कला क्षेत्रातील प्रसन्नता : डॉ. शरयू दोशी.

 


शरयू दोशी हे नांव घेताच आपल्या डोळ्यासमोर येते ते  एक अतीशय प्रसन्न चेहऱ्याचे, देखणें असे हसतमुख व्यक्तीमत्व. आणि त्याचसोबत येते ती म्युझियम समोरील मोठ्या दिमाखात उभी असलेली 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट'ची भव्य अशी गोलाकार दगडी इमारत, ज्यामध्ये देश विदेशातील महान कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शीत केल्या जातात. तसाच त्यांचा संग्रहही केला जातो. आत गेल्यावर तेथील स्थापत्यरचना प्रथम आपले लक्ष वेधून घेते. संपूर्ण गोलाकार असलेल्या या इमारतीमध्ये पाच लेव्हल्स आहेत. प्रत्येक लेव्हलवर वेगवेगळी प्रदर्शने आकार घेत असतात. येथे सर्वसाधारण गॅलरीप्रमाणे कोणी प्रदर्शने भरवू शकत नाही. तर चित्रकारांचा व चित्रांचा दर्जा विचारात घेऊन त्यांची प्रदर्शने क्युरेट केली जातात. अश्या या खास प्रदर्शनांना आपण जेव्हां भेट देतो ती चित्रे, शिल्पे, छायाचित्रे, आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातात. आणि याच गॅलरी मध्ये स्वतः जातीने उपस्थीत राहून वातावरण प्रसन्नमय करणारे, सुहास्य मुद्रेने वावरणारे एक व्यक्तीमत्व वावरत असे. डॉ. शरयू दोशी!

दोशी नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात ती उद्योगपती वालचंद हिराचंद, लालचंद हिराचंद ही आदरणीय नांवे. पुढे शरयू देखील त्या घराण्यात सामील झाल्या. मूळच्या त्या शरयू दफ्तरी. त्यांचे वडील व काका सरकारी सेवेत होते. त्या काळाप्रमाणे सरकारी अधीकारी कोठेही गेले की, पट्टेवाला, खानसामा, शिपाई आदी लवाजमा त्यांच्यासोबत असायचाच. एकदा त्यांच्या काका-काकी 'भारत दर्शन' च्या प्रवासाला निघाले असता, एके सायंकाळी शरयू नदीच्या काठी ते दोघे बसले होते. त्याच वेळी त्यांचा शिपाई धावत धावत त्यांच्या नांवे आलेली तार घेऊन आला. तारेतील मजकूर वाचून त्यांना अत्यानंद झाला. त्यांच्या भावाला मुलगी झाली होती. पुतणीच्या जन्माची गोड बातमी शरयू नदीच्या काठावर असताना समजल्यामुळे त्यांनी आपल्या बंधूना निरोप धाडला की, मुलीचे नांव शरयू ठेवावे. ( गुजराथीमध्ये हा उच्चार सरयू असा केला जातो) अश्या रीतीने शरयूचे नदीशी नाते जुळले. वडील शासकीय सेवेत इंजीनिअर म्हणून काम करीत असल्याने त्यांना वारंवार रहाती ठिकाणे बदलावी लागत. यामुळेच कदाचीत शरयूने आपल्या जीवनांत विविधतेने नटलेले सौंदर्य अनुभवले आणि त्याचाच परिपाक असेल, त्या दृक कलेकढे अधिकाधीक आकृष्ट झाल्या.

 


