छंदातून व्यावसायीकतेकडे : वसंत सरवटे

 


"व्यंगचित्रे काढणारा चित्रकारापुढे एक पायरी असतो. त्याचे ड्रॉईंग तर उत्तम असावेच लागते, शिवाय त्याचा रेषेचा, शरीरशास्त्राचा, कॉम्पोझिशनचा पाया भक्कम असावा लागतो. राजकीय व्यंगचित्रे काढताना ती केवळ शिक्के मारल्याप्रमाणे एकेक काढून दाखवता येत नाहीत. तर भोवतालचे वातावरणही त्यात घ्यावे लागते. मंत्री दाखवताना पलीकडच्या दालनात त्याचा सचिव दाखवावा लागतो. अलीकडच्या भागात शिपाई फायली घेऊन जात असताना दिसतो. शिवाय छतावरील पंखे, दिवे, भिंतीवरील दिव्याची बटणे हे सर्व अभ्यासपूर्ण तऱ्हेने चित्रित करावे लागते" जागतीक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण दूरदर्शनवरील एका मुलाखतीत बोलत होते. आणि ते खरोखरच होते. व्यंगचित्राची ताकद ही खूप मोठी असते. आणि त्याचे प्रमाणही एकदा आम्हांला मिळाले. आर.के.लक्ष्मण यांनी कांही वर्षांपूर्वी 'टाइम्स ऑफ इंडीया' मध्ये काढलेल्या एका व्यंगचित्रात एक आजोबा आपल्या हातात बॅट घेऊन उभ्या असलेल्या नातवाला आशीर्वाद देत सांगत आहेत की, असाच तू सुपर खेळाडू हो. अन टूथ पेस्ट, शाम्पू, साबण यांच्या जाहिरातीतून मिळालेल्या उत्पन्नावर अर्थमंत्रालयाकडून कर सवलत घे! आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या व्यंगचित्राचा हवाला देऊन सचिन तेंडुलकरांच्या फेरारी गाडीच्या केंद्र सरकारच्या कर सवलतीबद्दल नोटीस दिली. व्यंगचित्रे असोत वा अर्कचित्रे अथवा कॅरीकेचर्स, दोन्हीमध्ये व्यक्तींचे भाव, गुण, दोष या सर्वच गोष्टी अभिप्रेत असतात. याकरीता हवी असते सतत रेखाटन करण्याची जिद्द, निरीक्षण शक्ती, व्यक्तीच्या खुबी ओळखण्याचे ज्ञान आणि त्यातील स्वभाव मर्म जाणण्याचे मार्मिक बलस्थान.

 


