रेषेने संवाद साधणारा चित्रकार: बाळ ठाकूर




माझ्या शालेय जीवनापासून अनेक पुस्तके, मासिके, दिवाळी अंक माझ्या पहाण्यात आली. त्यातील कथांना असलेली विवीध चित्रकारांची चित्रे पहाण्यात अली. त्यांचा वेगवेगळ्या शैली मी ओळखू लागलो. त्यामध्ये बरेचसे पारंपारीक रूढीनुसार चित्रे काढणारे होते.तसेच कांही विशेष लक्षात रहाणारे, आधुनिकतेने काम करणारे होते. काळाच्या पुढे जाऊन त्यांची कामे आविष्कृत होत असत. त्यापैकी कांही म्हणजे चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगांवकर, द. ग. गोडसे, स्वतःच्या कथांना चित्रे काढणारे व्यंकटेश माडगूळकर शिवाय ग.ना.जाधव, शि.द.फडणीस असे कांही कलावंत. त्यातही आपल्या रेषेने कथाचित्रांना प्रभावीत करणारे एक नांव होते, ते म्हणजे बाळ ठाकूर. आपल्या जोरकस व प्रवाही अश्या रेषेने कथा विषयाचे आकलन करून देणारे एका बोधचित्रकार.

 


भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण समस्त जाहीरात व साहीत्य क्षेत्रात ते बाळ ठाकूर या नावानेच परीचीत आहेत. ठाकूर यांचा जन्म २४ एप्रील १९३० साली कोकणातील लांजा जिल्ह्यातील भांबेड या गांवी झाला. त्यावेळी शाळेत जाताना आतासारखी वह्या पेनची सोय नव्हती. असे ती लाकडी चौकटीतील दगडी पाटी. खाली पडली की तिचे फुटून तुकडे होत असत. मग त्यातील मोठा तुकडा दप्तरात घालून शाळेत जायचे व त्याच तुकड्यावर निरनिराळे चेहरे काढायचे. कागदाची तर तेव्हां ओळखच नसे. आणि या छंदातूनच चित्रकलेची आवड वाढीला लागत गेली. कधीतरी कोल्हापूरला गेल्यावर तेथील शिवाजी पुतळ्याजवळील डॉ.काटे यांच्या दवाखान्यात लावलेली निसर्ग दृश्ये पहाण्यात येत असत.ती पहाताना चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. शालेय शिक्षण आटोपल्यावर मनात विचार होता तो पुढे चित्रकलाच शिकायची. सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेचे शिक्षण वगैरे मिळते याचीही त्यांना फारशी कल्पना नव्हती. पुढे चौकशी करून फॉर्म मागवला व तो आल्यावर भरून पाठवला. तोही त्याकाळातील कमर्शियल आर्ट विभागात. तेथे प्रवेश मिळाला आणि बाळ ठाकुरांची स्वारी कोल्हापूर मार्गे रेल्वेने मुंबईला प्रस्थान करती झाली. त्याकाळात रेल्वेचा प्रवासही आतासारखा सुसह्य नव्हता. कोल्हापूरला मुंबईचे दोन डबे असायचे. मिरजेला ते हुबळी अथवा बंगळूर येथून पुण्यासाठी जाणाऱ्या गाडीला पाठी हे डबे जोडत. व ही गाडी पुण्यापर्यंत जात असे. कारण बंगळूर पुणे हा रेलमार्ग मीटर गेजचा होता. त्यामुळे गाड्याही लहान असत. पुढे मुंबईच्या ब्रॉड गेजच्या प्रशस्त गाडीत बसून मुंबईचा प्रवास होत असे. अश्या प्रकारे एका गृहस्थांच्या सोबतीने बाळ ठाकूर मुंबईत आले ते फणसवाडीतील त्यांचे एक घरगुती स्नेही वा.रा.ढवळे यांच्याकडे. प्रकाशनातील ढवळे हे एक मोठे नांव! तेथेच नियतीने बाळ ठाकूर व प्रकाशन यांची एक स्नेहगाठ बांधली. आणि तो काळही होता दर्जेदार मराठी मासिकांचा, पुस्तकांचा आणि तश्याच दर्जेदार लेखक आणि चित्रकारांचा.

