चित्रकार ते वेषभूषा संकल्पन - एक प्रवास : भानू अथैय्या
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कला इतिहासकार व क्युरेटर जेहरा झुमाभॉय ह्या न्यूयॉर्क मधील एशिया सोसायटी म्युझियमसाठी भारतातील एके काळी गाजलेल्या ‘प्रोग्रेसीव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’च्या प्रदर्शनाची तयारी करीत असता त्याचा मागोवा घेण्यास आरंभ केला. त्यावेळी त्यांना प्रोग्रेसीव्ह ग्रुपच्या मुंबईतील शेवटच्या प्रदर्शनाचा कॅटलॉग मिळाला. तो अभ्यासत असताना त्यांना आढळले की हा ग्रुप केवळ पुरुष कलाकारांशी संबंधीत नव्हता. त्या प्रभावाखाली आधुनीक चित्रकला आविष्कृत करणाऱ्या एका अनोळख्या महिलेचेही नांव त्यामध्ये होते. आणि यावर झुमाभॉय यांनी संशोधन सुरु केले. ते नांव होते, भानुमती राजोपाध्ये. आणि त्या नांवाचा शोध घेत असता त्या थेट पोचल्या त्या भानू अथैय्या या नावापाशी. आणि या भानू अथैय्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून १९८३ मध्ये रिचर्ड ॲटेनबरो यांच्या 'गांधी' या चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर अवार्ड पटकावणाऱ्या भानू अथैय्या ह्याच होत्या. ऑस्कर मिळताच भानू अथैय्या या जगप्रसीध्द झाल्या. कॉश्च्युम डिझाइनर म्हणून त्यांचे नांव सर्वत्र गाजू लागले. तसे ते आधीपासूनच चित्रपट सृष्टीत गाजत होते. पण चित्रकला विषयाशी त्यांचे असलेले नाते मात्र खूपच कमी जाणकारांना होते. तिच्या वस्त्र प्रावरणामध्ये आणि शरीर ठेवणीमध्ये असलेली त्याची पार्श्वभूमी ही सहजी तिच्याकडून घडत असे. आणि हे ज्ञान तिला लाभले होते ते, तिने घेतलेल्या जे. जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या शिक्षणामुळे हे नक्कीच! शिवाय तिचे वडील गणपतराव उर्फ आण्णासाहेब राजोपाध्ये यांनी तिला दिलेला हा समृद्ध वारसा होता.
अण्णासाहेब हे एका धनवान कुटुंबातील स्वयंशिक्षित आणि अष्टपैलू कलाकार होते. आणि काळाच्या कित्येक वर्षे पुढे होते. त्यांना झालेल्या सात कन्यांपैकी भानू हे तिसरे अपत्य. भानूचा जन्म २८ एप्रील १९२९ साली कोल्हापूरात झाला. स्वतःच्या ज्ञान लालसेमुळे अण्णासाहेबांनी आपल्या मुलींना व पत्नीला शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन दिले होते. केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादीत न रहाता त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणाची सर्व दालने उघडून दिली. त्यांच्या या कला ज्ञानामुळे आपल्या मुलींना त्यांनी पेंटींग ते फोटोग्राफी व कशिदाकाम ते छाया चित्रणापर्यंत विषयांचे सखोल ज्ञान मिळवून दिले. स्वतःच्या पत्नीला त्यांनी कशिदाकाम, शिवण, पेस्टल ड्रॉईंग अश्या गोष्टी शिकवल्या. त्यासाठी त्यांना सिंगरचे शिलाई मशीनही आणून दिले. १९३५ साली त्यांनी 'राजा हरिश्चन्द्र' या तेलगू चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर आण्णासाहेबानी स्वतंत्रपणे दिग्दर्शनाचे काम सुरु केले. कांही हिंदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शीत केले. अण्णासाहेब वारंवार मुंबईला जात असत. मुंबईला त्यांचा एक इंग्रज पुस्तक विक्रेता होता. तो परदेशातून कलेवरची पुस्तके मागवून येथे त्यांची विक्री करीत असे. त्याच्याकडून आण्णासाहेब नेहमी पेंटींग, फोटोग्राफी अश्या विषयावरील पुस्तके खरेदी करून आणत असत. त्यामध्ये लिओनार्दो द विंची असत, रेम्ब्रा असत, टर्नर असे, आणि यातून प्रेरणा घेऊन त्यांची स्वयंशिक्षीत चित्र तपस्या सुरु असे. चित्रकलेतील तंत्र व मंत्राचा अभ्यास करीत असत. त्यावेळच्या काळानुसार ब्रिटिश वास्तववादी पद्धतीचे काम ते करीत. त्यांच्या या कलेच्या आवडीमुळे घरच्या सर्वांची बुद्धीमत्ता, त्याचे कलागुण वाढीला लागण्यात मदत झाली. स्त्रियांना अश्या प्रकारच्या विषयाचे ज्ञान दिल्यावरच त्यांच्यातील सुप्त गुण जागृत होतील याची त्यांना खात्री होती. आणि अश्या या घरातील कलात्मक वातावरणामुळे भानुसहीत इतर सहा भगीनींनी त्यांची पुढील कारकीर्द वेगवेगळ्या क्षेत्रात गाजवीली.
