भक्ती आणि शक्ती, चारित्र्य आणि चैतन्य यांचा संगम : गुरुजी गोळवलकर

 


'देवाचा शोध की देशाची सेवा' या दोन गोष्टींच्या संभ्रमात एक तेवीस वर्षाचा तरुण पडला होता. या वयातील त्याचे मित्र आपले उमलते आयुष्य सुखासमाधानात, ख्याली खुशालीत वा मौज मजेत घालवीत होते. या तरुणाच्या सभोवतालीही तशी प्रलोभने होती. पण हा युवक मात्र खंबीरपणे त्या लौकीक सुखाना लाथाडून 'देश की देव' या विवंचनेत पडला होता. आत्मोन्नती व मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात जाऊन तप करावे, का आपल्या देशासाठी, त्याच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य समर्पित करावे. याच द्विधा मनस्तीतीत तो होता. मात्र कोणत्याही वाटेवरून गेले तरी त्यामध्ये अपरंपार कष्ट, काटेरी वाटचाल व खडतर साधना आहेच, याचीही त्याला पूर्ण जाणीव होती. विचारांती या युवकाने ठाम निर्धार केला की, हिमालयात न जाता येथेच या भवसागरात राहूनच संन्यस्त वृत्तीने मी माझी कर्मे पार पाडीन. या तेजस्वी तरुणाचे नांव होते ' माधव सदाशीव गोळवलकर'.

१९ फेब्रुवारी १९०६ रोजी नागपुरमधील रामटेक येथे एका शिक्षकाच्या पोटी त्यांचा जन्म झाला. एकूण नऊ अपत्यांपैकी वाचला फक्त एक. माधव! त्यामुळे आई-वडिलांचा त्यांच्यावर खूपच जीव होता. १९२२ मध्ये म्यॅट्रिक झाल्यावर माधवराव पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. पण त्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात फर्ग्युसनवर कांही सरकारी निर्बंध लादल्यामुळे त्यांना नागपुरास परतावे लागले. तेथील मिशनऱ्यांनी चालवलेल्या हिस्लॉप कॉलेजमध्ये त्यांनी नांव दाखल केले. आपल्या कॉलेज जीवनात माधवरावांनी हिंदू धर्मशास्त्र, त्याच सोबत कुराण, बायबल आदी धर्मग्रंथाचाही सखोल अभ्यास केला. त्याचप्रमाणे खेळाचीही त्यांना आवड होती. हॉकी ते खूप खेळत. शिवाय टेनिस, मलखांब व इतर मर्दानी खेळ ते नेहमी खेळत. बांसरी वाजवण्यातही ते निपुण होते. त्यानंतर त्यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयात दाखल होऊन तेथून एम.एस.सी. ही पदवी घेतली. तेथेच कांही काळ प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. तेथील वास्तव्यात ते आपल्या विद्यार्थ्यांशी अतिशय प्रेमळपणे व आपुलकीने वागत. त्यांच्या या वागणुकीने ते 'गुरुजी' या उपाधीने ओळखले जावू लागले. व पुढे ते संपूर्ण हिंदुस्तानात 'गुरुजी' याच नावाने प्रसिद्ध झाले. काशीला राहिल्यामुळे माधवरावांवर तेथील धार्मिक व विज्ञाननिष्ठता या दोन्हीचा प्रभाव पडला. त्यांच्या मनाची जडण-घडण या उदात्त विचारसरणीवर झाली. तेथून ते नागपूरला परतले. तेथे त्यांचा रामकृष्ण मिशनशी संबंध आला आणि जणू त्यांच्यातील रत्नाला कोंदणच मिळाले!


पुढे माधवरावांनी वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून वकिलीस प्रारंभ केला. मात्र, सुरुवातीपासून परमार्थाकडे ओढ असलेल्या गुरुजींना वकिली फारशी भावली नाही. काशीमध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी प्रथम संबंध आला होता. त्यामुळे संघकार्याकडे त्यांचा थोडा कल होताच! त्यातच रा.स्व.संघाचे सर संघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचीही दूरदृष्टी गुरुजींकडे अपेक्षेने पहात होती. पण गुरुजींच्या मनातील अध्यात्माची ओढ त्यांना रामकृष्ण आश्रमात नेत होती. त्यामुळे गुरुजींनी कोलकात्याजवळील रामकृष्ण मिशनच्या आश्रमात पदार्पण केले. तेथे त्यांनी स्वामी स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखण्डानंद यांचे शिष्यत्व पत्करले. जेमतेम एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गुरुजींनी अध्यात्मिक क्षेत्रांत खूप प्रगती केली. दुर्दैवाने स्वामी अखण्डानंद दिवंगत झाले व त्यामुळे गुरुजी पुन्हा नागपूरला आले.