 

 


ढवळे यांचा व ठाकूर यांच्या काकांचा राजापूरपासूनचा जुना परीचय होता. शिवाय बाळ यांचे वडीलही मुंबईला आल्यावर तेथेच उतरत असत. त्यामुळे बॅग घेऊन बाळ ठाकूर देखील तेथेच आले. आणि बाळ ठाकूर यांचा जे.जे.स्कुल ऑफ आर्टचा नवीन प्रवास सुरु झाला. जे.जे.मध्ये शिकत असतांना बाळ ठाकूर हे चित्रकार द.ग.गोडसे यांच्या चित्र शैलीमुळे खूप प्रभावित झाले होते. मुंबईत आल्यावर ठाकूर यांनी जे.जे.च्या अभ्यासासोबतच मासीकं पुस्तकांची कामं घेणं, प्रकाशकांना भेटणं हे प्रकारे सुरूच ठेवले होते. 'साहीत्य' या मुंबई मराठी साहीत्य संघाचे नियतकालिक निघत असे. त्यातील चित्रे द.ग.गोडसे यांनी काढली होती. त्यांच्यासारखी चित्रे आपल्याला काढता यावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्यासारखी रेषा आपल्या हातातून उमटावी अशी धारणेने बाळ ठाकूर यांची तपश्चर्या सुरु होती. तसेच जे.जे. उपयोजीत कला विभागात त्यावेळी त्यांना मधुकर जोमराज नावाचे प्राध्यापक शिकवायला होते. त्यांचं ड्रॉईंग खूप चांगलं होतं. वेगवेगळ्या शैलीत ते चित्रे काढीत असत. विशेष म्हणजे ब्रशच्या साहाय्याने ते रेषा काढीत त्याचे आकर्षण बाळ ठाकूरांना होते. आणि बाळ ठाकुरांची रेषाही त्याच मागोव्याने पुढे जावू लागली. ठाकूरांनी रेषेचा रियाझ चालूच ठेवला. वर्तमान पत्रावर त्यानी रेषांनी सराव सुरू केला. आणि ठाकूर यांनी आपल्या रेषेवर प्रभुत्व मिळवले. प्रवाही आणि भावस्पर्शी. रंग रेषेवर त्यानी आपलं ठसा उमटवला.    

 


१९४८ साली बाळ ठाकूर यांनी जे.जे. स्कुल ऑफ ॲप्लाईड आर्ट मधून पदवीका घेतली. सुरुवातीला त्यांनी जे. वॅाल्टर थॉम्प्सन, 'ऐय्यर्स' अश्या जाहीरातसंस्थांमधून इलस्ट्रेटर म्हणून काम केले. मात्र पुढे ते ‘उल्का’ या जाहीरात संस्थेत बरेच रमले. ठाकूर यांची विषयाचा आशय जाणून तो आपल्या रेषेतून आविष्कृत करण्याची किमया केवळ अवर्णनीय होती. मग ते जाहिरातीमधील एखाद्या उत्पादनाविषयीचे काम असो किंवा एखाद्या कथा कादंबरीतील लेखकाच्या कल्पना विहारावर असो. त्यांची रेषा तितक्याच प्रभावीपणे कार्यरत होत असते. रेषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांची चित्रे एक उत्तम प्रकारे संवाद साधीत असतात. 'उल्का' या जाहीरात संस्थेत ते काम करत असताना त्यांना अनेक उत्पादनावर काम करावे लागे. त्यावेळी 'उल्का ही जाहीरात संस्था बोधचित्रांना प्राधान्य देत असे. त्यांचे  झोडियॅक,नेरोलॅक पेंट्स, हिज मास्टर्स व्हॉइस, अश्या ग्राहकांच्या जाहीराती बहुदा चित्रांनी सजलेल्या असत. बाळ ठाकुरांची चित्रे मी माझ्या विद्यार्थी दशेतच पहात आलो आहे. आणि ती स्मरणात राहीली ती त्यांच्या वेगळेपणाने. एका विशिष्ट अश्या दर्जाने. नेहमीची पारंपारीक चाकोरी सोडून केल्यामुळे आणि त्यातील त्यांच्या हातातील ती प्रवाही, लयबद्ध रेषा. एखादा अवखळ झरा खळाळत, वळणे, आडवळणे घेत घेत वहात जातो त्याप्रमाणे त्यांची रेषा कागदावरून धांवत असते. आणि कोठेही न थांबता तुमची नजर संपूर्ण चित्रावरून फिरवते. त्यातून व्यक्तीचे भावदर्शन होते. विषयाचे आकलन होते. मग त्या त्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखा असोत, वा मासीके, पुस्तकांसाठी काढलेली कथा चित्रे. तीही आवश्यक तेवढ्या रेषांतून व्यक्त झालेली. आणि ही रेषाही ब्रशची आहे. गरजेनुसार तिला बारीक अथवा जाड करता येणारीआणि उठावदार होणारी.  आणि यासाठी ठाकुरांनी अभ्यास करून ब्रशवर हुकूमत मिळवली. त्यांनी टाकाने अथवा क्रोकविलने देखील कामे केली आहेत. पण त्यात त्यांना ब्रशचा आनंद मिळत नसे.

 


उल्का मधे असताना ठाकूरांना हिज मास्टर्स व्हॉईस या कंपनीची एक जाहीरात मोहीम करण्याचे काम हाती आले. अर्ध्या पानभराची एकेक असे ती पाच जाहिरातीची मोहीम होती. त्यामध्ये सुप्रसीध्द सतार वादक पंडीत रवी शंकर, सनईवादक उस्ताद बिस्मिल्लाखान, तबला वादक उस्ताद अल्लारखान असे म्युझीक मास्टेरो यांचा वापर करण्यात आला होता. बाळ ठाकूर यांनी आपल्या अद्भुत चित्ररेषेने त्या जाहीरात मोहीमेचा सुवर्णमध्य साधला होता. वादकांच्या हातांचा वापर करून ते एकमेकांवर वापरून त्यांच्या हालचालींमधून पं. रवीशंकर यांच्या सतारीचे झंकार ऐकू येत, उस्ताद बिस्मिल्लाखान यांच्या सनईचे मंजुळ सूर ऐकू येत व उस्ताद अल्लारखां यांच्या तबल्याचे बोल ऐकू येत. आणि या जाहीरात मोहीमेचा बराच बोलबाला झाला.

 


जाहिरातीची त्यांची कामे सुरूच होती, याच्या जोडीला त्यांची प्रकाशन क्षेत्रातील कामेही सुरूच असत. किंबहुना तेच त्यांचे प्रिय असे आवडते क्षेत्र होते. पण पुढे जाहीरात क्षेत्रात ते फारसे रमलं नाहीत. त्यांच्या मते कथा कादंबऱ्यांची चित्रे काढतांना तो आपला विषय असतो. तिथे कोणी हुकूमत करत नाही. आपण आपल्या सवडीनुसार आपल्याला भावतं ते व्यक्तिमत्व घेतो, आणि ते व्यक्त होतांना मनात अनेक गोष्टी घडत असतात. एखादी गोष्ट कमी करणं किंवा वाढवणं हे आपल्या हाती असतं. त्यामुळे या क्षेत्रात मनासारखं काम करता येते. प्रकाशकाची दृष्टीही विकसीत झालेली असते. जाहीरात क्षेत्रात तसे नसते. तेथे बऱ्याच गोष्टीवर तुम्ही अवलंबून असता. त्यावेळी केशव भिकाजी ढवळे यांच्याकडे ना.वि.काकतकर होते. त्यांच्यासाठी ठाकुरांनी बरेच काम केले. कांही कारणामुळे तेथून कांही लोक निघाले. त्यात काकतकरही होते. त्यांनी पुढे स्वतःचे प्रकाशन सुरु केले. व 'रहस्य रंजन' चालवायला घेतले होते. त्यामध्ये कांही काळ सदानंद रेगे हे देखील संपादक वर्गामध्ये होते. पण नंतर ते फेलोशीप मिळवून परदेशात गेल्यामुळे अशोक शहाणे हे मुख्य संपादक म्हणून रुजू झाले. त्यावेळी चिं.त्र्यं. खानोलकर, जितेंद्र अभिषेकी असे नामवंत त्यात लिहीत असत. या 'रहस्य रंजन'साठी ठाकुरांनी खूप काम केले. उल्का मधून मधल्या सुटीत ते रहस्य रंजन मध्ये जात. आणि लेख घेऊन येत असत. या रहस्य रंजनने त्यांना बरीच मोकळीक दिली होती. अशोक शहाणे सारखे नवविचाराचे साहित्यीक कवी यांच्या संपादनाखाली बाळ ठाकूर यांनी आपल्या चित्रांना देखील त्याच सर्जनशीलतेने सादर केले. असेच एकदा ते श्री.पु.भागवत यांच्याकडे गेलें असता भागवत म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी काम करणार का? असे विचारणारे पत्रच लिहायला घेतलें होते. आता त्याच्या दोन ओळी लिहून झाल्या होत्या. यावरून बाळ ठाकूरांच्या चित्रांच्या दर्जाची जाणीव होते. श्री.पु. हे साहीत्य आणि प्रकाशन क्षेत्रातील एक अधिकाराचे नांव. माणसाच्या अंगातील गुण हेरून , त्यांच्यातील सर्जनशीलता स्वतः समजून घेणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. पुस्तकाच्या कागदाच्या निवडीपासून, त्याचा टाईप, पृष्ठ रचना, दर्जेदार लेखक, तितकेच दर्जेदार कलाकार अश्या सर्वच बाबतीत त्यांची सौंदर्य दृष्टी दिसून येत असे. आणि त्यांच्याकडून प्रशंसा हा ठाकूरांच्या गुण ग्राहकतेचा एक मोठा सन्मान होता.

