एक सज्जन, प्रेमळ, सच्चा कलोपासक पारशी : केकू गांधी.

 


माझ्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट च्या सहवासात जे.जे.च्या पुण्याईमुळे अनेक महापुरुष माझ्या संपर्कात आले. आणि त्यापैकी कांही तर माझ्या काळजाचा तुकडा बनून राहीले. अशीच एक प्रेमळ आणि मायेचा वर्षाव करणारी, आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने दुसऱ्यांची मनं जिंकणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, ती म्हणजे कलाक्षेत्रात ज्यांचे नांव अत्यंत आदरपूर्वक घेतले जाते ते कलोपासक केकू गांधी. मुळातच पारशी लोक हे प्रेमळ स्वभावाचे. त्यातही कलासक्त मनोवृत्तीचे असले की त्यांच्या आचार विचारातून, त्यांच्या वाणीतून तो खानदानीपणा आवर्जून दिसून येतो. अश्याच एका धनाढ्य पारशी कुटुंबात  कैखुश्रू मिनोचेअर गांधी यांचा जन्म  २१ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. लहानपणापासून तो केकू या नांवानेच ओळखू जाऊ लागला.  वडील मोठे कारखानदार होते. त्यांचा केमीकल मोल्डींगचा कारखाना होता. वांद्र्याला समुद्राच्या जवळ तोंड करून असलेला त्यांचा 'केकी मंझील' हा मोठा बंगला होता. लहानग्या केकूचे आयुष्य तेथे मोठ्या लाडाकोडात गेले. मुंबईतील शालेय शिक्षण झाल्यानंतर केकू १९३८ साली लंडनला पुढच्या शिक्षणासाठी केम्ब्रीज येथे पेमब्रोक काॅलेजमध्ये गेले. तेथें त्यांना राजकारणाची गोडी लागली. तेथील संस्थेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी शाखेचे ते सचीव बनले.तेथे ते राजकीय विषयावर भाषणे, वादविवाद करू लागले. त्यांना हे व्यासपीठ मदतीचे ठरले. १९३९ साली ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी म्हणून भारतात आले, पण त्याचवेळी दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटल्यामुळे केकू पुन्हां केम्ब्रीजला जाऊ शकले नाहीत. पुढच्या दोन वर्षात त्यांच्या वडीलानी केमीकल मोल्डींग फॅक्टरी सुरु केली त्यातून पेंटींगच्या फ्रेम्स बनविण्यात येऊ लागल्या. व केकूनी वडीलांना या उद्योगात मदत करण्यास सुरुवात केली, आणि केकू गांधी यांचे कला जगतातील व्यक्तींशी संबंध येणारे हे पहीले पाऊल ठरले.

केमीकल मोल्डींग या नांवावरून त्यांच्या फॅक्टरीला 'केमोल्ड' हे नांव देण्यात आले. आणि चित्रांना फ्रेम करून घेण्यासाठी येणाऱ्या कलाकारामुळे केकूचे कला क्षेत्रांतील चळवळीकडे मन जास्तीत जास्त आकर्षीत होऊ लागले. त्यातील घडामोडी त्यांना समजू लागल्या. आणि एक ख्यातनाम कलाकार व टाइम्स ऑफ इंडियाचे कला दिग्दर्शक वाॅल्टर लॅंगहॅमर हे आपल्या चित्रांना फ्रेम करून घेण्यास तेथे वारंवार येऊ लागले. तत्पूर्वी हे लॅंगहॅमर कोण होते हे आपणास जाणून घेणे आवश्यक आहे. ऑस्ट्रीया मधील व्हिएन्ना आर्ट अकादमी येथे लॅंगहॅमर हे प्राध्यापक होते. मुंबईच्या सीलू वकील त्यांच्या हाताखाली पेंटींग शिकत होत्या. लॅंगहॅमर यांचे पेंटींगवरील असामान्य प्रभुत्व पाहून सीलू त्यांना मुंबईला येण्यास विनंती करीत असे. व लॅंगहॅमर ती वारंवार धुडकावून लावीत. पण जेव्हां हिटलरचे ज्यू लोकांवरील अत्याचार वाढले तेव्हां मात्र ते घाबरून गेले, कारण त्यांची पत्नी ज्यू होती व त्यांनी सीलूच्या सांगण्याप्रमाणे तडक हिंदुस्थान गाठला. येथे येताच सीलू टाइम्सचे संपादक सर फ्रान्सीस लो यांच्याकडे गेली  व तिने लॅंगहॅमरची त्यांच्याशी ओळख करून दिली. लॅंगहॅमर यांचा पोर्टफोलिओ पाहताच तात्काळ त्याना कला दिग्दर्शक म्हणून लो यांनी त्याना  टाइम्स मध्ये घेतले. येथे येताच लॅंगहॅमर भारतातील रंग व प्रकाश याच्या प्रेमात पडले. 

