विचारवंत समीक्षक- सर्जनशील कलावंत : प्रा. संभाजी कदम.

 


संभाजी कदम सरांची पहीली भेट मला अजूनही आठवते. त्यापूर्वी जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील या शैलीदार आणि सर्जनशील कलाकारांची नांवेच फक्त ऐकून होतो. आणि त्याला कारणही तसेच घडले. माधवराव सातवळेकर त्यावेळी कलासंचालक म्हणून कार्यरत होते. एक जबरदस्त ताकदीचा वास्तववादी कलाकार आणि तेवढ्याच ताकदीचे प्रशासकीय काम पहाणारे कलासंचालक म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा कांही कामानिमित्त त्यांनी मला बोलावले होते. त्यांच्या केबिनमध्ये जाताच मला समोरच दिसले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भव्य असे लाईफ साईझ पेंटींग. त्या तैलरंगातील व्यक्तिचित्रात डॉ. आंबेडकरांचे पुरेपूर व्यक्तिमत्व व्यक्त होत होते.क्षणभर मी भान विसरून त्या पेंटींगचे निरीक्षण करु लागलो. त्या पेंटींग शेजारीच एक कोट, टाय वगेरे परीधान केलेली व काखेत एक चामड्याची बॅग धरलेली किरकोळ शरीरयष्टिची एक प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती चेहऱ्यावर निरागस हास्य आणून उभी होती. 'यांना ओळखता का?' मला सातवळेकरांनी विचारले. क्षणभर मी प्रश्नार्थक चेहरा करून उभा राहीलो. 'अहो! हे संभाजी कदम.' सातवळेकरनी त्या व्यक्तीचे नांव सांगताच आदराने माझी मान त्यांच्यापुढे झुकली. कारण संभाजी कदम हे नांव आम्ही बरेच ऐकून होतो. योग मात्र त्या दिवशी आला त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि त्यांचा परीचय होण्याचा!

संभाजी सोमाजी कदम यांचा जन्म हा आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड( जामसंडे) या गावी ५ नोव्हेंबर १९३२ साली  झाला. लहानपणीच वडीलांचे छत्र हरपल्याने अल्पवयातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. हातात चित्रकला असल्याने तीही पुढे वाढवायची इच्छा प्रकर्षाने होत असे. आणि म्हणूनच देवगड येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी तडक मुंबई गाठली व  १९५२ मध्ये  सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मधे उच्च कला शिक्षणासाठी प्रवेश घेतला. घरची परिस्थीती बेताचीच असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतच त्यांना कलासाधना करावी लागली. त्याच काळात कलाक्षेत्रात एक नवे वारे वाहू लागले होते. कांही चित्रकारांनी यथार्थ आणि रूढीबद्ध चित्रीकरणाच्या विरुद्ध बंड करण्याचा, कलेची संकल्पना. आशय, जाणीवा यांच्यातील नीतिमूल्ये बदलण्याचा मार्ग स्वीकारला. आणि त्यातून 'प्रोग्रेसीव्ह ग्रूप' आकाराला आला व त्यातून चित्रकारांची विभागणी झाली. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांमध्येही हे गट निर्माण झाले. ते आपापल्या गुरुजनांच्या कार्यप्रणाली प्रमाणे विभागले गेले होते. अश्या त्या काळात संभाजी कदमांनी 'पोर्ट्रेट' या कला विषयात प्रावीण्य मिळवले. आर्ट स्कुलमध्ये त्या काळी बाबुराव सडवेलकर, तय्यब मेहता, रवींद्र मेस्त्री यांच्यासारखे मातब्बर विद्यार्थी होते. त्यांना लाभलेले शंकर पळशीकर, भोंसुले, वसंत परब असे निष्णात गुरुजनही तितक्याच ताकदीचे होते.  कदमाना त्यांच्यातील विलक्षण कलागुणांमुळे विद्यार्थी दशेत असतांनाच 'डॉली करसेटजी' हे मानाचे पारितोषिक प्राप्त झाले. 

 


विद्यार्थी दशेतच कदमांनी आत्मसात केलेले कौशल्य जाणून त्यावेळचे जे.जे.मधील एक जेष्ठ कला अध्यापक प्रा. शिरगांवकर यांनी त्यांना जे.जे.मध्ये अध्यापकांच्या जागेसाठी मुद्दाम पाचारण केले. तोपर्यंत कदमांनी व्यक्तिचित्रणामध्ये असामान्य प्रभुत्व मिळवले होते. त्यावेळी इतरत्र मिळत असणारी भरपूर पगाराची नोकरी डावलून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारण कलावंताचे मृदू मुलायम हृदय असलेल्या कदमांचा पिंडच मुळी शिक्षकाचा होता. त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद त्यांनी त्यावेळी घेतले, तेव्हां मातोश्रीनीही त्यांना सांगीतले की, 'केवळ पैशांपेक्षा जेथे तुझ्या कलेचे-गुणांचे चीज होईल त्याच ठिकाणी तू जा!' त्या मातेने  त्यांच्या वडीलांच्या पश्च्यात अपार काबाडकष्ट करून त्यांचे जीवन घडवले होते. आणि संभाजी कदम हे जे.जे.च्या अध्यापकांच्या भूमिकेत शिरले.

