मुंबई पोलीसातील एक मानवतावादी, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी मैत्री साधणारा सहाय्यक पोलिस आयुक्त : अविनाश धर्माधिकारी
आज मुंबई पोलीस खात्यात एकापेक्षा एक असे कर्तबगार पोलीस अधिकारी आहेत. पोलीस सेवेत असताना त्यांचा दिवस सर्वसाधारण माणसाप्रमाणे चोवीस तासांचा नसून तो चक्क छत्तीस तासांचा असतो. पोलीस अधिकारी हा कधीच रिकामा दिसत नाही. कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याची उकल त्यांना सतत करावी लागत असते. त्याशिवाय रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासोबतच कायदा व सुरक्षितता यांचेही रक्षण करावे लागते. या त्यांच्या मानसीक तणावामुळे कित्येकदा एखादा माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढल्यावर कदाचित दुखावला जातो. पण पोलीस खात्यातील अधिकारी वर्ग मात्र जनतेची मानसीक परिस्थिती जाणून त्यांच्या मनाला दुखावेल अशी कोणत्याही तऱ्हेची गोष्ट न करता शांतपणे, हळुवारपणे त्याच्याशी संभाषण साधून त्याच्या मनातील दुःखावर फुंकर घालतात. पण बहुतेक वेळा सामान्य लोकांचा या अधिकारी वर्गाशी फारसा संबंध येत नाही. त्यांचा बहुतेक संबंध येतो तो रस्त्यावरील हवालदाराशी, पोलीस शिपायाशी आणि त्यात कांही वेळा लोकांना कांही पोलिसांचा अनुभव बरा आलेला नसतो. व त्यावरून जनता सर्वच पोलीस खात्याबद्दल आपले मत बनवते. आणि हा पोलीस शिपाई त्या खात्याचा चेहरा होतो. आणि जनता व रात्रंदिवस जनतेसाठी झटणारा पोलीस यामधील ही दरी दूर व्हावी, त्यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी समाज-पोलीस जागृती करण्यास कांही अधिकारी सतत प्रयत्न करीत असतात. अनेक उपक्रम करून दोघांमध्ये मैत्रत्व आणण्याचा प्रयत्न करतात. आणि लोकांना पोलिसांबद्दल विश्वास, मैत्री निर्माण करून त्यांच्यात एक वेगळा विश्वास दृढ होतो. अश्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अविनाश धर्माधिकारी.
आज अविनाश धर्माधिकारी हे नांव ते ज्या ठिकाणी जातात तेथे आदराने घेतले जाते. आपल्या अख्यत्यारीतील पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यास ते निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक नामवंतांना बोलावून त्यांची व्याख्याने आयोजित करतात. अनेक समाजोपयोगी संस्थांशी ते संबंध ठेवून असतात. अलीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध महिलांनी सक्षम होऊन त्याविरुद्ध लढावे, तसेच अश्या गोष्टी निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवावा य हेतूने धर्माधिकारी यांनी 'महीला सक्षमीकरण आणि सुरक्षा' यासाठी एक अतीशय सुंदर विचार मांडला. त्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनच्या परिसरातील महीलांचा एक व्हाट्सअप ग्रुप बनवला. त्याचे नांव ठेवलं आहे 'निर्भया पथक '. सदर 'निर्भया' ग्रुप हा पोलीस अधिकाऱ्यांसोबत जोडला आहे. यामुळे कोणत्याही महिलेला आपली तक्रार थेट नोंदवणे सहज शक्य व्हावे. पोलीस आणि समाज यामधली दरी बुजवावी, त्यांच्यात सौहार्दाचे, मैत्रत्वाचे वातावरण निर्माण व्हावे, त्यांच्यात सुलभ संवाद घडावा या हेतूने धर्माधिकारींनी हा एक स्तुत्य उपक्रम सुरु केला. त्यासाठी वाकोला पोलीस स्टेशनच्या परिसरात एक परिसंवाद आयोजीत केला. यामध्ये 'निर्भया' पथकाच्या प्रमुख श्रीमती कीर्ती जाधव, वाकोला पोलीस स्टेशनच्या तडफदार प्रमुख अधिकारी श्रीमती सुनयना नटे यांचा मौलीक सहभाग लाभला. आज अनेक महीला त्याचा लाभ घेत आहेत. स्त्रियांवरील अत्याचारांच्या व गुन्ह्याच्या घटना वाढत असताना या प्रकारचे उचललेले पाऊल खरेच कौतुकास्पद आहे. या निर्भया पथकातील स्त्रियांच्याही पोलीस महीला अधिकारी सतत संपर्कात असतात. यावेळी धर्माधिकारी यांनी महिलांना एक छान असा संदेश दिला की, ' आपण आपल्या विभागीय पोलीस ठाण्याच्या महीला पोलीस अधिकारी तसेच महीला कर्मचारी यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी परीचय वाढवावा. त्यामुळे विभागातील गुंड प्रवृत्तीचे लोक, समाज कंटक आपोआपच आपल्याला दबकून वागतील. चुकूनही आपल्या वाटेला जाणार नाहीत. एखाद्या महिलेचा पती जर का दुराचारी असेल, अत्याचारी असेल तर तोही घाबरून राहील.