नागपुरात गुरुजी बरेच अस्वस्थ होते. डॉ. हेडगेवारांचे त्यांच्यावर पूर्ण लक्ष होते. हिंदू समाजाला आत्मविस्मृती व आपापसातील भेदभाव या रोगांनी ग्रस्त केलें आहे, हे डॉ. हेडगेवारांनी हेरूनच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर १९२५ साली 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'ची स्थापना केली होती. गुरुजींच्या मनात या हिंदमातेच्या उत्कर्षासाठी कांही तरी करावे, ही भावना बळावतच होती. डॉक्टरांच्या सान्निध्यामुळे ते संघाकडे जास्तच आकर्षित झाले. व गुरुजी अधिकारी शिक्षण वर्गाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. यानंतर डॉक्टरांशी त्यांचा सतत संपर्क होत राहीला. या सुमारास डॉ. हेडगेवार आजारी पडले. भावी सरसंघचालक म्हणून डॉक्टर गुरुजींकडे मोठ्या विश्वासाने पहात होते. त्याबाबतीत त्यांनी आपल्या जेष्ठ सहकाऱ्यांची मतेही आजमावून पाहीली. आणि सर्वानुमते गुरुजींच्या नांवाला पसंती मिळाली. थोड्याच दिवसात डॉक्टरांची तब्येत जास्तच खालावली. अन २१ जून १९४० रोजी त्यांचा स्वर्गवास झाला  आणि त्यांच्या योजनेप्रमाणे सरसंघचालकपदाची सूत्रे गुरुजींच्या हाती आली. यावेळी गुरुजी उद्गारले, 'परमपूज्य डॉक्टरांनी माझ्यावर सरसंघचालकपदाची कल्पनातीत महत्वाची जबाबदारी टाकली आहे. पण हे विक्रमादित्याचे सिंहासन आहे. आज या सिंहासनावर बसण्याचा माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला योग आला आहे. पण डॉक्टर माझ्या तोंडातून योग्य तेच वदवतील व हे संघकार्य पूर्वीच्याच निष्ठेने व जोमाने पण अधिक वेगाने पुढे चालवू!'

 


मात्र गुरुजींनी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हिंदुस्तानातील राजकारणाची गती एकदम बदलली. केवळ स्वतःची शिस्तबद्धता, आत्मनिर्भरता, शुद्ध चारीत्र्य या आधारावर  प्रभावी ठरलेल्या या संघटनेची आपणाला अडचण होईल या दृष्टीने ब्रिटिश सरकारने संघाच्या संचलनावर बंधने घालण्यास सुरूवात केली. सुरुवातीच्या काळात कांही प्रांत वगळता संघाचा प्रवेश अन्य ठिकाणी फारसा झाला नव्हता. मात्र गुरुजींनी त्याचा विस्तार देशभर करायचे ठरवून त्यांनी हिंदुस्थानभर झंझावाती दौरे सुरु केले. वर्षातून दोन वेळा त्यांची संपूर्ण 'हिंदुस्थान यात्रा' होत असे. याचवेळी देशात 'हिंदुस्थान छोडो' चळवळ सुरु झाली. आणि गुरुजींनी सर्व तरुणांना आवाहन केले. 'शतका-शतकातून चालून येणारी ही सुवर्णसंधी जर आम्ही सुस्त राहून गमावली, तर आमच्यासारखे करंटे आम्हीच! संकटमय प्रसंगातून जो कार्यान्वीत रहातो त्याचेच नांव जगत अमर होते. यासाठी निर्भय होऊन प्रसन्नतेने संकटाशी मुकाबला केला पाहीजे. म्हणून सर्व तरुणांनी संघासाठी आपले एक वर्ष द्यावे.' या त्यांच्या आवाहनाला हिंदुस्तानातील युवकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वजण तन मन धनाने संघकार्यात रममाण झाले! संघशक्ती विलक्षण वाढली. देशाच्या काना कोपऱ्यात संघशाखा सुरू झाल्या. पुढे संघकार्याचा विस्तार इतका वाढला, की गुरुजीच म्हणायचे ' रोज एक शाखा पहायची ठरवली तर देशभरातील सर्व शाखा पहाण्यास १५ वर्षे तरी सहज लागतील.'