असाच एक मुलगा कोल्हापूरमधील आपल्या शाळेत चित्रे काढण्यात रमत होता. त्याचे चित्रकला शिक्षक शिरगावकर अश्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करित असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रॉईंगच्या दोन परीक्षाही त्याने दिल्या. कोल्हापूर हे तसे कलापूर म्हणून ओळखलं जात असे. तेथील मातीत कला रुजलेलीच आहे. आबालाल रहमान, बाबुराव पेंटर, माधवराव बागल अश्या दिग्ग्ज कलाकारांची चित्रे त्या काळात घरोघरी दिसत असत. त्याचाही प्रभाव या बाल कलाकारावर पडला. पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबईला सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये जायचं हेही त्याने मनाशी नक्की केलं. तो कोल्हापुरातील ज्या वाड्यात रहात असे तेथील आणखी एक मुलगा देखील असाच चित्रकलेच्या वेडाने झपाटलेला होता. दोघांची मिळून कला साधना सुरु असे. दोघांचेही ध्येय एकच होते. चित्रकार बनण्याचे. दोघेही मुळगांवकर-दलाल यांच्या मोहक चित्रांनी झपाटलेले होते. त्यांच्याप्रमाणे या दोघानांही घडायचे होते. शिरगावकरांच्या घरी होणाऱ्या जेष्ठ चित्रकारांच्या चर्चेमधून मार्गदर्शनही व्हायचे, आणि मनातल्या कलेच्या उर्मी उफाळून येत असत. पण जीवनाला अचानक कलाटणी मिळाली. आणि ह्या मुलाने सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तर त्याच्या जिवलग मित्राने स्कुल ऑफ आर्टची वाट धरली. हा स्कुल ऑफ आर्टमध्ये उच्च कला शिक्षणासाठी गेलेला मुलगा होता, आजचे सुप्रसीध्द कलाकार शि. द. फडणीस, व पुढे इंजिनिअरला दाखल झालेल्या या मुलाचे नांव होते, वसंत सरवटे. हास्य व साहीत्याशी नाते जुळलेले एक व्यंगचित्रकार. त्यामुळे कांही काळ का होईना, सरवटेंचा चित्रकलेशी संपर्क तुटला. पण नियतीला ते मंजूर नव्हते. महाराष्ट्राला एक व्यंगचित्रकार घडवायचा होता. आणि तो तसा घडलाही! अशा या वसंत सरवटे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी कोल्हापूर येथे झाला. तेथेच त्याचे शालेय शिक्षण झाले. आणि इंटर सायन्स झाल्यावर त्यांनी इंजिनिअरींग कॉलेजची वाट धरली. मात्र या दरम्यान त्यांची कला साधना सुरूच होती

 


वसंतरावांनी इंजिनिअरिंगची प्रथम वर्षाची परीक्षा दिली, आणि त्यानंतर  आलेल्या दीर्घ आजारामुळे सुमारे दोन वर्षे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. या सक्तीच्या विश्रांतीमध्ये त्यांच्यातील चित्रकला उफाळून आली. मात्र शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची सोय आता नव्हती. त्यामुळे स्वतःच्याच हिमतीवर त्यांनी त्या कलेची तपस्चर्या सुरु केली. आजपर्यंत गोळा केलेला चित्रकलेचा अनूभव जोडीला घेऊन तांत्रीकदृष्ट्या रेखाटन कसे करावे याकडे सरवटे यांनी विशेष लक्ष पुरवले. तसेच चित्रामध्ये आशय महत्वाचा असतो. त्यासाठी सभोवार पहाण्याची चौकस दृष्टी हवी, ती त्यांना लाभली होती. शालेय काळापासून त्यांना जी वाचनाची गोडी लागली होती, त्याचा सरवट्याना मोठा फायदा झाला. सॉमरसेट मॉम हा त्यांचा आवडता लेखक. सुरुवातीला त्याना छापील चित्रांची नक्कल करणे सुलभ वाटत असे. पण पुढे त्यांच्या वाचनात बरीच पाश्च्यात नियतकालीके आली अन सरवट्यांची दृष्टी बदलली. चित्रकारांच्या विवीध शैली त्यांच्या नजरेस पडल्या. विशेषतः व्यंगचित्रे हा प्रकार केवळ रेखाटनांपुरता नसून तो साहीत्य निर्मितीचाच एक प्रकार आहे, हें त्यांना जाणवलं. व आजारातून उठल्यावर त्यांनी पुन्हां इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरु केला.

