धागा धागा विणून विश्व निर्माण करणारा चित्रकार : प्रभाकर नाईक साटम

 


हल्लीच वृत्तपत्रात एक बातमी आली होती. जपानस्थित टॅपेस्ट्री कलाकार प्रभाकर नाईक साटम कालवश. ही बातमी वाचताच माझे मन ७ एप्रील २०१२ साली झालेल्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात साजरा झालेल्या त्या भव्य सोहळ्यात गेले. तो दिवस होता भारतीय विणकामाला एक जागतीक स्तरावर मानाने नेणाऱ्या प्रभाकर नाईक साटम या जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या एका प्रतिथयश चित्रकाराच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा अभूतपूर्व समारंभ. सारस्वत बॅंकेचे एकनाथजी ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशीत झालेल्या 'झल्लाळ' या समारंभाला हजर राहून त्यांच्या कर्तबगारीवर चार शब्द बोलण्याचे भाग्यही मला  त्या दिवशी लाभले. त्यादिवशी त्यांची जपानी पत्नी काझूको ताकाहाशी या देखील या सोहळ्यात उपस्थीत होत्या. त्यांना एक सुंदर सुवासीक अत्तराची कुपी देऊन आयोजकांनी तिचे स्वागत केले, व ह्या समारंभाचा सुगंध असाच आयुष्यभर तिच्या जीवनात दरवळावा  अशी आशा व्यक्त केली. आणि मी माझ्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार त्यातील पहील्या प्रतीवर व्यसपीठावरील सर्व पाहुण्यांच्या सह्या घेऊन त्या ग्रंथाला संग्राह्य केले.

 


प्रभाकर नाईकसाटम यांचा जन्म कोकणातील मालवण तालुक्यातील बांदीवडे या गावचा. २६ सप्टेंबर १९२९ रोजी ते या लहानश्या गावात जन्माला आले. जन्म झाला तो ऋषी पंचमीच्या दिवशी. आजोबांचा पेशा शिक्षकांचा होता. निधनापूर्वी त्यांनी आपल्या सर्व कुटुंबाची जबाबदारी जेष्ठ पुत्र श्रीधर म्हणजे प्रभाकर यांच्या वडिलांच्यावर दिली. प्रभाकर हा त्यांच्या ताई आत्याचा खूप लाडका होता. तिनेच देवाला नवस केल्यामुळे तो जन्माला आला असे तिचे म्हणणे होते.  वडीलांना तो दादा असे संबोधत असे. दादाही शिक्षकी पेशातच होते. गावात असलेल्या चार यत्तेच्या शाळेत प्रभाकरची रवानगी झाली. पण त्याकाळात बरेच शिक्षक मुलांना शिक्षा करण्यात धन्यता मानत. या मार खाण्याच्या आणि शिक्षा भोगण्याच्या प्रकाराला कंटाळून एकदा या काही मुलांनी त्यांच्या खुर्चीवर खाजकुयली टाकली. व मास्तरांची खाज असह्य होऊन ते घरी परतले. पण हा प्रकार उघडकीस आलाच! मात्र शाळेचे चेअरमन यांनी यापुढे शिस्तीत राहून अभ्यास करण्याचे वचन घेऊन ह्या मुलांना सोडले. गांव सोडून पोटासाठी मुंबईला गेलेले मुंबईकर सुट्टीत गांवी आले की त्यांचा रुबाब स्वतः चार यत्ता शिकलेले असलेले तरी एखाद्या संस्थानिकांचा असायचा. त्यातही कांही हौशी मंडळी असत, ते एखादे नाटक बसवून त्याचा प्रयोग गावात करीत असत. सण आले की या मुलांच्या हौसेला पारावर नसायचा. मग गणपतीची माती चेचणे, आरास करणे या गोष्टी जोमाने मुले करीत असत.

 