थोड्याच दिवसात संपूर्ण जगाला हादरवणारे दुसरे महायुद्ध सुरु झाले व ब्रिटीश साम्राज्य खिळखिळे करून संपुष्टात आले. यावेळी ब्रिटिशांच्या कुटील नीतीने देशाचे विभाजन करण्याचा डाव टाकला. त्याला आपले पुढारी बळी पडणार अशी लक्षणे दिसू लागली. त्याचा परीणाम म्हणून नौखाली, कोलकाता, ढाका इत्यादी ठिकाणी जातीय दंगली सुरु झाल्या. हिंदूंवर पाशवी अत्याचार होऊ लागले. हे पाहून गुरुजींचे अंतःकरण विदीर्ण झाले. त्यांनी जनतेला निक्षून सांगीतले की, 'आत्मरक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा आणि समाजाचा प्रकृतिसिद्ध हक्क आहे. आक्रमकावर शस्त्र न उचलण्याचा अप्रतिकारी भाषेचा प्रयोग सर्वत्र होत आहे. पण ही भाषा विरताजन्य आहे, असे मला वाटत नाही. तर ती केवळ कायरता आणि आत्मवंचनीय आहे. याने हिंदुस्तानचे कल्याण होणार काय?'

पण गुरुजींचा हा स्पष्टवक्तेपणा देशांतील पुढाऱ्यांना मानवणारा नव्हता. मुस्लीम लीग व त्यांची पाठीराखे वृत्तपत्रे संघविरोधी प्रचार करु लागली. ज्या काँग्रेसने अखंड हिंदुस्तानचे आश्वासन देशवासियांना दिले होते, ते त्यांनी पुढे पाळले नाही. त्यामुळे पुढे पाकिस्तानात जों भाग जाणार होता, तेथे हिंदूंच्या कत्तली होऊ लागल्या. लाहोरमध्ये तर आगडोंब उसळला. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी दंगलींनी परिसीमा गाठली. पाकिस्तानात हिंदु औषधालाही ठेवायचा नाही या दृष्टीनेच तेथील हिंदूंवर अनन्वीत अत्याचार सुरु झाले. अश्या वेळी त्यांना दिलासा द्यायला संघाचे स्वयंसेवक पुढें आले. रात्रंदिवस स्वयंसेवक आपद्ग्रस्ताना सुरक्षीत छावण्यात हालवत होते. गुरुजींच्या नेतृत्वाखाली लक्षावधी हिंदूंचे प्राण संघ स्वयंसेवकांनी वाचवून आपले जीवन यथार्त करून दाखवले. गुरूजीनी सांगीतले होते की, शेवटचा हिंदू आणेपर्यंत दटून रहा. यामध्ये हजार-पाचशे स्वयंसेवक झुंजता झुंजता धारातीर्थी पडले.


यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी जम्मू-काश्मीर संस्थानचे दिवाण मेहरचंद महाजन यांना निरोप दिला की काश्मीर नरेश हरीसिंह यांना हिंदुस्तानात विलीन होण्यासाठी त्यांच्याशी बोलणी करा. श्री मेहरचंदं महाजन यांनी श्री गुरुजींना विनंती केली की त्यांनी हरिसिंघ यांच्याशी बोलून त्यांचे मन वळवावे. त्याप्रमाणे गुरुजींनी त्यांनी भेट घेतली. पण हरिसिंघ यांनी म्हटले, 'माझे राज्य पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे. सारे रस्ते सियालकोट व रावळपिंडीकडे जातात. रेल्वे देखील सियालकोटच्याच दिशेने जाते. आमच्यासाठी विमानतळ हा लाहोर आहे. तेव्हां मी हिंदुस्तानशी कसा संबंध ठेवू शकतो?'. यावर गुरुजींनी त्यांना समजावले, 'आपण एक हिंदू राजे आहात. पाकिस्तानात राहील्यास आपणास व आपल्या हिंदू प्रजेस अनेक संकटे व संघर्ष यांच्याशी सामना करावा लागेल. हे खरे आहे की या क्षणाला हिंदुस्तानशी रेल अथवा हवाई मार्गाचा संपर्क नाही. पण लवकरच तो अमलात येईल. तेंव्हा आपण व काश्मिरी जनतेचे हीत यातच आहे की आपण हिंदुस्तानात सामील व्हावे. व ते महाराज हरीसिंघ यानांही पटले. यामुळे काश्मीर भारतात सामील होण्यात गुरुजीँचेही मोठे योगदान आहे.


