सामन्यातील असामान्य कलावन्त : प्रा. चिंतामण तिरोडकर.


सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट असो, वा सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट असो, ह्या संस्थांना वैभवाप्रती नेण्यास कांही कला शिक्षकांचे योगदान निश्चितच आहे. ते शिक्षक ह्या संस्थांचे भक्कम स्तंभ म्हणून ओळखले जातात. एक मोठी मालीकाच होती अश्या गुरुतुल्य शिक्षकांची. आणि त्यातील एक आवर्जून घ्यावे असे नांव म्हणजे चिंतामण विष्णू अथवा चिं.वि.तिरोडकर, अर्थात सर्वांचे आवडते तिरोडकर सर! मी जेव्हां उपयोजीत कला संस्थेत १९६२ साली प्रवेश घेतला, तेव्हां एकेक शिक्षकांच्या ओळखी होऊ लागल्या. मोजकेच प्राध्यापक. त्यातले आमचे वर्गशिक्षक दामू केंकरे, बेसीक डिझाईन व टायपोग्राफी शिकवणारे अरविंद देसाई, दुसऱ्या वर्षाला शिकवणारे हरीभाऊ हणमंते, वरच्या वर्गाला जाहीरात विषयक विषय शिकवणारे शशिकांत साठे, आणि ड्रॉईंग हा खास विषय शिकवणारे तिरोडकर असे हे सर्व प्राध्यापक होते. षांताराम पवार हे तेव्हां अभ्यागत व्याख्याते म्हणून येत असत. आणि हे सर्व शिक्षक आपापल्या कामामध्ये दादा माणसं होती. ह्या सर्व शिक्षकांना त्या काळी टाय लावणे अनीवार्य असे. आणि विद्यार्थ्यांना अंगावर ॲप्राॅन. ड्रॉईंगच्या तासाला आम्हां सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवून मध्ये मॉडेल बसवण्यात येत असे. व मग आमचे तिरोडकर आमचा क्लास घेत. त्याच वर्षी मे महीन्याच्या सुटीत माझा बेळगावचा जे.जे.त शिकत असलेला भाई मिरजकर नांवाच्या मित्रांसोबत पवार सर  व तिरोडकर सर  बेळगांवला आले होते, तेंव्हां मी या दोघांशी जास्तच जवळ आलो.

तिरोडकरांचा जन्म हा १ मे १९३५ चा. शालेय शिक्षण झाले ते परळच्या शिरोडकर हायस्कुल मध्ये. तशी ही शाळा अनेक कलाकार निर्माण करणाऱ्यांची खाण म्हणूनच ओळखली जात असे. विद्यार्थ्यांवर संस्कार करणारी शाळा म्हणूनही ती प्रसीद्ध होती. शिक्षकही तेच व्रत वाहणारे.  त्यातही बरेचसे लालबाग परळ बिरुदावली मिरवणारी आणि तितकीच चित्रकलेत माहीर असलेली मुले या शाळेत शिकत असत. तेथील कला शिक्षक अश्या विद्यार्थ्यांची कला जोपासण्यास उत्तेजन देत असत. आणि येथूनच पुढे चिंतामण तिरोडकर, षांताराम पवार. दत्ता सावंत, रमेश पावसकर, नरेंद्र विचारे सारखे कलावन्त  निर्माण झाले. आणि बालपणापासूनच चित्रकलेशी नाते जोडलेल्या तिरोडकरांची कला येथूनच बहरण्यास सुरुवात झाली. आता प्रश्न होता तो पुढील उच्च कला शिक्षणाचा. परळच्या बाटलीवाला रोडवरील चाळीत रहाणाऱ्या तिरोडकरांची घरची परिस्थीती तशी बेताचीच.  घरी बहीण भावंडांचे मोठे कुटुंब. पण शिकण्याची जिद्द होती, ती या अश्या अडथळ्यांना न जुमानता पुढे जाणारी होती. कागद-पेन्सिल खुणावत होते.  रंगही बेभान होऊन सभोवार उधळत होते. आणि त्या काळातील चित्रकारांच्या मालीकेतील एक उच्च स्तरावरील नांव होते ते एम.आर. आचरेकर या अष्टपैलू चित्रकाराचे. त्यांची दादर हिंदू कॉलनी येथे 'आचरेकर अकॅडमी ऑफ आर्ट' नावांची चित्रकला शिक्षण देण्याची संस्था होती. त्यामध्ये तिरोडकरांनी प्रवेश घेतला. आचरेकर सरांचे शिकवणे म्हणजे गुरु शिष्य परंपरेतील ज्ञानार्जन. त्यांची पेन्सील असो, जलरंग असोत किंवा तैलरंग, सर्वत्र त्यांचा मुक्त संचार असे. पाहायला त्यांचे काम कदाचीत सोपे वाटे, पण ते अतीशय कठीण होते. त्यांच्या कामात करकरीतपणा नव्हता. त्यांचं काम अत्यंत फ्लॅशी होतं. त्यांची प्रवाही, सतत धावती रेषा चित्राला बांधत असे. लाइकनेसमध्ये तर त्यांचा हातखंडा असे. गर्दीचे रेखाटन असले, तरी त्यातील सर्वांची ओळख पटे. पांढऱ्या पार्श्वभागावर पांढऱ्या साडीतील, तेही जलरंगाने लता मंगेशगकरांचे पोर्ट्रेट फक्त आचरेकरच करू जाणोत. याच मालिकेतील वहीदा रहमान, नर्गीस, गुरुदत्त अश्यांचीही चित्रे त्यांनी केली. ती तिरोडकरांनी खूप पाहीली होती, अभ्यासली होती. त्यांची पेन्सीलची रेषा अत्यन्त प्रवाही होती. त्याचे पेन्सील ड्रॉईंग कधी ट्रेस करता यायचे नाही, इतकी ती रेषा हातात सापडणे कठीण होते. आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना यातून कलेचे शिक्षण  मिळत गेले. अश्या ईश्वरी देणं लाभलेल्या गुरूकडून तिरोडकरांना चित्रकलेचे धडे गिरवण्याची संधी मिळाली होती.