पुढे काळ हळूहळू बदलत गेला. ते सुखाचे दिवस संपत आले. शेती करणारी माणसं मुंबईच्या वाटेने गेली. आणि गाववाले त्यांच्या मनी ऑर्डरची वाट पाहू लागले. इथे प्रभाकरच्या कुटुंबाचे देखील तेच हाल झाले.कणकवलीच्या शाळेत नोकरी करणाऱ्या  वडीलांचा तुटपुंजा पगार, यात दिवस जात होते. आणि सर्वच कुटुंब दादांनी कणकवलीला नेले. आणि प्रभाकर आठले मास्तरांच्या शाळेत जाऊ लागला. पुढे सहावीला त्याला इंग्रजी शाळेत घालण्यात आले. मराठी शाळेत वर्गशिक्षक हेच सर्व विषयांचे शिक्षक असत. पण येथें प्रत्येक विषयाला एकेक शिक्षक होते. त्यात जगताप मास्तर हे चित्रकला शिकवत असत. त्यांची रेषा व रंगाची सफाई वाखाणण्याजोगी होती. या जगताप मास्तरांनी त्यांच्या ड्रॉईंगच्या दोन परीक्षा करवून घेतल्या. मध्यंतरीच्या काळात मुंबईहून त्यांचे एक नातेवाईक आले. त्यांनी प्रभाकरला पुढे काय करणार असें विचारताच त्याने उत्तर दिले मुंबईला जाऊन ड्रॉईंग शिकणार. ते गृहस्थ क्षणभर स्तब्ध झाले, नंतर म्हणाले, मुंबईला एक सरकारी ड्रॉईंगची शाळा आहे. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट नावाची. मी मुंबईला गेल्यावर त्यांच्या प्रवेशाच्या नियमांचे माहीती पुस्तक पाठवून देईन. आणि खरोखरीच त्यांनी ते पाठवून दिले. इकडे प्रभाकरने आपल्या आत्याला, ताईला पत्र लिहून हे कळवताच तिने आपण जेवणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवली.  दिवाळीच्या सुटीत ते एकदा गावी गेले असता सकाळी दात घासत पडवीत बसले होते. अचानक त्याचे लक्ष समोरील एका व्यक्तीकडे गेले. कमरेला एक साधारण तुकडा गुंडाळलेला अंगात तसेच काहीतरी कुडत्यासारखे, पायात चपलांसारखे काहीतरी, हातात एक तुटकी फुटकी बादली आणि एक काठी पण चपळ असा. कुठे बघणे नाही काही नाही. समोरून येणाऱ्या व्यक्ती मात्र त्याला लवून नमस्कार करीत. मित्राकडे विषय काढताच ते कुचेष्टेने म्हणाले, 'अरे तो सकाळीच उठून गावचे संडास साफ करतो' घरी गेल्यावर वडीलांकडे चौकशी करताच ती व्यक्ती म्हणजे अप्पासाहेब पटवर्धन हे कळाले. काही काळ उरळी कांचनाच्या आश्रमात वडिलांनी त्यांच्या सोबत कांही दिवस काढले होते. संयम आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करत रहाणे हा त्यांचा धर्म होता. ते कधी गांधीजींच्या कधी विनोबांच्या गोष्टी सांगत. चरख्यावर सूत कातत. अश्या थोर माणसाच्या सहवासात यावे या तीव्र इच्छेने प्रभाकरने त्यांच्याबरोबर संडास साफ करण्यास सुरुवात केली.

 


शेवटची परीक्षा आटोपली. आता आपण व आपला मित्र बाबा दोघेजण मुंबईला जे.जे. स्कूलला जाणार या आनंदातच दिवस घालवल्यावर दुसऱ्याच दिवशी  वडीलानी स्कुल बोर्डाच्या ऑफीसात जाऊन प्रभाकरसाठी शिक्षकाच्या नोकरीच्या नेमणुकीचे पत्र आणले देखील. हिरमुसल्या तोंडानेच प्रभाकरने कामावर जाण्यास सुरुवात केली. महीना झाल्यावर पहीला पगार वडीलांच्या हातावर ठेवला. आणि त्यांच्या म्हैसकर नावाच्या मित्राने त्यांना प्रभाकरची आकांक्षा सांगितली. वडील तसेच बाहेर पडले. आणि परतले तेच प्रभाकरच्या मुंबईला जाण्याची तयारी करवून. मुंबईला पोचताच ताईच्या नवऱ्याबरोबर स्कुल ऑफ आर्टला जाताच कळाले की आता प्रवेश संपून वर्गही सुरु झालें आहेत. तोपर्यंत त्याचा बाबू तेथे प्रवेश घेऊन मोकळाही झाला होता. ताईचे यजमान डॉक्टर होते. दीनबंधू नांवाने समाजकार्य व डाॅक्टरकी करणे हाच त्यांचा पेशा होता. त्यांनी एक पत्र लिहून तेथील 'नूतन कला मंदीर' येथे त्यांना पाठवले. तेथे मुख्य शिक्षक होते दंडवतीमठ. कला क्षेत्रात दंडावतीमठ हे नांव फार आदराने घेतले जात असे. त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले होते. बेळगांवचे हे दंडवतीमठ सर्वांच्या आदराला पात्र ठरले होते. वडीलानी दिलेल्या पैश्यातून फीचे पैसे देताच त्याची परिस्थीती पाहून मास्तरांनी ते पैसे परत केलें आणि एका दुकानचे नांव सांगून तेथून ड्रॉईंगचे साहीत्य घेण्यास सांगीतले. आता प्रवेश तर झाला होता. पण पुढचे काय? हा प्रश्न उभा होताच! अश्यातच त्यांना एका वृत्तपत्रात एक जाहीरात नजरेस पडली. ती होती खेरवाडीतील ‘चर्मोद्योग स्कुल’ मध्ये होतकरू विद्यार्थी पाहीजे असल्याची. दोन वर्षाचा अभ्यासक्रम शिवाय वर स्टायपेंडही मिळणार होता. दुसऱ्या दिवशी ते प्रिन्सिपॉल भालेकर यांच्याकडे पोचले. आणि प्रभाकरने ते चामड्याचे काम शिकण्यास सुरुवात केली.  सकाळी नूतन कला मंदीर, दूपारी चर्मोद्योग स्कुल, संध्याकाळी इंडस्ट्रियल स्कूल असा तिहेरी प्रवास सुरु झाला. बघता बघता परीक्षेचे दिवस आले. पहील्या वर्षाची परीक्षा आटोपली अन एक दिवस स्कुल आर्टच्या मातोंडकर मास्तरांचा भेटून जाण्यासाठी निरोप आला. जाताच त्यांनी जे.जे.चा प्रवेश फॉर्म समोर ठेवून सही  करण्यास सांगीतले. आणि प्रभाकर नाईक साटम यांची रवानगी अहिवासी सरांच्या वर्गात केली. शेवटी एकदाचे जे.जे.त जाण्याचे स्वप्न पूर्णत्वाला आले.

