सात्वीक मनाचा सोज्वळ, अध्यात्मिक चित्रकार : जिवाजी भिकाजी दीक्षित.
अगदी प्राथमीक शाळेत असल्यापासूनआमच्या घरी येणाऱ्या त्या काळातील मासीकातील 'प्रसाद' हे सुप्रसीध्द मासीक माझ्या आवडीचे होते. त्याचे संपादक मंडळ होते तेही अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यामध्ये संपादक म्हणून य.गो.जोशी, स.आ.जोगळेकर, सोनोपंत दांडेकर अश्या तीन व्यक्ती होत्या. या मासिकात संत वाङ्मय, ललित लेख, पौराणीक कथा असे बरेच वाचनीय साहीत्य असे. आणि हे सर्व वाचायला उद्युक्त करीत असे ते त्यात असलेल्या कथांची, मुखपृष्ठाची चित्रे. अत्यंत सुंदर रीतीने काढलेली ही बोधचित्रे कथा विषय, त्यातील भाव दर्शन, त्यातील रचनात्मक मांडणी यामुळे मोहीत करीत असत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक आणि सहज सुंदर भाव, ज्यात केवळ असे तो सुशील आणि सोज्वळ पणा. आणि ही चित्रे रेखाटणारे कलावंत होते ते ही सात्विक आणि अध्यात्मिक प्रवृत्तीचे. जिवाजी भिकाजी दीक्षित अथवा जि.भि.दीक्षित. केवळ त्यांच्या चित्रशैली मधूनच परमार्थाची ओळख करून देणारा एक मनस्वी कलावंत!
या प्रसाद मासिकात त्याकाळी अनेक नामवंतांच्या कथा असत. शिवाय त्यांनीच त्याकाळात महाराष्ट्राला 'वेताळ पंचविशी' 'सिंहासन बत्तीशी' या कथांची ओळख करून दिली. आणि या सर्व कथांना आपल्या कुंचल्याने नटवीत असत ते जेष्ठ चित्रकार दीक्षित. त्याकाळात प्रसाद मासिक व जि.भि.दीक्षित हे एक समीकरणच ठरले होते. मग ती चित्रे सामाजीक विषयावरील असोत, पौराणिक असोत वा ऐतिहासीक. विषयानुरूप त्यातील मांडणी व आशय असायचा. शिवाय दिवाळी अंकात एखादे रंगीत देव देवतांचे चित्र हे वाचकांना खास भेट म्हणून देण्यात येत असे. त्यात अनेक सत्पुरुषांची वर्णी लागत असे. कित्येक लोक ही रंगीत चित्रे फ्रेम करून त्यांना आपल्या देव्हाऱ्यात स्थान देत असत. त्यांच्या या बोधचित्रांमधून अथवा त्यांनी त्यांनी आविष्कृत केलेली तैलरंगातील पेंटींग्स असोत, त्याच्यात जाणवे ते आध्यात्मिक सात्विक असे मंगलमय वातावरण. आणि त्याचप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्वही तसेच होते. सात्विक आणि प्रेमळ. अध्यात्मिक आणि भजन कीर्तनात रंगणारे असे.
जिवाजी भिकाजी दीक्षित यांचा जन्म ११ मे १९०७ साली सांगली येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण देखील सांगलीतच झाले. त्यांचे वडील पेशाने वकील होते. व आपल्या मुलानेही वकीली करावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु जिवाजीला ओढ होती ती चित्रकलेची. त्यामुळे माध्यमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी १९२८ साली थेट मुंबईला येऊन सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या सोबत वर्गात ज.द.गोंधळेकर, गोपाळ देऊसकर असे पुढे नावाजलेले चित्रकार होते. या जे.जे.मधील कला प्रवासात दीक्षितांनी व्यक्तिचित्रण व निसर्ग चित्रण यात विशेष प्राविण्य मिळवले. व १९३२ साली तेथील अभ्यासक्रम उत्तम रित्या पूर्ण करून त्यांनी पदविका मिळवली. आणि त्यानंतर दीक्षितांची व्यावसायीक वाटचाल सुरु झाली. पण आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, त्यात प्रापंचीक अडचणी. त्यामुळे केवळ चित्रे काढून उदारनिर्वाह करणे अशक्य होते. त्यावेळी पुण्यातील 'प्रभात फिल्म कंपनी' जोरात होती. तेथील कला दिग्दर्शक एस. फतेलाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास त्यांनी आरंभ केला. तेथे पाच एक वर्षे नोकरी करून त्या अनुभवावरून पुढे दीक्षितांनी 'सरस्वती सिनेटोन' व त्यांनतर ' नवयुग फिल्म कंपनी'त काम केले. या फिल्मी जगतातील त्यांच्या कला कारकिर्दीत दीक्षितांनी चित्रपटाचे सेट लावण्याच्या कामासोबतच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी आवश्यक असलेल्या जाहीराती, पोस्टर्स, मोठ्या आकारातील बॅनर्स त्यांच्या नेतृत्वाखाली तयार होत. 'प्रभात'च्या 'कुंकू' 'माणूस' 'गोपाळ कृष्ण' 'अमर ज्योती' या चित्रपटांसाठी त्यांनी केलेली पोस्टर्स केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात गाजली. १९३८ साली प्रभात च्या 'माझा मुलगा' या चित्रपटासाठी त्यानी कॅनव्हासवर ऑइल पेंटींग मध्ये केलेले व पुढे पुनर्मुद्रीत झालेले पोस्टर खूपच लोकप्रिय झाले होते. सदर पोस्टरची प्रत देखील संग्राहकांनी ५०,००० रुपयांना विकत घेतल्याचे ऐकीवात आहे.