आचरेकर सरांसोबत तिरोडकरांना अनेक गोष्टी मिळाल्या. सर्वप्रथम सतत स्केचिंग करणे ही सवय तेथून लागली. तिरोडकरांना स्केचिंगची आवड होतीच, आचरेकरांच्या क्लासमध्ये ती वाढीला लागली. मुलांचे ड्रॉईंग निर्दोष कसे व्हावे याकडे ते विशेष लक्ष देत असत. शिवाय जलरंगात तर आचरेकर सरांची मास्टरी होती. त्यामधून तिरोडकरांना रंग समजू लागले, त्यातील पारदर्शकता समजू लागली. चित्रातील टवटवीतपणा कसा राखला पाहीजे हे कळू लागले. आचरेकर हे सिनेमा सृष्टीत खूप काम करीत होते. त्यामुळे केवळ पोस्टर डिझाईनच नव्हे, तर त्यांचे सेट डिझाईन, चित्रपटांतील दृश्यांची स्केचीस, सेट डिझाईन झाल्यावर तो सेट उभा करणे, त्यासाठी लागणारे सुतार आदी कामगार, यात सुद्धा तिरोडकरांना काम करायची संधी मिळाली. ही मोठी कामे कशी चालतात याचाही त्यांना अंदाज आला. आणि दर शनिवार-रविवार संस्थेला सुटी असल्याने आचरेकर सर त्यादिवशी अथवा त्यांना जेव्हां जसा वेळ मिळेल तसे सर्व विद्यार्थ्यांना घेऊन लॅंडस्केपला जात असत. त्यासाठी ते आधी जागा निवडून ठेवत. मग सर्वांचे लॅंडस्केप पेंटींग सुरु होई. यावेळी  निसर्गाला समोरच्या कागदावर कसे सामावून घ्यावे, त्यात मागील पुढील अंतर कसे दाखवावे, पारदर्शकता कशी आणावी याचे ते प्रात्यक्षीकासह शिक्षण देत असत. तेव्हांपासून तिरोडकरांची लॅंडस्केपची आवड निर्माण झाली. त्याकाळात बाहेरून अभ्यास करून जे.जे.च्या परीक्षा देण्याची सोय होती. अश्या विद्यार्थ्यांना परीक्षेआधी कामाचे नमुने पाठवावे लागत. अनेक कला विद्यार्थी या प्रमाणे बाहेरून परीक्षा देत असत. आणि तिरोडकरांनीही त्याप्रमाणे परीक्षा देत आपली शासकीय पदवीका प्राप्त केली.

तिरोडकर सरांनी आचरेकरांसोबत सुमारे बारा वर्षे काम केले. त्याचे ड्रॉईंग सुधारले. त्यांच्या जीवनाला एक शिस्त लागली. घेतलेले व्रत कठोर परीश्रम, तपस्चर्या करून त्यांनी पूर्ण केले. आणि अकस्मात त्यांच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. एक नवीन संधी उपलब्ध झाली. सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ  ॲप्लाईड आर्ट मधील महाजन सर नुकतेच निवृत्त झालें होते. उपयोजीत कला विभागात विद्यार्थ्यांचे ड्रॉईंग सुधारावे यासाठी पेंटींग विभागातील व्यक्तीची नियुक्ती केली जात असे. आणि महाजन हे ड्रॉईंग विषय शिकवीत होते. आचरेकर सर तसे जे.जे.शी संबंधीत होतेच. जे.जे.चे पहीले भारतीय संचालक म्हणून त्यांची नियुक्तीही झाली होती. पण सतत काम करण्याचा पिण्ड असलेल्या आचरेकरांना ते प्रशासकीय पद मानवले नाही व थोड्याच दिवसात त्यांनी राजीनामा दिला व ते बाहेर पडले. जे.जे.ला त्यावेळी दादासाहेब आडारकर हे अधीष्ठाता होते. त्यांनी तिरोडकरांचे काम पाहून त्यांच्यातील गुण हेरले व तात्काळ त्यांनी तिरोडकरांना अध्यापक म्हणुन जे.जे.उपयोजीत संस्थेत घेतले. ते वर्ष होते सन १९५८ आणि जे.जे. कला शिक्षकांच्या मालीकेत आणखी एक मणी गुंफला गेला.