 


याशिवाय आणखी दोन व्यक्ती अश्याच भारतात आल्या. त्यापैकी एक होती डॉ. इमॅन्यूएल स्लेसींजर व दुसरी रुडी व्हॉन लायडन. हे दोघेही जर्मन होते. रुडी हे मुंबईतील स्विस कंपनी वाॅलकाॅर्ट याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. चित्रे विकणे, त्यांना गिऱ्हाईके मिळवून देणे ही कामेही ते करीत असत. स्लेसींजर हे टाइम्स मध्ये कला समीक्षक म्हणून काम पहात होते. लॅंगहॅमर हे नेहमी केकू यांच्याकडे आपल्या पेंटींगसाठी फ्रेम करण्यास येत असल्याने केकू यांचे शॉप हे लवकरच प्रसिद्धीला आले. मुंबईच्या कला वर्तुळातील घडामोडींचा केकू यांच्यावर परीणाम होवून त्यांची कलेविषयी आवड वाढू लागली. आणि लॅंगहॅमर व केकू या दोघांनी मिळून आधुनीक भारतीय कलाकारांच्या प्रोग्रेसीव्ह ग्रुपच्या चित्रांना फ्रेमींग करण्याचे काम सुरु केले. या प्रोग्रेसीव्ह ग्रूपच्या मागे लॅंगहॅमर यांचेच प्रोत्साहन होते. त्यामध्ये आधुनीक पेंटर के.के.हेब्बर, आरा, शिवाक्स चावडा, एन.एस.बेंद्रे असे कांही आघाडीचे चित्रकार होते. केकू यांनी त्याकाळी बॉंबे आर्ट सोसायटीचे सभासदत्वही स्वीकारले. तेथे त्यांनी लॅंगहॅमर यांच्या पत्नी केथ यांच्या समवेत कांही प्रदर्शनांची मांडणी केली. आणि या त्यांच्या प्रयत्नामुळे सोसायटीनेही काही तरुण अश्या आधुनीक कलाकारांना त्यांची चित्रे आविष्कृत करण्याची संधी या व्यासपीठावरून दिली. येथून पुढे केकू गांधी भारत सरकारच्या देशव्यापी उपक्रमामध्ये सामील होऊन या सर्वानी 'ऑल इंडीया असोसिएशन फॉर द फाईन आर्टस्' ही संस्था स्थापन केली. आणि लवकरच यामध्ये मनू ठाकर, व्ही.आर.आंबेरकर, मुल्कराज आनंद, राम चटर्जी अशा कलाकार व बुद्धिमान व्यक्तींची निवड करण्यात आली. याद्वारे भारतीय कला वारसा याचे संरक्षण व संवर्धन करणे यासाठी अखील भारतीय कला परीषद भरवली. ज्यामध्ये मोठे राजकीय नेते व नामांकीत नागरीकांनी या परिषदेत भाग घेऊन हा कला वारसा जपण्याचे आवाहन केले.

