एका धन्वंतरीची कथा : डाॅ. स्नेहलता देशमुख.
१९९५ साल होते ते. नुकतेच युती सरकार सत्तेवर आले होते. सरकारी योजनांची माहिती सामान्य लोकांना व्हावी यासाठी "प्रगती पथावर महाराष्ट्र" हे शासकीय योजना ह्या सर्वसाधारण माणसापर्यंत दृश्य कलेच्या माध्यमातून कश्या पोचवाव्यात यासाठी जेजे उपयोजीत कला संस्थेच्या विध्यार्थी आणि शिक्षकाकरवी ‘प्रगतीपथावर महाराष्ट्र’ नांवाचे मी एक मोठे प्रदर्शन आयोजिले होते. त्याच्या उदघाटनाला मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी आले होते. त्याचवेळी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून एक विद्वत्तापूर्ण असे व्यक्तिमत्व आले होते. प्रसन्न आणि हसतमुख चेहरा, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज, आवाजात एक प्रकारचा गोडवा अन माधुर्य, मोहिनी पडेल असे वक्तृत्व, आणि सर्वच विषयांवर प्रभुत्व असे हे हरहुन्नरी व्यक्तित्व म्हणजे डॉ. स्नेहलता देशमुख. त्यांनाही मी आमंत्रित केले होते. आणि त्यावेळी समस्त शिक्षक विध्यार्थ्यांना त्यांनी हसत खेळत, मनोरंजन करीत सर्वाना आपल्या ज्ञानाची, विनोदबुद्धीची चुणूक त्यांना त्या समारंभात दाखविली. मी त्याच वेळी विद्यापीठात फाईन आर्ट विभागाचा डीन झालो होतो, त्यामुळे त्यानंतर आमची जवळीक जास्तच झाली
डाॅ. स्नेहलता देशमुख यांचा जन्म ३० डिसेंबर १९३८ चा अहमदनगर येथील. त्याचे वडील डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हें एक नांवाजलेले सर्जन होते. मुंबईतील शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.इ. एम. रुग्णालयात त्यांनी अधिष्ठाता म्हणून यशस्वी कारकीर्द काढली होती. त्यांचा पावलावर पाऊल टाकून स्नेहलता या चालत असत. लहानपणापासून त्यांना चित्रकला, गायन, रांगोळी, भरतकाम अश्या कलांमध्ये रूची होती. हे सर्व कलागुण त्यांच्या मातोश्री कडूनच आले होते. त्यांचे माध्यमीक शिक्षण दादरच्या इंडीयन एज्युकेशन सोसायटीची शाळा व रुईया महाविद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी जी.एस. मेडीकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश घेतला. जात्याच बुद्धीने तल्लख असलेल्या स्नेहलताबाईं एम.बी.बी.एस. मध्ये सर्व विद्यार्थ्यामध्ये सर्व प्रथम आल्या. आपण कॅन्सर सर्जन होण्याची महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली होती व पुढच्या शस्त्रक्रीयेच्या शिक्षणासाठी त्या टाटा कॅन्सर रुग्णालयात गेल्या. पण त्यावेळी महिलांना कर्करोगावरील शस्त्रक्रिया शिक्षणासाठी प्रवेश देत नसत. व बराच संघर्ष करूनही त्यांच्या वाट्याला निराशा आली. कारण शस्त्रक्रिया हे क्षेत्र महीलांच्या स्त्रीत्वाला आणि नाजुकपणाला थोडे कठीण असे मानले जात असे. शेवटी त्यांनी अर्भकावरच्या शस्त्रक्रियेमध्ये शल्यविशारद होण्याचे ठरवले. आणि ते त्यांनी केवळ हस्तगतच केलें नाही, तर त्या क्षेत्रांतील अनेक मान सन्मानाच्या मानकरी ठरल्या. आणि यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांचे पालक ठामपणे उभे राहीले. आज त्या एका निष्णात बाल व स्त्री रोग तज्ञ म्हणून प्रसीद्धी पावलेल्या डॉक्टर आहेत.
केवळ वैद्यकीय प्रॅक्टिस करून भागणार नाही हे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे त्यांनी खास दिल्ली येथें जाऊन वैद्यकीय प्रशासनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. व जेथे त्यांच्या वडीलानी वैद्यकीय अधीकारी म्हणून काम केले होते, त्याच शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यानी अधीष्ठाता म्हणून पदभार स्वीकारला. दरम्यान त्यांचं विवाह डॉ. शामराव देशमुख यांच्याशी झाला व त्या जोगळेकरच्या स्नेहलता देशमुख बनल्या. एक सुखी असा संसार सुरु झाला. डॉ. स्नेहलता देशमुखांनी आपल्या कारकिर्दीत तेथे बरेच संशोधन करण्यास प्रारंभ केला. तेथील 'स्तन्य दूध' दुग्ध पेढी निर्माण करण्यात त्यांचाच पुढाकार होता. ज्या मातांना कांही वैद्यकीय कारणामुळे अर्भकाला आपले दूध पाजता येत नाही, त्यांच्यासाठी ही दुग्धपेढी एक वरदान ठरली आहे. शिवाय त्या रुग्णालयात त्यांनी बाल शस्त्रक्रीया विभाग देखील सुरु केला. डाॅ. स्नेहलाबाईंनी धारावी झोपडपट्टीच्या महीला व मुलांसाठी खूप काम केले आहे. धारावीतील नवजात अर्भकाच्या पाठीवर एक प्रकारची गाठ (आवाळू ) असण्याचा प्रकार घडत होता. स्नेहलताबाईंनी त्यावेळी लो. टिळक रुग्णालयांमधील डॉक्टरांना यावर संशोधन करायला लावले. तेव्हां मातांच्या शरीरातील 'फॉलीक ॲसीड'च्या कमतरतेमुळे हे घडले आहे, हे सिद्ध झाले. त्यानंतर धारावीतील गर्भवती महिलांना 'फॉलीक ॲसीड’च्या गोळ्या वाटण्यात येऊ लागल्या. व या समस्येवर मोठ्या प्रमाणावर निराकरण झाले. अश्या या धन्वंतरी व्यक्तीची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून १९९५ साली नियुक्ती करण्यात आली. आणि मीही त्याच वर्षी मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट फॅकल्टीचा अधीष्ठाता म्हणुन निवडुन आलो. नुकतेच युतीचे सरकार सत्तेवर येऊन मनोहर जोशी हे मा. मुख्यमंत्री बनले. आणि त्याच आमच्या प्रदर्शनाच्या उदघाटनाला मी या दोन महान विभूतींना मी आमंत्रीत केले होते.
जे.जे. कला महाविद्यालयाविषयी सर्वानाच एक आपुलकी असते, जी सहसा इतर संस्थांच्या शिक्षकांना मिळत नाही. तीच गोष्ट त्यांच्याही बाबतीत होती. त्यांचे यजमान डॉ. शामराव देशमुख हेसुद्धा विद्यापीठात मेडिकल विभागाचे डीन होते. एक हुषार, बुद्धीमान व अनुभवी असे ते व्यक्तीमत्व होते. येथे येण्यापूर्वी डाॅ. स्नेहलता देशमुख या शिवच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलच्या डीन म्हणून कार्यरत होत्या. स्त्री व बालरोग तज्ञ म्हणून त्यांचे काम सर्वज्ञात आहे. एक सर्जन म्हणून त्यांचे कार्य थोर आहे. पण केवळ शारीरिक दुखण्यावर औषध घेऊन चालत नाही, तर मानसिक स्थितीही तेवढीच सुदृढ हवी, याचे महत्व त्या पटवून देत. विद्यापीठात सर्व विध्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान मिळावे यासाठी त्या झटत असत. कलिना येथे विद्यापीठाने खूप मोठे कॅम्पस तयार केले. परीक्षा विभाग सुसज्ज रित्या उभा केला. पण परीक्षा विभागाच्या सर्व बैठकी मात्र व्हायच्या त्या फोर्ट मध्ये. कारण बऱ्याच विभागातील लोकांचे व्यवसाय त्या भागात असत. त्यामुळे त्यांना कलिना येथे जाणे कठीण होत असे. कांही विधी फॅकल्टीचे सदस्य सिनेटच्या बैठकीला सकाळी येऊन सही करून थेट उच्च न्यायालयाची इमारत गाठत, व तेथील वकीली आटोपून संघ्याकाळच्या सुमारास परतत. हे जेव्हां त्यांच्या लक्षात आले, तेव्हां त्यानी दुपारी सह्या करण्याची वेळ ठरवली. व त्यांची पंचाईत झाली. आणि म्हणूनच बाईंनी याला छेद दिला व महिन्यातून एक तरी बैठक कलीना येथील परीक्षा विभागात झालीच पाहिजे हा दंडक घातला. व तो राबहूनही घेतला. तिथे मग त्यांच्या कर्तव्यात कसूर नसे.
देशमुख बाईंच्या कारकिर्दीत मी जे.जे.साठी अनेक सुधारणा करणाऱ्या गोष्टी बनवून घेतल्या. त्यापैकी महत्वाची म्हणजे कित्येक वर्षे न बदललेला जे.जे.चा अभ्यासक्रम. अनेक नामवंत कला शिक्षण तज्ञांच्या मदतीने या नव्या अभ्यासक्रमाला आकार दिला. जुने कालबाह्य विषय काढून टाकले, तसेच नवीन माध्यमांचा समावेश केला. नैपुण्य विषयांना महत्व मिळेल असे तास त्यांना मिळवून दिले. आणि याला सर्वच फॅकल्टीचे अधिष्ठाता व इतर सदस्यांनी मला तेथे नेहमीच सहकार्य केले. डॉ. देशमुख तेथें आम्हांला कुलगुरूंच्या एका भारदस्त भुमिकेत कधीच न दिसता एका प्रेमळ वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतच आम्हांला दिसल्या. मध्यंतरीच्या काळात विद्यापीठाचे कुलपती व राज्याचे राज्यपाल डाॅ. अलेक्झांडर यांना त्यांच्या पुनर्नियुक्ती बद्दल डाॅ. देशमूखबाईनी त्यांच्या निवासस्थानी एक डीनर ठेवले होते. त्यावेळी डाॅ. अलेक्झांडर यांनी सांगीतले की, कुलपती व कुलगुरू यामध्ये असलेल्या सुसंवादामुळेच विद्यापीठाचे कामकाज यशस्वी होत आहे. आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छामुळेच मला परत या राज्याची सेवा करण्याची संधी मिळत आहे. आणि खरोखरीच ठाम निर्णय घेणाऱ्या कुलगुरू व करारीपणाने कृती करणारे कुलपती यामुळेच डाॅ. देशमुखांच्या काळांत मुंबई विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढत्या क्रमांकावर राहीला.
यावेळचा आठवणीतील एक प्रसंग म्हणजे, मध्यंतरी आमच्याकडे एक नवीन कलासंचालक आले. त्यांनी माझ्याशी उभा दावा धरला होता. कारण त्यांच्या काही गैर कारवाया मी थांबवल्या होत्या. त्यांनी एक वर्षी जे.जे.च्या प्रवेश परीक्षा ह्या विद्यापीठाने न घेता त्या कला संचालयाने घेतलेल्या इंटरमिडिएटच्या ड्रॉईंग ग्रेडच्या आधारावर प्रवेश देण्यात यावेत असा फतवा काढला. त्याला मी विद्यापीठाच्या फाईन आर्ट फॅकल्टीचा डीन या नात्याने विरोध केला. कारण त्यात अशी वर्गवारी केली होती की त्यामध्ये प्रवेश परीक्षेचे महत्व कमी करून केवळ. इंटरमीडीएटच्या ‘ए’ व ‘बी’ ग्रेडसाठीच महत्व ठेवले होते. व सी ग्रेडला काहीच महत्व नव्हते. मी विद्यापीठाच्या ॲकॅडमीक कौन्सील मध्ये गणिताच्या भाषेत सिद्ध करून दाखवले की, सी ग्रेड वाल्याना जरी परीक्षेचे संपूर्ण गुण दिले तरी तो प्रवेशापर्यंत पोचत नाही. याप्रश्नावर देशमुख बाईंनी सिनेटमध्ये चर्चा घडवून आणली, व सर्वानुमते ह्या सरकारी प्रवेश नियमांना स्वीकारायचे नाही असे एकमताने ठरवले. शिवाय अभ्यासक्रम हा विद्यापीठाचा असल्याने ही प्रत्यक्ष विद्यापीठाच्या कामकाजात सरकारी ढवळा ढवळ ठरते, असेही मत विद्यापीठाने व्यक्त केले. त्यावर डॉ. देशमुख बाईंनी माझ्याशी सहमती दर्शवून उप-कुलगुरू प्रा. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून शासनाला माझे म्हणणे योग्य असल्याचे जाणवून दिले. शेवटी एक पालकाने हायकोर्टात या प्रकरणात केस दाखल केली. त्यावर जस्टीस ए.पी.शहा यांनी स्वतःच सांगीतले की सदर ग्रेड परीक्षा ह्या विद्यार्थी बऱ्याच वेळा शाळेंत सहावी सातवीत असताना देतात. त्याही बहुदा त्यांचे ड्रॉईंग शिक्षक त्यांना परीक्षेला बसवतात. पुढे आपण कोणत्या क्षेत्रात जाणार आहोत, याची कल्पना त्या वयात त्या विद्यार्थ्याना येत नसते. पण त्याकाळात कदाचित 'सी' ग्रेड मिळालेला विद्यार्थी आता प्रवेश परीक्षेपर्यंत प्रगती करून त्या विषयात पारंगतही झाला असेल. मग हा त्याचा आताचा आवीष्कार तुम्हांला त्याच्या जुन्या ग्रेड परीक्षेवरून कसा कळणार? असे म्हणून त्यांनी शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे वाभाडे काढले. विद्यापीठाचे वकील रुई रॉड्रीक्स यांनी अवघ्या पंधरा मिनीटांत या केसचा निकाल लावला. आणि शासनाला गोत्यात आणणारे कला संचालक व त्यांचे हितचिंतक खाली मान घालून माघारी परतले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू या नात्याने डॉ. देशमुखबाई सदैव माझ्या पाठीशी राहील्या.
विद्यापीठातील सिनेट म्हणजे एक छोटीशी विधानसभाच असते. तेथे विरोधक असतात, ते निरनिराळ्या कारणावरून कुलगुरूंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात. बरेचसे सभासद विविध राजकीय पक्षांशी बांधलेले असतात. तेथे पत्रकार असतात. त्यांना बातम्यांची घबाडे हवी असतात. पण शिस्त कशी असते ते देशमुख बाईंनी त्याकाळात दाखवून दिले. परीक्षा काळात वेगवेगळ्या महाविद्यालयात होणारे भ्रष्टाचार बंद करण्यास त्यांनी आरंभ केला. परीक्षेत होणाऱ्या भ्रष्टाचारावर त्यांनी कठोर कारवाया केल्या. यावेळी सिनेटचे एक सभासद डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी त्यांना एरवी गौरीच्या रूपात असलेल्या कुलगुरूंनी दुर्गेचा अवतार धारण करावा आणि याविरुद्ध कारवाई करावी असे आवाहन केले होते. आणि हे खरेच होते. एरवी स्निग्ध, शांत, मृदू अन संयमी असलेल्या डाॅ. देशमुख प्रसंगी कडक होत असत. आमच्या वेळी सिनेटमध्ये होमी तल्यारखान, डॉ. हिरानंदानी, माधवराव गडकरी, सुभाष भेंडे, भालचंद्र नेमाडे, अरुण मेहता, रूपा शाह, अनिता गरवारे, मधू परांजपे, वेलींग, विनायक दळवी असे तोलामोलाचे सदस्य होते. सर्वच जण सीनेट गाजवणारे होते. डाॅ. देशमुखांशी अनेकदा त्यांचे मतभेद होत, पण ते वैचारिक असत. आणि या आपल्या वक्तृत्वाने, करणीने त्या सर्वांचे समाधान करीत. प्रत्येक सभासद काय बोलतो आहे याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. त्यांच्या प्रत्येक मुद्याला त्या स्पष्टीकरण देत. मात्र अश्यांच्या वाट्याला त्रास येतोच. ‘भुकटो’ ही कम्युनिस्ट संघटना त्यांच्या विरुद्ध सतत कार्यरत होती. इंडियन एक्सप्रेस मधूनही देशमुख यांच्याविरोधात खोट्या नाट्या बातम्या छापून येत असत. सतत बातम्या छापून खोटेनाटे आरोप केले जायचे. बैठकीत ठरलेल्या ठरावांची माहीती तत्काळ वृत्तपत्राकडे पोचत असे.
एकदा नानी पालखीवाले या अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अर्थतज्ज्ञाला डी.लीट द्यायचा प्रस्ताव जेव्हा मांडण्यात आला, तेव्हा या भुकटोवाल्यानी त्याला विरोध केला. अर्थात हा ठराव मंजूर होणार होताच! पण बाईंची इच्छा होती की तो सार्वमताने मंजूर व्हावा. केवळ बहुमताने त्याला मान्यता मिळू नये. पण कधीकाळी कॉ. डांगेंना विरोध झाला होता म्हणून हा विरोध होता. शेवटी मताला जाऊन तो ठराव मंजूर झाला हे वेगळेच ! असे अनेक धडाडीचे निर्णय स्नेहलताबाईंनी आपल्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीत घेतले. त्यापैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे, विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या पित्यासोबतच त्यांच्या आईचे नांव लिहिण्याचा. तसेच प्रमाणपत्रावरील इंग्रजी मजकुरासोबतच त्याखाली मराठीत देखील मजकूर आला. त्यासाठी प्रथमच सुलेखनकार प्रा. र.कृ. जोशी यांच्या देवनागरी टाईपचा वापर करण्यात आला. तसेच त्यांनी बी एम एस आणि बी एम एम हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु केले. आज देशात टॉप म्यानेजर खूप आहेत. पण देशाला मिडल म्यानेजरचीही गरजू आहे. त्यादृष्टीने आणखीही काही अभ्यासक्रम त्याना सुरु करायचे होते. प्रत्येक प्राध्यापकाने पीएच.डी. करावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही करावे, या साठी त्यांचे प्रयत्न चालु होते. विद्यापीठाने महाविदयालयानं स्वायत्तता द्यावी, यासाठीही डॉ. देशमुख यांचे प्रयत्न सुरु होते. पण काही तांत्रिक नियमात अडकल्यामुळे त्यामुळे त्यात हवे तसे यश त्यांना मिळाले नाही.
मध्यंतरी एड्स विरोधी ' अश्वमेध ' कार्यक्रम त्यांनी राज्यभरातील महाविद्यालयातून राबविला. यावेळी त्याच्या उदघाटनाची व सजावटीची जबाबदारी जेजेवर होती. मिठीभाई कॉलेज मध्ये मुंबई विद्यापीठाचा राजाभाई टॉवर, गेटवे ॲाफ इंडीया, इंडिया गेट यांच्या प्रतिकृती आम्ही उभारल्या होत्या. प्रा. नरेंद्र विचारे यांनी याची जबाबदारी घेतली होती. व सुंदर अश्या त्यांच्या प्रतीकृती त्यांनी तयार केल्या. सहा वाजता राजाबाई टॉवरच्या घड्याळातून टोले पडले अन राज्यपालांनी उदघाटन केले. घड्याळाचा टोलेही प्रा. विनायक दळवी यांनी राजाभाई टाॅवर मधील घड्याळाच्या टोल्यांचे रेकॉर्ड केले होते . एक भव्य सोहोळा त्यादिवशी झाला. तसेच एकदा एका कार्यक्रमासाठी संपूर्ण विद्यापीठाचे कॅंपस सुशोभीत करण्याचे काम आमच्या संस्थेकरवी प्रा. सुनील नांदोसकर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने केले. या विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला एक वेगळाच दिमाख असे. आपापल्या रंगांचे गावून परीधान करून आम्ही सर्वजण आरंभीच्या मिरवणूकीत सामील होत असू. त्यामध्ये सर्वप्रथम राज्यपाल तथा कुलपती, मागोमाग कुलगुरू, त्यामागे प्र- कुलगुरू, हातात चांदीचा दंड धरून परीक्षा नियंत्रक असत. त्या पाठोपाठ मागून आम्ही सर्व फॅकल्टीचे डीन, यानंतर इतर सभासद या मिरवणुकीत सामील होत. त्यानंतर पदवीदान समारंभात होणारी कुलपती व कुलगुरू यांची अभ्यासपूर्ण अशी भाषणे ही एक पर्वणीच असे. त्यानंतर आम्ही सर्व फॅकल्टीचे डीन आपापल्या विभागाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करीत असू. आम्ही जे.जे. स्कूल ऑफ आर्ट तर्फे डाॅ. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम केले. जेजे उपयोजित कला संस्थेच्या विध्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे अनेक पारितोषिकेही ठेवली. त्यांच्याच कारकिर्दीत विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र सुरु झाले. या कालावधीत मला मुंबई विद्यापीठाच्या स्टडी बोर्डाचा सभासद, अकॅडमिक कॉन्सिलचा सभासद, परीक्षा समितीचा सभासद, सिनेटचा सभासद अश्या सर्वच समित्यांवर काम करायची संधी मिळाली. २००० साली, एकूण पाच वर्षांची त्यांची, सोबत माझीही फाईन आर्ट विभागाचा अधिष्ठाता म्हणून कारकीर्द कशी गेली ती कळलेच नाही. पण तरीही डॉ. स्नेहलताबाई देशमुख यांच्याशी नंतरही ऋणानुबंध कायम राहिले. पार्ल्याला त्यांच्या घरी गणपतीला हक्काचे आमंत्रण येतेच !
दरम्यान त्यांचे पती डॉ. श्यामराव देशमुख त्यांची अर्धवट साथ सोडून निघून गेले. नंतर डॉ. स्नेहलता देशमुख यांनी आपल्या ज्ञानाचा वापर समाजाला व्हावा या दृष्टीने समाजकार्य सुरु ठेवले. अनेक ख्यातनाम बाल संस्थांशी त्या निगडित आहेत. मेडिकल कार्यात सामील आहेत. स्त्री ही खऱ्या अर्थाने गृह स्वामींनी असते, आणि ती सुशिक्षित, संस्कारी असली तर तिचे कुटुंब, समाज व अंतिमतः देश सुसंस्कारित होईल हे तत्वज्ञान त्या मांडतात. आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी
'गर्भ संस्कार प्रकल्प’ त्या गेली अनेक वर्षे त्या राबवीत आहेत. हा राबविताना त्यामागे असलेले शास्त्रशुद्ध, अध्यात्मिक आणि वैद्यकीय महत्वही त्या विशद करतात. आज भारतामध्ये स्त्री-पुरुष समानता रुजली आहे. पण तरीही स्त्री म्हणून काही गोष्टींची जबाबदारी तिच्यावर असतेच ! यासाठी डॉ. देशमुखांनी ' अर्ध गुरुकुल ' संकल्पना आणली. मुलांना सकाळ ते संध्याकाळ अश्या गुरुकुलात शिकण्यास पाठवायचे. ज्यामुळे मातांना मोकळेपणाने काम करता येईल. आज काळ बदलला आहे, शिक्षण पद्धती बदलल्या, यात मार्गदर्शकाची काम माता करते. या ‘अर्ध गुरुकुल’ मुळे स्रियांना त्याच्या दैनंदिन कारभारात व व्यवसाय कारकिर्दीत नैपुण्य दाखविता येईल.