चित्रपट सृष्टीत सुमारे पंधरा वर्षे काम केल्यावर त्यांना आपले क्षेत्र बदलण्याची इच्छा झाली. व त्यांनी त्यांच्यातील विचार प्रसारण कलेला प्राधान्य मिळेल अश्या प्रकाशन संस्थेशी संबंध जोडले. प्रकाशन व्यवसायात त्याकाळात अनेक पुस्तके छापली जात असत. त्यामध्ये धार्मिक पुस्तके व पोथ्या, नियतकालिके, मासिके शिवाय शालेय विद्यार्थ्यांची क्रमीक पुस्तके यासाठी बरीच इलस्ट्रेशन लागत. ती सर्व कामे दीक्षित करू लागले. त्यांच्याकडे धार्मिक पुस्तकांची कामे मोठ्या प्रमाणावर येत असत. ही कामे करतांना त्यातील प्रमाणबद्धता, रचना, त्यातील पवित्र असे मांगल्य, प्रसंगानुसार केलेले मोहक चित्रण, देवदेवता यांचे प्रसन्न रूप या गोष्टी प्रकर्षाने जाणवीत असत. देवांची वस्त्र प्रावरणे, त्यांचे अलंकार, आजूबाजूचे स्वर्गीय वातावरण हे दीक्षितांच्या चित्रांतून सहजगत्या जाणवत असे. इतके त्यांनी आपल्या रेषेवर त्यांच्या कारागिरीवर, कौश्यल्यावर प्रभुत्व मिळवले होते. आणि या सर्वामुळे त्यांचे स्वतःचे व्यक्तित्व देखील त्याचप्रमाणे अध्यात्माच्या वाढीला लागले. त्यांची धार्मिक प्रवृत्ती अधिकाधिक जोपासू लागली. कदाचित त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच त्यांच्यातील चित्रकार जास्तीतजास्त प्रभावी होऊ लागला. आणि त्यांच्याकडे त्याच प्रकारची कामे येऊ लागली. कित्येकदा त्यांना जाणवत असे, अभिजात कलावंत म्हणून हे योग्य नाही, तरीही आयुष्यभर त्यांनी हे व्रत अंगीकारले.