जे.जे.मध्ये कदम सर सुरुवातीपासूनच एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून गाजले. विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्या मनांत नेहमीच आपुलकी असे. ते कधीही  शिक्षक-विद्यार्थी हे अंतर ते कुणालाही दाखवून देत नसत. चेहऱ्यावर हास्य धारण केलेला त्यांचा मृदुभाषी स्वभाव एखाद्याला आपलासा करण्यास पुरे होई. 'शिक्षक' हा त्यांचं केवळ पेशा नव्हता. तर ती त्यांची तळमळ होती. कलेच्या विद्यार्थ्यांचा चहुबाजूने विकास व्हावा या हेतूने त्यांना केवळ हस्त कौश्यल शिकवून चालणार नाही, तर त्यासाठी त्यांना कलेचे मर्म कळायला हवे, त्यांना सौंदर्य दृष्टी यायला हवी, ह्या गोष्टी त्यांनी जाणल्या होत्या. कदमांना स्वतःलाही चित्रकलेसोबतच साहीत्य, संगीत, काव्य आदी ललित कलांची आवड होती. आपल्या जीवनाला व्यापून टाकणाऱ्या इतिहास, तत्वज्ञान, मानसशास्त्र, यासारख्या ज्ञान वाढवणाऱ्या विषयांची गोडी त्यांना होती. आणि ती जोपासून त्यांनी वाढीला लावली. त्यांचा सखोल अभ्यास सुरु केला. त्यांच्याकडून पेंटींग सोबतच काव्यही साकारत होते, साहीत्यही घडत होते. आणि संगीताचे सूरही निनादत होते. त्यासाठी ते हॉर्मोनियम शिकले. एक उत्कृष्ट हार्मोनीयम वादक ठरले. कलाकृतीचा आस्वाद घेता यावा, म्हणून सौंदर्य शास्त्राचा अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटू लागले. प्रथम दृश्यकलेच्या अंगाने त्यानी सौंदर्य शास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर इतर कलांच्याही अंगाने तो विस्तारीत नेला. चित्रकलेसोबतच संगीतशास्त्र, साहित्यशास्त्र या क्षेत्रातही त्यांचा सखोल अभ्यास झाला. सौंदर्यशास्त्र त्यांच्या आवडीचा विषय बनला. कलाशिक्षक म्हणून जरी कदम कार्यरत होते, तरी विद्यार्थ्यांसोबत ते सतत आपला अभ्यास वाढवीत राहीले.

 