पण गुरुजींना, पर्यायाने संघाला अजून अग्निदिव्यातून जायचे होते. ३० जानेवारी १९४८ रोजी गुरूजी मद्रासमध्ये एका कार्यक्रमात असतांना महात्मा गांधींचा वध झाल्याची बातमी तेथें थडकली. गुरुजी क्षणभर सुन्न झाले. आपला पुढील कार्यक्रम रद्द करून त्यांनी संपूर्ण हिंदुस्तानातील सर्व शाखा तेरा  दिवस बंद ठेवल्या. गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसें हा संघ स्वयंसेवक असल्याची आवई कांही लोकांनी सर्वत्र पसरवली. नागपुरात गुरुजींविरुद्ध वातवरण तापविण्यात आले. त्यांना गांधी वधाच्या कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून अटक झाली व पाठोपाठ संघावर बंदी आली. संपूर्ण देशांत नाना प्रकारचे आरोप ठेवून सहस्रो स्वयंसेवकांना पकडण्यात आले. गांवोगांवी स्वयंसेवकांना मारहाण करण्यात आली. त्यांनी घरे लुटली. जाळपोळ करण्यात आली. पुढे गुरुजींची या घटनेशी काडीमात्र संबंध नाही हे सिद्ध झाल्यामुळे त्यांची सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी संघबंदी उठवण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. एखादा पाण्याचा लोंढा वेगाने पसरावा तसा संघ सत्याग्रही कारागृहाच्या दारावर धडका देऊ लागले. संघाचे हे विराट स्वरूप पाहून सारा हिंदुस्थान स्तिमित झाला. शेवटी संघाला स्वतःची लिखीत घटना तयार करण्याचे आदेश देऊन अखेर १२ जुलै १९४९ रोजी संघावरील बंदी बिनशर्त उठवली गेली. त्यावेळी गुरुजींना सरदार पटेलांनी दिलेल्या संदेशात म्हटले होते, 'संघावरची बंदी उठल्यानंतर मला जितका आनंद झाला, त्याचे प्रमाण माझ्यासोबत त्यावेळी जे लोक होते ते सांगू शकतील. मी माझ्या शुभेच्छा आपणास देत आहे!'


जेव्हां चीनने हिंदुस्थानवर आक्रमण केले त्यावेळी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संघ स्वयंसेवकांनी जनतेमध्ये जाऊन त्यांचे मनोबल दृढ करण्याचे प्रयत्न केले, व हा त्यांचा सामाजीक सहयोग पाहून पंडीत नेहरू यांनाही त्यांचा सहयोग व योगदान मान्य करावे लागले. व १९६३ च्या गणतंत्र दिनाच्या दिल्लीच्या राजपथावरील संचलनात कांही काँग्रेसच्या लोकांनी विरोध करूनही संघ स्वयंसेवकांना भाग घेण्याचे आमंत्रण मिळाले. संघाचे तीन हजार गणवेशधारी स्वयंसेवक जयघोष करीत शिस्तबद्ध संचलन करते झाले. त्यावेळचे हे एक प्रमुख आकर्षण ठरले.

गुरुजींच्या मनन, चिंतन यात अत्यंत समर्थ, प्रभावी आणि जगाला मार्गदर्शक ठरेल अशा हिंदुस्तानचे चित्र होते. संघ हे विशाल कुटूंब आहे अशी त्यांनी विचारसरणी होती. त्यामुळेच प्रत्येक स्वयंसेवकांची ते जातीने चौकशी करीत. गुरुजींचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. एका ऋषीप्रमाणे ते चैतन्यशील होते.  वर्णाने गोरेपान, त्यांची मध्यम उंचीची शरीरयष्टी, स्कंधावर रुळणाऱ्या केसांच्या जटा, चेहऱ्यावर प्रसन्न असे चैतन्य, निर्मलतेने चमकणारे नेत्र व स्नेहाने ओथम्बलेली नजर. एका दृष्टीक्षेपातच पहाणारा त्यांच्यात सामावून जात असे. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे अध्यात्मिकता आणि ऐहिकता, भक्ती आणि शक्ती, चारीत्र्य आणि चैतन्य यांचा मुर्तीमंत संगम होते. पवित्रता त्यांच्यामध्ये परीपूर्ण भरलेली होती. गुरुजींची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती. मराठी प्रमाणेच त्यांचे इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांचे वक्तृत्व अमोघ होते. लोकांना मंत्रमुग्ध करणारे होते. मधल्या काळात बाळासाहेब ठाकरे नागपूरला गेलें असता मुद्दाम गुरुजींना भेटायला गेले. शिवसेना व त्यावेळचा जनसंघ हे दोन राष्ट्रीय प्रवाह एकत्र यावेत अशी तळमळ गुरुजींनी त्याकाळी व्यक्त केली होती. त्यावेळी ते झाले नाही. पण पुढे भारतीय जनता पक्ष व शिवसेना बराच काळ एकत्र होते ही हिंदुस्थानी राजकारणाला कलाटणी देणारी गोष्टी ठरली. दुर्दैवाने आज ते पुन्हां दुभंगले गेले आहेत.