शरयू यांचे माध्यमीक शिक्षण क्वीन्स मेरी स्कुल मधून झाले. व पुढे एकफिस्ट्न महाविद्यालयातून त्या इकाॅनामीक्स-पॉलिटीक्स विषय घेऊन त्या पदवीधर झाल्या. यानंतर त्यांचा आवडता विषय चित्रकला याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. आणि तेथे त्यांचे पेंटिंगचे शिक्षण सुरु झाले. एक दिवस जे.जे.च्या पायऱ्यांवर बसले असतांना त्यांच्यापुढे दोन वर्षे असलेली विद्यार्थीनी प्रफुल्ला जोशी (नंतरची डहाणूकर) त्यांना भेटून गप्पा मारू लागली, ती त्यांची इतकी जिवलग मैत्रीण झाली की अखेरपर्यंत त्यांची जिवाभावाची मैत्री अभंग राहीली. प्रफुल्ला जोशी-डहाणूकर, सतचित दाभोळकर, प्रमीला दंडवते, भाई पत्की आदी त्यांचे समकालीन विद्यार्थी होते. तर प्रा. शंकर पळशीकर, प्रा. धोपेश्वरकर, प्रा. वसंत परब, अहिवासी ह्या नामवंत कला शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. शरयू यांना मोगल व राजपूत लघुशैलीतील चित्रें आकृष्ट करू लागली. आणि येथूनच त्यांनी कला इतिहासाचा व मिनीएचर पेंटींग्जचा  विशेष अभ्यास करायला सुरुवात केली. कलेच्या संदर्भातील कोणताही आकार शरयूच्या सर्जनशील मनाला भुरळ घालू लागला. मग ते पेंटींग असो, शिल्प असो, वा निसर्गातील एखादा अनोखा रंग!

 


जे.जे. मध्ये असताना तेथे कलेसोबतच नाट्यविषयाची सेवाही सतत सुरु असे. आणि लालचंद हिराचंद यांचे मराठी नाटकप्रेम तर सर्वसृतच होते. अनेक मराठी नाटके त्यांचे सर्व कुटुंब पहात असे. त्यांचे जेष्ठ चिरंजीव विनोद दोशी हेही नाटकात रस घेत असत. कला व नाट्य यांच्यातील आवडीने बऱ्याचदा विनोद आर्ट स्कुलमध्ये आपल्या मित्रांना भेटण्यास येत असत. जेव्हां त्यानी या गोड, सुन्दर असलेल्या मुलीला पाहीले, तेव्हां आर्ट स्कुल मधेच तिला त्यांनी मागणी घातली.  आणि शरयू दफ्तरी शरयू दोशी बनून विनोदचा संसार फुलवण्यास गेल्या. लग्नानंतर काही काळ त्यांनी साताऱ्यात काढला, पण त्यांच्या कलेच्या ओढीने मुंबईला वारंवार फेऱ्या होत असत. येथील कला वर्तूळात चर्चा घडत. नंतर ते कुटूंब मुंबईला कारमायकल रोडवरील (आताचा डहाणूकर मार्ग)  त्यांच्या निवासस्थानी रहायला आले. नाट्य श्रुष्टीतील अनेकांशी विनोद यांची जवळीक होती, त्यापैकी एक होते सत्यदेव दुबे. त्याकाळात त्यांची इम्प्रेशनिस्ट नाटकांची चळवळ सुरु होती. त्यासाठी त्यांना जागेची आवश्यकता होती. तेव्हां ताडदेव येथे लालचंद ग्रुपने 'वालचंद टेरेस' नावाची इमारत त्यांच्या काही कार्यालयांना व तेथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ठेवली होती. विनोदचे  बंधू शशांक यांचा एस.एल. स्टुडीओ देखील त्याच इमारतीत होता. तेंव्हा त्यातील रिकामा असलेला एक फ्लॅट विनोदनी सत्यदेव दुबे यांना वापरायला दिला. प्रशस्त अश्या त्या हॉल मध्ये मग नाटकांच्या तालमी, चर्चा, कलाकारांची भेटण्याची जागा असे सर्व प्रकार घडू लागले व या जागेला ‘नाटक अड्डा’ हे नांव पडले. तेथें अनेक नामवंत मंडळी येतं असत. अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर, विजया मेहता, अश्या लोकांची वर्दळ तेथे सुरु असे. आणि कित्येकदा विनोद-शरयूच्या घरी देखील या चर्चा चालत. तेथेंच जेवण होत असे. एका दिवशी रात्री एका प्रर्शन आटोपून शरयूताई परतल्या तेव्हां सत्यदेवसहित आणखी चार पाच लोक त्यांना तेथे झोपलेले आढळले. एक दिवस तर सर्व दोशी मंडळी डीनरसाठी बाहेर गेली होती. रात्री उशीरा परतली तर पहातात तो काय? दरवाजाबाहेरच सत्यदेव दुबे जमीनीवरच पथारी पसरून झोपले होते. असे नाट्यवेडे दिवस होते ते! असा बऱ्याच लोकांना दोशींच्या ह्या नाटक अड्ड्याचा फायदा झाला. त्यांत गोविंद निहलानी. श्याम बेनेगल, अमरीश पूरी अश्या सर्जनशील लोकांच्या बैठकीही होत असत.

 


एकंदरीत शरयू दोशी यांचे घर म्हणजे कलाकार, नाट्य अभीनेते, लेखक, उदयोन्मुख दिग्दर्शक, उभरते अभीनेते अश्या सर्जनशील लोकांचे एक 'ओपन हाऊस' ठरले होते. त्यांचे नाट्य प्रयोग वालचंद टेरेस मध्ये होत असत. कित्येकदा रविवारचे लंच हे कित्येक दिग्गजांसोबत होत असे. त्यामध्ये रशियन बॅले डान्सर रुडॉल्फ न्यूरेयेव व पंडीत रवीशंकर असत, एम.एफ.हुसेन कधी येत. कधी गोविंद निहलानी, दीपा साही असत, तर कधी चार्ल्स व मोनीका कोरीया देखील असत. आणि हे सर्व घडत असे ते विनोद आणि शरयू दोशी यांच्या आतिथ्यामुळे, त्यांच्यातील नाट्यकलेच्या ओढीमुळे. कलेसोबतच बौद्धिक वरदान लाभलेल्या शरयूनी 'प्राचीन भारतीय इतिहास अन संस्कृती' ह्या विषयावर अभ्यास संशोधन सुरु केले, त्यासाठी त्यांना रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळाली, व त्यांनी  मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर पतीसोबत शरयूनी कला इतिहास शिकण्यासाठी अमेरिकेला प्रयाण केले. व तेथील शिकॅगो विद्यापीठाची 'मोगल पेंटींग्स' या विषयावर पोस्ट डॉक्टरल पदवी मिळवली. त्यावेळी त्यांचे वय होते फक्त तेवीस वर्षे! शरयूला कला प्रांतात रुची घेण्याछे कारण म्हणजे लहानपणापासून त्यांना ड्रॉईंग व पेंटींगचे आकर्षण होते. ज्या मिशिगन विद्यापीठात त्याचे कला शिक्षण झाले, तेथे कला इतिहासाचा प्रचंड असा अभ्यासपूर्ण विभाग होता. तेथे त्यांना पाश्च्यात कला अभ्यासण्यास मिळाला. त्याचे मन प्रगल्भ होत गेले. तेथून त्या जेव्हां भारतात परतल्या, तेव्हां त्यांनी भारतीय कला अभ्यासण्यास प्रारंभ केला. विशेष करून मिनिएचर शैलीकडे त्यांचा खास ओढा होता. कांही काळ पुणे विद्यापीठात कला विषयावर अध्यापनही केले.  जैन पेंटींगवर आतापर्यंत फारच थोडा अभ्यास झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणून शरयू दोशींनी आपल्या डॉक्टरल रिसर्चसाठी 'जैन मिनिएचर' हा विषय  संशोधनासाठी निवडला. एकीकडे त्यांचा कलेचा अभ्यास सुरूच होता. त्याच वेळी अनेक संस्थांनी त्यांच्या ज्ञानाचा लाभ 'अभ्यागत व्याख्यात्या' म्हणून करून घेतला.  यामध्ये जश्या भारतीय संस्था होत्या, तसेच अमेरीकेतील कॅलीफोर्निया विद्यापिठ व मिशीगन विद्यापीठ यांचाही अंतर्भाव होता. कलेच्या ज्ञानासोबतच त्यांना लाभलेले देखणेपण, आकर्षक व्यक्तीमत्व, सुरेख व रसाळ अशी भाषाशैली, विषयाचा सखोल अभ्यास यामुळे त्यांची व्याख्याने रसपूर्ण होत असत.

 


१९८१ मध्ये शरयूताईना 'मार्ग' या कलेला वाहीलेल्या मासिकाची संपादीका म्हणून आमंत्रीत करण्यात आले. 'मार्ग' हे कला आणि संस्कृतीला वाहीलेले टाटा ग्रुपचे त्रैमासीक नियतकालिक जे.आर.डी. टाटा यांनी १९४६ साली सुरु केले होते. त्याचे पहीले संपादक होते डॉ. मुल्कराज आनंद. जनतेमध्ये कला व संस्कृतीविषयी जाणीव  व्हावी, तिची अभिरुची वाढवावी हा हेतू त्यामागे होता. आरंभाला टाटा ग्रुप याचा आर्थीक भार उचलत होता. पण पुढे एन.सी.पी.ए. या संस्थेच्या ट्रस्टने तो भार उचलला. डॉ. मुल्कराज आनंद गेल्यानंतर संपादक म्हणून त्याच तोलामोलाची व्यक्ती 'मार्ग'ला हवी होती. आणि शरयूशिवाय आणखी कोणते नांव त्यांच्यापुढे येणार? कला इतिहासकार, कला अभ्यासक, कला तज्ञ, कला समीक्षक अश्या विविध भुमिकामधून वावरणाऱ्या शरयूताईवर ती जबाबदारी सोपविण्यात आली. पण शरयूताईनी तेथील सूत्रे हातात घेतल्यानंतर तेथे ना एखादे पेंटींग होते, ना छायाचित्र, ना एखादे डिझाईन. जणू शून्यातूनच शरयूताईना त्याची नवनिर्मिती करावी लागली. पण सतत आव्हाने स्वीकारण्याची आवड असलेल्या शरयूताईनी त्यावरही मात करून 'मार्ग' वर स्वतःचा ठसा उमटवला. या मार्गमधील कालावधीत त्यांना बराच अनुभव आला. बरेच फिरायला मिळाले. निरनिराळ्या लोकांच्या भेटी झाल्या. त्यापैकी त्यांच्या कायमच्या स्मरणात राहीलेली व्यक्ती म्हणजे अमेरीकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या पत्नी व 'फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका’ जॅकेलीन केनेडी.

 


ज्यावेळी  जॅकेलीन केनेडी  भारत भेटीगाठी आल्या, त्यावेळी त्यांना भारतीय मिनिएचर पेंटींगची आवड असल्याने शरयूताईवर ती जबाबदारी सोपविण्यात आली. शरयूने त्यांना कान्हेरी गुंफा दाखविण्यासाठी नेले. तेथील बौद्धकालीन शिल्पाविषयी माहीती दिली. शरयूपेक्षा दहा बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या जॅकेलीन मोठ्या तडफदारपणे तेथे वावरत होत्या. त्याचवेळी नेहरू सेंटरमध्ये 'बॉंबे आर्ट सोसायटीचे शताब्दी वर्षानिमित्ताने प्रदर्शन भरले होते, तेही जॅकेलीनने पाहीले. रात्री भोजनही तिने शरयूच्या घरी घेतले. भारतात सदीच्छा भेटीसाठी आलेल्या जॅकेलीन यांनी परत जाताना बऱ्याच आठवणींचा खजीना सोबत नेला.  परत आपल्या देशात गेल्यानंतर शरयू दोशींना स्वहस्ताक्षरात त्या पत्रे लिहीत असत.  याच 'मार्ग'तर्फे शरयूताईंची अनेक पुस्तके प्रकाशीत झाली. यामध्ये 'मास्टर पिसेस ऑफ जैन पेंटींग्स' तसेच 'डान्स ऑफ मणीपूर' 'धरणा विहार' हे राजस्थानमधील जैन मंदीरावर आधारीत व 'होमेज टू श्रवण बेळगोळ' हे जैन तीर्थक्षेत्रावर आधारीत अशी अनेक पुस्तके आहेत. याशिवाय अनेक अभ्यापूर्ण पुस्तकांच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत.

