एनसायक्लोपीडिया: व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्.
भारतीय चित्रकार-शिल्पकार यांची जगाला ओळख करून देणारा चित्रकोश
आज पाश्च्यात देशांच्या तुलनेने आपल्या भारतीय कलाकारांची-कला संस्थांची माहीती आपल्या देशात फारच थोडी उपलब्ध आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेक सृजनशील चित्रकार-शिल्पकार काळाच्या उदरात गडप झाले, कित्येकांचे काम नजरेआड झाले, तर कित्येक कलाकार अनामीक राहीले. अश्या कलाकारांना लोकांसमोर आणण्याचे काम हे वास्तवीक शासनाच्या सांस्कृतीक विभागातर्फे व्हावी अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. शिवाय महाराष्ट्र राज्याने स्वत:चे असे कला संचालनालय स्पथापन केले आहे. त्यांच्याकडूनही असा दस्तावेज करणे गरजेचे आहे. पण आजवरचा अनुभव पहाता दृक कलेच्या बाबतीत शासनाची उदासीनता नेहमीच आढळून येते. आणि याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे 'राज्य कला प्रदर्शना'चे सोहळे. राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये चित्रकार- शिल्पकार यांची नांवे चित्रपट, दूरदर्शन अभिनेत्यांच्या तुलनेने अभावानेच असतात. सांस्कृतीक खात्याच्या पुरस्कार सोहळ्याचा दिमाखदारपणा कला संचालनालयाच्या राज्य-पुरस्कार सोहळ्याला कधीच दिसत नाही. आज महाराष्ट्राकडे कलाकृती जतन करण्यासाठी अथवा त्या रसिकांसाठी प्रदर्शीत करण्याची हक्काची जागा वा दालन उपलब्ध नाही. भाग्याची गोष्ट म्हणजे जेष्ठ व श्रेष्ठ चित्रकार श्री सुहास बहुळकर यांनी ललीत कला अकादमीच्या महाराष्ट्र शाखेसाठी दीर्घकाळ पाठपुरावा करून अखेर ती जागा मिळवली. त्यांना ललित कलेचे अध्यक्ष शिल्पकार श्री उत्तम पाचारणे यांची साथ मिळाली. त्यांनीही प्रत्येक स्तरावर मदत केली.
सुहास बहुळकर
सुहास बहुळकर हे सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांना तत्कालीन कला संचालक प्रा.बाबुराव साडवेलकर यांनी आर्ट स्कुल व कला संचालनालयातील कलाकृती सांभाळण्याचे, त्यांचे जतन करायचे काम दिले. त्यावेळी बरेच जुने चित्रकार त्यांच्या नजरेत आले. अनेकांच्या शैल्या त्यांना अभ्यासायला मिळाल्या. आणि येथून त्यांचा जुन्या चित्रकारांच्या नोंदी घेण्याची, त्यांची चित्रे मिळवण्याची, ती जतन करण्याची आवड निर्माण झाली. त्याचे मध्यन्तरी जे.जे.मध्ये प्रदर्शनही भरवण्यात आले. अश्याच काळात त्यांना एकदा विवेक साप्ताहीकाचे संपादक श्री दिलीप करंबेळकर भेटायला आले. 'विवेक' ने तेंव्हा महाराष्ट्र राज्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निरनिराळ्या विषयावर कोश मालीका करण्याचे योजले होते. त्यातील चित्र-शिल्प विभागाचे काम बहुळकर यांनी पहावे अशी त्यांची इच्छा होती. अर्थातच बहुळकर यांच्या आवडीचे हे काम होते. तरीही त्यांनी करंबेळकरांना सांगीतले की, मी हे काम करेन. पण माझ्या कामात कोणाची मध्ये लुडबुड असता कामा नये. हे मान्य असेल तरच मी काम करेन. करंबेळकर व त्यांच्या सोबत आलेल्यानी काही वेळ विचार केला, व त्यांनी सांगीतले, बहुळकर आम्हांला मान्य आहे. कोणीच तुमच्या मध्ये येणार नाही. पण याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील. आणि 'आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण-चित्रकार शिल्पकार चरित्र कोश' याचा श्रीगणेशा घातला गेला. तब्बल साडेसहा वर्षे यावर बहुळकर यांचे काम सुरु होते. बहुळकर यांच्या सोबत संपादक म्हणून श्री दीपक घारे व रंजन जोशी हे होते. विशेषतः उपयोजीत कलेचा भाग हा दीपक घारे व रंजन जोशींनी सांभाळला. जोडीला चित्रकार श्री वासुदेव कामत व श्री सुनील महाडीक यांनीही मदत केली. व्यंगचित्रांची बाजू सांभाळली ख्यातनाम व्यंगचित्रकार श्री शि.