इंजिनिअरिंगची पदवी हस्तगत केल्यानंतर पुढे सरवटे मुंबईला आले चित्रे काढणे चालूच होते.मुंबईला ए.सी.सी. या सिमेंट कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणून कामाला लागल्यानंतरही सरवट्यांचे रेखाटन चालूच होते. अनुभवाच्या शाळेतून त्यांनी कलेचं धडे गिरवायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे व्यंगचित्रामध्ये त्यांनी विशेष गती दाखवली. येथे चित्र तर हवेच, पण त्याही पुढे जाऊन त्यातील आशय, त्यावरील तुमचे भाष्य, नेमके साधलेले मर्म आणि त्याबरोबर व्यक्तीचा स्वभाव विशेष दाखवणारी हुकुमी रेषा, जी कोणाकडूनच शिकता येत नाही. त्यातील मानवी आकृतीच्या अभ्यासासाठी मॉडेल्सवरून रेखाटनं करणे  आवश्यक होते. त्यासाठी सरवट्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सायंकालीन छंद वर्गात प्रवेश घेतला. व नोकरी सांभाळून तीन चार वर्षे जोमाने अभ्यास केला. येथे त्यांना गुरुवर्य शंकरराव पळशीकरांचे मौलीक मार्गदर्शन मिळालं. जोडीला बी.डी . शिरगावकरही असत. मधून मधून अधिष्ठाता गोंधळेकर यांच्याही फेऱ्या होत असत. मात्र येथे कोण शिकवत नसत. सर्वजण आपापले काम करण्यात मग्न असत. जर का तुम्हांला कांही अडचण असल्यासच सल्ला मिळे.   मुंबईत आल्यावर सुरुवातीला  त्यांनी गिरगावातील आपल्या भावाकडे मुक्काम केला होता. पुढे पार्ल्याला त्यांनी स्वतःची जागा घेतली. आणि स्वतःच्या कामासाठी टेबल-खुर्ची व चित्रकलेच्या साहित्यासाठी स्वतंत्र जागा केली. पुढे त्या टेबलावरून आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी निरनिराळ्या नियतकालिकांसाठी, पुस्तकासाठी अगणित व्यंगचित्ररचना केली.

 


वसंत सरवटे यांची व्यंगचित्रे मौज. सत्यकथा. वसुधा, वीणा यासारख्या साहीत्यिक दर्जाच्या मासीकातून प्रसीद्ध होऊ लागली. विशेष करून हंस, मोहिनीमधील व्यंगचित्रांना जाणकारांकडून चांगलाच प्रतीसाद मिळू लागला. व्यंगचित्रामध्ये कॉम्पोझिशन हा तांत्रिक प्राण असतो. प्रत्येक चित्राची मागणी वेगळी असते. व ती पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या प्रयोगक्षमतेवरच अवलंबून रहावे लागते. सरवट्यांच्या यशामध्ये त्यांना मधल्या बारा तेरा वर्षांच्या काळात आलेल्या अडचणी व मार्गदर्शकाच्या अभावी स्वतःच खटपट करून त्या निस्तरणे याचा मोठा वाटा आहे. कला शिकवता येत नाही. शिकवता येतं ते तिचं तंत्र. आणि त्यामुळेच वसंत सरवटे या व्यंगचित्रकारांची यशस्वी वाटचाल साहीत्य क्षेत्रांत दमदारपणे सुरु झाली. संवेदनाक्षम दृष्टी असलेल्या सरवटे यांना ही चित्रनिर्मिती करतांना घेतलेल्या स्वयंअनुभवाचा तसेच सॉमरसेट मॉमने आपल्या साहित्यकृतीत केलेल्या चित्रे-चित्रकाराविषयी भाष्याचा बराच लाभ झाला.

 