गुरुजी सर्व मानसन्मानापासून कटाक्षाने दूर राहीले. गुरुजींच्या आदेशानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राजकीय क्षेत्रात काम करू लागले. 'भारतीय जनसंघ' या नांवाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परीषद, भारतीय मजदूर संघ, विश्व् हिंदू परिषद, वनवासी कल्याण, महारोगी सेवा, राष्ट्रीय शिशु शिक्षण, डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थानी स्मृती मंदिराची उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शीला-स्मारक तसेच अनेक शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहील्या. सरसंघचालक झाल्यापासून  गुरुजींचा देश प्रवास अखंड सुरूचं होता.  तो सतत ३३ वर्षे चालू राहीला. पायी, बैलगाडीने, टांग्याने, सायकलीने, मोटारीने विमानाने व विशेष करुन आगगाडीने! आगगाडीचा डबा हेच माझे घर आहे, असे विनोदाने ते म्हणत असत. आणि यातच त्यांच्या प्रकृतीने साथ  देण्याचे सोडले. प्रकृतीची अस्वस्थता वाढू लागली. आणि कर्क रोगाने त्याना ग्रासल्याचे निदान झाले. तरिही गुरुजींचा प्रवास, व्याख्याने, मार्गदर्शन सुरूच होते.
‘राष्ट्राय स्वाहा, इदं न मम' म्हणजेच 'जे कांही आहे ते राष्ट्राचे आहे, माझे कांहीही नाही' ही गुरुजींच्या संघकार्यामागील भावना होती. त्यामुळे हयात असतानाच त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती संघाला दान केली.

आणि ज्येष्ठ शुद्ध पंचमी, ५ जून १९७० रोजी सर्व कार्य  सिद्धीला गेल्याचे जाणून या तपस्वी महाऋषीनी आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. ‘नमस्ते सदावत्सले मातृभूमी’ हे शब्द सदा ओठावर बाळगणारे गुरूजी अनंतात विलीन झाले. त्यानी प्रज्वलीत केलेली  हिंदुस्तानातील प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची, जाज्वल्याची, एकतेची ज्योत सदैव पेटती राहो, हीच या महाऋषीच्या चरणी वंदनीय प्रार्थना !

                     

हा अखंड नंदादीप, जळणार सतत जळणार |
                      हा असाच तेवत जगती, नीज प्रकाश नित देणार ||
                      जळत जळत जरी आत्मनाश हो जीवन सार्थकता ही
                      घोर निराशा तमविनाश हो ध्येय अंतरी राही
                      हे प्रदीप्त नंदादीप, अवनीस प्रकाशविणार ||
                      चिरकाल सतत जळणे, इतरासही चेतविणे
                      हे कार्य सतत करणे, दशदिशा प्रकाशविणे
                      आकांक्षा धरुनी चित्ती, हा जळत जळत असणार ||
                      प्रलय वादळी नंदादीप, मुळी न थरथरे असें ज्वलंत
                      ज्वालामुखीपरी वरुनी शांत हा, दया क्षमा ठेवी थोर
                      गंभीर मनी खंबीर, प्रज्वलीत राष्ट्र करणार ||
                      एक दीप दुसऱ्यास चेतवी, ऐसे अगणित होती
                      जागृत हा राष्ट्रास जागवी, देऊनी जीवनस्फूर्ती
                      हा एकच नंदादीप, पण दीपमाळ करणार

                      हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार ||

-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…