काळाच्या पुढे पहाणारा द्रष्टा चित्रकार: ग. ना. जाधव
वाचनाचे वेड अन घरात वडीलांच्या वाचन व्यसनाने येणारी असंख्य पुस्तके, मासीके यामुळे माझे वाचनाचे वेड तर वाढलेच, शिवाय त्यासाठी चित्रे काढून सजवणारे चित्रकारही त्या मासिका - पुस्तकातून माझ्या परीचयाचे होत गेले.दर्जेदार अशी त्याकाळची ती मासिके, त्यात लिहिणारे तितकेच व्यासंगी आणि शैलीदार असे लेखक आणि त्यांच्या कथा-लेख आपल्या चित्रशैलींनी वाचनीय आणि आकर्षित करणारे चित्रकार ह्या सर्वांचा तो सुवर्ण काळ होता. आणि या प्रकाशनामागे तितकीच समर्थ अशी लेखन कौशल्य असणारी संपादक मंडळी असे. त्यामधे झंकार व अंजली काढणारे ना. सी. फडके, वसंतचे दत्तप्रसन्न काटदरे, हंस-मोहीनी-नवलचे अनंत अंतरकर, नवयुगचे आचार्य अत्रे, प्रसादचे य.गो.जोशी-स.आ.जोगळेकर-सोनोपंत दांडेकर, दीपलक्ष्मीचे ग.का.रायकर, आवाजचे मधुकर पाटकर असे एकापेक्षा एक असे मातब्बर. या सर्वांचे त्यांच्या प्रकाशनासाठी चित्रकार ठरलेले असत. यात प्रामुख्याने दीनानाथ दलाल, एस.एम.पंडीत, रघुवीर मुळगांवकर, व्ही.एस.गुर्जर,प्र.ग.शिरूर, शि.द.फडणीस, शंतनू माळी, वसंत सरवटे असे नामांकीत चित्रकार होते. त्यामुळे त्यांच्या शैलीचीही ओळख घडून येत असे. आणि त्याकाळात एका दृष्ट्या मराठी माणसाने उद्योग जगतात क्रांती करून स्वतःचे पाय रोवले व त्यातून आजचा सुप्रसिध्द असा 'किर्लोस्कर उद्योग समूह' उभा केला, त्या लक्ष्मणराव किर्लोस्करांनी १ जानेवारी १९२० साली आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी सुरु केलेले 'किर्लोस्कर खबर' हे नियतकालीक पुढे त्यांचे चित्रकार पुतणे श्री. शं.वा.किर्लोस्कर यांनी त्याला साहीत्यिक दर्जा दिला. पुढे स्वा. सावरकरांनी त्यातील खबर या फारसी शब्दाला त्यातून काढून टाकायला लावले व ते केवळ 'किर्लोस्कर' मासीक राहीले. अश्या या किर्लोस्कर साठी शं.वा. कि. नी अनेक नामवंत लेखकांना लिहायला लावले. पाठोपाठ स्त्रीयांसाठी एक व्यासपीठ मिळावे या हेतूने 'स्त्री' हे नियतकालिक सुरु केले. तसेच तरुणासाठीही 'मनोहर या लहान आकाराच्या मासिकाने जन्म घेतला. आणि त्यातील लेख, कथांना सुंदर अशी बोलकी बोधचित्रे देण्यात येऊ लागली. या चित्रांच्या खाली टाकाने लयबद्ध अशी केलेली ग.ना.जाधव अशी धावती सही दिसू लागली. आणि तिच आमच्या बालवयात ग.ना.जाधवांशी झालेली आमची पहीली ओळख.