आजवर सरवट्यांनी अनेक नामांकित आणि दर्जेदार अश्या लेखक-साहित्यिकांच्या साहित्यासाठी चित्रनिर्मिती केली. साहीत्य सजावटीच्या निमित्ताने त्यांना थोर लेखकांचा स्नेह लाभला. त्यामध्ये पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रमेश मंत्री असे नामांकीत होते. त्यांच्या सहवासातून सरवटेना बरेच कांही शिकायला मिळाले. आणि त्याची प्रचिती त्यांच्या चित्रातून जाणवते. जयवंत दळवींचा ' ठणठणपाळ' त्यांनी आपल्या चित्रातून मराठी साहीत्यात अजरामर केला. पु.ल. देशपांडे यांच्यासाठी तर त्यांनी अगणित काम केलं. भाईंच्या विनोदी लिखाणासाठी चित्रं काढणं हा त्यांना नेहमी आनंददायक अनुभव होता. विशेषतः त्यांच्या 'बटाट्याची चाळ' साठी काढलेल्या अर्कचित्रांना त्यांनी त्यातील अनेक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. त्यातील आकाराच्या मर्यादेमुळे दाखवलेला चाळीचा फक्त वरचा मजला, मोडकळीस आलेले छप्पर, वाळवीने खाल्लेले खांब, उखडलेल्या लाद्या, कठड्यावर सुकत घातलेले कपडे, वर टांगलेल्या डालड्याच्या डब्यात लावलेली तुळस या सर्वच गोष्टी भाईंच्या मनातील  चाळीच दर्शन घडवणाऱ्या होत्या. आणि भाईंनीही त्यांना यासाठी मनसोक्त दाद दिली.

 


सरवटेनी केवळ हास्यचित्रेच काढली नाहीत तर साहीत्य क्षेत्रातील कथा चित्रेही तितकीच समरसतेने त्यांनी आविष्कृत केली. किंबहुना तीच त्यांची ओळख राहीली. त्याकाळच्या कथा मुख्यत्वे करून घटना प्रधान असल्यामुळे त्यात केवळ सजावटीचा भाग असे. पण नंतरच्या 'अभिरुची' 'सत्यकथा', आदी नियतकालिके एक विचारवंतांचा नवा वर्ग निर्माण करत होती. त्यांच्यातील नवकथांच्या बाबतीत ही विसंगती लक्षणीय होती. आणि त्याबरोबर चित्रकाराची कथेशी असलेली सुसंगती अश्या शैलीतील अर्थपूर्ण उणिवा दूर केल्या. १९५४-५५ च्या सुमारास 'वसुधा' मासीकासाठी सरवटे नियमीत चित्रे काढायचे. त्यात प्रसीद्ध झालेल्या दीर्घकथेमध्ये त्यांनी त्यांना दिलेल्या वर्णनावरून सरवटेनी पात्रांचं शारिरीक वर्णन त्या तपशिलावरून ठरवलं, व त्यातून घडत गेली एकेक पात्रं. त्यावेळी विजय तेंडूलकरांनी केलेल्या मौलीक सुचनांचा त्यांना फार लाभ झाला.
रमेश मंत्री यांनी इंग्रजीतील 'जेम्स बॉण्ड' या पात्रापासून मराठीत 'जनु बांडे' हे विडंबनात्मक पात्र केलं, त्यावेळी सरवटेनी  
शॉन कॉनेरीला डोळ्यासमोर ठेवून ते चित्रित केलं. ‘जनू बांडे’ या कथामालीकेतील त्यांची चित्रे खूपच गाजली होती. कारकिर्दीच्या आरंभी हंस-मोहिनीचे अनंत अंतरकर, व नंतर 'मौजे'चे श्री.पु.भागवत व राम पटवर्धन, 'वीणा'चे उमाकांत ठोमरे यांनी दिलेल्या उत्तेजनाचा ते नेहमीच उल्लेख करीत.