आज स्वंयपाक घरात देखील स्रीयांना त्यांच्या मुलांना शास्त्र शिकविता येते. गरम दुधाचे भांडे उतरविताना जो चिमटा आपण वापरतो, त्याचा आकार तोंडाशी लहान व मागे लांब का असतो, हल्ली आपण कोटेड भांडी का वापरतो, पूर्वी कल्हई का केली जायची, हातात टॉमेटो देऊन तो दाबल्यावर का फुटतो, बटाटा तितक्या सहज का चिरडला जात नाही, दगड अजिबात का दाबला जात नाही, यातून तुम्ही नरम, कठीण, अर्ध कठीण हे शास्त्र शिकवू शकता. त्याचबरोबर मुलांनीही शंका, प्रश्न विचारायला हवेत. त्यासाठी आपण त्यांना तयार करावे लागते. कारण अश्याच शंकामधून संशोधन होते. यासाठी ' थिंक टॅंक ' तयार करायला हवा. मध्यंतरी त्यांनी मातांवर विचार केला. स्त्री, मग ती महालात राहणारी असो, झोपडीत असो, एखादी वेश्या असो, आपल्या मुलांप्रती त्यांचे प्रेम सारखेच असते. काहींनी तर आपल्या स्पेशल मुलांना वाढविण्यास स्वतः वेदना सहन करून वाढविले. अशा मातांशी त्यांनी संपर्क साधला. त्यांच् कर्तुत्व पाहीले. व अश्या अनेक कर्तृत्ववान मातांची प्रेरणादायक गाथा त्यांनी आपल्या ' आई ' या पुस्तकाद्वारे सांगितली आहे. 'अरे संस्कार संस्कार' 'गर्भ संस्कार' 'आपला आहार' 'तंत्रयुगातील उमलती मने' अशी इतर पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. मुलांना आजच्या आधुनिक युगात ज्ञान देताना मातांनी आपणही ते आत्मसात करायला हवे हे सुद्धा त्यांचे सांगणे असते. मुलांशी बोलताना आपल्या डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर, पायाला चक्र हवे. तेव्हाच ती यशस्वी होतात.
युवकहो विश्व उद्याचे तुमचे,
जेजे आमुचे तेते व्हावे तुमच्या उपयोगाचे.
या ग.दि. माडगूळकरांच्या काव्य पंक्तींचा उल्लेख त्या मुद्दाम करतात. मध्ये एकदा 'सर्वांगीण आरोग्य कार्यक्रम' या कार्यक्रमात 'आरोग्य व दैनंदिन कार्यक्रम' या विषयावर बोलताना डॉ. देशमुख यांनी कांही मौलीक गोष्टी सांगीतल्या.
'आपण आपला रोजचा दैनंदिन कार्यक्रम आखायला हवा. पण आखताना इतर लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आपल्या दिवसाची सुरुवात ओम अथवा गायत्री मंत्र गुणगुणत सुरु करावी. त्याच्या जोडीला थोडे देशभक्तीपर वाचन करावे. संपूर्ण दिवसभर आयुर्वेदामध्ये सांगीतलेला सात्विक आहार घ्यावा. जेवतांना टीव्ही अजीबात पहाता कामा नये. तो तुमच्या आरोग्याला घातक असतो. रोजचा व्यायाम करणे आवश्यक आहे. निदान नित्याने रोज दहा मिनीटे तरी चालावे. अश्या कृतीमुळे आपले विचार सकारात्मक होण्यास मदत होते. आणि अश्या प्रकारचे मानसीक गोंधळ न घडवणारे योग्य निर्णय आपल्या रोजच्या कार्यक्रमात आपण घेतल्यास आपण आनंदी आणि आरोग्यदायक जीवन जगू शकतो'
डॉ. देशमुखांचे कार्य अविरत चालू आहे. त्यांचे भाषण सुरु झाले कि मुखातून जणू मोगऱ्याची फुलेच पडताहेत असे वाटते. कोणत्याही समारंभात त्या बोलायला उभ्या राहिल्या की त्यांची सुरुवात ही मराठी मधूनच होते. मराठी इतकेच त्यांचे इंग्रजी कानाला मोह पाडणारे असते. एक प्रकारचा ज्ञानाचा झराच त्यातून वाहू लागतो. आणि सर्व विषयांचा चौफेर अभ्यास असल्याने शिवाय साहित्य, काव्य हे सदैव ओठावर खेळत असल्याने कवी कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, भा.