लोकशाहीचा कैवारी: बॅ. नाथ पै
कोकणच्या भूमीने या महाराष्ट्राला, पर्यायाने राष्ट्राला अनेक नररत्ने दिली आहेत. राजकारण, साहीत्य, काव्य, कला, समाजसेवा या सर्वच आघाडयांवर येथील लोक गाजले. आपला देश गुलामगिरीत असतांना या भूमीतील अनेकांनी तळहातावर शीर घेऊन ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला. त्यापैकी कांही भाग्यवानांना स्वतंत्र हिंदुस्तानामध्ये जनतेचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभले. व ती संधी त्यांनी निःस्वार्थीपणानें पार पाडली. यापैकी बॅरीस्टर नाथ पै हे एक लढवैये नेते.
२५ सप्टेंबर १९२२ साली कोकणातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नाथ पै यांना पितृछत्र फारसे लाभले नाही.त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांचे वडील वारले. मात्र त्यांना घडवण्यात त्यांच्या मातोश्री तापी व वडील बंधू अनंत यांच्या संस्काराचा मोठा वाटा होता. नाथांचे प्राथमीक शिक्षण वेंगुर्ल्यात झाले. नंतर ते बेळगाव येथे आले. तेथील बेनन स्मिथ हायस्कुल व नंतर लिंगराज कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले व पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात असतानाच त्यांना त्यांच्या ठायी असलेल्या वकृत्व गुणांची जाणीव झाली. व ती कला त्यांनी चांगलीच जोपासली. त्याकाळात अनेक वकृत्व स्पर्धाहीं त्यांनी गाजवल्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांनी चांगलेच प्रभूत्व मिळवले. सोबत पाश्च्यात वाङ्मयाची गोडी त्यांना लागली होती. शेक्सपीअर, बायरन, पर्सी शैली आदींच्या साहीत्यातही त्यांनी रस घेतला होता. सेवादलाचे कार्यकर्ते असलेल्या नाथांनी महाविद्यालयीन काळातच स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय भाग घेण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून काम करणाऱ्या नाथांवर टपाल कचेऱ्या लुटणे, पोलीस कचेऱ्यावर हल्ला करणे इत्यादी कारणावरून खटले भरण्यात आले. चवताळलेल्या ब्रिटिश सरकारच्या पोलिसांनी त्यावेळी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे नाजूक प्रवृत्तीच्या नाथांच्या हृदयावर विपरीत परीणाम झाला.
सर्वसामान्यांना न्याय मिळावा या हेतूने नाथ पै सतत चळवळीत सहभागी होत असत. मग तो प्राथमीक शिक्षकांचा संप असो वा गोवामुक्ती आंदोलन, त्यांचा सक्रीय सहभाग असायचाच. गोवामुक्ती आंदोलनामध्ये डॉ.राममोहन लोहीया यांच्या प्रेरणेने ते सामील झाले. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी गोव्यात स्वातंत्र्यसंग्रामास सुरुवात केली. सायकलवरून खेड्यापाड्यात जाऊन ते थाळी वाजवून लोकांना गोळा करीत व त्यांच्यासमोर नाथांचे भाषण सुरु होई. अश्या रीतीने स्वातंत्र्याचा संदेश त्यांनी गोव्यातील गावागावांत पोहोचवला. गोवा स्वतंत्र होईपर्यंत गोवामुक्ती लढ्याशी नाथांचा संबंध अतूट राहीला.