 


१९९६ साली त्यांनी मुंबईतील 'राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या' (National Gallery of Modern Arts) ह्या संस्थेची संस्थापक संचालीका म्हणून सुत्रे हातात घेतली. येथेही त्यांच्या वाट्याला प्रचंड समस्या आ वासून उभ्या होत्याच! एकतर शासकीय कारभार. त्यामुळे पैशाचा सतत तुटवडा. मनुष्य बळाचा अभाव. जे होते ते शक्यतो शासकीय पद्धतीने कामचुकारपणा करणारे. आणि या सर्वातून त्यांना समन्वय साधायचा. यातही शरयूनी आघाडी घेतली. स्वतःचा आत्मविश्वास अन असलेल्या प्रचंड जनसंपर्काच्या आधारावर त्यांनी या राष्ट्रीय संग्रहालयाचा दर्जा वाढवला. या संग्रहालयावर जाणकार अश्या सर्जनशील व्यक्तींचा समावेश केला. त्यामध्ये जहांगीर साबावाला होते. अकबर पदमसी होते. केकू गांधी, दादीबा पंडोल, हर्ष गोएन्का, रणजीत होसकुटे, यासारखे प्रतिभावान चित्रकार व कला समीक्षक होते. जहांगीर निकलसन सारखे कला संग्राहक होते. त्याचसोबत अभीनय व  कला क्षेत्रात काम करणाऱ्या टीना अंबानी व जया बच्चन यादेखील होत्या. सध्याच्या भाऊ दाजी लाड म्युझियमच्या संचालीका तसलिन मेहता होत्या. व शरयूंच्या आर्ट स्कुल पासूनच्या सोबती व जिवलग मैत्रीण प्रफुल्ला डहाणूकर होत्या. अगदी तोलामोलाच्या व्यक्तींचा त्यात समावेश होता. जे.जे.स्कुल ऑफ आर्टचा अधिष्ठाता हा तेथील पदसिद्ध सभासद असतो. पण शरयू, प्रफुल्ला व केकू गांधी यांनी एका बैठकीत मंजूर करवून त्यांनी मला त्या संग्रहालयाचा सभासद करून घेतले. त्यामुळे या कर्तबगार व्यक्तींना मला फार जवळून पहाता आले. त्यामध्ये जहांगीर निकलसन सारखे परखड, प्रफुल्ला सारखी स्पष्टवक्ती, टीना अंबानी सारखी खूप बोलणारी तसेच जया बच्चन यांच्यासारखी मोजके पण परीणामकारक बोलणारी व्यक्तिमत्वे मी तेथे पाहीली. आणि या सर्वाना आपल्या प्रेमळ, सयंमी आणि मृदू स्वभावाने एका माळेत गुंफणारी शरयू दोशीं देखील मी पाहील्या.

आणि अश्या या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाने आपल्या जनसंपर्काच्या आधारावर अनेक बहुमूल्य अशी प्रदर्शने आयोजीत केली. अनेक श्रेष्ठ कलाकारांच्या दुर्मीळ अश्या कलाकृतींचा लाभ रसिकांना करून दिला. यापैकी खास अशी प्रदर्शने म्हणजे ब्रिटिश म्युझियम मधील मूळ वस्तूंचे, ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने आयोजीत केलेले 'इंड्यूरींग इमेजीस' हे प्रदर्शन. अगदी राजघराण्यातील जडजवाहिरांपासून इजिप्शियन ममी पर्यन्त मूळ गोष्टी या प्रदर्शनातून भारतीयांना पहायला मिळाल्या. तसेच काळा घोडा फेस्टीव्हलच्या निमित्ताने त्यांनी सुरु केलेला एन.जी.एम.ए. मधील 'मॅगझीन शो'. हा 'मॅगझीन शो' म्हणजे यात विविध प्रकारचे कला प्रकार दाखविण्यात येतात. आणि मुंबई -महाराष्ट्र व इतर प्रांतातील कला परंपरेशी शरयूताई अतीशय जवळून निगडीत असल्याने त्यांना हा मधूर कलासंगम साधणे शक्य होते. एका वर्षी आम्ही या ‘मॅगझीन शो’चे  विषय ठरवीत असतांना मीं त्यांना माझ्या खास आवडीचा तसेच सध्याच्या काळात लुप्त झालेला चित्रपटांच्या बॅनर पेंटींग्सचा विषय सुचवला. शरयूताईना हा विषय इतका आवडला की त्यांनी माझ्यावरच ती जबाबदारी टाकली. आम्ही पूर्वीचे बॅनर शोधले. पण जुने बॅनर मिळणे दुरापास्त होते. कारण चित्रपट थेटरवरून उतरला की, ते मोठमोठे कापडी बॅनर झोपड्पट्टीवर  छप्पर म्हणून वापरले जात असत. यावेळी माझे मित्र प्रा. नरेंद्र विचारे मदतीला आले. त्यांनी दादरच्या बाळकृष्ण वैद्य यांच्याकडून जुन्या चित्रपटांच्या स्टील वरून पूर्वीप्रमाणेच नवीन बॅनर तयार  करून घेतले. व यात वहीदा रेहमान, वैजयंतीमाला, मधुबाला, माधुरी दीक्षित आदी कलाकारांच्या चित्रपटांचे हाताने रंगवीलेले बॅनर आम्ही प्रदर्शीत केले. खुद्द वैजयंतीमालेने प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या 'संगम' चित्रपटातील बॅनरसोबत स्वतःची छायाचित्रे काढून घेतली. त्या वर्षीच्या ‘मॅगझीन शो’ चे ते खास आकर्षण ठरले. आणि हे सर्व घडत असे ते शरयू दोशी या नावामुळे.

