एक अतूट नाते बंधन : प्रा. नरेंद्र विचारे.

 


एक वर्षी कांही विद्यार्थ्यांची एक बॅच माझ्याकडे आली. प्रविण घरत, सुनील वाकळे, सुभाष गोरेगांवकर, अरुण चिंदरकर, नरेंद्र विचारे, शेखर साळवी, दत्ता पाडेकर, अनील गांधी, विजय कुल्लरवार, बाळा राणे, असे विद्यार्थी व गीता राव, शैला कुलकर्णी, पुष्पा पाटील, भारती जोगळेकर( जी पुढे माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून आली), हेमा धुमटकर, रंजना कानविंदे अश्या विद्यार्थीनी असे अनेक आजही आठवणारे विद्यार्थी त्या बॅचमध्ये होते. वर्ग होता द्वितीय वर्षाचा. पुढे यात भर पडली ती नागपूरहून आलेल्या रमेश खापरे, प्रकाश बिसने या विद्यार्थ्यांची आणि नाना पाटेकराची. हे बहुतेक विद्यार्थी माझ्या जवळचे होते. त्यातही शेखर साळवी, नरेंद्र विचारे, रमेश खापरे, हे जरा जास्तीच जवळ आले. त्यालाही कारण होते. विचारेचे ड्रॉईंग उत्तम होते. शिवाय तो खेळही चांगले खेळायचा. विशेषतः खो खो, कब्बडी, व्हॉलीबॉल हे त्याचे आवडते व प्रावीण्य मिळवलेले खेळ.  पण होता सणकी  डोक्याचा. कधी भडकला तर बघायला नको. लालबाग परळची माती होती ती. खापरे तसा सौम्य प्रवृत्तीचा. पण मोठा बेरकी होता. तर शेखर साळवी हा सगळ्यांच्या मदतीला येणारा. नेहमी खाली मान घालून बोलणारा. आणि या सर्वाना धरून रहाणारा म्हणजे आमचा नरेंद्र विचारे. तसा तो कट्टर शिवसैनिक होता. तीही त्याची बाजू होती. आणि शेवटच्या वर्षी नरेंद्र -शेखर ही जोडगोळी जे.जे.चे विद्यार्थी  सेक्रेटरी म्हणून निवडून आले. आणि संस्थेत त्यांनी बरेच कार्यक्रम केले. येथेही वर्गकामाचा खर्च भागविण्यासाठी त्याला बाहेरील कामे, विशेषतः रांगोळ्यांची प्रदर्शने व साईन बोर्डस करून पैसे मिळवावे लागत.

 


अश्या या हरहुन्नरी कलावंतांचा जन्म ७ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबईत परळ येथील गिरणगावात झाला. शाळेपासूनच त्याचा ओढा चित्रकलेकडे होता. मोठा भाऊ पोर्ट्रेट करीत असे. ती पाहूनही तें प्रभावीत झाले. शिवाय ते रहात असलेल्या कोळी चाळीत सुप्रसीध्द नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांचे वास्तव्य होते. त्यांचे कामही नजरेस पडत असे. जवळच वायंगणकर नांवाच्या मूर्तिकाराचा गणेश मूर्तींचा कारखाना होता. तेथेही जाऊन ते करत असलेल्या मुर्त्या न्याहाळणे, त्यांचे रंगकाम पहाणे हे देखील विचारेंचे नित्याचे काम होते. आणि परळ हा भाग अश्या कलाकारांची भूमी समजली जात असे. आई-वडिलांना आपल्या या मुलाचे कौतुक असल्याने, घरची हलाकीची परिस्थीती असूनही नरेंद्राची चित्रकाला वाढीला लागावी म्हणून, प्रसंगी पोटाला चिमटा काढूनही ते त्याला चित्रकलेचे साहीत्य पुरवीत होते. पुढे विचारे भोईवाड्याच्या नवभारत विद्यालयात दाखल झाले. तेथे बापट नावाचे चित्रकला शिक्षक होते. त्यांनी विचारेंची कला पाहून त्यांना खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्या शाळेत चित्रकला व रांगोळ्या मध्ये विचारेंचे नांव गाजत होते. त्याच सोबत अभ्यासाच्या बाबतीत एक अत्यंत हुशार व नेहमी पहील्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचेही नांव गाजत असे. हा विद्यार्थी म्हणजे एक अर्थ तज्ञ म्हणून प्रसीद्ध असलेले व पुढे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गाजलेले डॉ. भालचंद्र मुणगेकर! आणि शालेय शिक्षणानंतर नरेंद्र विचारे सर जे.जे.उपयोजीत कला संस्थेत दाखल झाले. आणि या त्याच्या चिकाटीने व जिद्दीने त्याला अंतीम वर्षाच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून दिला.