अहिवासी मास्तर म्हणजे शंभर टक्के भारतीय बाणा. चित्रेसुद्धा भारतीय संस्कृतीची. वाॅश टेक्नीक मध्ये त्यांचा हातखंडा होता. मात्र काम चाले ते जलरंगात. स्कुल ऑफ आर्टचे संचालक सॉलोमन यांनी भारतीय कला परंपरेचे शिक्षण देणारा एक वर्ग सुरु करून त्याचा ताबा अहिवासी यांच्याकडे दिला होता. त्यांचे विद्यार्थीही मांडी घालून डेस्कसमोर बसत. त्याच वेळी शेजारील वर्गातील मुले तैलचित्रे रंगवीत असत. वेळ मिळेल तेव्हां प्रभाकरचे तेथे जाऊन ते न्याहाळणे सुरु असे. आणि तो वर्ग चालवीत शंकर पळशीकर. पळशीकर हे अत्यंत आदरणीय शिक्षक म्हणून मानले जात. अकॅडमीक शैलीची परंपरा आणि आधुनिक कलादृष्टी यांचा समन्वय त्यांच्या विचारात होता. पॉल क्ली आणि आधुनीक कला प्रवाहाचा त्यांनी विद्यार्थ्यांना परीचय करून दिला. आणि या पळशीकरांनी प्रभाकरची कामे पाहुन त्यांना अहिवासीकडून आपल्या वर्गात आणले. त्यांना लायब्ररी मधील पुस्तके बघायला शिकवली. आणि प्रभाकर त्यांचा एक आवडता विद्यार्थी ठरला. पण ह्याच अहिवासी सरांबद्दल पळशीकरांना अत्यंत आदर होता. जरी त्यांची विचार शैली पटत नसे तरी.

 


स्कुल ऑफ आर्टचा वाढता खर्च, मिळणारे तुटपुंजे पैसे यामुळे प्रभाकर नेहमीच चिंतेत असत. असेच एक दिवस केनेडी ब्रिजच्या पुलाखालून जात असताना पूलाखाली असलेल्या दगडू चांभाराकडे सकाळी जाताना लोक आपले तुटलेले चप्पल, बूट व अनेक प्रकारच्या चामडी वस्तू दुरुस्त करायला देत.  व दगडू त्या संध्याकाळी जाताना सर्वांच्या घरी पोचवीत असे.  या दगडूला प्रभाकरने चर्मोद्योग अभ्याक्रम केल्याचे माहीत होते. त्याने प्रभाकरला टाके मारणार कां, असे विचारताच प्रभाकरने चक्क स्त्यावर बसून चप्पल दोन पायात चप्पल धरून टाके मारण्यास सुरुवात केली. पुढे पैशाची गरज पडली की दगडू अथवा त्याचा मेव्हुणा काशीराम यांच्याकडे काम करण्यास जाणे नित्याचे झाले. अखेरीस शेवटचा दिवस आला. आतापर्यंत पळशीकरांनी सर्वांचा विश्वास जागा केला होता. दंडवतीमठ मास्तरांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या क्लास मध्ये बोलावून आशीर्वाद दिले. आणि सर्वानी ज्या कॅन्टिनवाल्याने मोकळ्या खिश्याच्या या विद्यार्थ्यांना सतत पोटभर खायला घातले होते, त्या रामय्याच्या कॅन्टीनकडे धाव घेतली. सर्वाना रामय्याने बटाटेवडे खायला घातले. निघताना पैसे देण्यासाठी मुले खिशात हात घालू लागताच रामय्या तडकला, 'पैसे कसले, मी गरीब. माझ्याकडे तुम्हांला द्यायला काहीच नाही. आजच एक एक बटाटावडा सर्वाना माझ्याकडून भेट' आणि हे बोलत असताना त्याचा आवाज खोल होत गेला. डोळेही भरून आले होते. पण अजून स्कूल ऑफ आर्ट प्रभाकरना सोडायला तयार नव्हते. भोंसुले मास्तरांनी त्यांना म्युरल पेंटींगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला. हा अभ्यासक्रम सुरळीत चालला होता. आणि एक दिवस जे.जे.मधे कॅलिको कंपनीने एक नोटीस लावली. त्यामध्ये म्हटले होते ,' कॅलिको मिल्स आणि कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल ही कंपनी काही होतकरू विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊ इच्छिते. शिकवायला इंग्लंडहून शिक्षक बोलावण्यात येईल. यातील यशस्वी विदयार्थ्यांना स्टुडीओत सामावून घेण्यात येईल. आणि भोंसुले मास्तरांनी स्वतः प्रभाकर कडून फाॅर्म भरून घेऊन पाठवून दिला. आणि अहमदाबादला इंटरव्ह्यू होऊन प्रभाकरची त्यांत निवड झाली.