गजानन नारायण जाधव यांचा जन्म १४ जानेवारी १९१७ चा कोल्हापुरातील. कोल्हापुरातील मातीच कलावंत घडवणारी. म्हणून ते कलापूर म्हणून ओळखले जाते. अर्थातच त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण ईश्वराने हातात दिलेली निसर्गदत्त कलेची देणगी होती. त्यामुळे लहानपणापासून ते चित्रकलेत रमत असत. त्याकाळात त्यांनी चित्रकलेच्या शासकीय ग्रेड परीक्षा दिल्या व ते त्यामध्ये गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झाले. त्याकाळातील ग्रेड परीक्षा देखील आतापेक्षा खूप कठीण असत. त्या दोन्ही परीक्षा चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण होऊन जाधवांनी आपली कला सिद्ध केली. चित्रकलेचे शिक्षण त्यांनी घरच्या घरीच घेतले. कोल्हापुरातील महान चित्रकार गणपतराव वडणगेकर, व चित्रमहर्षी बाबुराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे धडे गिरविण्यास आरंभ केला. या कोल्हापुरात तशी नामवंत चित्रकारांची मांदीयाळीच होती म्हणा ना! त्यातील बाबा गजबर, चित्रकार जांभळीकर, माधवराव बागल अश्या चित्रकारांचे मार्गदर्शनाचे भाग्यही त्यांच्या वाट्याला आले. प्रत्येक गुरूकडून काहींना काही ते आत्मसात करीत होते. आणि त्यांचे गुरुही त्यांना भरभरून देत होते. आणि अल्पावधीतच गजानन जाधवांनी आपल्या रेखाटनावर कमालीचे प्रभूत्व मिळविले. दरम्यान १९४२ साली त्यांचा इंदीराबाई कदम यांच्याशी विवाह झाला.
इकडे किर्लोस्कर-स्त्री-मनोहर या मासिकांनी अल्पावधीतच आपल्या वाङ्मयीन दर्जामुळे प्रसिद्धीचे शिखर गाठले होते. त्यांचे संपादक शं. वा. किर्लोस्कर स्वतः एक निष्णात चित्रकार होते. पंडीत सातवळेकर सारख्या चित्र महर्षींचे त्यांना मार्गदर्शन मिळाले होते. त्यांनीच पुढे शं.वा. कि. यांना मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टची वाट दाखवली होती. आणि कलेची दृष्टी लाभलेले शं.वा.कि.आपली नियतकालिके, त्यातील वाङ्मयीन दर्जाप्रमाणेच त्यातील सुबकता देखील राखून होते. कित्येकदा स्वत:च ते मुखपृष्ठ रेखाटत असत. आतमध्ये माणसांच्या दैनंदिन जीवनावर, समाजातील अनीष्ठ प्रथांवर, कौटुंबीक समस्यावर व्यंगचित्रे रेखाटत असत. या किर्लोस्कर मध्ये शंकररावांनी ललित, वैचारीक लेखांना प्राधान्य दिले. या मासिकात स्वा. वि.दा . सावरकर, वि.स.खांडेकर, ना.सि.फडके, डॉ.पु.ग.सहस्त्रबुद्धे, चिं. वि. जोशी, डॉ.अ.वा. वर्टी अश्या नामवंतांचे लेखन सहाय्य मिळाले. व त्यासाठी चित्रे काढताना जाधवांची साहीत्यिक पातळी वाढू लागली. कारण चित्रे काढण्यापूर्वी सर्व लेख वाचावे लागत, व एक प्रकारे तो जाधवांचा तो साहीत्यिक अभ्यास सुरु झाला. त्यांना साहीत्याची उत्तम जाण आली. आणि जाधवांचे चित्रकलेवरील असामान्य प्रभुत्व, त्यांची तपश्चर्या, त्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम पाहून माधवराव बागल यांनी शंकरराव किर्लोस्कर यांच्याकडे जाधवांची शिफारस केली. आणि किर्लोस्कर कंपनीत गजानन जाधव चित्रकार म्हणून कार्यरत झाले. त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. आणि प्रकाशन क्षेत्राला एक तडफदार असा शैलीदार चित्रकार मिळाला. किर्लोस्कर-स्त्री-मनोहर ही मासिके चित्रकार जाधवांच्या कुंचल्याने नटू लागली, सजू लागली, वाचकांना त्यातील कथा वाचण्यास प्रवृत्त करू लागली. आणि त्यांच्या मुखपृष्ठाच्या तीन रंगी चित्रावर तसेच आतील कृष्ण धवल चित्राखाली एक लयबद्ध अशी धावती सही दिसू लागली, 'ग.ना.जाधव' व त्यानंतर किर्लोस्कर नियतकालिके आणि ग.ना.जाधव हे एक समीकरणच बनले. आणि या नोकरी सोबतच ग.ना.जाधवांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टचा पेंटिंगचा अभ्यासक्रमही प्रथम श्रेणीत गुणवत्तेत येऊन पूर्ण केला. त्यामुळे त्यांच्या कलेला शास्त्रोक्त बैठक मिळाली.