धर्माधिकारींचे चौफेर लक्ष्य असते. केवळ कार्यालयीन कामापुरतेच नसुन एखाद्याला जर कां कठीण प्रसंगाला तोंड द्यायचे असले व त्याची बाब धर्माधिकारी साहेबाना कळली तर त्याची गाठ घेऊन श्यक्यतो त्याची अडचण निवारण करण्याकडे त्यांचा कल असतो. मध्यन्तरी अश्याच एका ६२ वर्षीय आजीबाईंबद्दल त्यांना कळले. पती निधनानंतर त्या आपल्या मुलीसोबत धुणी भांडी करून त्या रहात असत. कांही दिवसांनी मुलीने आपले रंग दाखवून तिला घराबाहेर काढले. ज्या कोणाकडे ती काम करित असे, त्यालोकांनी जेवणखाण दिले. पण आसरा मिळत नव्हता. अशीच वणवण करीत एकदा त्या विलेपार्ले पोलीस ठाण्यावर पोचल्या. तेथील पोलीस निरीक्षकांनी सदर बाब सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांच्या कानावर घातली. धर्माधिकारी यांनी तीची नीट विचारपूस करून कोरोना चालू असल्यामुळे मुंबई पोलिसांतर्फे तिच्या जेवणाची सोय केली. ड्युटीवर येताना प्रत्येक पोलीस डब्यात आजीसाठी पोळी भाजी आणत असे. दरम्यान धर्माधिकारी यांनी मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमाचे संचालक श्री विजय जगताप यांच्याशी संपर्क साधून आजींच्या पुढील आयुष्याची सोय करण्याची शिफारस केली. व कुसवली येथे अनाथ व निराधारांसाठी उभारलेल्या वृध्दाश्रमाला एका आजीबाई मिळाल्या. तेथील आजी आजोबानी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. पोलीस स्टेशनवरून जातांना त्या आजींच्या डोळ्यांत केवळ पोलिसांबद्दल कृतद्न्यता होती.