संभाजी कदमांनी व्यक्तीचित्रणामध्ये स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. व्यक्तीचित्र म्हणजे केवळ त्या व्यक्तीची ओळख दाखवणारे चित्र नसून त्या व्यक्तीच्या अंतरंगाला अधोरेखीत करणारे चित्रण होय, ही व्यक्तीचित्रणाची व्याख्या त्यांनी रुजवीली. व्यक्तीचे केवळ हुबेहूब चित्रण न करता तिच्या अंतरंगासह, त्यातील व्यक्तिमत्वाचा आशयही ते आविष्कृत करीत असत. त्यांची पोर्ट्रेट्स ही माणसाच्या छायाचित्रासारखी प्रतीकृती नसून त्यात चित्रकाराची दृष्टी व भावना यांचा परीपाक असतो. त्यांच्या पोर्ट्रेटमधील व्यक्तीच्या अंगावरील वस्त्रे रंगविणे ही तर त्यांची खासीयत होती. ज्या साहित्याने ते वस्त्र विणले आहे, त्याचा पोतही कदम सर आपल्या कुंचल्यातून साकारीत असत. आणि त्यांचे रंगलेपन हे त्यांनी कधीच कंजुशीपणाने केले नाही. मुक्तपणे रंगांची उधळण आपल्या ब्रशच्या जोरकस फटकाऱ्याने ते करीत असत. कदम सर साहीत्यात देखील तेवढेच नांव कमावून होते. त्याचे वाचन अफाट होते. स्कूल ऑफ आर्टच्या आवारात त्यांच्या हातात बरीच पुस्तके दिसत. मग ती पेंटिंगची असोत, वा मराठी साहित्याची. मराठीतील एक नामांकीत टीकाकार म्हणून कदम ओळखले जात. १९६० च्या दरम्यान त्यांनी 'मौज' या दर्जेदार आणि विशीष्ट वाचकवर्ग असलेल्या नियतकालिकातून 'विरुपाक्ष' या टोपणनावाने समीक्षा लिहीण्यास सुरुवात केली. कोणत्याही कलामाध्यमातील समीक्षा ते अतीशय तौलनीक आणि सर्जनशीलतेला धरून लिहीत असत. पुढे त्यांनी 'सत्यकथा' या मासिकातून स्वतःच्या नावाने समीक्षा लिहिण्यास सुरुवात केली. संगीतातील सौंदर्यशास्त्र या विषयावरही त्यांनी लेखन केले आहे.  'दै. नवशक्ती' मधून त्यांनी कलाविषयक सदर चालवीले. जे.जे. च्या 'रूपभेद' या वार्षीक प्रकाशनामध्ये कदम सरांनी सौंदर्यशास्त्रावर अनेक लेख लिहीले आहेत. जे.जे.मधील दिवसात कदम सरानी चिं. त्र्यं. खानोलकर लिखित 'आरसा बोलतो' हे एकपात्री नाटक दिग्दर्शीत केले. यात प्रथमच तेथील विद्यार्थी अमोल पालेकर यांचे नाट्यगुण ओळखून त्यांनी त्याला प्रमुख भूमिका दिली होती. जे. जे. मध्ये कदम यांचा वावर होताच, तसेच मौजेच्या कार्यालयातही विचारवंतांच्या घोळक्यात ते दिसत. तर कधी चित्रकार कवींच्या मेळाव्यात.तर कधी संगीत मैफलीत दंग असतील. स्वस्थ असलेले कधी दिसलेच नाहीत.

 


स्कूल ऑफ आर्ट मधील टीचर्स रूम ही त्याकाळात प्रा. प्रल्हाद धोंड यांनी आपल्या विनोदी वाक्चातुर्याने व अवर्णनीय  अशा त्यांच्या स्मरणातील आठवणींच्या पोतडीतील घटनांनी खूप गाजली होती. त्याला धोंड सर 'धुरांडे' म्हणत. त्या गप्पा ऐकायला बाहेरील नामांकीत व्यक्तीही येत असत.  त्यामध्ये सत्यकथेचे राम पटवर्धन असत, कादंबरीकार श्री.ना.पेंडसे असत, नाना पळशीकर, चंद्रकांत मांडरे हे अभीनेते असत. तर कधी अशोक रानडे, चिं. त्र्यं. खानोलकर अशा विविध प्रकारच्या व्यक्तीही मजा लुटण्यास येत असत.  बऱ्याच वेळा कदम सरांचे लग्न हा विषयही त्यात असायचा. बैठकीत बसलेले राम पटवर्धन अथवा चिं. त्र्यं. खानोलकर धोंडांना हा विषय हाती घेण्यास सांगत असे. तेव्हां धोंड सर म्हणत, 'अनुरूप अशी वधू निवडून एक महीन्याला पुरेल असे तांदूळ, कांदे- बटाटे, पीठ, मीठमिरची वगैरे सामानासकट तिला व कदमला एका खोलीत कोंडून ठेवा आणि बघा परीणाम!' त्यावर बाबुराव साडवेलकर उत्तर द्यायचे, 'मुलगी सौंदर्य शास्त्र बडबडत बाहेर पडेल किंवा ताना मारीत सुटेल.’ पण कदम सरांच्या कामाची ताकद सर्वाना माहीत होती. आणि त्यांच्याबद्दल नेहमीच सर्वाना आदर होता. एकदा प्रा. विश्वनाथ सोलापूरकर यांनी या रोजच्या गप्पा पुस्तक रूपाने याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. सर्वानीच ती उचलून धरली. पण कदमांनी तिचा पाठपुरावा सुरु केला. धोंड सरांना हे सर्व लिहीणे अश्यक्य होते. पण कदम सरांनी सांगितले की तुम्ही मला तुमच्या आठवणी सांगत चला, व मी त्या माझ्या पद्धतीने लिहीत जाईन. आणि हे ठरले. धोंडांनी आठवणी सांगणे व कदम सरांनी त्या लिहीणे असा हा कार्यक्रम असे. कित्येकदा पुनरावृत्ती होत असे. मग कदम सरांना तो मजकूर गाळून त्याचे संपादन करावे लागे. लिहिण्यात सुसूत्रता यावी यासाठी त्याचे परत परत वाचन करून नीट मांडणी करावी लागे. आणि याचा परीपाक म्हणजे त्यातून एक सुंदरसे 'रापण' नावाचे पुस्तक निर्माण झाले. व अल्पावधीतच त्याने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्याच्या आवृत्त्याही निघाल्या. या पुस्तकाचे श्रेय जितके प्रा. धोंडांना आहे तितकेच त्या आठवणींना आपल्या शब्दांत बांधून वाचकांपुढे आणणाऱ्या प्रा. संभाजी कदमांचेही आहे असे म्हणावे लागेल.