मी विद्यार्थी म्हणून जेव्हां जे.जे.त आलो तेव्हां हे तिरोडकर सर दुसऱ्या वर्गापासून अंतीम वर्षापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिकवीत असत. दुसऱ्या वर्ष्याला ड्रॉईंग, तसेच तृतीय आणि अंतीम वर्षाला इलस्ट्रेशन हा विषय ते घेत असत. आपला विषय शिकवताना त्यांचा ड्रॉईंग याविषयातील  त्यांचा अभ्यास, त्याचे वाचन, त्यातील त्यांची अनुभूती या सर्वच बाबींचा पुरेपूर दृष्टांत  आम्हां विद्यार्थ्यांना होत असे. सरांचं वाचन भरपूर होते. सर्वच विषयांची त्यांना जाण होती. मग ते अध्यात्म असो, तत्वज्ञान असो किंवा पाश्च्यात कलाकारांच्या कामाची माहीती व त्यांनी चित्र पद्धती असो, तिरोडकरसरांची एकदा का रसवंती सुरु झाली, की समोरच्या मॉडेलचे अंतरंग आपोआप उलगडत जात असे. मग विद्यार्थ्यांच्या चित्रावर सुधारणा करताना तो कोठे चुकला आहे, हे रबरने खोडत ते प्रत्येक पायरीवर त्याची माहीती देत असत. रोमन, ग्रीक पुतळ्यांचे डोळे बदामाच्या आकाराचे कसे असतात ते बाजूला काढून दाखवित असत. तेव्हां त्यांच्या बोटातील पेन्सिलीची ताकद दिसून  येत असे.  त्या काळांत काळा घोडा येथील म्युझीयम दर सोमवारी बंद असे, व तो दिवस जे.जे. च्या विद्यार्थ्यासाठी असे. व तोही विनामूल्य.
त्या दिवशी तिरोडकर सर आम्हां विद्यार्थ्यांना घेवून तेथे जात. मग आमचे तेथील प्राणी, पक्षी यांची स्केचींग करणे, ती पेस्टल व वाॅटर कलर मध्ये रंगवणे हे काम चाले.

तिरोडकर स्वत:ही काम करून दाखवत आणि आमचीही कामे सुधारत असत. तिरोडकर सरांचे इंग्रजी उच्च प्रतीचे नव्हते, उलट ते ज्या जोराने ते बोलत असत, तेव्हां त्यांच्या इंग्रजी भाषेची अडचण कुणालाच वाटत नसे. कारण तिरोडकरसरांचा कुंचला व पेन्सिल बोलू लागे तेंव्हां भल्या भल्याना बोटे तोंडात घालावी लागत. त्यांचा स्वभाव थोडा अजागळ असल्याने बऱ्याच लोकांचे ते चेष्टेचा विषय असत. पण त्यांच्या जवळपास जाऊन काम करणं हे कित्येकांना अशक्य  होतं. आपल्यापेक्षा कितीही खालचा माणूस असला तरी त्याच्याशी तिरोडकरांचे बोलणे एकदम अदबीने असे. अन याचाच गैरफायदा कित्येकदा त्याचे सहाय्यक घेत असत. कॉलेजची वेळ अन तिरोडकरांचं येणं याचा ताळमेळ कधीच जमू शकला नाही. त्यांना शिस्त लावण्याचा प्रयोग करणारे शेवटी स्वतःच थकून गेले. मग ते आडारकर असोत वा हणमंते. पण जेव्हां कामाची निकड भासे, तेव्हां रात्रंदिवस उभे राहून काम करण्याची तयारी केवळ तिरोडकर - पवार या दोघांचीच होती.  कितीही उशीरा आले तरी ते वर्ग व्यवस्थीत सांभाळणार याची खात्री असल्याने त्यांचे एक वरीष्ठ प्राध्यापक बिनधास्त असत. तिरोडकरांना टॉवेल, साबण, टाचण्या, कागद या सर्व वस्तू स्टोअर मधून आणून देवून ते तिरोडकरांची खुशामत करीत होते. तिरोडकरांनाही यांची जाणीव होती, ते आपल्याला का सांभाळत असतात याची. दरम्यान षांताराम पवार सरांचीही स्थायी अध्यापक म्हणून संस्थेत नियुक्ती झाली. आणि पवार- तिरोडकर ही समविचारी सृजनशील जोडी जे. जे. च्या आवारात एकत्र दिसू लागली.

मध्यम वर्गीय घरातून आलेल्या तिरोडकरांना येथिल सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांबद्दल नेहमीच आस्था वाटत असे. आई-वडील पोटाला चिमटे काढून मुलांना शिकवत असतात, त्याचा चांगला सदुपयोग करा म्हणून ते नेहमी सांगत. त्यांचे ड्राॅईंग विषयावरील व्याख्यान सुरु झाले, की त्यांच्या भाषेचा अडथळा कधीच जाणवत नसे. जाणवे ती फक्त या विषयात पारंगत व्हायला सोसावे लागणारे कष्ट. त्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या. आणि सतत करायचा स्केचिंगचा सराव. मध्येच ते विद्यार्थ्याला त्याच्या जागेवरून उठवून स्वतः बसून समोरच्या मॉडेलवरून संपूर्ण ड्रॉईंग अथवा पेंटींग करून प्रात्यक्षीक देत असत. त्यावेळी त्यांनी पेन्सील कशी फिरते अथवा रंग कसे लोड करतात ते पाहण्यासारखे असे. त्यांच्या कामात एक प्रकारची शिस्त असे. कोणत्याही प्रकारची गडबड घाई ते चित्र काढतांना करीत नसत. त्यांचे पेन्सिलींना नीट टोक काढणे, रफ चित्रावरून ट्रेस करून फायनलसाठी ट्रेस करणे हे इतके काळजीपूर्वक चालत असे की त्यांचे चित्र हे निर्दोष होणार याची खात्री पटत असे. पेन्सीलसहीत एकूण एक माध्यम तिरोडकरांनी हाताळले आहे. जलरंग, तैलरंग, ॲक्रॅलीक अश्या सर्वच माध्यमातून त्यांनी काम केले आहे. आणि तेही त्यातून नैपूण्य राखून. वर्गातील सर्वच विद्यार्थी त्यांच्या बोलक्या स्वभावावर व त्यांच्या बोटातील कलेवर, अधून मधून त्यांच्या ओरडण्यावर बेहद्द खुश असत. त्यामुळेच येथील शिक्षण संपवून गेल्यावरही अनेकजण सरांशी संबंध ठेवून आहेत.