लायडन यांनी चित्रकार आरा यांच्याशी केकू यांची ओळख करून दिली. आरा हे अत्यंत गरीब परिस्थितीमधून आले होते. लायडन यांनी आरा यांना बरीच वर्षे सहाय्य केले. तसेच लॅंगहॅमर यांच्या स्टुडिओत त्यांचा हेब्बरांशी परिचय झाला.  त्याकाळी स्कुल ऑफ आर्ट मधे आधुनीक चित्रशैली आणणाऱ्या जेरार्ड यांच्याशीही लॅंगहॅमर यांनीच केकूंचा परीचय करून दिला. वॅन हार्टवेल हे कलोपासक व पेंटिंगचे आश्रयदाते म्हणून प्रसिध्द असलेले युसिसचे ग्रंथपाल व त्यांच्या पत्नी हुसेनच्या व चावडा यांच्या चित्रांचे चाहते होते. अनेक चित्रे विकत घेऊन त्यांनी त्यांचा संग्रह केला होता. त्याकाळात हुसेन हे कोणीच नव्हते. १९४० साली केमोल्डच्या प्रदर्शनातून केवळ ३०० रुपयांना विकत घेतलेले हुसेनचे 'डॉल्स वेडींग' हे पेंटींग पुढे कांही वर्षांनी ३५,००० डॉलर्सना विकले गेले. केकूनी लॅंगहॅमर व लायडन या दोघा मित्रांच्या विचारसरणीमधून, त्यांच्याशी विचार मंथन करून अनेक चित्रकारांशी संपर्क साधला व आधुनीक कलेचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला. आरा, रझा हे सर्जनशील व उत्कृष्ट कला आविष्कृत करणारे होते. भारतीय समकालीन कलेचा अभ्यास त्यांनी केला. आरा, रझा, हेब्बर अश्या लोकांमध्ये ते वावरू लागले. स्वतः रोटेरीअन असल्यामुळे अनेक महत्वाच्या अन विशिष्ट दर्जाच्या लोकांशी केकू यांचा संबंध येत असे. आणि अश्या नावाजलेल्या कलाकारांच्या चित्रांना दर्जेदार फ्रेम्स करून त्यांची कला अधिकच खुलवणे त्यांचे काम झाले.

 


जेंव्हा चित्राला सुंदर अश्या फ्रेम मध्ये गुंतवले की ते ग्राहकाला अधीक उत्तेजीत करते हे केकूंच्या ध्यानी आले. त्याकाळात भारतीय कलेला विशेष मार्केट नसताना देखील केकूनी अनेक चित्रांना ग्राहक मिळवून दिले. आणि त्याचेच समाधान त्यांना मिळत असे. अनेक चित्रकार त्यांची पेंटींग्स केकूंच्या गॅलरीत ठेवून जात असत. रिझर्व्ह बॅंकेच्या मागील भागात 'हारून हाऊस' नावांची केकू यांची एक जागा होती. फ्रेमिंगसाठी आलेल्या चित्रांपैकी कांही चित्रे केकूनी तेथे  लावण्यास आरंभ केला. तसेच मेट्रो सिनेमा सुरु झाल्यावर त्यांना आढळले की तेथें अनेक रसीक जमा होत असतात. तेव्हां त्यानी तेथील पहील्या मजल्यावरील एका भिंतीचा कांही भाग घेऊन तेथेही चित्रे लावण्यास सुरुवात केली व त्याला 'मेट्रो कॉर्नर' असे नांव दिले. लोक जेव्हां चित्रपट पाहून बाहेर पडू लागत, तेव्हां त्यांच्या नजरेला ही पेंटींग्स पडत. तसेच ताजमहाल हॉटेलच्या पहील्या मजल्यावर त्यांची एक विंडो शोरूम होती. तेथेही केकूनी चित्रे लावण्यास सुरुवात केली. आतापर्यंत केकूनी चांगल्या प्रकारे चित्रांची विक्री केल्यामुळे आता त्यांना जागेची कमतरता जाणवू लागली. त्यांच्या वडीलांचे प्रिन्सेस स्ट्रीटवर एक गोडावून होते. त्याचेच रूपांतर त्यांनी 'केमोल्ड फ्रेमींग शॉप' मध्ये केले. प्रोग्रेसीव्ह ग्रुपने आपला पहीलाच यशस्वी सेल या केमोल्ड शॉप मधे केला. आणि मुंबईतील हे 'केमोल्ड शॉप' अनेक कलाकारांना त्यांच्या पेंटींगच्या प्रदर्शनाचे, विक्रीचे खास ठिकाण ठरले.