१९४९ साली जि.भि. दीक्षितांचा त्याकाळातील थोर व अध्यात्मिक प्रवृत्तीचे साहीत्यिक य.गो.जोशी यांच्याशी संबंध आले. निर्मळ मनाचे व अध्यात्मावर दृढ श्रद्धा असलेले य.गो.जोशी हे त्यांच्या 'प्रसाद' मासिकाचे संपादक होते. आणि येथेच दीक्षित यांचा 'प्रसाद'शी संबंध आला. त्यानंतर 'प्रसाद' हे मासिक अथ पासून इती पर्यंत केवळ दीक्षितमय होते. 'प्रसाद' ने दीक्षितांना व दीक्षितांनी प्रसादला ओळख दिली म्हणायला हरकत नाही. त्यातील 'सिंहासन बत्तीशी' मधील विक्रमादित्याच्या सिंहासनावर जेव्हां भोज राजा बसायला जातो, त्यावेळी त्या सिंहासनावरील बत्तीस पुतळ्यापैकी एकेक पुतळी पुढे येऊन विक्रमादित्याच्या महानतेची कथा भोज राजाला सांगून विचारते की, राजा तुझ्या अंगात जर असे गुण असतील तरच तुला या सिंहासनावर बसायचा हक्क आहे. यावरील प्रसंगाची दीक्षितांची चित्रे तर ते सर्व प्रसंगच डोळ्यासमोर उभे करीत असत. एकदा 'प्रसाद'ने एक खास असा लघुकथा स्पर्धा विशेषांक प्रसीद्ध केला होता. त्यातील कथांची बक्षिसपात्र कथा निवडण्याचे काम कोणा तज्ज्ञांकडे न देता, ते त्यांनी प्रसाद मासिकाच्या वाचकांवर सोपवले. कारण त्याच्या मते वाचक हेच खरे चोखंदळ परीक्षक असतात. त्यासाठी त्यांनी वाचकांकडूनच त्याविषयी मते मागविली. आणि कोणी आपल्या आवडत्या लेखकाला त्याच्या नांवावरून मत देऊ नये, यासाठी त्या खास अंकात कथेसोबत लेखकांची नावेच छापली नव्हती. आणि वाचकांनी भरभरून मते देऊन आपापल्या आवडीच्या कथा निवडल्या. दुसऱ्या महिन्यांतील अंकात बक्षिसपात्र लेखकांच्या नांवासोबतच त्यांनी सर्व कथा लेखकांची नांवे देऊन त्या काळात संपादक मंडळाने एक आगळा वेगळा प्रयोग केला होता. आणि या खास अंकाची सजावटही जि.भि. दीक्षितांनी तितकीच खास अशी केली होती. मुखपृष्ठावर डोक्यावर सुवर्ण मुकुट घातलेली, मुक्त केशात असलेली, एका हातात पेटती मशाल घेऊन उभी असलेली भारतमाता दाखवली होती. तिच्या पाठी एका दीपमाळेवर असंख्य दिवे लुकलुकत असताना दाखवले होते. हे मुखपृष्ठ त्याकाळात खूपच गाजले होते. अजूनही माझ्या डोळ्यासमोर तो प्रसादचा खास अंक येतो. माझ्या वडील बंधूनी आपल्या हस्ताक्षरात प्रत्येक कथेवर लेखकाचे नांव लिहीले होते. मी मुंबईला येईपर्यंत तो प्रसादचा अंक आमच्या संग्रही होता. ज्या दिवशी य.गो.जोशी गेले, तेव्हां ते खूपच हताश झाले होते. आपली चित्रकलेची पिशवी खुंटाळ्याला लावून स्तब्ध बसले होते.
प्रसाद मधील कामासोबतच दीक्षितांनी अनेक व्यावसायिक व्यक्तिचित्रणाची कामे केली. त्यात अपारदर्शक जलरंगातील, तसेच कॅनव्हासवरील पूर्णाकृतींचा समावेश आहे. विद्यार्थी दशेपासून ते पुढें व्यावसायीक चित्रकार झाल्यानंतरही दिक्षीतांनी आपली रेखाटने व निसर्गचित्रे रंगविण्याचा सराव सतत ठेवला होता. त्याकाळात फोटोवर ऑउटलाईन घेऊन त्यावर ऑइल पेंटने काम करण्याचा प्रघात होता. तीही त्यांनी आत्मसात करून कलात्मक पद्धतीने आविष्कृत केली. त्यांची कॅनव्हासवरील लाईफ पेंटिंग पुण्यातील अनेक संस्था, शिक्षण संस्था, संशोधन संस्था यांच्या संग्रहात आहेत. यात खास करून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री गुरुदेव दत्त, साहीत्य सम्राट न.चिं . केळकर, ह. भ.प. सोनोपंत दांडेकर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, गजानन महाराज, स्वामी विवेकानंद अश्या थोर संत विभूतींचा समावेश आहे. भारत सरकारने १९८८ साली स्वामी समर्थ रामदास यांचे जे टपाल तिकीट वितरण केले होते त्याची निर्मिती करण्याचा मान जि.भि,दीक्षितांना मिळाला होता.
चित्रकार जि.भि.दीक्षितांचे व्यक्तिमत्व हे अतिशय सात्विक असे होते. सहा फुटापेक्षा जास्त उंची लाभलेले दीक्षित नेहमी सदरा व स्वच्छ असे पांढरे धोतर नेसत असत. त्यावर त्यांचा काळा कोट असे. डोक्यावर काळी टोपी आणि कपाळाला चंदनाचा गंध अशी त्यांची प्रतिमा त्यांच्याबद्दल आदरयुक्त भाव आपोआप निर्माण करीत असे. त्यांच्यातील ईशवराप्रती असलेली श्रद्धा, त्यानुसार आपली वर्तणूक, बोलणे हे गुण त्यांनी आयुष्यभर जपले. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी 'चित्रमय गुरुचरीत्र' रंगवीले. ते घराघरात पोचले. त्यांचे जिवलग मित्र ज.द.गोंधळेकर यांच्यासारख्या प्रयोगशील व आधुनीक विचारसरणीच्या कलावंताच्या सहवासात राहूनही त्याचा परीणाम दीक्षितांनी स्वतःच्या कला निर्मितीवर होऊ दिला नाही. मात्र ती आधुनीक कला निर्मिती ते आवर्जून अभ्यासत. त्यावर चर्चाही करीत. त्याच्यातील आध्यात्मिक वृत्तीमुळे त्यांचा या विषयावर खूप अभ्यास झाला होता. संत परंपरा हे त्यांचे मानसीक बळ होते. ते ज्ञानेश्वरीवर प्रवचने करीत असत. संत तुकाराम यांचे साधेभोळे व निर्व्याज्य व्यक्तिमत्व साकारताना त्यांनी तुकारामांच्या अंगाखांद्यावर खेळणारे, बागडणारे पक्षी तसेच आजूबाजूला वावरणारे खार-हरीण यांचे भयरहित वास्तव्य दाखवून त्यातून भाव प्रदर्शन प्रभावी पणे केले आहे. तसेच पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाच्या संग्रहात असलेल्या चित्रात त्यांनी महात्मा फ़ुले मंडईतील पक्षी विक्रेता दाखवला आहे, त्याच्या पिंजऱ्यातील बागडणारे पक्षी सुंदर आहेत, पण ते करुण वाटतात. हें त्यांनी अत्यन्त भावपूर्ण पद्धतीने रंगवीले आहे.
कला आविष्कृत करताना दीक्षितांनी कधीच आपपर भाव केला नाही. अगदी छोटासा मोनोग्राम ते कथांची इलस्ट्रेशन, मुखपृष्ठे, पोस्टर्स, व्यक्तीचित्रणे, मोठ्या आकारातील बॅनर्स अशी सर्वच कामे ते सहजगत्या करीत असत. आणि हे सर्व करीत असताना त्यांच्यातील सर्जनशील कलाकार नेहमीच शांत आणि संयमी असे. त्यामुळे त्यांच्या चित्रातील वेश्याही उच्शृंखल वाटत नसे. यावर गोंधळेकरांसारखे त्यांचे मित्र त्यांना डिवचतही असत. चित्राच्या लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत काम कसे करावे याचे ते उत्तम विवेचन करीत. 'छोटे चित्र काढताना बोटांची, त्यापेक्षा मोठे चित्र काढताना मनगटाची हालचाल करायची. फार मोठे असेल तर खांद्याची. म्हणूनच लहान चित्रातील ठिपका मोठ्या चित्रात भोपळ्याएवढा मोठा होतो. फक्त त्याची शरीराला अन मनाला सवय लावावी लागते. मग ते जमते. 'पिंडी ते ब्रह्मांडी.'
पुढे १९७३ नंतर जि.भि.दीक्षित अनेक वर्षे वाई येथील विश्वकोशाच्या कार्यालयात अभ्यागत चित्रकार म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत तेथे काम करणाऱ्या अनेक तरुण चित्रकारावर त्यांनी आपल्या सात्विक व संयमी चित्रशैलीचे संस्कार केले. अनेकजण त्यांचे शिष्य बनले. त्यांच्या 'चित्रमय गुरुचरीत्र' 'सुबोध ज्ञानेश्वरी' तसेच य.गो.जोशींच्या 'प्रसाद' मासिकाच्या माध्यमातून जि.भि.दीक्षितांनी सर्व सामान्यांच्या मनावर संस्कार केले. त्यांच्यात सदाचरण, सुबुद्धी व जीवनातील धार्मिक मूल्ये याबद्दल श्रद्धा वृद्धिंगत केली. जिवाजी भिमाजी दीक्षित सर्वार्थाने एक संपन्न जीवन जगले. अध्यात्मावर नितांत श्रद्धा ठेवून त्याचे आचरण त्यांनी केले. आपल्या चित्राविष्कारातून त्यांनी कधीही सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रकार केला नाही. आपल्या तत्वांशी, प्रामाणीक पणाशी अथवा आपल्या पारमार्थीक स्वभावाशी कसलीही तडजोड केली नाही. आणि
८ मे १९९५ साली वयाच्या ८८ व्या वर्षी आपल्या नश्वर देहाचा त्यांनी त्याग केला. एक शुचीर्भूत आणि मंगल अश्या जीवनाची इतीश्री झाली. मी ज्यावेळी जे.जे.उपयोजीत कला संस्थेमध्ये कला दालन केलें तेंव्हा मला दीक्षितांची चित्रें हवी होती. अश्या चित्रकारांचा मागोवा ठेवणारे कलाकार म्हणजे आमचे सुहास बहुळकर. त्यांनी मला दीक्षितांची कांही चित्रे मिळवून दिली, ती मी त्या कला दालनात ठेवली आहेत. पुढे मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट आर्ट गॅलरीच्या क्युरेटर श्रीमती नीना रेगे यांनी त्यांच्या कला कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी 'इंडियन मास्टर्स पेंटर्स' या नेहरू सेंटरच्या उपक्रमाअंतर्गत १२ डिसेंबर २०१४ ते ४ जानेवारी २०१५ या दरम्यान त्यांच्या पेंटिंग्सचे, इलस्ट्रेशनचे व निसर्गचित्रांचे सिंहावलोकनी प्रदर्शन भरवून या थोर चित्रकाराला आदरांजली वाहीली.