पुढे कला शिक्षण संपल्यावर नरेंद्र विचारे , शेखर साळवी व रमेश खापरे  जे.जे.मध्ये अधिव्याख्याते म्हणून लागले. आणि त्यांची शिक्षकी कारकीर्द सुरु झाली. आणि विचारे यांच्या कलागुणांमुळे, त्याच्या ड्रॉईंग मुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये मिसळून, त्यांना मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे लवकरच विचारे हे विद्यार्थी प्रिय झाले. त्यांच्या कामाचा उरकही इतका प्रचंड होता की, कोणतेही काम असो, त्याने ते अल्पावधीत आटोपलेच म्हणून समजा. आणि विद्यार्थी देखील त्यांच्या मनमिळावू व मदत  करण्यास तत्पर असलेल्या स्वभावामुळे विद्यार्थी लवकरच त्यांच्यावर विसंबून राहू लागले. ड्रॉईंग स्टुडीओमधील प्रा. तिरोडकर सरांचे काम देखील विचारेंवर प्रभाव टाकत असे. आणि हेच ज्ञान ते आपल्या विद्यार्थ्यांना वाटत असत. विचारेंचे खेळीमेळीचे वागणे, वेळ प्रसंगी त्यांचे दटावणे यामुळे संस्थेत असलेली कांही दांडगट मुलेही त्यांना वचकून असत. त्यांचे काम आणि वचक या गुणामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये ते अतीशय लोकप्रिय ठरले. कोणाच्याही अडी अडचणी सोडवणे हा सुद्धा त्याचा एक स्थायीभाव होता. कोणत्याही वेळी मदतीला धावणे हा स्वभाव होता. संस्थेचे अधिष्ठाता त्यांना संस्थेकडे येणारी अनेक कलात्मक कामे करण्यास देत असत. विशेषतः प्रदर्शने, स्टाॅल अश्या मोठ्या कामामध्ये विचारेंची खास हुकूमत होती

 


मध्यंतरी जे.जे.कला संस्थांमध्ये प्रथम शिक्षकांचा कला संचालकांविरूद्ध व ते शिक्षक आम्हांला नको म्हणून कांही विद्यार्थ्यांनी घडवून आलेला संप झाला. प्रा. बाबुराव साडवेलकर हे कला संचालक म्हणून आल्याबरोबर त्यांनी केलेल्या कांही शिक्षकांच्या बदल्यामुळे हे घडले होते. दरम्यानच्या काळात विचारे यांची औरंगाबादला बदली झाली. मुंबईत संसार असलेल्या व्यक्तीवर बाहेर गेल्यावर काय आपत्ती येते हे त्याचा अनुभव घेतल्यालाच कळते.  पण बाबुरावांनी विचारेना पुन्हा मुंबईला आणले. याच दरम्यान विचारेंचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंध आले. जवळीकही झाली. बाळासाहेब त्याला 'गुरुजी' असे संबोधित. त्यांनीही संस्थेत येऊन संप मिटावा म्हणून विचारेंनी त्यांना उद्धवकरवी विनंती केली. त्याप्रमाणे बाळासाहेब आले देखील. पण संपकरी शिक्षकांनी आमचे मागणे शासनाशी आहे. इतर कोणाशी आम्ही बोलणार नाही असें म्हटल्यावर बाळासाहेबांनी संपावरील शिक्षकांचा उद्धार केला व ते निघून गेले. पुढे संप मिटला. पण कांही ओरखडे ठेवूनच! पण पुढे काही दिवसांनी वातावरण बदलले. त्यावेळी शासनाकडून बरीच कलात्मक कामे जे.जे.कडे येत असत. असाच १९८४  साली कला संचालक साडवेलकर यांनी विचारेना प्रथमच 'शिवाजी महाराजांचे आरमार' या विषयावर दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी चित्ररथाचे संकल्पन करण्यास दिले. हा त्यांचा पहीलाच चित्ररथ होता. पण दुर्दैवाने त्या काळात पंतप्रधान इंदिराजींची हत्या झाली. संपूर्ण दिल्ली पेटत होती. कमलाकर सोनटक्के व विचारे त्यातच दोघेही दिल्लीला पोचले.पण कांही कारणाने हा चित्ररथ होऊ शकला नाही. पण पुढे तो चित्ररथ १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त सोनटक्के यांनी मुंबईतील शिवतीर्थावर दिमाखात फिरवला.