 


पुढे बाळ ठाकूर यांनी उल्का सोडली. आणि संपूर्णपणे ते प्रकाशन क्षेत्राशी निगडीत राहीले. रहस्य रंजन, मौज, सत्यकथा, विवेक, सामना अश्या प्रकाशनासाठी त्यांनी अपार काम केले. आजही करताहेत. मात्र त्यांचा एक नियम होता. तो म्हणजे संपूर्ण कथा वाचून, त्यातील लेखकाचा आशय समजून घेऊनच ते आपल्या चित्रांची मांडणी करतात. कोणी एखादा परीच्छेद देऊन करण्यास सांगितले तर त्यांचा नकार असतो. कथेतील कोणता भाग आपल्याला भावेल हे सांगता येत नाही. संपूर्ण लेख अथवा पुस्तक वाचल्यावरच डोक्यात येते हे ते प्रतिपादन करतात. त्यांच्या चित्रांना दाद देणारे लेखक म्हणजे शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर असे. पुर्वी माडगूळकर स्वतःच्या कथांना अथवा कथा संग्रहांना स्वत चित्रे काढीत असत. ते उत्तम चित्रकार होते. जेव्हां 'बनगरवाडी'ची आताची जी आवृत्ती आहे, ती काढतांना व्यंकटेश माडगूळकरांनी नवीन चित्रे काढावीत असा एक विचार होता. पण माडगूळकरांनी सांगीतले की त्यांना आता पूर्वीसारखी चित्रे काढता येतं नाहीत. शिवाय ज्या गावाचे चित्रण केलं तो गावच आता राहीला नाही. ती माणसं, ती मेंढरं कांहीच आता उरलं नाही. त्यानंतर श्री.पु. भागवतांनी हे काम बाळ ठाकूर यांना पूर्ण करण्यास सांगीतले. मग रवी मुकुल यांनी फोटो काढले व बाळ ठाकूर यांनी चित्रे काढली.

 


बाळ ठाकूर यांनी विविध विचारसरणीच्या प्रकाशनासाठी काम केले. मात्र ती करताना त्यांना कोणाचाही तसा त्रास झाला नाही. सर्वांचेच स्वातंत्र्य होते. त्यांच्या दृष्टीने काम करताना कथा समोर असते, लेखक नसतो. त्यामुळे मनासारखं काम करता येतं. ही कामे करताना ठाकुरांनी विविध प्रयोग केले. वेगवेगळ्या शैलीत काम केले. त्यामुळे प्रकाशकही त्यांच्या या वेगळ्या शैलीची वाट पहात असत. पुढे जेव्हां तंत्रज्ञान विकसित झाले, नवीन मशीनरी आली तेव्हां छपाईत जास्त सफाईपणा आला. पूर्वी रंग जमवणे हे प्रिंटरचे काम होते, ते सुलभ झाले. ठाकुरांनी मुखपृष्ठासाठी अनेक चित्रे काढली. कथांसाठीही त्यांनी भरपूर चित्रे काढली. पण त्या दोघांमधला फरक ते समजावून देतात. मुखपृष्ठ हे पोस्टर सारखं असत. अंगुलीनिर्देश करण्यासारखं असत. आणि केवळ त्यातूनच सर्व भाव त्यातून साकारावे लागतात. पण आतील कथा चित्रे अथवा इलस्ट्रेशन ही त्या कथेतील सर्व पात्रांशी, त्यातील प्रसंगाशी निगडीत असतात. लेखकाच्या मनातील व्यक्तिरेखेशी त्या तादात्म्य असाव्या लागतात.

