मातीच्या कणातून माणूस साकारणारा प्रतिभावान शिल्पकार : भगवान रामपुरे.
१९९३ सालची गोष्ट आहे ही. सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या त्या शिल्पकाराच्या आयुष्यातील स्वतःच्या स्टुडिओची निर्मिती होती त्यादिवशी. गोरेगावच्या भाड्याने घेतलेल्या स्टुडीओत आधी तयार केलेल्या आपल्या मातेच्या शिल्पासोबतच आपल्या कुटुंबीयाचे 'मदर ॲंड चाईल्ड' ह्या शिल्पाची सुरुवात करून आपल्या स्टुडिओचे उदघाटन करायचा घाट घातला होता त्याने. एवढ्यात एका कर्मचाऱ्याने सांगितले, आज पूजा करायची आहे. त्यासाठी एखाद्या देवाची मूर्ती ठेवून तिची पूजा करून स्टुडिओचे उदघाटन करावे. शिल्पकाराने शेजारीच असलेल्या ओल्या मातीतून एक गोळा उचलला. आणि दोन्ही हातानी त्याला पिळवटून एक आकार दिला. आणि त्यातून घडली गणेशाची अमूर्ताकारातील एक सुबक मूर्ती. ती मूर्ती त्या शिल्पकाराने घडवली नव्हती. तर एक अदृश्य शक्तीने त्याच्याकडून बनवून घेतली होती. त्या गणेशाकडे पहाताच शिल्पकाराच्या मनातून आनंदाच्या लहरी उमटून गेल्या. आणि त्याने ठरवले, हा गणेश आता कायमचा ठेवायचा. आणि त्याचा मोल्ड काढून त्यानें अनेक फायबरचे गणेश आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी बनवले. एक दिवस त्याचे एक क्लायंट कामासाठी त्याच्या स्टुडीओत येताच त्यांची नजर या गणेशावर पडली. व तो त्याच्या प्रेमातच पडला. आणि त्याने त्याच गणेशाच्या दोनशे प्रतीमा करून मागितल्या. प्रथम शिल्पकाराने त्याला नकार दिला. पण नंतर त्याने विचार केला, की हा गणेश मी दिला किंवा दुसऱ्याच्या हाताने दिला तरी तो भक्तांच्या हातातच जाणार. आणि त्यांनी त्या करून दिल्यावर त्याची प्रसिद्धी एवढी झाली की निरनिराळ्या ठिकाणाहून त्याला प्रचंड प्रमाणावर मागणी येवू लागली. नाशिकच्या मारुती मोटारीच्या डिलरने तर त्यांच्या विकल्या गेलेल्या प्रत्येक गाडीच्या डॅशबोर्डवर तो लावून देण्यासाठी मोठी मागणी नोंदवली. आणि एक दिवस त्याला टाइम्स ग्रुपचे मालक जैन यांच्याकडून बोलावणे आले. ते फिल्म फेअर प्रमाणे ‘मिस फेमिना अवार्ड’ देणार होते. तेही ज्या मिस इंडीया, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स झालेल्या पंधरा सौंदर्यवती ललनांना! त्यांना ती 'फेमिना लूक ऑ दी इअर' ट्रॉफी त्यांच्या गणेशासारखी लयबद्ध व ग्राफीक हवी होती. आणि तेव्हापासून त्याचा गणेश हा जिल्हा नव्हे, राज्य नव्हे, देश नव्हें तर त्याला परदेशातही मान्यता पावली. मागणीचा ओघ सुरू झाला. आणि त्या गणेशाने त्या शिल्पकाराला स्वतःचा स्टूडीओ, घर, गाडी सर्व कांही मिळवून दिले. आणि हा शिल्पकार म्हणजे सरस्वतीचा आणि बुद्धिदात्याचा वरदहस्त असलेले आजचे आघाडीचे वास्तववादी, सर्जनशील, आधुनिक शिल्पकार श्री भगवान रामपुरे. आज रामपुरे हे नांव घेताच डोळ्यासमोर येतात ती त्यांची असंख्य शिल्पे. कधी गणेशाच्या रूपातील, कधी राधा-कृष्णाच्या रूपातील तर असंख्य अशी भगवान बुद्धाच्या रूपातील.
भगवान रामपूरे यांचा जन्म ७ जानेवारी १९६२ मधील सोलापूरचा. त्यांचे वडील सुप्रसीध्द लक्ष्मी-विष्णू मिल मध्ये काम करीत होते. त्याच बरोबर ते स्वतः एक उत्कृष्ट मूर्तीकार होते. घरी गणपतीची चित्रशाळा होती. सर्वच कुटुंब त्या चित्रशाळेत राबत असे. आणि लहानग्या भगवानच्या हाताला मातीने कधी स्पर्श केला ते त्यालाही कळले नाही. पण त्या मातीशी नाळ जुळली ती कायमची. तेथील कामगार केंद्रात होणाऱ्या नाटकामुळे भगवानची नाटकांची आवड देखील वाढीला लागली. नंतर काही नाटकेही त्यांनी लिहीली. आणि नाटकात ते गुंतत गेले. जोडीला चित्रकलेचेही त्यांना खानदानी वरदान लाभलेच होते. मन दोलायमान होत होते. नाटक की चित्रकला? पण चित्रकला निवडली. आणि सोलापूरला उच्च कला शिक्षणासाठी त्यांनी फाऊंडेशनचा अभ्यास पुर्ण केला. फाऊंडेशन या वर्षात कला विद्यार्थ्याला त्याच्यातील अंतर्गत कलागुण समजून यावेत यासाठी पेंटींग, ड्रॉईंग, शिल्पकला या सर्वच विषयाचा अभ्यास असतो. आणि भगवानचे केलेले एक शील्प त्यांच्या सुदर्शन देवरकोंडा सरांनी पाहीले व भगवानला एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, तुझी चित्रकला चांगलीच आहे, पण तुझी शिल्पकला अत्युत्कृष्ट आहे. आणि तू शिल्पकार झालास तर या सोलापूर शहराला, महाराष्ट्राला, या देशाला एक नामांकीत शिल्पकार मिळेल याची मला खात्री आहे. जणू नियतीच त्यांच्याकरवी वदली होती.
१९८२ साली भगवान यांनी जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिल्पकलेसाठी प्रवेश घेतला. सुरुवातीच्या काळात मुंबईत रहायचीही पंचाईत होती. म्हणून लक्ष्मणच्या कॅन्टीनच्या बाकड्याखाली ट्रँक ठेवून दिवस काढावे लागले. आणि तेथूनच त्यांचे संघर्षमय आयुष्य सुरु झाले. नंतर त्यांना जे.जे.च्या हॉस्टेलमध्ये जागा मिळाली. हाॅस्टेलवर रहात असताना तेथील टी व्ही वर ‘मिर्झा गालिब’ ही मालीका सुरु होती. त्यामुळे गालीब यांच्याशी त्यांची ओळख झाली. चित्रपटांची आवडही होती. त्यातूनही देव आनंद जरा जास्तीच आवडीचे. त्याकाळातील गुरुदत्त, बीमल रॉय, अश्यांचे चित्रपट पाहून जीवन संपन्न होत होतं. १९८७ साली रामपुरे यांनी आपलें जे.जे.तील शिक्षण पुर्ण केले. काही दिवशी त्यानी त्याचे विभागप्रमुख प्रा. खानविलकर त्यांच्या स्टुडीओत काम केले. पुढें त्याना प्रशिक्षणासाठी सिंगापूरला जाण्याची संधि मिळूनही आता नोकरीत गुंतवुन घ्यायचे नाही या मतावर ठाम असलेल्या रामपुरेंनी त्या वयातही ते नाकारले, आणि त्यांच्या शिल्पकलेचा नवा प्रवास सुरु झाला. पुढे २००० साली एक दिवस त्यांचे मित्र अरुण शेवते आपल्या एक मित्राला घेऊन त्यांच्या स्टुडीओत आले. त्या मित्राने 'गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते' हे पुस्तकं लिहीले होते. त्यांच्या सोबत भगवान रामपुरेही गेले. गुलज़ार आधीपासूनच रामपुरेना नांवाने ओळखत होते. त्यावेळी रामपुरेंनी त्यांच्याकडे त्यांचे पोर्ट्रेट करणयाची इच्छा व्य्क्त करून त्यांना वेळ देण्याची विनंती केली. त्यांनी लगेच त्याला होकार देवून तब्बल तीन दिवस त्यानी दिले. या तीन दिवसात त्या दोघांचेही सूर जुळले. त्यांच्यात एक प्रकारची आत्मीयता निर्माण झाली. पुढे दोघांच्या नात्यातील खुमारी वाढतच गेली. व गुलजारनी रामपुरेंकडून आणखीही काही शिल्पे बनवून घेतली
अश्या या कलेचा परीस स्पर्श लाभलेल्या रामपुरेंनी नुसती कला निर्मिती डोळ्यासमोर ठेवली नाही, तर त्या कलेला त्यांच्या आतून येणाऱ्या उर्मी आणि स्पंदनानी त्याला आविष्कृत केले. त्यांच्या शिल्पामध्ये आकार निराकाराचा संगम असतो. त्यांचे मन आणि दृष्टी याच्यातून निर्माण झालेली ती एक आधुनिकता आणि सौंदर्याचा साज चढवलेली दैवी कलाकृती असते. आणि या त्यांच्या धारणेचा उगम फार पूर्वी झाला होता. ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूने त्यांचे वाचन, निरीक्षण, अध्यात्म याकडे पाऊले पडत होतीच. जेव्हां ते पुण्यातील आचार्य रजनीशांच्या आश्रमात गेले, तेव्हां त्यांच्या आचार विचार, त्यांच्या साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. जरी देहरूपी रजनीशांची त्यांना भेट झाली नाही, तरी त्यांची पुस्तके, सी डी, व्हिडीओ यातून रजनीशांची ओळख झाली. त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे वडील गेल्यावर रामपुरेंनी जन्म, मृत्यू याचा शोध घेण्यास आरंभ केला. रजनीशांच्या आश्रमात गेल्यावर ओशोंच्या काही पुस्तकांनी त्यांच्यावर खूप प्रभाव टाकला. जीवनाचे संपूर्ण सार त्यांनी उलगडून दाखवले होते. त्यांच्या 'शांती की खोज' व 'ज्योतीष एक अध्यात्म व ज्योतीष एक विज्ञान' या पुस्तकांनी ध्यानाची अवस्था, जीवनाची सात चक्रे यांचा धम्मचक्रापर्यंत प्रवास कसा होतो, याचे संपूर्ण ज्ञान त्याना मिळाले. मुळात असलेली अध्यात्माची ओढ जास्तच प्रबळ होऊ लागली. लहानपणी पुराणकथांतून जाणवलेली गूढता नेहमीच मनाला भुरळ घालत होती. भगवान बुद्धाचे चरीत्र, लीळा चरीत्र, पाश्च्यात तत्ववेत्यांचे साहीत्य हे सर्व वाचून एका अनामीक ओढीने ते भारले गेले. साहीत्य, कला आणि तत्वज्ञान यांच्या मधुर अश्या मिलापात रामपुरे पूर्णपणे मिसळून गेले. अमूर्ताच्या शोधास लागले. ध्यान धारणेतून त्यांच्या आंतरीक अवस्थेत त्यांना कांही आकार दिसू लागले. कल्पना सुचू लागल्या. आणि ध्यान अवस्थेतून बाहेर येताच ते त्या आकारांना मूर्त स्वरूप देऊ लागले. आणि भगवान ओशोंच्या दृष्टिकोनातून त्यांनी मीरेचे शिल्प करायचे त्यांनी ठरवीले. ही मीरा कृष्ण भक्तीने अंतर्बाह्य उजळून निघालेली असणार या भावनेने त्यांनी कृष्ण भक्तीने धुंद झालेली वीणाधारी मीरा साकारली. आता या मीरेला जाणवणारा कृष्ण कसा असेल हा विचार रामपुरेंचा मेंदू सतत कुरतडू लागला. कारण मीराने कृष्णाला देहरूपी कधी पाहीलेच नसणार. तेव्हां त्याला आकार नसेल. तो केवळ भासमय असेल. म्हणून केवळ बाह्य आकाराने त्यांनी भासमान होईल असा आविष्कृत केला. आणि त्या भक्ती आणि शक्तीतून साकारले मीरा-कृष्णाचे एक अजोड असे शिल्प आकाराला आले.
अश्या विचारांनी भारलेल्या रामपुरेंनी आपला कला प्रवास मोठ्या सर्जनशील आणि कलात्मकतेने सुरु ठेवला. शिल्पामधील निगेटिव्ह स्पेस त्यांच्या नजरेत एक आकार निर्माण करीत होती. शिल्प म्हणजे मूर्त आकाराचे अस्तित्व दर्शवणारे प्रतीक. पण आता रामपुरे यांना नास्तित्व साकारायचे होते. जे नाही त्याला महत्व द्यायचे होते. आणि त्यातून त्यांनी साकारलं एक धातू शिल्प. 'बियॉंड द सर्कल ऑफ लाईफ.' दोन हात फैलावलेली मनुष्याकृती. मात्र मस्तक, हात व पाय यामध्ये पाच वर्तुळे साकारली आहेत. या शिल्पाला स्पर्श करताच ही पाचही वर्तुळं कंप पावतात. आणि त्यातून जाणवते ती परमहंस अवस्था! आणि मानवाच्या अंतरातील चैतन्याचा स्पर्शानुभव भगवान बुद्धाची शिल्पे करताना त्यांनी साकारला. ध्यानस्थ बुद्धाच्या बुद्धीपणाला भिडतांना त्यातील पोकळी हा स्पर्शानुभव हा जाणवू लागला. कलाकाराच्या नजरेतून बुद्ध हा आधुनिकतेचे, बौद्धिकतेचे प्रतीक आहे. तो शरीर नसून एक विचार आहे. त्याची दृष्टी आणि कौशल्य दोन्ही जेंव्हा एकवटतात तेव्हां ती पोकळी ध्यानाचे प्रतीक होते. आणि त्या पोकळीत आकार विरघळतो व तो निराकार होतो. आंतरीक सौंदर्याची ही महान अशी व्याख्या त्यानी केली आहे. आणि आकार व निराकार अशा बुद्धाच्या प्रतीमा त्यांनी साकारल्या
शिल्प निर्मिती करतांना रामपुरेंनी विविध माध्यमे हाताळली. त्यात ब्रॉन्झ, लाकूड, मार्बल, फायबर, काच ही प्रामुख्याने येतात. त्यांनी आपल्या शिल्पकलेची अनेक प्रात्यक्षिके सर्व ठिकाणी दिली आहेत. त्यांना लाभलेले भाग्य म्हणजे त्यांना अनेक नामवंतांची समोर मॉडेल म्हणून बसवून त्यांचे शिल्प करण्याची संधी मिळाली. यामध्ये विजय तेंडुलकर, डॉ.श्रीराम लागू, सुशीलकुमार शिंदे, अमीरखान, चंद्रकांत गोखले, गुलजार, दिलीप प्रभावळकर, कवी ग्रेस, भास्कर चंदावरकर अशी दिग्गज व्यक्तिमत्वे होती. त्यांची शिल्पे महाराष्ट्रत अनेक ठिकाणी स्थानापन्न झाली आहेत. त्यापैकी कांही म्हणजे सांगली येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे शिल्प, पुण्याच्या दीनानाथ इस्पितळाच्या आवारातील योगी, महाबळेश्वर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, दलाल स्ट्रीटवरील स्टाॅक एक्स्चेंज मधील ब्रॉन्झचा बिग बुल, वास्तविक सदर बुल हा अमेरिकेतील शेअर मार्केटच्या बुल ची प्रतीमा हवी होती. पण रामपुरेंच्या मनाने ठाम घेतले होते की त्याची केवळ नक्कल असता कामा नये, तर त्यात आपल्या भारतीय लोकांना जाणवणारा अस्सलपणा असला पाहीजे. आणि आज प्रसीद्धी पावलेले हे बिग बुलचे शिल्प रामपुरे यांच्या कलात्मक बोटातून साकारले. सत्ता-ऐश्वर्य आणि ताकद याच्या उन्मादाचं प्रतीक असलेला हा महाबैल शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य मध्यम वर्गीयाला शाश्वत हमी देणारे शक्तीचे प्रतीकच त्यांनी शिल्पबद्ध केले आहे.
रामपुरे यांची बैठकच अध्यात्मिक विचारधारेतून घडली आहे. त्यांच्याशी बोलतानाही त्यांचे विचार ते सतत व्यक्त करतात. त्यातून त्यांचे चिंतन, योग धारणा, त्यांना जाणवणाऱ्या आंतरीक ऊर्जेची स्पंदने, समोरच्या अवकाशातील पोकळीतून होणारे विविध आकार, आणि त्यातील आकारांना दिलेले भासमय स्वरूप ह्यातून ते दृष्टीपथात येते. हातात कौशल्य तर आहेच, शिवाय त्या कौशल्याला सर्जनशीलतेची, चिंतनाची आणि भौतीक सामर्थ्याची जोड मिळाली की त्याचे शिल्पं तुमच्याशी संवाद साधते. आणि त्यांच्यातील सौन्दर्य दृष्टीने तें अधिक सुंदर होऊन साकारते. त्याचा स्पर्श तुमच्या मनात जाणिवा निर्माण करतो. आणि एक आगळीवेगळी अनुभूती आपल्याला रामपुरेंची शिल्पे देऊन जातात. वीस वर्षांपासून त्यांच्या डोक्यात एक विषय घुमत आहे. पण अद्यापही ते शिल्पात रुपांतरीत झाले नाही. म्हणजे त्यांचे म्हणने असे आहे की विषय सुचल्याबरोबर शिल्प करायला बसता येत नाही. ते प्रथम मनात झिरपते. तुमच्या अंतर्पटलावर दिसणं ही त्यांच्या मते पहीली प्रक्रीया आहे. नंतर मनामध्येच त्याचे अनेक आकार होऊ लागतात. मनामध्ये शिल्प घडत असते. जसे स्त्रीच्या शरीरात बाळ हळूहळू वाढत असते, आकार घेत असते, तसेच मनामध्ये ते शिल्प साकारत असते. आणि जेव्हां मला वाटते आता ते मातीत आकारायला हवे, तेंव्हा मातीत ते साकारू लागते. ते होताना त्याला किती काळ लागेल हे ते शिल्पच ठरवते. आणि आपल्या मनामध्ये जो आकार दडलेला आहे तो परीपूर्ण होईपर्यंत ते काम चालूच रहाते. वेळेचं त्याला बंधन नसतं, हा रामपुरे यांचा सिद्धांत आहे. अध्यात्माची आणि शिल्पकलेची योग्य प्रकारे सांगड रामपुरे घालतात. त्यांच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे सर्वसाधारण लोक जे रोज पूजापाठ करतात, पोथीवाचन करतात ते म्हणजे अध्यात्म नाही. ती परंपरा आहे. जी गोष्ट पूर्वजांनी आपल्या मनावर ठसवली आहे, ती आपली मनःस्थिती घडवणारे एक वातावरण असते. अध्यात्म म्हणजे ध्यान आहे, तुमच्या संवेदना विकसित करणं, ध्यानात जाणं आणि कला ही त्यातील एक माध्यम आहे. तुमच्यात निसर्गाची ऊर्जा सतत असते, ती विकसित करणं हा अध्यात्माचा मार्ग आहे. आणि जेव्हां तुम्ही त्याच्याशी एकाग्र होता, तेंव्हा तुमच्या देहाचे भान तुम्हांला रहात नाही. भान हरपणं ही अध्यात्माच्या स्थितीला जाण्याची अवस्था आहे. रामपुरे बोलू लागले की जणू ऋषी मुनींची वाणीच त्यांच्या मुखातून शब्दावाटे प्रकट होत आहे की काय? असा भास होतो. आणि त्याचे प्रत्येक शिल्प या अध्यात्माच्या अनुभवावरून आविष्कृत झाले आहे.
आपल्या शिल्पातून रामपुरे यांनी प्रतीकात्मक अनुभव देखील दिला आहे. मीरेचे शिल्प करतांना त्यांनी अनेक प्रवचनं ऐकली. तेव्हां ते संपूर्ण मिरामाय झाले. तिच्यासाठी मॉडेल शोधत होते. साधारण वर्षभर ते मीराचा शोध घेत होते. गाडीतून जाताना ते वेगवेगळ्या स्त्रियांकडे पहात. कित्येकदा शेजारी असलेल्या त्यांच्या ड्रायव्हरला ते चमत्कारीक वाटे. साहेब हल्ली बायकांकडे कां पहात असतात, हा प्रश्न त्याला पडे. आणि एका लग्नाच्या पार्टीत त्यांना त्यांची मीरा मिळाली. आणि मग त्यांनी मीरेच्या वेगवेगळ्या अवस्था जाणून घेतल्या. आणि त्यातून त्यांची अजरामर मीरा साकारली. ध्यान करताकरता ती देहाची अवस्था विसरून गेली आहे. तिच्या हातातून एकतारा गळून पडला आहे. आणि निश्चल अशी मीरा श्रीकृष्णाच्या पायाशी एकरूप होऊन पडली आहे. आणि श्रीकृष्ण आकार देताना त्यांना नेहमीची मंदिरातील मुर्ती नको होती. तो भासमय कृष्ण हवा होता मीराला जाणवलेला. तो कृष्ण सदेह भेटत नसेल! तेव्हां रामपुरे स्वतः मीरा बनून कुंडलिनीतून ध्यानाच्या प्रक्रियेत गेले. मीराच्या भावनेत परकाया प्रवेश करून पाहीले तेंव्हा त्यांना आकार दिसला नाही. फक्त प्रकाश जाणवला. आणि त्याप्रमाणे त्यांनी भासमय असा श्रीकृष्णाचा आकार दिला. आणि त्यातूनच त्यांना जाणीव झाली मातीतून आकार निर्माण करण्याची. असेच एका रात्री ते झोपेतून जागें झाले, आणि त्यांनी त्यांना जाणवलेले बुद्धाचे त्या अवस्थेतील रूप. आणि जाग येताच त्याच मनस्थितीत त्यांनी भराभरा रेखाटायला सुरुवात केली. हे विचार डोक्यातून न येता अंतर्मनातून जाणवलेले होते. आज त्यांचा मिराविषयी एवढा अभ्यास झाला आहे की एखाद्या चित्रपटाप्रमाणे तें मीरेच्या बालपणापासूनचा सर्व अवस्था शिल्पबद्ध करु शकतात.
त्यांनी जेव्हां त्यांनी स्लीपिंग बुद्ध केला तेंव्हा त्याचा उजव्या हातावर रेललेला चेहरा आणि पहुडलेल्या कटीवर ठेवलेला हात एवढेच दाखवले. पण तरीही त्यात नसलेला भागही आपल्या नजरेला दिसतो. आकार आणि निराकार यांचे हे सुंदर उदाहरण आहे. आणि यातूनच त्यांची बुद्धाची मालीका तयार झाली. हे शिल्प कोठेही ठेवले की त्याच्या पोकळ भागामधून रामपुरेना सदैव साथ देणारा नैसर्ग दिसतो व त्या शिल्पाचा तो एक भाग बनून जातो. शिवाय त्या शिल्पामधील लयबद्ध आणि मोहक अशी रचना, त्याची शांत भाव असलेली आणि चेहऱ्यावर समाधानाची तृप्ती असलेली बुद्धाची मुद्रा पहाताच आपणही तेथे नम्र होतो. त्याचे विचार सर्वत्र पोचतात. तसेच दुसऱ्या शिल्पात त्यानी ध्यानस्थ बुद्धाच्या मस्तकाखाली पोकळी दाखवली आहे.
त्यांनी भगवान ओशोंचे शिल्प जेव्हां साकारले, तेव्हां त्यांच्या समाधीला त्यांनी भेट दिली. त्याच्या त्या खोलीत ओशोंचा एक फोटो आहे. त्याखाली लिहिले आहे, या वेळी माझा जन्म झाला, मी पृथीतलावर आलो. या साली मी पृथ्वीचा निरोप घेतला. आपण कोण आहोत याचा शोध त्यांना होता. ध्यान हे महत्वाचे आहे म्हणून कोणत्याही विषयावर त्यांचे प्रवचन झाले की त्याचा शेवट ते ध्यानात करत. त्यांचे विषय मीरा, कृष्ण, महावीर, आरोग्य, किंवा संभोग असोत, अखेरीस ध्यानाचे महत्व ते पटवून देत. ध्यान करणे म्हणजे निर्विकार होणे. शून्य अवस्थेत पोचणे. तुमचा प्रवास होतो ध्यानातून शुन्याकडे. त्यामुळे त्यांनी ओशोंचे ध्यानाचे हात घेतले. त्यांचा चेहरा केला आणि शून्य दर्शविण्यासाठी गोल काच लावली. काचेमुळे त्यात पारदर्शकता आली. काचेखाली हात म्हणजे 'ध्यानातून शुन्याकडे' हे शिल्प तयार झाले. आणि कुंडलिनी जागृत झाल्यावर जे कमळ फुलते व आनंदाच्या लहरी अनुभवहून आपण परमानंदाला पोचतो, त्यामुळे त्यांच्या केसाच्या ठिकाणी कमळ दाखवले आहे. केवढा प्रचंड विचार करतो हा शिल्पकार? ज्याच्या प्रत्येक बाबीतून जाणीव होत असते ती आध्यात्मिक सामर्थ्याची. निसर्गाच्या ऊर्जेची आणि त्यातून बळ मिळून साकारणाऱ्या एकेक अजरामर अश्या शिल्पांची.
त्यांनी जेव्हां गुलजार त्यांचे शिल्प केले तेव्हां गुलजार यानी तत्काळ होकार दिला. तोही तब्बल तीन दिवस तें मॉडेल म्हणून बसत होते. एरवी कोणतीही गोष्टी त्यांना पटल्याशिवाय होकार देणाऱ्यांपैकी गुलजार नव्हेत. पण त्या वेळी त्यांनी सांगीतले, मी जो बसतो आहे ते माझें शिल्प होणार म्हणून नव्हे, तर मातीच्या कणातून माणूस कसा निर्माण होतो, ते पहाण्यासाठी मी आलों आहे. त्यांनी हे गुलजार यांचे शिल्प केले आहे, ते पहाताच त्यातून जाणवतो आपल्याला त्यांचा प्रखर बुद्धिमत्तेने उजळून निघालेला आणि कविमनाचे भाव दर्शवणारा एक चिंतनशील आणि चैतन्यमय चेहरा. विचारात मग्न असताना अगदी सहजगत्या त्यांनी आपला चष्मा डोळ्यावरून उतरून हातात धरला आहे. किती नैसर्गिकपणे बद्ध केले आहे हे त्यांचे मनस्वी रूप! सांगलीला मास्टर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बसवण्यासाठी जो मा. दिनानाथ यांचा अर्धपुतळा रामपुरेंनी बनवला तेव्हां तो पहायला लतादीदींसह सर्व कुटुंब हजर होते. वडीलांचे केलेले शिल्प पाहून दीदी भावूक झाल्या होत्या. त्यांनी केलेले रामपुरेंचे कौतुक त्यांना अत्यंत मोलाचे वाटते. तसेच पुण्यातील मा. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आवारात बसवलेला 'योगी' हे देखील एक भावनाशील शिल्प तेथे आहे. याच लता दीदींना फिल्म फेअर ने 'हम आपके है कोन' या चित्रपटातील गाण्यासाठी फिल्मफेअर अवार्ड देण्यासाठी निवडले होते. पण लता दीदींनी आधीच जाहीर केले होतें की, यापुढे आपण कोणत्याही स्पर्धामध्ये भाग घेणार नाही. तरी ते अवार्ड दुसऱ्या कोणाला तरी देण्यात यावे. पण फिल्मफेअर वाले जेव्हां गळच घालू लागले, तेव्हां त्यांनी सांगीतले की मला केवळ आठवणीसाठी या अवार्डची एका लहान ट्रॉफ़ी करून द्या. आणि ती करण्याचे काम अर्थातच रामपुरेवर सोपविण्यात आले. आणि ती त्यांची 'मिनी फिल्म फेअर अवार्ड' ही ट्रॉफी आज दिमाखाने लतादीदींच्या घरी स्थानापन्न झाली आहे.
अशीच गोष्टी आहे दिल्ली येथे बसवलेल्या मिर्झा गालीब यांच्या अर्धपुतळ्याची. मिर्झा गालीब यांच्या २१३ व्या जयंतीला, त्यांचा अर्धपुतळा २६ डिसेंबर २०१० रोजी त्यांच्या हवेलीत बसविण्याचे दिल्ली प्रशासनाने ठरवले. या हवेलीचे नूतनीकरण करून त्यातील कांही भाग हा म्युझियम मध्ये परिवर्तीत करण्यात आला. आणि तेथे हा पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सुप्रसीध्द कवी, दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते बसवण्याचे ठरवले. दर्जाच्या बाबतीत अतीशय जागरूक असलेल्या गुलजार यानी हा अर्धपुतळा भगवान रामपुरे यांनाच करायला द्यावा असे सुचविले. आणि रामपुरे यांचे आणखी एक शिल्प दिल्लीत स्थानापन्न झाले. अश्या या भगवान रामपुरे याना असंख्य पारितोषिके मिळाली. अनेक सन्मान त्यांच्या वाट्याला आले. कला क्षेत्रात 'महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' हा पुरस्कार त्यांना मिळाला. सई परांजपे व इतर दिग्गजांसमवेत ते प्रतिष्ठेच्या 'गोदा गौरव पुरस्कार' याचे मानकारी ठरले. आर्ट सोसायटीचा जीवन गौरव पुरस्कार व अन्य पारीतोषिके त्यांना देण्यात आली. २०१२ साली नव सह्याद्री पुरस्काराने ते सन्मानीत झाले. त्यानी आपल्या शिल्पाकृतींची प्रदर्शन पुणे, आणि सोलापूरला त्यांच्या जन्मगावी भरवले. त्यावेळी अनेक मित्रांनी, कलाकारांनी स्वतः येऊन ह्या कार्यक्रमाची गोडी वाढवली. त्यांची कामे परदेशातही पोचली. आज गुलजारजी, आमिरखान यांची केवळ त्यांनी शिल्पे बनवली नाहीत, तर त्यांच्या संग्रहात रामपुरेंची विविध माध्यमातील अनेक शिल्पे आहेत. तसेच मस्कत येथें स्थापीत झालेले 'सुलतान काबूस रोझ' हे पंचवीस फूट उंचीचे शिल्प देखील त्यांच्या हातून घडले आहे.
आज लाॅकडावून असताना त्यांना कसे वाटते यावर त्याचे उत्तर होते, 'कोणताही कलाकार हा सतत लॉकडाऊन मध्येच असतो. कारण तो आपल्या कलाकृतीत मग्न असतो. त्यांत त्याचे भान हरपून गेले असते. आजूबाजूच्या परिस्थितीचे भान त्याला रहात नाही. मग आताच्या या लॉकडाऊनचे वेगळेपण काय वाटायचे. मात्र व्यवसाय म्हणून त्यावर थोडा परीणाम होतो. पण मला जो आज दुसऱ्याशी बोलण्याचा, त्यांच्या सोबत वेळ घालविण्याचा, मुलाखती देण्याचा जो आनंद मिळतो तोही काही वेगळा आहे. माझ्या ध्यानस्थ अवस्थेत मला जे काय आकार दिसतात, ज्या प्रतीमा दिसतात, त्यांच्या जाणिवा होतात, त्या मी जागा झाल्यावर त्यांची भराभर स्केचेस करून ठेवतो. कारण पुन्हां कधी त्या अवस्थेला जाईन ते माहीत नसतं
सोलापूरच्या विमानतळ मार्गाच्या आडवाटेवरील होटगी रोडवर भगवान रामपुरे यांचा ' रामपुरे आर्ट स्टूडीओ' आहे. निसर्गाची ओढ असलेल्या या कलाकाराला निसर्गाने वेढलेल्या अश्या वातावरणात आणि निसर्गाच्या कुशीत कला आविष्कृत करायची संधी मिळाली आहे. शांत अश्या त्या वातावरणात केवळ पक्षांची किलबिल आणि पानांची सळसळ असलेल्या त्या आश्रमाप्रमाणे स्थापीत केलेल्या जागेत रामपुरे आपले काम निसर्गाशी संवाद साधत करीत असतात. त्यांच्या सर्व कुटुंबासोबत ते आपला हा प्रचंड कला संसाराचा प्रवास दिमाखात करत आहेत. रामपुरे यानी आपला स्टूडीओ स्थापन केला, तेव्हां त्यांचा मुलगा सागर हा तीन वर्षांचा होता. आज तोही व्यावसायीक शिल्पकार होऊन आपल्या कलाकृती साकारत आहे. वास्तववादी ते अमूर्तवादी शिल्पं साकारण्यात त्याने प्राविण्य मिळवले आहे. नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त त्याने मोदीजींचा अर्धपुतळा बनवून त्यांना एक आगळी वेगळी भेट दिली. तसेच त्याने संतोषगिरी महाराजांचे पूर्णाकृती शिल्पं देखील बनवले आहे. पुढच्या पिढीचा कला प्रवास चालूच आहे. एकदा त्यांना विचारण्यात दिले की, आपल्या चिरंजीवांचाही कला प्रवास आपल्याप्रमाणेच प्रगतिशील पद्धतीने चालू आहे. आपल्या त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? यांवर रामपुरेंनी मोठे मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, जर मी माझ्याकडून कांही अपेक्षा ठेवल्या नाहीत, तरी माझ्या मुलाकडून कां ठेवू? आज तो प्रगतीच्या वाटेवर आहे. आणी तो सतत पुढें जातं राहणार यांची मला खात्री आहे!
रामपुरे यांच्या स्टुडिओच्या आत जाताच आपल्याला समोर येते तो प्रचंड असा वटवृक्ष. त्याच्या पारंब्यांच्या आणि विस्तारलेल्या सावलीत एक चिंतन करणारा योगी दिसतो. हे आहेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ. त्यांचे मन एकाग्र केलेली मुद्रा, आपल्या मनाचा वेध घेणारे डोळे, थोडेसे मोठाले असे पोट, मांडी घालून आसनस्थ झालेली त्यांची ध्यानाची बैठक. माळेतील मणी, हातांची बोटे या सर्व गोष्टींचे रामपुरे यांनी इतके सुरेख असे बारकाईचे केलेले काम पहाताच स्वामीजींच्या समोर आपण नतमस्तक होतो. आणि हे सर्व पहाताच जाणवतं की अध्यात्माची ओढ असलेल्या, तो अनुभवलेल्या आणि त्यातून मिळणाऱ्या संकेतानुसार आपली कला आविष्कृत करणाऱ्या रामपुरेना आपला हा स्टुडिओ आंतरीक संकेताप्रमाणे का करावासा वाटला! ती निसर्गाची असलेली एक प्रेरणा आहे. ध्यानासाठी मिळणारी ती एक ऊर्जा आहे. आणि त्या अंतर्मनातून प्रेरणा घेत ते मातीच्या गोळ्यातून शिल्प साकारतात. कारण त्यांना माहीत आहे, माती आपण जे सांगु इच्छीतो ते ऐकते. आपल्याशी संवाद करायला लागते. कारण भावना व्यक्त करायचे तेही एक माध्यम आहे!
शेवटी रामपुरे यांच्याच काही ओळी उदघृत कराव्याश्या वाटतात.
कळलेच नाही
जगणे,
सत्य म्हणावे की भास कळलेच नाही
आयुष्य संपत आहे,
जीवन काय हे अजून कळलेच नाही
ओळखतात सारे मला पण,
स्वतः मलाच मी, अजून कळलेच नाही
आता मी जसा ही आहे ते,
स्वतःला मी घडविले आहे?
की नियतीने,
अजूनही मला कळलेच नाही !
------------------------------
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष











Comments
Post a Comment