 


हे चित्ररथ महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतीक संचालनालयातर्फे बनवला जातात. व दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त संरक्षण मंत्रालयातर्फे त्याचे आयोजन केले जाते. प्रत्येक राज्याला साधारणतः तीन विषय दिले जातात. मात्र यात धार्मीक, जातीय व राजकीय विषयांना स्थान नसते. याची सुरुवात जुलै महिन्यांत होते. त्यानंतर राज्य सरकार एक तज्ज्ञाची समिती नेमून त्यांच्याकडे नोंदी असलेल्या दहा बारा प्रतिथयश चित्रकारांकडून जे दोन तीन विषय निवडले असतात, त्यावर संकल्पने मागवतात. व ही संकल्पने दिल्लीला पाठविण्यात येतात. तेथेही संरक्षण मंत्रालयाची एक निवड समीती असते. या समितीत अग्रगण्य चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, नृत्य विशारद, संगीतकार असे सुमारे पंधरा सभासद असतात. यावेळी प्रत्येक राज्यातून एक विषय निवडला जातो. त्यामध्ये सुधारणा सुचवून दुसऱ्या वा तिसऱ्या बैठकीस संकल्पनास मंजुरी मिळते. अर्थात संकल्पनकाराला ठामपणे स्वतःची कल्पना प्रभावीपणे मांडावी लागते.यानंतर वेळ येते ती या चित्ररथाचे त्रिमिती मॉडेल बनविण्याची. तेही स्केलला धरून. परत त्यात सुधारणा सुववल्या जातात.

 


डिसेंबरच्या साधारण तिसऱ्या आठवड्यात य चित्ररथाच्या उभारणीस सुरुवात होते. दिल्लीत हे दिवस कडाक्याच्या थंडीचे असतात. चित्ररथाच्या आकारासही कांही बंधने असतात. मिंटोब्रिजच्या खालून तो न्यावा लागत असल्याने त्याची उंची सोळा फुटाच्या आत ठेवावी लागते. तसेच रस्त्यावरून सहजपणे वळवता यावा या हेतूने रुंदी चौदा फूट व लांबी पन्नास फूट असते. चित्ररथावर दहा व्यक्ती ठेवण्यास परवानगी असते. आणि हे सर्व सेनादलाच्या अख्यत्यारीत असल्याने तेथील सुरक्षा व्यवस्था अतीशय कडक असते. निरनिराळ्या विभागाचे बॉम्ब स्कॉड तज्ञ येवून चित्ररथाची तपासणी करून जातात. अशा वेळी जर कां त्यांना संशय आल्यास पूर्ण उभारलेली गोष्टही त्यांना पूर्णपणे उचकटून दाखवावी लागते. व पुन्हा उभारावी लागते. कारण सुरक्षा ती सुरक्षा, त्यांना तुमच्या कलात्मकता व सौंदर्य याच्याशी काहीच संबंध नसतो.  अश्या रीतीने तयार झालेल्या सर्व चित्ररथांची संरक्षण मंत्रालयातर्फे २३ जानेवारीला रंगीत तालीम होते. तेथे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या डमी  वापरल्या जातात. व २६ तारखेला रात्री  सर्व चित्ररथ राष्ट्रपती भवनाजवळील चौकात उभे रहातात. सर्वाना त्यांच्या राज्याच्या आद्याक्षरावरून नंबर दिले जातात. नंतर ही मिरवणूक इंडियागेट कडे जाते. तेथे राष्ट्रपतींना सलामी दिली जाते. आणि नरेंद्र विचारेना या सर्व बाबी आता माहीती झाल्या आहेत. तेथील सर्व अधिकारी त्यांच्या चांगलेच माहीतीचे झालेत.आणि त्यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतीक संचालनालयाचे आयुक्त डॉ. न.नि. पटेल हे स्वतः कलासक्त असल्याने त्यांना संपूर्ण सहकार्य देत असत. व स्वत: जातीने हजरही असत