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष.
( या लेखासाठी आधार : सुहास बहुळकर , प्रभाकर दिवाकर यांचा लेख.
जि.भि.दीक्षितांचे छायाचित्र: सौजन्य - सुहास बहुळकर.)
प्रभात फील्म कंपनीच्या ‘माझा मुलगा’ चित्रपटाचे पोस्टर. सौजन्य : बॅालीवूड मूव्ही पोस्टर्स.कॅाम )
————————————————————————————————————
लेखमालेचा निरोप.
आज फेसबुकवरील ही माझी शेवटची पोस्ट. शेवटचे लिखाण. शेवटचा व्यक्ती परिचय! गेली दहा वर्षे सतत मी काहींना काही लिहीत राहीलो. केवळ कलाविषयक लिखाण करत राहीलो. त्यात कांही व्यक्ती होत्या, कांही संस्था होत्या. कांही अवांतर लेखन होते. पण जे कांहा लिहीले ते सकारात्मक लिहीले. कलाकारांचे केवळ सद्गुण दाखवले. ते बरे होते, वाईट होते मला माहीत नाही. जे लिहीत होतो ते माझ्यासाठी व माझ्या काही वाचक मित्रासाठी. जे मनापासून माझ्या लिखाणाला दाद देतात. काही चुका सुधारतात. त्यांच्यापासून शिकता येते. अर्थात शिक्षण हे अखेरपर्यंत चालूच असते. काही जण मात्र कधीच प्रतिक्रिया देत नसत. उलट त्यांच्या मनाला न पटणाऱ्या एखाद्या शब्दाबद्दल, त्यातील एखाद्या त्यांना न पटणाऱ्या एखाद्या संदर्भाबद्दल हल्ला मात्र चढवत होते. आणि आतापर्यंत मी बऱ्याच व्यक्तिंवर लिहीले. मी कोणी लेखक नाही, इतिहासकार तर अजीबात नाही. लेखनाचे संकेत मला कधी कळत नाहीत. मझ्या भाषेत, माझ्या बोलीत मी बोलतो तेच मी शब्दातून व्यक्त करत आलो आहे. पण जरी आठवणीतून लिहीले असले, तरी त्यासाठी कांही नोंदी आवश्यक असतात. त्या मिळवण्यासाठी, काही संदर्भ मिळवण्यासाठी, कांही दुर्मिळ छायाचित्रे जमवण्यासाठी मला कांही मित्रांची सतत मदत मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने होते ते सुहास बहुळकर, विनय नेवाळकर, नरेंद्र विचारे हे माझे मित्र. त्यांच्या सहकार्यामुळे माझें हे लेख झाले.
आता वाटते याचा काय उपयोग? एवढे लिहून किती जणांना याचा उपयोग होतो माहीत नाही. आणि आता एवढे मराठी टाईप करणेही कठीण जाते. आणि सध्यातर या वयात कोणताही वाद होवून डोक्याला ताप देण्यापेक्षा ते शांत ठेवणे आवश्यक आहे. 'कधीतरी, कोठेतरी,कुणीतरी थांबायला पाहीजे' असे एकदा संगीतकार श्रीकांतजी ठाकरे म्हणाले होते. आणि तेच सत्य आहे. खरंच थांबायला हवं ! यापुढील माझ्या काही पोस्ट असल्यास त्या केवळ माझ्या कौटुंबीक असतील.
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष





Comments
Post a Comment