किर्लोस्कर मध्ये काम करताना मुखपृष्ठासोबतच आतील कथा, लेख यांच्यासाठीही बोधचित्रे काढावी लागत असत. दरमहा प्रसीद्ध होणारी ही नियतकालिके असल्याने त्यांच्या कामाचा वेग देखील प्रचंड प्रमाणावर होता. प्रथम लेखकाची कथा संपूर्ण वाचून त्यातील आशय समजून घेणे, त्यातील पात्रांचा परीचय करून घेणे, त्यांच्या व्यक्तीरेखा ठरविणे, त्याप्रमाणे त्यातील योग्य प्रसंग निवडून त्यावर तितकेच परीणामकारक चित्रं रेखाटने हा जाधवांचा खास असा ठसा त्यावर उमटला. चित्राचा विषय, त्याची मांडणी, त्यातील गर्भीत अर्थ, समयसूचकता आणि स्वतःची खास अशी चित्र शैली त्यामुळे अल्पावधीतच 'ग.ना.जाधव' हे नांव मराठी घराघरात पोचले. आणि गम्मत म्हणजे मला माझ्या लहान वयात त्यांच्या त्या कथा चित्रांनी खूप आकर्षीत केले होते. त्यातील कथा वाचताना त्यामधील पात्रे आपले विविध चेहरे घेऊन आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याचे कसब जाधवांनी अत्यंत कलात्मकतेने साधले होते. अजूनही मला त्यातील डॉ. अ. वा. वर्टी यांच्या कथा आठवतात. बहुदा त्या सर्व विनोदी असत. त्यामध्ये त्यांनी स्वतःचे कुटुंब गुंफलेले होते. स्वतः अंत्या, त्यांची पत्नी सुलु अशी पात्रे त्यामध्ये असत. अश्या या दोघांच्या घरी एकदा त्यांच्या पत्नीची लांबची आत्या रहायला येते. तिने आपल्या सुलूच्या नवऱ्याला कधीच पाहीलेले नसते. स्टेशनवर त्यांना उतरून घ्यायला हे दोघे जेव्हां जातात, तेव्हां आत्याला हा तीचा सर्व्हंट वाटतो. आणि त्यांच्या डोक्यावर आपला सर्व बोजा ती टाकते. अश्या त्या जाडजूड आत्याचे वर्णनाबरहुकूम बोधचित्र जाधवांनी इतके सुंदर रेखाटले होते, की अजूनही मझ्या डोळ्यासमोर ते येते. खाकेत छत्री पकडलेली, जाडजूड ओठ, हातात पर्स, डोळ्यावर गॉगल, आणि केविलवाण्या चेहऱ्याने डोक्यावर हमालाप्रमाणे सामान वहात नेणारा नोकराच्या भूमीकेतील अंत्या. ह्या कथेचे नांव होते' सुलूचा सर्व्हंट'. डॉ. अ. वा. वर्टी यांच्या स्वतःला अभीप्रेत करून लिहीलेल्या अंत्या आणि सुलू या पती पत्नीच्या विनोदी कथा सुलूचा सर्व्हंट, टालडुप्पो वांगीमाडू, वाचकांना रिझवीत असत व त्यांना ग.ना. जाधव आपल्या बोधचित्रांनी सजवीत असत. अशी कैक बोधचित्रांनी ही मासीके जाधवांच्या कुंचल्याने सजत असत. तसेच त्याकाळी गाजलेली दाजी या मालीकेमधील दाजीचे व्यक्तीत्व हे गाजले होते. तसेच त्याकाळात बहुदा टाकाने केलेली ही चित्रे मराठी वाङ्मय क्षेत्रातील कथाचित्रांचा एक अजोड नमुना मानली जावीत. त्या वयात आम्हांला ते जाणवत नसे, पण आता जेव्हां त्यांच्या बोधचित्रांचा विचार करतो तो त्याकाळातील त्यांची चित्रे ही काळाच्या कितीतरी पुढची असल्याचे जाणवते. ही दूरदृष्टी त्यांना लाभली होती.
मुखपृष्ठासाठी जाधवानी अनेक विषय निवडले. मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील काळानुसार बदलती जाणारी संस्कृती. त्यातही ग्रामीण विषय त्यांना खास करून मोहवीत असत. ग्रामीण भागात साजरे केले जाणारे सण, तेथील खास असे उत्सव, बैल पोळ्यासारखे सण दिवाळीचा मराठी घरातील साजरा केला जाणारा सण, त्यामध्ये आकाश कंदील लावणारा यजमान, मुलांना अभ्यंगस्नान घालणाऱ्या व दारात रांगोळ्या घालणाऱ्या गृहीणी असे अनेक प्रसंग चित्र रूपांनी त्यांनी घरोघरी पोचविले. त्यांच्या चित्रातील गृहीणी ही खास अश्या मराठी पेहरावातील नऊ वारी साडी नेसणारी, नाकात नथ असलेली आणि चेहऱ्यावर प्रसन्न असे हास्य बाळगणारी असे तसेच त्यातील घरधनी हा फुल शर्ट व धोतर परीधान केलेला आजूबाजूला एकदोन लहान गोंडस बालके अश्या प्रकारचे वास्तव दर्शन ते करीत. तसेच अनेक व्यक्ती चित्रणातून बऱ्याच नामांकितांना त्यांनी मुखपृष्ठावर स्थान देऊन महाराष्ट्राला परिचीत करून दिलें आहे. विशेषतः दिवाळी अंगावरील त्यांच्या या कौटुंबीक चित्रामुळे वाचकांचा आनंद द्विगुणीत हॉट असे. आणि भारतीय संस्कृतीचा परंपरेचे संस्कार होत असत. ना.सी.फडके यांच्या 'अंजली' या दिवाळी अंकासाठी तसेच अनेक पुस्तकांसाठी, कथा कादंबऱ्यासाठी त्यांनी विपुल असे चित्र कार्य केलें आहे. विशेष करून 'अंजली'च्या वासंतीक अंकावर त्यांनी केलेली 'ओलेती' ही सौंदर्य दर्शक खचित होती, पण आपल्या चित्रात जाधवांनी कधीही बीभस्त्तता, अश्लीलता अथवा वासना दर्शवली नाही. संपूर्ण कुटुंबाला आनंदीत करणारी चित्रे ते रेखाटत असत.
ग.ना.जाधवांनी नियतकालिकांसाठी बोधचित्रे काढली तशीच अनेक निसर्गचित्रेही काढली. जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमावर त्यांची हुकूमत तितकीच प्रभावी होती. चित्रातील पारदर्शकपणा, तजेलपणा व जिवंतपणा हे त्यांचे रंगलेपनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तितक्याच सुलभतेने ते अपारदर्शक पोस्टर रंगही वापरीत असत. जलरंगातील व्यक्तिचित्रात ग.ना.जाधवांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. व्यक्तीचे अंतरंग ते मोठ्या मार्मिकतेने दर्शवीत असत. त्यांची चित्रे आधुनीक असत पण त्यामध्ये दुर्बोधता नव्हती. जाधवांचा ओढा हा वास्तवतेकडे होता पण आधुनिकतेकडेही ते अभ्यासपूर्ण नजरेने पहात असत. किंबहुना त्यांची सर्व चित्रे ही आधुनिकतेचा परीस स्पर्श झालेली असल्याने ती केवळ अकॅडमिक अथवा जुन्या वळणाची शैक्षणीक स्वरूपाची नसून आधुनिकतेचा कळस चढवलेली सर्वांगीण अशी चित्रे आपल्याला जाणवतात. पुणे विद्यापीठात असलेली कर्मवीर शिंदे, मा. यशवंतराव चव्हाण, विज्ञान भवनातील पंडीत नेहरू, 'ल का कि' मधील संग्रहालयातील लक्ष्मणराव किर्लोस्कर व शंतनुराव किर्लोस्कर, बालगंधर्व कला दालनातील बालगंधर्व अशी अनेक व्यक्तिचित्रे याची साक्ष देतात. अनेक सुप्रसीध्द अश्या नामवंत व्यक्तींची प्रत्यक्ष बैठकीवरून केलेली अनेक व्यक्तिचित्रणे जाधवांनी केली आहेत. त्यामध्ये कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रकार गणपतराव वडणगेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महा महोपाध्याय दत्तो वामन पोतदार, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, शंकरराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर, कवयित्री शांता शेळके, चित्रकार रवींद्र मेस्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, अशी भली मोठी रांग आहे त्यांच्या व्यक्तिचित्रणाची. आपल्या व्यक्तिचित्रणातून त्या व्यक्तीचे स्वभावगुण, त्याचे अंतरंग दाखविण्यात जाधवांची हातोटी होती. म्हणूनच दत्तो वामन पोतदारांचे व्यक्तिचित्रण पहाताच जाणवतो तो त्यांचा कणखरपणा आणि शिस्त, शंतनुराव व शंकरराव किर्लोस्करांची चित्रे पाहील्यावर त्यांच्या नजरेतील भव्य अशी विकासाची स्वप्ने पाहण्याची दृष्टी, आचार्य अत्र्यांचा परखड आणि भारदस्तपणा. व्यक्तिचित्रणाच्या पातळीवर जाधव हे एक निष्णात चित्रकार मानले जावेत. सुप्रसिद्ध साहीत्यिक वि.द.घाटे यांना प्रत्यक्ष मॉडेल बसवून केलेल्या त्यांच्या 'दादा' या व्यक्तिचित्रणास पुरस्कार मिळाला. १९७१ सालच्या महाराष्ट्र राज्य कला प्रदसर्शनात त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला.