 त्यावेळी अनेक कापडं गिरण्या होत्या. मोठे मोठे कारखाने फक्त कापड बनवून विकत होते. विव्हर्स सेंटरचे सर्व आर्टीस्ट खरे तर कला महाविद्यालयाचे डिप्लोमा घेतलेले, पण त्यांच्या हातून जूनी जिवंत असलेली वस्त्रकला जपणे एवढेच कार्य झाले. सरकारी धोरण व चित्रकारांचा बाहेरच्या जगाशी नसलेला संबंध ही प्रामुख्याने त्यातील कारणे असावीत.  पण कॅलिको मिल ही त्याला अपवाद होती. तिने अनेक प्रयोग केले. नवनवीन डिझाईन बनवली. आणि त्यांचे 'कॅली-क्लॉथ' हे प्रसिद्धीच्या झोतात आले. आणि याला कारण होत्या त्या गिराबेन साराभाई. एक चैतन्यमय व्यक्तीमत्व. नव्या पिढीला काय पाहीजे हे ओळखणारी. आणि माणसातले गुण ओळखण्याची त्यांनी पारख खचितच वाखाणण्यायोग्य होती. मुंबईला त्यांची स्वतःची जाहीरात संस्था 'शिल्पी' कार्यरत होती. तेथेही जाहीरात क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती भाई पत्की हे कार्यरत होते. त्यांनीही जाहिरातीद्वारे कॅलिकोला प्रसिद्धीच्या कळसावर नेले होते. आणि प्रभाकर नाईक साटम यांना त्यांनी तेथे प्रयोगशील रहाण्यास उद्युक्त केले.पुढे नाईक साटम याना दोन वर्षे इंग्लडला टेक्स्टाईल डिझाईनिंग शिकण्यासाठी 'रॉयल स्कुल' येथे कंपनी तर्फे पाठविण्यात आले. कॅलोकोचे तेथेही कार्यालय होते. पुढे तेथून जर्मनीलाही त्यांना जाण्याचा योग आला.

 


तेथून परतल्यानंतर प्रभाकर यानी केवळ डिझाईनिंगवर अवलंबून न रहाता तेथील प्रत्येक खात्याची माहीती करून घेण्यास सुरूवात केली. तेथील कामगारवर्ग त्यांच्यावर खुश होता. पण कांही अधिकाऱ्याना मात्र हे रुचत नव्हते. पण गिराबेनना त्यांची योग्यता माहीती असल्याने त्यांनी प्रभाकर याना सर्वच खात्यातून फिरण्याची परवानगी दिली. परिणामी त्यांच्या डिझाइनना तंत्रज्ञानाचाही फायदा मिळाला. आनेक ग्राफिक डिझाईन त्यांनी साड्यांसाठी बनवली. त्यांची किंमतही जास्त ठेवली. लोकांना ही रूचतील का हा प्रश्न येताच आपण स्वतः काउंटरवर उभा राहून ती विकू याची खात्री त्यांनी दिली एवढेच नव्हे, तर स्वतः काऊंटर डिझाईन करून त्यांचा दर्शनी भाग सारखा ठेवून अंतर्गत रचना बदलली व ही नवीन डिझाईन लोकांना खूपच भावली. कॅलिकोचे नांव वाढतच गेले. प्रभाकर नाईकसाटम यांनी आपला स्टूडीओ एक आदर्श असा त्यांनी तयार केला होता. अमेरिकेत बंकिंगहॅम फुलर यांनी डोम या प्रकारच्या वास्तूची स्वतःची कल्पना प्रत्यक्षात आणली होती. कॅलिकोचे चेअरमन गौतम साराभाई याना तो प्रकार खूप आवडला होता. व तो येथे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा डोम पूर्णत्वाला आला की त्यातूनच कॅलिकोची सर्व प्रदर्शने करायची ही कल्पना पुढे आली.

 