 


१९९१ साली मी जेव्हां जे.जे.चा अधीष्ठाता म्हणून नियुक्त झालो, तेव्हां असेच चित्ररथाचे काम करण्यासाठी विचारणा आली. आमची मंत्रालयात बैठक भरली. सांस्कृतीक खात्याचे मंत्री होते मा. विजयसींह मोहीते पाटील व सचिव होत्या डॉ. नीला सत्यनारायण. दरवर्षीचा प्रकार असे तो आमच्या संस्थेकडून आठ दहा संकल्पने करून घ्यायची. व त्यातील एक निवडले जाईल तेवढ्याच संकल्पनांचे पैसे द्यायचे. पण मी आग्रही भूमिका घेऊन त्यांना सांगीतले की आपण जेवढ्या कलाकारांना काम करण्यास सांगतो, त्या सर्वाना त्यांचा मेहनताना मिळायला हवा. शिवाय ज्याचे निवडले जाईल त्याला एक ठरावीक रक्कम जादा दिली जावी. व या चित्ररथाची उभारणी टेंडर मागवून करण्यात येईल, त्यावर संकल्पन करणाऱ्याची देखरेख राहील. शिवाय जे.जे.ला एक दर्जा असल्यामुळे यापुढे ही कामे अधिकृतपणे संस्थाप्रमुखाकडे देण्यात यावीत. व संस्था प्रमुख अध्यापकांच्या क्षमतेनुसार निवड करून त्यांना सदर कामे करायला देतील. नीला सत्यनारायण यांना हे पटले. व एक नवीन प्रथा सुरु झाली.

 


मध्ये मी 'प्रगतीपथावर महाराष्ट्र', ' भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव', व 'जय जवान-जय किसान', ही प्रदर्शने विद्यार्थ्यांकरवी भरवली. तेथेही विचारे कामी येत असत. माझ्या अधिष्ठाता पदाच्या पहील्याच वर्षी विधान सभेचे सभापती मा. मधुकरराव चौधरी यांनी विधान भवनात 'लोकप्रतिनिधींना शिष्टाचार व सौजन्य' यावर लोकप्रतिनिधींना शिक्षण देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजीत केली. व माझ्याकडे त्यांनी यासाठी एक छोटेसे प्रदर्शन उभारण्यास सांगीतले. ज्यामधून कोणाचा अपमान न होता खेळकर पद्धतीने त्यांना समाज शिक्षण देण्यात यावे असा त्यामागे विचार होता. मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते उदघाटन व भाषण होणार होते. आणि नेमकी दिवाळीची सुटी असल्याने कॉलेज बंद होते. कोणीच विद्यार्थी मदतीला मिळू शकणार नव्हते. ह्या वेळी मला दोन व्यक्ती डोळ्यासमोर आल्या. एक होते नावाजलेले ग्राफीक डिझाइनर यशवंन्त चौधरी व दुसरे या प्रदर्शनाची उभारणी एकहाती करणारे विचारे. दुसऱ्याच दिवशी मी दोघांनाही बोलावले. सर्व प्लॅनिंग झाले. विचारेनी त्यांच्यासोबत नेहमी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची फौज आणली. आणि लोक प्रतिनिधींना  समाज शिक्षण देणारे आमचे प्रदर्शन खूपच गाजले. याचे सर्व श्रेय होते विचारे व त्याच्या टीमला. समारंभाचे आम्हांला खास आमंत्रण देऊन मधुकररावांनी आम्हा सर्वाना पाहुण्यांसोबत जेवणास ठेवून घेतले.