ग.ना.जाधव हे स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि प्रसिध्दी परान्मुख असे चित्रकार होते. स्वभावाने थोडेसे अबोल असल्याने त्यांनी स्वतःच्या चित्रांची प्रसंशा कोणाकडे कधीच केली नाही.स्वतःच्या चित्रांची प्रदर्शनेंहि त्यांनी कधी भरवली नाहीत. ते भरवले ते त्यांचे मित्र श्री शि. द. फडणीस यांनी. तसे पाहीले तर शि. द. फडणीस व ग.ना. जाधव दोघेहि कोल्हापूरचे. पण तेथे त्यांची भेट झाली नाही. झाली ती खूप उशीरा. किर्लोस्करांनी त्यांच्या 'मनोहर' मासिकाचा चित्रपट विशेषांक काढला होता. त्यांचे मुखपृष्ठ फडणीसांनी केले होते. त्याच्या प्रकाशन समारंभासाठी फडणीस किर्लोस्करवाडी येथें गेले असता किर्लोस्करचे चित्रकार श्री ग.ना.जाधव यांच्याशी ओळख झाली. पुढे किर्लोस्कर मासिक पुणे येथे स्थलांतरीत झाले. व जाधवही पुणेकर झाले. तेथे फडणीस व त्यांची मैत्री अतीशय दृढ झाली. त्यांची जलरंगातील अतीशय सुंदर रित्या साकारलेली पोर्ट्रेट्स, व लॅंडस्केप्स पाहून फडणीस मोहीत झाले. एवढी त्यांची त्या माध्यमावर पकड होती. आणि त्यामुळेच त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवून फडणीसांनी ती रसिकांसमोर आणली. पुढे फडणीस -जाधव या कलाकारांनी एकत्र येऊन ' पुणा आर्टीस्ट गिल्ड ही संस्था सुरु केली. त्यामध्ये भैयासाहेब ओंकार, खटावकर, दिवाकर डेंगळे, मुरलीधर नांगरे असे कलाकार सभासद होते. ह्या संस्थेतर्फे अनेक उपक्रम करण्यात आले.
ग.ना.जाधव यांची चित्रे अनेक मानाच्या जागी स्थानापन्न झाली आहेत. विशेष म्हणजे त्याचे ' कल्याणचा खजीना' हे चित्र त्यांनी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भेटीदाखल दिले, ते आजही राष्ट्रपती भवनाच्या संग्रहात आहे. तसेच १९५१ साली दिल्ली येथे 'कृषिप्रधान हिंदुस्थान' हे कृषी प्रदर्शन आयोजीत केले होते. त्यातील महाराष्ट्राच्या दालनात जाधवांच्या चित्रांचे खास प्रदर्शन ठेवण्यात आले होते. प्रदर्शन पहायला आलेल्या पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी या मराठमोळ्या चित्रकाराच्या कलाकृतींचे अवलोकन करून त्यांचे खूप कौतुक केले. पंडीत नेहरू, इंदीरा गांधी व लहान वयातील राजीव गांधी या तीन पिढ्या दर्शवणारे जाधवांचे चित्र पाहून पंडीतजी खुष झाले व त्या चित्रावर त्यांनी स्वाक्षरी करून ते जाधवांना दिले. आणि जाधवांनी देखील स्वतः केलेले पंडीत नेहरू व इंदिराजींचे केलेले मूळ चित्र त्याना भेट म्हणून दिले. जेव्हां केंद्र सरकारकडून लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्यावर खास टपाल तिकीट काढण्यात आले, त्यासाठी त्यांचे छायाचित्र वापरण्याचे ठरले होते. पण किर्लोस्करांच्या खास आग्रहावरून सदर तिकीट डिझाईन ग.ना.जाधव यांच्याकडून करून घेण्यात आले व तेच भारत सरकारने छापले. यापेक्षा आणखी कोणता मोठा गौरव असेल!