इंग्लंडहून आल्यावर आपल्या नवीन कल्पनांना मार्केटमध्ये पडताळून प्रभाकरना  पहायच्या होत्या. इकडे डोम आणि प्रदर्शन, फॅशन शो याची कामे जोरात चालू होती. डोम उभारणी सुरु होती. पण वरची गोलाकार इमारत अर्धी झाल्यावर मग मात्र कोणीच वर चढायला तयार होईना. रात्री दहाची वेळ झाली होती. गिराबेन, प्रभाकर व दोघें तिघे आर्टीस्ट  फक्त हजर होते. शेवटी प्रभाकर स्वतः वर चढले आणि त्यांनी मधला सांधा जोडायला घेतला. तेव्हा दुसऱ्या बाजूने सुतार देखील वर चढला आणि डोम पूर्ण झाला. कॅलिकोचे दिवस सरकत होते. प्रभाकर त्यात आपले सर्वस्व ओतून काम करीत होते. कॅलिकोची डिझाइन्स करताना त्यानी अनेक रेनासन्सच्या पेंटरच्या चित्रांचा आधार घेतला. त्याना आधुनिक रुप देऊन त्यांना साड्यावर छापले. त्यांचे प्रिंट्स खूपच प्रसिद्धीला आले. पण त्यांचा दुस्वास करणारेही वाढले. आणि एक दिवस ध्यानीमनी नसताना तेथील एका थोर व्यक्तीने त्यांना भानावर आणले. एवढा पगारी दुसरे कोण देणार का तुला, हा त्याचा प्रश्न ऐकून प्रभाकरच्या कॅलिकोच्या आपुलकीलाच तडा गेला.आपण येथे नोकर आहोत याची जाणीव त्या व्यक्तीने करुन देवून त्याचे डोळे उघडले. तेव्हां त्यांना आपणही या लोकांप्रमाणेच कॅलिकोला असल्याची प्रथम जाणीव झाली.

'पगारच सांगायचा असेल, तर तो मी इथे मिळणाऱ्या पगारापेक्षा दोन अडीज पट जास्ती मिळवु शकतो,' असे म्हणून ते विमानाने दिल्लीला गेले. तेथील 'डी सी एम' या कापड गिरणीतून नोकरीचे नेमणूकपत्र घेऊनच ते परत आले. व त्यांनी कॅलिकोला ते दाखवून आपला राजीनामा दिला. त्यांनी स्वतः प्रेमाने उभारलेल्या स्टुडीओचे दरवाजे बंद करून ते बाहेर पडले. ज्या गेटमधून तेरा वर्षांपूर्वी ते आत आले होते, त्याच गेटमधून बाहेरी पडताना त्यांना आठवत होत्या त्या कॅलिकोशी बांधलेल्या सूत्र गांठी. त्याही आज सुटल्या. दिल्ली येथे जाऊन त्यांनी 'दिल्ली क्लॉथ मिल' मध्ये सुत्रे हातात घेतली. त्या पूर्वीही या व अश्या अनेक गिरण्यांतून त्यांना आमंत्रणे आली होती. जास्त पैशाचीही आमीषे देण्यात आली होती. पण कॅलिकोशी असलेली बांधिलकी त्यांना सोडवत नव्हती. पण आता 'डी सी एम' मधून दोन वर्षातच निघण्याच्या तयारीत नाईक साटम होते. तेथे त्यांना जाणवले की कुठल्याही कापड गिरणीत कापड धंद्यात प्रगतीपथावर जाण्याच्या उद्देशाने कामे झालीच नाहीत. कापड निर्मिती एवढाच एक उद्देश त्यामागे राहीला होता. बेचीराख झालेला जपान व स्वतंत्र झालेला भारत या दोन्ही देशांनी एकाच वेळी प्रगतीवर जाण्याचा मार्ग धरला होता. पण जपानने रात्रीचा दिवस करून एक कुटुंब भावनेने जपानला प्रगतीपथावर नेले. पण  त्यावेळी भारत सायकलच्या जमान्यातून बाहेर आला नव्हता.

दिल्लीत एक वर्ष झाल्यावर आता त्यांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवायची वेळ आली होती. अनेक वर्षे टेक्स्टाईलमध्ये काम केल्याने सूत्र या शब्दाशी त्यांचे नाते जुळले होते. चित्रकार चित्र बनवतो. माध्यम कोणते वापरायचे ते प्रत्येकाचा वैयक्तीक निर्णय असतो. आणि आपला 'दोरा' हे माध्यम तर प्रभाकर यांच्या खेळीमेळीचे साधन होते. पुढचा मार्ग आखायचा तो या दोऱ्याच्या माध्यमावरच आधारीत असा. आणि त्यांचे 'टॅपेस्ट्री' हा प्रकार त्यांच्या कामाशी जुळणारा होता. आणि नाईक साटम यांनी राजीनामा दिला व ते डी सी एम मधून बाहेर पडले. फ्रांस-बेल्जीयम मध्ये ‘टॅपेस्ट्री’ या कला प्रकारामध्ये खूपच प्रगती झाली होती. आणि १९६८ साली त्यावेळच्या झेकोस्लोव्हाकिया मधील सरकारकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यासाठी त्यांना त्यांची भाषा शिकावी लागली. तेथे त्यांना अनेक नामवंतांकडून मार्गदर्शन मिळाले. पुढें ते प्राग मध्ये गेले. तेथे त्यांना पहिलेच काम करायला मिळाले ते चार मीटर रुंद व दोन मीटर उंच असे होते. रंगीत दोरे घ्यायला पैसे नव्हते. तेव्हा ताकाहाशी या जपानी महिलेनं तात्पुरते पैसे दिले. कॉलेजचे दिवस कामातच जात असत. पेंटिंगचे विद्यार्थी असल्याने त्यांची डिझाईनची स्केचीस सतत चालू असत. उन्हाळ्याच्या सुटीत अर्थार्जनासाठी काम करणे हे आत नित्याचे झाले होते. टॅपेस्ट्रीचा सर्व बाजूनी अभ्यास सुरु होता. आणि झेकोस्लोव्हाकियाचा तो काळ संपवुन प्रभाकर मायदेशी परतले. तेथे कॅलिकोचे लोक त्यांच्या मागे  परत येण्यासाठी लागले. जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करा असे त्यांचे म्हणणे होते. प्रभाकरचेही मन दोलायमान होवू लागले होते. परत कॅलिकोत जाण्याचा विचार मनांत डोकावू लागला.