असेच एक दिवस डॉ. होमी भाभा हे दुपारचे जेवण आटोपून केकू यांच्या शॉप वर थडकले. त्यावेळी 'टाटा इंन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' ही संस्था स्थापीत करण्याचे काम ते करीत होते. वाॅल्टर लॅंगहॅमर व लायडन यांच्याकडून त्यांना केकूंच्या केमोल्ड बद्दल डाॅ. भाभाना बरेच ऐकायला मिळाले होते. टाटा घराण्याकडे अनेक मौल्यवान पेंटींग्सचा खजीना होता. त्यासाठी त्यांच्या फ्रेमिंगसाठी डॉ. भाभा स्वतः त्यांचे परीक्षण करण्यास आले होते. फ्रेमच्या बाबतीत डॉ. भाभा अत्यन्त चोखन्दळ, मार्मिक व बारकाईने पाहणारे होते. आणि केकूंच्या फ्रेमींगचे काम पाहून डॉ. भाभा देखील केमोल्डचे एक आश्रयदाते ठरले. आज डॉ. भाभा यांच्यामुळेच 'टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेकडे अमूल्य असा चित्र खजीना आहे. अश्याच प्रकारे केकू यांच्या जीवनात खुर्शीद या त्यांच्या पत्नी म्हणून आल्या. केकू त्या काळात भारतात अनेक चित्रकारांना एकत्र आणण्याच्या कामात मग्न होते. त्याकाळात दोघांचीही मित्र असलेली बाप्सी साबावाला ( जहांगीर साबावाला यांच्या भगीनी) यांच्यामार्फत त्यांचा  खुर्शीदशी परीचय झाला. बाप्सी हे एक आनंदी व चैतन्यदायी व्यक्तीमत्व होते. ती धर्मादाय असे बरेच थिएट्रिकल उपक्रम करीत असे. एकदा तिने टी-डान्स आयोजीत केला व त्याची तिकिटे विकण्यास खुर्शीदकडे सोपवली. मात्र खुर्शीदकडून एकही तिकीट विकले गेले नाही. तेव्हां बाप्सीने खुर्शीदला स्वतः डान्स करायला लावला व जोडीदार म्हणून केकूना घ्यायला लावले. त्याचं वेळी दोघांमध्ये प्रेमाची ज्योत पेटली. हळूहळू भेटीगांठी होवू लागल्या, जवळीक वाढत गेली व पुढे १९४४ साली त्याची परिणीती विवाहात झाली.

 


केकू अतिशय दृष्टे होते. भावी आयुष्याची स्वप्ने पहात होते. अनेक आघाडीच्या कलाकारांना त्यांची चित्रे रसिकांपुढे आणून  त्यांनी त्यांचा नावलौकिक वाढवला. त्यामध्ये हुसेन होते, तय्यब मेहता होते, राम कुमार, रझा, आरा, भूपेन खक्कर, नलीनी मालानी, क्रिशन खन्ना अश्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. हुसेन यांच्या १९५१ च्या पहील्याच यशस्वी प्रदर्शनानंतर केकू गांधीं मोठे उद्योगपती, कला संग्राहक व कला आश्रयदाते कावसजी जहांगीर, डॉ. होमी भाभांसारखे न्यूक्लिअर सायंटीस्ट, लॅंगहॅमर अश्या नामवंतांसोबत, जहांगीर आर्ट गॅलरी, कावसजी जहांगीर हॉल आणि पुढे नॅशनल गॅलरी ॲाफ माॅडर्न आर्ट यासारख्या संस्थांच्या स्थापनेत सहभागी होते. हुसेन यांच्या पहील्या प्रदर्शनाच्यावेळी ते खाली खिडकीतून पहात असताना त्यांना त्यांच्या पत्नीचे काका रस्त्यावरून जात असतांना दिसले. केकू लगबगीने त्यांच्याकडे गेले व त्यांचा हात पकडून त्यांना वरती प्रदर्शनांत आणले. बिचाऱ्या काकांना काय चालले आहे तेच कळेना. पण केकूना त्या प्रदर्शनात गर्दी हवी होती. आणि या यशस्वी प्रदर्शनानंतर केमोल्डच्या फ्रेमिंगची विक्री ही प्रतीवर्षी पाचशे पासून एकदम दोन हजार रुपयांपर्यंत गेली. यावेळी त्यांच्यासोबत लॅंगहॅमर, मुल्ला, लायडन हे लोकदेखील होते. शिवाय सर कावसजी जहांगीर देखील हजर होते. तेव्हां सर्वानीच जाणले की मुंबईतील कलाकारांना आता आपल्या कलाविष्कारासाठी एका चांगल्या गॅलरीची आवश्यकता आहे. सर्वानीच सर कावसजींना गळ घातली. कावसजी केवळ कलेचे आश्रयदातेच नव्हते, तर त्यांचे राजकीय लागेबांधेही खूप मोठे होते. आणि त्यांच्या कलाप्रिय धनाढ्य घराण्याला तशीच कलासक्त पार्श्वभूमीही होती. त्यांच्या पणजोबानी मुंबई विद्यापीठाचा हॉल बांधून दिला होता. पुढच्या पिढीने एल्फिन्स्टन कॉलेज दिले होते. कावसजी हॉल दिला होता. आणि १९५२ मध्ये सर कावसजींनी सुप्रसीध्द अशी 'जहांगीर आर्ट गॅलरी' सुरु केली. आणि त्याच गॅलरीच्या पहील्या मजल्यावर केकू गांधी यांना त्यांची गॅलरी सुरु करण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळी केकू यांना चित्रकार सुझा व चावडा यांनी केकूनी या गॅलरीच्या भानगडीत पडू नयें अशी सूचना केली. त्यामध्ये आर्थीक फायदा तर होणार नाहीच, शिवाय तू गुंतवलेले पैसेही मिळणार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले. उलट यामुळे तुझी फ्रेम कंपनीही बंद पडेल असेही त्यांनी सांगितले. पण केकू बॉंबे आर्ट सोसायटीमध्ये कार्यरत होते. विशेष म्हणजे या बॉंबे आर्ट सोसायटीचे ते १९४० साली पहीले भारतीय सचीव म्हणून नियुक्त केले होते. त्यामुळे त्यांनी अश्या गोष्टी अनुभवल्या होत्या. त्यांची पत्नी खुर्शीद हीने त्यांना गॅलरीसाठी पाठींबा दिला व गॅलरीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

१९६३ साली जहांगीर आर्ट गॅलरीच्या पहिल्या माळ्यावर स्वतःची पहीली आधुनीक चित्रकलेची 'गॅलरी केमोल्ड'  सुरु केल्यावर तेथे त्यांचा पहीला शो होता तो, 'कलमकारी पेंटींगच्या ब्लॉक-प्रिंटचा ट्रायबल आर्ट शो'. हळूहळू नावाजलेले कलाकार तेथे येत राहीले. तळमजल्यावरील 'कॅफे समोवार' हे चित्रकार, समीक्षक यांचे भेटीगांठीचे, चर्चा करण्याचे ठिकाण बनले. पैसा हा केकूना कधीच आकृष्ट करु शकला नाही. किंवा तो कसा खर्च  करावा याचे गणितही त्यांनी कधी मांडले नाही. आरंभीच्या काळात फ्रेम मेकींगच्या भरभराटीच्या उद्योगांमधून गॅलरीचा खर्च भागवीला जात असे. नंतर नावाजलेले कलावंत तेथे नेहमीच येऊ लागले. केकूना गॅलरी सुरु केल्यावर त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव झाली. एकीकडे त्यांच्या फ्रेमिंगच्या उद्योगासोबत आर्ट गॅलरी सुरु करून त्यांनी आपल्यासमोर तीन उद्दीष्टे ठेवली होती. त्यांच्या दृष्टया मनाला जाणवलेले त्यांचे कला भवितव्य होते ते म्हणजे भारतीय कलेच्या विविध कलाकृतींना एक व्यासपीठ देणे, मुंबई तसेच भारतातील इतर शहरात आधुनीक कलेला प्रोत्साहीत करणे, व भारतीय कलेला परदेशात नेणे, यासाठी त्यांना बॉंबे मॉडर्न आर्टची व आर्टसाठी अशी एक संस्था उभी करण्याचे स्वप्न होते.