वयाच्या आठव्या वर्षी आण्णासाहेबानी भानुचे कलागुण जाणून तिला पेपर क्राफ्ट शिकविण्यास एक शिक्षक ठेवला होता. दुर्दैवाने भानू केवळ दहा वर्षाची असताना सप्टेंबर १९४० मध्ये अण्णासाहेबांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा 'मोहीनी' नांवाचा मराठी चित्रपट सुरु होता. त्या चित्रपटात आपल्या दहा वर्षाच्या लहानग्या भानुमतीला त्यांनी राजपुत्राची भूमिका दिली होती. वडील गेल्यानंतरही भानूच्या आईने तिची चित्रकलेची आवड जाणून तिला चित्रकलेची शिकवणी लावली. भानू शाळेत असतांना एकदा सुप्रसीध्द नाट्य अभिनेत्री व एक थेटर व्यक्तीमत्व असलेल्या हिमादेवी आपल्या पतीसमवेत कोल्हापूरला आल्या होत्या. इब्राहीम अल्काझी या नाट्य दिग्दर्शकाच्या 'हेड्डा गॅबलर' या नाटकात त्यांनी पुढे हेड्डा गॅबलरची भूमिकाही केली होती. त्यावेळच्या बंगालच्या दुष्काळाला मदत म्हणून त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या एका नाटकाचे इंग्रजी नाट्य रूपांतर सादर केले होते. त्यामध्ये भानुला त्यांनी दोन वाक्ये बोलण्याचे काम दिले होते. हिमादेवीचा भानूवर इतका प्रभाव पडला की ती सतत हिमादेवीसोबतच राहू लागली. हिमादेवी सतत नवीन टॅलेंटच्या शोधातच असत. भानुमध्येही त्यांना कलागुण दिसले. व त्यांनी तिला मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये कला शिक्षण घेण्याचा मौलीक सल्ला दिला. तिच्या शाळेतील शिक्षकांचेही तेच मत होते. जेव्हां हिमादेवी परत मुंबईला निघाल्या तेव्हां त्यांनी मुंबईला आपल्याकडे येण्याचे भानुला खुले आमंत्रण दिले. आपले शालेय शिक्षण संपवून पुढे मुंबईला गेल्यावर भानू हिमादेवींना भेटली. हिमादेवींची आई मीरादेवी ह्या एक फॅशन डिझाइनर होत्या व त्या 'फॅशन अँड ब्यूटी' या मासिकासाठी काम करीत होत्या. आणि येथेच भानु राजोपाध्येच्या चित्रकला कारकीर्दीचा पाया रचला गेला म्हणायला हरकत नाही. मुंबईला मीरा देवी यांच्या सोबत मुंबईच्या उपनगरातील खारच्या घरात तिने राहायचे, व लोकल ट्रेनने व्ही.टी. येथे गर्द झाडीत लपलेल्या गॉथिक वास्तुशात्राच्या भव्य इमारतीत असलेल्या सर जे.जे. स्कूल ॲाफ आर्टमध्ये जायचे हे ठरले.
सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये भानुच्या कलाविष्काराला पंख मिळाले. तिची प्रतीभा बहरू लागली. संस्थेचे संचालक कॅटन सॅालोमन आणि कला क्षेत्रात आधुनिकतेचे वारे वाहवणारे उपसंचालक जेराल्ड या दोघांचाही तिच्यावर प्रभाव पडला. तिचे शिक्षक होते ख्यातनाम चित्रकार व प्रोग्रेसीव्ह ग्रुपचे एक सभासद वासुदेव गायतोंडे. गायतोंडेंना भानूचे काम आवडू लागले. विशेष करून तिची स्केचीस त्यांना खूप आवडत. त्यांनी तिला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. १९५२ साली गायतोंडे यांनी स्वतः भानू राजोपाध्येचे पोर्ट्रेट केले. त्यामध्ये त्यांनी भानूचे प्रभावी, परीणामकारक व्यक्तीमत्व, तिचे बांधलेले केस, तिच्या हातामध्ये असलेला पक्षी व त्यातून येणारे भौमितीक आकार यातून त्यांनी भानूंचे अंतरंग उलगडले आहे. अश्या रीतीने भानूचे स्कूल ऑफ आर्टचे प्रशिक्षण सुरु होते. स्कूल ऑफ आर्टच्या शेवटच्या काळात भानुला YWCA या मिशनरी मुलींच्या वसतीगृहात रहाण्याची जागा मिळाली. हे वसतीगृह माझगाव येथे होते. तेथील शांतता व एकांत हा भानुला तिची चित्रसंपदा आविष्कृत करण्यास अत्यंत योग्य वाटत होता. तिचा चित्रकलेचा इझल व रंग यांच्या वापरासाठी उपयुक्त अशी ती जागा डॉकयार्ड स्टेशनच्या जवळ होती. याकाळात भानू यांनी तिचे 'प्रेयर' हे पेंटींग रंगवीले. या चित्रात तिने देवाच्या पवित्र अश्या आसनासमोर दीनवाण्या रूपात गुडघे टेकून याचना करणाऱ्या दोन आकृत्या दाखविल्या आहेत. त्यातील त्यांच्या पोषाखावरून त्या दोघी नन्स असल्याची जाणीव होते. त्यात दिसणारा क्रॉस हा सुद्धा प्रतीकात्मक सूचीत करतो. आणि तिने केलेल्या तिच्या वैयक्तीक नोंदीवरून हे पेंटींग तिने आपल्या स्वतःच्या अनुभवावरून केल्याचे म्हटलं आहे. आणि असा विषय चित्रीत करण्यासाठी तिला विद्यार्थी दशेत आणखी कोणती पवित्र अशी जागा मिळणार होती?
तिने म्हटल्याप्रमाणे "जी जागा मला देण्यात आली होती, ती अत्यन्त शांत, कोणताही उपद्रव होणार नाही अशी असल्याने तेथील वातावरणाचा अनुभव हा माझ्या मनावर एक विस्मयकारी परीणाम करणारा होता. या वसतिगृहाची आणि सभोवारची जागा अंधारी आणि एकांतात होती. त्यामुळे येथे राहणाऱ्या विद्यार्थीनी जितके लवकर घरी जाता येईल तितके पहात असत. वर्दळ जाणवे ती फक्त येथे राहणाऱ्या नन्स यांची सतत ये जा सुरु असे त्याची. खाली राहण्याच्या खोल्या होत्या. येथे रहाणाऱ्या मुलींमध्ये तामीळनाडू व श्रीलंका येथूनही आलेल्या मुली होत्या. हा सर्व प्रकार मला मोठाच विस्मयकारक होता. अश्या या कॉन्व्हेंट वसतीगृहातील अनुभव मात्र रोमांचकारी होता. नन्स यांचे धार्मीक विधी, त्यांची गाणी, अगदी जवळून न्याहाळलेले त्यांचे दैनंदिन जीवन याचा माझ्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला. नेहमी शांत असलेले हे वसतीगृह व तेथील चर्च नाताळात मात्र त्यांच्या इव्ह मास ने गजबजून निघे. आणि ह्याच चर्चने मला 'नन्स' हे त्यांना मानवंदना म्हणून केलेले पेंटींग करण्यास प्रवृत्त केले. पुढे हे पेंटींग 'फ्रेंच गेट-टू-गेदर' मध्ये ‘प्रोग्रेसीव्ह आर्टीस्टस ग्रुप' बरोबर जेंव्हा प्रदर्शीत झाले, तेव्हां कोणालाही ते वैयक्तीक अनुभवावरून आविष्कृत केल्याची जाणीव झाली नाही." असेच तीचे १९५० साली केलेले अमूर्त शैलीतील ‘लेडी इन रीपोज' हे न्यूड पेंटींग आहे. यामध्ये बिछान्यावर पालथी झोपलेली एक नग्न स्त्री दाखवली असून तिला लाल, निळा, पिवळा अश्या प्राथमीक रंगसंगती मध्ये आविष्कृत केली आहे. ब्रशच्या विवीध अश्या फटकाऱ्याने साकारलेल्या या चित्रातील आकृतीवर संरक्षणात्मक अशी जाळीही आपल्याला दिसते.