रा. तांबे अश्या कवींच्या काव्याची समर्पक उदाहरणे मधून मधून त्या पेरत असतात, त्यावेळी साक्षात सरस्वतीचं त्यांच्या जिव्हेवर वास करीत असल्याची जाणीव होते. त्यांना १९९८ साली 'डॉ. बी.सी.रॉय' पारितोषिक देण्यात आले, तसेच २००५ साली 'धन्वंतरी' पारितोषिकाने गौरविले. महान स्त्री-बाल रोग तज्ञ, उच्च विद्या विभूषित, समाजासाठी झटणारी व्यक्ती जेंव्हा निवृत्त होते, तेव्हां ती खरोखरीच सर्व कामातून मुक्त होते का? याविषयी खुद्द डॉ. स्नेहलताबाईंनीच एकदा संवाद साधला होता. त्यांनी सांगितले, 'आयुष्यभर नोकरी केल्यावर एका ठरावीक टप्प्यावर माणसं निवृत्त होतात. आणि मग आयुष्यात काय केलं आणि काय राहीलं याचा उहापोह मन करू लागतं. पण माझ्या बाबतीत सांगायचं तर मला निवृत्तीनंतर मोकळा वेळच मिळाला नाही. आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या. वैद्यकीय प्रॅक्टीस करतांना मी फक्त डॉक्टर होते. इतर डॉक्टरप्रमाणे व्यंग दूर करण्यासाठी नेमाने लहान मुलांवर शस्त्रक्रीया करीत होते. तेंव्हा वाटायचं की व्यंगावर शस्त्रक्रीया करण्यापेक्षा ते व्यंगच निर्माण होऊ नये यासाठी कांही करायला हवे. तेव्हां ते शक्य नव्हते. पण आज गर्भसंस्कार प्रकल्पाच्या माध्यमातून गर्भवती मातांना सल्ला देणं असो, किंवा समुपदेश करणं असो, तेव्हां राहून गेलेल्या गोष्टी मी आज पूर्ण करते आहे. गरीब माता आणि पोषणमूल्य देणारा आहार हा आता माझ्या संशोधनाचा विषय असून त्यातही माझे काम सतत सुरूच आहे. निवृत्तीनंतर माझ्या क्षेत्राशी आणि माझ्या संशोधनाशी संबंधित विषयात मी स्वतःला गुंतवून घेतलंय. माझी आई खूप सुंदर गायची. त्यामुळे माझ्यात संगीताची आवड उत्पन्न होणं हे साहजीकच होतं. मला संगीत शिकायला एक विख्यात गायिका येत असत. पण मला रियाझाला वेळच मिळत नसे. तरी गाणं समजायला लागलं. पुढे विद्यापीठाच्या संगीत विभागाशी माझे चांगले सूर जुळले ते त्यामुळेच! आशा खाडीलकर, अश्वीनी भीडे, रंजना जोगळेकर अशा अनेक चांगल्या मैत्रीणी मला मिळाल्या. मला खरं तर कॅन्सर सर्जन व्हायचं होतं, पण मी झाले मुलांची डाॅक्टर. म्हणजे कॅन्सर सर्जन व्हायचं राहूनच गेलं. नियतीनेच बहुदा ठरवलं असावं की माझा उपयोग मुलांसाठी जास्त व्हावा., आणि तो तसा झालाही! अशा शेकडो गोष्टी मला करायच्या होत्या. त्यापैकी कांही पूर्णत्वाला गेल्या, पण राहूनही खूप गेल्या. त्या पूर्ण करण्यासाठीचे माझे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. आणि राहून गेलेल्या गोष्टी माझ्याकडूनच नाही, तर इतर कोणाकडून पूर्ण होतील हा विश्वास मी बाळगून आहे!’
डॉ. स्नेहलता शामराव देशमुख, आज केवळ व्यक्ती नसून ते एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. अजूनही त्यांचे रुग्णांशी, त्यांच्या वेदनांशी जुळलेले नाते कायम आहे. तंत्रज्ञान हवंच, पण त्याचबरोबर डॉक्टरांचा रुग्णांशी सुसंवाद असायला हवा म्हणणाऱ्या डॉ. देशमुखबाई ज्ञानाने परिपूर्ण भरलेले अक्षय पात्र आहेत. त्यातून कितीही घ्या. कधीच रिते होणार नाही. अनेक मातांच्या, त्यांच्या बाळांच्या त्या देवदूत ठरल्या आहेत!
-प्रा. मं.गो. राजाध्यक्ष







Comments
Post a Comment