 


अश्या या कदम सरांना ऐन उमेदीच्या काळात क्षयासारख्या रोगाने ग्रासले. एखाद्या  कलावंताच्या वाट्याला असे दिवस यावेत यापेक्षा दुर्दैवी घटना कोणती असेल? दोन महीने त्यांच्या आजाराचं निदानच झाले नव्हते. पण जेव्हां क्षयाची बाधा आहे हे कळले तेव्हां, अश्या रोगावर लागणारी औषधे यांचा खर्च प्रचंड असतो याची जाणीव झाली. पण ते इस्पीतळात असताना   त्यांच्या शेजारीच असलेला रुग्ण एक सरकारी कर्मचारी होता. त्याने अश्या रोगावर सरकारकडून सर्व सवलती व भरपाई मिळते याचे नियम सांगीतले. साध्या सरळमार्गी कदमांना याची काहीच माहीती नव्हती. कदमांनी हे सर्व प्रा. धोंडांना सांगीतले आणि धोंडांनी सर्व केस लगेचच सरकारपुढे मांडली. सरकारनेही विनाविलंब त्यांना सर्व सवलती दिल्या. या त्यांच्या आजारपणात या रोगावरचे निष्णात तज्ञ् डॉ. माधवराव देशमुख यांनी त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करून एखाद्या धन्वंतरी प्रमाणे कदमांना बरे केले. अगदी रोगाचे  समूळ उच्चाटन करून डॉ. देशमुखांनी कदम सरांना घरी पाठवले. ते त्यांचे ऋण पैशाने फेडणे कांही कदमांना शक्य नव्हते. पण मृत्यूवर मात करणाऱ्या या वीर धन्वंतरीचे- डॉ. देशमुखांचे पोर्टे्ट  त्यांनी इतक्या भावुकपणे रंगवले आहे की त्यांचे न फिटणारे ऋण अंशतः फेडण्याचा प्रयत्न केला.

कदम सरांनी आपल्या सौंदर्यशास्र विषयात खास रूची घेतली होती. जे.जे.मध्ये तर तो विषय ते शिकवीत असतंच, शिवाय मुंबई विद्यापीठात एम.ए. च्या विद्यार्थ्याना हा विषय शिकविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यांचे व्याख्यान असो वा पोर्ट्रेटचे प्रात्यक्षीक, विद्यार्थी त्यामध्ये मोठ्या आवडीने रस घेत, पण एवढे असूनही कदमांनी आपली शैली, आपले विचार अथवा मतप्रणाली कोणावरही लादली नाही. शिक्षक म्हणून कदम सरांचे कार्य सुरूच होते. पळशीकर निवृत्त झाल्यावर लोकसेवा आयोगाने त्यांची जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या अधिष्ठाता पदावर नियुक्ती केली. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्यातीलच एकजण आल्यासारखे वाटले. स्कूल ॲाफ आर्टच्या वैभवशाली काळांत तेथे ए.ए. भोंसुले, शंकर पळशीकर या मातब्बर व्यक्तीचित्रणकारानी स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या सोबत कदमांचेही नांव घेण्यात येऊ लागले. अनेक दर्जेदार व्यक्तीचित्रे त्यांनी रंगवली. ते म्हणत त्याप्रमाणे व्यक्तिचित्रण केवळ व्यक्तीची ओळख पटेल असे चित्रण करणे नव्हे, तर त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व, तीचे अंतरंग, तिचे अंतर्बाह्य रूप, चित्राचा आशय, रंग, रेषा, आकार अन अवकाश यांच्या संयोगातून झालेली निर्मिती असते. आणि स्वतः कदम त्या कसोटीला पुरेपूर उतरले होते. मुळातच कदम घडत गेलें ते त्रिंदाद, लॅंगहॅमर, ए.ए.भोंसुले, सातवळेकर अश्या विशिष्ट शैलीच्या बुजुर्ग कलाकारांच्या परंपरेतून. शिवाय पाश्च्यात कलावंतांपैकी व्हिसलर, सार्जंट हे त्यांनी गुरुस्थानी मानले होते. चित्र करतानाही ते एका दमात पूर्ण करत. पॅलेटवर रंग घेताना, व त्यांचे लेपन करतांना त्यात कधी कंजुषी नसे. 'रंग कसा लोण्याऽऽऽसारखा मुलायम हवा!’ हे त्यांचे हुकुमी वाक्य होते. व तसा रंग करून त्याचा मुलायमपणा ते रंगलेपनात आणत असत. त्यांचा ब्रश कधी हळुवारपणे तर कधी विलक्षण ताकदीने कॅनव्हासवर फटकारे मारीत असे.