१९६४ साली मॅजेस्टीकचे संस्थापक-संपादक केशवराव कोठावळे यांच्या सहकार्याने 'ग्रंथप्रेमी मंडळ' स्थापन झाले. त्यावेळी जयवंत दळवी, रमेश मंत्री व वसंत सरवटे यांच्या सहकार्याने वाचकांचे वैचारीक मंथन करणारे 'ललित' हे मासिक सुरु केले. साहजिकच त्याचे मुखपृष्ठ व आतील सजावट, बोधचित्रे करण्याचे काम वसंतरावांकडे देण्यांत आले. त्यांना येथे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. यावेळी मुखपृष्ठ, व्यंगचित्रे यामध्ये जे जे कांही करता येईल, जे कांही करून पहावंसं वाटेल ते सर्व त्यांनी येथे करून पाहीले. जणू चित्रांची प्रयोगशाळाच त्यांना येथे गवसली होती. 'ललित'  मासिकाच्या अगदी प्रारंभापासून असलेले एकमेव चित्रकार, हे सरवटे यांच्या नांवावर असलेलं एक मानाचं पान!  ललित मासिकाच्या १९६४ च्या पहील्या दिवाळी अंकापासून मुखपृष्ठे आणि आतील चित्रे त्यांनी आरंभापासून ती त्यांच्या हयातीपर्यंत  सतत केली . चाळीसावर वर्ष मोठी अर्थपूर्ण, खुमासदार, गर्भीत अशी मुखपृष्ठे काढुन त्यांना सरवट्यांनी योग्य न्याय दिला. त्यामध्ये निरनिराळे आकार, सामाजीक, राजकीय घडामोडी, आजूबाजूचा परीसर, घड्याळाप्रमाणे सरकणारे मुंबईचे यांत्रीक जीवन असे आगळे वेगळं विषय होते, ज्यामुळे 'ललित'चे व्यक्तीमत्व नेहमीच वेगळे राहीले आहे. १९७७ साली 'ललित'ने खास 'वसंत सरवटे गौरव अंक' काढला त्याचेही मुखपृष्ठ त्यांचीच बनवले होते. त्यामध्ये त्यांनी ते चित्र दोन भागात विभागले होते. यामध्ये सभोवतालचं वास्तव आणि फुलातून जग पहाण्याच्या फॅंटसीत रमलेला कलावन्त अश्या दोन भागात चित्रं मधोमध विभागलं आहे. आणि मधोमधलं व्यक्तीचित्र वास्तवभागात रेषांतून तर फॅंटसी भागात छयाचित्रातून दाखवून वास्तव व फॅंटसी यांची एकमेकातील गुंतागुंत सूचित केली आहे. असे स्वतःचे व्यक्तित्व सरवट्यांनी त्यातून साकारले होते. याचप्रमाणे बाल साहित्याला पोषक अशी बाल चित्रे काढून त्यांनी बालवर्गाला आनंदीत केले. विंदा करंदीकरांच्या 'राणीचा बाग' सारख्या बाल साहित्याला बहुरंगी असा निरागस चेहरा दिला. त्यांच्या 'चार  पायांचे झाड' या शिशुगीताचे बोधचित्र तर वाखाणण्याजोगे आहे. निखळ व्यंगचित्रांची दुनीया किती समृद्ध आहे, किती संपन्न आहे हे वसंत सरवटे यांनी आपल्या चित्रांतून उलगडून दाखवले आहे. आणि हे करत असताना त्यांनी आपल्या व्यंगचित्रांचा दर्जा उच्च ठेवला. त्यांची अभिरुची आणि संपन्नता जपली. आणि म्हणूनच ते एका विशिष्ट दर्जाचे व्यंगचित्रकार म्हणून कायम स्मरणात राहीले.

 


मुंबईतील 'बॉंबे बुक डेपो' मध्ये पुस्तक जत्रा भरत असे. त्यावेळी रोज एका लेखकाच्या स्वाक्षरीचा कार्यक्रम त्याची पुस्तके विकत घेणाऱ्या वाचकांसाठी ठरला होता. ‘ठणठणपाळ’ या लेखकाची पुस्तकेही त्यात होती. सुरुवातीला हा 'ठणठणपाळ' कोण आहे हे कुणालाच माहीत नव्हते.  मात्र ठणठणपाळचा दिवस आला तेव्हां ठणठणपाळचे एक मोठे कटआऊट ठेवण्यात आला होता. व त्यामागून हात बाहेर काढून सही केली जात होती. पण वाचकांनी ठणठणपाळ दिसलाच पाहीजे, असा प्रचंड आग्रह केला. तेव्हां मात्र कट आऊट मागून लेखक पुढे आले अन ते होते जयवंत दळवी. एक गुपीत उघड झाले. मात्र दळवींचा हा 'ठणठणपाळ' गाजण्यात सरवटे यांचाही तितकाच मोठा हात होता. त्यांनी त्याला दृश्य स्वरूप दिले होते. हातोड्याला टेकून उभा असलेला एका मिशाळ बलदंड असा माणूस हात बांधून उभा असल्याचे त्यांनी दाखवला होता. तशीच सरवटेनी अनेक श्रेष्ठ लेखकांची वेष्टनेही केली आहेत. तीही त्यांच्या साहित्याचा दर्जा ठेवून.

 


वसंत सरवट्यांनी कथाचित्रे, मुखपृष्ठे, आणि विशेष करून व्यंगचित्रे व अर्कचित्रे मोठ्या प्रमाणावर काढली. अर्कचित्रे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे कॅरिकेचर. मराठीतील अर्कचित्र हा मराठी प्रतीशब्द सरवटेनीच  दिला आहे. त्यांत आवश्यक असलेली कल्पकतेचा शोध घेणारी दृष्टी त्यांना असल्यामुळे त्यांचे साहीत्यिक, संपादक, लेखक, कलावंत यांच्याशी बरेच संबंध आले आणि यामुळे जीवन विषयक समज प्रगल्भ व्हायला बरीच मदत झाली. अर्कचित्रामध्ये सरवटेनी स्वतःचे असे मानदंड निर्माण केले आहेत. त्यांची प्रभावी व वाहती रेषा, चित्रांच्या हुकुमती सामर्थ्याने व्यक्तीच्या अंतरंगात शिरून तिची स्वभाव वैशिष्ट्ये दाखवते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी त्यात दाखवलेला भावाविष्कार. संपूर्ण नवरसाची निर्मीतीतून  दिसत असते.  त्यांची चित्रे व्यंगात्मक अंगाने जात असली तरी ती आपली प्रमाण बद्धता व लय सोडत नाहीत. पण त्या व्यक्तीची लकब दाखवताना त्या व्यक्ती आपण केवळ पहात नसतो, तर त्यांच्याशी संवाद साधत असतो. त्यांच्या भावाविष्कारावरूनच आपणाला त्यांचे विचार स्पष्ट जाणवतात. त्यातून कधी आपण अनंत काणेकरांना भेटतो, कधी ग.दि.माडगूळकर आपल्याशी संवाद साधतात. कधी आचार्य अत्रे दिलखुलास हसवत असतात, कधी गंभीर चेहऱ्याचे ग.का. रायकर खुर्चीवर दोन्ही पाय घेऊन बसलेले दिसतात. पु. ल. मिस्किलपणे संवाद साधतात. शिवाय गंगाधर गाडगीळ, श्री. पु. भागवत, रमेश मंत्री, रामदास भटकळ, जयवंत दळवी अश्यांची व्यक्तिचित्रे ही व्यंगचित्रकलेचा एक सर्वोत्कृष्ट आविष्कार मानावा लागेल. गेल्या पन्नास वर्षाहून अधीक काळ वसंत सरवट्यांची हास्यचित्रे महाराष्ट्र टाइम्स, माणूस,आवाज, दीपावली, मौज, हंस, मोहीनी आदी नियतकालीकांतून प्रकाशीत झाली आहेत. वसंत सरवटे यांच्या चित्रांचे पहीले प्रदर्शन १९९०  साली पुण्यातील  बालगंधर्व कलादालनात झाले. त्यामध्ये त्यांनी पेंटींगच्या अंगाने जाणारी चित्रे काढली. व्यंगचित्रे, अर्कचित्रे ते अभिजात कला असा हा
त्यांचा प्रवास तेथे पहायला मिळाला. त्यांचा 'खेळ रेषावतारी' या व्यंगचित्र -हास्यचित्र प्रदर्शनास पुणे, कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, धुळे, चाळीसगांव, कोंकण, बंगळूर, गोवा आदी ठिकाणी उदंड प्रतिसाद मिळाला. सरवट्यांनी स्वतः एकदा अर्कचित्राच्या वैशिष्ट्याविषयी सांगीतले आहे की, 'अर्कचित्रामध्ये मूळ व्यक्तीची पहाताक्षणी ओळख पटण्याइतके शारीरीक साम्य तर असावेच लागते. पण त्यापलीकडे जाऊन त्या व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तीमत्व, तिचा स्वभाव, समाजातले स्थान, आर्थीक स्थीति, वैष्ट्यपूर्ण लकबी इत्यादी अनेक घटकांचा परीणाम म्हणून घडलेले असते, त्यांचे दर्शनं होणे महत्वाचे ठरते