 


याशिवाय या राष्ट्रीय आधुनीक कला संग्रहालयात  त्यांचे इतरही अनेक उपक्रम सुरु असत. एकदा अमीताभ बच्चन यांचा 'मधुशाला' हा हरीवंशराय बच्चन यांच्या कवितांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम शरयूताईनी आयोजीत केला. संपूर्ण गॅलरी तुडूंब भरली होती. निरव अशी शांतता पसरली होती. अमीताभ स्वतः, पत्नी जया, अभिषेक व ऐश्वर्या सोबत आले होते. आणि आपल्या धीर गंभीर आवाजात त्यांनी सर्व श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात त्या रात्री नेले. आणि हेही घडले ते केवळ शरयूताईमुळेच! १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याची पन्नास वर्षे झाली त्यावेळी स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्यत्तरोतर अशी दोन भागात त्या काळातील कलावंतांनी केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन शरयू दोषींनी भरवले. यानंतर त्यांनी आपल्या  कला कारकिर्दीवर आणखी एक शिरपेंच खोवला. तो म्हणजे 'पाब्लो पिकासो' या जगविख्यात महान कलाकाराच्या मूळ कलाकृतींचे मुंबईकरांना दिलेले दर्शन! १५ फेब्रुवारी २००२ रोजी हे भव्य प्रदर्शन या कला संग्रहालयात साकारले. आरंभीच्या पिकासोच्या वास्तववादी कलाकृती, त्यांनतर त्याच्यातील काळानुसार होत गेलेले बदल. त्याचा पिंक पिरिएड, त्याची आधुनीक शिल्पे अश्या सर्व बाजूनी पिकासोचे यथार्थ दर्शन घडवणारे हे प्रदर्शन बरेच नावाजले गेले. शिवाय या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक स्मरणचिन्हेही त्यांनी बनवली. पिकासोच्या सह्या असलेले टी शर्ट, पारकर पेन्स, पोस्टरचे प्रिंट्स, पेपर बॅग्ज अश्या अनेक गोष्टी  त्या प्रदर्शनाच्या निमित्ताने रसीकांनी पिकासोच्या आठवणी म्हणून त्यावेळी खरेदी केल्या. एक अविस्मरणीय असे ते प्रदर्शन झाले

 


एका मोठ्या उद्योगपती घराण्यात असूनही शरयूना त्यात फ़ारसे गम्य नसते. त्या नेहमी रमतात ते कला, थिएटर, सिनेमा, नृत्य, छायाचित्रण अश्या विषयात. त्यांत त्या समरसून काम करतात. आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन १९९८ साली  भारत सरकारने त्यांना पदमश्री किताबाने गौरवीले आहे. सार्थ अश्या व्यक्तीला हा किताब प्रदान करण्यात आल्यामुळे संपूर्ण कलाविश्वाने त्यांचे मनःपूर्वक अभीनंदन केले. जणू तो कलाविश्वाचाच सन्मान होता! अश्या या कलाप्रेमी जोडप्याची वाटचाल सुरु असतानाच त्यांच्या संसार रथाचे एक चाक अचानक निखळले. हातात हात घेऊन कला-संस्कृतीची वाट जोडीने चालत असताना  त्यांचे पती विनोद दोशी ६ ऑकटोबर २००८ साली अचानक त्यांना सोडून निघून गेले. पण दुःख गिळून त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.

डॉ. शरयु दोशी यांनी जगभर प्रवास केला आहे. त्यांच्या नांवावर अनेक पुस्तके आहेत. त्यांच्या जैन हस्तलिखितांच्या संशोधनामुळे जैन मंदीराचा अभ्यास करणाऱ्यांना फायदा झाला. त्यांना सुमारे १५ व्या शतकातील अनेक प्राचीन हस्तलिखिते त्यांच्या या संशोधनातून मिळाली. कला संस्कृतीसाठी महत्वाचे योगदान करणाऱ्या डॉ. शरयू दोशींनी मुंबईच्या कला विश्वावर आपला खास असा ठसा उमटवला आहे. प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तीमत्व लाभलेल्या शरयूताईनी केवळ स्वतःच्या बळावर राष्ट्रीय आधुनीक कला संग्रहालयाचा कारभार गौरवशाली पद्धतीने चालवुन त्याला एक खास दर्जा मिळवून दिला. तेथील त्यांच्या कारकिर्दीत सुमारे तेरा भव्य अशी खास प्रदर्शने त्यांनी आयोजीत केली. पिकासोला भारतात आणताना वाहतुकीचा प्रचण्ड खर्च येणार होता. त्यासाठी स्वतःच्या जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी एअर इंडीया कडून खास सवलत मिळवुन तो खर्च कमी केला. यामुळे मुंबईच्या कलाविश्वालाही मानाचे स्थान प्राप्त झाले. त्याचबरोबर शासनाच्या नियमाने हात बांधले असूनही ज्या समस्या त्यांना येत, त्यावर त्या स्वतःच मात करून त्या निस्तरत. याची जाणीव त्यांच्या सहकाऱ्यांनाही असे. त्यामुळे ते निर्धास्त असत. आणि आपल्या स्वभावाप्रमाणे प्रदर्शनाच्या यशाचे श्रेय आपल्या सहकारी मित्रांना देऊन शरयूताई सर्वानाच आनंदी करणार याचीही सर्वांना खात्री असे.

 


जेव्हां जेव्हां शरयू ताईकडे जाण्याचा योग येत असे, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यात, नवीन गोष्टी समजून घेण्यात आणि त्यांच्याकडे आलेल्या नामांकीत चित्रकारासहीत अनेक क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींशी ओळख होवून त्यांच्याशी संभाषण साधण्यात एक प्रकारचा मोठेपणा मिळत असे. आमच्या एन.जी.एम.ए.च्या बैठकीत तर ज्या चर्चा होत, वादविवाद होत, त्यातूनही बरेचसे कांही शिकायला मिळत असे. मध्यन्तरीच्या काळात कलाप्रेमी उद्योगपती संगीता जिंदाल या जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या संवर्धनाचे काम करीत होत्या. तसेच राज्य सरकारच्या अख्यत्यारित असलेल्या या जागतीक कीर्तीच्या आर्ट स्कूलचा विकास तेवढा होत नसल्याच्या जाणीवेने जिंदाल यांनी जे.जे.स्कूलला स्वायत्तता देण्याची मागणी केली, व त्यासाठी कलाकारामध्ये जागृती करण्यासाठी नॅशनल गॅलरीमध्ये शरयूताईनी एक चर्चासत्र आयोजीत केले. त्यामध्ये स्वतः जिंदाल, कला वास्तुशात्रज्ञ आभा लांबा, एन.जी.एम.ए. चे अध्यक्ष व माजी केंद्रीय सचिव भालचंद्र देशमुख व मी स्वतः असे व्याख्याते होतो. त्याचं सुमारास जे.जे.मधे कांही लोकांनी या स्वायत्ततेविरुद्ध एक चळवळ चालवलेली होती. जे. जे. मध्ये यापुढे मराठी मुलांना प्रवेश मिळणार नाहीत असा खोटा अपप्रचार करण्यात येत होता. मी स्वायत्ततेचे कला विद्यार्थ्यांना होणारे फायदे विषद करून सांगीतले. दुसऱ्या दिवशी लोकसत्तामध्ये कोमल कुंभार नावाच्या वार्ताहराने 'जे.जे.मध्ये भ्रष्टाचार चालतो' असे मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी टाकून बातमी दिली. त्यावर प्रभाकर कोलते यांनी माझ्यावर टीका करून लिहीलेले पत्र लोकसत्ताने मोठी चौकट टाकून छापले. मी ते शरयूताईंच्या नजरेला आणताच त्याही संतापल्या. कारण सर्वच लोकांनी केवळ शैक्षणीक चर्चा केल्या होत्या. व त्या सर्वांचे रेकॉर्डींग झाले होते. त्यांनी तर एक वार्ताहर परीषद घेऊन लोकसत्ताचा खोटेपणा उघड करायचे ठरवले. पण कुमार केतकरांशी माझा वैयक्तीक परीचय असल्यामुळे मी केतकरांना सांगून खरी गोष्ट छापायला लावली. आणि मजा म्हणजे आमचे व्याख्यान संपल्यावर सुमारें तास दीड तास आम्ही सर्व जेवणासाठी तेथे थांबलो होतो, त्यामध्ये या बाईही होत्या. पण तेथे त्यांनी चुकूनही याबाबत मला विचारले नव्हते. एकूण कुणालाही बदनाम करण्यासाठी या लोकांचा वपर कसा केला जातो याचे एक उदाहरण मला तेव्हां पहायला मिळाले. माझ्या अधिष्ठाता पदाच्या शेवटच्या वर्षात शरयूताईनी आमच्या वार्षीक प्रदर्शनाचे उदघाटन करण्याची विनंती मी त्यांना केली होती. व त्यांनीही ती स्वीकारली. व त्यादिवशी आमच्या विद्यार्थ्यांना डॉ. शरयू दोशी यांच्या बहुमोल सल्ल्याचा, मार्गदर्शनाचा आणि त्यांच्या शुभेच्छांचा लाभ झाला.


अश्या या कला व संस्कृती क्षेत्रांत समृद्धपणे वाटचाल करणाऱ्या डॉ. शरयू दोशी यानी आपल्या दिवंगत पतीच्या नांवे 'डॉ. शरयू अँड विनोद दोशी फाऊंडेशन' सुरु केले आहे. या फाऊंडेशनचा उद्देश हा की आपल्याकडील होतकरू आणि सर्जनशील अशा तरूण कलाकारांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. कारण कलाकाराच्या मनाची आवड आणि महत्वाकांक्षा विचारात घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश त्यामध्ये आहे. विनोद आणि शरयू या दोघांचेही विचार  आणि ध्येय हे त्यातून अधीरेखीत होतात. शिवाय विनोदची विचारधारणा होती की मनाचे संगोपन, पालनपोषण जसे शिक्षणाने होते, तसेच आत्म्याला, मानसीकतेला विकसित होण्यास गरज असते ती, कला-संस्कृतीची. आणि या विचारधारणेतून या शिष्यवृत्तीचा जन्म झाला. तसेच विनोद दोशी यांची थेटर विषयीची आत्मीयता व ओढ विचारात घेऊन पुणे येथे दरवर्षी 'थेटर फेस्टीवल' भरविण्यात येते. ज्यामध्ये तरुण प्रायोगीक नाट्य कलावंतांना आपली प्रयोगशील नाटके सादर करायला संधी मिळते.  नाट्यकलेची सेवा या रूपाने केली जाते.

आजही मिनिएचर पेंटींगचा, प्राचीन जैन मंदीराच्या अभ्यासाचा विचार आला, की डोळ्यासमोर नांव येते ते आमच्या शरयूताईचे. डॉ. शरयू दोशी यांचे! ज्या अजूनही देश-परदेशात जाऊन तेथील कलाकारांना, कला रसिकांना, कला इतिहासकारांना आपल्या ज्ञानाने  सर्वश्रुत करतात. कलेचे रत्नकण वाटत असतात!

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष







Comments

  1. Casino City - DrmCD
    The Borgata Hotel Casino 창원 출장안마 and Spa is a modern, newly opened destination that's 광주광역 출장샵 welcoming its 안양 출장샵 guests with a 상주 출장마사지 full-service spa, a 24-hour casino, 포항 출장안마

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :