महाराष्ट्राचा सांस्कृतीक खजीना : दी बॉंबे आर्ट सोसायटी




भारतीय कलेचा इतीहास हा भारतीय संस्कृती इतकाच प्राचीन आहे. कालानुरूप त्याच्यावर प्रत्येक कालखंडाचे प्रभाव पडत गेले. त्यातून व्यक्त होणारी भावना बदलत गेली. त्या व्यक्त करण्याच्या पद्धती बदलत गेल्या. आणि याचा प्रभाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतातील मुंबई, कोलकाता, मद्रास अश्या शहरावर पडला. याला कारण होते ते, ब्रिटिशांनी येथें सुरु केलेल्या कला शाळा. आणि यातूनच स्थापन झाली ती आपल्या देशातील कलेच्या संदर्भातील कार्य करणारी एक गौरवशाली कला संस्था 'दी बाॅंबे आर्ट सोसायटी'. देशातील एक सर्वात जुनी अशी अग्रगण्य कला संस्था.

 


1888 साली अस्तीत्वात आलेल्या झालेल्या 'बॉंबे आर्ट सोसायटी' ची स्थापना मूलतः ब्रिटिश कलाकारांना प्रोत्साहीत करण्यासाठी झाली. तसेच या देशातील हौशी कलावंतांना प्रोत्साहन देणे व सर्वसामान्य जनतेमध्ये कलेचा प्रसार होऊन त्यांची अभिरुची वाढवणे हाही उद्देश त्यामागे होता. अर्थात त्या काळातील इंग्रज अधिकारी तसेच त्यांच्या स्त्रिया याना उत्तेजन देणे हा एक अंतस्थ हेतू त्यामध्ये होताच! त्यामुळे कांही सुविद्य नागरीकांच्या सहाय्याने या सोसायटीची मुहूर्तमेढ रोवून कांही प्रतीष्ठीत नागरीकांच्या हातामध्ये याचे व्यवस्थापन सोपविण्यात आले. त्यावेळचे गव्हर्नर जॉर्ज सिडनहॅम क्लार्क हे सोसायटीचे आश्रयदाते होते. तसेच चीफ जस्टीस प्रा.ओ. व्ही. मुल्लर, डब्ल्यू.सी.ह्युजीस, जस्टीस रसेल, सर चंदावरकर, सर दिनशा पेटीट, सर जमशेटजी जीजीभॉय, राव बहादूर वसनजी खिमजी असे मातब्बर कलाप्रेमी लोक कार्यरत होते.

 


तदनंतरच्या काळात भारतीय कलाकारांचाही स्पर्धात भाग घेण्यासाठी समावेश करण्यात आला. बॉंबे आर्ट सोसायटीचे वार्षीक कला प्रदर्शन म्हणजे सोसायटीच्या बाबतीतील एक मोठा समारंभ असे. राजा रवीवर्मा, गणपतराव म्हात्रे, एम.एफ.पिठावाला अश्या प्रतिथयश कलाकारांनी त्यात भाग घेऊन पारितोषिके पटकावली. १८८९-९० मधे सोसायटीचे पहिलेच प्रदर्शन, जे सचिवालयात भरवले होते, त्याला फक्त सभासदांनाच प्रवेश होता. गव्हर्नरांच्या हस्ते त्याचे उदघाट्न होत असे. त्यांत लाकडी स्क्रीनवर गचडी करून चित्रे टांगलेली असत. चांगली दर्शनी जागा ही त्यावेळचे प्रतिष्ठीत माधवराव जोशी, नारायणराव सरदेसाई, माणिकराव चाफळकर, वसंतराव तळवडेकर, राजा परांडेकर इत्यादींनी बळकावलेल्या असत. दुसऱ्या दिवसापासून या प्रदर्शनाला बाजाराचे रूप येत असे. चित्र विकत घेण्यासाठी कोणी संस्थानीक, युरोपियन येईल याच्या वाटेकडे डोळे लावून हे चित्रकार बसत. कोण्या संस्थानिकाला एखादे चित्र आवडले की, तो राजा परांडेकरांसारख्यांची  डझनावारी निसर्गचित्रे विकत घेत असे, एखाद्याला पोर्ट्रेट आवडले की, त्या कलावंताला पोर्ट्रेटची कामे मिळालीच म्हणून समजा! याकाळात कला क्षेत्रात महत्वाचे योगदान असलेली त्रिमूर्ती म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे कला दिग्दर्शक वॅाल्टर लॅंगहॅमर, आर्थर स्लेसींजर आणि डॉ.आर.व्ही. लायडन. या तिन्ही व्यक्ती पाश्च्यात असल्या तरी त्या मुंबईच्या कला जीवनाशी पूर्णपणे समरस झाल्या होत्या. स्लेसींजर हे नवोदीत कलावंतांची चित्रे विकून देत, त्यामुळे प्रसिद्धीला आले होते. आर.व्ही. लायडन यांचे टाइम्स मधील कला समीक्षण वाचूनही त्यात उल्लेख केलेली चित्रे सरळ विकत घेतली जात.

 


मात्र १८९९ साली टाऊन हॉलमध्ये भरलेल्या प्रदर्शनाने केवळ नैराश्य पाहीले. अन १९०० व १९०६ या दोन वर्षी प्रदर्शनेच भरली नाहीत. यानंतर कांही काळ या प्रदर्शनांनी सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये स्थलांतर केले. पण शासकीय नियंत्रणाखाली असलेल्या या कलाशाळेतील सोसायटीची प्रदर्शने कला रसिकांकडून तशी वंचितच राहीली. त्यामुळे पुनच्छ टाऊन हॉलकडे त्यांना वळावे लागले. हळूहळू पेंटींग्स व दर्शकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली. पेंटिंग्सचा खपही होऊ लागला. १९१० साली सोसायटीचे १९ वे प्रदर्शन भरले, त्यामध्ये १००० च्या वर कलाकारांची चित्रे स्पर्धेसाठी आली. त्यापैकी निवडक अशी ७५० चित्रे प्रदर्शनांत मांडली गेली. यानंतर मात्र ही प्रदर्शने दरवर्षी भरू लागली. आणि सोसायटीच्या या उपक्रमाने प्रेरीत होऊन सरकारनेही त्याचा थोडा आर्थीक भार अनुदानाच्या रूपात उचलला. स्थापनेच्या सुमारे बावीस वर्षानंतर सोसायटीने मानद सचीव व्ही व्ही. मुल्लर यांनी संपादीत केलेले स्वतःचे असे पहीले जर्नल प्रकाशीत केले. यामध्ये 'बॉंबे आर्ट सोसायटी'चा इतीहास दिला होता. या सोसायटीच्या वाटचालीत अनेक प्रतिष्ठीत व नामवंतांचे सहकार्य सतत मिळत गेले, त्यामुळे आलेल्या अडचणी व आपत्तींना तोंड देत तिने आपली कामे चालूच ठेवली.

१८९४ मध्ये सोसायटीच्या प्रदर्शनांतील विजेत्या कलाकृतींना सुवर्ण पदक देण्याची प्रथा सुरु झाली. संपूर्ण देशभरातून स्पर्धात्मक कलाकृती येत असल्याने या सुवर्ण पदकाला एक प्रतीष्ठा प्राप्त झाली. पहीले सुवर्ण पदक मिळविण्याचा मान प्राप्त झाला तो कर्नल हंटर या इंग्लीश चित्रकाराला. व त्याच्याच पुढच्या वर्षी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मधून  नुकतेच शिक्षण घेऊन कला क्षेत्रांत पदार्पण केलेल्या एका तरुण चित्रकाराने ते सुवर्ण पदक पटकावले. हा तरुण म्हणजे नंतरचे सुप्रसीध्द चित्रकार रावबहादूर एम.व्ही. धुरंधर होय! या काळात जे.जे.स्कुलचे प्राचार्य हे ब्रिटिश असल्याने त्यांचा या सोसायटीवर वरचष्मा असे. आपल्या शैलीचा प्रभाव ते विद्यार्थ्यांवर पाडीत असत. मात्र या काळात वास्तववादी काम कळसाला पोचले होते. पुढे चित्रकार हुसेनचा 'प्रोग्रेसिव्ह ग्रुप' जो नंतर बॉंबे ग्रुप झाला, त्या सर्वच गोष्टींचे उगमस्थान ही ‘बॉंबे आर्ट सोसायटी’ होती. या क्षेत्रांत अनेक महिलाही कार्यरत राहील्या. पण पुढे अमृता शेरगील यानी हे प्रतीष्ठेचे सुवर्ण पदक मिळवल्यानंतर मात्र व्हीक्टोरीया राणीची मुद्रा असलेले हे रत्नजडीत पदक मिळवण्याचा मान कोणा महिलेला मिळाला नाही. त्या दरम्यान बॉंबे आर्ट सोसायटीचे प्रदर्शन पुण्यालाही  दरवर्षी भरवले जात असे. १९३५ साली भरलेल्या बॉंबे आर्ट सोसायटीच्या मुंबईच्या प्रदर्शनात अमृता शेरगील या पुढे प्रसिद्ध पावलेल्या भारतीय चित्रकर्तीला सुवर्णपदक देण्यात आले. 'थ्री गर्ल्स' या तिच्या चित्रामधील तरुणी दाखवल्या होत्या, त्यात थोडी मोगल व राजपूत चित्रशैलीचा मिलाफ जाणवत होता. पाश्च्यात चित्रकार गोगॅं याची छाप त्यावर जाणवत होती. जुन्या पिढीतील चित्रकारांना तें चित्र पसंत नव्हते. नैसर्गीक वास्तववादी पद्धतीने त्यातील आकृत्त्या रंगवलेल्या नव्हत्या. भारतात परतल्यानंतर तिने केलेले हे पहिलेच चित्र होते. अमृता शेरगिलच्या या आधुनीक चित्राला सुवर्णपदक दिल्याबद्दल पुण्यात सोसायटीचा निषेध करण्यासाठी एक सभा भरली. त्यात मुंबईचेही काही दुद्ढाचार्य कलाकार हजर होते. वास्तववादी कलेला मारून टाकण्यासाठी अश्या आधुनिक प्रकारचा गौरव केला जात आहे, अशी टीकाही त्यावेळी करण्यात आली. पण पुढे कोणत्याही महीला कलाकाराला हा सुवर्ण पदकाचा सन्मान मिळाला नाही.

