प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुपचा शेवटचा शिलेदार : मनोहर म्हात्रे.
एखादी व्यक्ती इतकी चांगली असू शकते? कुणाबद्दल असूया नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही किंवा कुणाच्या अपरोक्ष कधी वाईट बोलणे नाही. आहे तो केवळ मनाचा चांगुलपणा, बोलण्यातील मार्दव, दुसऱ्याबद्दल केवळ आपुलकी आणि स्वभावातील पारदर्शकपणा. स्वतः कलाकार तर आहेच शिवाय कला क्षेत्रातील एवढी प्रचंड माहीती, वारसा आणि व्यासंग हे की एखाद्याला एनसायक्लोपीडीयाची गरजच भासू नये. आणि ही व्यक्ती म्हणजे ज्या प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुपने कलेची मूल्यच बदलली त्या कलाकारामधील एक शेवटचे शिलेदारच म्हणा ना! किँवा ' द लास्ट एम्पेरीयर मनोहर म्हात्रे. चित्रकलेतील एक प्रयोगशील, आणि आदरणीय असे नांव.
मनोहर म्हात्रें यांचा जन्म अलीबाग जवळील धाकोडे नावाच्या एका लहानश्या गावात झाला. यांना त्याकाळातील अनेक चित्रकलेने झपाटलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे कलेच्या ओढीने ग्रासले होते. मिळेल ते पुस्तक, मिळेल तो कागद घेऊन त्याच्यावर चित्रे रेखाटने हे एकच काम मनोहर करीत असे. हा मुलगा पुढे काहीच करणार नाही याची जणू खात्रीच सर्वाना वाटत असे. आणि काहीच न येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे.जे.स्कुल मध्ये घालतात हा एक प्रवाद त्याकाळात असे. लहान भाऊ अभ्यासात हुशार. पुढे तो इंजिनीअर झाला. सर्व कलाकार आणि कला विद्यार्थी यांचे आशास्थान असलेले सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट त्यांना खुणावत होते. घरची परिस्थीतीही तशी बेताचीच होती. पण त्यांच्या वडीलानी मुलाची कलेबद्दलची तळमळ ओळखली. त्याचे कलासक्त मन जाणले. ते अत्यंत उदारमतवादी होते. त्यांनी केवळ मनोहरच्या कला शिक्षणाला पाठींबाच देऊन ते थांबले नाहीत, तर स्वतः त्याला घेऊन जे.जे.चे पहीले भारतीय संचालक प्रा. व्ही.एस.अडूरकर यांच्याकडे गेले. वास्तवीक तेव्हां आर्ट स्कुल सुरु झाले होते, तरीही अडूरकरांनी म्हात्रेंची एक परीक्षा घेऊन त्यांना प्रवेश दिला. अन मनोहर यांनी जे.जे.त प्रवेश मिळवला. एक स्वप्नपूर्ती झाली. आणि येथून म्हात्रे यांच्या कलेचा पहीला प्रवास सुरु झाला. या काळात मुंबईच्या कला विश्वात कांही चित्रकारांनी ब्रिटीश पारंपारीक वास्तववादी प्रवाद सोडून आधुनिकतेकडे वळण्यास सुरवात केली होती. एक विशिष्ट अश्या नामवंत कलाकारांचा ग्रूप होता तो. आणि हा ग्रूप 'प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रूप म्हणून प्रसिद्धीला आला. त्याच्या कामाचे पडसाद जे.जे.च्या विद्यार्थ्यावरही पडू लागले.आणि म्हात्रेही याला अपवाद नव्हते. या प्रोग्रेसीव्ह ग्रुपचे कलाकार होते, एफ. एन. सुझा, एस. एच. रझा, सदानंद बाक्रे, एच. ए. गाडे, के.एच. आरा, एम.एफ. हुसेन असे सर्वच सर्जनशील अन कर्तबगार. यापैकी केवळ बाक्रे हे एकमेव शिल्पकार त्यात होते. पुढे त्यात पळशीकर, गायतोंडे, मोहन सामंत असे लोकही सामील झाले. आणि म्हात्रेंनी त्याच्या कलाविष्काराचा अभ्यास सुरु केला.