 


मध्ये एकदा एका नापास झालेल्या मुलीला पास करण्यासाठी कांही गुंडानी रात्री अकराच्या सुमारास माझ्या घरी येऊन तिला पास करा अन्यथा तुमचे दोन्ही पाय तोडून टाकू अशी धमकी दिली. मी संतापून त्यांना हाकलू लागताच त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला. मुले घरी लहान होती. पत्नीही घाबरली होती. पण मला भीती वाटली नाही. चीड आली त्या गुंडाची. माझ्या कारकिर्दीत मी सहसा कुठल्याच विद्यार्थ्याला अथवा शिक्षकांना त्रास दिला नाही. पण जर का कोणी कारण नसताना माझ्या वाट्याला गेल्यास त्याची मी खैर ठेवीत नसे. या वेळीही तसेच झाले. माझ्या सासऱ्यांनी पोलीस आयुक्त सोमण यांना फोन करून सर्व हकीकत सांगताच काही अवधीतच वाकोला पोलीस स्टेशनवरून गाडी आली व मला घेऊन जाऊन माझी तक्रार नोंदवून घेऊन केस दाखल केली. मी शेखर साळवी याला फोन करून ही गोष्ट सांगताच काही वेळातच विचारे व खापरे यांना घेऊन रात्री माझ्या घरी आला. दोनच दिवसांनी वाकोला पोलीस स्टेशनवरून एक हवालदार मला बोलावण्यास आला. हल्लेखोर त्यांना मिळाले होते. जेव्हा ते मला ओळख परेड मध्ये मी त्या गुंडाना ओळखले पण जेंव्हा त्या अधिकाऱ्याने सांगितले की ही तुमच्याच कॉलेजची मुले आहेत, तेव्हां मला धक्काच बसला. मी कधी त्यांच्या म्होरक्याला पाहीले नव्हते, पण त्याच्या कथा मी बऱ्याच ऐकून होतो. कारण ती दोन वर्षे मी नागपूरला होतो. पुढे पोलिसांनी त्याचा पूर्ण बंदोबस्त केला. त्यावेळी मला समजले की ही मुले विचारेंच्या जवळ होती, तेंव्हा मीहि थोडा दुखावलो होतो. पण पुढे मळभ गेले आणि आम्ही पहिल्यापेक्षा जवळ आलो. आणि ही घटना घडली तेव्हां माझ्या जवळचे म्हणवणारे मित्र कोणीही साधे विचारायलाही आले नाही. पण विचारे आणि साळवी सावलीप्रमाणे माझ्या सोबत असायचे. या उलट सदर विद्यार्थिनीने कॉलेज सोडले व ती एकदा कॉलेजमध्ये आली असता माझे मित्र व सहकारी नागवेकर यांच्याशी गप्पा मारताना मला दिसली. मी नागवेकरांना विचारले की एवढा प्रकार तिने करूनही तिच्याशी का संपर्क ठेवतोस? त्यावर नागवेकरने मला दिलेले उत्तर ऐकून मी चक्रावलोच. ते म्हणाले, ती तुझ्याशी वाईट वागली आहे. माझे काय वाकडे केले आहे तिने. याच नागवेकरांना मी काही विद्यार्थ्यांच्या रोषाला बळी पडत होते तेव्हां मी सांभाळत होतो. असेच माझ्या अधिष्ठाता पदाच्यावेळी संस्थेतील एक गट मला ते पद मिळू नये यासाठी खटपटीत होता. बाकी सर्व अध्यापक मंडळी केवळ गमतीने हे पहात असत. पण त्यावेळी सतत माझ्यासोबत राहून मला मदत करणारी अध्यापक मंडळी म्हणजे प्रा.नरेंद्र विचारे, प्रा. रमेश खापरे, प्रा. नंदा देशपांडे व प्रा. शेखर साळवी. ज्यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. कोठेही जायचे असल्यास विचारे आपली गाडी काढून कोणत्याही वेळी मला घेऊन जात असत. व हे मी निवृत्त होईपर्यंत त्यांनी पाळले. 

 


भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्णमयी वर्ष होते ते. महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीला वेळेत चित्ररथाची संकल्पने गेली नाहीत, या कारणास्तव त्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच महाराष्ट्राचा चित्ररथ निघणारच नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. पण माजी मुख्यमंत्री मा.मनोहर जोशी यांनी बरीच खटपट करून महाराष्ट्राला त्यात सामील करायला लावले. न.नि.पटेल व विचारे दिल्लीत संरक्षण मंत्रालयात ठाण मांडून बसलें होते. मात्र सेनादलाच्या अधिकाऱ्यांनी विचारेना तेथल्या तेथे पाच संकल्पने करून देण्यास सांगीतले. पटेलांनी धावाधाव करून रंग, कागद, स्केच पेन आदी साहीत्य मिळविले. दुपारी तीन वाजेपर्यंत संकल्पने तयार झाली. त्यातले एक निवडले गेले. मग विचारेंनी रात्रभर महाराष्ट्र सदनात बसून थर्मोकोलचे मॉडेल बनवले. ज्यावेळी इतर राज्यांच्या चित्ररथांचे काम संपले होते, तेव्हां १३ जानेवारीला विचारेंचे काम सुरु झाले. आणि स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राचा चित्ररथ सन्मानाने राजपथावरून फिरला.