तिरोडकर सरांवर सर्वांचीच मर्जी होती. सर्वानांच ते आपलेसे वाटत. खुद्द आडारकर देखील त्यांच्याकडून चुका झाल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करीत. तिरोडकरांना संस्थेची वेळ ही कधी पाळताच आली नाही. हमखास ते उशीरा पोचत. मग त्यावेळचे अधिष्ठाता आडारकर असोत, किंवा नंतरचे हणमंते असोत, त्यांना बोलावून थोडी प्रेमळ समज देत व पाठवून देत. एकदा त्यांच्या वर्गावरील दुसऱ्या एका शिक्षकाने त्यांच्या उशीरा येण्याबद्दल तक्रार केली त्यावेळी अधिष्ठात्यांनी त्याला सांगीतले की एकदा का ते वर्गात शिरले की मग केवळ विद्यार्थ्यांसाठी काम करतात. कधीही घड्याळाकडे पाहून काम करत नाहीत हे माहीत आहे का तुम्हाला? पण अश्या सर्व गुण-दोषांसहीत सर्वच शिक्षक वर्गाने तिरोडकरांवर प्रेम केले. ते त्यांच्यातील कलागुण जाणूनच! उपयोजीत कला विभागांत काम केल्याने त्यांना त्या विषयाची चांगलीच जाण होती. मग ड्रॉईंग व इलस्ट्रेशन यातील फरक ते नेमका ओळखत, जो सर्वसाधारणपणे पेंटींगच्या अध्यापकाना जमत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वाध्यायीका असोत, कुणाला खासगी काम करून हवे असेल, तेंव्हा सर्व शिक्षक वर्ग तिरोडकरावर विसंबून असत. वर्गात जेव्हां प्रदर्शनानिमित्त कामे चालू असत, त्याकाळी प्रत्येक वर्गशिक्षक तिरोडकरांना बोलावून त्यांच्याकडून मुलांच्या कामावर सुधारणा करवून घेत असत. आणि तिरोडकरही आनंदाने ते करीत असत. रोज सकाळी प्रा. दामू केंकरे यांच्या केबिनमध्ये त्यांच्या जवळचे शिक्षक, बाहेरील नाट्यक्षेत्रातील मित्रमंडळी यांचा दरबार भरलेला असे. अधून मधुन तिरोडकरही तेथे येत असत, किंबहुना ते आल्याशीवाय व त्यांच्या कांही फिरक्या घेतल्याशिवाय केंकरे अथवा पवार यांना चैनच पडत नसे. अधून मधून डाॅ. रेगे यांचाही त्यात सहभाग असे. पण त्याचे काहीही वाटून न घेता चेहऱ्यावर भोळाभाबडा भाव घेऊन तिरोडकर वावरत, केंकरेंच्या खिशातील तंबाखूची डबी काढून त्यातील तंबाखू मळून खाण्यात ते गर्क होत. तेथे त्यांचा खेळकरपणा दिसून येत असे. कोणत्याही सांस्कृतीक कार्यक्रमाची कधीही जबाबदारी न घेणाऱ्या या तिरोडकर स्तरावर हणमंते सरांनी एकदा चक्क संस्थेच्या स्टुडंट्स मजलीस च्या चेअरमनची जबाबदारी टाकली. कुठल्याच गोष्टींत तशी जबाबदारी न घेतलेले तिरोडकर सर ही डोकेदुखी कशी झेलणार याचाच विचार आम्ही करत होतो. पण सरानी तितक्याच जोखीमेने आणि कल्पकतेने ही जबाबदारी पर पाडली, एवढेच नव्हे तर कित्येक कल्पक अश्या गोष्टी करवून घेतल्या. कारण विद्यार्थी व शिक्षक त्यांना मानत होते, हे त्यातील मुख्य गमक होते. 