बेळगावमध्ये राहून नाथांनी तेथील कामगारांच्या संघटना बांधण्याचे कार्य चालू ठेवले. हॉटेल. होजीअरी, नगरपालीका, कॅन्टोन्मेन्ट आदी विविध प्रकारच्या कामगारांना त्यांनी संघटीत केले. नाथ पै यांच्या प्रसन्न अन प्रभावी व्यक्तिमत्वाची छाप समोरील व्यक्तीवर एकदम पडत असे. उत्कृष्ट इंग्रजी, अमोघ वक्तृत्व, विषयांचा गाढा अभ्यास आदी गोष्टींमुळे ते प्रभावीपणे उठून दिसत. १९४६ साली झालेल्या टपालखात्यातील पोस्टमन व तार कामगारांचा संप ही हिंदुस्थानी इतिहासातील एक अप्रूप गोष्ट होती. तेंव्हा बेळगांव विभागांतील संपाशी नाथ निगडीत झाले व त्यांनी तो संप शंभर टक्के यशस्वी करविला. त्यावेळी त्यांना अटकही झाली. पण पुढे संपात यशस्वी तडजोड होऊन तो संपला.
नाथांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ लांबून नेतृत्व करणारे पुढारी नसून स्वतः कामाला हात घालत. अगदी झाडू मारण्यापासून त्यांचे काम आनंदाने चालत असे. त्यामुळे सर्वांचे ते आवडते होते. कार्यकर्त्यांना व जनतेला ते आपल्यापैकीच एक वाटत असत. नाथांच्या या वृत्तीमागे सेवादलातील शिकवण व त्याग होता. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर हिंदुस्थानची घटना बनत असताना नाथानी तिच्याकडं बारकाईने लक्ष ठेवलं होते. घटनेबद्दलचा त्यांचा अभ्यास गाढा होता. त्यामुळे हिंदुस्थान प्रजासत्ताक झाला त्यादिवशी नाथांना अवर्णनीय आनंद झाला. खऱ्या अर्थाने जनतेच्या हाती सत्ता आल्याची, स्वातंत्र्य लोकांच्या घरात पोचल्याची जाणीव त्यानी त्यावेळी जनतेला करून दिली.
१९४७ साली नाथ पै इंग्लंडला गेले. ज्या ठिकाणी महात्मा गांधी, पंडीत नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महान नेते बॅरीस्टर झाले त्याप्रमाणे स्वतः बॅरीस्टर होण्याचा त्यांनाही ओढा होता. पण बॅरीस्टर होऊन केवळ पैसे कमवणे हे त्यांचे ध्येय नव्हते. उद्या हिंदुस्थान स्वतंत्र झाला की येथे संसदीय लोकशाही नांदणार आहे. त्यासाठी इंग्लंडची लोकशाही जवळून अभ्यासायची हा त्यामागील मूळ हेतू होता. तेथील मजूर पक्षाच्या कामामध्येही त्यांना लक्ष घालायचे होते. तेथे पोचल्यावर त्यांनी हिंदुस्थानी संस्थांचा परीचय करून घेण्यास सुरुवात केली. हाऊस ऑफ कॉमन्स मधील परराष्ट्रीय धोरणावरील
चर्चा त्यांनी ऐकल्या. तेथील परंपरा समजावून घेतल्या. लंडनमध्ये त्यांनी आपल्या कार्यकक्षा खूपच रुंदावल्या. सोबत लोकशाहीचा अभ्यास सुरूच होता. ते मजूर पक्षाचे काम करु लागले. त्यांच्या वक्तृत्वाचा तेथील लोकांवरही परीणाम होऊ लागला. ब्रिटनचे पंतप्रधान ॲटलीशी त्यांचं संबंध आला. याचवेळी तेथील 'इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशॅलिस्ट युथ' शी त्यांचा संबंध आला व ते सहा वर्षे तीचे अध्यक्ष होते.
