह चित्ररूपात दिसू लागते. आणि चित्राविष्कार घडू लागतो आणि पाडेकर चित्रनिर्मितीचा आनंद आणि समाधान घेतात. पाडेकरांनी व्यावसायीक पोर्ट्रेट्स केली नाहीत. स्वानंदासाठी केलेल्या पोर्ट्रेटप्रमाणे त्यात पूर्ण स्वातंत्र्य घेता येत नाही.


पाडेकर यांनी कला निर्मिती आणि कला निरीक्षण यासाठी देश अन अनेक परदेश पाहीले. तेथील कला संग्रहालये पाहीली. लंडनमधील 'नॅशनल पोर्ट्रेट्स गॅलरी' तसेच बी. पी. टी. पोर्ट्रेट अवार्ड्सचे प्रदर्शन त्यांनी पाहीले. त्यातील कलात्मकता आणि अभिजातता पाहण्याची संधी त्यांना मिळाली. आणि यातूनच पाडेकरांची पोर्ट्रेट्स बद्दल अनुभूती विकसित होत गेली. पाडेकर सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांना गुरुस्थानी मानतात. एकदा बोलता बोलता ते पाडेकरांना म्हणाले, 'तू तुझ्या पोर्ट्रेट पेंटिंग्जवर एक पुस्तक करावस असं मला वाटतं!' आणि पाडेकरांनी हे गांभीर्याने घेतले. त्यांनी आपण केलेली पोर्ट्रेट्स शोधायला सुरुवात केली. आणि त्यातून त्यांना बरेचसे पोर्ट्रेट्सचे धन सापडले. ती सर्व पूर्वीची पोर्ट्रेट्स पाहतांना जो त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद अनुभवायला मिळाला तो केवल अवर्णनीय होता. आणि त्यातून सुरु झाली निवडक अशी पोर्ट्रेट्स निवडण्याची प्रक्रीया.

 


आणि यामध्ये त्यांनी निवडली ऑइल कलर, पोस्टर कलर, पेस्टल कलर, वाॅटर कलर, इंक अश्या विविध माध्यमातील समोर मॉडेल बसवून केलेली ५७ पोर्ट्रेट्स. आता गरज होती ती त्यासाठी ह्या सर्व व्यक्तिचित्रणांना कोंदण देण्याची, अर्थात योग्य न्याय देणारा प्रिंटर शोधण्याची. आणि ती गरज पुरवली एके काळचे पाडेकरांचे जे.जे.मधील सहकारी जयप्रकाश खांडेकर यांनी. त्यांचा आधुनीक आणि नवीन तंत्रज्ञानाची मशीनरी असलेला प्रेस व खांडेकरांची कलात्मक दृष्टी. हार्डकव्हर, आर्ट पेपरवर छपाई होणाऱ्या या पुस्तकाच्या चित्रांच्या प्लेट्स जेव्हां तयार झाल्या तेव्हां पुन्हां एकदा पाडेकर व त्याचे जागतीक कीर्तीचे कलाकार चिरंजीव देवदत्त या दोघांनी पुन्हां त्या प्लेटवरून प्रिंट घेऊन ती मूळ चित्राप्रमाणे तंतोतंत व्हावीत यासाठी प्लेटवर पुन्हा सुधारणा करून नवीन प्लेट्स बनविल्या. व त्या प्लेट वरून या पुस्तकाची छपाई करण्यात आली. आणि त्यातून तयार झाले पाडेकरांचे '‘पोर्ट्रेट्स- दत्तात्रय पाडेकर’' हे सर्वांग सुंदर व संग्राह्य असें पुस्तक तयार झाले. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या केवळ ५०० पुस्तके त्यांनी छापली. यापुढे त्याची आवृत्ती निघणार नाही. यामुळे त्यांचे पुस्तक घेणाऱ्याला पाडेकरांची सही व ती कितवी प्रत आहे, याची नोंद असणार आहे. व हे पुस्तक संग्राह्य बनले. या आर्टपेपरच्या ६०० पानी पुस्तकाची किंमत आहे रुपये १०००/ व टपाल खर्च रुपये १००/ असे एकूण ११००/ रुपये.

खरोखरीच पाडेकरांचे हे एक अतुलनीय कार्य आहे. आणि आरंभाला त्यांनी आपले मनोगत सांगीतले आहे, त्यातून आपला संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला आहे. यात आपल्याला पाडेकरांच्या शैलीतून आपल्या ओळखीच्या विविध व्यक्ती तर आढळतातच. शिवाय पाडेकरांच्या विशिष्ट रंगसंगतीने त्या अधीक उठावदार दिसतात.

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
rajapost@gmail.com




Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’