आणि या जे.जे.च्या वास्तव्यात तिरोडकरांची प्रख्यात चित्रकार सोलेगांवकर यांच्याशी भेट झाली. त्यावेळी उपयोजीत कला, पेंटींग, आर्किटेक्चर हे सर्व विभाग एकाच छताखाली असल्याने तिरोडकरांचे पेंटींग विभागांत जाणे येणे असायचे. तेथील शिक्षकाकडून त्यांना नवीन गोष्टी समजत. आचरेकरांचे विद्यार्थी म्हणून तिरोडकर सर्वानाच माहीत होते. आणि सोलेगांवकर यांनाही ते माहीत होते. सोलेगांवकरांचे  काम, विशेषतः त्यांची लॅंडस्केप्स, पेंटींग्स तिरोडकरांना नेहमीच मोहवीत असत. त्यांची खास अशी भारतीय शैलीची रंगसंगती ही उठून दिसत असे. आणि तिरोडकरांनी सोलेगांवकरांचे जणू शिष्यत्वच पत्करले. त्यांच्या ग्रीडचा अभ्यास केला. त्यांच्या रंगसंगतीची पॅलेट त्यांनी उचलली. कॉम्पोझिशन कसे करायचे हे शिकले. सोलेगांवकर स्वतः रंग तयार करीत असत. तेही तिरोडकरांनी आत्मसात केले. आचरेकरांकडे ड्रॉईंग सुधारलेच होते. त्याची सतत सवय ठेवली. सोलेगांवकराना  एक्स -रे डोळा होता. ते चित्र काढायचे ते एक्स-रे काढल्यासारखे. त्यांना समोरची व्यक्ती दाखवायची नसे. त्यामधील हवे ते अंतर्गुण ते घ्यायचे. अंतर्व्यक्तीमत्व बाहेर काढायचे. त्यांच्या पेंटींग मधील त्यांची माणसं, प्राणी, घरं अगदी सोपी साधी असत. त्यात जाऊन रहावं, त्या घराची सावली घ्यावी असं सोलेगांवकरांची पेंटींग पाहून मनोमनी वाटत असे. ते नेहमी तिरोडकरांसोबत चर्चा करत, त्यांना समजावून सांगत. सोलेगांवकरांसोबत लॅंडस्केप करण्यासाठी ते जात असत. काम करणे व शिकणे ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून होत असत. आणि तिरोडकरांची स्वतंत्र अशी शैली आणि रंगसंगती तयार झाली. ते चित्र रंगवताना ब्रशवर एकत्र असे निरनिराळे तीन चार रंग घेऊन जेव्हां कागदावर तो ब्रश सफाईने फिरवत तेव्हां त्यातून एकमेकात ते रंग मिसळून होणाऱ्या रंगाच्या छटा पाहण्यासारख्या असत. आणि हीच पद्धत दुसरे अध्यापक षांताराम पवार यांनीही उचलली. ज्या सफाईने तिरोडकर जलरंगात पेंटींग अथवा लॅंडस्केप करीत त्याच सफाईने ते ओपेग रंगांमध्येही काम करीत. दोन्हीही अगदी ताजी आणि टवटवीत.

पवार आणि तिरोडकर हे दोघेही जिवलग मित्र. दोघेही आपल्या क्षेत्रांत निष्णात असे.  संस्थेत दोघेही जोडीने दिसत असत. त्या दोघांमध्ये औचारिकपणा कधीच नसे. एकमेकाला ते श्यांत्या- चिंत्या असेच संबोधीत. एक आपुलकीचा दरवळ त्यात दिसून येत असे.  पण जेथे तिरोडकरांची गरज असेल तेथे तिरोडकरांनीच ते काम करायला हवे हे पवारांचे ठाम मत असे. कारण त्यांच्या कामाची ताकद त्यांना माहीत होती. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा, पंचवर्षीय योजना, चित्ररथ, कलात्मक शासकीय कामे, लघु उद्योग महामंडळाची कामे, अश्या कामामध्ये ते तिरोडकरांना नेहमी सहभागी करून घेतं असत. तसे दामू केंकरे, हणमंते, देसाई, साठ्ये असे सर्वच प्राध्यापक तिरोडकरांवर जीव लावत असत. विशेषतः पवार आणि साठ्ये यांच्या सोबत ते जास्त जवळ होते. दोघेही व्यावसायीक कामे करणारे शिक्षक. त्यामुळे तिरोडकरांची त्यांना नेहमीच गरज लागे. १९७२ साली दिल्ली येथे झालेल्या 'महाराष्ट्र लघू उद्योग' प्रदर्शनाचे काम भाऊसाहेब नेवाळकरांनी पवारांना दिले होते. त्यावेळी मी एकटाच असल्याने माझ्याच घरी सर्व काम सुरु होते. पवारांसोबत मी, तिरोडकर व आमचा एक विद्यार्थी दिलिप शिवलकर असे तिघे काम करीत असू. आणि गोविंदराव शिलकर मेस्त्री जोडीला उभारणीचे काम करत होते. तिरोडकरांवर सर्व इलस्ट्रेशनची जबाबदारी होती. तेंव्हा रात्रंदिवस जागून ते काम करताना मी पाहीले आहे. सुमारे तीन महीने हे काम चालले होते. तसेच प्रा. साठ्ये यांच्यासोबत युनिअन कार्बाइडच्या ८ x १० फूट आकाराच्या म्यूरलचे कामही मी त्यांच्यासोबत केले आहे. अगदी ट्रेसिंग पासून ते रंग कसे लोड करायचे यांचे शिक्षण देत सरांची कामे  सुरु असत. त्या म्यूरलमध्ये त्यानी जो काळा रंग ज्या पद्धतीने वापरला होता, त्यामुळे त्यांत एक प्रकारची खोली जाणवत असे. तें म्युरल पाहून प्रा. धोंड म्हणाले होते, की चिंतामण, भले भले असा काळा रंग वापरायचे धाडस करत नाहीत. पण तू इतक्या सहजपणे तो वापरला आहेस. मानले तुला! धोंडांनी दिलेली ही पावतीच तिरोडकरांचे चित्रकार म्हणून महत्व दाखवणारी होती. तसेच त्यांनी बजाज भवन येथे केलेल्या भिंतीवरील रीलीफ म्युरलही तितकेच प्रभावी झाले होते.