द.फडणीस व श्री वसंत सरवटे यांनी. आणि विशेष म्हणजे सुहास बहुळकर यांच्या पत्नी साधना बहुळकर याही चित्रकार तसेच उत्कुष्ट लेखक व कला समीक्षक आहेत. त्यांच्या नावावर कांही पुस्तके देखील असून आताही एक कलाकारावर त्यांचे पुस्तक येणार आहे. त्यांचाही सहभाग या मराठी कोशासाठी संपादक मंडळात समावेश होता. त्यातील बऱ्याच नोंदीवर भाषा संस्करण, लिखाणातील सुसूत्रता, त्यातील नोंदी करणे, संपादन अश्या बऱ्याच आघाडीवर त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र सहा विभागात विभागून तेथून अठराव्या शतकाच्या उत्तरार्धा पासून कलाकार व त्यांच्या कलाकृती यांचा वेध घेण्यात आला. कोणते चित्रकार व त्यांची चित्रे निवडायची यांचे निकष ठरवण्यात आले. यासाठी बहुळकरानी भरपूर प्रवास केला. मुलाखती घेतल्या. काही वेळा सहजगत्या माहीती मिळाली. काहीवेळा अडचणी आल्या. काहींच्या माहीतीत नवीन भर पडली. त्यासाठी लेख लिहून घेतले. विशेष करून ते लेखही चित्रकाराकडूनच लिहीले जावेत याकडे लक्ष देण्यात आले. त्यासाठी घेण्यात आलेल्या नोंदी ह्या तीन प्रकारच्या होत्या. छोट्या, मध्यम, व मोठ्या.
दीपक घारे
या महाकोशाचे मूल्य रुपये ४०००/- आहे. पण प्रकाशनपूर्व मूल्य ठेवलं आहे रुपये २६००/- अधीक घरपोच हवे असल्यास टपाल हंशील म्हणून रु. ३५०/- अधीक आहे. आणि जर का प्रत्यक्ष प्रकाशकाकडुन हवे असल्यास बुकींग केलेल्याना सवलतीच्या किमतीत देण्यात येणार आहे. २ मार्च हा सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टचा संस्थापन दिन. त्यावेळी स्कुल ऑफ आर्ट मधील सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या प्रतिमेला पहीली प्रत अर्पण करून प्रकाशन करण्यात येणार आहे. व त्यानंतर आरक्षित केलेल्या प्रतीचे वितरण करण्यात येईल.
आणि चित्र-शिल्प कोशाने आकार घेतला. आठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून कला-शिल्पाचा वेध आणि बोध घेणारा कोश भरारी घेण्यास अधीर झाला. अनेक नामवंत कलाकार आपली ओळख घेऊन रसिकांपुढे येण्यास सिद्ध झाले. आणि २०१३ साली पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन 'रचना संसद' च्या' सभागृहात मोठ्या थाटामाटाने झाले. त्या समारंभास हजर होते ‘पंडोल आर्ट गॅलरी’चे दादीबा पंडोल व फिरोजा गोदरेज. हा कोश पाहून त्याचे मोल त्या दोघांच्याही ध्यानात आले. व दादीबानी असा कोश केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादीत न रहाता संपूर्ण जगभरात या कलाकारांची माहीती व कीर्ती पोचली पाहीजे अशी धारणा व्यक्त केली. तेवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी सदर ग्रंथ इंग्रजी मध्ये केल्यास त्याचा प्रकाशनाची जबाबदारी स्वतः घेतली. एक मोठे पाऊल त्यांनी टाकले होते. तसेच हा कोश इंग्रजीमध्येही असावा अशी कला रसिकांचीही मागणी होती. आता जबाबदारी होती ती बहुळकरांची. सदर कोश इंग्रजी मध्ये भाषांतरीत करण्याची. २०१३ मध्ये मराठी कोश आल्यानंतर २०१४ मध्ये या इंग्रजी कोशावर काम कारण्यास सुरुवात केली. काम तसे सोपे नव्हते. यासाठी एक समिती नेमण्यात अली. त्यामध्ये दादीबा पंडोल, सुहास बहुळकर, सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे, दीपक घारे असे नामवंत होते. आणि डॉ. सुपर्णा कुलकर्णी यांनी को-ॲार्डीनेटर म्हणून काम पाहीले.इंग्रजी भाषांतरासाठी तज्ञ निवडले गेले. त्यातही मुंबई-पुण्याचे होते. निरनिराळ्या स्तरावर या लेखनाचे स्वरूप तपासण्यात येत होते. त्यातील संहिता, मजकूर, आदी महत्वपूर्ण बाबी तपासण्यास शांता गोखले, दीपक घारे, सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे आदींनी मेहनत घेतली. आणि अंतीम स्वरूप देण्याचे काम होते ते सुहास बहुळकर यांचे!