अशातच पहील्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ मध्ये जाहीर झाल्या आणि समाजवादी पक्षाने नाथ पै यांचे नांव मुंबई विधानसभेसाठी सुचविले. त्यावेळीं त्यांचा विरोधक असलेल्या मातब्बर व्यक्तीने 'नाथ पै हे परदेशात असल्याने हिंदुस्थानीच नव्हेत' असा आक्षेप घेतला. ज्या नाथ पैनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन कष्ट सोसले, कारावास भोगला, पोलिसांची मारहाण सोसली, ते यावेळी परदेशात असल्याने 'ते हिंदुस्थानी नव्हेत' असा आक्षेप घेणारे, देश पारतंत्र्यात असतांना जिल्हा न्यायाधीश म्हणून देशभक्तांना शिक्षा देणारे, आता आव्हान देत होते. त्यापेक्षा देशाचे दुर्दैव ते काय? या निवडणुकीत नाथांना अपयश आले. पण त्या अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हां श्रमजीवी जनतेचे लढे लढण्याचे कार्य सुरुच ठेवले. यानंतर नाथांनी पुन्हां लंडनला जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले व बॅरीस्टरची परीक्षा ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. हिंदुस्तानात परतण्यापूर्वी त्यांनी बेल्जीयम, जर्मनी, युगोस्लाव्हिया, हॉलंड, इस्राईल या देशांना भेटी दिल्या व तेथील अनुभवाची शिदोरी घेऊन नाथानी हिंदुस्तानात पदार्पण केले. येथे येताच बेळगावचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.
१६ जानेवारी १९५६ चा तो काळाकुट्ट दिवस. संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेले प्रयत्न, अर्जविनंत्या, जनतेने दिलेला कौल या साऱ्या बाबी धुडकावून देऊन ' बेळगांव -कारवारचा समावेश कर्नाटकातच' अशी घोषणा पं. नेहरूंनी नभोवाणीवरून केली आणि बेळगावातील मराठी माणसात असंतोषाचा वणवा पेटला. १७ जानेवारीपासून बेळगावच्या जनतेने उग्र स्वरूप धारण केले. त्यावेळी राखीव पोलिसांनी सुरु केलेल्या गोळीबारात मारुती बेन्नाळकर हा निधड्या छातीचा पहिलवान 'चालवा तुमच्या गोळ्या' असे आव्हान देऊन पुढे होताच पोलिसांचा तो पहिला बळी ठरला. बेळगांव शहरांचे सारे उद्योगधंदे थंडावले. बेळगावचे पुढारी बाबुराव ठाकूर व त्याचे 'तरुणभारत' हे या लढ्याचे मुखपत्र होते. नाथ पै, बाबुराव ठाकूर, बा. रं. सुंठणकर प्रभृतीनी दिल्ली येथे बेळगावचे गाऱ्हाणे मांडले. तेंव्हापासून बेळगावचे महाराष्ट्रात सामिलीकरण हा नाथ पै यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न झाला होता. या काळात कोकणशीही त्यांचा घनिष्ट संबंध आला.
१९५७ च्य सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या अन संयुक्त महाराष्ट्र समितीने तराजू हे चिन्ह घेवून महाराष्ट्रभर आपलें उमेदवार उभे केले. त्यामध्ये नाथांचे कोकणातील कार्य व तेथील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम जाणून प्रजा समाजवादी पक्षाने कोकणातील राजापूर मतदारसंघातून नाथ पै यांचे नांव लोकसभेसाठी जाहीर केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत होती. कोकणातील प्रत्येक गावांत नाथांनी आपल्या वक्तृत्वाचा प्रभाव पाडला आणि कोकणच्या साध्याभोळ्या माणसांनी नाथांचे हृदय ओळखले. आपल्यासाठी झटणाऱ्या या माणसाचा लोकांनी जयजयकार केला आणि विरोधी उमेदवाराची अनामत जप्त करवून कोकणी माणसाने आपल्या या लाडक्या नाथाला प्रचंड मतांनी निवडून दिले. लोकसभेतील पदार्पणामुळे नाथांना सीमाभागाच्या वेदनांना प्राधान्य देता आले. लोकसभेमध्ये बॅ. नाथ पै या व्यक्तिमत्वाने सर्वानांच आकर्षून घेतले. नाथांची अभ्यासपूर्ण भाषणे, त्यांचे सरस इंग्रजी या गोष्टीमुळे विरोधी पक्षीयातच नव्हे,तर सत्ताधारी पक्षातही त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झाले. सर्व संसद सदस्यांनी त्याचे कर्तृत्व मान्य केले. खुद्द पं. नेहरूंवर त्यांचा खूप प्रभाव पडला. तें स्वतःही नाथांची भाषणे लक्षपूर्वक ऐकत असत. नाथ एक कर्तबगार संसदपटू म्हणून गाजू लागले. १९६० साली नाथांचा क्रिस्टल मिशेल या ऑस्ट्रियन युवतीशी विवाह झाला.