माधवी गोंबरे हिची देखील कथा अशीच आहे. घाटकोपरच्या झुनझुनवाला कॅालेजमधून बी एम एस केलेल्या माधवीला द्वितीय वर्षांला असताना तिच्या कॉलेजने विद्यार्थीनींसाठी एक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणासाठी कार्यक्रम ठेवला होता. यावेळी माधवीतील बॅाक्सींग खेळातील गुण तिच्या शिक्षकांनी हेरले. यानंतर तिला कांदिवली येथे अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळाले. पुढे कॉलेजतर्फे तिला जिल्हा स्तरावर खेळण्यास पाठविले. तेथें सुवर्ण पदकं जिंकलेल्या माधवीला पुढे राज्यस्तरीय स्पर्धेला पाठविले. पुढे आंध्र प्रदेशात जागतीक किकॅक चॅम्पिअनशिपसाठी तिची निवड झाली. जेथे तिने ब्रॉन्झ पटकावले. माधवीचे प्रत्येक पावूल तिला तिच्या ध्येयाकडे पोचवित होते. नंतर तिने चेस बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदकं जिंकले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेस बॉक्सिंग ॲम्याच्युअर स्पर्धेसाठी तिची निवड झाली. पण यावेळी तिची आर्थिक परिस्थिती आड आली. गरीब घरातील माधवीचे वडील ती शाळेंत असतानाच अपघातात निधन पावलं होते. आई शाळेत शिपाई म्हणून दरमहा ४५०० रुपये मिळवीत होती. आणि स्पर्धेची प्रवेश फी होती ३०.०००/-
माधवीने अनेक राजकीय नेते, अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, पण अल्पशी रक्कम जमा झाली. आणि धर्माधिकाऱ्यांच्या एका मित्राने ही हकीकत त्यांच्या कानावर घातली. आणि अचानक एक दिवस माधवीच्या घरी पोलीस ठाण्यावरून तिच्या आईला फोन आला की तिच्या मुलीला सोबत घेऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर यावे. अर्थातच प्रथम माधवीची आई गडबडली. पोलीस ठाण्यावरून फोन म्हणजे काय समस्या निर्माण झाली आहे, माहीत नाही. थोडेसे घाबरतच त्या दोघी पोलीस ठाण्यावर जाताच त्यांना सुखद असा धक्का बसला. तेथे धर्माधिकारी यानी त्यांचे स्वागत केले. माधवीची बॉक्सिंग मधील प्रगती, तिने मिळवलेली सुवर्ण, रौप्य, ब्रॉन्झ पदकानी ते खूष झाले होते. त्यांनी कांही सामाजीक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक कार्यक्रम आयोजीत केला. इतक्या लहान वयात माधवीने मिळवलेले स्पृहणीय यश पाहून सर्वांचेच मन हेलावले. आणि केवळ स्पर्धेपुरतेच नव्हे, तर तिला पुढील आयुष्यात तिच्या शिक्षणासाठी, तिच्या खेळासाठी मद्त करण्याचे सर्वानी ठरवले. पुढे आपल्याला मिळालेले रौप्य पदक घेऊन ती विलेपार्ले पोलीस ठाण्यावर मुद्दाम भेटण्यासाठी आली. अविनाश धर्माधिकारी यांनी एक प्रकारे माधवीला आकाशात झेप घेण्यास तिच्या पंखांना बळ दिलें हे निश्च्छितच! अश्या प्रकारच्या घटनांनी पोलीसखात्याची प्रतीमा नक्कीच उंचावण्यास मदत करतात.
सध्या देशभर एक नवीन पद्धतीचा लैंगिक प्रवृत्तीचा फायदा घेऊन लोकांना लुटणारा प्रकार सुरु झाला आहे. याला पोलीसी भाषेत सेक्सटार्शन ( Sextortion) असे म्हटले जाते. साध्या भोळ्या माणसाच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन एखादी स्त्री अथवा स्त्रीच्या आवाजातील पुरुष त्याच्याशी फेसबुक वा तत्सम माध्यमातून मैत्री करून त्याच्याशी लैंगीक चाळे करण्याचे प्रयत्न करतो. व त्याला जर का कोणी फशी पडले की त्याचा व्हिडीओ बनवून त्या व्यक्तीला पाठवून मग त्या व्यक्तीला धाक दाखवून त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी ब्लॅक मेल करू लागतात. लाजेमुळे ती व्यक्ती पोलिसांकडे जात नाही. मग पैशांचे हे दुष्टचक्र थांबत नाही. अश्या व्यक्तीकडून पाच पाच सहा सहा लाख रुपये या रॅकेटने वसूल केलें आहेत. आपल्या देशात सध्या ही रॅकेट फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यासाठी त्यांनी खबरदारी घ्यावी यासाठी धर्माधिकाऱ्यांची सतत खटपट सुरु असते. त्यासाठी त्यांनी समाजाला अशी काही सुरक्षा प्रमाण दिली आहेत. यु ट्यूबवर त्यांनी यासाठी सुरक्षा सूचनांचे व्हिडीओ देखील करून टाकले आहेत. त्यापैकी कांही मुद्दे खालीलप्रमाणे,
* लक्षात ठेवा, इंटरनेट कधीही विसरत नाही अथवा क्षमा करत नाही. एकदा का तुम्ही त्यावर कांही टाकले की ते कोणत्या ना कोणत्या रूपाने कायमचे तेथे रहाते.