 केकू व खुर्शीद यांची कन्या शिरीन ही देखील लहानपणापासून तेथे सतत येत असे. पुढें आपल्या आई-वडिलांच्या या व्यवसायाबद्दल तिला आकर्षण वाटू लागले. तिला या क्षेत्रात यावेसे वाटू लागले. पण केकू व  खुर्शीद या दोघांनीही तिला प्रथम कला-व्यवस्थापनेचे धडे घेण्यासाठी लंडनला मास्टर डिग्री घेण्यासाठी पाठवले. व १९८७ साली तेथून मास्टर डिग्री यशस्वीपणे घेऊन शिरीन भारतात परतली. आल्यावर ती अधिकृतपणे आपल्या आई-वडिलांच्या व्यवसायात सामील झाली.
तसे पाहीले तर १९७० च्या दशकापर्यंत भारतीय चित्रसंपदेला तसा भाव आला नव्हता. जागतीक स्तरावर देखील तशी फारशी दखल घेतली जायची नाही. पण १९७२ नंतर भारतीय चित्रव्यवसायाने जागतीक स्तरावर पोचण्यास आरंभ केला. त्यामध्ये कांही मोठी नांवे होती. कांही उच्चभ्रू उद्योगपतींनी, कला रसीकांनी तसेच आश्रयदात्यांनी मोठ्या प्रमाणावर चित्रे खरेदी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान पाश्यात देशातही अनेक कला संग्राहकानी आपले संग्रह वाढवीण्यास आरंभ केला. यात भारतीय समकालीन कलाकार आघाडीवर होते. आरंभाला कोणाकडेच इतके पैसे नसत की, ज्यातून ते चित्रे विकत घेतील. पण पुढे अर्थव्यवस्था मजबूत झाली. चित्रे ही एक गुंतवणूक ठरू लागली. पण केकूनी मात्र केवळ कलेच्या प्रेमापोटी  आपली गॅलरी वाढवली. अनेक चित्रकारांना नांव मिळवून दिले. त्यांना प्रकाशात आणले. पुढे १९८७ पासून परिस्थीती बदलू लागली. जागतीक पातळीवरील 'ख्रिस्तीज' या फाईन आर्टच्या लिलाव कंपनीने ताजमहल हॉटेल मध्ये आपला पहीला चित्रांचा लिलाव गांधी घराण्याबरोबर ठेवला. आणि त्यामध्ये प्रथमच हुसेन व रझा यांची चित्रे लाखांच्या वर किंमतीत विकली गेली. आणि १९८८ साली केमोल्डने आपला रौप्य महोत्सव साजरा केला.

पुढे केकू व खुर्शीद गांधी हे दोघेही या गॅलरीच्या व्यवसायातून निवृत्त झाले. गॅलरीचे काम मुलगी शिरीन पाहू लागली. व फ्रेमशॉपचे काम मुलगा आदील पाहू लागला. गांधी कुटुंबीयांचा हा गॅलरीचा कौटुंबीक उद्योग होता, त्यामुळे पुढे स्पर्धात्मक कलाजगतात त्यांना जुळवून घेता येईना. अनेक उद्योगपतीही या गॅलरीच्या क्षेत्रात उतरले. २००५ साली शिरीनला आपली ६०० चौरस फुटांची जागा गॅलरीसाठी  अपूरी वाटू लागली. म्हणून तिने योग्य अश्या जागेच्या शोधाचे प्रयत्न सुरु ठेवले. आणि तिला हवी तशी प्रशस्त, हवेशीर,भरपूर प्रकाश खेळणारी जागा फोर्ट मधील 'क्वीन्स मॅन्शन' मध्ये मिळाली. मुंबईच्या शांत अश्या भागात असलेली ही जागा तिसऱ्या मजल्यावर होती. आणि शिरीनने त्या जागेचे रूपांतर एका प्रशस्त अश्या गॅलरीत केले, जेथे ती आपल्या आयुष्यातील स्वप्ने आणखी भव्य स्वरूपात पाहू शकत होती. एका खासगी गॅलरीला ही अतीशय सुंदर अशी उंच सीलिंग असलेली जागा होती. आणि २००७ साली दक्षीण मुंबईत शिरीनने नवीन अशी 'केमोल्ड प्रेस्कोट रोड' या नवीन गॅलरीचे उदघाटन केले. शिरीनने जेंव्हा गॅलरी ताब्यात घेऊन तिचे नेतृत्व केले  ते गॅलरीच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरले. गॅलरीच्या व्यवसायात कालानुरूप होणाऱ्या बदलाचा तिने जाणीवपूर्वक विचार करून त्याला नवीन स्वरूप देण्यास प्रारंभ केला. शिरीनने आनेक आंतरराष्ट्रीय कला मेळे, आर्ट गॅलर्या यांना भेटी देण्यास सुरुवात केली. आणि याचा फायदा भारतीय कलाकारांना त्यांनी कला जागतीक स्तरावर नेण्यास मदत झाली. आणि 'केमोल्ड प्रेस्कोट रोड' गॅलरी ‘मुंबई आर्त डिस्ट्रीक्ट’ चे एक आकर्षण ठरले.

 


केकू गांधी हे नांव कला जगतात एक ध्रुव तारा म्हणून पाहीलं जातं. त्यांचा बोलका स्वभाव, त्यांची प्रेमळ नजर, आदर वाटावं असे संयमशील व्यक्तीमत्व या साऱ्याच गोष्टी त्यांच्याप्रती आदर निर्माण करणाऱ्या होत्या. कला क्षेत्रातील अनेक घडामोडींचा ते एक चालता बोलता कोष होते. आम्ही जेव्हां नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या बैठकीच्या निमित्ताने भेटत असू, त्यावेळी बैठक संपल्यावर कितीतरी वेळ आमचे इतर गोष्टीवर बोलणे होत असे. प्रोग्रेसीव्ह ग्रूपच्या आरंभापासूनचा काळ त्यांनी अनुभवला होता. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात ते आले होते. त्यांना प्रकाशात आणण्यास ते कारणीभूत होते. आणि त्यांच्याशी केवळ व्यावहारीक नव्हे, तर त्यांचे भावनीक नाते जुळले होते. सीलू वकील आणि लॅंगहॅमर यांच्यातील झालेले संभाषण त्यांच्याकडून ऐकताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर येतं असे. त्यांच्या वर्णनातून लॅंगहॅमरच्या ब्रशची ताकद समजून येत असे.आरा, रझा, हुसेन यांचे आरंभीचे जीवन आम्हांला ते जाणवून देत असत. मुंबईचा कला प्रवास यशस्वी करण्यास केकू गांधी यांचा मोठा वाटा आहे, यात शंकाच नाही. कोणालाही अडचण आली की थेट मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाण्याची त्यांची क्षमता होती. ते जेव्हां एन.जी.एम.ए.मध्ये येत तेंव्हा त्यांच्या सोबत एक प्रचण्ड ऊर्जा घेऊन येत असत. प्रसन्नता आणीत असत. आणि त्यांच्या  विनयशील स्वभावामुळे आम्हां सर्वाना एक वडीलधारी व्यक्तीप्रमाणे ते वाटत असत. सर जमशेटजी जीजीभाई यांचे पणतू रुस्तम जीजीभाई यांनी त्यांच्या पारशी बेनेटेलीन स्कुलच्या शताब्दी निमित्ताने दादाभाई नौरोजी रोडवरील त्या शाळेत हाय लंच ठेवला होता. व मी आणि शिल्पकार नारायण सोनावडेकर यांना त्यांनी आमंत्रीत केलें होते. त्यादिवशी केकू गांधी, साबावाला आदी सर्व लोक त्यांच्या पारंपारीक वेशभूषेत आले होते. पारशी पद्धतीच्या पारंपारीक भोजनाचा आस्वाद घेत, एक अभूतपूर्व असा सोहळा पाहीला आम्ही त्या दिवशी!

अश्या या प्रेमळ, पारदर्शीक कलोपासकाला, केकू गांधी यांना २००८ साली  त्याच्या कला सेवेच्या अतुलनीय कामगिरीबद्दल, त्यांच्या चित्रपरंपरेच्या योगदानाबद्दल भारत सरकारने 'पदमश्री' हा किताब देऊन गौरवीले. एका योग्य व्यक्तीला उचीत सन्मान प्राप्त झाला. हा कलाक्षेत्राचा एका अर्थाने सन्मान होता!  अश्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाने १० नोव्हेंबर २०१२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक होतकरू कलावंतांना प्रकाशात आणून. प्रचंड असे कर्तृत्व पाठीमागे ठेवून!

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष  













Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :