निसर्गप्रेमी प्रतिभावान स्वयंप्रेरीत कलाकार : अरुंधती वर्तक.

 


निसर्गाने आपल्याला वृक्षांच्या रूपाने आपलें जीवन समृद्ध होण्याचे एक महत्वपूर्ण साधन दिले आहे..या वृक्षांमुळे वातावरणातील पर्यावरणाचा समतोल रहातो, मानवी जीवन समृद्ध होतेच, हेंच वृक्ष आपल्याला सावली देतात, फळे देतात, याशिवाय त्यात एक भाव असतो तो या वनराईचे सौंदर्य. प्रत्येक ठिकाणच्या, भागातील वातावरणाच्या परिस्थितीमुळे तेथील वृक्षसौंदर्य बदलत असते. आणि हे सौंदर्य आपल्या कुंचल्यात नेमके पकडून त्यात स्वतःच्या कल्पनाशक्तीचा भर घालून त्यावर रंगांची उधळण करून आपल्या कॅनव्हासवर आविष्कृत करणारी एक जागतिक कीर्तीची चित्रकर्ती म्हणजे अरुंधती वर्तक. जणू जन्मापासून वृक्ष वेडाने भारावून निघालेली एक निसर्गवेडी कलाकार.

अश्या या मनस्वी कलावंताला भेटण्याचा योग  मला अकस्मात आला. मी जे. जे.ला अधीष्ठाता म्हणून कार्यरत असतांना  आपल्या नियोजीत प्रदर्शनाचे आमंत्रण देण्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्या आमंत्रण पत्रिकेवरच त्यांच्या कलेची कल्पकता आणि ताकद दाखवणारी वृक्ष चित्राची कलाकृती होती.  प्रथमदर्शनी छाप पडेल अशा शांत, संयमी व्यक्तिमत्वाच्या अरुंधती  वर्तक अत्यंत मृदू स्वभावाच्या आहेत. आमच्या गप्पा चालू असताना मी त्यांना उपयोजीत कलेच्या संस्थेसाठी नामवंत चित्रकारांच्या कलाकृतींचा करत असलेल्या संग्रहाबद्दल त्यांना सांगितले, आणि संग्रहातील कांही चित्रेही त्यांना दाखवली. व त्यांचेही एक चित्र या संग्रहात असावे अशी माझी प्रांजळ इच्छा व्यक्त केली. आणि त्यांनीही तात्काळ त्याला मान्यता दिली. पण पुढे मी निवृत्त झाल्यामुळे ते राहुनच गेले.  पुढे त्यांच्या वृक्ष चित्रांचा मी चाहता झालो. त्यांची वृक्ष चित्रे माझ्यां मनांत कायमची कोरली गेली.

 


अरुंधती वर्तक या मूळच्या मुंबईच्या. वास्तविक तसे त्यांच्या घराण्यात कोणी चित्रकार नव्हते. पण अगदी लहान वयातच अरुंधतीला चित्रकलेची आवड निर्माण झाली. लहानपणी एकदा वडिलांच्या सोबत त्यांनी मंत्रालयाची इमारत पाहीली, व घरी आल्यावर पाटीवर ती रेखाटली. ते साध्या आणि सहजतेने त्या वयात काढलेले चित्र तिच्या वडिलांनी पाहीले आणि त्यांनी अरुंधतीच्या अंगचे उपजत गुण ओळखले. तिच्यातील चित्रकाराची प्रतिभा त्यांना जाणवली आणि या प्रतिभेला फुलवायचे हेच त्यांनी मनात ठरवले. आणि तेव्हापासून कोठेही चांगले चित्र प्रदर्शन असले की सहकुटुंब त्या प्रदर्शनाला भेट देऊ लागले. चित्रावरील चर्चा तिला ऐकवू लागले. तिची चित्रे इतर चित्रकारांना दाखवून त्यांची मते अजमावू लागले. त्यातून  चित्रकलेमधील बरे वाईट अरुंधतीला समजू लागले. मात्र वडीलानी तिला कोणाच्याही चित्रकलेच्या कलासमध्ये घालून त्या चाकोरीत अडकवले नाही. यामुळे अरुंधतींचे स्वतंत्र विचार त्यांच्या कलेतून आविष्कृत होऊ लागले. स्वतःच्या हाताला त्या वळण  देऊ लागल्या. वडील देखील तिला उत्तमोत्तम पुस्तके पुरवीत असत. त्यात निसर्गाविषयी माहीतीची पण पुस्तके असत.  त्यातून  कलेचे तंत्र त्या अभ्यासू लागल्या. आणि हळू हळू त्यांच्यातील कला परिपक्व होऊ लागली. त्यांना चित्रातील लालित्य उमजू लागले. मनात भावू लागले. मनात उमटणाऱ्या संवेदनांना त्या लहानश्या कागदावरील चौकटीत टिपू लागल्या. त्याचे आजोबा (आईचे वडील) हे थोर अभ्यासू असे प्रतिष्ठित गृहस्थ होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांच्या संग्रहात अनेक प्राचीन ग्रंथ होते, त्यामध्ये धर्म, तत्वज्ञान, राजकारण अश्यांचा समावेश होता. निसर्गरम्य अश्या समुद्र किनाऱ्यावरील सुंदर अश्या चिंचणी या गावांत ते रहात असत. अरुंधतींचे नेहमी तेथे जाणे असे.आणि या चिंचणीने सुंदर अश्या निसर्गाने वेष्टीत असलेल्या अनेक वृक्षांशी अरूंधतींशी ओळख करून दिली. प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य त्यांना जाणवू लागले.  तेथेच अरुंधतीचा त्यांच्याकडील ग्रंथांशी परिचय झाला. ग्रंथांमुळे त्या प्रोत्साहीत झाल्या.  त्यामुळे एस.एस.सी.झाल्यावर प्रत्येकाची पाऊले जे.जे. स्कूल ऑफ आर्टशी वळतात, त्याला त्या अपवाद ठरल्या. व त्यांनी मुंबई विद्यापीठाची साहीत्य व मानसशास्त्र अश्या विषयात पदवी घेतली. पुढे त्या पुण्याला स्थायीक झाल्या.

 


अरुंधतींचा अनेक संस्कृत ग्रंथांशी संबंध आला. यामध्ये महाकवी कालिदास यांनी त्यांच्या काव्यात केलेल्या सखोल निसर्ग अभ्यासाच्या आणि निरनिराळे कल व त्यातील व्यक्तित्व आपल्या काव्यात प्रतिबिंबित केले, त्या अरुंधतीची चित्रांची उंची व दर्जा वाढवण्यास कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कालिदासाने सभोवतालच्या  निसर्गातील अनेक उपमा आपल्या पात्रांना दिल्या आहेत हा सुद्धा निसर्गाकडे खोलवर पहाण्याचा भारतीय प्रवाद आहे. मध्यंतरीच्या काही काळात त्या सुप्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांच्याकडे व्यक्तिचित्रण शिकल्या. जेव्हां जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा महंमद अली भारत भेटीवर आले  असता, त्यांनी त्यांचे एक व्यक्तिचित्रण करून त्यांना भेट दिले. तेव्हां त्यांना ते अतीशय आवडले. ' आय ॲम द ग्रेटेस्ट' म्हणणाऱ्या महंमद अलीनी त्यावेळी अरुंधतींना उस्फुर्तपणे म्हटले, ' यू आर द ग्रेटेस्ट'! बी.ए.झाल्यावर त्यांनी जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये फाउंडेशन अभ्याक्रमासाठी प्रवेश घेतला. पण त्या रूढ आणि चाकोरीतील अभ्याक्रम त्यांना रुचेना. व त्यांनी जे.जे.ला रामराम ठोकला. आणि त्यांच्यामधील प्राचीन भारतीय कला आणि संस्कृती उफाळून आली. आणि प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी सुरु केला. जोडीला संगीताचं अभ्यास सुरु होता. जलरंगातील निसर्गचित्रे रंगवण्याचा त्यांना छंद होता. चिंचणीच्या पावसाळ्यातील अनेक निसर्गचित्रे त्यांनी रंगवली. चित्रकार हळदणकर यांची जलरंगावरील हुकूमत त्यांनी पाहीली होती.  पाण्यानं भरलेला ब्रश अलगद रंगात बुडवून ते कागदावर ऊन सावल्याचा पारदर्शीपणा आणत. त्यातून बोध घेऊन त्यांनी ती किमया स्वतःत मुरवली. आणि त्याचवेळी त्यांच्या वाचनात कालिदासाचे 'मेघदूत' आले. आणि अरुंधती मेघदुतातील निसर्गाच्या प्रेमात पडल्या. आणि त्या मेघदूतावरील त्यांचे पहीले चित्र कागदावर उतरले. त्या चित्रातील सौंदर्य पाहून त्यांच्या वडीलांना खूप आनंद झाला व त्यांनी उत्तेजन दिल्यामुळे अरुंधतींनी त्यावर एक संपूर्ण चित्रमालिका तयार केली.  आणि १९८४ साली मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये अरुंधती वर्तक या निसर्ग चित्रकर्तीचे पहीले प्रदर्शन भरले व चित्र रसिकांसहित अनेक मोठमोठे साहित्यिक, चित्रकार, कवी अश्यानी भेटी देऊन त्यांच्या कलेची प्रशंसा केली. 

 


अरुंधतींनी जेव्हां भारतीय लघु चित्रशैलीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेव्हां त्यांना जाणवले की त्यात जे वृक्ष आहेत ते बहुदा पार्श्वभूमीला. पण ते त्या चित्रातील एक घटक म्हणून दर्शवीले जातात. ते कधीही विशिष्ट झाड अश्या तऱ्हेने त्याकडे पाहीलेले नसते. ही झाडे त्या चित्रांचे सौंदर्य खचित वाढवतात, त्यांच्या अलंकारीक रचनेमुळे आणि त्यातील सौंदर्यामुळे त्यांना स्वतंत्र असे स्थान नसते. त्यांत तो अपेक्षीत ध्वनि नसतो. आणि अरुंधतींच्या चित्रामध्ये त्यांनी या वृक्षांना मध्यवर्ती स्थान दिले. ते त्या चित्रातील मुख्य पात्र ठरले. आणि चित्रातील इतर घटक हे त्या वृक्षांना पूरक अशी पात्रे ठरली. या भारतीय लघु चित्र शैलीने (Indian miniatures) अरुंधतींना एक नवी दिशा दिली. त्यातील शैलीदार रचनेने, त्यातील आकार व आकृतीबंधाने कलेची दृष्टी दिली. अश्या या आकारबंधातून संगीतातून ध्वनीत होणारा शांत असा परीणाम चित्रातून त्या आविष्कृत करू लागल्या. आणि ही वृक्ष चित्रकलेची शैली त्यांनी दोन भारतीय लघु चित्रकलेच्या दोन शैलीतून साकारली. त्यातील एक होती वास्तववादी अशी १६ व्या शतकातील मुगल शैली जिच्यावर पर्शियन लघु शैलीचा प्रभाव होता. व दुसरी होती  राजस्थानी स्कूलची मेवाड, जयपूर, बसोली अशा वाळवंटी प्रदेशातील. त्या दोघांमध्ये एक गतिमान असे रंग, रेषा, आकार यांचा प्रवाही समतोलपणा राखला जातो. आणि अरुंधती यातून प्रेरणा घेवून त्यातील नाट्यमय आणि प्रभावी अशी झाडांची व्यक्तिमत्वं साकार करू लागल्या. तसे झाड अथवा वृक्ष हे भारतीय परंपरेनुसार अनेक संदर्भाशी रूढ झाले आहे. विवीध पारंपारीक, अध्यात्मिक, सामाजीक आणि धार्मिक रूढी याभोवती गुंफलेल्या असतात. आणि अरुंधतींनी केवळ झाडे चित्रित केली नाहीत, तर त्याचे अभ्यासपूर्ण अवलोकन केले. झाडांच्या वाढीच्या विविध अवस्था, ऋतुमानाप्रमाणे दिवसागणिक त्यांच्यात होणारे बदल, वातावरणाप्रमाणे त्यांचे रंग उधळत असलेले रूप, ऋतुमानाप्रमाणे होणारी पानांची पतझड व पुन्हां त्यांचे अंगावर नवीन फुलोरा चढवणे, झाडांसोबत असलेले अनेक पशु पक्षी यांच्याशी असलेले साहचर्य अश्या विविध रूपांनी त्या आपल्या चित्रांना आशयपूर्ण करतात.

 


अरुंधती आपल्या चित्रांना तीन भागात विभागते. ते म्हणजे फोरग्राउंड, बॅकग्राऊंड व आकाश. त्यातील पार्श्वभूमीच्या मोठ्या भागात तिच्या झाडाचे मुख्य केंद्रित केलेले पोर्ट्रेट असते. आणि त्यामध्ये पोस्टर रंगाचा वापर करून त्यातील अपारदर्शकपणा त्या जपतात. आणि त्या झाडांमधून आपणास त्यातील भावनांचा स्पर्श होतो. त्या सोबत विषयानुसार व त्यांतील मानसीक कलानुसार त्यामध्ये मानवाकृती, प्राणी, पक्षी, फुले जे नेहमी झाडाच्या साहचर्यात असतात, अश्यांची जोड त्याला दिली जाते. आणि त्यातील  नेमका मूड पकडतात. या चित्रांची त्यातील आषयानुसार केलेली रंगसंगतीची पॅलेट त्यांच्या मनात ठरलेली असते. त्यांची चित्रे सुरु होतात ती छोट्या स्केचिसनी. बॉल पेन अथवा पेन्सिलने केलेली लहान स्केचीस,  व नंतर पूर्ण पेंटींग या दोनच स्तरावर ती असतात. रंगाची निवड देखील त्या काळजीपूर्वक करतात. त्यांना त्यांची झाडे त्यांच्या पद्धतीने ओळखीची झाली आहेत. आणि त्यांची स्केचिस त्या त्यांच्या पद्धतीने वाचू शकतात. तिचे पारीजात हे सुंदर पेंटींग पाहील्यावर आठवण येते ती कृष्णाने स्वर्गलोकातून आणलेल्या पारिजातकाच्या पारंपारीक कथेची. वडाच्या झाडासभोवारचा संधी प्रकाश एक गूढ असे वातावरण तयार करते. आणि त्यात आपल्या पारंब्यासहीत उभा असलेला वड हा जटाधारी योग्याप्रमाणे भासतो. डेरेदार असा आंब्यांनी लगडलेला आम्रवृक्ष जणू आपली शीतल छाया व फळे देण्यासाठी हात पसरून उभा असतो. चिंचेचे झाड आपल्या भरगच्च अश्या जांभळट हिरव्या पानांनी चिंचाना कवटाळत असते, तेव्हां त्यातील डौल आपणास जाणवतो. फणसाच्या भाराने आपले समतोलत्व राखत असलेले फणसाचे झाड आपले मोहक रूप दाखवते. कोठे गुलमोहरने जमीनीवर पसरलेला रंगभान गालीचा असतो. जेव्हां एक आदिवासी मुलगी झोपाळ्यावर बसलेली बुलबल पक्षांची जोडी न्याहाळते, तेंव्हा त्यातील पिवळसर रंग हे पिकाच्या कापणीच्या हंगामावेळी असलेल्या उत्सवाची जाणीव देते. वास्तविक झाडांचे बारकावे, त्यांचे बदलते रंग, शिवाय प्रत्येक भागाची संपूर्ण झाडाशी असलेली प्रमाण बद्धता यांचे  रेखाटन  तसे कठीण काम आहे.पण अरुंधतीने त्यातील तंत्र  कौशल्यपूर्ण आत्मसात करून त्यामध्ये आपली कलात्मक रचना व डौल याचा समतोल साधला. त्यांच्या चित्रात इतका सखोल अभ्यास केलेला असतो की, ऋतूबदलाप्रमाणे होणारे फेरफार, निरनिराळ्या झाडांचे विवीध पोत, त्यासोबत असलेले पक्षी, कीटक यामुळे समजून येतात. सोनचाफ्यामधील मध चाखण्यासाठी येणारे काळे भुंगे त्यामध्ये दिसतात. पावसाळ्यात बाभळीच्या झाडावर येणारे पावसाळी पक्षी तेथे असतात.

अरुंधतींच्या चित्रांनी वेगवेगळे अविष्कार नेहमीच दर्शवले आहेत. त्यांची अनेक चित्रे शुभेच्छा पत्रावर वापरण्यात आली आहेत. त्यापैकी कांही C R Y(चाईल्ड रिलीफ ॲंड यू ), वर्ल्डवाईड फंड फॅार नेचर- इंडीया, नॅचरल सोसायटी फॉर क्रिपल्ड, बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटी या कांही उल्लेखनीय संस्था. त्यांनी आपल्या चित्रांची प्रदर्शने हाऊस ऑफ सोव्हिएत कल्चर, जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, आर्टीस्ट सेंटर या कला दालनांत भरवली आहेत. अनेक कॉर्पोरेट ऑफीस मध्ये त्यांच्या कलाकृती संग्रहीत आहेत. शिवाय भारतात तसेच जगभरातील बोटॅनिकल कला संग्रहालयात त्यांच्या चित्रांनी स्थान पटकावले आहे. त्यांच्या कला कारकिर्दीने भारतातील चित्रकला क्षेत्रात एक नवे दालन उघडले गेले. आणि त्यांनी आपला स्वतंत्र असा ठसा य क्षेत्रावर उमटविला.

 


अश्या या स्वयंप्रेरीत कलाकाराचे भारतीय वृक्षचित्रांचे उत्तर अमेरिकेतील ' हंट इन्स्टिट्यूट फॉर बोटॅनीकल डॉक्युमेंटेशन' या संस्थेने तिच्या एकटीचे प्रदर्शन ' पोर्ट्रेट्स ऑफ इंडियन ट्रीज' या शीर्षकाखाली सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी भरवून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या कलाकृतीवर एक सुंदरसा कॅटलॉग देखील काढण्यात आला. त्यावेळी 'क्यू गार्डन्स' या लंडनच्या जगप्रसीध्द वनस्पती उद्यानाच्या मान्यवर विश्वस्त डॉ. शर्ली शेरवूड यांनी अरुंधती यांचे 'कडुनिंब' हे चित्र पाहून त्यांची दोन चित्रे त्यांच्या वैयक्तीक संग्रहासाठी घेतली. डॉ. शेरवूड या  आपल्या संग्रहाचे प्रदर्शन बोटॅनीकल  आर्टच्या  प्रसारासाठी जगभर भरवीत असतात. त्यामुळे अरूंधतीना जगभर प्रसीद्धी मिळाली व जगभरातून त्यांच्यावर कला पत्रिकेतून स्तुतीवर्षाव झाला. भारतीय वृक्षांची विविधता आणि सौंदर्य जगभरात पोचवण्यात अरुंधती वर्तकांचा सहभाग नक्कीच आहे.  

कलाक्षेत्रा इतकीच अरुंधतींची साहीत्य- वाङ्मय क्षेत्रांतही तितकीच बहुमूल्य कामगिरी आहे. कुंचल्याइतकीच त्यांची प्रतिभा साहीत्यातही बहरून येते. शब्दांना कल्पनेची जोड देवून त्यातील आशय त्या चित्राप्रमाणेच कागदावर ओघवत्या भाषेत उतरवतात. स्वतः  केलेल्या निसर्गाच्या भटकंतीमधून आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या मेघदूताच्या प्रदर्शनानंतर त्यांनी लोकसत्तेसाठी 'वहिवाट ही लेखमाला लिहीली. त्यांच्या 'चिंचणी' या खेडेगावांतील पायवाटेच्या बाजूच्या, कुंपणालगत उगवणाऱ्या विविध रंगीबेरंगी रानफुलांवर त्यांनी शास्त्रीय माहीतीपुर्ण लेख लिहीले. त्यांची ‘वईवाट’ ही लेखमाला सर्वांनाच भावली. वईवाट म्हणजे वहीवाट. तेथील बोली भाषेत तिला वईवाट असे संबोधीले जाते. व तोच आपुलकीचा शब्द अरूंधतीनी ठेवला आहे. सध्या त्यांच्या हातात दोन महत्वाचे प्रकल्प आहेत. त्यापैकी एक आहे प्राचीन साहीत्यातील वनस्पती सृष्टी. यामध्ये वृक्षांची नांवे, त्यांचे ऐतिहासीक, सामाजीक, सांस्कृतीक संबंध यांचा आढावा आहे. आणि दुसरा प्रकल्प आहे सातवाहन काळातील ग्रंथ 'गाथा सप्तशती' चे इंग्रजी भाषांतर आणि तेही सचित्र. खूप मोठे प्रकल्प आहेत हे!

 


आज अरुंधती सांगतात, त्यांची स्वप्ने खूप आहेत. अगदी गगनाला गवसणी घालण्यासाठी त्या हात पसरून उभ्या आहेत. पण ते हात दोनच आहेत. तरिही विश्वास आहे की हे काम  पूर्ण करून रसिकांपुढे नक्कीच आणतील. अर्थात त्यांच्या कामाची भरारी, कल्पना शक्तीची झेप, उपजत असलेली अफाट प्रतिभा आणि विषयाचा असलेला सखोल शास्त्रीय अभ्यास यामुळे हे प्रकल्प निश्चितच पूर्ण होतील याची खात्री आपणा सर्वाना आहेच!

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
 
( लेखन संदर्भ सौजन्य: श्रीमती उष:प्रभा पागे, चतुरंग.
चित्र सौजन्य : हंट इन्स्टीट्यूट फॅार बोटॅनीकल डॅाक्युमेंटेशन- कॅटलॅाग)




Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…