 



१९८० मध्ये अचानक नाईक साटम यांच्या हातात जपान फाउंडेशनचा फॉर्म आला. जपान फाऊंडेशनचा फेलोशिपचा फॉर्म  होता तो. प्रभाकरनी  तो भरून जपानी दूतावासात नेवून दिला. कॅलिकोच्या म्युझियमसाठी केलेली डिझाइन्स त्यांनी इंटरव्ह्यूला दाखवली. पुढे त्यांची जपान फौंडेशनसाठी निवड झाली. आणी तीनच महीन्यांनी जपान दूतावासातून त्यांना जपानला  येण्यासाठी आमंत्रण दिले. जपानी माणूस हा आदरातिथ्यासाठी प्रसीद्ध आहेत. नाईक साटम यांचे  योग्य प्रकारे स्वागत करून त्यांनी टोकिओमधील  जगप्रसिद्ध असलेली होक्कायडो युनिव्हर्सिटी, त्यांचे गेस्ट हाऊस, फॉरेस्ट म्युझियम, संशोधनासाठी भली मोठी प्रयोगशाळा अन विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेल दाखवले. व दुसऱ्या दिवशी ते तेथे राहायला गेले. आणि कामाला जोरदार सुरुवात झाली. टॅपेस्ट्रीसाठी लागणारे दोरे त्यांनी स्वतःच रंगवले. लागणारा माग देखील त्यांनी गांवातील सुताराच्या मदतीने स्वतःच तयार केला. आणि तीन महिन्यात त्यांची पहीली टॅपेस्ट्री तयार झाली. तिला टी व्ही वर चांगलीच प्रसीद्धी मिळाली. आणि एकदिवस त्यांना होक्कायडो म्युझियमच्या क्युरेटरचा फोन आला व त्याने सदर टॅपेस्ट्री पहाण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी ते लोक नाईक साटम यांच्या स्टुडीओवर हजर झाले. आणि ती टॅपेस्ट्री पाहून झाल्यावर म्युझियमने ही विकत घेण्याची ठरवले आहे, हे सांगताच ते एकदम आनंदीत झाले. त्यांच्या पहील्याच कामाचा त्या प्रख्यात म्युझियमने केलेला आदर त्यांना नक्कीच भूषणावह होता.

 


आता प्रभाकर नाईक साटम यांचे काम पूर्ण दमात सुरु होते. अनेक जण त्यांची कामे पहायला मुद्दाम भेटी देऊ लागले. दुसर्या टॅपेस्ट्रीची सुरुवात झाली होती. टी व्ही चॅनल आणि वृत्तपत्रांनी सुरुवातीपासूनच साथ द्यायला सुरुवात केली होती.  दुसऱ्यानंतर तिसरीने वेग घेतला. टोकीओमधील एका प्रमूख वृत्तपत्राने तॅयांची मुलांखत घेतली.  आणि त्या वर्षाचे सांस्कृतीक अवार्ड देण्यासाठी नाईक साटम यांना निवडले गेले. शिवाय त्यांना एक वर्षाची मुदतवाढही मिळाली. आता प्रभाकर नांईक साटम हे नांव प्रसीद्ंधीच्या झोकात आले होते. पुन्हा होक्कायडो म्युझियमला भेट देताच मुख्य क्यूरेटरांनी त्यांना मुख्य हॉलच्या मुख्य भिंतीकडे बोट दाखवून विचारले, 'साटम तुमच्या कामावर आम्ही सर्व खुश आहोत. ही समोरची भिंत म्युझियमचे मानाचे स्थान समजले जाते. त्यासाठी मोठी टॅपेस्ट्री तुम्ही करावी अशी इच्छा आहे. अर्थात त्याला इतर स्पर्धकही असणारच. त्यांचा विश्वास होता प्रभाकरवर, आणि तो त्यांना तोडायचा नव्हता. प्रश्न होता एवढे प्रचंड काम करायला जागा कोठे आहे? तीही समस्या त्शेयांनी सोडवली. शेजारचे वापरात नसलेले म्युझियम त्यांना देण्यात आले. लागणाऱ्या लाकूड सामानाची व्यवस्था गावातच झाली. हे प्रचंड काम जर या गावात झाले, तर पूर्ण जपानमध्ये या क्युरेटरला व गावाला एक मानाचे स्थान मिळेल ही भावनाही त्यामागे होती. जोडीला त्यांनी योग्य असे मदतनीस निवडले. मूळ पेंटींग तयार झाले. पुढे होणाऱ्या ४ मीटर बाय ५ मीटर आकाराच्या टॅपेस्ट्रीसाठी साडेसहा मीटर उंच व साडेपांच मीटर रुंद अशी फ्रेम बनवण्यात आली. साधारण दहा एक महिन्यांत टॅपेस्ट्री तयार झाली. एका भव्य अश्या समारंभाने तिचे उदघाटन करण्यात आले. त्या टॅपेस्ट्रीचे नामकरण 'लाईफ आफ्टर डार्क' असें त्यांनी केले.  नाईक साटम याना एक आगळाच बहुमान देण्यात आला. जपान फौंडेशनचे व भारतीय दूतावासातील अंब्यासॅडरना अगत्याने आमंत्रण दिले होते. पण जपानच्या सर्व मोठ्या व्यक्ती हजर असलेल्या त्या मानाच्या समारंभाला भारतीय दूतावासातून कोणीच हजर राहीले नव्हते. विशेषतः हा मान केवळ प्रभाकर नाईक साटम या व्यक्तीचा नव्हता, त्यांच्या एका कलाकृतीचा नव्हता, तर भारताचे नांव जगभरात करणाऱ्या, जे.जे.स्कुल ऑफ आर्टने घडवलेल्या एका महान कलाकाराचा होता. हा सन्मान भारताचा होता. पण तेथील भारतीय दूतावासाच्या लेखी त्यांना फारशी किंमत नव्हती. प्रभाकर नाईक साटम यांनी आपले पाच गुरु मानले होते , ते म्हणजे बांदिवड्याच्या शाळेतील आठले गुरुजी, कणकवलीच्या शाळेतील जगताप मास्तर, नूतन कला मंदीरचे दंडवतीमठ सर, जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील शंकर पळशीकर सर व अहिवासी सर. या सर्वामुळे आपण घडलो ही भावना त्यांच्या मनात रुजली होती.