बाळ ठाकूर यांनी आपली अनेक साहीत्य प्रकारातील कथाचित्रे अथवा मुखपृष्ठे भिन्न प्रकृतीच्या लेखकासाठी केली आहेत. 'सत्यकथा' 'ललित' ‘मौज’ अश्या दर्जेदार आणि विशीष्ट वाचक वर्गासाठी असलेल्या नियतकालिकांना त्यांनी कित्येक वर्षे चित्रे काढली आहेत. अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी आपल्या रेषेतून जिवंत अशी साकारली आहेत. ही रेषा कधी बारीक तर हवी तेथे दाब देऊन जाडसर केलेली असते. त्यातून ते आविष्कृत केलेल्या व्यक्तीचे संपूर्ण अंतरंग दाखवीत असतात. विशेषतः पूर्वीच्या काळातील मर्यादीत सुविधा असलेल्या छपाई पद्धतीला त्यांची ही टाकाने अथवा ब्रशच्या रेषेने केलेली चित्रे योग्य न्याय देत असत. अश्या व्यक्तिचित्रणात बालकवी, बा.सि.मर्ढेकर, लक्ष्मीबाई टिळक, अशोक शहाणे अश्या लोकांना त्यांनी साकारले आहेत. महेश एलकुंचवार, ह.मो.मराठे यांच्यासाठी केलेल्या इलस्ट्रेशनमध्ये ठाकुरांनी आपल्या कल्पनांचा मुक्त वापर केला आहे. कधी आशयपूर्ण, कधी प्रतीकात्मक अश्या तऱ्हेने त्यांची कथाचित्रे, मुखपृष्ठे ते साकारीत असत.

 


बाळ ठाकूर यांना थोर चित्रकार श्री रवी परांजपे यांनी त्यांच्या 'कृ. रा. परांजपे गुणीजन पुरस्कार' या ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान  डोंबिवली येथे भरलेल्या अखील भारतीय साहित्य संमेलनामध्ये बाळ ठाकूर यांचा व  श्री जयंत नारळीकर यांचा सत्कार करण्यात आला. एक विज्ञान कथा लेखक व दुसरा त्या कथांवर आपल्या कुंचल्याद्वारे सुवर्णालंकार चढवणारा कलाकार यांना मिळालेला तो एक दुग्ध शर्करायोगच म्हणावा! मध्यन्तरी  आपल्या बहारदार, प्रवाही आणि रसीक वाचकांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या रेषेचा अधिपती चित्रकार बाळ ठाकूर यांचा 'संवाद' या संस्थेतर्फे त्यांच्या ' आप्तवाक्य' या उपक्रमाअंतर्गत मुक्त कथनाचा कार्यक्रम मुंबईच्या पु.ल.देशपान्डे अकादमीत आयोजीत करण्यात आला होता. उत्तम ग्रंथ रचनेत लेखकाचा सिंहाचा वाटा असतो. पण त्याच सोबत त्या ग्रंथाला त्यातील आशयानुसार उचीत रूप देणारे त्याचे मुखपृष्ठ व आतील सजावटही तितकीच महत्वपूर्ण असते. आणि येथे चित्रकार हा महत्वपूर्ण ठरतो. आणि याच विषयावर ठाकूर यांनी आपले अंतरंग उलगडले. आज बाळ ठाकूर यांचे चरित्र म्हणजे एका समृद्ध आणि यशस्वी चित्रकाराची यशोगाथा मानली जावो. ज्याने आपल्या रंग रेषांनी अनेक प्रकाशने, नियतकालिके, कथासंग्रह उजळले. प्रकाशमान केले.

आज चोवीस एप्रिल. बाळ ठाकूर यांचा वाढदिवस. त्यांच्या एका अज्ञात चाहत्याकडून त्या निमीत्ताने त्यांना भरभरून शुभेच्छा!

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष.

( लेखासाठी संदर्भ: प्रा. दीपक घारे यांचा लेख, व श्रीराम खाडीलकर यांनी 'आप्तवाक्य' साठी घेतलेली मुलाखत.
 छायाचित्रे सौजन्य:  कुमार गोखले व रवी मुकुल)




 

Comments

  1. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’