श्री दादीबा पंडोल
आणि याच सोबत या नवीन कोशासाठी चित्रे जमवणे हे देखील एक महत्वाचे आणि जिकीरीचे काम सुहासकडे होते. तीही कॉपी राईटशिवाय. अनेक शासकीय व खासगी संग्रहालयाकडून ही चित्रे मिळवावी लागत. त्यासाठी शासकीय संग्रहालयाचा दर होता प्रती चित्र रुपये तीन हजार. खासगीचे दर तर पहायलाच नकोत. पण ही सर्व चित्रे त्यांनी मुद्रण करण्यासाठी विनामूल्य मिळवली. आणि हे केवळ घडले ते सुहासच्या शब्दामुळे. त्यासाठी खूप प्रवास करावा लागला. काही अज्ञात चित्रकारांची माहीती मिळाली. काहींच्या चित्रात पुन्हा मौलीक भर पडली, जी पूर्वीच्या मराठी कोशात नव्हती. अंतीम पायरीवर कोश येताच त्यातील शब्द न शब्द बिनचूक असावा याची पहाणी सुहासकडून सुरु झाली. काही शब्दांच्या बाबतीत इंग्रजी शब्द बिनचूक झाला नाही. कारण काही कलाविषयक शब्द हे त्याच क्षेत्रांतील व्यक्तीला समजू शकतात. त्यामुळे एखादी चूक देखील राहून चालत नाही. एखाद्या लेखामध्ये चूक राहीली तर ती क्षम्य असते. कारण त्याचे आयुष्य अल्प असते. पण शब्द अथवा चित्र कोशात अशी चूक अक्षम्य असते. कारण ती माहीतीसाठी आधारभूत असते. आणि तब्बल २०१४ सालापासून तब्बल सहा वर्षांची अथक मेहनत घेऊन सुरु झालेले हे काम अखेर पूर्ण झाले. प्रागैतिहासीक काळापासून ते आधुनीक काळापर्यंतच्या दृक कलेचा वेध घेणारा दृश्य कलेतील हा महाकोश आपल्या प्रकाशनासाठी आता सज्ज झाला आहे. कला रसिकांसाठी ती एक मेजवानी आहे.
या दृश्य कलेच्या या महाकोशामध्ये एकूण ३०७ प्रथितयश अश्या चित्रकारांच्या आणि ४ नामवंत कला संस्थांच्या नोंदी आहेत. मराठीमधील कोशापेक्षा ३७ अधीक नोंदी यात घेण्यात आल्या आहेत. शिवाय त्यातील तपशिलांमध्येही अधीक भर घालण्यात आली आहे. बहुळकरांच्या मते 'आतापर्यंत महाराष्ट्राची दृश्य कलेसंदर्भात प्रागैतिहासीक ते आधुनीक अशा प्रकारे सलग मांडणी कुठेच झालेली नाही. त्यामुळे हा चित्रकोश महत्वाचा आहे. ग्रामीण, आदिवासी, अभिजात अश्या सर्व कलांना हा कोश स्पर्श करतो. यात महाराष्ट्राच्या कलात्मक इतिहासाचे यात महाराष्ट्राच्या कलात्मक इतिहासाचे सूत्ररूपाने प्रत्यंतर येते.' हा कोश कलाकार, कला अभ्यासक, कला विद्यार्थी, परदेशी कलाकार, वाचनालये, अश्या सर्वानाच उपयुक्त ठरणार आहे. या कोशाचे संपादक आहेत सुहास बहुळकर व दीपक घारे. सहसंपादक आहेत सुधीर पटवर्धन व दिलीप रानडे.
आज देशातील दृक कलेच्या या पहिल्याच महाकोशाला भरभरून यश प्राप्त होवो. कला क्षेत्रांत एक मानाचा भरजरी तुरा मिरवणाऱ्या आणि भारतातील कलाकारांची कीर्ती जगभर नेणाऱ्या या दृक कलेच्या कोशाला जगभरातून भरभरून दाद मिळू दे हीच कला क्षेत्रातील सर्वाना सोबत घेऊन इच्छा प्रदर्शीत करतो.
प्रा. मं.गो. राजाध्यक्ष
( हा दृक कला महाकोश कोठे व कसा आरक्षीत करायचा याची माहीती सोबतच्या माहीती पत्रकात देण्यात येणार आली आहे)



Comments
Post a Comment