संस्थेत तर अनेक शासकीय कामे, चित्ररथ, पोस्टर्स  तिरोडकरांनी केली आहेत. १९७२ साली महाराष्ट्र शासनाने ठरवलं की त्यांचे शासकीय कॅलेंडर हे डिलक्स पद्धतीचे काढायचे. हे परदेशी पाहुण्यानाही भेट म्हणून देता येईल. त्यावेळी कला संचालक होते माधवराव सातवळेकर. सदर काम पवारांकडे आले. पवारांनी त्यासाठी विषय निवडला 'संत वाङ्मयाची शिकवण'. बारा पानी कॅलेंडरवर प्रत्येकी चार चित्रे पवार, तिरोडकर व वैउडे यांनी काढायची ठरले. कारण तिघांची चित्रपद्धती एक प्रकारची होती. त्यावेळी तिरोडकरांनी केलेली चित्रे ही पेंटींगचा एक उत्कृष्ट नमुना होती. उपयोजीत कला आणि पेंटींग या दोन्ही बाजूनी तिरोडकरांनी आपल्या कलेचा सुरेख संगम साधला होता. आणि आर्ट पेपरवर छापलेले मोठ्या आकाराचे  महाराष्ट्र शासनाचे हे कॅलेंडर एक अद्भुत नावीन्य ठरले. एरवी केवळ सुट्या पाहण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या भींती अडवून बसणारी ही शासकीय कॅलेंडरे, जेव्हां नवीन रूप घेऊन आली, तेव्हां त्यांनी शासनाचा दर्जाही वाढवला. अनेकांनी त्याचे स्वागत केले. कित्येक परदेशी पर्यटकांना, दूतावासांना ही भेट म्हणून  देण्यात आली.  शिकवताना तिरोडकर सर मांडीवर कागद लावलेला बोर्ड घेऊनच बसत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आपसूकच प्रात्यक्षिकाची जोड मिळत असे. मात्र कामाच्या वेळी विद्यार्थ्यांनी कामचुकारपणा केलेला त्यांना अजीबात खपत नसे. मग ते रुद्रावतार धारण करीत असत. मग त्या बोलण्यानेच तो विद्यार्थी खजील होत असे.

वर्गात तिरोडकर शिकवू लागले की, त्याची रसवंती वाहू लागे. संदर्भासाठी ते अनेक गोष्टी सांगत असत. कले इतकीच विद्वत्ता देखील दिसून येत असे. त्यात तत्वज्ञान असे, इतिहास असे, पुराण असे. त्यांच्या बोलण्यात समकालीन कलाकारांच्या कलाकृतीवर अभ्यासपूर्ण भाष्य असे. व या सर्वांची सांगड ते चित्रकलेशी जोडत असत. त्यांचे वाचनही भरपूर होते. त्यामुळे सखोल ज्ञान होते. स्केचिंगही आवड त्यांना कधी स्वस्थ बसू देत नसे. हातात बाळगायला सोपी म्हणून लहान आकारातील जाडजूड अशी स्केचबुक त्यांनी करवून घेतली होती. त्यामध्ये ते मानवी आकृत्यापासून ते पक्षी, प्राणी, फुले यांची विविध स्केचेस करीत असत. केवळ उंटाची त्यांनी अनेक स्केचेस केली होती. त्याच्या प्रत्येक अवयवाचा अभ्यास त्यातून दिसून येत असे. एखाद्याला पी.एच.डी. करण्याइतपत त्यांची ही स्केचबुक अभ्यास करण्याजोगी आहेत. वर्गात शिकवतांना ते बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना वेगवेगळी नांवे ठेवूनही बोलत असत. त्यांच्या तोंडी बसलेला त्यांचा आवडता शब्द म्हणजे 'हिंदुस्थान.'  त्यामुळे कित्येकदा कोणालाही ते 'ए  हिंदुस्थान' असे संबोधत. व हा शब्द त्यांच्या नावासोबत खूपच प्रसीद्धी पावला होता.   एकदा ते गेटवे  ऑफ इंडीया येथे स्केचिंगला गेले असता, तेथे त्यांना त्यांच्यासारखाच एक चित्रवेडा माणूस भेटला. ऑट्रेलियाहून आलेल्या त्या कलावन्ताला तेथील सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. सर्व खर्च सरकारचा होता. या कलाकाराने फक्त जगभर फिरून चित्रकला आविष्कृत करायची. दिल्ली, राजस्थान करत तो मुंबईला आला होता. तिरोडकरांनी आपल्या स्वभावाप्रमाणे त्याच्याशी मैत्री केली. तिरोडकरांची स्केचेस पाहून तोही भारावून गेला. व त्यांच्या सोबत आर्ट स्कुलला आला. तेथे त्याने तिरोडकरांच्यासमोर बसून त्यांचे पेन्सिलने स्केच केले. तिरोडकरांचे कानाजवळील पांढरे झालेले केस दाखवताना त्याने त्याने त्याजागी आधी टोकदार खिळ्याने रेषा उमटवल्या. व त्यावरून हलकीशी पेन्सील फिरवताच तो खोलगट झालेला केसांचा भाग पांढरा दिसू लागला. आणि कांही मिनिटातच त्याने  हे स्केच आटोपले. सहजगत्या केलेल्या या स्केचमधून तिरोडकरांच्या हातावरील शिराही पेन्सिलच्या हलक्या फिरवण्याने त्या कलाकाराने दाखवल्या होत्या. धन्य ते देश, जेथे कलावंताची कदर केली जाते. आपल्याकडे याची वानवाच आहे.

तिरोडकरांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी निघून गेले. त्यांचा मान ते सतत राखीत असत. त्यांचे बोलणेही थोडे सलगीचे व मैत्रीचे असे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ते नांवे ठेवून त्याप्रमाणे बोलवत. त्यातही प्रत्येकाला 'हिंदुस्तान' म्हणण्याची संवय तोंडात बसली होती. सर्वच विद्यार्थ्यांना हे आपुलकीचे वाटे. इंग्लीश भाषेचा आनंद होता, पण एकदा का त्यांचा हात  चालायला लागला, की मग बोले  ती त्यांची पेन्सिल अथवा कुंचला. आणि त्यांच्यातील या दैवी देणगीपुढे त्यांना सर्व गुन्हें माफ असत. विद्यार्थीही त्यांना गुरुस्थानी मानत. विशेषत: संस्थेची जेव्हां स्टडी टूर जात असे तेव्हां सोबत तिरोडकर सर असणे ही विद्यार्थ्यांना एक पर्वणीच असे. कारण त्यांच्यासोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लॅंडस्केप, पेंटींग करण्याची मजा कांही औरच असे. पण पुढे विदयार्थ्यांच्या पिढ्या बदलू लागल्या. तिरोडकर सरांचे काम, त्यातील मर्म ओळखणारी मुले कमी झाली. त्यांच्या पुरती त्यांची भाषा, त्यांचा 'हिंदुस्थान' शब्द यावरच तिरोडकरांची ओळख त्यांना राहीली. कारण तिरोडकर सरांची सर्जनशीलता, त्यांच्या कामाचा दर्जा ओळखण्याची त्यांची कुवतच नसे. आपल्यापेक्षा  कितीही खालच्या दर्जाचा माणूस असला तरी त्याच्याशी तिरोडकरांचं बोलणं एकदम अदबीचं असे. अन याचाच गैरफायदा कित्येकदा त्यांचे सहाय्यक असे घेत. आजही तिरोडकरांविषयी काहीही माहीती लिहिल्यास त्यावर 'हिंदुस्थान' हीच प्रतिक्रीया काही विध्यार्थी देत असतात. पण त्यांना गुरुतुल्य मानणारे देखील अनेक आहेत, ज्यांना त्यांच्या कलेची जाणीव आहे. त्यांच्याकडून ड्रॉईंग शिकल्याची आत्मप्रौढी आहे.  त्यांना गुरु मानून ते अजूनही त्यांची पूजा करतात. त्यांचे ऋण मान्य करतात. दरम्यानच्या काळात तिरोडकरांनी बोरिवलीच्या कृष्ण नगर येथे प्लॉट घेऊन त्यावर बंगला बांधला. अर्थात सर्व भावंडांचा यात सहभाग होता. व परळमधल्या चाळीतून ते बंगल्यात रहायला आले. पण तरीही त्यांच्यातील माणूस साधाच राहीला!

निसर्गाच्या ओढीने  तिरोडकर खूप फिरले. पेंटींग मधे त्यांचे अनेक मित्र असल्यामुळे तेथें त्यांचे जाणे नेहमीच असे. त्यामुळे सर्वच अध्यापक त्यांना मानत होते. त्यातही तेथील अध्यापक परेश धरू हा त्यांचा मित्र नाट्य क्षेत्राशी संबंधीत होता. तो व त्याचे काही मित्र नेहमी सुट्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी ट्रेकिंगला जात असत. सर्वच कला क्षेत्रातील असल्यामुळे तिरोडकरही त्यात सामील झाले. फिरण्याची आवड मुळातच होती. मग बऱ्याच वेळा ते हिमालयात जाऊन आले. राजस्थान, मध्यप्रदेश अश्या विविध ठिकाणी जाऊन त्यांनी भरपूर लॅंडस्केप केली. आपला वेळ ते कधीही फुकट घालवीत नसत. निसर्गाची आवड आणि तो कागदावर उमटवण्याची क्षमता यामुळे त्यांची लॅंडस्केपची आवड पूर्ण व्हायची. या निमित्ताने त्यांनी जवळ जवळ संपूर्ण भारत पायाखाली घातला. साडवेलकर कलासंचालक असतांना त्यांनी राज्यातील सुप्त असलेल्या कलांना लोकांसमोर आणण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केले होते. त्यासाठी योग्य माणसाकडे ते काम सोपवीत असत. एकदा त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील रास्त्यांच्या वाड्यातील व मेणवली येथील नाना फडणवीसांच्या वाड्यातील भित्तिचित्रांच्या प्रतिकृती निर्माण करण्याचे काम जेष्ठ चित्रकार गोंधळेकर  व तिरोडकर त्यांच्याकडे सोपवले. पुढे गोंधळेकरांची तब्येत बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तेव्हां तिरोडकरांनी ती सर्व जबाबदारी घेतली. मदतीला कांही विद्यार्थी घेतले. व कामाला सुरुवात केली. मध्ये मध्ये वेळ काढून ते मुलांना घेऊन लॅंडस्केपला जात. कारण मुलांना मोकळे न सोडता ती कामात असली की ती आपल्या ताब्यात असतात हा हेतू त्यामागे होता. आणि येथेही तिरोडकरांनी बरीच सुंदर अशी लॅंडस्केप काढली. तिरोडकरांची लॅंडस्केप एक उत्कृष्ट कलाकृतींचा नमुना मानली जातात.