तसे पाहीले तर भानू राजोपाध्ये जिथून आल्या ते कोल्हापूर संस्थान कलाप्रिय म्हणून ओळखले जाते. त्याला कारणही होते ते तेथील प्रगतशील आणि कला व संस्कृतीची जाण असलेले सामाजीक सुधारणावादी छत्रपती शाहू महाराज. त्यानी अनेक कलाकारांना मदत करून पुढें आणले. अनेक कलाकार त्या मातीत जन्माला आले. त्यांचा वारसा पुढे त्यांचे सुपूत्र छत्रपती राजाराम महाराजांनी चालवीला. कलेसोबतच त्यांनी शरीर सौष्ठवालाही तितकेच महत्व देऊन व्यायाम शाळा सुरु केल्या. मल्ल खांब व कुस्ती या व्यायाम प्रकारातून अनेक पहिलवान व कुस्तीगीर तयार केले. तमाशा या महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला प्रकाराला वाढीला लावले. कोल्हापूर हे मराठी चित्रपट सृष्टीचे उगमस्थान ठरले. बाबुराव पेंटर यासारख्या कलावंताने तेथे चित्रपट स्टुडीओ उभारून अनेक चित्रपट निर्माण केले. अनेक कलाकार पुढे आणले. आबालाल रहमान,
महादेव विश्वनाथ धुरंधर सारखे कलावंत तेथे तयार झाले. त्यापैकी आबालाल रहमान हे शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार झाले. तर पुढे राव बहादूर ही पदवी मिळवणारे प्रा.म.वि. धुरंधर हे सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या त्यांच्याच मातृसंस्थेत उप संचालक झाले. अश्या चहुबाजूनी कलात्मक वातावरणात भानू राजोपाध्ये ही वाढली असल्याने ते सर्व गुण तिच्या अंगी आले नसल्यास नवलच!
जे.जे. मध्ये शिक्षण घेत असताना तेथील संचालक कॅ. सॉलोमन यांच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे आर्ट स्कुलमध्ये त्या काळात ब्रिटिश वास्तववादी पद्धतीचे काम करून घेण्यात येत असे. बॉंबे आर्ट सोसायटीवरही त्यांच्या कामाचा प्रभाव होता. पुढे सॉलोमन यांनी भारतीय शैलीवर बंगाल स्कूलच्या आधारे अभ्यासक्रम जे.जे.मधे सुरु केला. त्यामध्ये खास करून अलंकारीक पद्धतीची बारीक कलाकुसर केलेली अशी चित्रे असत. विद्यार्थ्यांना त्यासाठी अजंठा येथील भित्तिचित्रे अभ्यासण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्या वयात भानूवर देखील या पद्धतीचा थोडाफार प्रभाव पडला. आरंभीच्या काळात तिच्यावर अमृता शेरगील या चित्रकर्तीचा प्रभावही दिसतो. त्यामुळे तिच्या रंगसंगतीची छाप असलेली तिची वुमन्स विथ पॉट्स, विश्वामित्र, रंग महोत्सव, अशा बेंगाल स्कुलच्या धर्तीवरची चित्रें तिच्याकडून आविष्कृत झाली. पण पुढे तिच्या विचारांनी एक वेगळीच धारणा स्वीकारली. तिचे विचार आधुनिकतेकडे वळू लागले. 'प्रोग्रेसीव्ह ग्रुप'च्या कलाकृती तिला खुणावू लागल्या. चित्रकार आरा यांचेही भानूच्या कामाकडे लक्ष असे.
भानूचा स्कूल ऑफ आर्टचा कला प्रवास उत्तमरीत्या सुरु होता. ती बाहेरील कामासाठी बोधचित्रे काढीत असे, व स्कूल ऑफ आर्ट मध्ये पेंटींग करीत असे. १९५३ साली अंतीम वर्षाच्या परीक्षेत भानुने सुवर्ण पदक जिंकले. जोडीला तिला म्युरल पेंटींगची शिष्यवृत्ती देखील मिळाली. ह्या तिच्या यशानंतर तिच्याकडे 'प्रोग्रेसीव्ह ग्रुप'चे लक्ष गेले व त्यांनी तिला या ग्रुपची सभासद होण्याची गळ घातली. भानुने त्यांचे सभासदत्व स्वीकारले. पाठोपाठ अंबादास गाडे यांनाही सभासद करण्यात आले. तेव्हां नवीन आलेल्या सभासदाने एक पेंटींग करण्याची प्रोग्रेसीव्ह ग्रुपची पद्धत होती. व भानूजींनी झोपाळ्यावर बसून झोके घेणारी स्त्री व तिला झोके देणाऱ्या तिच्या मैत्रिणी असे अमृता शेरगिलच्या शैलीमध्ये पेंटींग केले. या ग्रुपचे सदस्य नेहमी एकत्र जमून चर्चा करीत असत. विचारांची देवाण घेवाण करीत असत. त्यामध्ये तय्यब मेहता, वासुदेव गायतोंडे, ललिता लाजमी, गीता रॉय( त्यावेळी त्यांचा गुरुदत्तशी विवाह झाला नव्हता) हे लोक नेहमीच चर्चेला असत. त्यावेळी भानूजींच्या 'ब्राम्हण' या पेंटींगमध्ये त्यांनी त्यातील स्त्रियांच्या वस्त्रातील वापरलेले भडक असे लाल रंग याविषयी प्रा.अहिवासी यांनी केलेल्या टिपणीवर त्यांनी सांगीतले की त्याकाळात त्यांच्या घराजवळ असलेल्या देवळात अनेक विधवा स्त्रिया प्रवचनासाठी येत असत, त्या अश्या प्रकारच्या साड्या नेसत असत, ज्याला विधवांनी वापरायची आलवण असे म्हटले जाई. त्याचा हा भडक लाल रंग आहे. आणि त्याचाच प्रभाव माझ्या पेंटींगवर आहे. आणि १९५३ साली भरणाऱ्या 'प्रोग्रेसीव्ह आर्टिस्ट्स ग्रुपच्या प्रदर्शनासाठी तिची दोन चित्रे निवडण्यात आली, त्यापैकी एक होते 'प्रेयर' आणि दुसरे ‘बनाना सेलर’! आपली चित्रे त्या काळातील आरा, सुझा, हुसेन, क्रिशन खन्ना, गायतोंडे अश्या चित्रकलेतील महानायकांसोबत प्रदर्शीत होणार या कल्पनेनेच तिचा आनंद गगनात मावेना.