म्हात्रे यांची जे.जे.मधील १९४९-५४ ची बॅच. त्यांच्या विद्यार्थी दशेत जे.जे. मधे त्यांच्या सोबत काही विद्यार्थी होते ते म्हणजे सतचित दाभोळकर, बाळंदे, प्रफुल्ला डहाणूकर( जोशी), बी. प्रभा, बी. विठ्ठल (हे शिल्पकला विभागात होते). त्याचे प्रथम वर्षाला शिक्षक होते ते, वासुदेव गायतोंडे. तेही पुढे प्रोग्रेसीव्ह ग्रुपला मिळाले. गायतोंडेंना म्हात्रेंचे काम अतीशय आवडले. आणि त्यानंतर त्यानी म्हात्रेंना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. गायतोंडे यांचे प्रोत्साहन व म्हात्रेंची मेहनत यामुळे म्हात्रे यांची कला प्रगती जोमात सुरु झाली. पुढे गायतोंडे व म्हात्रे हे दोघे शिक्षक विद्यार्थी न रहाता दोघांमध्ये एक मैत्रीची वीण गुंफली गेली. म्हात्रें सतत गायतोंडे यांच्या घरी जातं असत. मात्र तेथे त्यांना जाणवले ते गायतोंडे व त्यांचे वडील यांचे नसलेले नाते. त्या दोघांमध्ये एक दुराव्याची प्रचंड अशी एक भिंत उभी होती. गायतोंडेंची अमूर्त कला म्हात्रेंना नेहमीच भुरळ घालत असे. त्यांच्या अमूर्त कलेत त्यांची बोली व कला संवाद साधण्याचे ते एक प्रभावी माध्यम असल्याचे त्यांना जाणवे.
म्हात्रे यांनी आपला जे.जे.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या काळात चित्र गॅलरी उपलब्ध नव्हत्या. फक्त १९४६ साली स्थापन झालेले 'आर्टीस्ट एड सेंटर' होते. तेथे भेट देण्यास म्हात्रेंनी सुरुवात केली. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ते जेव्हां आर्टीस्ट सेंटर मध्ये जाऊ लागले, तेव्हां त्यांचा अनेक कलाकारांशी सहवास येऊ लागला. आणि या आर्टीस्ट सेंटरमध्येच म्हात्रेंचा १९४७ साली स्थापन झालेल्या 'प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रूप' च्या सभासदांशी संपर्क आला. यानंतर म्हात्रेंनी आर्टीस्ट एड सेंटरला भेटी देण्यास आरंभ केला, ते आजतागायत तो प्रवास चालूच आहे. याचे मुख्य उद्दीष्ट होते ते म्हणजे तेथे येणाऱ्या मोठमोठ्या कलाकारांच्या सहवासात येणे, त्यांच्याकडून त्या विषयाचे ज्ञान प्राप्त करून घेणे, आणि कला क्षेत्रांतील नव प्रवाहाच्या चळवळी समजून घेणे. आणि येथेच म्हात्रे यांचा चित्रकार आरा व प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंध आला. आणि इतर गॅलरी उपलब्ध नसल्याने कलाकार आपली कामे प्रदर्शीत करू शकत नव्हते. पुढे मुंबईची सुप्रसीध्द जहांगीर आर्ट गॅलरी सुरु झाली आणि आणि रसिकांना नवी संधी उपलब्ध झाली. मात्र पैशाची टंचाई असल्याने म्हात्रें आठवड्यातून एक वेळच गॅलरीला भेट देत. दरम्यान म्हात्रेंना म्युरल डेकोरेशनची स्कॉलरशिप मिळाली अन त्यांचा म्युरल पेंटींगचा अभ्यास सुरु झाला. मोठमोठ्या आकारातील म्युरल त्यांनी केली. शिवाय खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकादमी येथील दोन मोठी म्युरल्स त्यांनी प्रा. बाबुराव सडवेलकर यांच्यासोबत केली.
त्यानंतर म्हात्रे यांची कामे सुरु झाली. वास्तविक मोठ्या कॅनव्हासवर काम करण्यासारखी त्यांच्याकडे जागाही नव्हती. कामातून पैसे मिळतील अशी त्यांना कल्पनाही नव्हती आणि अपेक्षाही नव्हती. त्यांचे काम चालू होते. त्यावर वासुदेव गायतोंडे यांच्या सहवासामुळे, त्यांच्या शिकवणुकीमुळे आणि त्यांचा मागोवा घेत असल्याने त्यांचा प्रभाव जाणवत असतो. पण ते प्रसीद्धी आणि पैसे याच्या कधीच मागे लागले नाहीत. आरंभापासूनच म्हात्रेंनी त्यांची स्वतःची अशी शैली शोधून काढली होती. व्यवसायीक झाल्यावर त्यांनी निरनिराळ्या स्पर्धांमधून भाग घेण्यास आरंभ केला. १९५५ साली त्यांच्या 'समर' या पेंटींगने कलकत्त्याच्या 'अकादमी ऑफ फाईन आर्टस्' चे सुवर्ण पदक मिळवले. बॉंबे आर्ट सोसायटीचे रौप्य पदक मिळवण्याचा मानही त्यांना मिळाला. पण आता संसार सुरु झाला होता. जीवनाला स्थैर्य हवे होते. त्याच सुमारास त्यांना चेन्नई येथे 'विव्हर्स सर्व्हीस सेंटर येथे काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या सुदैवाने हे केंद्र ज्यांनी उभारले होते, त्या सुप्रसीध्द कला समीक्षक व इंदिराजी गांधींच्या निकटवर्तीय श्रीमती पुप्पुल जयकर यांच्याशी भेट झाली. जयकरानी त्यांना या टेक्स्टाईल क्षेत्रांतील संकल्पनांची सर्व बारकावे, त्यातील तांत्रीक गोष्टी, डिझाईनमधील वेगळेपण अश्या सर्व गोष्टी शिकवल्या. आणि तेथे म्हात्रे यांना एक नवीन दालन उघडून मिळाले. आता त्यांचा कापडाशी, दोऱ्याशी, त्यांच्या रंगांशी खेळ सुरु झाला, आणि त्यांची पेंटींगच्या अंगाने जाणारी टेक्स्टाईल डिझाईन सुरु झाली. धाग्यांची वीण, नेमके जुळणारे रंगीत धागे, एकापुढे एक असे येणारे डिझाईन आकार या सर्व गोष्टी म्हात्रेंनी आत्मसात केल्या.