मात्र बेळगावचा लढा हिरीरीने सुरूच होता. बेळगावकर जनता निधड्या छातीने, सनदशीर मार्गाने त्यावेळच्या म्हैसूर सरकारशी लढत होती. शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ सुरु केली आणि त्यांच्यावर कर्नाटकी पोलिसांनी पाशवी अत्याचार सुरु केले. यावेळी नाथ पै मराठी लोकांचे मनोधैर्य वाढवीत होते. या लढ्यात ते तुरुंगवासात गेले. संसद गाजविणाऱ्या या अखील हिंदुस्थानी नेत्याला कर्नाटकी सरकारने एक गुन्हेगारासारखी वागणूक दिली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, पण त्याचे स्वागतही नाथांना गजाआडूनच करावे लागले. महाराष्ट्रातील राज्यकर्ते महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये मग्न होते. पण आचार्य अत्रे, एस.एम.जोशी, नाथ पै यांच्यासारखे नेते मात्र सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात न झाल्याने हा लढा चालूच ठेवला पाहीजे या हेतूने तळमळत होते.
पंडीत नेहरूंवर नाथ पै लोकसभेत नेहमीच टीका करायचे. पण ती धोरणात्मक असायची. त्या दोघांचे संबंध मित्रत्वाचे होते. नाथांशी चर्चा करणे पं. नेहरू व इंदिराजी गांधी या दोघांनाही आवडे. नाथांचे वर्णन पं. नेहरू ' एक सभ्य राजकारणी' असे करीत असत. १७ डिसेंबर १९६१ रोजी हिंदुस्थानी सेनेने पोर्तुगीज अमलाखालील गोव्यात प्रवेश करून तीन दिवसात तेथील पोर्तुगीज राजवटीची अखेर केली. त्या मंगल दिवशी नाथ पैनी सैन्याच्या मागून स्वतंत्र गोव्यात प्रवेश केला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्यासाठी ते लढले, अगदी परदेशातूनसुद्धा त्या प्रश्नावर हिंदुस्तानची भूमिका त्यांनी जगासमोर मांडली, गोवा मुक्तीचे जे स्वप्न त्यांनी सतत पाहिले त्या स्वप्नाची ती पूर्तता होती.
१९६२ सालच्या निवडणुकीतही कोकणवासियांनी नाथांना भरभरून यश दिले. अर्थात हे यश केवळ नाथांचेच होते. वैयक्तिक होते. त्यांच्या कर्तृत्वाचे होते. तेथे पक्ष कधी कोणी पाहिलाच नाही. 'नाथ पै' ही अक्षरेच मंतरल्याप्रमाणे कोकणवासीयांना मंत्रमुग्ध करीत. नाथांचे फोटो घरोघरी देवाप्रमाणे लावून पुजले जात. या दगदगीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. निष्णात हृदयरोग तज्ज्ञांनी त्यांच्यावर उपचार केले. याच काळात चीनने हिंदुस्थानवर आक्रमण केले. नाथानी आपली संरक्षण भूमिका कशी चुकली याची मीमांसा करून यापुढे जागृत रहाण्याची विनंती केली. लोकसभेत संरक्षणविषयक प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. त्यांचे हे भाषण अविस्मरणीय ठरले.हे सर्व होत असतानाच बेळगांव कारवारच्या सीमा प्रश्नावरही नाथ लोकसभेत सतत झगडत होते. सीमावासीयांसह या प्रश्नावर त्यांनी मुंबईत निदर्शने केली. ज्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी त्यांनी कर्नाटक सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, त्यांना यावेळी महाराष्ट्रातील पोलिसांकडूनही लाठ्या खाव्या लागल्या. पण त्यामुळे नाथ डगमगले नाहीत. कारण आंदोलनापासून ते कधी विभक्त होऊच शकत नव्हते. १९६७ नंतर लोकसभेत नाथानी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. जगातील अनेक राष्ट्रांच्या घटनांचा त्यांचा सखोल अभ्यास होता.