 


पुढे नाईक साटमना योकोहामा या प्रख्यात म्युझियमला भेट देण्याची संधी मिळाली. त्यांचे संचालक प्रभाकरच्या ओळखीचे झालेच होते. अतीशय उच्च दर्जाचेच काम असलेल्या दर्शनी  भिंती डेकोरेट करण्यासाठी अनेक कलाकारांकडून कामे मागविण्यात येत होती. आपणही आपली ड्रॉइंग्स द्यावीत अशी विनंती क्युरेटरनी त्यांना केली.  त्या म्युझियम मध्ये आपले काम लागावे यासाठी मोठमोठे कलाकार धडपडत असत. प्रत्येकी बहुदा एकच काम लागलेले असे.  तीन महीने सतत काम करून नाईक साटम यानी निरनिराळ्या इझमवर आधारित ड्रॉईंग त्यांनी करून ती म्युझीयमला दिली. एका महिन्यात त्यांना बोलावण्यात आले. टेबलवर एक बॉक्स ठेवण्यात आला होता. तो उघडायला नाईक साटमना सांगून त्यातील वरची पाच पेंटिंग त्यांनी उचलली. ही पाच पेंटींग पाच टॅपेस्ट्रीसाठी आहेत. प्रत्येक टॅपेस्ट्री तीन मीटर दहा सेंटीमीटर रुंद व दोन मिटर पन्नास सेंटीमीटर उंच असेल. आपल्या पाच टॅपेस्ट्री या जगविख्यात म्युझियमच्या महत्वाच्या  भिंतीवर झळकणार हेच त्यांच्यासाठी गौरवाचे होते. एक भारतीयाला एका प्रगल्भ देशातील जगप्रसीध्द म्युझियमच्या भिंतीवर स्वतःचे काम लावायचा बहुमान दुसऱ्यांदा मिळणार होता. खुद्द जपानमधील कलाकारांच्या वाट्याला न आलेला सन्मान प्रभाकर नाईक साटम या भारतीय कलाकाराने मिळवून भारताची मान उंचावली होती. यावेळी सर्व लोकांना म्युझियम तर्फे उदघाटनाची आमंत्रणे पाठवली होती. आपले भारतीय राजदूत यांनाही बहुमानाने आमंत्रण पाठवले होते. शिवाय नाईक साटम यांनीही प्रत्यक्ष भारतीय दूतावासात जाऊन त्यांना हजर रहाण्याविषयी कळकळीची विनंती केली होती. उदघाटन सोहोळा खरोखरीच अवर्णनीय झाला. पाचही टॅपेस्ट्री तेथे दिमाखाने झळकत होत्या. म्युझियमची माणसे भारतीय राजदुत आले का याची कटाक्षाने चौकशी करीत होते. राजदूत ही भारताची परदेशातील प्रतीमा असते, असे मानले जाते. पण शेवटी भारतीय राजदूत आपल्या देशाच्या होणाऱ्या या सन्मान सोहळ्याला दिसले नाहीत.