 


१९७६ साली कदम सरानी अधिष्ठातापद  स्वीकारले. त्याच काळात जे.जे.मध्ये विद्यार्थी- शिक्षक असा संप घडून आला. कदम सरांना जी तत्वे पटत होती त्याबाजूने ते ठामपणे उभे राहीले. पण पुढे त्यांनी या संस्थेतील होत असलेल्या राजकारणामुळे व्यथीत होऊन त्यांच्यातील सद्सदबुद्धीने विचार केला की जिथे काम करायला जे वातावरण लागते, तेच नष्ट झाल्यामुळे केवळ तडजोड करून येथे रहाणे मनाला पटत नाही. आणि जेथे प्रत्येक व्यक्ती निवृत्ती घेण्यासाठी आपल्या नोकरीची संपूर्ण कारकीर्द पूर्ण व्हायची वाट पहातात, त्याच जागी कदम सरांनी आपल्या नोकरीतील तब्बल तेरा वर्षे शिल्लक असतानाही १९७७ सालामध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली. आणि तीही त्यांची आर्थीक स्थिती फारशी चांगली नसताना. माणसाला शरीर जगविण्यासाठी खाद्य लागते, तसे मन जगवण्यासाठीही खाद्य लागते असे ते सतत म्हणायचे. अन यासाठीच माणूस हा सर्व प्राणिमात्रांमध्ये श्रेष्ठ आहे. व त्यामुळेच तो आपल्या अनुभवांचं एक वेगळं विश्व साकारू शकतो, ही कदम सरांची विचार धारणा होती. आणि त्यादिवशी संध्याकाळी जे.जे.मधील शेवटचा दिवस आटोपून ते घरी मोकळ्या मनाने, शांत चित्ताने घरी म्हणजे डीन बंगल्यावर यायला निघाले. आणि याच वेळी त्यांच्या जीवनातील एका दुसऱ्या पर्वाची सुरुवात होणार होती

 


जे.जे.च्या अंतीम वर्षाच्या परीक्षा आटोपून सर्व विद्यार्थी आपापले लाॅकर खाली करून त्यातील सामान घेऊन घरी परतले होते. याच वेळी आवारात एक देखणी, गौरवर्णी विद्यार्थिनी आपल्या जवळ बरेच चित्रकलेचे साहीत्य घेऊन उभी होती. तिला लांब बदलापूरला जायचे होते. आणि साहीत्य बरेच होते. ते नेता येणे शक्य नव्हते. ते कोठे ठेवावे हेही समजत नव्हते.  आणि अचानक घरी निघालेले कदम सर तेथे थांबले. पहातात तो ती त्यांची विद्यार्थीनी- ज्योस्त्ना जोशी होती. आणि तिची अडचण ओळखून सरांनी सर्व साहीत्य तिला आपल्या घरी आणून ठेवण्यास सांगीतले. आणि पुढे या भेटीगाठी वाढत गेल्या. गुरु शिष्याच्या नात्याने प्रेमाचे रज्जू बांधण्यास सुरुवात केली. नंतर ज्योस्त्नाताई ह्या नेहमी सरांच्या सोबत दिसू लागल्या. दरम्यानच्या काळात मी व आमचे अधिष्ठाता प्रा. हरीभाऊ हणमंते दोघेही नागपूर येथे चित्रकला महाविद्यालय येथे बदलीवर गेलो. तेथील विद्यापीठाच्या परीक्षांना कित्येकदा मुंबईहून जे.जे.च्या प्राध्यापकांना परीक्षक म्हणून बोलावीत असत. त्यांची राहण्याची व्यवस्था तेथील आमदार निवासात करण्यात येत असे. आम्हीही नागपूरमधील वास्तव्यात तेथेच रहात असू.  कदम सरही बऱ्याच वेळा तेथे येत. १९८२ साली आम्ही त्यांना पोर्ट्रेटसाठी परीक्षक म्हणून बोलावले होते. आणि परीक्षेच्या आदल्याच दिवशी कदमांचा हणमंते सरांना फ़ोन आला. आणि त्यांनी सांगीतले, मी आणि ज्योस्त्ना यांनी आज सकाळी रजीस्टर विवाह केला आहे. व दुपारी विमानाने आम्ही दोघे नागपूर येथे येत आहोत. तरी आम्हां दोघांसाठी तेथील आमदार निवासात रहाण्यासाठी व्यवस्था करावी. अर्थात त्यांच्या नावावर ती केलीच होती. आणि दुपारी नव दाम्पत्य नागपूर मध्ये दाखल झाले. कॉलेज मध्ये हे कोणालाच माहीत नव्हते. तेथे कदम सरांचे पूर्वीचे विद्यार्थी धनंजय वर्मा, काशीनाथ साळवे, अरुण मेंदुळे आदी लोक होतेच. कदम सर कधी आले तर त्या सर्वांचे चेहेरे आनंदाने फुलायचे. त्या सर्वानाच हा एक सुखद असा धक्का होता. आणि ज्योस्त्नाताई आमच्या सर्वांशी मिसळून गेल्या. कदम सर त्यांना कधी नावाने हाक मारीत नसत. अहो बाई, असाच त्यांचा आदरार्थी उल्लेख करीत. नेहमीच ते त्यांच्याशी आदराने संबोधीत. त्यांच्या  तब्येतीची अतीशय काळजी घेत असत.  कदम सरांशी गप्पा मारण्यात आम्हांला खूप मजा येत असे. आणि त्यांच्याकडे आणखी एक कला होती. ती म्हणजे भविष्यविद्या. हात, पत्रीका पाहून ते भविष्य सांगत असत. आणि ते तंतोतंत खरे होत असे. मीही याचा अनुभव घेतला आहे.

 


पुढे मी पुन्हा मुंबईला जे.जे.मध्ये बदली होऊन आलो. त्या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या उच्च कला शिक्षक संघटनेतर्फे सोलापूर येथे भरलेल्या कार्यशाळेसाठी गेलो होतो. सोबत आमचे अधिष्ठाता किसन कामत, वसंत सोनवणी, प्रभाकर कोलते, काशीनाथ साळवे, दिवाकर डेंगळे असे सर्व शिक्षक कलावंत होते. आणि या कार्यशाळेत प्रात्यक्षिकासाठी संभाजी कदम सरांना आमंत्रीत केले होते. मला स्वतःला त्यांना काम करताना कधी पाहण्याचा योग आला नव्हता. कदम सरांचे प्रात्यक्षीक अगदी सुरुवातीपासून पहाण्याची दुर्मीळ संधी आज उपलब्ध होणार, ती पर्वणी लाभणार ह्या आनंदात मी होतो. दुपारची जेवणे झाली. आम्ही जरा आडवे झालो होतो. तेच कदम सर फिरत फिरत आमच्या खोलीत आले, व मला उठवून म्हणाले, 'राजाध्यक्ष चला, माझे मॉडेल मला मिळाले!' आणि त्यानंतर मलाच मॉडेल म्हणून बसवून त्यांनी पोर्ट्रेटचे प्रात्यक्षीक दाखविले. मला कांही ते काम करताना पहाता आले नाही, पण कदम सरांच्या अजरामर कुंचल्यातून माझें व्यक्तीचित्रण निर्माण झाले हे तर परम भाग्याचे होते!

मी जेव्हां अधिष्ठाता पदावर नियुक्त झालो तेव्हां मुद्दाम माझ्याकडे येऊन त्यांनी मला आशीर्वाद दिलें होते. तसेच माझ्या डीन बंगल्यावर देखील ते सतत येत असत. नेहमी पती-पत्नी जोडीने येत असत. आले की सोबत एक प्रसन्नता आणीत असत. एकदा ज्योस्त्नाताईनी त्यांच्या पॅथाॅलाॅजीस्टचे केलेले तैलरंगातील सुमारे सहा फूट उंचीचे लाईफ साईझ पेंटींग घेऊन ते दोघेही माझ्याकडे आले. पिवळ्या साडीतील ते व्यक्तिचित्रण इतके सुंदररीत्या आविष्कृत केले होते, की त्यावरील नजर ढळत नव्हती. सर मला म्हणाले कांही दिवस हे पेंटींग तुमच्याकडे राहूदे. आणि आमच्या त्या प्रशस्त हॉलच्या दोन काचेच्या दरवाज्याच्या मधील जागेत ते पेंटींग इतके चपखल बसले की जणू त्या जागेचा विचार करूनच ते बनवले असावे. नंतर प्रत्येक वेळी ते दोघे आले की कांही वेळ त्या पेंटींगकडे नजर लावून पहात व त्यानंतर आमच्या गप्पा सुरू होत. ज्योस्त्नाताईनी कदम सरांची ड्रेपरी करण्याची हातोटी हुबेहूब साकारली होती. एक दिवस कदम सर मला म्हणाले, जरा या पेंटिंगवर वरून लाईट आला तर खूप छान दिसेल. दुसऱ्याच दिवशी लोहार स्ट्रीटवर जाऊन मी एक पेंटींग लाईट आणला. पी.डब्ल्यू.डी. चे वायरमन बोलावून त्यांच्याकडून तो पेंटिंगवर बसवून घेतला. आणि खरोखरीच सर म्हणाले तसे त्या चित्रांचे तेज उजळून निघाले. आणि त्यांनी जेव्हां पुढच्या वेळी आल्यावर हे पाहीले तेव्हां ते म्हणाले, आता तुम्ही बाईंच्या चित्राला न्याय दिलात. त्या वर्षीच्या महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणून ते पेंटींग छापण्यात आले.  कार्यालयात मी कधी काम करीत बसलो की सोबत टेपवर सौम्य आवाजात एखादे संगीत लावून बसत असे. अश्याच एका वेळी सर आले, व ते म्हणाले, राजाध्यक्ष तुमचे मन कलाकाराचे आहे, म्हणूनच ही संस्था तुम्ही चांगली वाढवता आहात. संगीताशिवाय चित्रकला होऊ शकतच नाही. आणि माणसाने मनात कॉम्प्लेक्स कधीच ठेवू नये. तो माणूस तेथेच संपला. कांही वर्षानी जोस्त्नाताईनीही हेच मला सांगीतले.  सरांच्या प्रेरणेने ज्योस्त्नाताईनीही खूप चित्रनिर्मिती केली. निरनिराळ्या विषयावर मालीका आविष्कृत केल्या. स्वतःची शैली आणि ओळख निर्माण केली. स्वत:ची प्रदर्शने भरवली. कदम सरांची सावली म्हणूनच त्या सदा वावरल्या

 


संभाजी कदम सरांनी आपली चित्र प्रदर्शने भरवली. ती गॅलरी ओयासिस,मुंबई, चामराजेंद्र अकॅडमी ऑफ व्हिजुअल आर्टस्, म्हैसूर, चेतना आर्ट गॅलरी मुंबई, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, अश्या ठिकाणी त्यांनी भरविली. त्याशिवाय मुंबई, कोल्हापूर, नागपूर, जयपूर, गोवा, पुणे, सोलापूर, म्हैसूर, अश्या ठिकाणच्या विवीध संस्थांमध्ये त्यांनी प्रात्यक्षीके दिली आहेत. १९९७ साली दिल्लीच्या आयफॅक्स या कलासंस्थेने सरांना 'व्हेटरन आर्टिस्ट' हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवीले होते. चित्रकलेसोबतच कवी, वादक, साहित्यीक. संगीत समीक्षक, कला समीक्षक अशा भूमीकेतून त्यानी अफाट लेखन केले आहे. १९६५ पासून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या विश्वकोषासाठी कदम यांनी लेखन व कला संपादनाचे महत्वपूर्ण कार्य केले. अनेक कलासंस्था, कला संग्रहालय या ठिकाणी त्यांची व्यक्तिचित्राने संग्रहीत आहेत. त्यांनी केलेली शंकर पळशीकर ( हे चित्र दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ॲाफ माॅडर्न आर्टच्या संग्रहात आहे), डॉ. एम.डी. देशमुख, मंगेश पाडगांवकर अश्यांची व्यक्तिचित्रणे त्यांच्या कलेची साक्ष देतात. जे. जे.सोडल्यानंतर कांही ठरावीक दिवस सोडलं तर कदम सर बहुदा घरीच असत. तेव्हां त्यांचे लिखाण, पेंटींग, हॉर्मोनियमचा रियाझ अगदी मनसोक्तपणे चालू असायचा. मग मधेच मूड आला की कधी गाण्याची तान असायची, कधी कागदावर कविता उतरायची. यातूनच त्यांचा 'पळसबन' हा कविता संग्रह प्रसीद्ध झाला. बंगला सोडतांना त्यांनी आपल्या कांही जवळच्या मित्रमंडळींना आमंत्रीत करुन हार्मोनियम वादनाचा एक कार्यक्रम घरी ठेवला होता. एक अविस्मरणीय असा कार्यक्रम त्या दिवशी झाला. नंतर ते ठाण्याला आपल्या घरी रहायला गेले.

कदम सरांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मान सन्मान मिळवले. राज्य पुरस्कारही त्यांना मिळाला. आपल्या कला प्रवासात त्यांनी अनेक चढ उतार पाहीले. चित्रकार ते समीक्षक, टीकाकार, विचारवंत अश्या विविध भूमिका कदम सर जगले. त्यांच्या अफाट वाचनातून त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी विचार  प्रसारणासाठी केला. हार्मोनियम वादनाचे एकल प्रयोग सादर केले. आपल्या चित्रकलेला त्यांनी नेहमीच संगीत आणि काव्याची जोड दिली. आत्मस्वाभिमान हा आपला धर्म समजून त्याच्याशी कधीही तडजोड त्यांनी केली नाही. की कोणाला कधी दुखावले नाही. संसाररथ चालवणारी जोडीदार भेटली तीही त्यांना समजून घेणारी, त्यांची सुख दुःखे वाटून घेणारी आणि त्यांच्या जीवनात वसंत फुलवणारी कलासक्त मनाची. वयाचे अंतर तेथे कधी उरलेच नाही. आणि त्यांच्या संसारवेलीवर आलेले फुल म्हणजे त्यांचा मुलगा शार्दूल. त्याच्यावरही संस्कार झाले ते कला संस्कृतीचे. साध्या जीवन रहाणीचे. संभाजी कदम सर आणि त्यांची पत्नी जोस्त्ना सतत जोडीनेच सर्वत्र जात असत. सरांना अनेकठिकाणी व्याख्यानासाठी आमंत्रणे येत. फोर्ट भागात ते कधीही आले की जोडप्याने आमच्या घरी थोडा वेळ काढून आल्याशिवाय रहात नसत. आणि या ज्ञानी, व्यासंगी आणि कलासक्त माणसाशी गप्पा मारण्यात जो आनंद येई तो केवळ अवर्णनीय असे. अश्या आनंदी आणि तृप्त अश्या कुटुंबाच्या जीवनात अचानक तो दिवस आला. १५ मे १९९८! त्यादिवशी कदम कुटुंबाच्या जीवनातील पॅलेटवरील रंग अचानकपणे दैवाने पुसून टाकले. संभाजी कदमसरांना नियतीने अनपेक्षीतपणे आमच्यातून हिरावून घेतले. कॅनव्हास कोराच राहीला. पुढे ज्योस्त्नाताईनी 'सर आणि मी' हे कदम सरांच्या आणि त्यांच्यातील प्रेमळ धाग्यांच्या गुंतवणी, आणि त्यांच्या मनस्वी अश्या धुंद सहजीवनाचा प्रवास हळुवार पणे उलगडून दाखविणारे पुस्तक लिहीले, ज्याला कला विश्वात प्रचंड प्रतीसाद मिळाला.

आज त्यांच्या पत्नी ज्योस्त्नाताई व मुलगा शार्दूल, कदमसरांची कला परंपरा तितक्याच जोमाने पुढे नेत आहेत. स्वतःची कला रसिकांपुढे आविष्कृत करीत आहेत!
 

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
-----------------

मी सुरु केलेल्या 'मी राजा बोलतो आहे' या माझ्या ब्लॉग वरील हा शंभरावा लेख, माझें गुरु संभाजी कदम सर यांच्या प्रती मी अर्पण करीत आहे. ब्लॉग सुरू केला तेव्हां लिहीताना वाटत होते की, कुणाकडून वाचले जाईल माझे हे लिखाण? आणि कुणाकुणावर लिहू?  पण लिहायला बसल्यावर सर्वच दिग्गज व्यक्ती नजरेसमोर येऊ लागल्या. आणि त्यांच्या आठवणी दृश्य स्वरूपात समोर साकारू लागल्या. हातात आय पॅड घेऊन एक लेख पूर्ण झाल्यावरच मी थांबू लागलो. काहींशी जास्त जवळीक असल्याने काही गोष्टी खूप जवळीकीने लिहील्या. अनेकांना आवडल्या. काहींनी अभीप्राय दिले, काहींनी ते शेअरही केले. काहींनी नुसतेच पुढे सरकवले तर बऱ्याच जणांनी दुर्लक्ष केले. असा हा माझा ब्लॉग आज शंभरी पूर्ण करीत आहे. त्यामध्ये केवळ लेखच नव्हते, तर कांही कविता, चित्रपट समीक्षा, माझ्या वैयक्तिक आयुष्यातील घटना असे सर्व मिळून मी ब्लॉग लिहीत असतो. आणि ब्लाॅगवरील तोच लेख मी माझ्या फेसबुक वरील मित्रासाठी शेअर करीत असतो. आजचा हा कदम सरांवरील लेख देखील मी त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ लिहीला आहे. अजूनही त्यांचे हास्य माझ्या नजरेसमोर तरळत असते. त्यांचे शब्द कानांत गुणगुणत असतात. त्यांची चित्रे अजूनही प्रेरणा देत असतात. हृदयाच्या कप्प्यात त्यांच्या स्मृती सांभाळून जपल्या आहेत. आणि त्यांचा सहवास, तो तर सभोवार जाणवत असतोच !
 

सरांच्या स्मृतीला मनोमन वंदन ! 🙏
 
- प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

 


 









Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’