तो एक काळ होता....

 


तो एक काळ होता,

जेव्हां आम्हांला शाळा म्हणजे एक मंदीर वाटत होते,
अन आमचे शिक्षक त्यातील देव. घासून पुसून, तावून सुलाखून आमच्या बुद्धीच्या रांजणात आपल्या ज्ञानाचे कलश रीते करीत होते. आम्हांला परीपू्र्ण करीत होते. आपली नांवे आमच्या हृदयावर कोरीत होते.
आणि आमची मस्तके त्यांच्या चरणी ठेवीत होतो.
 

तो एक काळ होता,
जेव्हां हरी नारायण आपटे, नाथ माधव, वि.सी.गुर्जर, न.चिं.केळकर, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, गो.ना.दातार, वि.स. खांडेकर, वि.वि.बोकील, मालतीबाई बेडेकर, ईरावती कर्वे या सारखे चतुरस्त्र कादंबरीकार आमचे साहीत्यिक ज्ञान वाढवीत होते. ग.दि.माडगूळकरांसारखे आधुनीक वाल्मीकी आपल्या अमृतमय शब्दलेण्यांनी महाकाव्याची बरसात करीत होते. जोडीला चित्रपट, कथा,भक्तीगीते, लावणी, अभंग अशा रचनानी चहुबाजूनी आमच्यावर संस्कार करीत होते.
 

तो एक काळ होता,
चित्र महर्षी बाबुराव पेंटर, व्ही.शांताराम, विष्णुपंत पागनीस, वसंतराव जोगळेकर, राजा परांजपे, राजा गोसावी, विवेक अभ्यंकर, शरद तळवलकर, राजन जावळे, दामूआण्णा मालवणकर, धुमाळ, चंद्रकांत, सूर्यकांत, रमेश देव, दादा कोंडके, उषा किरण, बेबी शकुंतला, सुलोचना , सुमती गुप्ते, रेखा, चित्रा, जयश्री गडकर, सीमा अशा मराठी कलावंतानी मराठी चित्रपट सृष्टी समृद्ध करून आम्हांला एक नवी दृष्टी दिली. कुटुंब काय असतं याची जाणीव करून दिली.
तसेच या चित्रपट सृष्टीवर संगीताचा साज चढवणारी कलाकार मंडळी आम्ही पाहीली ती, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकी, राम कदम, वसंत पवार, दत्ता डावजेकर, प्रभाकर जोग, वसंत देसाई, सी. रामचंद्र, दशरथ पुजारी, केशवराव भोळे, स्नेहल भाटकर, आनंदघन, हृदयनाथ मंगेशकर, राम मराठे, यशवंत देव, गजानन वाटवे, अशोक पत्की, श्रीकांत ठाकरे असे एकापेक्षा एक सर्जनशील कलावंत. आणि त्यांना आपला दैवी स्वर देणाऱ्या गान कोकीळा म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, माणीक वर्मा, उषा मंगेशकर, मीना खडीकर, तसेच सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, रवींद्र साठे असे होनहार गायक. यामध्ये कधीकधी शास्त्रोक्त संगीत गायक. पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी अश्यानीही आपल्या आवाजाने हे क्षेत्र समर्थ केले आहे
 

तो एक काळ होता,
हिंदी चित्रपट सृष्टी कृष्ण धवल होती, तरीही त्यातून सौंदर्याची जाण होत असे. अशोक कुमार, दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद ही आमची दैवते होती. तमाम प्रेक्षक वर्ग या अभिनेत्यानी वाटून घेतला होता. त्यांच्या जोडीला नूतन, वहीदा रेहमान, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, शामा, उषाकिरण, माला सिन्हा, सुचित्रा सेन, निरूपा रॅाय अशा अभीनेत्री होत्या. आज चित्रपट रंगीत झाला असला तरी पूर्वीच्या कृष्ण धवल चित्रपटांची रंगत कांही औरच होती. आजही त्या काळातील जुने कृष्ण धवल चित्रपट तितकेच उत्कंठेने पहावेसे वाटतात.
 

तो एक काळ होता,
या महाराष्ट्राने आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वि.आ. बुवा, द.मा.मिरासदार, अ.वा.वर्टी, वि.वि.बोकील, श्री.कृ.कोल्हटकर, चिं.वि.जोशी, रमेश मंत्री, न.वि. तथा काकासाहेब गाडगीळ, गंगाधर गाडगीळ, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, असे अनेक विनोदी लेखक दिले ज्यांनी आम्हांसहीत संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरधरून हसायला लावले. ते स्वत: महाराष्ट्रभर फिरले व महाराष्ट्राला स्वत:भोवती फिरवले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे पोहे, चिं. वि. जोशींचे चिमरावांचे चऱ्हाट, एरंडाचे गुऱ्हाळ, अत्र्यांचे मी कसा झालो, अश्या पुस्तकांनी आमच्या मनावर विनोदी संस्कार नक्कीच केले. आणि हा वारसा पुढे चालवला तो मधुकर पाटकर यांनी 'आवाज' हे विनोदी वार्षिक काढून.
 

तो एक काळ होता,
जेव्हां या महाराष्ट्रावर दत्तो वामन पोतदार, दुर्गाबाई भागवत, बाबासाहेब पुरंदरे, इतीहासाचार्य राजवाडे, वि.सी.चितळे, य.दि. फडके, गो.नि.दांडेकर, असे अनेक व्यासंगी व अभ्यासक इतीहासकार दिले.
काव्याशी तर आपल्या महाराष्ट्राचे जिवाभावाचे नाते. अगदी संत, पंत, तंत काव्य हे मराठी घराघरात गुणगुणले जाते. आणि त्यामुळे या मातीत अनेक कवी जन्मले. त्यामध्ये आईची थोरवी सांगणारे राजकवी यशवंत होते, स्वातंत्र्याचा जयजयकार गर्जणारे कुसुमाग्रज होते, झेंडूची फुले वाहून महाराष्ट्राला विडंबनाने हसवणारे केशवकुमार होते, निसर्गाशी नाळ जुळलेले व श्रावणाच्या धारा बरसावणारे मंगेश पाडगांवकर होते, तसेच बा.सी. मर्ढेकर, केशवसुत, भा. रा. तांबे, कवी अनिल, बा.भ. बोरकर , आरती प्रभू, सदानंद रेगे, वसंत बापट अश्या या सर्जनशील कवींची लांबलचक रांक आम्ही पाहीली आहे. ऐकली आहे.
 

तो एक काळ होता,
जेव्हां बाबुराव अर्नाळकरांनी आपल्या रहस्यकथांची मोहीनी तमाम मराठी माणसावर कैक वर्षे घातलेली होती. वाचनालयात त्यांच्या नवीन रहस्यकथेसाठी वाचक आतुरतेने वाट पहात असत. विद्यार्थी दशेत आम्ही शालेय पुस्तकाच्या आत अर्नाळकरांची पुस्तके ठेवून वाचीत असू. त्यामधील डिटेक्टीव्ह धनंजय-छोटू, झुंजार-विजया, काळापहाड, चारुहास या नायकांना मनांत कवटाळत होतो. त्यातील पात्रे खरी समजून अनेकजण त्यांना पत्रे लिहीत असत. कारण रंगसम्राट मुळगांवकरांनी त्यांना आपल्या कुंचल्याद्वारे चेहरे दिले होते.
 

तो एक काळ होता,
जेव्हां चित्रकार दलाल, रघुवीर मुळगांवकर, एस.एम,पंडीत, शंकर पळशीकर, गोपाळराव देऊसकर, द.ग.गोडसे, शंतनू माळी, आलमेलकर, व्ही.एस. गुर्जर, रवी परांजपे, प्र.ग.शिरूर, ज.द.गोंधळेकर, के.बी.कुलकर्णी, जे.पी. सिंघल असे चित्रकार तसेत रावसाहेब म्हात्रे, नानासाहेब करमरकर, भाऊसाहेब साठे, बाळाजी वसंत तालीम, रघुनाथ फडके, रामचंद्र पां. कामत, नारायण सोनावडेकर, वाघ असे शिल्पकार अशा कलावंतांची बरसात या महाराष्ट्रावर झाली. आणि महाराष्ट्र कला संस्काराने संमृद्ध झाला.