झेकोस्लोव्हाकिया येथे भेटलेली काझूको ताकाहाशी सोबत त्यांचे संबंध आले होते. त्यांच्यासोबत ती कामही करीत असे. अनेकदा तिच्याकडून पैशांची मदतही झाली होती. भारत भेटीवरही ती नाईक साटम सोबत आली होती. टोकिओ सारखे शहर सोडून ती एका खेड्यात येऊन त्यांना मदत करीत होती. आणि त्यातूनच त्यांचा हा सुखद सहवास मनाने जोडला गेला. काझूको हिच्या सहवासामुळे आणि जनाशीर्वादामुळे त्यांनी कायम जपान मधेच रहायचे ठरवले. जीवनपूर्तीसाठी अहोरात्र कष्ट करण्याची एक ताकद त्या दोघांमध्ये निर्माण झाले होती. एकमेकांना ओळखण्याची संधी दोघांनाही मिळाली होती. दोन जीवांचे जातक जुळलेले असेल तर सुखाचा तुरा भालप्रदेशावर मिरवणारच, हे त्यांच्यासाठी सत्य होते. आणि दोघेही पती-पत्नी नात्यांने बांधले गेले. टोकियो जवळच याचिहो (आताचे साकुहो माची) येथे घर घेऊन त्यांनी आपला स्टुडीओही त्या सुंदर गावात निर्माण केला. त्यांच्या अनेक टॅपेस्ट्री अनेक खासगी म्युझियममध्ये, खासगी व्यक्तीकडे संस्थांकडे संग्रहीत आहेत. कांही कॅलेंडर डिझाइन्स देखील त्यांनी बनवली. गावांतील लोकांना विणकाम शिकवले. दरवर्षी हिंवाळ्यात भारतात येवून काही महीने ते काढत असत. त्यावेळी आपल्या जुन्या मित्रांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारण्यात त्यानं आनंद मिळत असे. त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभानंतर ते आपल्या अनेक मित्रांना जाऊन भेटले. ज्यांच्याकडे जाणे शक्य नव्हते, त्यांच्याशी फोनवरून संभाषण साधले. भारताशी आपली नाळ कशी जुळली आहे, याचेच हे प्रतीक होते. आपल्या आत्मचरित्राचे नांव त्यांनी 'झल्लाळ' असे ठेवले आहे. निर्मिती प्रक्रियेशी एकरूप झालं की अंधार शिल्लक रहात नाही. उरतो तो फक्त 'झल्लाळ' म्हणजे तेज किंवा ऊर्जा. दीपक घारे या व्यासंगी लेखक-कला समीक्षकांनी संपादीत केलेल्या व  त्याला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहीलेल्या या 'झल्लाळ'चे  चित्रकार सतीश भावसार यांनी अर्थपूर्ण मुखपृष्ठ तशीच अंतर्बाह्य रचना सुंदर रित्या केली आहे. तसेच इंग्रजी मध्ये ‘लाईफ आफ्टर डार्क’ हेही प्रसीद्ध झाले आहे.

 

 


यावर्षीही पत्नीसह ते मुंबईला आले होते. बोरीवली येथील आय सी काॅलनी मधील आपल्या घरी ते वास्तव्याला होते. परंतू फेब्रुवारी- मार्च महीन्याकडे ते पुन्हां जपानला जात असत. या वेळीही ते मार्चमध्ये परत जपानला जाणार होते. पण कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडावून झाला व त्यामुळे त्यांचा भारतातील मुक्काम वाढला. त्यांना ताप येऊ लागल्यामुळे केलेल्या कोरोना चाचणी अहवालात त्यांचं रिपोर्ट पॉजिटीव्ह आला. व एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आणि उपचारादरम्यानच शनिवार दिनांक ३० मे २०२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठोपाठ एका महीन्याने त्यांनी पत्नी कोझूको नाईक साटम यांनाही वयाच्या नव्वदाव्या वर्षी कोरोनाने ग्रासले. कांदीवली मधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आणि तब्बल २० दिवस कोरोनशी झुंज देऊन या महिलेने कोरोनावर मात केली, अन भारतातील कोरोना मधून मुक्त होण्याचा सर्वात वयस्क परदेशी नागरीक ठरली. उपचारादरम्यान तेथील शेफने त्यांना जपानी पद्धतीचे जेवण बनवून तिला घरचा वातावरणाची सोय मिळवून दिली होती. मात्र आज प्रभाकर नाईक साटम यांच्या जाण्याने त्यांच्या सह जीवनातील ऊर्जा मात्र निमाली आहे. बांदिवडे ते टोकिओ व्हाया मुंबई-अहमदाबाद हा त्यांच्या सफल जीवनाचा प्रवास त्यांची सुविद्य पत्नी काझूको ताकाहाशी नाईक साटम हिच्यासोबत यशस्वी केला. आणि या भारतीयाने जपान मधे आपल्या देशाचे नांव उज्वल केले. आणि त्या देशानेही त्यांची, त्यांच्या कलेची कदर केली. त्यांच्यातील कलाकाराला मानवंदना दिली!

अश्या वेळी आठवतात त्या राजकवी यशवंत यांच्या काव्यपंक्ती,

              ' तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला,
                हिऱ्याचे तेज ही जैसे मिळावे गारगोटीला,
                दिसावी पावलाखाली खड्याना तारकाकांती,
                ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी '

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

(लेखातील छायाचित्रे अनुभव प्रकाशनच्या 'झल्लाळ' या पुस्तकातून साभार घेतली आहेत)









Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…