विचारेंनी आजपर्यंत अत्यंत परीश्रम पूर्वक ही कामे केली. त्या काळात सांस्कृतीक आयुक्त न.नि.पटेल यांनी विचारेना सतत सहकार्य दिले. त्यांनी केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या  चित्ररथांना १९९३-१९९४-१९९९५ या तीनही वर्षी सतत प्रथम पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही विचारेंच्या नांवे आहे. हा बहुमान आत्तापर्यंत केवळ महाराष्ट्र शासनाला मिळाला आहे.चित्ररथाच्या बाबतीत विचारेंच्या नांवाचा दिल्लीत एक दबदबा आहे. कांही वेळा त्यांच्यावर कठीण प्रसंगही ओढवले आहेत. एकदा तंबूत झोपले असताना रात्रीं अचानक पाऊस सुरु झाला. तंबूभर पाणी भरले होते. तेथेच इलेक्ट्रीक हिटरही चालू होता. एक सुरक्षा रक्षक आरडा ओरडा करीत आला व त्याने विचारेना उठवले.हिटरच्या काॅईलपर्यंत पाण्याची पातळी पोचली असती तर तिच्या संपर्काने गंभीर प्रसंग ओढवला असता. विचारेंनी आतापर्यंत महाराष्ट्र शासनासाठी अनेक चित्ररथ केले. ‘चित्ररथ आणि विचारे’ हे एक समीकरणच बनले आहे. त्यातील कांही चित्ररथ म्हणजे  ' छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार', आदिवासींचा तारपा', कोंकणातील जीवनशैली दाखवणारा हापूस आंबा', 'गांधीजी,' 'लोकमान्य टिळक' हे आहेत.   

 


विशेष म्हणजे २०१८ सालच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची कथाही अशीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या विषयावर चित्ररथ करायचा होता. या विषयासाठी विचारेंनी अनेक दुर्मिळ पुस्तकांचे संदर्भ शोधले. अनेक इतिहासकारांशी अन जाणत्यांशी चर्चा केली. जेव्हां एखादा राजा म्हणून मान्यता पावतो, तेव्हां त्याचे प्रतीक म्हणून त्याचा भालेकऱ्याच्या भाल्यावर माशाचे डोके, घोड्याचे शेपूट, तराजू अशी मानचिन्हे दाखविण्यात येतात. तीच विचारेंनी आपल्या संकल्पनात दाखवली होती. जेव्हां त्यांनी चित्ररथाचे त्रिमिती मॉडेल बनवले, तेव्हां छत्रपती घराण्याचे वंशज खासदार श्री संभाजीराजे भोसले यांनी विचारेना ते मॉडेल घेऊन त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी बोलाविले. त्यातील ऐतिहासिक बाबींचा योग्य वापर झाला आहे की नाही, याची बारकाईने पहाणी केली व आणखी कांही सूचना केल्या. त्यानंतर टेंडर मागवून सुप्रसीध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई याना त्याच्या फॅब्रीकेशनचे काम देण्यात आले. सुमारे महिन्याभरात विचारेंच्या देखरेखीखाली हा चित्ररथ तयार झाला. एवढेच नव्हे, तर त्याने सर्व राज्यांच्या चित्ररथामधून प्रथम पारितोषिक मिळवले. मात्र जेव्हां दूरदर्शनच्या चॅनलवरून  याच्या बातम्या झळकू लागल्या त्यात विचारेंच्या नावाचा उल्लेखही कुठे झाला नाही. नितीन देसाईंच्या मुलाखतीत देखील त्यांनी हे मूळ संकल्पन प्रा. विचारेंचे असल्याचा उल्लेख केला नाही. मला हे थोडे खटकले. ज्याने ती मूळ कल्पना साकारली असते त्याचा आधार घेऊनच नंतर कोणीही त्याची उभारणी करतो. त्यामुळे मूळ संकल्पनाकार हा महत्वाचा असतो. आणि हे मी सोशल माध्यमावर टाकताच ते प्रचंड व्हायरल झाले. अनेक चॅनलनी त्याची दखल घेतली. व शेवटी विचारेंचे श्रेय त्यांना मिळाले. पुढे विचारे सरांचा सत्कार जे.जे.च्या १९८०-८५ च्या बॅचने पार्ले येथील हॉल मध्ये करण्याचे ठरवले. आणि त्यासोबत माझ्याशी संवाद सोबत असा कार्यक्रम ठरवला. आणि त्या दिवशी विचारानी आपल्या त्या चित्ररथाची संपूर्ण कहाणी सर्व माजी विद्यार्थ्यांना ऐकविली. 

 


पुढे मी जे.जे.मधून निवृत्त झालो. काही वर्षांनी विचारेही निवृत्त झाले. पुढे ते सावंतवाडी येथे डॉ. गायतोंडे यांच्या पुढाकाराने सूरू झालेल्या 'बांदेकर स्कुल ऑफ आर्ट'मध्ये प्रिन्सिपॉल म्हणून नियुक्त झाले. आमच्या विचारांचे आदान प्रदान सुरूच होते. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास हाक मारावी अशी एकच व्यक्ती होती माझ्या जीवनात. नंतरही आम्ही कांही उपक्रम केले. मी सुरु केलेल्या विरार येथील 'विवा कॉलेज ऑफ ॲप्लाईड आर्ट' येथे डिझाईन डिस्प्ले शिकवण्यासाठी त्यांना मी बोलाविले होते. त्यानंतर त्यांनी 'मा. वसंतदादा कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट'  त्या संस्थेला सुरु करून दिले. व तेही तेथे सल्लागार म्हणून काम पहातात.मी  कांही वर्षांपूर्वी त्यांच्यावर 'चित्ररथाचा सारथी' हा लेख लिहून त्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. संस्थेच्या प्रत्येक सांस्कृतीक कामामध्ये विचारे सर माझा आधार होते. त्यांना काम सांगावे, आणि खुशाल आराम करावा असा त्यांच्यावर भरोसा होता. आम्ही जी मुंबई विद्यापीठासाठी काही भव्य कामे केली, त्यांचे आयोजनही विचारेंचेच! आज त्यांच्याकडे सर्व प्रकारची कामे करणारे कलाकार आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व विचारे सरांचे विद्यार्थीच आहेत. मग ते आजी असोत वा माजी. एका माणसाने जमा केलेली पुण्याई आहे ती!