विव्हर्स सेंटर्स च्या कारकीर्दीत म्हात्रेंनी प्रभाकर बर्वे यांच्यासोबत काम केले. त्यावेळी बर्वे हे बनारसला होते तर म्हात्रे चेन्नईला. दर दोन वर्षांनी त्यांची भेट होत असे. व ती भेट अविस्मरणीय व आनंद देणारी असे. अशा असे. त्याकाळात म्हात्रे बऱ्याच ठिकाणी फिरले. बनारस, इंदोर, जयपूर अश्या विवीध ठिकाणी गेल्यावर तेथील संस्कृतीवर त्यांनी असंख्य ड्रॉइंग्स केली. त्यामध्ये हेड आहेत, लॅंडस्केप्स आहेत, कोलाज आहेत, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स आहेत. आणि त्याचा वापर त्यांनी टेक्स्टाईल डिझाइनसाठी केला. माजी पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधी यांच्यासाठी साडी डिझाईन करण्याची संधीही त्यांना मिळाली. हे काम पैसे मिळवून देत होते. आयुष्याला स्थैर्य देत होते, पण त्यांचे मन कोठेतरी पेंटींग करण्यासाठी आसुसले होते. वस्त्र आणि धाग्याच्या जागी त्यांना कॅनव्हास व रंग दिसू लागले. व त्यामुळे विव्हर्स सर्व्हीस सेंटरची सुमारे तीस वर्षे नोकरी करून म्हात्रेंनी तेथील डेप्युटी डायरेक्टर या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि यापुढे त्यांनी स्वतःला पेंटींगला वाहून घेण्याचे ठरवले.
म्हात्रे यांनी आपल्या चित्रांचे एकूण सात शो केले. आरंभीच्या ताज मधील शो मध्ये त्यांनी केवळ सात चित्रे ठेवली होती. तेंव्हा डॉ. होमी भाभा यांनी त्यातील एक चित्रं खरेदी केले. शिवाय त्यांनी म्हात्रेंना सांगीतले की यापैकी कोणतेही चित्र विकले गेले नाही, तर माझ्याकडे या. ही पेंटींग्स मला द्या. त्याच्या दुसऱ्या शो मधील सर्व चित्रे एका ॲास्ट्रेलीयन व्यक्तीने विकत घेतली. म्हात्रेंना प्रोग्रेसीव्ह ग्रुपचा मोठा वारसा लाभला होता, गायतोंडे यांच्यासारख्या प्रतिभावान कलावंतांचे मार्गदर्शन मिळाले होते, तरीही त्यांची चित्रें जरी गायतोंडे यांच्या प्रभाव वाटणारी असली तरी ती त्यांनी कोणाची केलेली नक्कल नव्हती. स्वतंत्र अंगाने जाणारी ती त्यांची शैली होती. त्यांच्या चित्रात प्रोग्रेसीव्ह ग्रुपच्या कलाकारांचा प्रभाव जाणवत नाही. हुसेन प्रमाणे त्यांच्या चित्रात भडक नाट्य नव्हते, गायतोंडेंची गूढता नव्हती, अकबर पदमसी यांच्या चित्रातील विरोधाभास नव्हता. तरीही त्यांची चित्रे रसिकांची नजर खिळवणारी होती. आणि त्यांच्या या कला वारशाचा मागोवा घेत आजचे एक तरुण क्युरेटर गौरमोनी दास यांनी त्यांची बहुतेक अशी प्रभावी चित्रे मिळवून त्याचे सिंहावलोकनी प्रदर्शन भायखळ्याच्या नाईन फिश आर्ट गॅलरीमध्ये ८ फेब्रुवारी २००२ मध्ये स्कुल ऑफ आर्टच्या माजी पदवीधरांनी सुरु केलेल्या DOT -LINE- SPACE या फोरमच्या सहयोगाने भरवीले. आणि त्याला तितकेच कलात्मक शीरषक दिले, “ The Progressive and The Personal- An Untitled Legacy”. प्रथम दर्शनी पहाता म्हात्रे यांची ही कला संपदा कला वारशाची एक समृद्ध परंपरा म्हणून पहावे लागेल. त्यांचा शांत स्वभाव, फारशी स्वतःची प्रसीद्धी न करणाऱ्या स्वभावामुळे त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर त्यांची फारशी ओळख कोणाला कदाचित नसेल. पण या प्रदर्शनाने ती होईल यात शंकाच नाही. त्यांच्या या चित्रातून जाणवले ते त्यांची सर्व चित्रे ही स्वतंत्रपणे साकारली असून त्यामागे एक विशिष्ट अशी मालीका अथवा कल्पना ठरवून ती केली नाहीत. त्यांना शीर्षके नाहीत. मागील चित्राचा पुढील चित्राशी संबंध असेलच असे नाही. यावर म्हात्रे म्हणतात, मला प्रत्येक कामात विविधता आवडते. बदल आवडतो. रुढीबध्द अन सर्वसाधारण अशी कामे मला आवडत नाहीत त्यात काही नावीन्य लागते. कोणी जर त्यांना चित्राचा अर्थ विचारला तर ते सांगत, तुम्ही चित्र पहात रहा. आपणच ते तुम्हांला सांगेल. पण गौरमणीला म्हात्रेंच्या कामाचे अंतःस्वरूप काय होणार याला महत्व नसून त्याच्या प्रवासाचे अंतीम स्वरूप त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते.
अश्या या कलासंपन्न कलावंतांशी माझा संबंध आला तो आर्टीस्ट सेंटर मुळे. सतीश नाईक या आमच्या मित्रामुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो. त्यावेळच्या जुन्या आठवणी आठवतात का म्हात्रे तुम्हांला? तेथील गरमागरम अश्या चालणाऱ्या चर्चा आणि वादविवाद. सतीशचा आक्रमकपणा व प्रफुल्ला डहाणूकर यांची सर्वाना सांभाळून घेण्याची वृत्ती. आणि यात म्हात्रेंची शांतपणे वावरण्याची प्रवृत्ती. नंतर सतीशच्या कल्पनेतून निघालेल्या पेण येथील 'चित्रकुटीर' या चित्रकारांच्या वसाहतीची योजना. लॉरी बेकर यांच्याकडून कलावंतांसाठी स्वस्तात अशी कलात्मक घरे उभारण्याची ही योजना होती. त्यासाठी मी स्वतः केरळ येथे जाऊन लॉरी बेकरना भेटूनही आलो होतो. त्यांनाही ही कल्पना आवडली होती. त्याच्या माझ्याच कार्यालयात भरणाऱ्या बैठका. त्यामध्ये जमणारे प्रफुल्ला डहाणूकर, मृगांक जोशी, माधव इमारते, दिलीप रानडे, मीनल परांजपे, सतीश नाईक, सुनील महाडीक, म्हात्रे, जॉन डग्लस, अरुण काळे अश्या अनेक सृजनशील कलाकारांच्या उपस्थितीत आपण रात्रीपर्यंत चर्चा करीत असू. एक खास बस करून आपण सर्वजण पेण येथे आपल्या जागेवर एक दिवसाची सहलही काढली होती. दुर्दैवाने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. कधी जहांगीर, कधी नॅशनल गॅलरी अश्या ठिकाणी आपल्या भेटी होतच असत. आणि त्यातून एक आठवते ती तुमची महत्वाची एक गोष्ट. ती म्हणजे तुम्हांला असलेली अंतर्ज्ञानाची शक्ती. एखाद्याची जन्म तारीख, त्याची रास एकदा का तुम्हाला समजली की ती व्यक्ती कितीही वर्षांनी भेटो, आपण पटकन ते सांगता. तसेच त्या आधारे त्याचे व्यक्तीमत्वही उलगडू शकता. एखाद्याच्या स्वभावाविषयी कोण बोलले की तुम्ही म्हणता, अरे त्याची रास अमकी आहे ना ? तो असे वागणारच !
असे हे आदरणीय व्यक्तीमत्व! आज वयाच्या नव्वदीत येऊनही त्यांची कला संपदा चालू आहे. पण त्यामागे पैसा व प्रतिष्ठा याचा लोभ मुळीच नसतो. ते काम करत असतात ते फक्त स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी! आणि आपण असेच कार्यरत रहाण्यासाठी म्हात्रेजी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना!
-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
( संदर्भ सौजन्य: जॉन डग्लस, चित्रे: नाईन फिश आर्ट गॅलरी )









Comments
Post a Comment