प्रोग्रेसीव्ह ग्रूपची एकूण तीन मोठी प्रदर्शने त्या ग्रुपच्या कारकीर्दीत भरली. त्यांचे पहीले प्रदर्शन बॉंबे आर्ट सोसायटी सलोन मध्ये १९४९ साली भरले होते, ज्याचे उदघाटन डॉ. मुल्कराज आनंद यांच्या हस्ते झाले होते. त्यांचे दुसरे प्रदर्शन हे १९५० साली कोलकात्याला भरले. यावेळी 'कोलकाता ग्रुप ऑफ बंगाल' व प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुप' अश्या दोन संस्थानी ते एकत्रीतरीत्या भरवले होते. त्यावेळी अनेक कला समीक्षकांनी, ‘पुराणमतवादी कला समीक्षक व पेंटर’ यांना हे एक नव्या कला चळवळीचे आव्हान असल्याचे म्हटले होते.आणि त्यांचे तिसरे व अखेरचे प्रदर्शन १९५३ साली मुंबईत भरले. आणि केवळ पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या प्रोग्रेसीव्ह ग्रुप मध्ये प्रथमच एका महीला कलावंतांचे नांव सामील झाले. गायतोंडे, अकबर पदमसी, क्रिशन खन्ना यांच्या जोडीला ते नांव होते, भानू राजोपाध्ये! पण भानूचा या ग्रुपशी फारच थोडा असा कालखंड राहीला. १९५४ साली ‘प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट्स ग्रूपही त्यातील कलावंत वेगवेगळ्या वाटेने गेल्यामुळे अधीकृतरीत्या फुटला. पंण आता भानूजींच्या रेषा भल्या मोठ्या कॅनव्हासवर कोणाही पेक्षा मोठ्या आकारात साकारणार होत्या. कलेचे समृद्ध असे एक नवीन दालन नियतीने भानूसाठी उघडून ठेवले होते. यावेळी चित्रकार आरा यांनी भीती व्यक्त केली होती की या व्यावसायीक कलेमुळे तिच्यातील अभिजात कला मारली जाईल. अनेक जेष्ठ चित्रकारांनी तिला तिच्यातील चित्रकलेचा व्यवसाय सोडू नये असा सल्ला दिला, कारण त्यातील तीचे टॅलेंट त्यांना माहीत होते. पण आता भानुला तिचे स्वतःचे नांव कोरायचे होते. आपले स्वतंत्र अस्तीत्व दाखवायचे होते. आणि त्यासाठी एकच पर्याय होता, तो फॅशन डिझाईनींग!
ज्
या मीरादेवीच्या प्रोत्साहनाने भानुने मुंबईत आपले पाय रोवले त्या मीरादेवी 'फॅशन अँड ब्युटी ' या मासिकाच्या सह संपादीका होत्या. तिच्यामुळे भानू यांनी फॅशनच्या कार्यक्षेत्रात आपले पाऊल टाकले. या मासिकाचे मुख्य संपादक किशन जहांगीयानी हे नुकतेच पॅरीस मधून एक अभ्यासक्रम करून परतले होते. त्यांनी भानूची स्केचीस पाहीली व ती त्यांना आवडल्यामुळे त्यांनी भानूला त्या मॅगझीनची इलस्ट्रेशन्स करायला सांगीतली. भानुने नेहमी आपल्या कामात भारतीय वारसा आणि त्याचे आधुनीक भवितव्य डोळ्यासमोर ठेवून ती रेखाटण्यास आरंभ केला. भानुच्या या फॅशन बोधचित्रांनी मॅगझीनचे नांव वाढवले. पुढे भानुने नुकत्याच सुरु झालेली 'इव्हस विकली' या फॅशन साप्ताहिकांत काम करण्यास आरंभ केला. प्रत्येक शनीवारी प्रकाशीत होणाऱ्या या ‘इव्हस वीकली’ मध्ये त्यांना डबल पेज इलस्ट्रेशन करण्याची संधी मिळाली. लवकरच ही इलस्ट्रेशन फॅशनच्या जगात एक बोलबाला ठरली. आम्ही आर्ट स्कुलचे विद्यार्थी देखील दर शनीवारी आमच्या संदर्भासाठी ह्या इलस्ट्रेशनसाठी इव्हस विकलीचा अंक विकत घेत असू. इतकी ती लयबद्ध शैली आणि त्यातील प्रवाही रेषा फॅशनचे अंतरंग उलगडत असे.
भानुच्या या इलस्ट्रेशननी इतकी प्रसीद्धी मिळवली की इव्हस वीकलीच्या संपादकानी एक नवे बूटिक उघडले. आणि त्यामधे भानुच्या वस्त्रभूषेची डिझाइन्स ठेवण्यात येऊ लागली. ही डिझाइन्स देखील अत्यंत प्रसीद्धी मिळवू लागली. हे बुटीक केवळ एका विशिष्ट दर्जेदार व उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादीत न रहाता अनेक फिल्मी व्यक्तीमत्वे देखील तेथे येवू लागली. कित्येक अभिनेत्यांची स्वत:च्या कॅास्च्यूमसाठी तिला बोलावणी येऊ लागली. तिच्या ग्राहकांपैकी कामींनी कौशल व नर्गीस य दोघीही वरचेवर येवू लागल्या. नर्गिसजीने तर भानूंची बोधचित्रे आधीच टाइम्स मध्ये प्रकाशीत झालेली पाहीली होती. तिने भानूची राज कपूरशी ओळख करून दिली. तेव्हां राज कपूरनी तिला त्याच्या श्री ४२० या चित्रपटातील नादीराची वस्त्र प्रावरणे डिझाईन करण्यास सांगीतले, व १९५५च्या या चित्रपटातील नादिरेच्या कपड्याने फॅशन जगतात एक नवीन मानदंड निर्माण केला. त्यातच यश चोप्रा व रामानंद सागर यांचीही वर्णी तिथे लागू लागली. आणि या लोकांकडून भानूवर प्रचंड प्रमाणावर मागणी होऊ लागली की, तिने आता संपूर्णपणे चित्रपटासाठी वस्त्र वेशभूषा डिझाइनर ( Costume Designer) म्हणून काम करावे. आणि ही मागणी सतत वाढतच गेली. आता भानुपुढे केवळ एकच पर्याय राहीला. तो म्हणजे आपला सध्याचा फॅशन डिझाईनचा व्यवसाय चालू ठेवायचा, की यापुढे चित्रपटासाठी वस्त्रवेशभूषा संकल्पीत करायची! आणि भानुने विचाराअंती निर्णय घेतला, यापुढे आपल्या सर्जनशीलतेला, विचार शक्तीला आणि आपल्या रुंद अश्या कॅनव्हासला आव्हान देणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमाकडेच वळायचे. तेथेंच माझ्या आशा आकांक्षा आणि उत्कंठावर्धक अश्या स्वभावाला पूर्ण न्याय मिळेल. आणि भानू राजोपाध्ये यांनी आपल्या चित्रकलेला रामराम ठोकला व चित्रपट सृष्टीला जवळ केले. त्यांनी आपले इव्हस विकलीसाठी शेवटचे इलस्ट्रेशन केले ते महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांचे फडफडणाऱ्या तिरंग्यासमोर गौरवाने उभे असलेले. १५ ऑगस्ट १९४७ साली इव्हस विकलीच्या पहील्या स्वातंत्र्यदिन विशेषांकात हे कृष्ण धवल चित्र प्रसीध्द झाले.
चित्रपट सृष्टीत जाण्याची भानूजींची ओढ एवढी प्रचंड होती की त्यात ती आपोआप ओढली गेली. आणि शेवटी त्यांनी आपले ध्येय साकारले. त्यांच्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात गुरुदत्तच्या सी.आई.डी. या चित्रपटाने १९५६ साली झाली. या चित्रपटामधील कलावंतांच्या वेशभूषेचे काम त्यानी पाहीले. आणि पाठोपाठ गुरुदत्तसाठी त्यांनी 'प्यासा' १९५७, 'चौधवीका चांद' १९६०, आणि 'साहीब बीबी और गुलाम' १९६२ या चित्रपटासाठी काम केले. गुरूदत्तच्या १९५९ च्या पहील्या भारतीय सिनेमास्कोप चित्रपट ‘कागज के फूल’ या कृष्ण धवल चित्रपटात भानूजीनी आपले सारे कौशल्य वापरले होते. काळाच्या पुढे असलेल्या या चित्रपटाचे कला दिग्दर्शन देखील चित्रकार मुरलीधर आचरेकरांनी केले होते व त्यांनी फिल्मफेअरचा उत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील मिळवला होता. दोन महान मराठी माणसांचे हात या चित्रपटाला लागले होते. त्यानंतर तिसरी मंझील, मेरा साया, आम्रपाली, गाईड, रेशमा और सेहरा या चित्रपटाच्या वस्त्रभूषेचे कामही भानूजीनी केले. १९६६ साली भानूजींना फ्रांस सरकारने पॅरीस मध्ये जाऊन फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण घेण्यासाठी सहा महिन्याची शिष्यवृत्ती दिली. गंमत म्हणजे त्यांना जेव्हां मुलाखतीसाठी बोलावण्यात आले, तो मुलाखतीचा शेवटचा आठवडा होता. नुकताच भानूजींनी त्यांचा 'आम्रपाली' हा चित्रपट हातावेगळा केला होता. व शेवटची मुलाखत भानूजींची होती. त्याचे कारण त्यांना मुलाखतीच्या वेळी सांगण्यात आले की, त्यांचा बायोडेटाचं इतका मोठा होता की समितीला तो वाचायला वेळ लागला, त्यामुळे आपणास शेवटी बोलावीले. अर्थातच त्या त्यात निवडल्या गेल्या. त्यावेळी पॅरीसने तिला एक नवीन जग उलगडून दाखवल्याचे भानुजीनी सांगीतले. तेथून त्यांनी स्पेन पर्यंत प्रवास केला. तेथे जगविख्यात चित्रकार गोया याची कला आणि त्यातील भावदर्शक रंग आपणात सामावून घेतले. व्हेनीसच्या गोंडोलाचे मनोवेधक दृष्य अनुभवले. दुसऱ्या आठवड्यात त्यांना रोमच्या कला व सांस्कृतीक वारशाने आपणाकडे खेचून घेतले. कला विद्यार्थी म्हणून अनेक जगप्रसीध्द अशी फॅशन हाऊस व जगातील मोठ्या फॅशन कलाकारांची कामे जवळून पहाण्याची संधी भानूजीना या शिष्यवृत्तीने मिळवून दिली. अनेकांशी मैत्री झाली. तेथे सर्वचजण एकमेकांशी आपल्या विचारांची, कल्पनाविष्काराची देवाण घेवाण करीत. अनेकांनी त्यांना साडी कशी नेसावी ती शिकविण्यास सांगीतले. आणि कला विद्यार्थी म्हणून भानूजींच्या मनांत संपूर्ण युरोपने तेथील कला सौंदर्याच्या, तेथील जपलेल्या संस्कृतीच्या नशेची एकप्रकारे धुंदी आणली.
१९८२ सालच्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या 'गांधी’ या जागतीक चित्रपटाने भानू अथैय्या या नावाची जगाला ओळख करून दिली. सुमारे १७ वर्षे सतत भारताच्या वाऱ्या करून आपली 'गांधी' यांच्यावर चित्रपट काढण्याची मनीषा रीचर्ड ॲटनबरो यांनी १९८० मध्ये या चित्रपटाचा श्रीगणेशा रोवून अखेरीस पूरी केली. यावेळी त्यांना एखाद्या भारतीय वेशभूषा कलाकाराची गरज होती. आणि भारतातील मिश्र जमाती, त्यांचे विविध पोशाख, संस्कृती, धर्म, जाती याची बिलकुल कल्पना नसलेल्या त्या ब्रिटिश दिग्दर्शकाने आपल्या प्रॅाडक्शन मॅनेजरला उत्कृष्ट असा वेशभूषाकार शोधण्यास सांगीतले. तोपर्यत भानूजीना चित्रपट सृष्टीत काम करून २५ वर्षे झाली होती. नांव झाले होते. शिवाय कॉनरॅड रुक्स या दिग्दर्शकासोबत 'सिद्धार्थ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट केला होता, त्यामध्ये मुख्य भूमिकेत सिमी गरेवाल होत्या. गांधी चित्रपटासाठी मुंबईच्या कास्टींग डायरेक्टर म्हणून डॉली ठाकोर या काम पहात होत्या. तिने सिमीला भानूशी संपर्क साधण्यास सांगीतले. त्याकाळात भानुजींकडे फोनही नव्हता. तेव्हां सिमी स्वतः भानुजींकडे आल्या व त्यांनी या चित्रपटाची पार्श्वभूमी भानुजीना सांगीतली. ते ऐकत असताना भानुजींच्या मनात असंख्य प्रश्न उमटत होते. आजपर्यंत हिंदी चित्रपटातील चमकदार वेषभूषा त्यांनी केल्या होत्या. पण सिमीने सांगीतले, अशी चालून आलेली संधी घालवू नकोस. तुझें कसब दाखविण्यास ही उत्तम संधी आहे. चांगले कपडे कर, तुझा बायोडेटा घे. मी तुमची मुलाखतीची वेळ ठरवते. तेथे तुम्हांला बरेच काही बोलायचे आहे. वांद्र्यातील सी-रॉक हॉटेलमध्ये पंधरा एक मिनिट बोलणी झाली. व ॲटनबरोनी त्यांच्या हातात स्क्रिप्ट ठेवले व आपणास ठरलेल्या दिवशी भेटण्यास सांगीतले. पुढे या भेटी वाढत गेल्या, अभ्यास सुरू झाला आणि अर्थातच पुढे इतीहास घडला. यावेळी गांधी चित्रपटातील वेशभूषा या दोन कलाकारात विभागल्या होत्या. त्यापैकी ब्रिटिश वेशभूषेची जबाबदारी होती ऑस्कर विजेत्या जॉन मोल्लो याच्यावर व भारतीय वेशभूषा करीत होत्या भानू अथैय्या!
भानूजीनी त्या चित्रपटातील प्रचंड अश्या अशा संख्येने असलेल्या अभिनेत्यांसाठी भारतीय पद्धतीची वेशभूषा संकल्पीत केली. तीही त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील. दक्षीण आफ्रिकेमधील तरुण वयातील गांधीजींची वेशभूषा, त्यानंतर भारतात आल्यावर येथील चळवळीच्या दरम्यान दांडी यात्रेच्या वेळेतील, आश्रमातील, अश्या विवीध अवस्थेतील गांधीजी त्यांनी साकारले. सोबत कस्तुरबाजींच्या साड्या या सर्व त्या काळाप्रमाणे त्यातील सत्यता जाणून त्यांनी त्या डिझाईन केल्या. खास बनवून घेतल्या. शिवाय गांधीजींच्या अंत्ययात्रेतील सुमारे तीन लाख सामील असलेल्या भारतीयांचा यात समावेश होता. या प्रचंड अश्या आवाक्याबाहेरच्या चित्रपटाच्या वस्त्रभूषेचे आव्हान तितकेच प्रचंड होते. पण भानुजीनी ते सहजी पेलले. शिवाय गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीला एक प्रकारे न्याय मिळवून देण्याचे समाधान त्यांनी मिळवले. गांधी चित्रपटामध्ये बेन किंग्सले यांचे जे पोषाख त्यांनी तयार केले त्या कामाने गांधीजी आपल्या हृदयाजवळ आल्याचे त्यांना जाणवले. त्यांचा सुमारे पन्नास वर्षांचा कालखंड कपडेपटातून निर्माण करणे हा त्यांच्या जीवनातील एक मौल्यवान क्षण त्या समजत. ऑस्करची लॉस एन्जलीस मधील ती रात्र त्यांना सतत आठवत असे. And the Oscar goes to... हे शब्द उच्चारताच भानू अथैय्या या भारतीय कॉस्चुम डिझाइनर वर प्रकाशझोत पडला. हे पारितोषिक तिला जॉन मोल्लो याच्याशी विभागून देण्यात आले होते. ज्यावेळी त्या बाकीच्या नामांकीतासोबत भानूजी आपल्या जागेवर बसल्या होत्या, तेव्हां त्या भानूजीना म्हणाल्या, आम्हाला खात्रीच होती की आज आम्हाला संधी नाही. कारण तुझ्या चित्रपटाचा कॅनव्हासच इतका मोठा आहे की तेथे दुसरा कोणी येऊच शकत नाही. मात्र भारतातही आणि सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट तसेच कदाचित कला क्षेत्रातील अनेकांनाही या नावाचे आकलन नव्याने झाले असावे. पण भानू अथैया ह्या ॲास्कर विजेत्या पहील्या भारतीय महीला ठरल्या. भारताचे नांव सिने सृष्टीत जगात उंचावणाऱ्या! आणि भारतीय सिनेसृष्टीने कधीही विशेष महत्वाने न पाहीलेल्या या वेशभूषा कलेला पाश्च्यात देशांप्रमाणेच प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या.
१९७२ सालच्या सिमी गरेवालच्या 'सिद्धार्थ' चित्रपटातील त्यांची वेशभूषा प्रेक्षकांचे श्वास रोखणारी ठरली. 'चांदनी’ या श्रीदेवीच्या १९८९ च्या चित्रपटातील तिची शिफॉनची साडी, १९९१ मधील 'लेकिन' मधील डिम्पलचा राजस्थानी पोशाख हे सर्व वाखाणण्यायोग्य ठरले. आणि २००१ मधील आमीर खानच्या 'लगान' या चित्रपटाने तिला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. आज कित्येकांना आठवतही नसेल पण शम्मी कपूरच्या 'ब्रम्हचारी' चित्रपटातील मुमताजची साडी त्यांनी जेव्हां डिझाईन केली, तेव्हां ती गच्च अशी शरीरासोबत लपेटलेलेली साडी 'मुमू' साडी म्हणून प्रसीद्धी पावली व अनेक तरुणीच्या आवडीची ठरली. ती त्या काळातील एक फॅशन ठरली. तसेच १९६६ साली आलेल्या 'आम्रपाली' या चित्रपटासाठी त्यांनी वैजयंतीमालेसाठी जी नर्तिकेची चित्ताकर्षक अशी साडी डिझाईन केली तीही 'आम्रपाली' साडी म्हणून अत्यंत गाजली. त्यासाठी भानूजींनी अजिंठ्याच्या प्राचीन चित्र गुंफाना भेट देऊन तेथील रीतसर संशोधन केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रथमच अभिनेत्रीची नाभी दाखविण्यात आली. त्यावर खूप चर्चाही झाली. तेव्हां खुद्द वैजयंतीमालाजींनी सांगीतले की माझें शरीर जरी तेथें उघडे वाटत असले, तरी माझ्या सर्वांगावर माझ्या स्किनच्या रंगाचा शरीराला गच्च बसेल असा पोशाख मी घातलं होता. नंतर अनेक वेळा इतर नायिकांही अश्या प्रकारच्या नाभी उघडी ठेवणाऱ्या साड्या नेसल्या आहेत. आजही कैक वेळा नृत्याच्या कार्यक्रमासाठी त्या 'आम्रपाली' साडीचा वापर केला जातो. गुरुदत्तच्या 'प्यासा' चित्रपट त्याच्या भावनाशील अभिनयाने गाजला. पण त्याचा पोशाख हा खास भानूजींच्या स्पर्शाचा होता. त्याचे बंगाली धोतर, खांद्यावरची शाल, त्याचा कुर्ता हे सर्व योग्य वातावरण निर्मिती करत होते. एखादा झगमगीत वेशभूषेचा केवळ व्यावसायीक चित्रपट असो, वा सर्जनशील दिग्दर्शकाचा कलात्मक चित्रपट असो, भानूजीं तितक्याच तन्मयतेने, संशोधन करून आपली संपूर्ण कला त्यात विरघळून परीश्रमपूर्वक काम करीत असत. त्यामुळेच या चित्रपट सृष्टीत त्यांच्या कलात्मकतेला तोड नव्हती. कित्येकदा त्या चित्रपटाच्या निमित्ताने ग्रामीण भागात जात. तेथील स्थानीक लोकांशी बोलत. त्याची वेशभूषा अभ्यासत. कपड्याचा पोत पहात. नेसण्याच्या पद्धती निरखीत. असा त्यांचा वेशभूषेचा अभ्यास, निरीक्षण, संशोधन चालु असे. त्यामुळे त्यांच्या कामात नेहमीच सत्यता जाणवत असे. २००५ साली भानूजींना दक्षीण आशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने गौरवीले गेले. २००९ मध्ये फिल्म फेअरने देखील भानूजींच्या भारतीय सिनेमातील सौंदर्य व वस्त्र प्रावरण यातील भरीव योगदानामुळे त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला. भानूजींनी खुप प्रवास केला.कला आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी टोकियो, मॉस्को, लेनीनगार्ड, लंडन, पॅरीस, रोम, न्यूयॉर्क, लॉस एन्जलिस अश्या शहरांना भेटी दिल्या.
भानू राजोपाध्ये यांनी दक्षीण भारतीय कवी व लेखक असलेल्या सत्येंद्र अथैय्या यांच्याशी विवाह केला अन त्या राजोपाध्येंच्या अथैय्या बनल्या. सत्येंद्र हे गीतकार असल्यामुळे कांही चित्रपटांची गीतेही त्यांनी लिहीली आहेत. त्यांना राधीका नावाची कन्या आहे. पण पुढे हा विवाह टिकला नाही. पण त्या अथैय्या या नावानेच अखेरपर्यंत ओळखल्या गेल्या. १०० पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी केले. यामध्ये त्यांनी राज कपूर, गुरुदत्त, यश चोप्रा, बी.आर.चोप्रा, विजय आनंद, राज खोसला, आशुतोष गोवारीकर या भारतीय व कॉनरॅड रुक्स व रिचर्ड ॲटेनबरो हे आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आहेत. त्यांच्या 'लेकिन' व 'लगान' या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भानू अथैय्या यांनी वस्त्र प्रावरणाची एक अनोखी भाषा भारताला शिकवली. केवळ त्या एक वेशभूषा कलाकार म्हणून राहील्या नाहीत तर त्यामागील शास्त्र त्यांनी सर्वांपुढे मांडले. ज्यावेळी 'गांधी' या महाचित्रपटासाठी वेशभूषा करायची होती तेव्हां भानूजींनी संपूर्ण दिल्लीतील म्यूझियम्स, लायब्रऱ्या अक्षरशः विंचरून काढल्या. त्यातून समर्पक संदर्भ शोधले. आणि पुढे या चित्रपटाने संपूर्ण जगाला जाग आणली व दोन्ही हातानी पुरस्कार ओढले. त्यातीलच एक ऑस्करची बाहूली सन्मानाने भानूजींच्या वाट्याला आली. आपल्या या कलाप्रवासातील सौंदर्यदृष्ट्या तिच्या आठवणीतील आवडीच्या नायीकांच्या वेंषभूषा म्हणजे आम्रपालीतील वैजयंतीमाला, गाईडमधील वहीदा रेहमान आणि सत्यं- शिवं-सुंदरम् मधील झीनत अमनची वेषभूषा. २०१५ सालचा ‘नागरीक’ हा त्यांचा वेशभूषा करण्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
२०१० च्या मार्च महीन्यात भानू अथैय्या यांनी आपल्या वस्त्र प्रावरणाच्या कला प्रवासावर आधारीत 'The Art of Costume Design' हे पुस्तक प्रसीद्ध केले. आणि १३ जानेवारी २०१३ मध्ये या पुस्तकाची एक प्रत त्यांनी दलाई लामा याना अर्पण केली. पुढे २०१२ साली भानूजींना ब्रेन ट्युमरचे निदान झाले. तेव्हां त्यांनी आपली ऑस्करची ट्रॉफी ही लॅास एन्जलीसच्या'द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अँड सायन्सीस' यांना परत करण्याचे ठरवले. कारण आपल्या पश्च्यात त्या ट्रॉफीची योग्य निगा राखली जाईल की नाही, तिला योग्य प्रकारे हाताळले जाईल की नाही या बद्दल त्यांना शंका होती. व त्याप्रमाणे त्यांनी ती परत केली. जेव्हां टाइम्सने त्यांची मुलाखत घेऊन याबद्दल त्यांना विचारले की निदान सरकारकडे तरी का दिली नाहीत? तेव्हां त्या म्हणाल्या, जेथें रवींद्रनाथ टागोरांचे नोबेल पारितोषिक चोरीला जाते, तेथे माझ्या या ट्रॉफीची सुरक्षा मी कशी देऊ? आपल्या देशांत अश्या कला व सांकृतीक वारशाची किंमत कोणालाच नाही. आणि परदेशातील अनेक नामांकीत फिल्मकारानी अश्या प्रकारे त्याचे योग्य जतन व्हावे यासाठी त्या अकादमीकडेच रहाव्यात असा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगीतले होते. शेवटी कांही दिवस त्या अंथरुणावरच होत्या. आणि अखेर १५ ऑक्टोबर २०२० या दिवशी वयाच्या ९१ व्या वर्षी झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. भारतीय चित्रपट सृष्टीला सतत वस्त्र प्रावरणाने सुशोभीत करुन नटवणारा, चमचमत ठेवणारा एक स्वयंप्रकाशीत तारा या जगातून निघून गेला. अंतराळातील असंख्य ताऱ्यामध्ये आपले तेज वाटण्यासाठी तेथे प्रकाशीत होत राहीला.
भानू अथैय्या हे नांव आठवताच आपणाला दिसतें ती त्यांची चंदेरी दुनीयेतील मौलीक कामगीरी ज्याला जगमान्यता मिळाली. त्याच सोबत आपणाला आठवते ती त्यांची चित्रमय कारकीर्द. त्यांची अनेक पेंटींग्स. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मातब्बर कलाकारांच्या 'प्रोग्रेसीव्ह आर्टिस्ट्स ग्रूप' च्या सभासदांमध्ये असलेले एकमात्र महीलेचे नांव, तेही तितक्याच समर्थपणे असलेले. आज त्यांनी आपली चित्रकला कारकीर्द म्हणून जोपासली असती, तर कदाचीत त्या भारतीय चित्रकलेचा पाया रचणाऱ्यापैकी एक म्हणून तेवढ्याच गाजल्या असत्या. पण त्यांची ओढ होती ती फॅशनकडे. जगाला आपल्या कामामुळे फॅशन करायला लावण्याची. आपल्यातील कलेला, कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला ओंजळीत कोंडून न ठेवता त्याला आकाशा एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर रेखाटण्याची. पेंटर म्हणून त्या राहील्या असत्या तर कदाचित त्यांची चित्रे आज अनेक म्युझियम मध्ये, कला दालनामध्ये दिसली असती. पण आज त्यांनी जी वस्त्रभूषेची कला जोपासली, त्यामुळे त्या सतत रसीकांसोबत राहील्या. अर्थात त्यांच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील शिक्षणाचा या वेषभूषेच्या माध्यमाला नक्कीच फायदा झाला आहे. कदाचित अजंठाच्या भित्तीचित्र शैली अभ्यासतांना त्यांना तेथील चित्रातील मानवी शरीरसौष्ठव, त्यावरील आच्छादलेली वस्त्र प्रावरणे त्यांचे प्रसंगानुरूप वापरलेली रंगसंगती यामुळे त्यांना वस्त्र प्रावरणाची मनातून आत्यंतीक ओढ लागली असावी. आणि जे.जे.च्या कला शिक्षणातून मानवी शरीराचे त्यातील शरीर सौष्ठव, रंगसंगती, कांपोझीशन, अवकाश विभाजन या सर्व गोष्टींचे शास्त्रशुद्ध आकलन त्यांना या कलेच्या अभ्यासातूनच मिळाले. आणि तसा तो पूर्वी तसा सत्यजीत रे यांनाही मिळाला होता. दोघेही कला विश्वातूनच शिक्षण घेऊन या वेगळ्या माध्यमात आले होते. पण माध्यम बदलले, तरी त्याचा मूलभूत पाया तोच असतो. फक्त वेगळ्या व्यासपीठावरून ते सादर होत असते!
भारताचे नांव आपल्या कलेद्वारे जगाच्या नकाशावर नेवून ठेवणाऱ्या भानू अथैय्या नामक या चित्रपट सृष्टीतील महानायिकेला विनम्र अभिवादन!
-प्रा. मं.गो. राजाध्यक्ष.
( संदर्भ सौजन्य : रणजीत होसकोटे, जेहरा जुमाभॅाय. पेजीस फ्रॉम भानूज हॅंड रिटन नोट्स.
चित्र-सौजन्य : प्रिंसेप्स, एन.एफ.डी.सी.)















Comments
Post a Comment