 


तसेच एम.एफ.पिठावाला, या चित्रकाराने १९०७, १९०८,१९०९  या तीनही वर्षी सतत पदक मिळवण्याची जी हॅटट्रीक साधली, तो विक्रमही कोणाला मोडता आला नाही. पारितोषिक विजेत्या कलाकृती नेहमीच रसिकांना भुरळ घालीत असत. मात्र कला विश्वाला खंत वाटेल अशी एक गोष्ट म्हणजे, एम.एफ.हुसेन, मुरलीधर आचरेकर, वासुदेव गायतोंडे, रावबहादूर गणपतराव म्हात्रे अश्या कांही नामवंतांना सोसायटीच्या त्या वैभवाच्या काळात सुवर्ण पदकाची प्राप्ती झाली नाही. हुसेनचे 'मॅन' हे मोठे प्रसीद्ध चित्र ज्या वर्षी प्रदर्शनात होते, त्यावेळी त्यांना सुवर्णपदक मिळेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण त्याच वेळी आरा ह्यांची स्टील लाईफ चित्रे देखील प्रदर्शनात होती. त्याच वर्षी जहांगीर आर्ट गॅलरीचे उदघाटनही झाले होते. त्यानिमित्ताने सुवर्ण पदक विजेत्याला एक हजार रुपयांचे खास बक्षीस गॅलरीतर्फे मिळणार होते. आणि आरा यांना सोसायटीचे सुवर्ण पदक मिळाले. यानंतर हुसेन यांनी बॉंबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाला कधीच चित्र पाठवले नाही.  तीच गोष्टी गायतोंडेंची झाली. काही वर्षांपूर्वी सोसायटीच्या प्रदर्शनात बक्षिसांच्या यादीत गायतोंडेंचे नांव नेहमीच असे. एकदा रौप्य पदक मिळाल्यानंतर त्यानी सोसायटीच्या प्रदर्शनात चित्र पाठवणे बंद केले

 


१९३६ मध्ये प्रथमच सर कावसजी जहांगीर या भारतीयाची या सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. पुढे ते सतत २६ वर्षे या पदावर कार्यरत होते. स्वतःची कार्यालयासाठी किंवा प्रदर्शनासाठीही जागा नसल्याने सुरुवातीच्या काळात अत्यंत कठीण व खडतर समस्यांना या सोसायटीला तोंडं द्यावे लागले. टाऊन हॉल मधील जागाही पहील्या महायुद्धानंतर हातची गेली. यानंतर मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहातही प्रदर्शन भरविण्यात आले. पण पुढे दानशूर व कलाप्रेमी सर कावसजी जहांगीर यांनी भरघोस मदत देऊन १९५२ मध्ये आर्ट गॅलरी उभारली. ही गॅलरी म्युझियमच्या शेजारी म्युझीयमने दिलेल्या जागेत बांधण्यात आली व तिला कावसजींच्या अकाली आणि अपघाती निधन पावलेल्या मुलाचे, जहांगीरचे नांव देण्यात आले. आणि मुंबईचेच नव्हे, तर संपूर्ण भारताची शान ठरलेल्या या 'जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये 'बॉंबे आर्ट सोसायटी'ला प्रदर्शनाला जागा उपलब्ध झाली  व तिचे कार्यालयही त्याच इमारतीत स्थापीत झाले. बॅरीस्टर  ओक आणि सर कावसजी जहांगीर ही जोडी बॉंबे आर्ट सोसायटीचा कणाच होता म्हणा ना! ही जोडी असेपर्यंत बॉंबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाची शान सतत वाढतच गेली.बॅ. ओक यांची सोसायटीच्या चिटणीस पदाची दीर्घकालीन कारकीर्द सोसायटीच्या भरभराटीला नक्कीच कारणीभूत झाली. सोसायटीबद्दल त्यांना प्रेम व आत्मीयता होती. एक श्रद्धा होती. ओक स्वतः जुन्या विचारसरणीतील असले तरी नवमतवादी हेब्बर, आरा, हुसेन, चावडा, पळशीकर, गाडे अश्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याचे मित्र सर कावसजी देखील जुन्या वास्तववादी कलेचे भोक्ते होते, तरीही ते नव्या कलावंतांना प्रोत्साहीत करीत. मुंबईतील कलावंतांची आणि बॉंबे आर्ट सोसायटीची त्यांनी लहान मुलासारखी जोपासना केली. आणि सोसायटीला पन्नास एक वर्षे होऊनही तिला स्वतःचे असे घर नव्हते याची कल्पना ओकांनी कावसजीना दिली. आणि त्यांच्या मैत्रीचे प्रतीकच म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीकडे पहावे लागेल.

 


निवड आणि निर्णय समितीमध्ये जे.जे.च्या सालोमन साहेबाचा दरारा असे. निवड समितीमध्ये असलेले प्रतिष्ठीत चित्रकार स्वतः स्पर्धकांमध्ये असल्याने आपली वा मित्रमंडळींची वर्णी लावण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळे उदयोन्मुख व दर्जेदार कलावंतांवर अन्याय होत असे. पण दर्जा नसेल तर सालोमनसाहेब ती चित्रे भिंतीवरून आपल्या अधिकारात खाली उतरवीत तसेच गोडाऊन मधील कांही नाकारलेल्या चित्रांना ते आणून लावीत असत. चित्रकार सोलेगांवकरांचे 'महियारी ' हे चित्र असेंच सॉलोमन यांनी गोडावून मधुन आणून लावले, व त्याला सुवर्ण पदक दिले. असा कलाकृतींचा दर्जा राखणारा कलावंत होते सॉलोमन साहेब! पुढे हळूहळू हे काम करणारे लोक मागे पडू लागले. सोसायटीच्या निवडणुका दहावीस लोक जमून होत असत, त्यांचा सभासदांवर विश्वास असे. पण या निष्काळजीपणाचा पुरेपूर फायदा खासगी संस्थांनी घेतला. निवडणुकीत रस घेतला. त्यात मुंबई बाहेरची मंडळी न चुकता हजर राहू लागली. आणि विशेषतः मतदारांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अनेक पटीने जास्ती होती. आणि तेव्हाच पूर्वीच्या लोकांना समजून चुकले की ते निवडणूक हरणार आहेत. आणि सोसायटीच्या पुढील काळातही अश्या प्रकारे मतदार जमवून निवडणुका लढविल्या जाऊ लागल्या. आणि याच प्रत्यय मीही घेतला आहे. तरीही के.के.हेब्बर, शिवाक्ष चावडा, माधवराव सातवळेकर, बाबुराव साडवेलकर, प्रफुल्ला डहाणूकर, गोपाळराव आडीवरेकर, उत्तम पाचारणे, विजय रावूत, नरेंद्र विचारे, वासूदेव कामत, चंद्रजीत यादव, अनील नाईक लोकांनी सोसायटीला सांभाळले. तिला वाढवले. आणि तिला आजचा हा दर्जा मिळवून दिला.

 


आपली संपूर्ण वाटचाल धीरोदात्तपणे करत बॉंबे आर्ट सोसायटीने १९८८ साली आपली शंभरी गाठली. वरळीच्या नेहरू सेंटर कला दालनात सोसायटीचा वैभवशाली गत इतिहास उलगडणारे एका भव्य प्रदर्शन भरवण्याचे ठरले. त्यामध्ये
आजवरच्या बक्षिसपात्र कलाकृती जमवून त्याचे पुनरावलोकनी प्रदर्शन भरवण्यात आले. ख्यातनाम चित्रकार व महाराष्ट्र राज्याचे माजी कला संचालक कै. बाबुराव साडवेलकर यांनी अपरंपार कष्ट घेऊन आख्ख्या भारतभर विखुरलेल्या बहुतेक पारितोषिक विजेत्या कलाकृती जमवल्या. जेथे ती मिळाली नाही, तेथे त्या चित्रकाराची त्याच कालखंडातील चित्रें मिळवून प्रदर्शीत केली. एक सुरेखसा माहीतीपुर्ण असा कॅटलॉग देखील त्यांनी संपादीत केला. या कॅटलॉगद्वारे भारतीय चित्रकलेचा इतिहासच आपल्या डोळ्यासमोर साडवेलकरांनी उभा केला. हे प्रदर्शन उभारण्यासाठी उद्योगपती श्री विनोद दोशी यांनी तीन लाख रुपयांची भरघोस देणगी दिली. प्रदर्शनाच्या उदघाटनाला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना आमंत्रीत केले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ख्यातनाम चित्रकार के.के.हेब्बर व समिती सभासदांनी सोसायटीच्या प्रदर्शनांना एक कायम स्वरूपी इमारत असावी, त्यामध्ये कला दालन, कला संदर्भ वाचनालय अश्या गोष्टी असाव्यात याकरिता एका भूखंडाची मागणी केली. व राजीव गांधींनीही महाराष्ट्र शासनाकरवी वांद्रे रेक्लमेशन येथे एका भूखंड देण्यास सांगितले. प्रफुल्ला डहाणूकर यांनी मुख्यमंत्री मा. शरद पवार याना सोसायटीच्या जागेविषयी गळ घालून वांद्रे रेक्लमेशन मध्ये एक भूखंड मिळवला.

 


बॉंबे आर्ट सोसायटीच्या शताब्दी निमित्ताने होतकरू कला विद्यार्थ्यांना एक शिष्यवृत्ती देण्यात यावी असा विचार मांडला गेला. त्यासाठी पैशाचे पाठबळ हवे होते. प्रफुल्ला डहाणूकर हे नांव कायमच अनेक संस्थांशी जुळलेले होते. संस्थांना आर्थिक मदतीची गरज असे, तेव्हां प्रफुल्लाताईंचा एक शब्द पुरेसा असे. आणि आताही सर्वांच्या डोळ्यासमोर नांव आले ते प्रफुल्लताईंचे. आणि पैसे उभा करण्याची जबाबदारी प्रफुल्लाताईनी उचलली. त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर नांव आले ते चित्रकार हुसेन यांचे. हुसेन हे तेव्हां चलनी नाणे होते. हुसेन यांच्याकरवी प्रात्यक्षिक करून त्याचा लिलाव करायचा व ते पैसे शिष्यवृत्तीसाठी ठेवायचे अशी योजना त्यानी आखली. अर्थात हुसेन म्हटले की कांही लोकांचा त्याला विरोध असणे हे ठरलेलेच होते. पण सर्व अडचणीवर मात करून प्रफुल्लाताईनी हुसेन त्यांच्यासमोर पेंटींगचा प्रस्ताव मांडला. प्रफुल्लाताईंच्या शब्दाला हुसेन नकार देणे शक्यच नव्हते. पण त्यांनीही एक अट घातली. मी पेंटींग करेन, त्याच वेळी सोबत पंडीत भीमसेन जोशी यांचे गायन हवे असा आग्रह धरला. आणि आपापल्या क्षेत्रांतील दोन दिग्गजांना एकत्र आणून पेंटींग व गायन अशी आगळी वेगळी जुगलबंदी करण्याचा चमत्कार प्रफुल्लाताईमुळे बॉंबे आर्ट सोसायटीच्या इतिहासात तेव्हां घडला. हा समारंभ एन.सी.पी.ए. मध्ये अनेक मान्यवरांच्या साक्षीने साकार झाला. या पेंटींगची विक्री करून आलेल्या पैशातून हुसेन यांच्या नांवे शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. पण हुसेन साहेबानी आपण गुरुस्थानी मानलेल्या चित्रकार बेंद्रे यांच्या नावांचाही त्यात अंतर्भाव करून ही शिष्यवृत्ती 'हुसेन-बेंद्रे स्कॉलरशिप' या नांवाने केली. ही शिष्यवृत्ती दरवर्षी एक होतकरू कलावन्ताला 'हुसेन-बेंद्रे स्कॉलरशिप' या नांवाने दिली जाते. तसेच पुढे ख्यातनाम कलाकारांना त्यांच्या कलासेवेचे ऋण म्हणून 'रूपधर 'हा पुरस्कार देखील सोसायटीमार्फत देण्यात येऊ लागला. पुढे २०१७ साली सोसायटीने आपला शताब्दीपूर्ण रौप्य महोत्सव साजरा केला. त्या वेळी संस्थेने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सोसायटीचे अखील भारतीय स्तरावरील भव्य प्रदर्शन आयोजीत करून त्याचे उदघाटन जहांगीर आर्ट गॅलरीचे चेअरमन मा. आदी जहांगीर व प्रा.परीमल मर्चंट, संचालक, ग्लोबल फॅमीली बिझिनेस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. व सोसायटीने आपल्या पुढच्या कला प्रवासासाठी तयारी सुरु केली.

 


मात्र पुढे या वैभव भोगलेल्या सोसायटीला पूर्वीचे रूप राहीले नाही. सुवर्णपदक व गव्हर्नर प्राईझ हळूहळू बंद झाले. ललीत कला अकादमीने प्रदर्शने भरविण्यास व बक्षीसे देण्यास सुरुवात केली, तेव्हां नामवंत कलाकारांनी सोसायटीकडे पाठ फिरवली. महाराष्ट्र शासनाने वांद्रे येथे सोसायटीला स्वतःची वास्तू उभारण्यासाठी दिलेल्या जागेवर बांधकाम करण्यास निधी उपलब्ध न झाल्याने  योग्य वेळी बांधकाम सुरु झाले नाही. विहीत मुदतीत बांधकाम सुरु न झाल्याने म्हाडाने ती जागा परत घेतली. पण त्या नंतर आलेल्या कमीटीने याचा पाठपुरावा करण्यास आरंभ केला. स्वतः प्रफुल्लाताईनी अनेक अधिकाऱ्यांना स्वतः भेटून त्यांना अडचण समजावून सांगीतली. व अखेरीस वांद्रे रेक्लमेशनवरील जागा परत मिळविण्यास सोसायटीला यश आले. आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे या जागेवर 'बॉंबे आर्ट सोसायटी'च्या भव्य अश्या कलावस्तूचे बांधकाम सुरु झाले. वास्तुविशारद श्री संजय पुरी यांना वास्तूचे काम देण्यात आले. १३००० चौरस फुटावर विस्तारलेल्या या नूतन वास्तूमध्ये ३ कला दालने, ॲम्पी थेटर, ज्याचा लेक्चर्स, व्हिडीओ दाखविण्यासाठी वापर होवू शकतो. शिवाय रेफरन्स लायब्ररी, आर्ट शॉप अश्या गोष्टीही या अमूर्त आकाराच्या क्युबिस्ट स्कल्प्चर प्रमाणे असलेल्या वास्तूमध्ये आहेत. आणि ही बॉंबे आर्ट सोसायटी केवळ मुंबईची नव्हे, राज्याची नव्हे तर संपूर्ण देशाला अभीमान वाटेल अशी गौरवशाली प्रतीमा आहे.
 

 


अश्या या भव्य दिव्य वास्तूचे उदघाटन भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते, १३ फेब्रुवारी २०१६ रोजी, राज्यपाल मा. विद्यासागर राव, तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सांस्कृतीक कार्य मंत्री मा. विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री शरदराव पवार यांच्या उपस्थितीत भव्य सोहोळ्यात झाले. एक नवीन तारा उदयाला आला. आणि पुन्हां गत वैभव घेऊन चित्रकला क्षेत्रांत मार्गदर्शन करण्यासाठी, होतकरू कलावंतांना प्रोत्साहीत करण्यासाठी, व्यावसायिक कलाकारांचा सन्मान करण्यासाठी आणि रसिकांच्या मनात कलाप्रेम जागृत करण्यासाठी पूर्वीच्याच अवतारात प्रकट झाली आहे, बॉंबे आर्ट सोसायटी! जीने आतापर्यंत १२८ वार्षीक कला प्रदर्शने भरवीली आहेत. तिचा 'रूपधर जीवन गौरव पुरस्कार' हा एक लाख रुपये रोख, व मानपत्र असा मानाचा पुरस्कार आहे. हुसेन-बेंद्रे स्कॉलरशिपच्या जोडीला आता लालीबाई धरमदास भांभानी स्कॉलरशिप देखील तरुण कलावंतांना देण्यात येते. 'गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अवार्ड व मेडल,' पदमश्री राम सुतार अवार्ड, हे उत्कृष्ट शिल्पासाठी, 'दी बॉंबे आर्ट सोसायटी अवार्ड' हे उत्कृष्ट प्रवेशिकेसाठी, चित्रकार एस.एम. पंडीत प्राईझ व त्याशिवाय विविध विभागातील कलाकृतींना गेल्यावर्षांपासून अनेक पारितोषिके देण्यात येत आहेत. शिल्पकला विभागाला जेव्हां बक्षीस नव्हते, तेव्हां ख्यातनाम शिल्पकार श्री उत्तम पाचारणे यांनी स्वतः ते ठेवून त्याचा श्रीगणेशा केला. चित्रकार वासुदेव कामत यांनी ‘राजा रवीवर्मा पारितोषिक’ हे उत्कृष्ट पोर्ट्रेटसाठी ठेवले. सोसायटीच्या 'रूपधर जीवन गौरव पुरस्कार' याने आतापर्यंत अनेक महान कलावंतांना सन्मानीत करण्यात आले आहे. त्यापैकी कांही म्हणजे व्ही. ए. माळी, तय्यब मेहता, जहांगीर साबावाला, शिल्पकार सदाशीवराव साठे, लक्ष्मण श्रेष्ठा, प्रभाकर कोलते, सुहास बहुळकर आदी आहेत. आणि १२८ व्या वार्षीक कला प्रदर्शनांत गेल्या वर्षी थोर कलाकार आणि ख्यातनाम कला शिक्षक प्रा.काशीनाथ साळवे यांना 'रूपधर जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानीत केले.

 


सोसायटीने एक नवीन व स्तूत्य असा उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे प्रत्येकाच्या मनांत असलेल्या सूप्त अशा कला गुणांना जागृत करून त्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. व त्यासाठी एक कला शैक्षणीक उपक्रम राबवणे! यामध्ये कलाप्रेमीना आपल्या आयुष्यातील हुकलेल्या कला संवर्धनेला पुन्हां उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. सोसायटीतर्फे पेंटींग व ड्राईंगचे कौशल्य वाढवण्यासाठी ‘बास आर्ट क्लासीस’ या नांवाने कला वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये केवळ त्यांचे कला कौशल्यच वाढवले जाणार नाही, तर त्यांना व्यावसायीक जगांत कसा प्रवेश करायचा, याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कला वर्गांचा कालावधी दोन आठवड्यापासून ते तीन महीने असेल, ज्यामध्ये या सुप्त कलाकारांना रंग रेषा व आकाराच्या कलात्मक जगांत वावरण्यास मिळेल.

आता सोसायटीने १२८ वे प्रदर्शन पूर्ण करून २०२१ मध्ये येणारे आपले '१२९ वे अखील भारतीय वार्षीक कला प्रदर्शन' साकारायच्या तयारीला सोसायटीची तरुण आणि तडफदार समिती सभासद मंडळी कामाला  लागली आहे. अशी आहे ही तुमची आमची 'दी बॉंबे आर्ट सोसायटी,' सर्व कलाकारांशी नाते जोडणारी, नवोदितांना प्रोत्साहीत करणारी आणि कला क्षेत्राचा इतिहास जपणारी देशातील एक अग्रगण्य संस्था!

१३२ वर्षे पूर्ण केलेल्या या सोसायटीची अशीच भरभराट होवो हीच प्रत्येक कलावंताच्या मनातील प्रबळ इच्छा असेल!

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष


( संदर्भ : बाॅंबे आर्ट सोसायटीचा इतीहास : प्रा. बाबुराव सडवेलकर, ‘रापण’: प्रा. प्रल्हाद अ. धोंड)




 





 

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’