शेवटी जाताजाता एक त्यांच्या बाबतीतील गोष्ट सांगितल्याशिवाय रहावत नाही. कदाचित त्यांनाही ती आवडणार नाही. आणि ही गोष्ट आहे आमचे भूतपूर्व अधिष्ठाता हरिभाऊ हणमंते यांच्या बाबतीतील. विचारेना त्यांनीच नोकरीला लावले होते. त्यांचा खूप लाडका होता तो. पण पुढे साडवेलकर आणि हणमंते यांच्यात जी दुरी झाली त्यामुळे शिक्षकांत दोन गट पडले. विचारेला मुंबई परत बाबुरावांनी आणल्यामुळे विचारेला त्यांच्याविषयी आदर होता. त्यामुळे हणमंते सरापासून तो थोडा दुरावला होता. एवढ्यात हणमंते याना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली. पण त्यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. तेव्हां हणमंते सर रजेवर गेले. इकडे डीन झाल्यापासून त्यांनी आपला कला नगरमधील बंगला एका मारवाड्याला भाडयाने दिला होता. अनेक वर्षे तो तेथे रहात होता. आणि जेव्हां हणमंतेनी निवृत्त होणार असल्याचे सांगून त्याला बंगला खाली करून देण्यास सांगितले, तेव्हां तो चक्क मागे फिरला. खाली करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. असल्या दिवाणी खटल्यात वर्षानुवर्षे खटले चालतात. आणि तो माणूस बिझनेसमॅन  असल्याने त्याला काहीच प्रश्न नव्हता. आणि गरजेपोटी परत नोकरीत यायचे ठरवले. निदान त्यामुळे डीन बंगला तरी रहायला मिळत होता. आणि रात्रंदिवस या विचाराने त्यांची तब्येत खालावत चालली. त्यांनी नागपूरची बदलीही स्वीकारली. तरी त्यांचा कला नगरमधील बंगला कांही तो माणूस सोडेना. शेवटी सरांची अवस्था पाहून शेखर साळवी याने विचारेंच्या सतत मागे लागून त्याला बाळासाहेब ठाकरेंकडे हे प्रकरण नेण्याविषयी गळ घातली. आणि विचारे यांनाही हणमंते सरांची अवस्था पहावेना . मागील सर्व विसरून तो हणमंते सरांना घरी जाऊन भेटला. हणमंते सरांनी अगदी अजीजीने त्याला आपला बंगला मिळवून देण्याची गळ घातली, आणि विचारेला भडभडून आले. त्याने उद्धव मार्फत बाळासाहेबांची भेट ठरविली.  व सोबत हणमंते, शेखर साळवी व रमेश खापरे असे साहेबांच्या मातोश्रीवर गेले. प्रथम हणमंतेंना पाहून साहेब संतापले. हणमंतेंनी त्यांना बंगल्याविषयी सांगताच साहेब कडाडले, देतांना मला विचारून दिला होतास काय? हणमंते यांनी आपली चूक कबूल केली. तेव्हां बाळासाहेबांनी फोन उचलला. आणि ज्या गोष्टीमुळे हणमंते खचले होते, ती केवळ अन केवळच नरेंद्र विचारामुळे घडून आली. हणमंते सरांना त्यांचा बंगला परत मिळाला. विचारेंनी आपल्या गुरुवर्याला दिलेली ही सर्वात मोठी गुरुदक्षिणा होती. मला कांही दिवसांनी हणमंते सरांनी बाळासाहेबांच्या बैठकीत काय घडले, हे प्रत्यक्ष सांगितले होते. बाळासाहेबांना सांगूनही तो मारवाडी गृहस्थ परत कोर्टातून इंजंक्शन आणण्याचा प्रयत्न करीत आहे हे हणमंतेना समजले तेव्हा त्यांनी परत विचारेना ही गोष्ट सांगितली. परत विचारे बाळासाहेबांकडे पोचले. बाळासाहेबांनी संतापून आपल्या खास अश्या शब्दात आधी त्या मारवाड्याला सुनावले. नंतर ते म्हणाले, तू काय माझा शत्रू नाहीस. पण हणमंते माझा मित्र आहे. त्याने कष्टाने उभा केलेला बंगला जर का तू खाली केला नाहीस, तर तुला कलानगरच नव्हे, तर या मुंबईतही पाय ठेवायला देणार नाही. आणि त्या बंगला न सोडणाऱ्या माणसाने ताबडतोब ट्र्क बोलावून सामान बांधण्यास घेतले. विचारेंनी अशी मदत केलेली कैक माणसे असतील. अनेक माणसे त्यांनी जोडली

 


विचारेंनी बॉंबे आर्ट सोसायटीचे सचिवपदही भूषविले. त्यांच्याच कारकिर्दीत सोसायटीच्या नवीन वास्तूचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते उदघाटन झाले. आणि त्या क्षणांचे ते मानकरी ठरले. स्वतःच्या पेंटींग्सचे प्रदर्शन देखील त्यांनी जहांगीर कलादालनात भरवून रसिकांची पावती मिळवली. त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर अनेक आघात झाले. नुकतेच ते करोनाशी दोन हात करून त्यालाही हरवून माघारी परत आले. अर्थात माणसाची नाहीच पण निसर्गाची तरी काय बिशाद आहे त्यांच्याशी पंगा घेण्याची? कारण त्याचे अनेक मित्र, शेकडो विद्यार्थी त्यांच्यासाठी दुवा मागत सतत होते. कैक जणांचे आशीर्वाद पाठीशी होते. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सतत पाठीशी राहून अहोरात्र कामात मग्न असलेल्या आपल्या पतीला कोणतीही तोशिष पडू नये यासाठी संसार रथ एकहाती ओढणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारीणीचे शुभ सहाय्य. हे ते कधीच विसरू शकणार नाहीत. हेच त्यांच्यावरील सर्वांचे प्रेम दर्शविते! असा हा अनेक नात्यांनी जोडला गेलेला माझा विद्यार्थी, सहकारी, मित्र, हितचिंतक ! नरेंद्र विचारे. तुला उदंड आयुष्य लाभो!

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष



 







Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…