तो एक काळ होता,

राम गणेश गडकरी, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, गोवींद बल्लाळ देवल, आण्णासाहेब किर्लोस्कर, वीर वामनराव जोशी, गो.ग. आगरकर, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, श्री. कृ. कोल्हटकर, मो.ग.रांगणेकर, गोवींदराव टेंबे, मामा वरेरकर, बाळ कोल्हटकर, विजय तेंडुलकर, वि.वा. शिरवाडकर, अशा नाटककारानी अजरामर नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला, व बालगंधर्व, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, दिनानाथ मंगेशकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार, दाजी भाटवडेकर, दत्ता भट, बापूराव माने, चित्तरंजन कोल्हटकर, काशीनाथ घाणेकर, श्रीराम लागू, माधव आपटे अशा कैक कलावंतानी आपल्या उत्कट अभिनयाने, दैवी आवाजाच्या संगीताने त्यावर कळस चढवून मराठी माणसाला नाटकवेडे केले.
 

तो एक काळ होता,
माणसाच्या मनोरंजनासाठी परमेश्वराने मोठ्या प्रयासाने स्वर्गलोकीच्या गंधर्वाना मानवरूप देवून या पृथ्वीतलावर महंमद रफी व लता मंगेशकर म्हणून पाठवले. आणि दैवी आवाज लाभलेल्या या दोघानी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगावर आपल्या आवाजाची मोहीनी घातली. सर्व जगाने हेवा करावा अशा या शारदामातेच्या गळ्यातील दोन रत्नांनी आपल्या मधूर आवाजाच्या रूपाने सर्व भारतीयांच्या मनांवर स्वरसंगीताची अक्षरश: बरसात केली. आजही प्रत्येक घरांत पहाट उगवते ती यांच्या भूपाळीने व दिवस मावळतो तो यांच्याच भैरवीने. आणि रेडीओवर यांच्या गीतांचे समालोचन करण्यासाठी मधूर, लाघवी आणि मधाळ आवाजाचे अमीन सायानी तितकेच यांच्या आवाजाशी एकरूप झाले होते. दर बुधवारी त्यांच्या गीतांची मेजवानी असलेली बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी तसेच अमीनभाईंचे मधाळ आवाजातील समालोचन ऐकण्यासाठी त्या काळात आम्ही हॅाटेलात बिनाका गीतमालेच्या वेळी पाच सहा कप चहा ढोसून रात्री आठ ते नवू हा काळ घालवला आहे. अजूनही कानांत ती गीतमाला गुंजारव करीत असते.
 

तो एक काळ होता,
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चाफेकर बंधूंचा वारसा सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यासारखे जाज्वल्य देशभक्तांचा! वासुदेव बळवंत फडके, विष्णू गणेश पिंगळे यांचा, क्रांतिवीर नाना पाटीलांचा. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आकाश पातळ एक करून सोडणाऱ्या आचार्य अत्रे, कॉ. डांगे, जॉर्ज फर्नांडीस, एस. एम. जोशी, सेनापती बापट, बॅ. नाथ पै यासारख्या जनता जनार्दनाच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या लोकनेत्यांचा, चिंतामणराव देशमुखांसारखे महाराष्ट्रासाठी आपले केंद्रातील मंत्रीपदावर लाथ मारणारे महाराष्ट्र प्रेमी अर्थतज्ज्ञांचा. आपल्या कुंचल्याच्या जोरावर आणि व्यंगचित्राच्या दैवी देणगीवर भ्रष्ट मंत्र्यावर, पुढाऱ्यावर अन्यायावर कुंचल्याचे घण घालून त्यांना चळाचळा कापायला लावणारे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे 'मार्मिक' होते. आचार्य अत्रे यांची मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी व संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा घेणारी नवयुग व मराठा ही वृत्तपत्रे होती. यांचे असणेही आम्हांला प्रेरणादायक होते. स्फूर्तिदायक होते.
 

तो एक काळ होता,
यशवंतराव चव्हाण यासारख्या खंद्या, समर्थ आणि दृष्ट्या अश्या नेतृत्वाचा. वसंतराव नाईक, लोकनेते बाळासाहेब देसाई, बाळासाहेब भारदे, मधुकरराव चौधरी, पंजाबराव देशमुख, वसंतदा पाटील अश्या कृषीतज्ञ चारित्र्यवान लोकनेत्यांचा. ज्यांच्याजवळ पोचण्यास सामान्य माणसालाही कधीच अडचण आली नाही. कारण ती तुमच्या आमच्या सारख्या सामन्यातून निर्माण झाली होती. सर्वांशी त्यांची नाळ जोडली गेली होती.
 

तो एक काळ होता,
क्रिकेट हा खेळ एक जंटलमन खेळ म्हणून खेळला जायचा. त्यावेळचे खेळाडू माधव मंत्री, बापू नाडकर्णी, विजय हजारे, अजीत वाडेकर, एकनाथ सोलकर, कपील देव, सुनील गावसकर दिलीप वेंगसरकर यांची बॅट मैदानावर तलवारी प्रमाणे तळपत असे. त्या खेळाडूंना ना होता पैशाचा सोस ना प्रसिद्धीचा हव्यास. त्यांनी कधीच आपल्या अंगावर उत्पादनांची ठिगळे जोडली नाहीत. जोडली ती फक्त मराठी रसिकांची मने. कारण खेळाला ते दैवत मानत.
 

तो एक काळ होता,
आम्ही पाहीली ती वृत्तपत्रे, त्यांचे निर्भीड आणि झुंझार संपादक ज्यांच्या शाब्दीक तोफांच्या भडीमाराने अनेकांचे भ्रष्टाचार, गैर व्यवहार, कुलंगडी, गैरवर्तन बाहेर आले आणि त्यांच्यावर कारवाई झाली. यामध्ये होते ते दै.मराठाचे आचार्य अत्रे, ब्लीट्झचे रूसी करंजीया, नवाकाळचे निळकंठराव खाडीलकर, विविधवृत्तचे चं.वि. बावडेकर, लोकसत्ताचे ह.रा.महाजनी पासून ते माधवराव गडकरी, कुमार केतकरपर्यंत, लोकमित्रचे एस. एम. जोशी, इंडीयन एक्सप्रेसचे अरूण शौरी. मार्मिकचे बाळासाहेब ठाकरे, बेळगांवच्या तरुण भारतचे बाबुराव ठाकूर. हे सर्व पत्रकार सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आपल्या लेखणीची ढाल करून उभे राहीले.
 

तो एक काळ होता,
भोळ्या भाबड्या जनतेच्या डोळ्यावरील अंधश्रद्धेची झापडं काढण्यासाठी डोक्यावर खापर आणि हातात झाडू घेऊन रस्त्यावरील आणि माणसाच्या मनातील घाण स्वच्छ करणाऱ्या गाडगे महाराजांचा.
किती पुजला देव तरी,
देव अजून पावला नाही,
कुठं रहातो कुणास ठाऊक
अजून पर्यंत घावला नाही

म्हणून समाजाला वास्तवतेचा आरसा दाखविणाऱ्या समाज सुधारकांचा.
 

तो एक काळ होता,
असा एक सुवर्ण काळ. या सुवर्णमयी काळात आम्ही जन्मलो, ते दिवस पाहीले, अनुभवले, उत्तुंग अशी हिमालयाच्या उंचीची माणसे पाहीली. आणि आठवणींच्या कप्प्यात हळुवारपणे जपून ठेवली. कधीकाळी मन त्रस्त झाले, आजूबाजूला पाहीले, स्वार्थासाठी रस्त्यावर उतरणारी माणसे पाहीली की त्या आठवणींचे क्षण हळूच बाहेर काढून पहातो. आणि मनाशीच म्हणतो, हे दिवस पुन्हां नक्कीच येतील. कारण हे कालचक्र आहे. एक वेढा पूर्ण झाला की परत मूळ ठिकाणावर येऊन स्थिरावते!



प्रा. मं. गो. राजाध्यक्ष


Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…