* इंटरनेटचा वेग आणि त्याची पोहोच ही इतक्या वेगाने पसरते की, कांही क्षणांतच लाखों लोकांपर्यंत तिचा प्रसार होतो. त्यामुळे त्यावर काहीही टाकताना पूर्ण विचारपूर्वक टाका, नाहीतर अश्या पोस्टमुळे आपणास पुढे खूप त्रास सहन करावा लागतो.
* जेंव्हा तुम्ही ऑनलाईन कोणाशी संवाद साधत असता त्यावेळी जर का समोरील व्यक्ती तुमच्याशी नाहक जवळीक साधतं असेल तर तुमच्यासाठी ती एक धोक्याची सूचना समजा.
* कोणाही व्यक्तीला तुमच्या कोणत्याही खासगी अवयवाला कोणत्याही प्रकारे चित्रित करू देऊ नका. अश्या प्रकारची गोष्ट पुढे त्याचा गैरवापर म्हणून उपयोग केला जातो, तो तुमच्या नावलौकिकाला इजा पोचवू शकतो.
याशिवाय ड्रग विरोधी उपक्रम करण्यासाठी त्यांनी 'नशा जागृती मोहीम' यासाठी एक चर्चासत्र 'नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो', यांच्या मार्गदर्शनासाठी कनीष्ठ महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजीत केले. शिवाय शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन, त्यांच्यातील कला-साहीत्य गुणांची जोपासना करण्यासाठी निबंध, ड्रॉईंग, व्याख्यान स्पर्धा असे अनेक उपक्रम त्यांनी सुरु असतातच! शिवाय महाराष्ट्र पोलीसांची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी एक ' डेडीकेटेड सेल' तयार करण्याचा मानस केलं आहे. यामध्ये किमान १२ पोलीस अधिकारी जे सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करतील. या सेलमध्ये पोलिसांच्या प्रशंसनीय कामे व त्यांच्या कामामधील घेतलेल्या उत्साहाबद्दल सर्व माध्यम वापरून त्याला प्रसिद्धी दिली जाईल. आणि हा 'डेडिकेटेड सेल' पोलीस मुख्यालयात स्थापीत करण्यात येईल.
एखाद्या कामाला कसे वाहून घ्यावे, नवीन कल्पनातून कश्या प्रकारे जनता व पोलीस यांच्यात सुसंवाद घडवावा, अडचणीत असलेल्याना धीर देवून त्यांची मानसीक शांती कशी मिळवून द्यावी ह्याकडे धर्माधिकारी यांचा नेहमीच कल असतो. आणि यातून नवीन उपक्रम जन्माला येतात. मध्यन्तरी त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायांना त्यांच्या कुटुंबियांसोबत शिर्डीची सहल घडवून आणली. प्रत्येक कुटुंबाला साईबाबांची मूर्ती भेट देऊन निरोप दिला. हा उपक्रम दिवस रात्र जनतेच्या रक्षणासाठी राबणाऱ्या पोलीसांना काही उत्साहाचे व आनंदाचे क्षण देऊन गेला. स्त्रियांच्या मार्गदर्शनासाठी मुंबई पोलिसांतर्फे 'पोलीस दीदी' कार्यक्रम घेतला जातो. हा कार्यक्रम साकीनाक्याच्या मदरश्यामध्ये घेतला होता. त्यावेळी अनेक मुस्लीम मुली व स्त्रिया यात सामील झाल्या. देशात मोठ्या संख्येने होणाऱ्या स्त्रियांवरील लैंगीक अत्याचारावर हा कार्यक्रम होता. त्यात या महिलांना महीला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
पोलिसांबद्दल कांही लोकांच्या मनात रोष असतो, पोलिसांना ते घाबरत असतात. पण अविनाश धर्माधिकारी यांच्यासारखे पोलीस अधिकारी जेव्हां भेटतात तेंव्हा रखरखीत ऊन्हात थंडगार पावसाचे शिंतोडे अंगावर पाडून समाधान व्हावे असे वाटते.
प्रा. मं.गो.राजाध्यक्ष.
Comments
Post a Comment