 


पुढे ए.सी.सी. मधून सरवटे बाहेर पडले. अर्थात ए.सी.सी.तील नोकरी ही त्यांच्या महत्वाकांक्षेचे उद्दीष्ट कधी नव्हतेच.केवळ एक चरितार्थाचे साधन म्हणूनच त्याकडे त्यांनी पाहीले होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यानी चित्रकला-व्यंगचित्रकलेला वाहुन घेतले होते. त्यांनी स्वयंप्रेरणेने जो मार्ग स्वीकारला तो निष्ठेने जोपासला. मराठी साहित्याच्या क्षेत्रातील ते एक चित्रमय मानबींदू ठरले. व्यंगचित्र हे संवेदनशीलता जागृत ठेवण्याचे साधन हे त्यांनी चक्क मनाशी ठरवले होते. जेव्हां त्यांनी आपला  ‘खडा मारायचा तर ...' हा व्यंगचित्र संग्रह 'राज्य पुरस्कार' स्पर्धेसाठी पाठवला, तेव्हां हा साहित्याच्या कोणत्याच प्रकारात बसत नाही, म्हणून तो स्वीकारावयास निवड समीतीकडून  नकार देण्यात आला होता.पण कांही वर्षांनी व्यंगचित्र हा साहित्याचाच चित्राच्या माध्यमातून मांडलेला एक प्रकार आहे, हे त्यांनी पटवून दिले. त्यामुळे सरकारला ते मान्य करावे लागले.

 


आपल्या सुमारे पन्नास वर्षाहून अधीक व्यंगचित्रीय कारकिर्दीमध्ये वसंत सरवटे यांनी व्यंगचित्रासोबत व्यासपीठही गाजवले. लेखा लिहीले. अनेक प्रदर्शने भरवून रसिकांना त्यांचा आस्वाद दिला. अनेक नामवंत साहीत्यिक, कवी, लेखक, त्याचे मानसपुत्र यांना आपल्या अनोख्या शैलीतील अर्कचित्रांनी अजरामर केले. आपल्या महाराष्ट्राला ते निश्चितच भूषणावह आहे. असेंच दिवस जात होते. आता त्यांना त्यांची तब्येतही साथ देत नव्हती. बाहेर हिंडणे फिरणे कठीण झाले होते. फोनवरच आपल्या लाडक्या मित्राशी- शि.द.फडणिसांशी बोलणे होत असे. आणि या आठवणी जागवतच मराठी साहीत्य श्रुष्टीला आपल्या व्यंगात्मक चित्र संपदेने हसवणाऱ्या, नटवणाऱ्या आणि तिला सर्वांगांनी समृद्ध करणाऱ्या महाराष्ट्राच्या या हरहुन्नरी कलावंताने
२४ डिसेंबर २०१६ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी कदाचित त्यांच्या अर्कचित्रांचा व अर्कचित्रांनी-व्यंगचित्रांनी  खळाळून हसणाऱ्या साहीत्य- कला वेड्या रसिकांचा श्वासही क्षणभर अडकला असेल!

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
















Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…