अश्या या तिरोडकर सरांच्या हाताखाली पेंटींगचे दोन सहाय्यक शिक्षक होते. दोघेही मोठ्या मेहनतीने स्वतः अमूर्त अशी पेंटीग्स करीत असत. त्यांना काम करत असतांना पहाणे हे देखील मोठे मजेशीर असे. माचकट रंगामध्ये चित्रविचित्र आकारांनी लडबडलेलं त्यांचं ते पेंटींग चालू असे, तेंव्हा कांही स्ट्रोक्स मारल्यावर ते पाच पावले मागे जात, आपली मान डावी उजवीकडे वळवत स्तब्धपणे निरखत व पुन्हा जोमाने त्या पेंटिंगवर तुटुन पडत. तिरोडकर मधे मधे त्यांच्या फिरक्या घेत असत. आम्हांला कांहीच बोध होत नव्हता त्या पेंटींग मधून. ना रंगाचा आनंद, ना आकाराची अनुभूती. आणि एक दिवस तिरोडकरांनी त्याच रूममध्ये एका कॅनव्हास इझलवर चढवला. आमच्यापैकी खांबेकर याला मॉडेल म्हणून बसवले , अन त्याचे एक सुंदर पोर्ट्रेट केले. या तिरोडकरांच्या पोर्ट्रेटचा या दोघा अभिजात कलावंतांवर असा काही परिणाम झाला की त्यानंतर त्या दोघांनीही तिरोडकरांसमोर आपली अमूर्त चित्रकला निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही.  यानंतर तिरोडकरांनी कांचन चंदावरकर या विद्यार्थीनीचे डोक्यावर टोपी घातलेले पोर्ट्रेट केले. तसेच कॅंटीनच्या वसंतचे क्युबीझम मध्ये एक वेगळेच पोर्ट्रेट त्यांनी साकारले. तिरोडकर सरांनी एवढे अफाट काम केले आहे की आम्ही त्यांना त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करून तुमची कला रसिकांसमोर आणा म्हणून मागे लागलो होतो. पण त्यांची ती प्रवृत्तीच नव्हती. स्वतःची प्रसीद्धी करण्यामागे ते कधीच लागले नाहीत. आणि त्यांची चित्रे लोकांसमोर आलीच नाहीत. 



अखेर तिरोडकर पेंटींग विभागाचे विभागप्रमुख म्हणून फाईन आर्ट मध्ये नियुक्त केले गेले. जवळ जवळ उपयोजीत कला विभागाचा वीसएक वर्षांचा सहवास तुटला. हळू हळू येथील त्यांचे मित्रही कमी होऊ लागले. त्यांच्या वेळचे सर्वच वरिष्ठ निवृत्त झाले. फाईन आर्टला गेल्यावर त्यांचे वरीष्ठ पद असल्याने त्यांचा वर्गाशी, पर्यायाने विद्यार्थ्यांशी संबंध कमी राहीला. प्रशासकीय काम वाढले.  मग पुन्हां त्यांच्या पूर्वीच्या भटकंतीच्या आवडीने उचल घेतली. पुन्हा हिमालय आदी ठिकाणी सुटीमध्ये जाऊन लॅंडस्केप होऊ लागली. आणि अखेर आपली स्कूल ॲाफ आर्टमधील सुमारे तीस वर्षांची सेवा संपवून
१ ऑक्टोबर १९८९  रोजी ते सर सर जे. जे.स्कूल ऑफ आर्ट मधून निवृत्त झाले. आम्ही त्यांना आमचेच मानत असल्याने उपयोजीत कला संस्थेतर्फे त्यांना आम्ही भावपूर्ण निरोप दिला. तसेच पुढे जे.जे.चे एक कर्तबगार गुरुतुल्य कला शिक्षक,  एक निपूण कलाकार, एक दिलखुलास मित्र, निर्मळ मनाचा एक अजातशत्रू या सर्व नात्यांनी त्यांचा व सोबत त्यांचे मित्र  प्रा. षांताराम पवार या दोघा जिवलग मित्रद्वयांचा संस्थेतर्फे माजी अधिष्ठाता प्रा. हरीभाऊ हणमंते यांच्या हस्ते सत्कार केला. गेल्या कांही वर्षांपूर्वी मी त्यांना घेऊन विरारच्या 'विवा' कॉलेज मध्ये त्यांचे व्याख्यान व प्रात्यक्षीक अश्या कारणासाठी घेऊन गेलो होतो. तेंव्हा त्यांनी तो संपूर्ण दिवस आम्हांला जे.जे.उपयोजीत कलेतील गत स्मृती जाणवून दिल्या. अजूनही आपल्या बोटात तीच ताकद आहे, मनांत तीच उमेद आहे, आणि आपण अद्यापही त्याच जोमाने काम करत आहे, हेच त्यांनी त्या दिवशी जाणवून दिले. निवृत्ती नंतरही त्यांना अनेक आर्ट स्कूल मधून प्रात्यक्षीकासाठी आमंत्रणे येत असतात. व आज या वयातही ते ती संपूर्ण आत्म विश्वासाने करतात.

पण मनांत विचार येतो की अशा या सर्जनशील, हरहुन्नरी कलावंताला जे.जे.ने काय दिले? ना मान, ना सन्मान! अशी माणसे जपण्याची असतात हे कळणारे कलासक्त लोक शासनात आणि कलाशाळेत येतील तोवर हे असेच चालायचे. पण उद्या जर कोणी जे.जे.स्कूलचा  इतीहास लिहिण्यास बसेल त्यावेळी जे.जे.ला प्रतिष्ठा देण्याचे, ती संस्था वाढवणाऱ्या कलाकारांची जेव्हां नांवे कोरली जातील, त्यामध्ये प्रा. चिंतामण विष्णू तिरोडकर हे नांव नक्कीच अग्रभागी राहील.

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

Comments

  1. समर्पक वर्णन एक प्रगाढ चित्रकार, शिक्षक, प्राध्यापक, गुरू आणि चित्रमहर्षी. त्यांच्या प्रेमाचा सर्व प्रसाद आणि आविष्कार मिळालेला मी त्यांच्या स्मृतींनी उल्हासित असतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…