नाथांची शेवटची सभा अन बेळगावचे पोरकेपण
१७ जानेवारी हा दिवस बेळगांवात 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो. १७ जानेवारी १९७१ रोजी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाथांची बेळगांवी जाण्याची तयारी सुरु झाली. हृदयावर प्रचंड ताण होताच! डॉक्टरांनी तपासून नाथांना बेळगांवी जाण्याची मनाई केली. पण नाथानी ऐकले नाही. विमानतळावर इंदिराजी गांधींशी त्यांची भेट झाली. तेथे दोघांच्या दिलखुलास गप्पा झाल्या. नाथ बेळगांवात पोचले तेव्हां बेळगांव शहरांत कडकडीत हरताळ पाळण्यात आला होता. तेथे डॉ. याळगींनी नाथांना तपासून त्यांना सभेमध्ये भाषण न करण्याचा सल्ला दिला. पण संध्याकाळच्या यूनियन जिमखान्यावर भरलेल्या विराट जाहीर सभेत नाथ बोलल्याशिवाय राहूच शकत नव्हते. बाबुराव ठाकूर अध्यक्ष असलेल्या त्या प्रचंड सभेत नाथ पै बोलण्यासाठी उठले. त्याचे भाषण सुरु झाले. आपल्या प्रिय नेत्याच्या भाषणातील एकेक शब्द त्यांची लाडकी जनता आपल्या कानात साठवून ठेवीत होती. संपूर्ण सभेला त्यानी मंत्रमुग्ध केले होते. सभा संपल्यावर ते म्हणाले, ' आज मी बेळगांवच्या ऋणातून मुक्त झालो!'
घरी गेल्यावर रात्रीं बाराच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागला. ते घामाने भिजून चिंब झाले. बेळगांवचे सुप्रसिद्ध हृदसयरोगतज्ञ् डॉ. कुलकर्णी यांनी उपचार सुरू केले. पण नियतीला ते मंजूर नव्हते. रात्री १२.४५ च्या सुमारास बेळगावकरांसाठी सतत लढणारा, गोर गरिबांसाठी कळवळणारा हिंदुस्थानचा हा महान सुपुत्र कायमचा सोडून गेला. बेळगांव पोरके झाले.
नाथ पै हे माझे पत्रकार असलेले जेष्ठ बंधू ग.गो.राजाध्यक्ष यांचे घनिष्ट मित्र. वास्तविक माझे बंधू हे रा.स्व.संघाचे कार्यकर्ते व नाथ पै हे सेवा दलाचे वरिष्ठ नेते. पण दोघांच्याही मैत्रीमध्ये कधीच याचा संबंध आला नाही. सीमा भागाच्या चळवळीच्या वेळी मुंबईतील मोठ्या वृत्तपत्रात सीमावासियांच्या वेदनांना प्रसिद्धी मिळत नसल्याचे जाणून नाथनी मुद्दम माझ्या बंधूना लोकसत्ताचे सीमाभागाचे प्रतिनिधी म्हणून काम पहाण्यास सांगितले. त्याकाळात माझ्या बंधूंची वार्तापत्रे खूप गाजली. मला आर्टस्कुलला आणून घालण्याशी नाथच कारणीभूत ठरले. आमचे डीन दादा आडारकर त्यांचे मामा. त्यामुळे दादा बेळगावी आले असतानाच त्यांनी मला प्रवेश देण्याविषयी त्यांना सांगितले. शिवाय मुंबईला आल्यावर त्यांनी दामू केंकरे यांनाही सांगून ठेवले कि दादा कदाचित विसरेल तर तुही लक्ष ठेव. मला त्यांनी सांगुन ठेवलं होते की मुंबईला आपण आल्यावर आपल्याला भेट. त्याप्रमाणे जेव्हां ते मुंबईला आलेले समजले की मी त्यांना भेटल्याशिवाय रहात नसे.