स्केचिंग करणे हा जाधवांच्या रियाझचा एक भाग होता. त्यासोबतच निरीक्षण शक्तीही त्यांची अफाट होती. हे स्केचिंग ते रेल्वे प्रवासी, नदीवरील यात्रेकरू, रस्त्यावरील भिकारी, अशा सर्वांचे करीत असत. प्रवासात असतानाही त्यांचे स्केचिंग चालूच असे. एवढेच नव्हे, तर लग्न समारंभ, गाण्याच्या मैफिली, सणासुदीच्या प्रसंगात ते प्रत्यक्ष त्या क्षणाची चित्रे भराभर रेखाटत. त्यांच्या खिशात नेहमी स्केचबुक व पेन्सील ही चित्रकाराची आयुधे असायची. त्यामुळे कळत न कळत त्यांच्याकडून स्केचिंग घडतच असे. ते एक प्रकारचे त्यांचे व्यसनच होते म्हणाना. आणि त्यामुळे त्यांची रेषा ही नेहमी प्रभावी, ओघवती आणि लयबद्ध अशी होती. आणि या सफाईदार ठळक रेषेमुळे त्यांची बोधचित्रे समर्पक आणि गुणवत्ता दर्शक अशी होत. त्यांच्यातील विनम्रता, संयम हा त्यांच्या चित्रातून सतत आविष्कृत होत असे. आणि जोडीला त्यांची विलोभनीय अशा रंगांची उधळण. त्यामुळे त्यांची चित्रे ही मराठी माणसाच्या मनामनात रुजली.
अश्या या मितभाषी, हरहुन्नरी, सिद्धहस्त, दिग्गज अश्या कलाकाराने महाराष्ट्रातील अनेक मासिकांची मुखपृष्ठे, कथा कवितांची बोधचित्रे, विलोभनीय निसर्गचित्रे, व्यक्तीचे अंतरंग उलगडून दाखवणारी आणि त्यांचे स्वभाव वैशीष्ट्य दाखवणारी व्यक्तिचित्रणे सजवून अखेर ५ जानेवारी २००४ रोजी तृप्त मनाने या जगाचा निरोप घेतला. अश्या या चित्रमहर्षी ग.ना.जाधव यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन नेहरू कलादालनाच्या प्रमुख श्रीमती नीना रेगे यांनी त्यांच्या 'इंडियन मास्टर्स पेंटर्स' या उपक्रमाअंतर्गत २०१५ साली त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ भरवले होते. त्यांच्या या सिंहावलोकनी प्रदर्शनात त्यांच्या चाहत्यांना, कला रसिकांना, कला विद्यार्थ्यांना एक पर्वणीच मिळाली होती. त्यांचे रंगलेपन, कुंचल्यावरील हुकूमत आणि रेषेवरील पकड तसेच निरनिराळे केलेले प्रयोग याची पुरेपूर जाणीव करून देणारी व निरनिराळ्या प्रयोगातून साध्य केलेली व निरीक्षणातून साधलेले बारकावे दर्शवणारी चित्रे याचे पुरेपूर प्रत्यन्तर देत होती. मी जेव्हां सर ज.जी.उपयोजीत कला महाविद्यालयासाठी कला दालन करून त्यामध्ये सकारात्मक काम करणाऱ्या चित्रकारांची चित्रे संग्रहासाठी जमवली त्यासाठी आमचे मित्र व थोर भारतीय चित्रकार श्री सुहास बहुळकर यांनी ग.ना.जाधव यांचे स्त्री मासिकाच्या मुखपृष्ठासाठी केलेले पंडीत नेहरू व इंदिराजी यांचे एकत्र असलेले मूळ चित्र आमच्या संग्रहासाठी मिळवून दिले. आजही रसिकांना ते तेथे पहायला मिळेल.
अश्या या भारतीय चित्रकलेच्या परंपरेतील शिलेदाराला मानाचा मुजरा!
-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
( लेखन संदर्भ: डॅा. नयना कासखेडीकर, श्री. प्रदीप गुजर )






Comments
Post a Comment