१९६७ सालच्या त्यांच्या निवडणूक प्रचाराची पोस्टर्स देखील मी बनवली होती. मी जेव्हां जे.जे.मधून शिक्षण संपवून बाहेरी पडलो त्याच वर्षी नाथांच्या हस्ते साहीत्य संघ मंदीर येथे प्रा. न.र.फाटक यांचा सत्कार होता. नाथ पै यांना मी एक भेटकार्ड बनवून घेतले होते. सत्कार सभा सुरु झाली. आणि नाथ पै आपल्या शैलीदार पद्धतीने बोलण्यास उभे राहीले. ते म्हणाले, 'आम्ही राजकारणी लोक आमची नांवे वाळूत कोरत असतो. एक लाटा आली की ती विरून जातात. पण तुम्ही साहित्यीक, कलाकार तुमची नावे ही दगडावर कोरता. त्यामुळे ती शास्वत असतात. अमर असतात.' आणि आम्ही सर्वजण मंत्रमुग्ध होऊन त्यांचे शब्द कानात साठवत होतो. समारंभ संपल्यावर मीत्यांना भेटताच त्यांनी मला पहीलाच प्रश्न केला, काय रे राजाध्यक्ष, तुझे शिक्षण पूर्ण केलेस की नाही? मी जेव्हां त्यांना माझे शिक्षण पूर्ण करून नोकरीलाही लागलो आहे हे कळताच त्यांनी समाधान व्यक्त केले व मला म्हणाले, मला नेमके तेच समजायला हवे होते. साहीत्य संघातून त्यांच्या सोबत मी बाहेर पडलो तेव्हां अनेक लोकांची त्यांच्या तक्रार निवारण करण्याकरिता कागदांची भेंडोळी घेवून बाहेर रस्त्यावर रांगच लागली होती. तरीही प्रत्येकाच्या हातातील कागदपत्र घेऊन त्यांना समजावून सांगणे चाललेच होते. त्यावेळी मला जाणीवही नव्हती या देव माणसाशी माझी ही शेवटची भेट आहे. तेव्हा आजसारख्या दूरदर्शनच्या वाहिन्या नव्हत्या. वृत्तपत्रे आणि रेडिओ एव्हड्यावरच भागवावे लागत असे. आणि एके दिवशी दैनिक मराठा वृत्तपत्रात हेडलाईन होती. 'अरेरे, काय ऐकतो आहो आम्ही हे! नाथ पै गेले?' ती बातमी कळताच मन आतून आक्रन्दू लागलं. जणू कोणी घरातील माणूस गेल्याचे दुःख झाले. मनात एका प्रचंड पोकळी निर्माण करून नाथ गेले. अनेक चाहत्यांना अनाथ करून गेले. आज वाटते की कोकणात झालेल्या विमानतळाला नाथ पै यांचे नांव द्यावे व कांही अशी त्यांनी केलेल्या कोकण सेवेतून कांही अंशी का होईना, ऋणातून मुक्त व्हावे.
नाथ पै यांच्या सारखी माणसे कोणत्या संघटनेची नसतात, कोणत्या राजकीय पक्षाची नसतात. ती असतात आपल्या राष्ट्राची. हिंदमातेची!
-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष.
( या वर्षी बॅरीस्टर नाथ पै यांची जन्म शताब्दी सुरु होत आहे, त्या निमित्ताने भारतमातेच्या या थोर सुपुत्राला भावपूर्ण आदरांजली )






Comments
Post a Comment